१.
आम्ही चौघेजण रस्त्याने बडबडत, थट्टामस्करी करत चाललो होतो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.. काळाकिर्र अंधार.. पण आम्हाला कसलीच पर्वा नव्हती. सगळ्यांची मस्त बडबड चालू होती. एक दोघांनी थोडीशी 'टाकली'ही होती. चालताचालता मी आमच्या चाळीत शिरलो. माझ्या मागोमाग ते तिघेसुद्धा आत आले. जिने चढत चढत सगळ्यात वरच्या मजल्यावर माझ्या घराच्या बाहेर एक कॉमन पॅसेज आहे तिथे आम्ही पोचलो. एकमेकांचे चेहरे अगदी जेमतेम पुसटसे दिसू शकतील एवढाच उजेड पाडणारा एक रात्रदिवा अगदी अंधुकपणे चमकत होता. आम्ही हळूहळू चालत होतो. तेवढ्यात एका 'टाकलेल्या'ला मागून (की पुढून?) कोणाचा तरी धक्का लागला. हा त्याला काहीतरी बडबडला. मग तोही उलटून याला बडबडला. शब्दाने शब्द वाढत गेले. आवाज चढत गेले. शब्दांतली धार वाढत गेली. अचानक ते दोघे हातापायीवर आले. आमच्यातला अजून एक (किंवा दोघेजण) सामील झाले आणि ते सगळे मिळून 'त्याला' झोडायला लागले. हे असे अचानक लाथाळ्यांवर उतरलेले पाहून मी काहीच का करत नाहीये हे मला कळत नव्हतं किंवा केलं असेल तरी काय केलं हे आत्ता मला आठवत नाहीये. मी त्या गुद्दगुद्दीत सामील झालो नसलो तरी काही न करता शुंभासारखा बघत होतो (किंवा बघत नसेनही.. मला खरंच आठवत नाहीये. सोरी हे पुन्हापुन्हा होतंय.. पण माझा खरंच इलाज नाही.) खरं तर मी त्यांना आवरायला हवं होतं. जे समोर चाललंय ते योग्य नाही हे मला कळतही होतं. मी टाकलेली बिकलेलीही नव्हती. तरीही मी शांतपणे काहीही न करता उभा होतो. गुद्दगुद्दीचा, आराडाओरड्याचा आवाज एव्हाना टिपेला पोचला होता. आमच्यातला तिसराही बहुतेक त्यांना सामील झाला असावा. कळत नव्हतं नीट. यांच्या आवाजाने घरातले आणि शेजारीपाजारी कुठल्याही क्षणी उठणार आता असं वाटून मला टेन्शन यायला लागलं होतं. इथे हाणामारी चाललेली आणि मला घरचे उठून मला रागावले तर काय असल्या विवंचना पडल्या होत्या. च्यायला कोणाचं काय तर कोणाचं काय !!
आता मला आठवतंय की अचानक बळ अंगात शिरावं किंवा अवचित स्वप्न संपावं तद्वत मी झोपेतून जागा झाल्याप्रमाणे त्यांच्यावर झेपावलो. पण .......... !! पण तोवर उशीर झाला होता. सगळं संपलं होतं. एवढ्या वेळात आत्ता पहिल्यांदा मला 'त्याचा' चेहरा नीट निरखता आला. तो चेहरा बघून तर माझ्या छातीत अजूनच धस्स झालं. आमच्या शेजारच्यांचा वयाने बराच मोठा असलेला वेडसर मुलगा (माणूस) होता तो. ते बघून मगाशीच आमच्या आवाजाने घरातले आणि शेजारचे उठले असते तर किती बरं झालं असतं असं मला वाटून गेलं. निदान हा अनर्थ तरी टळला असता !!! बघता बघता परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांनाच कळून चुकलं. आता काय करायचं हे कोणालाही कळत नव्हतं. भीती सगळ्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात ज्याने धक्का दिला होता तो बोलायला लागला. तो समहाऊ तितकासा घाबरलेला वाटत नव्हता. त्याच्या मते तिथून ताबडतोब पळून जाणं हा एकमेव पर्याय होता. कारण आत्ता इथे कोणी आम्हाला अशा परिस्थितीत बघितलं असतं तर आमचं नक्की काय झालं असतं याचा विचारही करवत नव्हता. आम्हाला कोणीही आत येताना बघितलेलं नव्हतं. त्या माणसाशी आमची बाचाबाची आणि मारामारी झाली हे पाहायला तिथे कोणीही नव्हतं. त्यामुळे ताबडतोब पळून गेलं तर आम्ही तिथे होतो याचा कुठलाही पुरावा शिल्लक राहणार नव्हता. हो-नाही करता करता सगळ्यांनाच त्याचं म्हणणं पटलं. मला पटलं का किंवा माझी प्रतिक्रिया काय होती हे मला आठवत नाही. पण एवढंच आठवतं की त्या सगळ्या गोंधळात आपापल्या इतस्ततः पडलेल्या वस्तू उचलून (पुरावे नाहीसे करून) त्या सगळ्यांबरोबर मीही घाईघाईने बाहेर तिथून पळून गेलो.
आम्ही चौघेही बरेच दिवस गायब होतो. काही दिवसांनी परत आलो तेव्हा वातावरण मी अपेक्षा केली होती तेवढं तापलेलं नव्हतं. तुलनेने शांत होते सगळे. कदाचित कोणाला खरंच काहीच माहित नसावं आमच्या त्या प्रकारातल्या सहभागाबद्दल. एक-दोनदा पोलीस घरी येऊन गेल्याचं कळलं. पण आवर्जून माझ्याबद्दल किंवा त्या तिघांबाद्दल काही विचारलं वगैरे नसावं. तेवढ्यात तिकडून 'त्या'ची आई आली. भरल्या डोळ्यांनी, करुण नजरेने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली "पोलीस आले आणि तुझ्याबद्दल आणि xxx बद्दल विचारून गेले. का केलंत असं? तुम्हाला काय वाटलं कोणालाच काही कळलं नसेल?" मी उभ्या जागी हादरलो !!
क्रमशः .................... किंवा समाप्त...
=========
२.
खूप रात्र झाली होती. मी एका टोळक्याबरोबर भटकत होतो. ते कोण होते मला माहित नाही आणि आता आठवतही नाही. एकही चेहरा ओळखीचा नव्हता. मी त्यांच्याबरोबर का फिरत होतो हेही माहित नव्हतं. फिरत होतो एवढं मात्र नक्की. सगळी एकदम अवली कार्टी होती. चालता चालता आम्ही एका मोठ्या बसस्टॉपवर येऊन उभे राहिलो. तिथे काही पोरी उभ्या होत्या. पण आमचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. सगळेजण सेवंथेवंथात होते. मोठमोठ्या आवाजात गप्पा, बडबड चालली होती. तेवढ्यात समोरून पाच-सहा पोरांचा एक ग्रुप जाताना दिसला. त्यांची अवस्था पाहून ते आमच्यापेक्षाही एक मजला वर चढले होते हे स्पष्ट कळत होतं. आमच्या बाजूला उभ्या असलेल्या पोरींकडे बघून त्यांनी हात दाखवायला, शिट्ट्या मारायला सुरुवात केली. चित्रविचित्र आवाज काढणं झालं, कमेंट्स पास करून झाले. शेवटी आमच्या ग्रुपमधल्या पोरांची डोकी सटकली. खरं तर थोडी बडबड करून समोरचा ग्रुप निघून जायच्या तयारीत होता तरीही आमच्यातल्या काही पोरांनी समोरच्यांना शिव्या घातल्या. त्या मुलींना न छळण्याबद्दलही बजावून झालं.. लगेच समोरूनही प्रत्युत्तरं आली. "का? तुमच्या बहिणी लागतात का?" वगैरे वाले टिपिकल डायलॉग मारून झाले. काही संबंध नसलेल्या, ओळखदेखही नसलेल्या कोणा कुठल्या मुलींच्या ग्रुपला तिसर्याच कुठल्याशा ग्रुपने अपरात्री छेडलं तर आमच्या पोरांना एवढं भडकायचं काय कारण होतं हे मला अजूनही कळलेलं नाही. असो. पण ते जाम भडकले एवढं मात्र खरं. आरडाओरडा, बोंबाबोंब होत होत बघता बघता राडा सुरु झाला. थेट समोरच्या ग्रुपचा म्होरक्या आहेसं वाटणार्याच एका मुलाला आमच्या पोरांनी धरला आणि दे-दणादण कुदवायला सुरुवात केली. मी लांबूनच बघत होतो. नजर थिजून गेली होती. बराच वेळ हात साफ करून झाल्यावर अचानक त्या म्होरक्याचा आधी येत असलेला अस्पष्ट कण्हण्याचा आवाजही बंद झाल्याचं जाणवलं. अचानक भानावर येऊन बघतो तोवर तो पोरींचा ग्रुप, समोरच्या ग्रुपमधली एकूण एक पोरं (अर्थात आता खाली निपचित आडवा पडलेला म्होरक्या सोडून), आमच्याही ग्रुपमधली अनेक पोरं हे सगळे सगळे गायब झाले होते. उरलो होतो ते आम्ही जेमतेम ४-५ जण. काय करावं ते कळत नव्हतं. शेवटी काहीही न सुचून आम्हीही जिवाच्या आकांताने तिथून पळून गेलो. रात्री घरी पोचल्यावर काय झालं ते मला आठवत नाही. दुसर्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा आमच्या घराच्या मोठ्ठ्या फ्रेंच विंडोमधून बाहेर बघितलं तर रस्त्यावर काहीतरी पडलेलं दिसलं. थोडं नीट निरखून
बघितल्यावर जे दिसलं ते बघून पूर्ण हादरून गेलो. हा तर कालचाच पोरगा होता. मोठ्या रस्याच्या मध्यभागी आडवा पडला होता. अगदी कालच्याच अवस्थेत. जराही हलला नव्हता. म्हणजे काल खरंच आमच्या हातून .... !! विचारानेही हादरलो पुन्हा एकदा. आठवणही नको होती मला त्या घटनेची पण तीच आठवण माझ्यापासून निव्वळ १०-१५ फुटांवर निपचित पडली होती. कालच्या घटनेची पुनरावृत्ती माझ्या मनात पुन्हा पुन्हा करण्यासाठी.. !!
नंतर दिवसभर मी घरीच राहिलो. दर पाच-दहा मिनिटांनी खिडकीतून बाहेर बघत होतो. तो तसाच पडला होता दिवसभर. असंख्य वाहनं येजा करत होती. पण कोणालाही तो दिसला कसा नाही किंवा कुठलंही वाहन त्याला धडकलं कसं नाही हेच मला कळत नव्हतं. संध्याकाळ होत आली. कालपासून घरातलेही कोणी दिसले नव्हते. कुठे गेले होते सगळे जण देव जाणे. आणि तेही मला न सांगता. माझा दर पाच मिनिटांनी त्याच्याकडे बघणं चालूच होतं. अचानक पाचच्या सुमारास तो मला किंचित हलताना दिसला. म्हणजे तो.... म्हणजे तो..... अचानक मला प्रचंड प्रचंड आनंद झाला आणि......... तेवढाच जोरदार धक्काही बसला. आमच्या हातून काल काही बरं-वाईट घडलं नव्हतं याचा तो आनंद होता मात्र तो शुद्धीवर आला की पोलिसांना सगळं सगळं सांगणार आणि आमचं पुढचं पूर्ण आयुष्य तुरुंगात खडी फोडण्यात जाणार या निव्वळ कल्पनेचाही धक्का जबरदस्त होता. घरच्यांची नाचक्की होणार होती ती वेगळीच. मी पुन्हा बाहेर बघितलं तर तो थोडासा उठून बसल्यासारखा वाटला. त्याच्याजवळ कोणीतरी उभं होतं. पोलीस होते बहुतेक. काय करावं काहीच कळत नव्हतं मला. सगळं संपल्यासारखं वाटत होतं. पूर्ण गळून गेल्यासारखं झालं होतं. काहीच न सुचून मी देवघराकडे धाव घेतली आणि हात जोडून देवापुढे नतमस्तक झालो.
क्रमशः .................... किंवा समाप्त...
=========
बाहेरच्या जोरदार वार्याचा आवाज ऐकू येत होता. घरातला हिटर चांगलाच तापला असल्याचं जाणवत होतं. तरीही प्रचंड प्रचंड थंडी वाजत होती. मी ब्लँकेट अजूनच घट्ट गुंडाळून घेतलं तरी काही उपयोग झाला नाही. खाडकन डोळे उघडले. अंधारात धडपडत, चाचपडत कसाबसा स्वेटर शोधला आणि तो अंगावर चढवून पुन्हा एकदा माझ्या ब्लँकेटच्या कोषात शिरलो. मोबाईलवरचं घड्याळ पहाटेचे ५:३० वाजवत होतं. मी थंडीने थरथरतोय की भीतीने हे मला अजूनही कळत नव्हतं.
=========
पूर्वी मला बॉलीवूड टायपाचं एक स्वप्न पडायचं.. नाग-सापांचं.. अचानक साप दिसायचा, मधेच कुठून तरी नाग फणा काढून समोर यायचा. कोणीच कोणाला (म्हणजे ते मला किंवा मी त्यांना) कधीच काही करायचो नाही किंवा घाबरायचो वगैरेही नाही. ते एखादा स्पेशल अपिअरन्स मारायचे आणि बघता बघता गायब व्हायचे. चिक्कारदा पडलीयेत ही अशी स्वप्नं. किंवा मग कधी कधी फार मध्यमवर्गीय स्वप्न पडायचं. एकच स्वप्न. अगदी टिपिकल. घटना, क्रम सगळं सेम. मी चालतोय आणि मला एक नाणं रस्त्यावर पडलेलं दिसतं. मी हळूच ते नाणं उचलून हातात घेतो. पुढचं पाउल टाकणार तोच फुट-दोन फुटावर दुसरं नाणं दिसतं. मग मी तेही उचलून हातात घेतो. मग तिसरं दिसतं, चौथं, पाचवं, सहावं दिसतं. अशी ढिगाने नाणी उचलतो मी.. भरपूर वेळ. बघता बघता नाण्यांचा मोठा ढीग जमतो माझ्याकडे. चांगले पन्नास-शंभर रुपये तरी असतील. अहो सगळी चार-आठ आण्यांची नाणी असतात (आठवा मध्यमवर्गीय). अरे हो मगाशी तेवढं सांगायला विसरलोच नाही का. हे एक स्वप्नं गेली कित्येक वर्षं मला पडत आलंय. थोडक्यात स्वप्नात का होईना मी करोडपती झालेलो आहे. कुठल्याही गरम-खुर्च्यांवर न बसता ;) .. कालांतराने 'स्वप्नील'शेठने आमचं प्रमोशन करून आम्हाला स्वप्नात एक-दोन रुपयांची नाणी बहाल करायला सुरुवात केली आणि माझा बघता बघता टर्नओव्हर एक कोटीवरून एकदम तीन-चार कोटींवर पोचला. मी समाधानी होतो. खरंच समाधानी होतो. काही तक्रार नव्हती. रोज नाग-साप बघा, नाणी वेचा आणि सकाळी फ्रेश होऊन उठा असं छानपैकी चाललं होतं सगळं. मध्यंतरी बर्याचदा मी ट्राऊझर, बेल्ट, सॉक्स, शूज घालून, हपिसाची ब्याग घेऊन घरातून बाहेर पडलोय आणि अचानक लक्षात येतं की वरती चांगला इस्त्री बिस्त्री केलेला शर्ट घालायच्या ऐवजी रात्रीचा चुरगळलेला टीशर्ट घालूनच बाहेर पडलोय असंही स्वप्न पडायचं. पण त्याबद्दलही कधी काही विशेष तक्रार नव्हती.
नंतर मी शिणेमे बघायला लागलो. खूप चिक्कार भरपूर आणि सगळे विंग्रजी. पूर्वी कुठलेही बघायचो. बघता बघता हळूहळू कळायला लागलं की 'सगळे विंग्रजी शिणेमे ब्येष्टच असतात' हा विंग्रजी शिणेमे फार कमी बघणार्यांनी किंवा अजिबात न बघणार्यांनी पसरवलेला एक मोठ्ठा सैरगमज उर्फ उलटा समज आहे. निव्वळ मिथ आहे ते एक. मग हळूहळू मला आवडतील तेवढेच शिणेमे बघायला लागलो. मला आवडतील त्या प्रकारातलेच, त्या ज्यॉनरचेच. हळूहळू कळलं की कॉमेडी, हिस्ट्री, वॉर, लव्हस्टोरी, चिक-फ्लिक्स हे विभाग आपल्यासाठी पूर्णतः वर्ज्य आहेत. त्यामुळे मी भक्तीभावाने फक्त सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, अॅक्शन, ड्रामा वालेच चित्रपट निवडून बघायला लागलो. निदान एक तरी खून, चार दोन पाठलाग, एखादं मोठठं रहस्य आणि त्याच्या आजूबाजूची त्याची पंधरा-वीस कच्चीबच्ची असलेली टिल्ली रहस्यं, एखाद्या खजिन्याचा किंवा घबडाचा शोध, त्यातून होणार्या हाणामार्या, संशयाची विणली जाणारी जाळी आणि खुबीने विणलेलं आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवलेलं महा-रहस्य किंवा मेगा-रहस्य (दर तीन-चार एपिसोडआड महा किंवा मेगा एपिसोड आला नाही तर फाउल धरतात हा पुलंनी सांगितलेला प्राचीन पुणेरी समज अगदी खरा आहे.) या आठ दहा मुद्द्यांपैकी किमान सहा ते सात मुद्दे कव्हर झाले नसतील तर आमच्या स्वयंभू स्टार रेटिंगमध्ये तो चित्रपट एकदम एका स्टारवर येतो. (अजून एक : आमच्या रेटिंग सिस्टममध्ये चित्रपट हा एक स्टार किंवा दहा स्टारचाच असतो. म्हणजे चित्रपट एकतर जबरा तरी असतो नाहीतर भंकस तरी. 'बरा' श्रेणीसाठी येथे चौकश्या करू नयेत : (आमच्याच) हुकुमावरून)..
तर माझ्या या आवडीला स्मरून गेली काही वर्षं मी फक्त याच टाईपचे चित्रपट बघत आलोय. (१ आणि २ वाचून (किंवा बघून) ही आवड आता भारी पडणार आहे असं वाटतंय.) मात्र गेल्या एक-दोन महिन्यांत माझ्या मासिक ढोबळ सरासरीच्या चारच्या आकड्याला जोरदार लाथ घालून मी माझा स्तर उंचावत नेऊन जवळपास दहावर स्थिर केला. गेल्या महिन्याभरात जॅकी ब्राऊन, सिन सिटी, इल्युजनिस्ट, सिटी ऑफ गॉड, डॉनी डार्को, शेरलॉक होम्स, अ सिंपल प्लान, शालो ग्रेव्ह , बिग नथिंग, द गेम, व्ही फॉर व्हेन्डेटा, किल-बिल १ आणि २, फ्युजिटीव्ह असे अनेक न पाहिलेले, काही पाहिलेले चित्रपट ही माझी गेल्या आठवड्याची (खरी) कमाई. हे चित्रपट पाहिले नसलेल्यांसाठी सांगतो. या प्रत्येक चित्रपटात वरच्या हुकुमात सांगितलेले सगळे प्रकार भरभरून आहेत. खून, मारामार्या, गोळीबार, विश्वासघात, खजिने, पाठलाग सगळं भरपूर भरपूर म्हणजे "एक मांगो, दस मिलेगा" अशा प्रमाणात आहेत. आयला, हे असले चित्रपट सतत बघितल्यावर नाणी उचलून उचलून पैसा गाठीशी लावण्याची स्वप्नं दिसण्याऐवजी रस्त्यात हाणामार्या केल्याची स्वप्नं नाही दिसणार तर काय होणार अजून? फक्त ते तेवढं थंडीचं बघितलं पाहिजे एकदा. स्वेटर घालूनच झोपावं कसं.. !
ऑन अ सिरीयस थॉट, मारामार्यांची, खुनाबिनांची स्वप्नं पडतात, आणि जवाबदार नागरिकाप्रमाणे पोलिसांना कळवण्याऐवजी त्यातून वाचण्यासाठी चित्रपटात दाखवतात तसं थेट पळून बिळून जातो आपण.. !! म्हणजे आपलं नक्कीच वैचारिक अधःपतन झालं आहे की काय असाही एक विचार पहाटे थंडी वाजत असताना मनात तरळून गेला. पण (न केलेल्या खुनाबिनाचा) निदान पश्चात्ताप तरी होतोय ना, अगदीच त्या व्हिलनांसारखं अजून जास्त गोळीबार करत, लुटमार करत ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ करत हसत रस्त्यावरून चालत जात दहशत माजवत असल्याची तरी स्वप्नं पडत नाहीयेत ना? झालं तर मग. तोवर आपण सेफ. ते पश्चात्ताप, अपराधी भावना वगैरेंचं बघून घ्या नक्की, नीट, न विसरता... आणि मग बघा काय बघायचं ते. हवं तेवढं !!
तळटीपा :
१. "चित्रपटांचा (समाजमनावर होतो का नाही याची पुरेशी कल्पना नाही परंतु) समाज बघत असलेल्या स्वप्नांवर तीव्र परिणाम होतो" हे आमचं आवडतं वाक्य आहे.
२. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" या उक्तीचा आम्ही येथे (आणि सगळीकडेच) जाहीर णी शे ढ करतो. (केला नाही तर आम्ही गोत्यात येऊ असे कोणी समजत असल्यास.... ते पूर्णतः खरे आहे. ;) )
३. '१' मधल्या xxx मध्ये त्या बाईने आपल्यातल्याच एका ब्लॉगर मित्राचं नाव घेतलं होतं.
४. आता मी डी निरोचा 'रॉनीन' बघणार आहे. तेव्हा आज रात्री (आणि नेहमीच) कोणीही उगाचंच रस्त्यावरून फिरू बिरू नका, उगाच कोणा अनोळखी व्यक्तींशी बाचाबाची करू नका, पोरीबाळींना छेडूबिडू नका अन्यथा..... !!! :P
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
थोडे दिवस चुपके चुपके, पडोसन, चलती का नाम गाडी, हेराफेरी हे सिनेमा बघितले तर कसे होईल? ;)
ReplyDeleteहो रे अधे मध्ये हलके फुलके शिनेमे पण तोंडी लाव ना.
ReplyDeleteएवढ जड नको..हलक फ़ुलक होऊ द्या... ;)
ReplyDeleteronnin is recommended!
ReplyDeleteकल्ला का तुला म्या जास्ती पिच्चरच्या भानगडीत पडत नाही ते.....:)
ReplyDeleteमला वाटलं तू तळटिपेला लेटेश आणि ग्रेटेश हरी कुंभाराची आठवण काढशील ...:)
बाकी ती मनी आणि त्यांची ती स्वप्नी याबाबतीत तुपला आपला शेम नि षे ध..............
जड होतय तर कॉमेडी बघत जा की रे ;-)
ReplyDeleteतूला चिल्लर मिळत होते मग तुझ्या मार्गात पैसे आहेत भरपूर अस म्हण की रे..
>> "चित्रपटांचा समाज बघत असलेल्या स्वप्नांवर तीव्र परिणाम होतो" << - एकदम पटेश
xxx म्हणजे ब्लॉगर? म्हणजे तू स्वप्नात स्वतःला एक मध्यमवर्गीय म्हणून बघतोस आणि तुझ्या ब्लॉगर मित्रांना खुनी, हलकट, व्हिलन नराधम म्हणून बघतोस?? बहुत नाइन्साफी है कालिया...
ReplyDeleteआणि अशी स्वप्नं पडू नयेत म्हणून फॉर अ चेंज, तमिळ किंवा तेलुगू चित्रपट बघ. बालकृष्णा किंवा कॅप्टन विजयवाले. मग स्वप्नात असं बुळचटासारखं पळून जाण्याऐवजी तू नुसत्या फुंकरीने तीन लोकांना उडवशील आणि तोंडात सिगरेट, डोळ्यांवर तीन चथुर्थांश चेहरा झाकणारा गॉगल, एका हातात तलवार आणि एक बंदूक, दोन पायांत मिळून तीन कट्यारी आणि दोन बझुका आणि उरलेल्या एका हातात कोणीतरी चिकणीचुपडी हिरॉईन हा सगळा जामानिमा घेऊन भारतातून अमेरिकेत साडेबत्तीस सेकंदांत जाऊ शकशील... ;-)
जे चाल्लंय ते उत्तम आहे.. काहीच नको, आवडतील तसे सिनेमे पहा.. अरे रात्री तर अगदी 4D मध्ये सिनेमे दिसत आहेत अजुन काय हवं..
ReplyDeleteमाझा तरी फुल्ल सपोर्ट आहे रे बाबा... :D
चित्रप्टांचा असा वाईट्ट परिणाम आमच्या स्वप्नांवरदेखील होतो, म्हणून आम्ही कमीच सिनेमे बघतो. किंवा बघायचेच तर सुदंर पोरगी कवटाळलेली असलेली रोम्यांटिक सिनेमे बघतो काही दिवस, नॉर्मल मोड मधे यायला ते सोपे जाते.
ReplyDeleteलेखाबद्दल- विषयाची हाताळणी नेहमीप्रमाणेच वेगळी.तळटीपा छानच! क्र. ३ मधे मला संशय आला की ते माझे नाव असावे.(इकडे भारतात "स्वामी असीमानंद" ला अटक झाल्याची बातमी बघितली(ऑर वाचलेली)असशीलच तू!)पहिल्या खुनातच संशय आला की हे स्वप्न असावे.लगे रहो..
रच्याक, आपण बघत असलेल्या आणि विचार करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम स्वप्नांवर होतो.त्यामुळे उगाचच मनावर घेऊ नये.
अरे हो, ब्लॉग माझा तर्फ़े सन्मानित होत आहेस, हार्दिक अभिनंदन!!! अशीच मेजवानी आम्हाला मिळत राहावी. पुन्हा एकदा अभिनंदन!!!!
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteब्लॉगमाझा च्या स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिका बद्दल हार्दिक अभिनंदन!!!
-निरंजन
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
ReplyDeleteहेरंबा..काय चालवल आहेस रे हे...चक्क खुन वैगेरे...थोडे हलकेफ़ुलके सिनेमे बघ रे आता...मी तर म्हणतो एकदा गुंडा बघ हया सर्वांवर उतारा म्हणुन...तसा मी पण कालच ’पर्फ़्युम-दि स्टोरी ऑफ़ मर्डरर’ पाहिलाय...पण त्यसाठी तुम्हाला घाबरायच काही कारण नाही,तो पाहिला असशील तर कळल असेल तुला का ते... :)
ReplyDeleteअसो,हेरंबा तुझे प्रचंड प्रचंड अभिनंदन....!!!
Dream? Reality? Confusion? I am not sure..
ReplyDeleteChaan lihitos!!! Khilavun thevnyasarkhe.. Ata ase kar, JAI SANTOSHI MAA, SANT TUKARAM, ASHTAVINAYAK vaigare ase cinemas bagh. mhanje swapnat thodi shantata, satvikta yeil :)
ReplyDeleteहेरंब, आम्ही सगळे इतकं बडबडलो!! आणि तू काय असा मूग गिळून बसलायस?! :) बोल ना काहीतरी! की खून करत सुटलायस??! :D आणि अभिनंदन भाऊ! त्रिवार अभिनंदन! :)
ReplyDeleteअनघा, हा हा.. सूचनेवर विचार केला जात आहे. विचारांती उत्तर कळवण्यात येईल :P .. आणि एकेकाळी हेराफेरी ची मी इतकी पारायणं केलेली आहेत की आवाज म्युट करून पिक्चर बघत बघत मी सगळे डायलॉग्ज म्हणू शकायचो .. पुन्हा एकदा ट्राय मारायला पाहिजे :)
ReplyDeleteअग आणि उत्तर द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.. सगळ्यांनाच.. काल दिवसभर बाहेर होतो. रात्री काही ब्लॉग्जवर कमेंट्स टाकले आणि म्हटलं की आता निवांतपणे कमेंट्सन उत्तरं देऊ तर नेटच गंडलं.. त्यामुळे आत्ता हापिसातून चा खेळ करत करत उत्तरं टंकतोय :)
आभार.. त्रिवार आभार !!
सचिन, अरे गेले काही महिने जड जड बघायचाच मूड आहे. हलकं फुलकं बघायला कंटाळा येतो :(
ReplyDeleteअरे बाप रे.. जनक्षोभ उसळण्यापूर्वीच हलकं फुलकं बघायला घ्यावं लागणार तर ;)
ReplyDeleteआल्हाद, रॉनीन सुरु केला होता पण नेमका तेवढ्यात लेक उठून बसला. त्यामुळे आता उरलेला पुढच्या विकांतात..
ReplyDeleteहा हा हा अपर्णा.. खरंय.. पण "तेरे बिना भी क्या जीना" असं आमचं पिच्चरच्या बाबतीत आहे.. म्हनून करावं लागतं बाये ;)
ReplyDeleteमला हरी कुंभार बिलकुल आवडत नाही. पहिला जरा बरा होता. बाकी सगळे एकापेक्षा एक बंडल (अलोट जनसागराच्या भावना दुखावल्याबद्दल क्षमस्व ;) )
निषेधाबद्दल धन्स :)
सुहास, आयला कॉमेडी बघायला लागल्यावर काय स्वप्नं पडतील याचा विचार करायला लागलोय मी आता :)
ReplyDeleteहम्म.. भरपूर पैसे !! पॉझिटीव्ह थिंकिंग का काय म्हणतात ते हेच असावं ;)
हा हा हा संकेत.. जसा मी तसे माझे मित्र ;)
ReplyDeleteअरे पूर्वी बरेच बघितलेत तेलुगु/तामिळ.. मस्त टीपी व्हायचा.. नंतर अजीर्ण व्हायला लागलं ;)
आणि हे गळ्यात पिवळे रुमाल गुंडाळून नुसत्या फुंकरीने लोकांना उडवण्यापेक्षा आपली नाणी वेचणं बरं ;)
बास तर.. 'सिनेमा कॅनव्हास' वाल्यांचा सपोर्ट आम्हाला भेटला ना .. मंग झाला तर...
ReplyDeleteहाहा 4D .. हो रे हा तर विचारच केला नव्हता मी.
संकेतानंद स्वामींनी तर आमच्या लेखाचं आणि स्वप्नांचं अगदी तपशीलवार पृथःकरणच केलं की :)
ReplyDeleteरच्याक, ते सुंदर पोरगी कवटाळलेले चित्रपट बघायचे दिवस गेले आमचे भौ.. आता रियालिटी वालेच पिच्चर बघतो.. (रियालिटी स्ट्राईक झाल्याने असेल ;) )
आणि शुभेच्छा आणि अभिनंदनाबद्दल मनःपूर्वक आभार.. जमेल तसं लिहीत राहणारच.. पुन्हा आभार !!
निरंजन, मनःपूर्वक आभार !!
ReplyDeleteसलील, त्रिवार आभार :)
ReplyDeleteहा हा देवेन.. करना पडता है यार :P अरे हलकेफुलके बघेन रे पण गुंडा !!! चुकून तू 'भिंती'वर लिहितोयस असं वाटलं की काय तुला.. गुंडा और मै? कभी नही ;)
ReplyDelete'पर्फ़्युम-दि स्टोरी ऑफ़ मर्डरर' सही आहे.. हो आणि खरं आहे. त्यासाठी आम्हाला घाबरायची अजिबातच गरज नाही ;)
प्रतिक्रिया आणि अभिनंदन दोन्हीबद्दल प्रचंड प्रचंड आभार्स :)
हा हा सविताताई.. me neither ;)
ReplyDeleteअनेक आभार साईसाक्षी. जमेल तसं लिहितो काहीतरी :) अरे बापरे.. या यादीपेक्षा वरची हलकीफुलकी यादी परवडली.. हेहे ;)
ReplyDeleteअनघा, गिळलेला मुग बाहेर काढला बघ.. ;)
ReplyDeleteपरवा se7en बघितला.. त्यात तर सात खून आहेत :) या आठवड्यात काही खरं नाही ;)
आभार आभार आणि तुझंही मनापासून अभिनंदन ग
>हो रे अधे मध्ये हलके फुलके शिनेमे पण तोंडी लाव ना.
ReplyDelete+१
आणि गुंडा बघ +१००००००००००००००००००००००००
ज ब रा झालीय पोस्ट!!!
आता हलकं फुलकं काहीतरी बघावंच लागणार.. अर्थात माझी आत्ताची वॉचलिस्ट संपली की मग.. आणि आत्ताच्या लिस्ट मध्ये अजून ५०-६० सिनेमे तरी आहेत नक्की.. त्यामुळे तोवर हलकं फुलकं आणि गुंडाला थांबावं लागणार.. ;)
ReplyDeleteआभार बाबा..
अभिनंदन रे :)
ReplyDeleteब्लॉगमाझा च्या स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिका बद्दल हार्दिक अभिनंदन!!!
'मायबोलीवर' वाचलं ;)
m_m, आभार .. मा(ज)यबोलीवर अजूनही आमच्या नावाने शिमगा होतोय हे माहित नव्हतं ;) :P
ReplyDeleteCongratulations...
ReplyDeleteनचिकेत, आभार !! आणि तुझंही मनःपूर्वक अभिनंदन.. !
ReplyDeleteरच्याक, 'खुनाच्या' पोस्टवर अभिनंदनाच्या प्रतिक्रिया वाचायला मजा येते ;)
हेरंब, अभिनंदन रे ...
ReplyDeleteहेरंब! मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!
ReplyDeleteधन्स धन्स गौरी !
ReplyDeleteविनायक, अनेक आभार.. ! तुमचंही मनःपूर्वक अभिनंदन !
ReplyDeleteहेरंबा पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
ReplyDeleteखुनाखूनी ब्येसच चाललीये तुझी. :D प्लॆश फॊरवर्ड मध्येही जरासा फिरून ये की. मग स्वप्नात मज्जाच मज्जा. :))
आभार श्रीताई.. अग या खुनाखुनीने 'झोप' शब्दशः उडाली होती त्या दिवशी ;)
ReplyDeleteफ्लॅश फॉरवर्ड हा हा.. करून बघायला हवं :P
धन्य आहेस... काय कुठून कुठे... थोडी आवडली.. थोडी विस्कळीत वाटली.. माहित नाही... माझ्या स्वप्नांसाठी एक स्वतंत्र ब्लॉग सुरू करावा म्हणतोय... :D कसे.. :).
ReplyDeleteहे हे.. अरे लिहून झाल्यावर मलाही वाटलं की किंचित भरकटली आहे. पण एकाच रात्री पडलेली ती दोन सारखी स्वप्नं, त्या कळत बघितलेले चित्रपट आणि पूर्वी पडणारी स्वप्नं या सगळ्याची साखळी गुंफताना पोस्ट कुठून कुठे गेली आणि किती मोठी झाली हे लक्षातच आलं नाही. :)
ReplyDeleteस्वतंत्र ब्लॉग? राजा अरे ५ ब्लॉग आहेत ते काय कमी आहेत का रे?? हेहे