Thursday, January 21, 2010

(शोधा)शोध

प्रसन्न सकाळ.. छान उन बिन पडलेलं. जास्त उकाडा नाही कि विशेष गारवा नाही अशी मोहक हवा. तो सकाळी नाश्ता वगैरे करून त्याच्या नेहमीच्या आवडत्या बागेत येऊन पोचला. चांगलं हिरवंगार, भरपूर सावली असलेलं आणि खाली चांगली हिरवळ असणारं झाड शोधून त्याखाली त्याने बैठक मांडली. आजूबाजूच्या रंगीबेरंगी फुलांचा मोहक गंध आणि छोट्या छोट्या पक्षांची गोड किलबिल कानांना, गात्रांना, मनाला सुखावत होती. निसर्गाचा आस्वाद घेता घेता तो नेहमीप्रमाणेच विचारांच्या राज्यात गढून गेला. त्याचं असं हे नेहमीच व्हायचं. कुठेही, कधीही. मनात नाना त-हेच्या आवडत्या विचारांची गर्दी झाली की तो त्याचा रहात नसे. आणि त्यात पुन्हा एवढा सुंदर नयनरम्य निसर्ग, ती बाग, प्रसन्न सकाळ म्हणजे तर त्याच्या साठी सोन्याहुन पिवळं असं होतं. आपल्या मनाला विचाररुपी अश्वावर बेलगाम सोडून देऊन तो अगदी स्वेच्छेने आणि आवडीने त्या विचारांच्या मागे जात असे.

त्यादिवशी असंच झालं. नेहमीप्रमाणे विचारांच्या जत्रेत हरवला असताना अचानक त्याचं लक्ष एका अगदी छोट्याशा वाटणाऱ्या घटनेने वेधून घेतलं. अर्थात तुमच्याआमच्या सारख्या अतिसामान्य जनांना सामान्य भासणारी घटना त्याच्या दृष्टीने फार फार महत्वाची, विचार करायला लावणारी आणि (त्याच्या आणि जगाच्या)  इतिहासाला कलाटणी देणारी होती. झालं काय की तो विचारात गढलेला असला तरी डोळे, कान, नाक आपापली कामं करत होते. (म्हणून तर सुरुवातीला म्हटलेली सुंदर फुलं, त्यांचा सुवास, पक्ष्यांची किलबिल त्याला जाणवली ना.) तर डोळ्यांनी एका सामान्य घटनेचा वेध घेतला. समोरच्या झाडावरून एक फळ हलकेच तुटून पडलं आणि जमिनीवर येऊन स्थिरावलं. झालं. त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरु झालं. हे फळ पडलंच का? पडलं तर खाली का पडलं वर का पडलं नाही? तर अशा अनेक काकांनी (का कां नी) त्याच्या मनात वादळ उत्पन्न केलं. आणि ही एका महान शोधाची नांदी होती. असा शोध जो मानव जातीला पुढची करोडो वर्षे उपकारक ठरणार होता, अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं देणार होता, अनेक विषयांवरील संशोधनाला कलाटणी देणार होता. आणि तो शोध म्हणजे.....

त्या शोधाची "खरी" माहिती सांगण्यापूर्वी एक सर्वमान्य आणि प्रचलीत शोध सांगतो. तो म्हणजे गुरुत्वाकर्षण. तुम्हालाही अगदी हेच वाटलं ना? कारण आपल्याला हेच शिकवलं जातं. (साला बदला रे हा इतिहास.. मेटे, खेडकर ऐकताय का?).. पण तो शोध म्हणजे गुरुत्वाकर्षण नाहीच्च मुळी. गुरुत्वाकर्षण हा काय शोध आहे? तो काय कोणीही लावला असता. आपलं गॅलीलीओ होता,  गॅलीलीओ नाही तर आर्किमिडीज होता. तो पण नाही तर गेला बाजार जेम्स वॅट तर होताच. एवढे ढीगाने शोध लावले या लोकांनी. त्यात सफरचंद पडताना बघून ते गुरुत्वाकर्षणाने पडतंय हे सांगायला काही कोणा शास्त्रज्ञाची गरज होती का? नाही...

तर मग खरा शोध काय होता? पुन्हा बघू. तो विचारात गढलेला, सफरचंद खाली पडलं, त्याने लगेच गुरुत्वाकर्षणावर प्रबंध लिहून काढला. इतकं सोप्पं होतं ते. पण त्याने तो प्रबंध का लिहिला, त्यामागची प्रेरणा काय होती? तर ते पडतं फळ त्याला आवाहन करत होतं, आज्ञा करत होतं. आणि ती आज्ञा मानून त्याने तो प्रबंध लिहिला. तर मुख्य शोध होता "अमृतातेही पैजा जिंकणा-या" भाषेला "पडत्या फळाची आज्ञा" या म्हणीरुपी एक महान अलंकार प्राप्त करून दिला तो माणसाने. आता तुम्हाला वाटेल काय हे. काय फालतूपणा आहे हा. हा काय शोध आहे का? पण बघा ही म्हण शोधणं एवढं सोप्पं होतं तर मगाशी उल्लेखलेल्या  (आणि न उल्लेखलेल्या) त्याच्या अनेक मित्रगणांनी ती आधीच का नाही शोधून काढली बरं? मला ठाउक आहे की तुम्हाला अजूनही माझं म्हणणं पटणार नाही. आता खाली दिलेली उदाहरणं बघा. जर "पडत्या फळाची आज्ञा" ही म्हण, हा सुविचार आपल्या भाषेत नसता तर खालील महान व्यक्तींनी त्या त्या कोड्यात टाकणा-या प्रसंगांच्या वेळी काय उत्तर दिलं असतं? मला नका सांगू उत्तर. तुम्ही स्वतःशीच विचार करा आणि माझं म्हणणं चूक कि बरोबर ते ठरवा. (हे असं म्हटलं की जाम बरं असतं बाबा)

१. सोनिया गांधी मनमोहन सिंग यांना जेव्हा म्हणाल्या (असतील) "मी नाही बावा पंतप्रधान होत. तुम्हीच व्हा कसे."

२. संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री आणि युद्धाशी संबंधीत असलेल्या सगळ्या अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या खात्यांचे मंत्री बुश कडे जाऊन जेव्हा म्हणाले (असतील) "दादा, त्या सद्दामकडे रासायनिक आणि कसली कसली अस्त्र आहेत. त्याच्यावर हल्ला केला पायजेल "

३. नारायण दत्त तिवारींची "मैत्रीण" जेव्हा त्यांना म्हणाली (असेल) "मी ना गडे तुम्हाला तुमच्या ऑफिस मध्ये नाही भेटत. राजभवनाच्या बेडरूम मध्येच भेटते. चालेल?"

४. बाळासाहेब ठाकरे जेव्हा राजू परुळेकरला म्हणाले (असतील) "अरे राजूबा, हा सचिन जाम वटवट करतोय. मार की थोडे फटकारे"

५. मणीशंकर अय्यर जेव्हा पक्षबैठकीत म्हणाले (असतील) "अरे त्या सावरकराच्या नावाची पट्टी कशाला पायजे रे अंदमानात"

६. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा  सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे "मासिक भत्तेवाढ आणि नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना फुकट विमान प्रवास करू दिला जावा" असा प्रस्ताव मांडला (असेल) तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणाले असतील?

७. शरद पवार ललित मोदींना जेव्हा म्हणाले (असतील) "भाया ललित, तुला आय पी एल साठी माझी जी काही मदत लागेल ती बिनधास्त सांग. वेळचवेळ आहे आपल्याकडे. कृषीमंत्री म्हणून तसंही मला "१५ दिवसात धान्याचे भाव कमी होणार", "३ महिन्यात साखरेची टंचाई निर्माण होणार" असल्या भविष्यवाण्या करण्याशिवाय काय काम असतं "

८.विधू आणि आमीर जेव्हा चेतनला आणि महेश जेव्हा मराठा महासंघाच्या गँगला आणि अवधूत जेव्हा नितीशला म्हणाला (असेल) की "जाम मंदी आहे राव. नुसती जाहिरातबाजी करून पैसा वसूल होणार नाही. कायतरी वाद घातला पायजे."

९. दाउद, छोटा/मोठा/मधला राजन/शकील/मिरची जेव्हा दया नायकला म्हणाले (असतील) "अब्बे तू गोलिया उडाते रेह और नोट गिनते रेह. बाकी आप्पून संभालेगा "

१०. नारायण राणेंचे व्यक्तिगत सल्लागार जेव्हा त्यांना म्हणाले (असतील) की "नारूसाहेब, या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय कर्जबाजारीने नाय होतं. दारू पितात लेकाचे. त्यामुळे होतात आत्महत्या. पण कोणीतरी हे बोललं पाहिजे"

तर आता मला सांगा "पडत्या फळाची आज्ञा" या सुवर्ण म्हणीचा शोध त्याने लावला नसता तर या वरच्या सगळ्या प्रश्नांना त्या त्या व्यक्तीने काय उत्तरं दिली असती? "हो", "चालेल, "बरं", "सहीच", "मस्त", "झालं म्हणून समजा" अशी काहीतरी बावळट, अळणी उत्तरं द्यायला लागली असती की नाही? अजूनही पटत नसेल तर या सगळ्या प्रश्नांना "पडत्या फळाची आज्ञा" ऐवजी "गुरुत्वाकर्षण" असं उत्तर देऊन बघा. लागतोय काही अर्थ? नाही ना? मग आता तुम्हीच मला सांगा की "गुरुत्वाकर्षणाचा" शोध जास्त महान की "पडत्या फळाची आज्ञा" या अलंकाराचा शोध महान?

आणि हे मीच म्हणतोय असं नाही. आयझॅकने त्याच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख केलाय की गुरुत्वाकर्षणा पेक्षाही त्या म्हणीचा शोध हा माझ्या दृष्टीने महान होता. पण लोकांना तो कळलाच नाही अशी खंतही त्याने पुढे व्यक्त केली आहे. विश्वास बसत नसेल तर इथे क्लिक करून बघा. असो. आणि या महान शोधाबद्दल तुम्हाला यापूर्वी माहीत नसेल तर आपला मराठी भाषा या विषयातला "म्हणींचे शोध" या उपवर्गातला अभ्यास आणि वाचन हे फार्फार कमी आहे असं खुश्शाल समजा.

क्रमशः
(असे अजून इतर महान परंतु मानवजातीला विशेष माहीत नसलेले आणि माहीत असतील तरीही दुर्लक्षिले गेलेले शोध जगासमोर आणणे हा या लेखमालेचा उद्देश आहे. तर असे इतर शोध आमच्या शोधखात्याला गवसताक्षणीच त्यांची योग्य ती छाननी करून आणि सगळे पुरावे, घटना तपासून ते आपल्या पुढे मांडले जातील. तोवर.... शोधत राहा.. शोधा म्हणजे सापडेल.. इति आलम...)

महत्वाची टीप : सावरकर म्हणजे माझं दैवत आहे. त्यांचा एकेरी उल्लेख हा फक्त प्रसंगाच्या गरजेसाठी केला आहे. त्यांचा कुठेही यत्किंचितही अपमान करण्याचा हेतू नाही.

18 comments:

  1. saheech shodhaachaa shodh laavalas ki!

    :D :D :D

    ReplyDelete
  2. चाबुक लेख, कुठे बाथरुम मध्ये पडत्या फळाच्या आज्ञावरुन आठवला का ?

    ReplyDelete
  3. अग, या शोधाचा शोध कधीच लावला होता मी. प्रबंध फक्त आज लिहिला :-)

    ReplyDelete
  4. हा हा हा.. आनंद, नाही रे. कधी कधी बाथरूम बाहेर पण सुचतात थोडे फार बरे विषय. अर्थात बाथरूम मध्ये सुचला असता तर अजून जास्त चाबूक झाला असता :-)

    ReplyDelete
  5. धन्यवाद सुषमेय !!

    ReplyDelete
  6. वा.वा.. हेरंबराव. हा पण एक शोधच आहे की. हेहे..

    बाकी मी असतो ना तिकडे आणि ते फळ हलकेच माझ्यासमोर तुटून पडलं असतं ना.. तर मी त्या फळावरच तुटून पडलो असतो.

    हाहा... शेवटी खाण्यासाठी जन्म आपुला ... :D

    ReplyDelete
  7. हो ना शोधाचा शोध :-)
    हा हा. वाचला बाबा एका सफरचंदाचा जीव ;-)

    ReplyDelete
  8. ह्म्म्म...चांगली शोधाशोध आहे बाबा....इथं सफ़रचंदाची झाडं पाहिलीत किती सफ़रचंद लगडली असतात ते..ते नेमकं एक सफ़रचंद पडेल हेच मुळी मला पटत नाहीये आता....एकावेळी वारा आला की टपटप आणि वारा आला नाही तरी चार-पाच तरी सटासट पडतीलच आणि मग शोध राहिला बाजुला पहिले त्यातलं चांगलं पाहून खायचेच विचार येतील...हे शोध ना जरा असं काहीपण घडलं होतं का??? :)
    बाकी काय लेख उत्तम हे सांगणे नलगे...उगाच आठवलं अल्केमिस्ट सचिन प्रकरणानंतर बंदच पडलं ना ??(आणि तेही टाटा बाय बाय न करता....)

    ReplyDelete
  9. अग १ पडलं काय नि ४ पडली काय साहेबांनी म्हणीचा (सॉरी गुरुत्वाकर्षणाचा) शोध लावला हे महत्वाचं.. वा. तू आणि रोहन म्हणजे अगदी सारखे आहात.. सफरचंद खाण्यावर तुमचं एकमत :)

    आणि राजूला (माझ्यासारखंच) बऱ्याच जणांनी ठोकलं असणार चांगलं त्यामुळे टाटा बीटा न करता पळून गेले असणार महाशय..

    ReplyDelete
  10. गुरुत्वाकर्षणाच्या शोधापेक्षा हा शोध महान आहे.. [:)]
    उदाहरणही मस्त आहेत.बाकी सफ़रचंदाबाबत माझी भुमिका अपर्णा आणी रोहन हयांच्यपेक्षा वेगळी नाही...

    ReplyDelete
  11. हा हा :-)
    ही सगळी उदाहरणं खरंतर फार दुर्दैवी आहेत. (म्हणून तर मी या पोस्टला "ब्लॅक कॉमेडी" असंही टॅगलंय)
    मी अपर्णा आणि रोहनल बोललो खरं पण प्रामाणिकपाने सांगायचं तर मीही तुमच्याच टीममधे आहे ;-)

    ReplyDelete
  12. http://fekafeki.com/ ही लिंक उघडत नाही. काही चुकलंय कां?
    "७वा" मुद्दा लै भारी!!! :) बाकी पण छानच आहेत पण ...:)

    ReplyDelete
  13. बाकी 'सफरचंदाने' तसे बरेच शोधांना जन्म दिलाय.मनुष्यजन्म हा अॅडम-ईव ने चुकुन खाल्येल्या सफरचंदाचीतर देण आहे.

    ReplyDelete
  14. हा हा.. पुन्हा (पुन्हा) क्लिक करून बघा :P

    बाकी ग्रह-शिरोमणी, राज-ज्योतिष पवारांविषयी काय सांगणे :)

    ReplyDelete
  15. @योगेश, अरे हो. हे लक्षातच आलं नव्हतं. या "शोधा"चा शोध पण घेतला पाहिजे आता :)
    बाकी सफरचंदाचा महिमा अपार आहे हे खरंच !!

    ReplyDelete
  16. लय भारी मित्रा, मस्त झालाय लेख. पवारांनी आज काल पुन्हा एक भविष्यवाणी केली की दुध महाग होणार आणि लगेच आज पासून दुध महाग ही झालं. तितक्यात पवार साहेब म्हणाले की मी २०२० सालाचं बोलत होतो. आता एवढा महान(?) द्रष्टा नेता असं म्हणतो तर कुणाला दाद मागायची आम्हा सामान्य लोकांनी. तुझा प्रबंध मस्त जमलाय पण.

    -अजय

    ReplyDelete
  17. धन्यवाद रे अजय !! बरोबर बोललास. अशा "द्रष्ट्या" नेत्यांचं दूरदृष्टित्व ओळखणं आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या कुवतीच्या पलीकडचं आहे. आपण आपली (भाव वाढलेली) सफरचंद खायची.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...