आधी एकदा लिहुन झाल्यावरही बरंचसं लिहायचं राहूनच गेलं आहे हे लक्षात आल्याने हा पुनःप्रयत्न !
शाळा... अंदाजे '७६ सालच्या डोंबिवलीतल्या (संदर्भ डास : डासिवली, मुंब्रा इ. इ. उल्लेख) एका साध्या टिपिकल मराठी शाळेत शिकणार्या पौगंडावस्थेतल्या कथानायकाचं वर्णन आणि त्याच्या व अनेकदा त्याच्या ग्रुपमधल्या त्याच्या वयाच्या मुलांच्या नजरेतून घडणारं तत्कालीन समाजाचं, शिक्षणपद्धतीचं, संस्कारांचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, नाजूक वयातल्या मुलामुलींमधल्या सुप्त आकर्षणाचं, नातेसंबंधांचं, भावभावनांचं, साध्या सोप्या (वाटणार्या) शब्दांतलं चित्रण !!
मी मुद्दामच 'वाटणार्या' असं म्हणतोय. कारण अगदी साधे शब्द, सोपी वाक्यरचना वगैरे असली तरी वाचत असताना प्रचंड 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करावं लागतं. एकेका ओळीत, एकेका वाक्यात, एकेका शब्दांत त्या परिस्थितीला निरनिराळ्या कोनांतून बघणारे, त्यावर भाष्य करणारे कैक उल्लेख आहेत. जातीभेदावर आहेत, विषमतेवर आहेत, चंगळवादावर आहेत, दांभिकपणावर आहेत आणि अगदी म्हंटलं तर लहान मुलांच्या बाबतीत घेतल्या जाणार्या लैंगिक गैरफायद्यावरही आहेत. पण गंमत म्हणजे या सगळ्या सगळ्यावर काही भाष्य केलं जातोय याचा पुसटसा आभासही यातल्या एकाही वाक्यात नाहीये. वाचताना वाटत राहतं की आपण मराठी शाळेतल्या एका साध्यासुध्या मुलाची वर्षभराची गोष्ट वाचतोय ज्यात त्याचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, शिक्षक आहेत आणि त्याला 'लाईन' देणारी (वाचा आवडणारी, प्रेम करणारी इ. इ.) त्याची एक मैत्रीण आहे. पण प्रत्यक्षात मात्र या सार्या लेखनाचा आवाका समोर दिसतो त्यापेक्षा फारच विस्तृत आहे !!!
या संपूर्ण पुस्तकात मला सगळ्यात आवडलेला किस्सा म्हणजे अथर्वशीर्ष पठणाचा. देववादी, दैववादी, अंधश्रद्धाळू, पूर्णतः नवसावर विसंबून राहणारे वगैरे लोकांवर अत्यंत साध्या शब्दांत पण एकदम खणखणीत, सट्टाकदिशी लागणारा असा एक जबरदस्त फटकारा लेखकाने ओढलेला आहे. आणि त्यातल्याच एका छोट्याशा ओळीत जातीपातींवरही एक खणखणीत फटका ओढलेला आहे. कितीही झालं तरी तो परिच्छेद इथे देण्याचा मोह टाळता येत नाहीये.
============================
(आईसाहेबांनी मला सांगितलं होतं की) गणपतीला म्हण की स्कॉलरशिप मिळाली तर एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवीन म्हणून. मला त्यावेळी जाम हसायला आलं होतं. गणपतीला पण आलं असणार. गणपती कशाला असलं काही ऐकतोय ? कारण त्याला माहित असणार की, आईसाहेब उकडीच्या मोदकांऐवजी कणकेच्या तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवणार. आणि तोसुद्धा सुक्या खोबर्याच्या खुळखुळ्या मोदकांचा.... आमच्या वर्गात फक्त बिबीकरला ती स्कॉलरशिप मिळाली..... नंतर आईसाहेब म्हणाल्या की, गणपतीला नवस करून काही उपयोग नाही. कुलस्वामिनीलाच करायला हवा होता. आता मी दहावीला गेल्यावर तसा त्या करतील.
मला तसं अथर्वशीर्ष येतं म्हणा. आमच्या बिल्डिंगीत पोंक्षेकाकांकडे वर्षातून एकदा सहस्त्रावर्तनाचा कार्यक्रम असतो. तेव्हा ते झाडून सगळ्यांकडचे पाट आणि माणसं गोळा करतात. निकमांकडचे फक्त पाट (ही ओळ म्हणजे तर तीन शब्दांत अक्षरशः उघडं करण्याचा सर्वोत्तम नमुना आहे !!!). पोंक्षेकाकांचा किरण तेव्हा आम्हाला आदल्या दिवशी सांगतो की उद्या आमच्याकडे गणपतीला गंडवायचा कार्यक्रम आहे म्हणून.कारण ते दहापंधरा लोक गोळा करतात. त्यांना साबुदाण्याची खिचडी आणि केळी देतात आणि त्यातल्या एकानं ते अथर्वशीर्ष म्हटलं तरी सगळ्यांनी म्हटलं असं समजतात आणि आकडा वाढवतात. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम दोनतीन तासांत आवरतो. गणपतीला काय हे कळत नसणार? पण ह्यांचं चालूच..."
============================
जातीपातींवर दबकत दबकत पण तेवढेच खणखणीत वार केल्याचे अजूनही छोटे छोटे अनेक नमुने आहेत. नरूमामासाठी देशमुखांच्या मुलीचं स्थळ आलेलं ऐकून मुकुंदाच्या आईने "आपल्यातल्या मुली काय मेल्या आहेत का?" या एका वाक्यातच त्या स्थळाची वासलात लावणे..
किंवा मग नरूमामाच्या लग्नात भेटलेल्या आशक्याबरोबरचा एक संवाद. मुकुंदाची आशक्या गायकवाडबरोबर छान गट्टी जमल्यानंतर मुकुंदा जेव्हा त्याला एकदा त्याच्या 'लाईन' बद्दल विचारतो आणि गायकवाड आणि त्याच्या 'लाईन' चं एकत्र भेटणं, बोलणं, फिरणं वगैरे चालू आहे हे पाहून आशक्या किती भाग्यवान आहे आणि त्याचं सगळं एकदम मस्त जमून गेलंय याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. तेव्हा गायकवाड जे उत्तर देतो ते ऐकून तर एकदम चरकायलाच होतं. गायकवाड म्हणतो "जमलंय कसलं रे..? काही नाही जमलंय. कारण आम्ही 'बीशी' आहोत ना" !!!!!!!
किंवा मग नरुमामाच्या लग्नाविषयी शिरोडकरशी बोलताना मुकुंदाने मुद्दाम आईसाहेबांना कशी 'आपल्यातली'च मामी हवी होती हे सांगताना 'आपल्यातली'च वर विशेष भर देणे वगैरे सगळे प्रसंग अगदी नकळत आलेले पण अगदी लहान लहान मुलामुलींच्याही मनात अजाणतेपणी का होईना खोलवर रुजलेले तत्कालीन समाजातले जातीभेदाचे संस्कार अगदी ठळकपणे अधोरेखित करतात. (आताही यातलं काहीही फारसं बदललेलं आहे असा माझा मुळीच दावा नाही.)
असंच अजून एक उदाहरण म्हणजे मुकुंदाच्या आईचं.. तिची मैत्री निकमकाकूंशीच असते. त्यांचं कधीही एकमेकींशी भांडणही होत नाही. याउलट पोंक्षेकाकूंशी कायम वादविवाद होत असतात पण तरीही सवाष्ण म्हणून जेवायला आई कायम पोंक्षेकाकूंनाच बोलावते. आणि ब्राह्मण म्हणून किरणला.. तो नेहमी पानात सगळं टाकत असतो तरीही !!
असे कित्येक छोटे छोटे प्रसंग बोकिलांनी संपूर्ण पुस्तकभर पेरून ठेवले आहेत. अनेक ठिकाणी सामाजिक भेदभाव, चुकीच्या किंवा अन्यायकारक रुढी-परंपरा इत्यादींना लक्ष्य केलं आहे.
नवरा हयात नसलेल्या स्त्रियांना समाजात दिला जाणारा दुजाभाव एका अगदी छोट्या वाक्यात मांडलाय त्यांनी. फावड्याची आई पूर्वी (नवरा असताना) आडवं कुंकू लावायची पण आता लावत नाही. चित्र्याला त्या आडव्या रेघेत कुंकू कसं बसतं हे बघायचं असतं पण ते आता शक्य नाही कारण फावड्याच्या आईला कुंकू लावण्याविषयी कोण समजावणार? पुरुषप्रधान समाजात नवरा नसल्यावर स्त्रीच्या अगदी छोट्या छोट्या आवडी-निवडीवरही सामाजिक रुढींमुळे कसा घाला घातला जातो हे यापेक्षा कमी शब्दांत आणि अधिक प्रखरपणे समजावणं जवळपास अशक्य आहे !
अनेक छोट्या छोट्या प्रसंगांत अक्षरशः एका वाक्यात सामाजिक विषमता/भेदभाव/रुढी/मानसिकता यापैकी कशा ना कशावर तरी कोरडा ओढलेला आहे. उदा भाई शेट्याने उल्लेखलेली पायलीभर भातासाठी काहीही करणारी नायकीण सामाजिक विषमतेवर बोट ठेवते किंवा एक दोन प्रसंगांत चित्र्याच्या अनुषंगाने आलेला "गोऱ्या पोरांवर लोकांचा विश्वास बसतोच" वाला उल्लेख गोऱ्या त्वचेकडे आकृष्ट होणारी किंवा गोऱ्यांनी केलेलं सगळं बरोबर आणि इतरांचं सगळंच वागणं प्रश्नार्थक किंवा संशयास्पद असतं अशी जी भारतीय समाजमनात खोल रुजलेली मानसिकता आहे ती दर्शवते.
एकीकडे "प्रत्येक काम हे सारखंच महत्वाचं आहे" म्हणणारा समाज प्रत्यक्षात मात्र शारीरिक आणि बौद्धिक श्रमांच्या श्रेयात दुजाभाव करतो आणि शारीरिक श्रमाला बौद्धिक श्रमांच्या मानाने अगदी दुय्यम स्थान देतो !! समाजाच्या या वृत्तीला बोकिलांनी एका छोट्या प्रसंगांतल्या केवळ एका वाक्यात फटकारलं आहे. सुऱ्या आणि फावड्याला मैदानी खेळात मिळालेल्या कपापेक्षा मुकुंदाला 'बुद्धिबळात' मिळालेला कप मोठा असतो कारण शाळेत बुद्धिबळाला मान आहे. !!"
नारुमामाच्या लग्नात मामीकडच्यांनी मुकुंदाच्या आईला घेतलेली साडी भारीतली नसते तसंच त्यांनी मुकुंदाच्या बहिणीला साडी घेतली नसते यासारख्या छोट्या कारणांनी मुकुंदाची आई रागावते आणि तिचा लग्नातला मुड जातो. अशा छोट्या छोट्या मान-अपमानाच्या प्रसंगातून लग्नाला उत्सवाचं स्वरूप आणणाऱ्या किंवा 'मुला'कडच्या लोकांना आपण केवळ मुलाकडचे आहोत म्हणून कशीही मनमानी करू शकतो या सामाजिक गृहितकाला आणि अनाठायी, अनावश्यक जुने पुराने रितीरिवाज पाळणाऱ्या आणि आपल्याला आपल्या आजूबाजूला नियमितपणे भेटणाऱ्या लोकांच्या (थोडक्यात आपल्या सगळ्यांच्याच) वर्तनावर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे !
अशाच प्रकारे स्त्री-पुरुष विषमतेला खतपाणी घालणाऱ्या आणि आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांचे दाखले कित्येक छोट्या छोट्या प्रसंगांतून पानोपानी विखुरलेले आहेत. त्यातला सगळ्यात जबरदस्त म्हणजे बेंद्रे बाई आणि मांजरेकर सरांची वेळोवेळी केली गेलेली तुलना. या दोघांमध्येही एक गोष्ट समान आहे ती म्हणजे ते दोघेही अविवाहित आहेत परंतु त्या अनुषंगाने त्यांच्याकडे बघण्याकडे मुलांचा (म्हणजेच भावी नागरिकांचा) दृष्टीकोन अक्षरशः भयावह आहे. या संदर्भातले काही उल्लेख म्हणजे "बेन्द्रीण लग्न झालेलं नाही तरीही सदैव तोऱ्यात असते." किंवा बेंद्रे बाई शिक्षा करतात तेव्हा "बेन्द्रीणीचं कधीही लग्न होणार नाही" असा सुऱ्याने दिलेला शाप या गोष्टी अतिशय छोट्या किंवा लक्षातही न येण्याजोग्या आहेत. पण एक मिनिट !! आता याच गोष्टींची आपण मांजरेकर सरांच्या अविवाहित असण्यासंदर्भात आलेल्या उल्लेखांशी तुलना करून पाहू. मांजरेकर सरांविषयी बोलताना मुकुंदाच्या तोंडून त्यांचं जे वर्णन येतं ते असं आहे. मांजरेकर सरांचं लग्न झालेलं नसल्याने ते 'एकदम बिन्धास' असतात, तोऱ्यात असतात, आकर्षक असतात, मुलांचे हिरो असतात, मुलांमुलींचे आवडते असतात !!!
केवढं मोठा विरोधाभास आहे हा !! म्हणजे जणु स्त्रीचं लग्न न होणं हे जणु अतिशय मानहानीकारक, अपमानास्पद, चुकीचं वगैरे असून त्याउलट पुरुषाचं लग्न न होणं हा त्याच्या तरुणपणाचा, सदाहरितपणाचा पुरावाच !!! थोडक्यात जातीपाती, पत्रिका, हुंडा, ऐपत इत्यादी इत्यादींमुळे किंवा कुठल्याही क्ष कारणामुळे जर एखाद्या मुलीचं लग्न होऊ शकत नसेल तर समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा चुकीचा असतो या दुटप्पीपणावर बोकिलांनी मोठ्या खुबीने बोट ठेवलं आहे.
अजून एक अगदी अगदी छोटा उल्लेख म्हणजे प्रगतीपुस्तकांचा गठ्ठा नंबरवार लावलेला असतो त्यात मुलांची प्रगतीपुस्तकं आधी असतात आणि मग मुलींची असतात असा एक छोटासा उल्लेख आहे. काही खास कारण नाही पण प्रत्यक्षातही याच्या उलट कधीच नसतं. प्रत्यक्षातही कायम प्रगतीपुस्तकं, हजेरीपटावरची नावं यात कायमच मुलांचा क्रमांक आधी असतो आणि मग मुलींचा असतो. अशी छोटी छोटी निरीक्षणं शाळेतून बाहेर पडणाऱ्या भावी पिढीच्या मनावर जन्मभरासाठी परिणाम करू शकतात !
असाच अजून एक प्रसंग. शाळेत ऑफ पिरेडला सिनेमाच्या भेंड्यांच्या वेळी एक उल्लेख असा येतो वर्गातल्या मुलींना मुलांबरोबर खेळ खेळण्याची भयानक हौस आहे... यापुढचं संपूर्ण वाक्य अदृश्य आहे पण आधी म्हटल्याप्रमाणे "रीडिंग बिटवीन द लाईन्स" केलं तर आपण ते सहजपणे पूर्ण वाचू शकतो !! "वर्गातल्या मुलींना मुलांबरोबर खेळ खेळण्याची भयानक हौस आहे..." "............ "पण मुलींनी पुढे होऊन मुलांशी मैत्री केलेली समाजाला चालत नाही, मुलीने असं केलं तर तिला आगाऊ/फॉरवर्ड वगैरे वगैरे ठरवलं जातं. तिला वाटेल तशी नावं ठेवली जातात. उदाहरणार्थ सुकडी-महेश प्रकरणात सुकडीकडे बघण्याचा मुलांचा दृष्टीकोन !! पण सुऱ्यासारखी मुलं मात्र बिनधास्त पुढे होऊन मुलींची छेड काढू शकतात कारण तो मुलगा असतो" आणि त्यामुळेच ही अनावश्यक शेरेबाजी किंवा मानहानी टाळण्यासाठी इच्छा असूनही मुली मुलांशी बोलण्यात, ओळखी करून घेण्यात पुढाकार घेत नाहीत उलट मुलांनी ओळख करून घेण्याची वाट बघत राहतात किंवा गाण्याच्या भेंड्यांसारख्या प्रसंगातून मुलांशी बोलण्याच्या छुप्या इच्छेला, उत्सुकतेला, भावनेला मोकळीक मिळवून देतात. पौगंडावस्थेतल्या मुलामुलींनी एकमेकांकडे आकर्षित होणं यात काहीच चूक नाही की ते वावगं नाही. ती एक अतिशय सद्दी अशी नैसर्गिक प्रवृत्ती आहे. परंतु समाजाच्या अनावश्यक जाचक नियमांमुळे या नैसर्गिक उर्मींना मुलींना दाबून ठेवण्यास भाग पाडलं जातं. असो..
पुस्तकात पानोपानी येणारे आणीबाणी उर्फ अनुशासनाचे उल्लेख आणि त्या अनुषंगाने येणारे प्रसंग हे तर निव्वळ अप्रतिम. १४-१५ वर्षांच्या मुलाच्या दृष्टीकोनातून आणीबाणीकडे बघून त्यावेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती, लोकांची मतं, विचार मांडण्याची कल्पनाच कसली बेफाट आहे !! त्याकाळची परिस्थिती, आणीबाणीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन, त्यांची मतं, आणीबाणीला ठाम विरोध करणारे ग्रुप्स आणि आणीबाणीला अनुशासन म्हणवून त्यापायी येणार्या शिस्तीचं कौतुक करणारे लोक आणि आणीबाणीच्या वेळी लोकांना आलेले अनुभव इत्यादी गोष्टी दहा अग्रलेख वाचून कळणार नाही एवढ्या चांगल्या रीतीने या पुस्तकातून कळतील कदाचित !! अनेक छोट्या उल्लेखांतून लेखकाने तत्कालीन विरोधाभास उलगडून दाखवले आहेत. इतिहास शिकवताना विद्यार्थ्यांना फ्रेंच राज्यक्रांती शिकवली जाते परंतु प्रत्यक्षात होऊ घातलेल्या क्रांतीबाबत मात्र सरकार मुलांना पुसटशी कल्पनाही न येऊ देता ती क्रांती आणीबाणीच्या माध्यमातून दडपून टाकत असते !
एका प्रसंगात मुलांना 'अनुशासन गीत' 'हम होंगे कामयाब' म्हणताना कामयाबच्या पुढे "उ उ उ" म्हणायला मजा येत असते पण अति झाल्यावर मात्र कंटाळा येतो असा उल्लेख आहे. हा प्रसंग आणीबाणीची विफलता खूपच परिणामकारकपणे विषद करतो. आणीबाणीला अनुशासनाच्या गोंडस नावात गुंडाळून जनतेसमोर आणलं जातं. सुरुवातीला दट्ट्या बसतोय म्हणून कामं वेळेवर होतातही आणि त्यामुळेच आणीबाणी आवडूही शकते पण कालांतराने अतिरेक झाल्याने त्या ताणलेल्या 'ऊ ऊ ऊ' प्रमाणेच आणीबाणी नकोशी वाटू लागते !! किंवा पीटीच्या तासाला कोणीतरी "आणीबाणी मुर्दाबाद" म्हणून ओरडल्यावर शिस्त मोडली म्हणून रागावणारा मुख्याध्यापक आप्पा म्हणजे जनतेला आणीबाणीतल्या दडपशाहीला शिस्त मानायला लावणाऱ्या सरकारचं प्रतिनिधित्व करतो. आणीबाणीवर आडून प्रहार करणारा अजून एक प्रसंग म्हणजे केवड्याच्या वडिलांनी मुकुंद आणि सुऱ्याला शिक्षा व्हावी यासाठी मुख्याध्यापाकाना आग्रह करण्याचा प्रसंग. केवडाचे वडील म्हणतात शिक्षा झालीच पाहिजे यांना. रस्टीकेट करा, पोलिसात तक्रार द्या आणि रिमांड होममध्ये टाका. त्यांना हे सगळं ताबडतोब व्हायला हवं असतं. मुलांना बोलायची किंवा आपली बाजूही न मांडू देता करायचं असतं. ते बघून आप्पाही चमकतो. मला वाटतं हा प्रसंग आणीबाणीची भीषणता, वाईट परिणाम मांडणारा प्रतिकात्मक प्रसंग आहे. आणीबाणीत असंच लोकांना आपली बाजू मांडू न देता सरकार/पोलीस सरळ कोणालाही अटक करत असतात. समजा मुकुंदाच्या वडिलांनी मध्यस्थी करून त्याला आणि सुऱ्याला सोडवलं नसतं तर निरपराधी असूनही त्यांची भरती रिमांड होम मध्ये झाली असती आणि कदाचित दोन नवीन गुन्हेगार जन्माला आले असते. आणीबाणीचे भयानक परिणाम दाखवणारा हा एक अतिशय उत्तम प्रसंग !!
'शाळा' नाव असलेल्या पुस्तकात शैक्षणिक क्षेत्रातले विरोधाभास दाखवले नसतील असं होणं शक्य तरी आहे का? जातीभेद, अंधश्रद्धा, मानापमान, परंपरा, रुढी, राजकीय, सामाजिक या सगळ्यांच्या बरोबरीने शैक्षणिक क्षेत्रातले विरोधाभास अनेक प्रसंगांतून सामोरे येतात. उदा. फावड्याची बॉलिंग अतिशय फास्ट असते, एक चांगला खेळाडू होऊ शकण्याची त्याच्यात पात्रता असते, तसंच सुऱ्याची चित्रकला अप्रतिम असते. परंतु त्यांना त्यांच्या छंदाकडे, आवडीकडे, कलेकडे लक्ष देऊ दिलं जात नाही किंवा त्या अनुषंगाने प्रोत्साहन मिळत नाही कारण की समजो वा ना समजो, आवडो वा ना आवडो पण शाळा, शिक्षण हे काहीही आणि कितीही झालं तरी सर्वात आवश्यक असा आपल्या समाजाचा नियम आहे !! धीरुभाई अंबानी, सचिन तेंडूलकर, ए आर रेहमान, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग अशा शिक्षण अर्धवट सोडूनही यशाच्या अत्युच्च शिखरावर असलेल्या लोकांकडे पाहिल्यावर हा विरोधाभास चांगलाच जाणवतो. सुऱ्या आणि फावड्याच्या रुपाने जन्माला येऊ शकणारे असे कित्येक सचिन, रेहमान, बिल गेट्स हे मुलांची कुवत न ओळखता शिक्षणाचं जोखड त्यांच्या गळ्यात बांधण्याच्या हट्टापायी आपण गमावत असू ! याच अनुषंगाने पुस्तकाच्या शेवटी चित्र्याच्या तोंडी एक अप्रतिम संवाद आहे. निकालाच्या भीतीविषयी बोलणं चालू असताना चित्र्या म्हणतो "खरं तर दहावीपर्यंत सगळ्यांना सरळ जायला द्यायला हवं. दहा वर्षं शाळा शिकली ना. आता बास झालं. ज्यांना पुढे जायचंय त्यांनीच दहावी पास करायची" !!!!
शाळेचे नियम, भिंती, कायदे, बेंच, तास, पुस्तकं, तास, गृहपाठ, कव्हरं या अशा एकांगी वातावरणात अडकलेल्या आपल्या देशातच गुरुदेवांची 'शांतिनिकेतन' जन्माला आली होती यावर विश्वास बसणं खरंच कठीण जाईल आणि हेच बोकिलांनी काही छोट्या प्रसंगांतून दाखवून दिलंय. शाळेच्या बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या वातावरणात बसलेले असताना सुऱ्याच्या तोंडी असलेला अशा अर्थाचा एक संवाद आहे की अशी शाळा असेल या शाळेत मी कितीही वेळ शिकेन आणि या शाळेत शिकवलेलं सगळं कळेल !! अजून एक प्रसंग म्हणजे शाळेत वह्यांना खाकी कागदाची कव्हरं घालण्याचा नियम असतो. त्यावेळी मुकुंदाच्या तोंडचा एक संवाद या नियमातल्या फोलपणावर बोट ठेवतो. तो म्हणतो की खाकी कव्हरं कंपल्सरी असल्याने संतू आणि फावड्यासारख्या आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या मुलांना विनाकारण खर्च करून खाकी कव्हरांसारखे फोल नियम पाळावे लागतात. शिरोडकरच्या वहीला तिच्या बाबांनी जागून घातलेलं कव्हर निव्वळ खाकी नाही म्हणून बेंद्रे बाई फाडून टाकतात तोही असाच एक प्रसंग. उगाच पुस्तकी नियम बनवले जातात परंतु त्यांची उपयुक्तता, आवश्यकता इत्यादी गोष्टी तपासून पाहण्याचे कष्ट न घेता ते नियम सरसकट सगळ्यांवर लादले जातात. फक्त शाळेतच नव्हे तर ही गोष्ट आपल्या समाजातल्या अनेक विचित्र नियमांना लागू होऊ शकते. कदाचित आणीबाणी हे ही त्याचंच एक उदाहरण !
पुस्तकातला एकूण एक प्रसंग १४ ते १५ वयोगटातल्या मुलाच्या किंवा मुलांच्या समूहाच्या नजरेने टिपलेला आहे. ही त्यांची निरीक्षणं आहेत. आणि अर्थातच मुलांची निरीक्षणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर पालकांचं वागणं, त्यांचे संस्कार.. काही अपवाद वगळता एकाही प्रौढ व्यक्तीला जात-पात किंवा स्त्रीपुरुष भेदभाव, अंधश्रद्धा इ वर थेट भाष्य करताना दाखवलेलं नाही. जे काही संवाद आहेत ते जास्तीत जास्त मुलांच्या तोंडचेच आहेत. थोडक्यात तो पालकांवर, आजूबाजूच्या समाजावर, शिक्षणपद्धती आणि शिक्षकांवर केलेला प्रहार आहे. कारण अशा अडनिड्या किंवा संस्कारक्षम वयातली मुलं या सगळ्याचा स्वतः विचार करून मत बनवू शकत नाहीत. तेवढी त्यांची तयारी नसते. थोडक्यात त्यांचे विचार, मतं जी तयार होतात ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या त्यांनी केलेल्या निरीक्षणांवरून, लावलेल्या अर्थावरून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या संगोपनाच्या प्रक्रीयेदरम्यान पालक आणि शिक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांवरून होत असतात. भविष्यातला आदर्श समज घडवण्याची भाषा करणारे आपण आपल्या भावी नागरिकांना प्रत्यक्षात मात्र जातीभेद, रुढी, अंधश्रद्धा, खोट्या परंपरा अशा चुकीच्या गोष्टींचं बाळकडू पाजून नक्की कशा प्रकारचा समाज घडवतोय हा भयावह प्रश्न या प्रत्येक प्रसंगानंतर आपल्यासमोर विक्राळ रुपात उभा राहतो !
मुकुंदाच्या मनात जो एक सतत वैचारिक गोंधळ चालू असतो तो आवरायला थेट अशी मदत होते ती फक्त नरुमामाचीच. तो मामा कमी आणि मित्र जास्त असल्याने त्याच्याबरोबर इंग्रजी पिक्चर बघणे, बिनधास्त गप्पा मारणे, त्याच्याशी मुलींविषयी बोलणे, त्याला शाळेतल्या मुलींचे किस्से सांगणे असे प्रकार दर भेटीत होत असतातच. अनेक प्रसंगांत नरूमामाच मुकुंदाचं चुकीचं पडलेलं किंवा पडू पाहणारं पाउल जागेवर आणताना दिसतो. उदा 'सुकडी'ला चिडवण्याचा प्रसंग किंवा धीर करून 'शिरोडकर'शी बोलण्याचा प्रसंग. किंबहुना मुकुंदाच्या प्रत्येक कृतीवर, प्रतिक्रियेवर, वागण्याबोलण्यावर नरूमामाचाच प्रचंड पगडा आहे, फार मोठा प्रभाव आहे आणि पुस्तकातल्या वाक्यावाक्यात तो जाणवतो. पानोपानी नरुमामाचे दाखले सापडतात. मुकुंदाच्या प्रत्येक वाक्यात, विचारात, कृतीत, कृतीच्या पुष्ठ्यर्थ नरूमामाची उदाहरणं आहेत. अर्थातच नरूमामा हा त्या काळाच्या तुलनेत विचारांनी अधिक सुधारित असणार्या अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करतो.
असं सगळंच जगावेगळं करणार्या नरुमामाने आधी (गंमतीतच) सांगितल्याप्रमाणे ख्रिश्चन मुलीशी लग्न न करता आईसाहेबांना आवडलेल्या 'आपल्यातल्याच' मुलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर सगळ्यात जस्त हिरमोड होतो तो मुकुंदाचा. सामाजिक, वैचारिक जोखडं भिरकावून देऊन वेगळं काहीतरी करणार्या नरूमामाने प्रत्यक्षात मात्र एवढा मोठा निर्णय घेताना मळलेली वाटच चोखाळावी हे नरूमामाकडे एक ग्रेट मित्र, आदर्श माणूस म्हणून बघाणार्या, स्वप्नील आयुष्यात वावरणार्या मुकुंदाला पचवायला जड जातं.
मुकुंदाच्या मनातले गोंधळ शमवू शकणारी किंवा त्याच्या विचारांना चालना देणारी, मदत करणारी अजून दोन पात्रं म्हणजे बाबा आणि चित्र्या. बाबांची थेट अशी मदत फारच कमी होते. परंतु बुद्धिबळाविषयीची आवड वाढीला लावणे किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींशी गैरवर्तणूकीच्या कथित आरोपावरून शाळेतून अगदी नाव काढायची पाळी आलेल्या मुकुंदाला विश्वासात घेऊन, प्रसंग समजावून घेऊन आणि आपल्या मुलाची काहीच चूक नाहीये हे कळल्यावर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून शांत व संयमित आवाजात मुकुंदाची बाजू थेट मुख्याध्यापक आणि तक्रारकर्ते यांना पटवून देण्याची त्यांची हातोटी दाखवणारा प्रसंग वाचून तर त्यांचा मोठेपणा अगदी थेट पोचतोच.
चाळीत टीव्ही आल्यामुळे सगळेजण टीव्हीच्या मागे लागल्याने बुद्धिबळ संपल्यामुळे विषण्ण झालेले बाबा, मोकळ्या जागेत बुद्धिबळ खेळले न गेल्याने आणि टीव्हीपायी लोकं न जमल्याने आजुबाजुच्यांनी अंगणात कचरा टाकायला लागणे यांसारख्या अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगांत चंगळवादावर अतिशय संयत आणि जवळपास शून्य शब्दांत लेखकाने ओढलेला कोरडा चांगलाच लागतो. चंगळवादावर ओढलेला असाच एक आसूड म्हणजे मुकुंदाच्या शाळा ते घर या मार्गावरचं पूर्ण पुस्तकभर डोकावणारं शेत पुस्तकाच्या शेवटच्या पानात एकाएकी नाहीसं होण्याच्या मार्गावर येतं तो प्रसंग.. तिकडे शेती करण्याऐवजी चाळी बांधायचं ठरवलं असल्याचं शंकर्याचे बाबा मुकुंदाला सहज सांगितल्याप्रमाणे सांगतात तेव्हा तर अगदी विषण्णच व्हायला होतं. पुस्तकातल्या निर्जीव पात्रांशीही आपण एवढे एकरूप होऊन गेलेलो असतो हे तोवर आपल्याला जाणवलेलंच नसतं.
मुकुंदाला आवरणारं आणि सावरणारं दुसरं एक महत्वाचं पात्र म्हणजे चित्र्या !! हा चित्र्या म्हणजे एक अवली कार्ट आहे. अतिशय हुशार, प्रचंड अभ्यासू, समजूतदार, परिस्थितीची चांगली जाण असणारं, आईबाबांमधल्या सततच्या भांडणांमुळे त्यांच्या प्रेमाला पारखा झालेलं, 'देवकी' पासून येणार्या कटु अनुभवांनी कंटाळून गेलेलं आणि घरातल्या या विचित्र परिस्थितीला कंटाळून जास्तीत जास्त वेळ त्याच्या आवडत्या वैज्ञानिक प्रयोगांत आणि ग्रुपचा नाका असलेल्या सुर्याच्या बिल्डिंगीत घालवणारं असं हे एक अतिशय इंटरेस्टिंग पात्र आहे. तो मुकुंदाला वेळोवेळी समजावतो, काही महत्वाची गुपितं फक्त मुकुंदाशीच शेअर करतो, आपल्या शांत आणि संयमित वागण्याने, गोड बोलण्याने आणि (मुकुंदाच्या भाषेत) गोर्यागोमट्या चेहर्याचा वापर करून ग्रुपला कित्येकदा मोठ्या संकटांतूनही वाचवतो. थोडक्यात नरूमामाला नियमित भेटता येत नसल्याने आणि त्याच्याकडून नियमितपणे मार्गदर्शन (!!!) मिळवता येत नसल्याने नरूमामानंतर चित्र्या हाच मुकुंदाचा एकमेव आधार असतो.
'शिरोडकर'बद्दल न लिहिता लेख संपवला तर मुकुंदा मला कधीही माफ करणार नाही. ('शाळे'त सर्वस्वी गुंतून गेल्याचा पुरावा यापेक्षा दुसरा देता येणार नाही :) ) .. कारण पुस्तकाचा निम्मा भाग हा शिरोडकरने व्यापलेला आहे. निम्म्या पानात प्रत्यक्षात आणि उरलेल्या निम्म्या पानात मुकुंदाच्या विचारांत, बोलण्यात, गप्पांत सगळीकडे. ही एक अतिशय गोड मुलगी आहे हा आपला विचार प्रत्येक पानागणिक अधिकाधिक पक्का होत जातो. तिचं मुकुंदाशी ओळख करणं, बोलणं, चोरून भेटायला जाणं वगैरे सगळं सगळं एकदम पटून जातं आपल्याला. आणि मुकुंदाची तिच्याबद्दलची इन्टेन्सिटी शाळेतल्या गाण्याच्या भेंड्यांचा प्रसंग, मुकुंदाने तिच्यासाठी मार खाण्याचा प्रसंग, स्काउट कॅम्पचा प्रसंग, तिच्यासाठी लांबचा क्लास लावण्याचा प्रकार इत्यादीमधून अधिकच ठळकपणे समोर येते. तिच्यासाठी चेसची स्पर्धा जिंकणं, तिच्यासाठी जीव खाउन अभ्यास करून निव्वळ शेवटच्या काही महिन्यात अभ्यास करून चांगले मार्क मिळवणं वगैरे वगैरे प्रकार प्रचंड आवडतातच आणि पटूनही जातात. किंवा नाईट कॉलेज शोधणं, मुंबईत भाड्याच्या घरात राहण्याची कल्पना करणं वगैरे प्रकार तर पटत नसूनही मुकुंदाच्या विचारांची भरारी आणि त्याची तयारी पाहून मनोमन हसायला आल्याशिवाय राहत नाही..
अर्थात हे पुस्तक नववीच्या एका टारगट ग्रुपविषयीचं असल्याने मुली, त्यांच्याबद्दलचे बिनधास्त उल्लेख, कट्ट्यावरची भाषा, नवीननवीन शब्द, शिव्या, 'ढिंगच्याक' गाणी, वात्रटपणा, आगाऊपणा या सगळ्याचा पुरेपूर वापर पुस्तकात आहे पण तो क्वचित कधीतरीच आक्षेपार्ह वाटतो किंवा बरेचदा वाटतही नाही. कारण सुरुवातीपासूनच आपण या पुस्तकात आणि विशेषतः मुकुंदात एवढे गुंतुन गेलेलो असतो की आपणही त्याच्याबरोबर शाळेत, कट्ट्यावर, सुर्याच्या बिल्डिंगीत, संध्याकाळच्या क्लासला, गुपचूप शिरोडकरच्या मागे, नरूमामाबरोबर इंग्रजी पिक्चरला, केटी आणि विजयच्या रुमवर, शाळेच्या रस्त्यावर असलेल्या शेतात जाऊन पोचलेलो असतो. त्यामुळे तो करतोय ते, बोलतोय ते, वागतोय तसं आपण ऑलरेडी वागायला लागलेलो असतो. आक्षेप घेण्याचा प्रश्न येतोच कुठे !!!!
थोडक्यात पुस्तकभर एवढे चढ-उतार येऊन, टक्केटोणपे खाऊन अचानक शेवटच्या काही पानांमध्ये मुकुंदाची आणि त्याच्या प्रेमाची घडी अगदी सुरळीतपणे बसणार आणि अगदी गोड गोड सुखांत शेवट वाचायला मिळणार असं वाटायला लागतं. आणि तेव्हा ते थोडंसं टिपिकल पुस्तकी वाटतंय की काय असं म्हणेम्हणेस्तोवर शेवटचं पान आलेलं असतं आणि तेवढ्यात.......... काही कळायच्या आत आपल्या पायाखालची चादर सर्रकन ओढली जाते. एकदम चटका बसून आपण वास्तवात येतो. स्वप्न संपल्यागत वाटतं... तसं म्हटलं तर पुस्तकाचा शेवट रूढार्थाने तितकासा काही ग्रेट किंवा जगावेगळा वगैरे नाहीये पण वर म्हटल्याप्रमाणे आपण मुकुंदामध्ये एवढे गुंतून गेलेले असतो की शेवटी मुकुंदाच्या मनावर जेवढा प्रचंड आघात होतो तेवढाच जोरदार धक्का आपल्यालाही बसतो. अगदी वेड्यागत होतं.
वपुंचं पार्टनर वाचताना त्यात शेवटी एके ठिकाणी "पार्टनर हा खराच होता की आपल्याला जसं व्हावंसं, वागावंसं वाटत होतं तसं वागणारी एक काल्पनिक व्यक्ती होती" अशा काहीश्या अर्थाचा एक उल्लेख आहे. त्याचप्रमाणे शाळा वाचताना आणि वाचून संपल्यावरही कित्येकांना अगदी स्वतःच्या शाळेविषयी वाचल्यासारखं, आपल्या त्यावेळच्या आयुष्याविषयी, त्यावेळी केलेल्या मस्ती, धम्माल, दंग्याविषयी आणि खोड्यांविषयी आठवतं, काही जणांना अगदी तसंच्या तसं नाही पण अनेक प्रसंग आपल्या शालेय जीवनाच्या जवळ जाणारे वाटतात किंवा कित्येकांना ही 'शाळा' म्हणजे फक्त पुस्तकात असणारी आणि आपल्या प्रत्यक्षातल्या नववी-दहावीच्या आयुष्यापेक्षा कित्येक मैल लांबची वाटते पण असंच सगळं आपल्यावेळीही आपल्या बाबतीतही घडलं असतं तर खूप धमाल आली असती असंही वाटत राहतं.
पण कुठल्याही स्वरुपात का होईना आपण 'या शाळे'ला आपल्या शाळेशी रिलेट करतोच आणि मला वाटतं हेच 'शाळा' चं सर्वात मोठं यश आहे आणि त्याबद्दल मिलिंद बोकीलांचे कितीही आभार मानले तरी ते मुकुंदाच्या शिरोडकरवर असलेल्या, चित्र्याच्या 'केवडा'वर असलेल्या, 'सुकडी'च्या महेशवर असलेल्या, आंबेकरच्या मांजरेकर सरांवर असलेल्या प्रेमापेक्षा आणि समस्त पोरापोरींच्या मनात बेंद्रीणीबद्दल, आप्पाबद्दल आणि केवड्याच्या बापाबद्दल असणार्या रागापेक्षा कित्येक पटीने कमीच असतील !!!!

शब्दातीत...
ReplyDeleteबोकिलांना आणि तुला _/\_ _/\_
धन्यवाद सिद्धार्थ !
Deleteखरं सांगायचे तर हे पुस्तक इतके का आवडले या मागे केवळ लाईन, सुर्या, फावड्या आणि शाळा इतक्याच गोष्टी कारणीभूत आहेत असे वाटले होते पण तू म्हटल्याप्रमाणे "रीडिंग बिटवीन द लाईन्स" खरेच झाले नव्हते. कदाचित समजतं होतं पण पूर्ण उमगलं नव्हतं. तुझी पोस्ट दोनदा वाचली आणि पुस्तकातील असंख्य अंधुक गोष्टी एकाएकी स्वच्छ दिसून आल्या.
ReplyDeleteThanks and Hats Off for this post!!!
अरे मीही जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा पुस्तकात आलेल्या असंख्य छोट्या छोट्या उल्लेखांमुळे एकदम भारावून गेलो होतो आणि त्या भारावलेपणातच जेवढ्या गोष्टी लक्षात होत्या तेवढ्या लिहुन टाकल्या आणि पोस्ट पब्लिश केली. नंतर मलाचं जाणवायला लागलं की आपण यापेक्षा खूप जास्त गोष्टी टिपल्या आहेत पण त्या पोस्टमध्ये उतरल्या नाहीत. म्हणून तेव्हाचं ठरवलं की पुन्हा पोस्ट लिहायची. पण जात्याच असलेल्या अंगभूत आळशीपणामुळे प्रत्यक्षात पोस्ट लिहायला अनेक महिने जावे लागले.
Deleteहातात भरल्या चहाचा कप आहे, हे आत्ता २० मिनिटांनी लक्षात येऊन भानावर आलोय...
ReplyDeleteधन्यवाद धन्यवाद अमेय !
Deleteमुकुंदात एवढे गुंतुन गेलेलो असतो की आपणही त्याच्याबरोबर शाळेत, कट्ट्यावर, सुर्याच्या बिल्डिंगीत, संध्याकाळच्या क्लासला, गुपचूप शिरोडकरच्या मागे, नरूमामाबरोबर इंग्रजी पिक्चरला, केटी आणि विजयच्या रुमवर, शाळेच्या रस्त्यावर असलेल्या शेतात जाऊन पोचलेलो असतो. त्यामुळे तो करतोय ते, बोलतोय ते, वागतोय तसं आपण ऑलरेडी वागायला लागलेलो असतो.
ReplyDeleteEkdam patesh!!!
मनःपूर्वक धन्यवाद श्रद्धा !
Deleteअत्यंत आवडत्या शाळा पुस्तकावर खुप काही लिहिले गेलेले आहे. पण हेरंब तुझा हा लेख वेगळा आहे. संपुर्ण लेख एका दमात वाचला.
ReplyDeleteअप्रतिम !!!
धन्यवाद दिपक. मला ती एक भीती होतीच की लेख प्रमाणाबाहेर मोठा झाला असल्याकारणाने वाचताना कंटाळा यायचा. तशी टीपही मी टाकणार होतो. पण राहून गेलं. टीप टाकायची आवश्यकता नाहीये हे सगळ्या प्रतिक्रियांमधून वाचून बरं वाटतंय :)
Deleteमानलं हेरंबा .... पहिला भाग उत्तम परिक्षण असताना दुसऱ्यात काय लिहिणार असा प्रश्न न येता ’अगदी अगदी ’ म्हणावं वाटतय या ही पोस्टला....
ReplyDeleteएक कौतूक तुझं की कित्ती मनापासून वाचतोस तू एखादं पुस्तक :)
जियो!!
(अवांतर : जवळपास वर्ष झालं असावं नाही की त्या गोष्टीला जेव्हा आपण म्हणाला होतात की ही पोस्ट लिहीताय )
धन्यवाद तन्वी. अग वर सिद्धार्थला म्हणालो त्याप्रमाणे पहिला लेख लिहुन झाल्यावरचं अनेक गोष्टी लिहायच्या राहिल्या आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं. पण नेहमीचा आळशीपणा ;) त्यामुळे एवढे महिने लागले.
Deleteखरं सांगायचं तर प्रत्येक पुस्तक मी एवढं आत्मीयतेने वाचतो याचं उत्तर 'नाही' असेल बहुतेक. पण शाळा च्या बाबतीत वेगळा प्रकार होता. पहिल्या पानापासूनच शाळाने गारुड घातलं होतं मनावर. हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे हे समजलं होतं. तिरकस शैलीतलं लिखाण हा तसाही माझा प्रचंड आवडता विषय असल्याने शाळा अजूनच आवडलं. इतक्या बारीक सारीक मुद्द्यांना स्पर्श केलाय ना बोकीलसरांनी आणि ते ही आडून आडून !! ग्रेटच प्रकार !
सगळ्यात आधी हे 'रीडिंग बिटवीन द लाईन्स विथ अ मायक्रोस्कोप' आहे!! एक नंबर!
ReplyDeleteदुसरं, माझं असं मत आहे की बरेचदा असं होतं- लेखकाला लिहायच्या/सांगायच्या असलेल्या 'अशा' गोष्टी इतक्या बारकाईने कुणी वाचत नाही कारण त्यांना त्यात विशेष काही वाटत नाही. या सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या चुकीच्या आहेत आणि कुणीतरी त्यांच्यावर ताशेरे ओढण्याच्या हेतूने काही लिहितो आहे हे लक्षातच येत नाही..शाळासारखं पुस्तक वाचताना आपण असं काही एक्स्पेक्ट करतच नसतो..! याउलट तू लिहिलंस तसंच शाळाचा 'दिसणारा' प्लोट जवळचा वाटतो कारण असं सगळं आपण कधीतरी अनुभवलेलं असतं, पाहिलेलं असतं..मग आक्षेप घेणार कोण?
सो..पुन्हा एकदा तुझ्या 'शाळे'च्या अभ्यासाला साष्टांग नमस्कार!
>> विथ अ मायक्रोस्कोप
Deleteहाहाहाहाहा चैतन्य !! धन्यवाद :)
>> या सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या चुकीच्या आहेत आणि कुणीतरी त्यांच्यावर ताशेरे ओढण्याच्या हेतूने काही लिहितो आहे हे लक्षातच येत नाही
अगदी अगदी अगदी.. !!
actually while reading all those feelings or comments pass through mind. but you have put them in words very beautifully.
ReplyDeletesorry, Baraha chalu karayacha kaMtala mhanUn comment Englishmadhe.
धन्यवाद अरुणाताई.. त्या सगळ्या भावना मांडायला दोन लेख लागले मलाही :)
Deleteशाळा वाचताना आपण शाळेत असतो तसंच ही पोस्ट वाचताना पुस्तकात असल्यासारखं वाटतंय.... शाळाचं यापेक्षा सुंदर परीक्षण होऊ शकत नाही....
ReplyDeleteमनःपुर्वक आभार, प्राची. 'शाळे' चं विश्वच अजब आहे !
Deleteआता हे लिखाण "at the backof the mind " ठेवून पुस्तक पुन्हा एकदा वाचून काढावे म्हणते! किती सुंदर लिहिलयस हेरंब कल्पना आहे का?
ReplyDeleteअनघा, धन्यवाद. प्रत्येक वाचनात काहीतरी नवीन मुद्दा सापडतोच. नक्की वाच पुन्हा.
Delete>> किती सुंदर लिहिलयस हेरंब कल्पना आहे का?
:D खूप आभार.
मायला...परीक्षणाचे पण सिक्वेल निघायला लागले तर...
ReplyDeleteभारी आहे...प्रचंड आवडलं !
पुस्तक कसं वाचायला हवे हेही शिकायला हवे तुझ्याकडून :)
हाहाहा.. सिक्वेल :)
Deleteशाळाशी जरा जास्त कनेक्ट झाल्याने झालं असेल असं :).. धन्यवाद सागर.
hmm, well first part was trailer..this is the movie.
ReplyDeleteKhar sangaych tar ya lekhatalya thodya chuka reading between d lines ne sapdlya, pan tyahi peksha ek anand 'SHALAa'parat wachanyacha milwaun dila..
I have a line for d post
Lihile Bokilanni ani Nirikshan kele Herambne, pohchawale amchyaparyant....
Hats off to you, for such narrower! yet interesting SHALAa period.
हाहाहा योगेश.. हो तसंच काहीसं.. हा पूर्ण चित्रपट आहे :)
Deleteलेखात काही चुका असण्याची शक्यता आहे किंवा मला जाणवलेले अर्थ योग्यच असतील असंही नाही. स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. लेखात कुठल्या चुका जाणवल्या ते वाचायला आवडेल.
पुन्हा एकदा आभार :)
>>मला जाणवलेले अर्थ योग्यच असतील असंही नाही.
Deleteas nahi mala mhnyach..
>>लेखात काही चुका असण्याची शक्यता आहे ..yes there are.. as mala wataley pan ti chuk barobar ahe ki nahi, te mahit nahi!!
ctrl+ f ne bagh
1 मुळी second one
2 भारती second one
3 आणि गायकवाड आणि
4 सुकडी-रमेश प्रकरणात and 'सुकडी'च्या महेशवर
When i read first time, it was in mind ..sorry'f there's being any wrong..
ओह. तू अशा चुका म्हणत होतास.. मला वाटलं काही मुद्दे वगैरे चुकले आहेत. अर्थात तुझ्याएवढं बारकाईने वाचन करणारं अजून कोणी असेल असं मला वाटत नाही. मीही एवढ्या मनापासून वाचली नसेल माझी पोस्ट :)) आप महान है :)
Deleteपहिली, दुसरी आणि चौथी चुक दुरुस्त केली आहे. पण तिसऱ्या मुद्द्यातलं वाक्य चुकीचं नाहीये. पुन्हा एकदा वाचून बघ. "आणि गायकवाड आणि त्याच्या लाईनचं एकत्र भेटणं" असं वाक्य आहे आणि ते बरोबर आहे. असो. पण एवढ्या बारकाईने वाचून चुका सांगितल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार.
बहुतेक तू पहिल्यांदाच कमेंट देतो आहेस न ब्लॉगवर?
ब्लॉगवर स्वागत !! अशीच भेट देत राहा ! :)
हे ,
ReplyDelete१९८० च्या आसपास मी डोंबिवली पूर्वेत (वय १० वगैरे ) रहायचो आणि तू सुद्धा डोंबिवलीचाच आहेस राईट ??
म्हणजे मग "शाळा" शी आपलं रिलेट होणं तर ....(बाकी जग गुणिले २)*जीव-घेणं !!!
ते इची-भना वाले आगरी मित्र , भाताची खाचर , गावदेवी मंदिराचा "शोले" सारखा खडकाळ परिसर,
सुबक बंगले आणि हिवाळ्यात चक्क पसरणार धुकं
हे सगळ मी प्रत्यक्ष अनुभवलय !!!
>>>>>>>>>>>
निकमांकडचे फक्त पाट
>>>>>>>>>
टू गुड !!!
होय.. मीही डोंबिवलीचाच.. करेक्ट. त्यामुळेच 'शाळा' शी जीवघेणं रिलेट होता आलं असेल ! अजून एक (एक्स)डोंबिवलीकर ब्लॉगर भेटल्याने लय आनंद झाला इचिभना ;)
Delete"निकमांकडचे फक्त पाट" ही तीन शब्दातली कत्तल आहे !!
मायला पहिलं परीक्षण इतकं अप्रतिम झालं होतं, की अजून काय वाचायला मिळणार याची उत्सुकता होती आणि अपेक्षा नेहमीप्रमाणे पूर्ण झाल्यात.
ReplyDeleteहा भाग निव्वळ अप्रतिम... :) :)
धन्यवाद सुहास. वर म्हटल्याप्रमाणे पहिल्या भागात राहून गेलेले अनेक मुद्दे दुसऱ्या भागात कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय :).. धन्स :)
Deleteअतिशय सुंदर ,नेटक, चपखल परीक्षण .. हे वाचून पुन्हा एकदा शाळा वाचाव अस वाटायला लागलं!
ReplyDeleteअनेक धन्यवाद सुजाता.
Deleteब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.
ReplyDeleteमस्तच लिहिलं भावा..
मी अजुनही पुस्तक वाचलं नाही... ( आय क्नो आय डीझर्व अ किक ऑन.. )
पण तुझा हा लेख आणि पहिला लेख वाचल्यावर अख्खं पुस्तक वाचल्यासारखं वाटतं...
मस्तच...
धन्स धन्स भावा.. अरे प्लीज लगेच वाच रे.. शाळा हा एक अनुभव आहे ! :)
Deleteखासच आहे हे पुस्तक... निर-निराळे कंगोरे नेहमीच असतात प्रत्येक पुस्तकाला, पण भावले वर पटलेही ते मिलिंद बोकिलांच्या वर्णनातून.. संवादातून, त्यांच्या ध्यानात ही नसतील इतके स्वच्छ अनायासे ते पुस्तकात बोलून गेलेत,
ReplyDeleteकाही पटणारे काही न पटणारे
हम्म...
दुरित
मनःपूर्वक धन्यवाद, दुरित.
Deleteकमीत कमी अलंकारिक शब्दांत एवढं सडेतोड लेखन पाहायला मिळण्याचे अनुभव विरळाच !
शाळेचं सविस्तर समीक्षण आवडलं.
ReplyDeleteविजय, मनःपूर्वक आभार !
Deleteआमच्या मराठीच्या प्राध्यापकांनी असं तुझ्यासारखं शिकवलं तर काय बहार येईल....मस्ती की पाठशाळा ...
ReplyDeleteहाहाहा सुमेधा :) एकदम सही प्रतिक्रिया.. आवडली :)
Deleteदुसरा पिरेड पण पहिल्याइतकाच आवडला. यातल्या आडनावावरूनचे बरेचसे संदर्भ खरं मला कळलेच नव्हते. (क्रेडीट टू ख्रिश्चन शाळेत शिक्षण )
ReplyDeleteते बेंद्रे बाई आणि मांजरेकर सरांची तुलना वाचताना मलाही तितकंच जाणवलंय. काही विरोधाभास अजूनही तसेच आहेत हे पुस्तक वाचताना जाणवलेलं सत्य म्हणून हे पुस्तक मला जास्त भावलं होतं...
धन्यवाद अपर्णा. अशा अनेक विरोधाभासांवर प्रेमकथेच्या आडून वार करणं हे लीलया साधलंय बोकीलांनी !!
Deleteमस्त लिहिलेस...:) पुस्तक परत एकदा वाचायचे असे मनात आले...
ReplyDeleteधन्यवाद मोनिका.
Deleteपुन्हा एकदा प्रयत्न करतोय.. :)
ReplyDeletejara ushirach vachala....ek no.lihilas..."reading between the lines" is too good.... :)
ReplyDeleteधन्यवाद चैताली. सॉरी. उत्तर द्यायला खूप उशीर झाला.
Deleteशाळा हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही लहानशा गावातली/ किंवा निमशहरी भागातली गोष्ट म्हणून खपून जाईल. अगदी असेच काहीसे शालेय जीवन होते माझे पण. लेख मस्त जमलाय. आज जमतंय प्रतिक्रिया द्यायला :)
ReplyDeleteवॉव.. आली एकदाची तुमची कमेंट !! फायनली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर :) प्रतिक्रियेबद्दल आभार.
Deleteहेरंब,
ReplyDeleteइतके दिवस आंतरजालावर वेगवेगळ्या ब्लॉग्स वर तुझ्या नित्यनेमाने येणाऱ्या प्रतिक्रिया वाचत आलो होतो... आज प्रथमच तुझा ब्लॉग वाचला - म्हणजे सध्यातरी 'शाळे' वरची ही एकच पोस्ट वाचलीये. शाळा वाचताना लक्षात न आलेल्या, निसटलेल्या कित्येक गोष्टी आज लक्षात आल्या. साधारणपणे आणीबाणी, पौगंडावस्था, मुकुंदाचे स्वतः चे वेगळे विश्व यांवरचे तरल भाष्य लक्षात येते पण तू म्हणतोस तितक्या सामाजिक गोष्टींवरचे भाष्य सगळेच लक्षात येतेच असे नाही (किंबहुना मला ते लक्षात आले नसेल असे म्हण). आज ते लक्षात आणून दिल्याबद्दल तुझे आभार. आणि इतकं तपशीलवार लिहिलंस हे फार चांगले केलेस.
असाच लिहित राहा. तुझ्या बाकीच्या पोस्ट्स वाचून प्रतिक्रिया कळवत राहीनच :)
पश्या, मनःपूर्वक धन्यवाद. बऱ्याच गोष्टी मलाही पहिल्या वाचनात कळल्या नव्हत्या. नंतर दुसऱ्या-तिसऱ्यांदा वाचताना अनेक संदर्भ लागत गेले. सामाजिक आणि जातीभेदाचे संदर्भ अनेकांना कळले नाहीत हेही खरं आहे.
Deleteपुनः एकवार प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.
दै. सकाळमध्ये छापून आलेला लेखही छानच होता. पण थोडा अपूरा वाटत होता. आपल्या ब्लॉगवर आणखी वाचायला मिळेल ही शक्यता वाटत होतीच. www.harkatnay.com ची लिंक दिली असती तर बरे झाले असते.
ReplyDeleteधन्यवाद प्रदीप. तुमच्यामुळेच मला कळलं की माझा लेख सकाळमध्ये छापून आलाय ते. पण सकाळमध्ये छापून आलंय ते मी लिहिलेलं 'शाळा' चित्रपटावरचं परीक्षण. हा लेख नव्हे.
Deleteपण तरीही पुन्हा एकवार धन्यवाद.
Heramb, tu he pustak kiti manapasun vachale ahes he hya lekhavarun samajetey..ha lekh me itakya ushira kasa kaay vachatey ?????
ReplyDeleteAso !!!! Khup masttt .
माऊ, धन्यवाद. हो. शाळा पुस्तक हे माझ्या फार फार आवडत्या आणि जवळच्या पुस्तकांपैकी एक आहे त्यामुळे कदाचित लेख जरा जमला असेल :)
Deleteमला आवडलेल्या पुस्तकावरचं खूप सुंदर परिक्शण!
ReplyDeleteउज्वला,
Deleteमनःपूर्वक आभार !!
ब्लॉगवर स्वागत आणि अशीच भेट देत राहा ब्लॉगला..
मस्त यार, एकदम खतरनाक लिहिलं आहेस!
ReplyDeleteyasarkhe lihilele yapurvi wachle nahi. khup ushira wachle yache duukh wateye. nave sandarba punha pustak wachaylay bhag padtat. dahynywad.
ReplyDelete