Wednesday, January 6, 2010

दोन छोट्या (पौराणिक) शंका

नारद मुनींच्या उपदेशाने पश्चाताप झालेला वाल्या कोळी तप करायला बसला आणि १२ वर्षं तप केल्यावर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला.वाल्मिकी ऋषींनी "रामायण" लिहिलं. त्यानंतर रामजन्म, स्वयंवर, सीता हरण, राम-रावण युद्ध, रावणाचा वध वगैरे वगैरे गोष्टी रामायणात सांगितल्याप्रमाणे घडत गेल्या.

ओके. रिवाईंड रिवाईंड....

 नारद मुनींच्या उपदेशाने वाल्या कोळ्याचे डोळे उघडले. तो नारद मुनींना शरण गेला तेव्हा त्यांनी त्याला १२ वर्षं "राम राम" असा जप करायला सांगितला. वाल्या कोळ्याने केलेल्या अनेक पापांमुळे त्याला "राम राम" (देवाचं नाव असल्याने) म्हणता येईना. तेव्हा नारद मुनींनी त्याला "मरा मरा" असं उलट म्हणायला सांगितलं जेणे करून आपोआपच त्याच्या तोंडून देवाचं नाव येईल. अशा तऱ्हेने १२ वर्षं तप केल्यावर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला.

शंका क्र. १ : वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर श्रीरामाचा जन्म झाला हे लक्षात घेतलं तर नारद मुनींनी वाल्या कोळ्याला (कमीत कमी) १२ वर्षांआधीच  रामाचा जप करण्यास सांगितलं हे कसं शक्य आहे? तेव्हा तर राम (राम नावाचा देव) अस्तित्वातच नव्हता.

शंका क्र. २ : वाल्मिकींनी आधीच लिहिलेलं रामायण श्रीरामाच्या काळात कोणीच कसं बघितलं नाही. ते बघितलं असतं तर कदाचित सीता हरण, सीतेला वनात सोडणे यासारखे प्रसंग टाळता आले असते. नाही का?

डिस्क्लेमर :
१. मी नास्तिक नाही. माझा देवावर विश्वास आहे.
२. मी अ.नि.स. किंवा इतर कुठल्याही तत्सम संस्थेशी/संघटनेशी संबंधित नाही.
वर दिलेले प्रश्न हे मला जेन्युईनली पडलेले प्रश्न आहेत.

31 comments:

  1. काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. रामायण घडले त्रेता युगात. म्हणजे ८६४००० वर्षांपूर्वी. त्याला श्लोकबध केले वाल्मिकी ऋषींनी इ.पू ६०० वर्षापूर्वी.
    वाल्मिकींनी लिहिल्यानंतर रामायण घडत गेले हा तुमचा समज चुकीचा आहे.

    ReplyDelete
  2. निश्चित कालावधी मला माहित नाही. पण वाल्मिकींनी रामायणात जसं लिहिलं तसंच पुढे घडलं असंच मी कायम वाचलं आहे. जमलं तर गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात बघा आजच्या तारखेच्या (६ जानेवारी). तिथेही तसाच उल्लेख आहे.

    ReplyDelete
  3. ते प्रवचन कुठे शोधायचे हे मला ठाऊक नाही. जर त्यांचं तसं म्हणणं असेल तर हा तुमचा प्रश्न प्रवचनकर्त्यांनाच विचारणं योग्य होईल. किंवा तुम्ही ऐकलेली नारद-वाल्मीकी राम राम "मरा मरा" कथा खोटी असु शकते. "मरा मरा" मराठी शब्द गृहित धरले तर मराठीचा इतिहास पाहता मराठी वाल्मिकीच्या काळात नक्कीच नव्हती.

    ReplyDelete
  4. कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात "गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं" मिळतात.
    आणि अर्थात मी ऐकलेली माहिती चुकीची असेलही.त्यातला "मरा मरा -राम राम" चा भाग सोडला तरी वाल्या कोळ्याला नारद मुनींनी रामनामच घ्यायला सांगितलं होतं. (अर्थात हे ही मी ऐकलेलं/वाचलेलंच आहे) आणि त्यामुळेच रामायणाच्या कालावधीच्या अनुषंगानेच मला ते प्रश्न पडले होते/आहेत.

    ReplyDelete
  5. तरी सांगितलं होतं की सोप्या गोष्टी सांगत जा मुलाला म्हणजे अशा कु(?)शंका येणार नाहीत....

    ReplyDelete
  6. Please check this article, it might help: http://mr.upakram.org/node/2180

    ReplyDelete
  7. हा हा :) .. अग या माझ्याच शंका आहेत. पिल्लुला त्याच्या गोष्टी चालूच आहेत.. (अर्थात त्याला माझ्या गोष्टींबद्दल असलेल्या प्रश्न/शंका कळायला अजून वेळ आहे म्हणा. साहेब बोलत नाहीयेत तोवर :) )आणि कमेंट्स देणाऱ्या मित्रांच्या मदतीने माझ्या काही शंका दूर होताहेत.

    ReplyDelete
  8. धन्यवाद अनामिक. वाचून बघतो..

    ReplyDelete
  9. marathi madhe type hot nahi tujhya blog var . ki board chalane band hote ...
    kashala asale vichar karit basatos? tyaa yugaat kaay jhaale aselm an kase te kadhic samajaNar nahi. ani tyaa kalat pan mete ani khedkar sarakhe lok asatil mhanun itihas badalalaa gela asel.. :)

    ReplyDelete
  10. प्रिय अनामिक, आत्ताच त्या दुव्या वरील माहिती वाचून बघितली. पण त्याखाली दिलेल्या कमेंट्स मधले बरेचसे मुद्दे त्या माहितीला खोडून काढणारे आहेत. असो.

    ReplyDelete
  11. काका, आता होतंय का बघा मराठीत टाईप.
    काही नाही हो. सहज विचार आला होता डोक्यात. तो खरडला :) .. आणि मेटे, खेडकरांबद्दलचं तर अगदी बरोबर लिहीलयत तुम्ही.

    ReplyDelete
  12. मी एका अध्यात्मक्षेत्रातील व्यक्तीला या विषयी विचारले. त्यावरून जे कळले वा वाटले ते असे:

    1. नारदमुनींनी वाल्मिकीला रामायण कथा सांगितली होती. याचा अर्थ रामजन्म पूर्वीच होवून गेला होता. हिंदू धर्मशास्त्राच्या मतानुसार हे जग अखंड चालत आहे. त्याला आदी किंवा अंत नाही. त्यात कल्प, युगे ही संकल्पना आहे. अनेक राम, अनेक कृष्ण, अनेक हनुमान त्या त्या कल्पात आणि कल्पातल्या युगात आजवर होवून गेले अशी कल्पना आहे. नारदानी वाल्मिकीला ज्या रामाची कथा सांगितली तो वाल्मिकीच्या कल्पातील नसून त्यापूर्वीच्या कल्पातील असावी. ब्रह्मदेवाने वाल्मिकीला असा वर दिला होता कि तुला भुतकाळातील कोणतीही घटना बघता येईल आणि तु लिहिशील ते खरे होईल. असे वाटते की वाल्मिकीने या सिद्धींचा वापर करून पुर्वकल्पातले रामाचे आयुष्य बघितले आणि त्याच्या युगात शब्दबद्ध केले. 'तु लिहिशील ते खरे होईल' या वरामुळे त्याच्या वेळी जो राम जन्मला तो वाल्मिकीने लिहिलेले आयुष्य जगला.

    2. नॉंस्टरडमस ने लिहिलेली भविष्ये बर्‍याचअंशी खरी निघतात असे म्हणतात. पण म्हणून आपण त्याने वर्तविलेल्या गोष्टी खोट्या ठरविण्यासाठी धडपडतो का?


    मला जे समजले ते बरोबरच असेल असे माझे म्हणणे नाही पण मला स्वतःला ते पटले (निदान याहून चांगले स्पष्टिकरण मिळेपर्यंत तरी)

    ReplyDelete
  13. नमस्कार अनामिक. बाप रे.. अनेक राम, अनेक कृष्ण, अनेक हनुमान हि कल्पनाच मला सर्वस्वी नवीन आहे :-) ..
    आणि उलट बरं झालं तुम्ही तुमचं मत मांडलत ते. मी तर असं अजिबातच म्हणत नाहीये की मी जे म्हणतोय ते खरं/योग्य आहे. मी फक्त माझ्या शंका उपस्थित केल्या.. आपला दुसरं मुद्दा (नॉंस्टरडमसचा) मला नीट कळला नाही.

    ReplyDelete
  14. मला तुझी शंका समजली पण दोन तीन युगं पाठीमागे जायचा कंटाळा आला होता. पण तुझ्या भावना समजल्या :-)

    तू चालूदेत तुझं, शंकेचं निरसन झालं की उत्तर ही ब्लॉग वर दे. मला काही सकाळी सकाळी माझ्या मेंदूला झोपेतून जागं करावंसं वाटत नाही नाहीतर मीच केलं असतं या शंकेचं निरसन. :-)

    बाय द वे, काही दिवसांपूर्वी माझ्या ही डोक्यात एक शंका अवतरली होती. रामाकडे हनुमानासारखे भलेमोठे पर्वत उचलणारे असतानासुद्धा लंकेला जाण्यासाठी सागरात एक एक दगड टा़कूनच का बरं रस्ता बनवावा लागला जर असे पर्वतच टाकले असते तर सीता लवकर नसती का सुटली ?

    -अजय

    -अजय

    ReplyDelete
  15. अजय, कमेंट्स मध्ये थोडी फार उत्तरं मिळतायत. अर्थात माझा पण असा काही अट्टाहास नाहीये कि उत्तरं मिळायलाचं हवीत वगैरे.. (म्हणजे मिळाली तर उत्तमच.).. मी आपलं जे डोक्यात आलं ते खरडून टाकलं :) .. आणि हो तुझी शंका पण एकदम रास्त आहे रे :-) .. आपल्या अशा अनेक शंकांची उत्तरंच मिळत नाहीत. माझ्या डोक्यात तर रामायण, महाभारत बद्दल अशा अनेक शंका असतात. पण बऱ्याच शंकांना उत्तरंच मिळत नाहीत. असो.

    ReplyDelete
  16. मध्यंतरी महाभारतातील एक शंका माझ्याकडे इमेल मध्ये आली होती, पण ती शंका विचार करण्यासारखीच होती
    इथे लिहीत नाही कारण ती इथे लिहीण्यासारखी नाही :-)

    असो.

    -अजय

    ReplyDelete
  17. मी मागे गणेश पुराण वाचल होत त्यातही अनेक ब्रम्ह,विष्णु,महेश,इतर देव,राक्षस ही संकल्पना आहे.

    ReplyDelete
  18. आपला दुसरा प्रश्न होता की सीता हरण वगैरे टाळता आले नसते का. ज्याप्रमाणे नॉस्टरडॅमसची भविष्ये खरी ठरतात (असे गृहीत घरून मी केवळ उदाहरण म्हणून हे देत आहे) तरी लोक ती टाळण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत त्याचप्रमाणे वाल्मीकी रामायणातील गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्न झाले नसावेत असे मला म्हणायचे होते. किंवा अशीही शक्यता आहे की त्याकडे 'काव्य' असेच बघितले गेले असेल 'भविष्य' म्हणून नाही.

    ReplyDelete
  19. अजय, ह्म्म्म.. आलं लक्षात ...

    ReplyDelete
  20. अच्छा. ही अनेक देवांची माहिती माझ्यासाठी एकदमच नवीन आहे, देवेंद्र.

    ReplyDelete
  21. अनामिक, आता आलं तुमचं नॉस्टरडॅमस बद्दलच उदाहरण लक्षात. धन्यवाद.

    ReplyDelete
  22. माझ्या माहितीप्रमाणे साधकच्या Comment#1 ला मी सहमत.
    बाकी अजयची पहिली शंका अगदी योग्य आहे. साधा सोपा उपाय होता तो. पण बहुतेक त्या वेळच्या प्रोजेक्ट मॅनेजरनीं वानर सेनेला काही टास्क असाइन करायला हवे म्हणून हनुमानाकडून पर्वत टाकून घेण्यापेक्षा समस्त वानर सेनेकडून "सेतु" बांधून घेतला असेल.
    अजयची दुसरी शंका मला देखील कळली. Its a logical mistake.

    ReplyDelete
  23. सिद्धार्थ, आभार.. एकूणच बरीच मत-मतांतरं आढळताहेत.

    ReplyDelete
  24. रमयति इति राम ही राम या शब्दाची व्युत्पत्ती आहे. रामाला ते नाव नंतर ठेवले गेले.
    रामायण हे प्रत्यक्ष राम-रावण युद्धावर केलेले रूपक असून त्यात पितृपूजक तत्त्वज्ञान मानणारा (सुख-दुःख फक्त जागृत स्थितीत अनुभवता येते हे तत्त्वज्ञान मानणारा) रावण व मन हेच सुख-दुःखाचे कारण मानणारा राम यांचा लढा वर्णन केला आहे. ही लढाई तत्त्वज्ञानाच्या पातळीवर अनेकदा लढली गेली व तिचा निर्णय रामाच्या तत्त्वज्ञानाचा विजय हाच होता. ही बाब अधिक ठसविण्यासाठी वाल्मिकीने लिहिल्याप्रमाणे रामायण घडले असे म्हटले जात असावे.

    ReplyDelete
  25. अनामिक, हा एकदम छान अर्थ सांगितलात. हे बऱ्याच अंशी पटण्यासारखं आहे.

    ReplyDelete
  26. माझे ह्या बाबतीत ज्ञान खुपच कमी आहे. पण मला वाटते राम नावाचा देव अस्तित्वातच नव्हता. 'राम' नावाचा पूर्णपुरुष राजा मात्र होता. कित्येक कोटी वर्षात आपण त्याला देव बनवले. कारण होते - त्याचे चरित्र. आत्ताच शिवरायांची मंदिरे उभी रहत आहेत. कोण जाणे १०००-५००० वर्षांनी ते सुद्धा देव असतील... :(

    अवांतर होते हे तरी सुद्धा सांगावेसे वाटले...

    ReplyDelete
  27. हा विचार आवडला. असही झालं असेल. मलाही नक्की माहित नाही. पण बऱ्याच प्रतीक्रीयांमधून बरंच काय काय कळलं !!

    ReplyDelete
  28. Dada
    Dusar kahi nahi ka Vichar karayla?
    Nasta khurak dokyala.....

    ReplyDelete
  29. :) अरे असंच कधीतरी अधून मधून विचार करतो मी ;-)

    ReplyDelete
  30. काही महाभारताशी संबंधित शंका:
    १. द्रौपदीवस्त्रहरण होताना दुर्योधनाच्या संपूर्ण राजसभेने पाहिलं होतं, पण त्याविरोधात कोणीही ब्र देखील काढला नव्हता. पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांसारखे अतिरथी-महारथीही मूग गिळून गप्प राहिले होते. राजाशी एकनिष्ठ राहणं या धर्माचं त्यांनी पालन केलं होतं. पण एखाद्या स्त्रीची अब्रू लुटली जात असताना तिचं रक्षण करणं हे धर्माचं बेसिक तत्व नव्हे काय? म्हणजे धर्म पाळण्याच्या नावाखाली या सगळ्यांनी प्रत्यक्षात धर्माचं उल्लंघनच केलं होतं की! का धर्मातही वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रत्येक प्रकाराला वेगळी प्रायॉरिटी लेव्हल असते?

    २. सम्राट युधिष्ठिराने द्युतात आपल्या भावांना आणि बायकोला पणाला लावलं होतं. आवडले नाहीत म्हणून किंवा आणखी कुठल्याही कारणासाठी दुसर्‍याला द्यायला बायको आणि भाऊ या काही दुकानात विकत मिळणार्‍या गोष्टी नव्हेत. धाकट्या भावाने मोठ्या भावाचं आणि बायकोने नवर्‍याचं ऐकणं हा धर्म आहे हे विधान पटू शकतं. पण मोठा भाऊ आणि नवरा या नात्याने लहान भाऊ आणि बायको यांची आयुष्यं पणाला लावण्याचेही अधिकार धर्माने पुरुषाला दिले आहेत?

    ReplyDelete
  31. तुझ्या दोन्ही शंका पटल्या.. अरे महाभारतात तर पावलोपावली अधर्म आहे. रामायण आपण सोवळं मानतो तरी त्यात अशा घोडचुका आहेत हे बघून आश्चर्य वाटतं. महाभारतासंबंधी मला तर अनेक शंका, प्रश्न आहेत. उदा कंसाने देवकीची आठ मुलं मारणं.. कसला अमानुषपणा आहे हा ! किंवा मग पांडवांनी लाक्षागृहात पाच भावंडं आणि त्यांच्या आईची जाळून केलेली हत्या किंवा मग युधिष्टिराचे (कु)प्रसिद्ध "नरो वा कुंजरो वा" चे उद्गार. सांगावं तेवढं कमी आहे.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...