Wednesday, December 22, 2010

इम्म च्ची

हे काये?
क्का?
सांताक्लॉSSSज
आंताक्काSSS

आणि हे?
ए?
स्नोमॅSSSन
ओमाSSS

आणि हे काय?
एका?
डिअSSSर
दिआंSS

आणि हे?
ए?
पेंग्विन
एंन्नी

आSSSणि हेSSS ????
इम्म च्ची SSSSSSSS
बरोब्बर.. ख्रिसमस ट्री

-१० मधले आंताक्का, ओमा आणि दिआं 
-१० च्या (इथे आडवी रेघ सहज गंमत म्हणून मारली नसून ते 'वजा/उणे/मायनस/निगेटिव्ह दहा' असे वाचावे.) कुडकुडत्या थंडीत घराखाली उभं राहून लेकाला कडेवर घेऊन नाताळातल्या अशा वेगवेगळया प्राण्यापक्षांच्या तास-दीड तास मुलाखती घेऊन झाल्यावर मी माझा हात शोधायला लागलो. खरं तर 'माझे' हात शोधायला लागलो. दोन्ही मिळेनात. गजनीच्या तोंडाला फेस येईल एवढ्या जोराने आठवून (हो असं हळू/जोरात वगैरे आठवता येतं. बिलीव्ह मी.) तास दीडतासापूर्वी कुठे बरं ठेवले होते हात असं स्वतःलाच विचारत अंदाजानेच हात शोधले. त्यानंतर एकशे-एकोणसत्तराव्यांदा त्या पाचजणांची हजेरी घेऊन झाल्यावर मी लेकासमोर पांढरं निशाण फडकावलं आणि त्याला म्हटलं "आता बास. आता घरी जायचं. तू वरून खिडकीतून बघ आता". या वाक्यातल्या एकूण तीन 'आतां' पैकी पहिल्या 'आता'लाच त्याने निरुपा रॉयच्या "नSSSSही"ला घरी बसवेल एवढ्या जोरात "भ्याSSSS(ही)" करून आजूबाजूच्या चारदोन मानांना वळवून त्याच्याकडे अतीव करुणेने आणि माझ्याकडे तेवढ्याच तुच्छतेने पहाण्यास भाग पाडलं. 
 -१० मधले आंताक्का, ओमा आणि दिआं :२   

त्या चारी मानांच्या वर वसणार्‍या चेहर्‍यांच्या साधारण मध्यभागी अर्थात नाकावर काल्पनिक ठोसे मारून "एवढा छळ चाललाय असं वगैरे वाटत असेल ना तर सांभाळा याला दीड तास आणि दाखवत रहा ते प्राणी पक्षी" असं त्यांना म्हणावं असं फार वाटत होतं पण दरम्यान "भ्याSSSS(ही)" सातव्या आसमानात चढायला लागल्याने त्या मानांकडे दुर्लक्ष करून मी लगबगीने घरात परतलो. घरात आल्यावरही रडगाणं कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. एक चॉकलेट, एक गाडी यांच्या मदतीने आणि पुन्हा एकदा अर्धा तास खिडकीत उभं राहून त्या "आंताक्का, ओमा, दिआं आणि इम्म च्ची" चा टॉप व्ह्यू घेऊन झाल्यावर मगच माझी सुटका झाली. एकुणात हे असंच चालू राहिलं तर त्याची ए फॉर आप्प, बी फॉर बें वाली बाराखडी आमच्यासाठी बदलून आय फॉर आयोडेक्स, सी फॉर क्रोसिन करावी लागेल आणि त्याला -१० [आमचे येथे एकदाच अर्थ सांगितले जातात :(आमच्याच) हुकुमावरून] च्या थंडीत स्नोमन दाखवता दाखवता जागच्या जागी गोठून लवकरच आमचाच स्नोमन होईल याबाबत माझ्यात आणि बाल-सांताच्या मातोश्रींत (कधी नव्हे ते) एकमत झालं आणि त्यामुळेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" च्या थाटात "स्वहस्तपाद-रक्षणाय आणि (इम्मच्ची)खूळ-निग्रहणाय" आम्ही काही पावलं तातडीने उचलण्याचा निर्णय घेतला.

हेच ते आम्हाला गोठवणारं इम्म च्ची
पाहिलं पाऊल : त्याला खाली नेऊन इम्म च्ची दाखवणं बंद करणे.
दुसरं पाऊल : वरून खिडकीतूनही 'एका वेळी फक्त १० मिनिटंच' असं दिवसातून दोनदाच दाखवणे.

परंतु बाल-सांता कुठल्याही पावलाला दाद देत नसून पाहिलं पाऊल आणि दुसरं पाऊल म्हणजे प्रत्यक्षात आमचा पहिला फाऊल आणि दुसरा फाऊल असून आमच्यातला करार हा एखाद्या एकतर्फी प्रेमापेक्षाही एकतर्फी असल्याचं दुसर्‍या दिवशी दिवसभर वाजलेल्या इम्मच्ची-गानामुळे आणि त्यामुळे भंडावून गेलेल्या डोस्क्यामुळे आमच्या लक्षात आलं. थोडक्यात सप्तपदीतली पहिली दोन्ही पावलं चुकीची पडली होती (वरच्या हो. उग्गाच कैच्याकै).. लहानात लहान फावलालाही बाल-सांता चांगली कडडक शिक्षा देतो या नियमाच्या तात्पुरत्या झालेल्या विस्मरणाची फळं भोगून झाल्यावर आम्ही पुढचं पाऊल कुठलाही फाऊल न करता अगदी योजनापूर्वक उचलण्याचं ठरवलं.

तिसरं पाऊल : इम्म च्ची घरी आणणे.

काही काही गोष्टी, घटना, प्रस्ताव, विधानं ही जोवर आपण त्यामागची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव वगैरे वगैरे समजावून घेत नाही तोवर वाचायला/ऐकायला फार सोपी वाटतात. थांबा.. सोप्पं करून सांगतो.

१. ज्यांचे आजोबा/पणजोबा महामहोपाध्याय वगैरे वगैरे होते,

२. ज्या घरात गेली कित्येक वर्षं दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा न चुकता केली जात असे,

३. ज्या घरात नॉनवेज, अंड वगैरे तर सोडाच पण ब्रेड, पाव, पिझ्झा, मॅगी, बिस्किटं वगैरेही अजूनही खाल्ली जात नाहीत,

४. ज्या घरात अजूनही कट्टर चातुर्मास पाळला जातो.. म्हणजे कांदालसूण विरहित वगैरे वगैरे,

५. ज्या घरात आत्तापर्यंत कधीही वाढदिवस केक वगैरे कापून साजरे झालेले नाहीत,

त्या घरातल्या लेकाने/सुनेने आणि नातवाने संगनमताने च्यामारिकेतल्या घरात का होईना ख्रिसमसट्री उर्फ इम्म च्ची आणणे.

हां.. आता बोला.. आता कसं वाटतंय वाचायला? थोडक्यात घरात ख्रिसमसट्री आणणे म्हणजे छ्या छ्या छ्या !! अब्रह्मण्यम !! धर्मभ्रष्ट !! अर्थात अतिशयोक्ती राहुदेत पण अगदी एवढी तीव्र मतं नसली तरी आपल्या लेकाने आपल्या नातवाच्या हट्टासाठी स्वतःच्या घरात ख्रिसमस ट्री आणणे ही कल्पना पचवणं त्यांच्यासाठी जरा जडच होतं. पण -१० वाली थंडी, हात शोधणे, स्नोमन होणे वगैरे वगैरे रोजच्यारोज घडणार्‍या घटनांच्या अपरिहार्य तीव्रतेमुळे अखेरीस या फावलाचं एका यशस्वी पावलात रुपांतर झालं. अशा रीतीने 'स्वदेसा'तून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर आम्ही लगेच इम्मच्चीच्या तयारीला लागलो.

ज्या घरातला कुठलाही मेंबर आर्टिस्ट नसतो त्या घरातले लोक फार्फार सुखी असतील असं मला आपलं एक उगाच वाटतं नेहमी.. म्हणजे त्यांना येताजाता "आम्ही कलाकार लोक .." टाईपची वाक्य ऐकायला लागत नाहीत म्हणून नाही (म्हणजे.. म्हणूनही) तर त्या घरातल्या लोकांना गणपतीचं मखर, दिवाळीतला आकाशकंदील वगैरे प्रकार उगाच रात्र रात्र जागत, स्वतःच कायकाय खुडबुड वगैरे करत घरी बनवावे लागत नाहीत तर ते त्यांना कुठलाही कमीपणा न बाळगता, ताठ मानेने बाजारातून विकत घेण्याची चैन करता येते !! गणपतीत ही चैन  माझ्या नशिबी नव्हती, दिवाळीतल्या कांदिलाच्या वेळीही अस्पष्ट का होईना पण निषेध नोंदवून मी आमच्या घरातल्या आर्टिस्टला आकाशकंदील एकटीने करायला सोडून देऊन ती चैन साधली होती.

पण यावेळी मात्र मी स्पष्टपणे निषेध नोंदवून ख्रिसमस ट्री घरी वगैरे न करता कंपल्सरी बाहेरून विकत आणायचा असा वटहुकूम काढला. पण दीड-दोन फुटी उंचीच्या, रंगीबेरंगी चमचमत्या कागदाच्या खोट्या ख्रिसमस ट्रीच्या आयफेल टॉवर/अल बुर्ज/ट्विन टॉवर्स वगैरे वगैरेंच्या उंच्यांनाही लाजवेल इतक्या उंचावर पोचलेल्या किंमती बघून तो वटहुकूम नसून वाट-हुकूम असल्याचं लवकरच माझ्या लक्षात आलं.

एवढाल्ले पैसे (वाचा डॉलर्स) देऊन लोकं खरंच दर वर्षी ख्रिसमस ट्री घेतात? बापरे !! पण आता (तिसरं) पाऊल मागे घेणं शक्यच नसल्याने आम्ही एक त्यातल्या त्यात स्वस्त पण टिकाऊ , कमी उंचीचं पण देखणं, खोटं पण चमचमतं थोडक्यात आखूडशिंगी बहुदुधी असं एक 'मध्यमवर्गीय' ख्रिसमस ट्री विकत घेतलं. मला टिकाऊ, देखणं, चमचमतं वगैरे वगैरे वाटत असलेलं ते ट्री बाल-सांताच्या मातोश्रींच्या दृष्टीने फारच साधंसुधं, नीरस, टिपिकल इत्यादी ठरल्याने त्यांनी ते थोडं (!) सजवण्यासाठी त्याच्याभोवती गुंडाळायला दोन-चार चमचमत्या चंदेरी माळा, दोन-तीन छोट्या बेल, काही रंगीत चेंडू असे सगळे '... पेक्षा मोती जड' आयटम्स घेतले. तो सारा लवाजमा घेऊन आम्ही घरी परतल्या परतल्या सांता आणि मातोश्री यांनी मिळून शॉपिंग बॅग्स रिकाम्या केल्या. मी शांतपणे लॅपटॉपमध्ये डोकं घातलं.

२-४ मेल्स, ५-६ ब्लॉग्ज, ३-४ पेपर्स वाचून होतात ना होतात तोवर "कसं दिसतंय रे? बघ ना !" चा चित्कार माझ्या कानी पडला. फार काहीतरी महत्वाचं वाचतोय असा आभास निर्माण करून किंचित त्रासिक चेहरा करून लॅपटॉपमधून डोकं बाहेर काढलं. "एवढं महाग ख्रिसमस ट्री एवढ्यात सजवून झालं सुद्धा??" असा विचार माझ्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता (असावा) परंतु माझ्या निव्वळ मुद्राभिनयातून तो विचार समोरच्या कलाकारांपर्यंत पोचेल एवढी माझ्या अभिनयाबद्दलची शाश्वत्ती माझी मलाच नसल्याने प्ले-सेफ म्हणून मी तो मुद्राभिनय प्रत्यक्ष संवादाचा आधार घेत पुन्हा एकदा साभिनय सादर करून दाखवला. त्यावर "त्याचा काय संबंध?" या समोरून आलेल्या बाणेदार उत्तराने मी डगमगून जात पुन्हा एकदा मूकपटाची 'कोशिश' केली.
"महाग ट्री असलं तर सजवायला जास्त वेळ लागतो असा काही नियम आहे की काय? आणि तसाच नियम लावायचा म्हटला तर उलट आपलं हे ट्री साधारण दीडेक मिनिटात सजवून व्हायला पाहिजे.. नाही का?"

मी पुन्हा एकदा मुद्राभिनयाचीच कास धरली परंतु यावेळचा अभिनय शरद कपूर/चंद्रचूड सिंग/इम्रान हाश्मी वगैरे वगैरे बोकडांच्या प्रेरणेने पक्षि तोंडावरचं झुरळही (नेहमी नेहमी काय माशी??) न हलवता केला त्यामुळे मला नक्की काय म्हणायचं आहे ते समोरच्या दीड तिकिटाला कळलंही नाही.

घरातलं इम्म च्ची
लपवलेलं निरांजन'


अर्थात जे काय असेल ते असो पण ती रंगीबेरंगी सजावट, डिझाईन वगैरे वगैरेमुळे ते ख्रिसमस ट्री दिसत मात्र जाम सही होतं. आता या वाक्यातलं 'होतं' चं टायमिंग एवढं जबरी असेल असं मलाही वाटलं नव्हतं कारण मी हा ट्रीच्या देखणेपणाचा वगैरे विचार करतोय ना करतोय तोच रारा सांतासाहेब यांनी त्याला अचानक धक्का देऊन, खाली पाडून त्याला 'होत्याचं नव्हतं' करून टाकायचं ठरवल्याचं दिसत होतं. त्या एकंदर सजावटीच्या चिंतेने बायको आणि उंच किंमतीच्या भीतीने मी असे दोघेही एकदम ट्रीच्या दिशेने धावलो आणि ते उचलून टेबलवर ठेवलं. थोडक्यात हा दीड-दोन फुटी ख्रिसमस ट्री समुद्रसपाटीपासून किमान चार-पाच फुट उंचावर तरी ठेवायला लागणार होता कारण केट विन्स्लेटला लाजेपोटी टायटॅनिकच्या डेकवरून उडी मारायला भाग पाडेल अशा शिताफीने पायांच्या अंगठ्यांवर उभं राहून हात वर करून चार पाच फुटाचं अंतर कापणं हा सांतोजीच्या डाव्या हाताचा मळ होता. आता त्याचा हात पोचू नये म्हणून गुढी किंवा आकाशकंदिलाप्रमाणे ख्रिसमस ट्री टांगून तर ठेवता येणार नव्हता आणि त्याच्या हातच्या मळाच्या कक्षेत येणार नाही असं कुठलंही टेबल घरात शिल्लक राहिलं नव्हतं.

परिस्थितीच्या अशा विचित्र कात्रीत सापडलो, क्षितिजापर्यंत लांब (आणि उंच) नजर टाकूनही जेव्हा कुठलाच मार्ग दिसत नाही अशा वेळी परमेश्वर हमखास मदतीला येतो या (मला तेव्हा नुकत्याच सुचलेल्या) उक्तीप्रमाणे परमेश्वर थेट नाही पण इनडायरेक्टली आमच्या मदतीला आला. आम्हाला अगदी आकाशकंदील टांगून ठेवल्यागतही नाही की अगदीच बाल-सांताचा थेट हात लागेल इतक्याही खाली नाही अशी परफेक्ट उंचीची एक वस्तू हाती लागली. बाप्पा पुन्हा एकदा पावला होता. गणपतीत केलेली मेहनत गणपती गेले तरीही वाया गेली नव्हती.

निरांजनाचा उपयोग देवासमोर दिवा लावणे, गणपतीचं आसन  म्हणून वापरणे याबरोबरच नासधूस होऊ नये इतपत उंचीवर ख्रिसमस ट्री ठेवण्यासाठीही यशस्वीपणे केला जाऊ शकतो याचा आम्हाला नवीन साक्षात्कार झाला. अर्थात गणपतीच्याच निरांजनावर थेट ख्रिसमस ट्री ठेवायला जरा विचित्र वाटत असल्याने ते पाप आपलं सॉरी निरांजन झाकायला आम्ही गणपतीच्या सजावटीत (न) वापरलेलं पांढरं सॅटीनचं कापड वापरलं. त्यामुळे स्नोचा इफेक्टही आला आणि पाप/निरांजनही लपलं ;)

पुढच्या वर्षीचं गणपतीचं मखर हे त्याचा दिवाळीतला आकाशकंदील आणि पुढच्या वर्षीचं इम्मच्ची ठेवायला कसा उपयोग करता येईल या सगळ्याचा विचार करूनच बनवायचं हे तर आता नक्की ठरलं.  ;)

***

परवा बाल-सांता इम्मच्ची समोर पाठमोरा उभा असलेला दिसला. हा एवढा शांत उभा राहून काय एवढं बघतोय हे न कळल्याने दोन मिनिटं वाट बघून हळूच त्याच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि त्याला विचारलं "काय करतोयस रे बेटा?" अचानक माझं लक्ष त्याच्या जोडलेल्या हातांकडे गेलं आणि तेव्हाच तोही माझ्याकडे बघून खिदळत खिदळत समोरच्या झाडाकडे बघून हात जोडत 'बाप्पॅ, बाप्पॅ' ओरडायला लागला. मी निरांजनासकट इम्मच्चीही हादरेल एवढ्या जोराने डोक्यावर हात मारून घेतला !! ;)

50 comments:

  1. हेहे!!! मस्त हेरंब!!! मज्जाच आली!!! आम्हीं पण आणला होता एकदा ख्रिसमस ट्री. मोठी होती तशी लेक. मग अगदी सजवलाबिजवला! आणि एक पार्टी पण केली!! खूप छान झालीय पोस्ट! पिल्लू एकदम गोड आहे ना?! बोबडं बोबडं?! :)

    ReplyDelete
  2. हा हा अनघा... हाबार्स.. !

    अग आमच्याकडे तर या ख्रिसमस ट्री शिवाय पान हलत नाही हल्ली.. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इम्मच्ची इम्मच्ची चा जप चाललेला असतो.. त्याला कधीपासून ते ख्रिसमस ट्री हातात घेऊन मनसोक्त खेळायचं आहे. पण आम्ही त्याचा तो कट यशस्वी होऊ देत नाही ;)

    बोबडं तर आहेच आणि त्यात पुन्हा नॉनस्टॉप टकळी चालू.. फुल धम्माल एकदम :)

    ReplyDelete
  3. रारा. छोटा सांता रॉक्स.....

    एकदम कडक,मस्त ....

    ReplyDelete
  4. आदितेय रॉक्स रे!!! ऑलवेज :D:D:D
    आणि >>आखूडशिंगी बहुदुधी असं एक 'मध्यमवर्गीय' ख्रिसमस ट्री विकत घेतलं.
    लई भारी!!! ;)

    ReplyDelete
  5. हेहे आभार्स सचिन.. छोटा सांता नेहमीच फुल रॉक ऑन असतो ;)

    ReplyDelete
  6. हे हे लैई भारी...पिल्लू खूपच गोड आहे.
    आदितेय रॉक्स रे!!! ऑलवेज :D:D:D +1

    ख्रिसमस दोन वर्षापूर्वी ऑफीसमध्ये साजरा केला होता एकदम प्रॉपर. सगळ्या पॉडला कापुस लावून त्यावर चमकी टाकून स्नो फील द्यायचा प्रयत्‍न आणि सान्ता बनवला होता आणि रात्री २ वाजता जाउन चोरबाजारातून ११० रुपयाचा ख्रिसमस ट्री आणला होता :)

    ReplyDelete
  7. >>"स्वहस्तपाद-रक्षणाय आणि (इम्मच्ची)खूळ-निग्रहणाय"

    हे..हे..हे..अशक्य भारी लिहल आहेस.

    छोटी वटवट मोठ्या वटवटीला भारी पडणार आहे ...हे दिसतय.

    ReplyDelete
  8. >>ए फॉर आप्प, बी फॉर बें वाली बाराखडी आमच्यासाठी बदलून आय फॉर आयोडेक्स, सी फॉर क्रोसिन करावी लागेल...
    अगदी अशक्य उदाहरण दिले आहे...
    आवडलं... सहीच... :)

    -श्रुती

    ReplyDelete
  9. Heramb, few yrs ago I felt the same way, can't help it we have too change
    Santa comes to our house on every Xmas eve n gives presents.
    it's good to see them living in the fantasy. Wish we had a chance to
    celebrate Diwali n Xmas in same enthu while growing up. Enjoy this fun
    and more to come. Aata fakta ek santachi aarti karane baki aahe :)- madhu

    ReplyDelete
  10. मस्त रे...आदिदेव रॉक्स
    मला शेवट खूपच भावला रे
    मस्त लिहील आहे

    ReplyDelete
  11. ख्रिस्टमस (मी असाच उच्चार करतेय ;)) च्या आधि आली एकदाची तुझी ही पोस्ट :)

    भन्नाट, तुफान बॅटिंग केलीये.. तू नव्हे आदिने :) मला ना क्षणभर वाटले की आदि आणि गौरा-ईशान भेटल्यावर काय बहार येईल त्यांच्या गप्पांना :)
    पोस्ट जाम आवडली.... ईम्म च्ची ची सजावटही.. अर्थात हा निरोप अनूजासाठी :) ... तिला सांग त्या महाग ख्रिसमस ट्री प्रकरणाला तिने ज्या सहजतेने, सफाईने हाताळले ते फार आवडले ;)

    बाकि आदि रॉक्स :) मेरी ख्रिसमस :)

    (तू मस्त लिहीली आहेस पोस्ट हे वेगळे सांगणे न लगे!)

    ReplyDelete
  12. ___/\___

    भन्नाट लिवलयं.

    ReplyDelete
  13. Great blog! Amhihee saghya aghaga(vaghoba), kunkun (kurmure), sachha (svachha) ase mast mastshabd aikat aahot.

    ReplyDelete
  14. A for आपो , B for फुगा...असं डोळे मोठे करत सांगणारा एक बाल-सांता माझ्याकडेही आहे. तुझा इम्म च्ची किती किती गोड वाटला म्हणून सांगू.
    तू लिहीलं आहेस त्या पेक्षा खूप खूप गोड आहे तुझं 'पिलोट' ...

    ReplyDelete
  15. हाहाहा.... काय गोड रे... loully ekdam... god bless u all... n hv a merry merry X'mas n gr8 new year... :)

    ReplyDelete
  16. एक्दम मत्त ले. व्वा वा लिलं हायेस.

    ReplyDelete
  17. मस्त लिहिलंय हेरंब, पिल्लू खूप गोड आहे .. :)
    आमच्याकडेही दिवाळीच्या वेळेस आकाशदिऊ..आकाशदिऊ चा जप चालला होता (अजूनही चालूच आहे) ..... रस्त्यात पण कुठे दिसला तर आम्ही थांबून १० मिनिटं तेच बघायचो.... :)

    ReplyDelete
  18. धम्माल.... काय भार्री लिहिलं आहे. सकाळी उठल्या उठल्या वाचलं. आता दिवस चांगला जाणार माझा. हसतोय अजूनही. भेटायला हवं आदितेयला एकदा. :-)

    ReplyDelete
  19. एकदम भारीच! आदि रॊक्स ऒलवेज आणि आदिचा बाबाही... :)

    किती गोड गोंधळ घालतोय आदि. गणपती तो विसरला नाहीये. तुझी मेहनत सार्थकी लागली की. :)

    ReplyDelete
  20. आदि ऑलवेज रॉक्स यार ...... :)
    शेवटच 'बाप्पॅ, बाप्पॅ' खूप गोड वाटलं....बाकी आदितेयाचा विषय आहे तेव्हा ह्या पोस्टबद्दल काय बोलू.... ;)
    लय भारी ...

    ReplyDelete
  21. बाबा.. आभार्स आभार्स.. अरे तो अति रॉकतो हाच तर प्रॉब्लेम आहे ;) अरे बाकीच्या झाडांच्या किंमती बघून हे महाग झाडहि मला अचानक मध्यमवर्गीय वाटायला लागलं ;)

    ReplyDelete
  22. हेहे सुहास, धन्स रे .. !

    चोरबाजारातून ख्रिसमस ट्री.. हेहे लोल..

    इथेही आमच्या हापिसात, हापिसच्या बाहेर मोठमोठी ख्रिसमस ट्रीज लावली आहेत. मस्त वाटतं.. एकदम उत्सवी वातावरण :)

    ReplyDelete
  23. योगेश.. हा हा हा.. अरे पडणार कसली ऑलरेडी पडते आहे.. नशीब माझं तो अजून ब्लॉग लिहिण्याएवढा झालेला नाही ;)

    प्रतिक्रियेबद्दल खूप आभार्स.. !

    ReplyDelete
  24. श्रुती :D :D... अनेक आभार्स..

    वेळीच इम्मच्ची घरात आला नसता तर ती बाराखडी नक्की खरी झाली असती :)

    ReplyDelete
  25. Hi Madhu !! Nice to see you here.. ! Welcome to blog.. !

    >> Wish we had a chance to
    celebrate Diwali n Xmas in same enthu while growing up.

    Yeah.. right.. totally agree.. What I've written regading diwali/ganpati and X'mas is just for fun sake. Just TP..

    Oh god.. सांताची आरती... हा हा लोल !!

    Thanks for the comment and Keep visiting..

    ReplyDelete
  26. मनापासून धन्यवाद, सागर...

    ReplyDelete
  27. ख्रिस्टमस ?? आयला भार्री !! हाहाहा

    अग तो भन्नाटच बॅटिंग करायला लागला आहे हल्ली.. फुल नॉनस्टॉप एकदम !!

    >> आदि आणि गौरा-ईशान भेटल्यावर काय बहार येईल त्यांच्या गप्पांना :)

    जबरी आयडिया आहे.. पण त्यांच्या गप्पांनी १०-१५ मिनिटांत आपली टाळकी भिरभिरायला लागतील एवढं मात्र नक्की. ;)

    निरोप पोचवण्यात आलेले आहेत हो SSS

    मेरी ख्रिसमस... तेरीभी ख्रिसमस.. (फार पांचट होता हा पण असुदे..) :D

    ReplyDelete
  28. दिपक, धन्स धन्स प्रतिक्रियेसाठी.. :)

    आणि ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा..

    ReplyDelete
  29. प्रिय अनामिक/का,

    प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार.. !!

    आघाबा, कुनकुन, सच्च... हा हा मत्त मत्त.. आवललं ... ;)

    ReplyDelete
  30. शाशा,

    अरे वा.. तुझ्याकडेही बाल-सांता आहे? वा. गुड गुड.. मग त्या बालसांताचे 'इल्लुसे-पिल्लुसे' पराक्रम कधी ऐकायला मिळणार आम्हाला? लवकर येउदे :)

    पिलोटाला सांगतो तुझा निरोप :)

    आमच्या सांताचंही ए फॉSSर आप्प, बी फॉSSर बे, सी फॉSSर के, डी फॉSSर दाद वालं रेकॉर्डिंग देवकाकांच्या शब्दगारवा अंकात प्रसिद्ध झालंय.. तेही टाकतो ब्लॉगवर पुढच्या आठवड्यात :)

    पुन्हा एकदा प्रतिक्रियेबद्दल आभार आणि फॉलोअर झाल्याबद्दल डब्बल आभार ... आणि ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत राहा नेहमी.

    ReplyDelete
  31. सौरभ :D .. loully loully thanks ..

    तुलाही मेरी ख्रिसमस आणि ह्याप्पी ह्याप्पी न्यु न्यु इयर !!

    ReplyDelete
  32. सिद्धाल्त, आबाल्च आबाल्च ;)

    ReplyDelete
  33. प्रिती,

    प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार्स.. अगदी अगदी.. आमच्याकडे आतात आतात चालू असतं.. इम्मच्ची आणि आतात.. पण सध्या इम्मच्ची चा शेअर जास्त अप आहे एवढं मात्र नक्की.. आणि इथे सध्या पावलोपावली, प्रत्येक घरात, दुकानात असे इम्मच्ची दिसत असल्याने आम्हालाही प्रत्येक इम्मच्ची समोर हजेरी लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही :)

    पुन्हा एकदा आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा. !

    ReplyDelete
  34. संकेत,

    धन्स धन्स रे :)

    हसा हसा आमच्या फजितीवर ;)

    >>भेटायला हवं आदितेयला एकदा. :-)

    कधी येतोयस बोल.. भेटूया नक्की एकदा !

    ReplyDelete
  35. श्रीताई, खूप हाबार्स ! रॉकारॉकी चालली आहे नुसती :)

    धमाल येते त्याचे गोंधळ निस्तरताना :) मधून मधून त्याचं बाप्पा बाप्पा चालू असतं.. बहुतेक लक्षात असतील गणपती.. पुढच्या वर्षी कळेल :)

    ReplyDelete
  36. धन्स रे देवेन.. खूप रॉक्स जमा केलेत तुम्ही सगळ्यांनी त्याच्या नावावर ;)

    >> तेव्हा ह्या पोस्टबद्दल काय बोलू

    हे हे.. तो अशीच बोलती बंद करतो आमची :P

    ReplyDelete
  37. मी सारखी तुझी ही पोस्ट उघडते आणि ते सुरुवातीचे बोबडे बोल वाचत बसते!!! हसायलाच येतं बाबा!! :D

    ReplyDelete
  38. कित्ती गोड... :-)
    इम्म ची... छान वाटते ऐकायला...
    Btw...शेवट खूप सही आहे...
    आणि हो.. merrry christmas... to आदु...n his sweet parents,,, ;-)

    ReplyDelete
  39. मत्त मत्त वातलं वातुन

    ReplyDelete
  40. ज्या घरातला कुठलाही मेंबर आर्टिस्ट नसतो त्या घरातले लोक फार्फार सुखी असतील असं मला आपलं एक उगाच वाटतं नेहमी...हे खरंय....एकदा घरी ये म्हणजे पटेलही...
    बाकी काय एकदम जबरा बॅटिंग केलीय....आमच्याकडे पुढच्या वर्षी नक्की येईल आच्चीची (तो व्हिडिओ आठवतोय नं??) अशी लक्षणं आहेत..पण यावर्षी सांतोबांना आम्हीच intorduce केलय...:)

    ReplyDelete
  41. हेहे अनघा... आभार्स.. पुढच्या आठवड्यात एक पोस्ट टाकणार आहे त्ती वाचून/ऐकून तर तुला हसतच राहायाला लागेल बघ:)

    ReplyDelete
  42. मैथिली, धन्स धन्स..

    इथे छान वाटतंय ग पण त्या थंडीत कुडकुडत उभं असताना वाट लागते ;)

    तुलाही मेरी मेरी ख्रिसमस !!

    ReplyDelete
  43. दन्नवाद मंदार ;)

    ReplyDelete
  44. अरे हे पोस्ट वाचलं होतं, तेंव्हाच कॉमेंटायचं होतं, पण जमलं नाही. खरंच हे दिवस अगदी अळवावरच्या पाण्यासारखे असतात.. धरून ठेवता येत नाहीत.
    ते शेवटंच वाक्य " बाप्पा.. बाप्पा " वाचून अगदी पोट धरून हसलो होतो.

    ReplyDelete
  45. खरंय काका... रोज काहीतरी नवीन धम्माल किस्से घडत असतात.. खूप मजा येते :)

    ReplyDelete
  46. घरच्या मैदानावरची तेंडूलकरांची परत भन्नाट फलंदाजी..
    आदिनाथांच्या कृपेने परत एक शतक ;)

    >> त्या घरातल्या लेकाने/सुनेने आणि नातवाने संगनमताने च्यामारिकेतल्या घरात का होईना ख्रिसमसट्री उर्फ इम्म च्ची आणणे.

    संगनमताने या शब्दाने अक्षरशः लोळलो रे... लई भारी

    ReplyDelete
  47. आदिनाथांची कृपा जरा जास्तच व्हायला लागली आहे हल्ली.. सवडीने सगळे किस्से सांगेन :)

    हेहेहे.. अरे त्यांच्या दृष्टीने संगनमतच :)

    ReplyDelete
  48. निरांजन की समई?
    पोस्ट निर्विवादच चांगली --'भारी'पैकी आहे.

    ReplyDelete
  49. delete my earlier comment :
    प्लास्टिकच्या दोन टोपल्या एकमेकींवर ठेवून तळाशी भोकं पाडून दोरीने घट्ट गाठ मारून त्या एकमेकांना जोडून निरांजनासारखा आकार केला.
    just read it and my prob. stands null and void.

    ReplyDelete
  50. हेहे :)

    'भारी'पैकी धन्यवाद समीक्षा...

    आणि ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...