Monday, December 13, 2010

वेळ .... वेल !!

परवा 'खेले हम जी जान से' बघण्याचा योग आला. नाही. खरं म्हटलं तर अगदी मुद्दाम ठरवून बघितला. इथल्या एका लोकल वाहिनीवर दर रविवारी सकाळी साधारण तासभर चालणार्‍या बॉलीवुडबद्दलच्या कार्यक्रमात बघितलेले प्रोमोज, युट्यूब आणि पेपरातलं परीक्षण वाचून वेगळा (आणि जिव्हाळ्याचा) विषय वाटल्याने बघायचं नक्की केलं. जवळपास वर्षभरानंतर बघितलेला हिंदी चित्रपट. गेल्यावर्षी 'थ्री इडियट्स' बघितला होता आणि त्यानंतर थेट हा 'खेले हम ..'... अर्थात मध्ये (चुकून, दुर्दैवाने वगैरे वगैरे) 'माय(ला) नेम इज खान' बघितला (बघावा लागला) होता. पण तो बघितला आहे असं लोकलज्जेस्तव मी कधीच कबुल करत नाही. त्यामुळे ऑफिशियली, ऑन पेपर 'थ्री इडियट्स' नंतर वर्षभराने बघितलेला चित्रपट म्हणजे 'खेले हम..'.. जाउदे.. सिरीयस लिहिताना उगाच आचरटपणा नको. 'खेले हम.. ' बद्दल सांगायचं तर चित्रपटाचा उद्देश, कथा, पात्रनिवड वगैरे चांगले आहेत. परंतु संकलन, संवाद अशा अनेक महत्वाच्या बाबतीत तो बराच डावा वाटतो. पण अशा काही उणीवा असल्या तरीही चटटोग्राम सारख्या छोट्याशा गावातली स्वातंत्र्यलढ्याची एक प्रचंड मोठी आणि तितकीच दुर्लक्षित (माहित नसल्याने) कहाणी आजच्या पिढीपर्यंत पोचवण्याची निर्मात्यांची धडपड, उत्साह आणि उद्देश निव्वळ वाखाणण्याजोगा !! असो.. (पुन्हा एकदा) चित्रपटाचं परीक्षण, समीक्षण वगैरे वगैरे लिहिण्याचा अजिबात काही विचार नाही. पण अशा प्रकारचे चित्रपट बघताना आणि बघून झाल्यावर किंवा अशा प्रकारची पुस्तकं वाचताना जो एक विचार नेहमी मनात येऊन जातो तोच आज पुन्हा आला. हाच विचार 'भगतसिंग' बघतानाही आला होता आणि 'रंग दे बसंती' बघतानाही.. 'लगान' बघतानाही असंच वाटलं होतं,'मंगल पांडे' बघतानाही .. 'वीर सावरकर'च्या वेळीही असंच वाटलं होतं आणि 'बोस.. द फरगॉटन हिरो' च्या वेळीही अगदी अगदी असंच... अगदी असंच काहीसं डोक्यात येऊन गेलेलं ते श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती, स्वामी, छावा, संभाजी, महानायक वगैरे वगैरे वाचतानाही..

हे सगळं वाचत, बघत असताना सतत दिसतो तो त्या त्या काळातला अन्याय, त्या त्या महापुरुषांनी त्या त्या काळात दिलेले लढे, केलेलं शत्रूचं निर्दालन, स्वातंत्र्यासाठी दिलेलं जीवाचं बलिदान, केलेले महान त्याग.. संसार, जातीपाती, उच्चनीचता, नोकरी, पगार, पैसा, वडिलोपार्जित जमीनी, बादशाही जहागिर्‍या, वतनं, इमले, माड्या, मानसन्मान या सगळ्या जोखडांना बेधडकपणे धुडकावून कणभरही विचलित न होता आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने केलेली अथक वाटचाल आणि त्यासाठी वेळोवेळी लावलेली जीवाची बाजी. हे सगळं सगळं दिसतं आणि एकच विचार मनात येतो... "च्यायला, चुकीच्या वेळी जन्माला आलो यार.. !!!"

खरंच.. असंच वाटतं नेहमी.. !! निदान मला तरी वाटतं. किमान शंभर-दीडशे वर्षं आधी जन्माला यायला हवं होतं. इतक्या आधी की साधारण १८५७ च्या आद्य स्वातंत्र्य लढ्यात निदान एक बाल क्रांतिकारक म्हणून भाग घेता आला असता.. बाबू गेनू, शिरीष कुमार यांच्यासारखं कोवळ्या वयात देशासाठी जीव सत्कारणी लागला असता.. भगतसिंगांच्या 'नौजवान भारत सभा' मध्ये दाखल होता आलं असतं.. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना जवळून बघता आलं असतं.. बहिर्‍या इंग्रजांना ऐकू जाईल असा आवाज केलेल्या असेंब्लीतल्या बॉम्बस्फोटाच्या योजनेत सहभागी होता आलं असतं.. त्या क्रांतीसुर्यांबरोबर 'इन्कलाब जिंदाबाद'चे नारे बेंबीच्या देठापासून देता आले असते, लोकमान्य टिळकांचे अग्रलेख वाचून 'शरीरातला अणुरेणु पेटून उठणे' म्हणजे काय याचा अनुभव घेता आला असता.. चापेकर बंधू, मदनलाल धिंग्रा इत्यादींप्रमाणे आपल्यालाही निदान एका तरी इंग्रज अधिकार्‍याला गोळी घालायला मिळाली असती किंवा त्यांच्या गाडीवर बॉम्ब फेकता आला असता.. "कदम कदम बढाए जा खुशी के गीत गाए जा" म्हणत सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत सामील होता आलं असतं.. त्यानिमित्ताने त्यांच्यासारख्या हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला जवळून बघता आलं असतं.. जीव गेला तरी बेहत्तर पण तिरंगा जमिनीला न टेकू देण्याच्या प्रयत्नात लांबून आलेल्या एखाद्या गोळीची शिकार होताना कृतकृत्य होऊन त्या तिरंग्याकडे अखेरची नजर टाकताना डोळ्यात भरून वाहणारं समाधान अनुभवता आलं असतं आणि शेवटचा 'वंदे मातरम्' चा जयघोष करता आला असता...

किंवा मग.... किंवा मग थेट सतराव्या शतकात जन्माला यायला हवं होतं. शिवकालात.. महाराष्ट्राच्या सुवर्णयुगात !! १६३० ते १६८० च्या मध्ये कधीही !! शक्यतो १६३० च्या जवळपास.. म्हणजे मग बाल शिवाजीबरोबर त्यांच्या सेनेत सामील होता आलं असतं.. रोहिडेश्वराच्या पिंडीच्या साक्षीने स्वराज्याची रक्तशपथ घेता आली असती.. पन्हाळगड ते विशाळगडाच्या जीवघेण्या पाठलागात छत्रपतींच्या पालखीला निदान खांदा देता आला असता.. तोफांचे तीन आवाज ऐकेपर्यंत बाजीप्रभूंबरोबर पावनखिंड लढवत ठेवता आली असती आणि शिवरायांचे प्राण वाचवण्याचं एक विलक्षण समाधान आणि शेकडो जन्मांचं पुण्य गाठीशी लावता आलं असतं.. प्रतापगडावर, जावळीच्या खोर्‍यात अफ्झुल्ल्याच्या सैन्याला कापता आलं असतं. लाल महालाला विळखा देऊन बसलेल्या शास्ताखानाला ठेचायला जाताना निदान एका तरी खरंच निदान एका तरी मुघल सरदाराला अल्लाला प्यारा करता आलं असतं.. शिवराज्याभिषेकाच्या वेळी "गोब्राह्मणप्रतिपालक राजाधिराज सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज की SSSSSSSS" ला घसा फुटेल एवढ्या मोठ्ठ्या आवाजात बेंबीच्या देठापासून 'ज SSSS य' असं पुकारून लवून मुजरा करता आला असता.. किंवा.. किंवा... किंवा अगदी असंच काही नाही पण कुठल्या एखाद्या दूरच्या किल्ल्यावर किंवा छोट्याशा खेड्यात का होईना पण राजांचा सेवक म्हणून अभिमानाने आणि समाधानाने राहता आलं असतं..

हे सगळं सगळं थ्रील, तो अनुभव, ते समाधान, ती हुरहूर, ती काळजी, स्वराज्य/स्वातंत्र्यप्राप्ती साठी झालेली युद्धं, लढाया, चकमकी, हल्ले, ते आनंदाचे क्षण, देशासाठी, समाजासाठी जीवाचं बलिदान करण्यातलं समाधान या सगळ्या सगळ्याला मुकलो.. खरंच खरंच खरंच मुकलो!! पण.. पण मग अशा वेळी मला पुनर्जन्मावर विश्वास ठेवावासा वाटतो. तसा माझा पूर्वजन्म, पुनर्जन्म, पिंड, कावळा, पितर, श्राद्ध, पक्ष वगैरे गोष्टींवर विशेष विश्वास नाही. अर्थात विश्वास नाही म्हणजे काही मी लगेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्याच्या थाटात लगेच जे विश्वास ठेवतात त्यांच्या अकलेची मोजमापं काढत नाही किंवा त्यांना दूषणंही देत नाही. आपापली श्रद्धा म्हणून त्या मतांचा मला आदरच आहे.. पण हे असे चित्रपट बघितल्यावर किंवा अशी पुस्तकं वाचल्यावर मात्र मला खरंच पूर्वजन्मावर विश्वास ठेवावासा वाटतो. भलेही जन्माला येण्याचा काळ आपण चुकलो असू पण मागच्या जन्मी कदाचित खरंच आपल्याला लोकमान्य टिळकांचं निदान भाषण का होईना ऐकायची संधी मिळाली असेल, सुभाषचंद्र बोसांचं कदाचित पुसटसं का होईना दर्शन आपल्याला झालं असेल, भगतसिंगांना ओझरतं का होईना पण पाहिलं असेल... किंवा त्याच्याही मागच्या जन्मात कदाचित खरंच राजांच्या पालखीला खांदा दिला असेल किंवा खरंच दरबारात यःकश्चित चाकर म्हणून का होईना पण राजांच्या पावलांची धूळ मस्तकी लावण्याचं अहोभाग्य आपल्याला मिळालं असेल किंवा कोणी सांगावं पण आग्र्याहून सुटताना कदाचित आपणच त्यांच्या निवडक सैन्यातले एक असू !!

चित्रपट संपल्यानंतर हे जे विचार सुरु होतात ते थेट दुसर्‍या दिवशी सकाळी उठेपर्यंत.. हो हो अगदी झोपेतही हेच असतं डोक्यात !! सकाळी उठल्यावर मी लोकसत्ता/मटाची वेबसाईट उघडतो आणि दिसतात घोटाळेच घोटाळे.. गडबड घोटाळे.. २-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कर्ज घोटाळा, 'आदर्श' घोटाळा (बाकी घोटाळा कसा करावा आणि तो कसा पचवावा या बाबतीत 'आदर्श' घोटाळा हा इतर 'घोटाळे'करांनी खरंच अगदी आदर्श घेण्यासारखा आहे. मुमं सोडून कोणाच्याही अंगाला साधं खरचटलंही नाहीये !! आहे की नाही एकदम आदर्श !!).. किंवा मग दिसतं ते गुरुसाहेबांच्या रूपातलं सरकारी पातळीवरचं लांगुलचालन किंवा कसाबराजांच्या रुपाने वसत असलेली एकदम ऑफिशियल अशी सर्वांगीण निष्क्रियता................................ यस्स.. खट्याक !! आणि मग माझ्या लक्षात येतं जन्माला येण्याची वेळबीळ काही चुकलेली नाही. किंबहुना योग्य काळात जन्माला येणं असं वगैरे काही नसतंच.. त्या त्या काळातली लोकं त्या त्या काळाला आपल्या महान कार्याने, आपल्या असीम त्यागाने एवढं महान करून ठेवतात की पुढच्या कित्येक पिढ्यांच्या मनावर त्यांच्या व्यक्तीमत्वांच्या पाउलखुणा ठसठशीतपणे उमटल्या जातात... इतक्या की मग पुढच्या पिढीत जन्माला आलेल्या, चांगल्या कोडकौतुकात लाडाकोडात वाढलेल्या, सगळे हट्ट वेळच्यावेळी पुरवल्या गेलेल्या लोकांना वाटायला लागतं की "अरे, आपण का नाही जन्मलो त्या सुवर्णकाळात... आपण खरंच चुकीच्या काळात जन्मलो".. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण ज्या काळाला सुवर्णकाळ संबोधतोय त्या काळातही गुलामगिरी, भ्रष्टाचार, वैचारिक पारतंत्र्य, नीतीमूल्यांची पडझड हे सारं सारं तेवढ्याच भीषण पातळीवर पोचलेलं होतं जेवढं आत्ताच्या काळात आहे. परंतु त्या लोकोत्तर पुरुषांनी त्यांच्या मनगटाच्या, इच्छाशक्तीच्या, अपार निश्चयाच्या जोरावर त्या काळाला सुवर्णकाळात रुपांतरीत केलं.........  आणि आपण मात्र म्हणत राहतो "च्यायला, चुकीच्या वेळी जन्माला आलो यार.. !!!"

48 comments:

  1. आणि आपण मात्र म्हणत राहतो "च्यायला, चुकीच्या वेळी जन्माला आलो यार.. !!!" +१

    खेले हम मुळे हे सारे विचार तुझ्या मनात आले हे आशूला सांगायलाच हवे. त्याला नक्कीच भावना पोचल्याचे समाधान मिळेल. :)

    ReplyDelete
  2. आभार श्रीताई..

    आशुतोषला नक्की सांग पोस्टबद्दल. तेवढंच माझा ब्लॉग आशुतोष गोवारीकरने वाचलाय असं म्हणून मी भाव खाऊन घेईन :D

    ReplyDelete
  3. हेरंबा मलाही मनापासून ईच्छा आहे हा सिनेमा पहाण्याची.... पाहीन तेव्हा अर्थातच तुमको कळवा जायेगा अभिप्राय...

    बाकि पोस्ट वाचून वाटतय असलेच विचार येणार मनात काहीसे....

    >>>>आणि आपण मात्र म्हणत राहतो "च्यायला, चुकीच्या वेळी जन्माला आलो यार.. !!!" +१

    अगदी अगदी...

    थोडे विषयांतर, हे जे तुला वाटते ना की >>>मागच्या जन्मी कदाचित खरंच आपल्याला लोकमान्य टिळकांचं निदान भाषण का होईना ऐकायची संधी मिळाली असेल, सुभाषचंद्र बोसांचं कदाचित पुसटसं का होईना दर्शन आपल्याला झालं असेल, भगतसिंगांना ओझरतं का होईना पण पाहिलं असेल.

    याबाबत सेम पिंच :)
    (रस्त्यावरच्या नाण्यांच्या स्वप्नासारखेच एकमत पुन्हा एकदा :) )

    पोस्ट उत्तम.... आशूतोष नक्कीच वाचणार तुझा ब्लॉग आणि त्यालाही आवडणार हे नक्की :)

    ReplyDelete
  4. हेरंब, त्या वेळी जी आपल्या देशाची गरज होती, ते कार्य त्यावेळच्या आपल्या पुढाऱ्यांनी केलं...प्राणांची तमा न बाळगता. आणि आपण आज जन्माला आलो आहोत...पण आज आपल्या देशाला ज्या कार्याची गरज आहे ते काही आपण करत नाही आहोत.. or may be आपापल्या परीने आपण करतही असू कदाचित....पोस्ट विचार करायला प्रवृत्त करणारी झाली आहे.

    ReplyDelete
  5. ब्लॉग तर आवडतोच. भावनाही पटल्या.

    बाकी, " चटटोग्राम", "चितगांव", "chittagong" मोठ्ठं शहर झालंय आता...
    http://en.wikipedia.org/wiki/Chittagong

    ReplyDelete
  6. "च्यायला, चुकीच्या वेळी जन्माला आलो यार.. !!!" + 123456789

    अगदी मनातल लिहल आहेस....सध्याच्या काळात पन्नाशी पर्यंत जगण्यापेक्षा त्या काळातील विशीतल मरण किती भारी असेल ना....हे असल षंढासारख जगणं काय जीवन आहे काय??? आपल्या डोळ्यासमोर होणारा भ्रष्टाचार, अत्याचार हे सार पाहुन फ़क्त मन विषण्ण होत.

    ReplyDelete
  7. खरय यार.. त्यावेळी लोकांनीच त्यांच्या हिमतीवर सगळा बदल घडवून आणला पण आता .... :(
    शिवबाच्या सैन्यात एक मावळा असतो तर, भगतसिंगच्या खांद्याला खांदा लावून लढता आल असत तर..मराठ्यांच्या पानिपत युद्धात उतरता आला असता तर..आझाद हिंद सेनेमधला एक शिपाई असतो तर...खरच जीव सत्कारणी लागला असता... मी ह्या सिनेमाच्या वाट्याला गेलो नाही कारण अभिषेकला अभिनयातला अ येत नाही. पण तू म्हणतोयस तर एकदा नक्की बघेन हेरंब. नक्की :)

    ReplyDelete
  8. हेरंब, खरं लिहिलांत.... वेळ चुकीची वैगेरे काही नसते... आज खरेच उठाव करावा अशी परिस्थीती आहे.... उजेडाचे मिणमिणते दिवे नाहीत असे नाही.... एवढाही मी निराश नाही पण हे मिणमिणत्या दिव्यांचे राजमार्ग करण्यासाठी पुढे यायला हवे.... मग हे राजमार्ग करताना सगळ्यांनाच प्रिय अशा गोष्टी नाही करता येणार त्यासाठीची होणारी टीका... अन्याय सहन करण्याची ताकद पाहिजे....( काळाच्या कसोटीवर तुम्ही पत्करलेला मार्ग बरोबर की चूक हे भविष्य ठरवत असते आणि भविष्याने काय ठरवायचे याचे नियोजन वर्तमानातच करणे शक्‍य असते... त्यामुळे वर्तमानातील टीकेला जुमानून चालत नाही....प्रसंगी ती कितीही जहरी असली तरी)
    एकदा तो मार्ग रुळला की लोक नंतर त्यावर झुंडीने चालतात आणि मार्ग करणाऱ्यांना आशीर्वाद देतात.... पण त्यासाठी उपसावे लागणारे कष्ट सहन करण्याची ताकद ठेवावी लागेल.... अगदीच रस्ता निर्माण नाही करता आला तरी तो रस्ता निर्माण करण्यासाठीचा एखादा दगड उचलता आला तरी आपण धन्य झालो असे समजावे.... असे प्रत्येकाने एक एक दगड उचलला तर रस्ता पूर्ण होईल.... पण आपल्याकडे रस्ता पूर्ण झाल्यावर कोणाची पाटी लागणार... आणि या पाटीवर जर आपले नाव नसेल तर दगड कशाला उचला हा विचार जास्त खोल आहे.... ... तर काहीजण त्या पाटीवर माझेच नाव लागावे याचसाठी काम करतात, त्यामुळेच तर पहिला दगड उचलल्यानंतर दुसरा दगड उचलण्यासाठी काही महिने काही वर्षे निघून जातातत..... पण तरीही माझा संपूर्ण क्रांतीवर विश्‍वास आहे.... उठाव होणार यात तीळमात्र शंका नाही.... sushamey

    ReplyDelete
  9. हेरंब, खरं लिहिलांत.... वेळ चुकीची वैगेरे काही नसते... आज खरेच उठाव करावा अशी परिस्थीती आहे.... उजेडाचे मिणमिणते दिवे नाहीत असे नाही.... एवढाही मी निराश नाही पण हे मिणमिणत्या दिव्यांचे राजमार्ग करण्यासाठी पुढे यायला हवे.... मग हे राजमार्ग करताना सगळ्यांनाच प्रिय अशा गोष्टी नाही करता येणार त्यासाठीची होणारी टीका... अन्याय सहन करण्याची ताकद पाहिजे....( काळाच्या कसोटीवर तुम्ही पत्करलेला मार्ग बरोबर की चूक हे भविष्य ठरवत असते आणि भविष्याने काय ठरवायचे याचे नियोजन वर्तमानातच करणे शक्‍य असते... त्यामुळे वर्तमानातील टीकेला जुमानून चालत नाही....प्रसंगी ती कितीही जहरी असली तरी)
    एकदा तो मार्ग रुळला की लोक नंतर त्यावर झुंडीने चालतात आणि मार्ग करणाऱ्यांना आशीर्वाद देतात.... पण त्यासाठी उपसावे लागणारे कष्ट सहन करण्याची ताकद ठेवावी लागेल.... अगदीच रस्ता निर्माण नाही करता आला तरी तो रस्ता निर्माण करण्यासाठीचा एखादा दगड उचलता आला तरी आपण धन्य झालो असे समजावे.... असे प्रत्येकाने एक एक दगड उचलला तर रस्ता पूर्ण होईल.... पण आपल्याकडे रस्ता पूर्ण झाल्यावर कोणाची पाटी लागणार... आणि या पाटीवर जर आपले नाव नसेल तर दगड कशाला उचला हा विचार जास्त खोल आहे.... ... तर काहीजण त्या पाटीवर माझेच नाव लागावे याचसाठी काम करतात, त्यामुळेच तर पहिला दगड उचलल्यानंतर दुसरा दगड उचलण्यासाठी काही महिने काही वर्षे निघून जातातत..... पण तरीही माझा संपूर्ण क्रांतीवर विश्‍वास आहे.... उठाव होणार यात तीळमात्र शंका नाही....

    ReplyDelete
  10. विचार करतोय काय कॉमेंट द्यावी याचा.. कदाचित आपल्या पुढची पिढी म्हणेल की त्यांनी उशिरा जन्म घेतला,त्यांना कदाचित आपल्या काळात जन्म घेतला असता तर जास्त बरं झालं असतं असंही वाटू शकेल . शेवटचे वाक्य अगदी योग्य आहे...
    परंतु त्या लोकोत्तर पुरुषांनी त्यांच्या मनगटाच्या, इच्छाशक्तीच्या, अपार निश्चयाच्या जोरावर त्या काळाला सुवर्णकाळात रुपांतरीत केलं......... आणि आपण मात्र म्हणत राहतो "च्यायला, चुकीच्या वेळी जन्माला आलो यार.. !!!"

    ReplyDelete
  11. सर्वजण म्हणतील गेले ते दिवस ,साहजिक आहे आताचे वातावरण तसेच आहे यात काहीच शंका नाही,पण पुढच्या लोकांना माहिती पाहिजे ना म्हणून असे होते.आपण खरे ते लिहिले आहे,सर्वच लोकांनी ह्याचा विचार करावयाला पाहिजे ,(वेशेष करून सर्व राजकीय पक्षाने)

    ReplyDelete
  12. There is so much to be done Today.. just catch up with the present and you will have the Satisfaction.. of not missing THE Golden Era :-)

    ReplyDelete
  13. प्रत्येक पिढीची आव्हानं वेगळी, स्वप्नं वेगळी, जिद्द वेगळी!
    आपल्याला हा साक्षात्कार होऊनच पुढची पायरी गाठता येईल... आणि कधीतरी पुढची पिढीसुद्धा हा विचार करेल.. :)
    मस्त लिहिलियस विचारसाखळी!

    ReplyDelete
  14. प्रत्येकालाच वाटत असत यार तेव्हा जन्माला यायला हव होत, मला मात्र थोडे उशिरा जन्माला यावस वाटत, अस एकदम 60s-70s मध्ये वगैरे, तो एकदम रेट्रो टाइप पिरिअड वाटतो, लोक बिना इंटरनेटचा tp कसा करत असतील याचा विचार करतोय, anyways विषयांतर झाले, लेख (नेहमीसारखाच) मस्त झालाय.. तो पिक्चर फारसा चालला नाही पण आता हे वाचुन बघायला काही हरकत नाही..

    ReplyDelete
  15. >>"लक्षात येतं जन्माला येण्याची वेळबीळ काही चुकलेली नाही. किंबहुना योग्य काळात जन्माला येणं असं वगैरे काही नसतंच.."<<

    खरंय. असं काही नसतंच. आपला काळ आपला असतो. एका जन्माचा कालावधी. त्या कालावधीतलं जग, आपला त्याच्याशी येणारा संपर्क... प्रत्येक मन सांगत असतं, कुठेतरी काहीतरी चुकतंय...

    बरेच जन्म चुकांशी जुळवून घेण्यात किंवा त्यांचा भाग होण्यात खर्ची पडतात. या चुकांच्या दुरुस्त्या करण्यास जे जन्म झटतात त्यांच्याच पुढे गोष्टी होतात. अन् त्या वाचणाऱ्यांना वाटतं "अरे, चुकीच्या काळात जन्मलो यार!"

    ReplyDelete
  16. तन्वे, नक्की बघ ग हा सिनेमा.. फार भयंकर आहेत काही काही प्रसंग. बघवत नाहीत !! ही सत्यकथा आहे हे चित्रपटाच्या सुरुवातीला सांगितलेलं असूनही विश्वास बसू शकत नाही ग !! खूप वाईट :(

    हेहे सेम पिंच.. तसं खरंच वाटतं मला कित्येकदा. आणि मग त्या विचाराने जरा बरं वाटतं :)

    ReplyDelete
  17. अनघा, धन्यवाद.. पूर्वी चित्रपट/पुस्तक वाचल्यावर कायम माझ्या मनात हे विचार यायचे की आपण तेव्हा असायला हवे होतो आणि नंतर मग असं की खरंच पूर्वजन्मात आपण तिथे असूही. आणि तिथेच थांबायचे विचार. पण हल्ली विचार साखळी अजून थोडी पुढे जायला लागली आणि मग साखळीतल्या शेवटच्या कडीचा विचार व्हायला लागला. काम करायचंच असेल तर खरंच हा काळही काय वाईट आहे !! :)

    ReplyDelete
  18. आल्हाद, अनेक आभार.

    हो बरोबर. चितगाव आता मोठं शहर आहे. चित्रपटात १९३० च्या सुमारचा कालखंड दाखवला आहे.

    ReplyDelete
  19. योगेश, खरंच त्या काळातलं विशीत आलेलं मरणही खरंच खूप ग्रेट असेल !! अर्थात पण आताही मनात आणलं तर बरंच काही करू शकतो आपण हेच सांगायचंय मला.

    ReplyDelete
  20. सुहास, तेच तर.. आता आपल्याला आपल्या हिंमतीवर सगळं बदलावं लागेल. अर्थात "शिवबाच्या सैन्यात एक मावळा असतो तर, भगतसिंगच्या खांद्याला खांदा लावून लढता आल असत तर..मराठ्यांच्या पानिपत युद्धात उतरता आला असता तर..आझाद हिंद सेनेमधला एक शिपाई असतो तर" खरंच हजारो जन्म सत्कारणी लागले असते.

    सुहास, नक्की बघ हा सिनेमा. अभिषेकने मस्त काम केलं आहे. अगदी कॅरेक्टरच्या मागणीनुसार. आणि तसेही अभिनयातला पायमोडकाही अ न येणारे कित्येक खान/कपूर इथे मिरवताहेत. त्या कित्येकांपेक्षा अभिषेक मला उजवा वाटतो. माझा आवडता आहे रे अभिषेक :D

    ReplyDelete
  21. सुषमेय, खुपच बोलकी प्रतिक्रिया.. सुंदर.. अगदी खरं आहे. आपल्याकडे पहिला दगड उचलण्यापासूनच मारामारी आहे. पहिलाही दगड कोणी उचलत नाही आणि "पहिलाही दगड कोणी उचलत नाही" असेच इतरही सगळे एकही दगड न उचलणारेच म्हणत राहतात. अखेरीस रस्ता स्वप्नातच राहतो आणि आपण आपल्याच निष्क्रियतेपोटी जन्मभर दगडगोट्यांनी आणि खाचखळग्यांनी भरलेला रस्ता तुडवत राहतो.. आणि हे बदलण्यासाठीच क्रांती हवी. पहिला दगड उचलायलाच हवा !!

    ReplyDelete
  22. काका, बऱ्याच दिवसांनी तुमची प्रतिक्रिया बघून बरं वाटतंय.

    खरंय. कदाचित वाटेलही असं पुढच्या पिढीला. प्रामुख्याने सचिन/माधुरी/लता मुळे :D .. हेहे

    ReplyDelete
  23. काका, आभार. खरंय. प्रत्येकाला असंच वाटत राहतं आणि आपल्या काळात आपण काही करायचं विसरून जातो !

    ReplyDelete
  24. योग, Well well.. :) .. आभार..

    ReplyDelete
  25. सविताताई, एक्झॅकली हेच म्हणायचंय मला. पण तरीही सुवर्णयुगात न जन्मल्याची चुटपुट कुठेतरी लागून राहतेच :)

    ReplyDelete
  26. आभार बाबा. अगदी अगदी बरोबर. कदाचित तो काळ आपल्याला आत्ता वाटतो तसा भारून टाकणारा नसेलही. नाही.. नक्कीच नसेल. नाहीतर एवढे फितूर लोक, आपल्यातलेच एवढे शत्रू का असते शिवाजीमहाराजांना किंवा क्रांतीकारकांना.. नाही का.. वैचारिक साखळीमी एक नयी कडी :)

    ReplyDelete
  27. हा हा गौरव.. अगदी योग्य प्रश्न आहे. खरंच लोक बिना इंटरनेटचा टीपी कसा करत असतील ?? हेहे.. आता तर नेट अर्धा सेकंद जरी बंद झालं तरी प्राण कंठाशी येतात आपले :P

    नक्की बघ पिक्चर. काही मुद्दे मला पटले/आवडले नाहीत तरीही एकूण प्रयत्न खूप छान आहे. हा चित्रपट निघाला नसता तर स्वातंत्र्यलढयातला एका छोट्या गावातला एवढा मोठा उठाव आपल्याला कळलाही नसता. त्याबद्दल आशुतोषचं विशेष कौतुक !!

    ReplyDelete
  28. नचिकेत, अगदी परफेक्ट. हेच म्हणायचंय मला.. आपणही आपलं काळात असं खूप काही करू शकतो की जे वाचून (अर्थात ज्याच्याविषयी पुढे लिहिलं जाण्याच्या लायाकीचं असेल) पुढच्या पिढीला वाटेल की जरा आधी जन्मायला पाहिजे होतं यार.

    अर्थात आपण प्रत्यक्ष कृती करण्याच्या दिशेने कधी पाउल उचलतो यावरच सगळं अवलंबून आहे.. !

    ReplyDelete
  29. हे हे सौरभ.. Yeah.. We need to.. At some point.. sooner than later !

    ReplyDelete
  30. काहीतरी करावं हे खरं आहे रे पण असं काही मनात आलं की "रंग दे बसंती"चा शेवट आठवतो. अरे धडधडीत पुरावे असताना कसाब अन् अफजल गुरू बिर्यानी खात आहेत. हजारो करोड रुपयांचे घोटाळे करून कलमाडी अन् राजा सारखे लोकं फिरत आहेत. ह्यांच्यावर मारायला दगड उचलशील तर आपल्यालाच मागून दगड मारणारे देखील कमी नाहीत. काही झालं तरी लाच द्यायची नाही असं ठरवलं आहे तर अजुन घरी नेट आलं नाही. साध्या बी.एस्.एन्.एल्.च्या लाईनमनला नडू शकत नाही रे इथे, सिस्टम सुधारायची म्हणजे काम धंदा सोडून भीक मागत फिरावं लागेल. अरे साधा सिग्नल पिवळा झाल्यावर नियमाला अनुसरून गाडी थांबवली तरी मागून येऊन ठोकणारे आणि "अबे चल ना बे" म्हणणारे आहेत. शहिद झाल्यावर काय मिळते हे तर वेगळे सांगायलाच नको. मला तर "शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात" हेच जास्त पटतं. प्रतिक्रिया पूर्ण निगेटीव्ह असली तरी हेच वास्तव आहे.

    जन्माला यायची वेळ म्हटलीस तर सचिनची बरीचशी शतकं Live पाहिली ह्यातच मला आनंद आहे.

    ReplyDelete
  31. सिद्धार्थ, तुझी प्रतिक्रिया पटली. निगेटिव्ह असली तरीही पटली. कारण ते सत्य आहे. अरे पण "शिवाजीमहाराजांच्या काळात का नाही जन्मलो यार" असं चांगल्या हेतूने म्हणणं आणि "या साल्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या असल्या जगात यावेळी का जन्मलो यार" असं निगेटिव्हली म्हणणं दोन्ही सारखंच अपायकारक. कारण आपण काही झालं तरी आपण ते आता बदलू शकणार नाही. तर मग आहे निदान समोर दिसतंय ते बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करणं एवढंच आपण करू शकतो !!

    >> जन्माला यायची वेळ म्हटलीस तर सचिनची बरीचशी शतकं Live पाहिली ह्यातच मला आनंद आहे.

    १०००००% अनुमोदन !!

    ReplyDelete
  32. कुठल्याही चित्रपटसमीक्षणासाठी माझी एकच पेटंट प्रतिक्रिया.... ‘बघायला हवा एकदा हा चित्रपट’... :-)

    ReplyDelete
  33. मनातलेच विचार मांडले आहेस. लगे रहो यार.

    >>"च्यायला, चुकीच्या वेळी जन्माला आलो यार.. !!!"

    अगदी अगदी रे.

    ReplyDelete
  34. यत्किंचित चाकर asa nahi mhanat

    तो शब्द चुकीचा आहे रे.

    यःकचित असं काहीतरी म्हणतात. नीट खात्री करून घेशील का? मग ही पोस्ट उडवलीस तरी चालेल.

    ReplyDelete
  35. संकेत :)

    अरे पण यात मी परीक्षण असं काही लिहिलंच नाहीये. जस्ट विचारसाखळी लिहिली माझी.

    ReplyDelete
  36. आभार मंदार. प्रत्येकाच्या मनात थोड्याफार फरकाने हेच विचार असतात..

    बरोबर रे.. यत्किंचित म्हणजे जराही, किंचितही, पुसटसा वगैरे.. तिथे योग्य शब्द यःकश्चित असा पाहिजे. बदल केला आहे. धन्यवाद. अरे आणि सुधारणा सुचवलीस हे योग्यच केलंस.. त्यासाठी कमेंट उडवण्याची आवश्यकता नाही. राहुदे तशीच. :)

    ReplyDelete
  37. ए.. सर्व लोक आपल्या सारखाच विचार करतात का? मग समाज बदलत का नाही ? नेमकी खोच कुठे आहे?

    हेरंब.. हे पोस्ट मी लिहिली आहे काय असे वाटत होते मला सारखे... सेम टू सेम... :)

    मला तर खात्री आहे की मी शिवकाळात एकदा जीवन जागून गेलो आहे.. काहीतरी मागे राहलय म्हणून परत आलोय असे सारखे वाटत राहते...

    ReplyDelete
  38. "Chukicha veli janmas alo ase ka mhanto ha, yala apan lihu ki tula itke tivratene vatatey na, tar kadachit tu asashilahi Shivaji Rajan barobar, Kinva Subhash chandra Bose yancha senet..etc. tuza magcha janmat. Aplyala magche janma athvat nahit na.." Pan pudhcha para wachla an baghitle ki tu to vichar pan cover kelay. Tari pan lihite ki tu nakkich asanar tya tya lokan sobat, tya tya janmat. An ata Sachin Tendulkar, Lata Mangeshkar, Abdul Kalam yancha sobat yaach janmat asnyacha abhiman balgu yat.

    ReplyDelete
  39. एकूण परिस्थिती पाहता खरतर आजच्या भारताला खूप गरज आहे एखाद्या महापुरुषाची...हीच वेळ आहे खर तर काही करून दाखवायची ...पण आपण सारे......... :(

    ReplyDelete
  40. रोहणा,

    >> नेमकी खोच कुठे आहे?

    थोडं स्पष्टपणे सांगायचं तर सगळे सारखाच विचार करतात पण कृतीत कोणीच आणत नाहीत.. यातच ती खोच आहे.. कदाचित आगाऊपणा वाटेल पण हे सत्य आहे असं मला तरी वाटतं !!

    >> हेरंब.. हे पोस्ट मी लिहिली आहे काय असे वाटत होते मला सारखे... सेम टू सेम... :)

    अगदी अगदी.. अरे पोस्ट लिहिताना तर मला तुझीच आठवण येत होती आणि तुझी प्रतिक्रिया अगदी अशीच असेल याची मला खात्री होती आणि अगदी तशीच ती आली. :)

    मला खात्री आहे की आपण सर्वच जण शिवकाळात, भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात लढून आलेलो आहोत.. नक्कीच !!

    ReplyDelete
  41. साईसाक्षी, असे चित्रपट, पुस्तकं बघितले/वाचली की सतत असंच काहीसं डोक्यात येत असतं. त्यावर एवढा विचार करू झाला आहे की आपोआपच सगळे मुद्दे कव्हर केले जातात.. :)

    >> An ata Sachin Tendulkar, Lata Mangeshkar, Abdul Kalam yancha sobat yaach janmat asnyacha abhiman balgu yat.

    नक्कीच !! हे खरोखरच आपलं अहोभाग्य आहे !!

    ReplyDelete
  42. देवेन, तेच रे.. आपल्यातल्या क्षमतेवर अन्याय करून आपण उगाच एखाद्या महापुरुषाची वाट बघत राहतो.. आणि इथेच सगळं चुकतं !! :(

    ReplyDelete
  43. सुपर्ब पोस्ट...
    सिनेमा पाहून भारावणं, एक-दोन दिवसांनी भानावर आणि वास्तवात येणं.. अगदी अगदी...
    विचारांची साखळी अत्यंत सुंदरतेने मांडली आहेस...
    आज हा तुझा लेख आणि दुपारी वाचलेली जिल्हाधिकार्‍याला जिवंत जाळण्याची घटना... द्विधा मनस्थितीचा अतिरेक :(

    ReplyDelete
  44. अगदी.. काही काही चित्रपट/पुस्तकं एवढा प्रभाव सोडून जातात की नंतरचे काही दिवस आपण अक्षरशः अंमलाखाली असतो त्यांच्या..

    ती मनमाडची घटना वाचून तर हादरून गेलोय मी.. जिल्हाधिकार्‍याला जिवंत जाळलं जातंय तिथे सामान्य माणसाची काय कथा?? आणि मग पटतंच की खरंच चुकीच्या वेळी नाही जन्माला आलोय आपण.. काहीतरी करण्यासाठीच जन्माला आलोय या काळात. !!

    ReplyDelete
  45. ही पोस्ट मी कशी वाचली नव्हती माहित नाही ... पण एकदम पटली. काळ वेगळा नसतो, त्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते. त्या त्या काळाच्या प्रश्नांना भिडून ही माणसं इतिहास घडवतात. आपण फक्त बाहेरून बघत बसतो.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय.. हे "बाहेरून बघत बसणं" किती वाईट आहे हे आपल्या लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असेल :(

      Delete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...