Tuesday, November 2, 2010

दिवाळी मिक्स !!

प्रत्येक ब्लॉगर दरवर्षी इतर ब्लॉगर्सना, वाचकांना आणि हितचिंतकांना आपल्या ब्लॉगवरून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. पण यंदा सगळ्यांनी मिळून जरा वेगळं करायचं ठरवलं. त्याचं काय झालं की काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे ब्लॉगर लोक (म्हणजे 'ब्लॉग लिहिणारा असा तो/ती' याअर्थी. ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस.कॉम अशा अर्थी नव्हे.) असेच जमलो होतो गप्पाटप्पा टाकायला. तेव्हा दिवाळीचा आणि शुभेच्छांचा विषय निघाला. त्यावेळी असं ठरलं की प्रत्येकाने स्वतःच्या ब्लॉगवरून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी सगळ्यांनी एकत्र मिळून एकाच ठिकाणाहून म्हणजे एकाच ब्लॉगवरून शुभेच्छा देऊया. तेवढंच वाचकांनाही बरं. एकच ब्लॉग वाचला की सगळ्या ब्लॉगर लोकांच्या शुभेच्छा मिळतील. तेवढ्यासाठी वेगवेगळया ब्लॉगवर जायला नको आणि तिथेच प्रतिक्रियांमध्ये शुभेच्छा दिल्या की त्या सगळ्या ब्लॉगर लोकांपर्यंतही पोचतील. आणि पुन्हा प्रत्येकाने आपल्या ब्लॉगवरून शुभेच्छा दिल्याने होणारा इ-पानांचा कचरा पर्यावरणाच्या दृष्टीने किती घातक आहे याचा विचार केला असता सगळ्यांनी एकाच ब्लॉगवरून शुभेच्छा देऊन त्यामुळे वाचणार्‍या (म्हणजे लाईफ-सेव्हिंग या अर्थी.. रीडिंग याअर्थी नव्हे) इतर इ-पानांचा दुवा (दुवा म्हणजे जुन्या 'आशीर्वाद' या अर्थी. हल्ली आपण वापरतो त्या 'लिंक' याअर्थी नव्हे. नाहीतर एकाच पोस्टमध्ये शुभेच्छा देऊन अजून कसले दुवे घ्यायचे-द्यायचे हा रास्त प्रश्न पडायचा) घेणं हे अधिक श्रेयस्कर होतं. (कुठल्याही शब्दाच्या पुढे 'पर्यावरण' आणि मागे 'इ' लावलं की सगळे प्रॉब्लेम्स फटाफट सुटतात अशा निष्कर्षाप्रत मी नुकताच आलेलो आहे).. एकूण एकदम फुलप्रूफ प्लान होता.  तर कुठल्या ब्लॉगवरून शुभेच्छा द्यायच्या असा विचारविनिमय चालू असता मी नेहमीप्रमाणे पुढेपुढे करून त्या माझ्याच ब्लॉगवरून द्यायच्या असा प्रस्ताव मांडला (वाचा "मागणी केली") आणि नाही-हो करता करता सगळ्यांनी त्याला मान्यताही दिली. ("कुठे याच्या नादी लागायचं एवढ्याशा गोष्टीसाठी" अशा प्रकारची कुजबुज मी अनुल्लेखाने मारली हेसांनल).. मग सगळ्यांचे शुभेच्छा संदेश एकत्र करून ते या पोस्टमधून वाचकांपर्यंत पोचवायचे असं ठरलं. पण तेवढ्यात अजून एक कल्पना आली कोणाच्या तरी डोक्यात. ती म्हणजे अशी की फक्त शुभेच्छा द्यायच्या मात्र त्याच्या खाली ब्लॉगरचं नाव नाही द्यायचं. वाचक लोक आणि इतर ब्लॉगरही इतके दिवस/महिने आपले ब्लॉग्ज वाचतायत तर त्यांना शुभेच्छा-संदेश वाचायला सुरुवात केल्याक्षणी लगेच ब्लॉगरचं नाव ओळखता आलं पाहिजे. मुद्दाम खाली नाव द्यायची गरजच काय? अर्थात ही कल्पनाही उचलून धरली गेली आणि होता होता सगळ्या ब्लॉगर लोकांचे शुभेच्छा संदेश एकत्र केले गेले. तर अशा रीतीने सगळ्या ब्लॉगर लोकांच्या या दिवाळीच्या एकत्रित शुभेच्छा समस्त वाचकवर्गासाठी आणि अन्य ब्लॉगर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी !

============

- खरं तर मी एक रोमँटिक कथा किंवा दिवाळीच्या शुभेच्छांचं एक रोमँटिक/हलकंफुलकं पोस्टच टाकणार होतो ब्लॉगवर. पण अचानक या एकत्रित शुभेच्छा द्यायचे मत मांडल्या गेले आणि मला देखील ही कल्पना आवडली. एकत्र शुभेच्छा देण्यात खरंच मजा आहे एक. आमच्या नागपुरात, वर्‍हाडात आम्ही सारे असेच एकत्र जमून दिवाळी साजरी करायचो माझ्या बालपणी. त्याची आठवण आली. पण पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी साजरा करण्याच्या दोन पिढ्यांमधल्या पद्धतींमध्ये किती फरक पडलाय नाही? एवढंच बोलून हे पोस्ट सॉरी शुभेच्छा संपवतो !

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'बिनधास्त' शुभेच्छा !!

============

* खरं तर दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ब्लॉगर मेळावा घ्यावा आणि ज्यांना गेल्या मेळाव्यामध्ये जमलं नव्हतं अशा ब्लॉगरनाही या मेळाव्यात सहभागी करून घ्यावं अशी खूप इच्छा होती. परंतु माझ्या पाहिल्याच दिवाळी अंकाचं काम आणि ब्लॉगजगतातल्या नवीन नवीन चोर्‍या पकडण्याचं काम करता करता वेळ कसा गेला कळलंही नाही. लवकरच एक दीर्घकथा घेऊन वाचकांच्या भेटीस यायचा मानस आहे. बघुया कसं जमतंय ते.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'फुलत्या' शुभेच्छा !

============

- दिनविशेष लक्ष्मीपूजन : याच दिवशी महाराजांनी < -- > किल्ला स्वराज्यात सामील केला आणि < -- > यांनी केलेल्या असीम पराक्रमाबद्दल किल्ल्यास < -- > असे नाव दिले. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदून ठेवण्यासारखा आहे.

आणि

खरे तर या पाडव्याला "मस्तपैकी बासुंदी कर" असे मी शमीला सांगितले होते. पण नेमके माझे काम वाढल्याने मला वेळेत येत येणार नाही यावेळी आणि ही दिवाळी हुकणार. असो पण कुठेही असलो तरी खादाडी चुकणार नाही हे अगदी नक्की. आणि परत आल्यावर बासुंदीही वसूल केली जाईल ती गोष्ट वेगळीच. हा हा..

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'खादाड' शुभेच्छा !

============

* दिवाळी म्हटलं की मला आठवतात ते बटाटेवडे. सध्या काही दिवसांसाठी शोमु सुट्टीवर आला असल्याने खायची नुसती चंगळ चालली आहे. दोघे मिळून रोज नवीन नवीन फर्माईशी करत असतात आणि मी मस्तपैकी रोज रोज नवीन काहीतरी बनवत असते :) .. तर आजची मागणी होती बटाटेवडे. बटाटेवडे म्हटलं की मला तर अजूनही माझ्या दादरमधल्या बटाटेवड्यांची आठवण येते आणि तोंडाला नुसतं पाणी सुटतं. गेल्या भारत दौर्‍यात इतके बटाटेवडे खाल्ले होते म्हणून सांगू. असो. कृतीही लिहून घ्या.

<फोटो>

<कृती>

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'सुगरण' शुभेच्छा :)

============

- खरं तर माझा जन्म पुण्यातला आणि माझं आजोळही (हे मी कितव्यांदा लिहितोय ते आठवत नाहीये). त्यामुळे पुणेरी थाटात शुभेच्छा द्यायचा विचार होता. पण ते फार क्लिशे होईल. कारण टेरेंटीनोच्या पंख्याने आणि प्रभूजींच्या भक्ताने पुणेरी थाटात शुभेच्छा देणं म्हणजे फारच कैच्याकै आवरा होऊन जाईल. एकदम मुक्तपीठ वाटेल ते म्हणजे. बाकी मुक्तपीठ हल्ली झोपलंय ही गोष्ट वेगळी. तर मुद्दा हा की पुणेरी नको आणि नॉनपुणेरीही नको.

दिवाळीच्या या 'मेड इन इटली-भिंत' शुभेच्छा घेऊन टाका कसे !!

============

* आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला) असतो नुसता. देवळं वगैरे आहेत पण आमच्या फिलीची मजा नाही. अर्थात इथल्या माउंट हूडची मजा काही और आहे हे मात्र खरं. लॉंग ड्राईव्हवर जाताना उजवीकडे हा असा माउंट हूड आणि रेडिओवर 'रिमझिम गिरे सावन'.. वा क्या बात है. सोबत कांद्याची भजी मिळाली की झालीच मग खरीखुरी दिवाळी. असो.

नमनाचं तेल वाहायला लागायच्या आतच 'माझिया' दिवाळीच्या हलक्याफुलक्या शुभेच्छा देते तुम्हाला आणि पळते कशी.

============

- चित्रपट : दिवाळी दिवाळी
दिग्दर्शक : पी. आनंद

http://www.imdb.com/title/tt012017699909/

माझं नेहमी एकच म्हणणं असतं. मला इतर लोकांसारखं चांगलं चांगलं लिहिता येत नाही. मी खरं तर एक वाचकच आहे. पण चित्रपटांवर मनापासून प्रेम असल्याने हा ब्लॉग अपडेट करत असतो अधून मधून. यंदाची दिवाळी 'स्वदेस' बघून साजरा करायचा विचार आहे.

तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या 'चित्रमयी' शुभेच्छा !

============

* गेल्या दिवाळीची एक आठवण. चकल्या तळत असताना गौरा मागे येऊन उभी राहिली गार गार हात घेऊन. मी तिला ओरडले. म्हटलं "कशाला ग उभी राहतेस एसी समोर? मग उगाच शिंकत राहतेस." पिल्लू म्हणालं, “तुला गरम होतंय ना म्हणून तुझ्यासाठी एसीची हवा हातात भरून आणली होती!!!!!! :)"

माझे डोळे नकळत पाणावले होते.

दिवाळी म्हंटली की मला अशाच काहीकाही गोष्टी आठवत राहतात. कशी कशी साजरी केली दिवाळी ते आठवत राहतं. खरं तर आयुष्यातला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी दिवाळी आहे इतकी तृप्त आहे मी. प्रत्येक क्षणात, तो क्षण जगण्यात एक गंमत आहे. पोरांच्या गंमतीजमती, त्यांच्या शाळा, मस्ती (एकदा तर लेकीने केळं काळं झालं म्हणून धुवायला टाकलेलं वॉशिंग मशीनमध्ये. आता बोला.) नवर्‍याची साथ, माझ्या सहज लिहायला घेतलेल्या ब्लॉगने जोडलेली नवीन नवीन नाती.. जन्मोजन्मी पुरणारी.. तर कधी हळवी होऊन माहेरचं गाणं गात आठवलेली माझ्या नासिकमधली दिवाळी. प्रत्येक क्षणाने भरभरून दिलंय मला..

असंच भरभरून वाहतं सुख तुम्हालाही लाभो याच 'सहज' शुभेच्छा !!

============

- या शुभेच्छा फक्त माझ्या एकट्यातर्फे नसून श्री.मेंदु.बिनडोके, श्री. स.दा. स्पंदने, कु. नयना बोलके, श्री.वदन बडबडे, श्री. का.न.उघडे ,श्री. वासु नाकपुरकर, श्री. हा.त. काहितरीकर, श्री. पा.य. धावते , सौ. रुचिरा जिभे आणि श्री.दात्ता चावरे या सगळ्यांतर्फे आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

या दिवाळीत माझ्या आवडत्या चेतन भगत आणि वपु यांची पुस्तके वाचत वेळ घालवण्याचा विचार आहे. बघू माझ्या शिफ्ट्स सांभाळून कसं जमतंय ते ! पण यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी मी नेहमीपेक्षा थोडासा वेगळा मार्ग निवडण्याचा विचार आहे. मी पूर्वी माझ्या वाढदिवसाला आणि वर्षभरात अजून एकदा रक्तदान करत असे. यावर्षी पासून मी रक्तदानासाठी माझा वाढदिवस आणि दिवाळी असे दोन दिवस नक्की केलेल आहेत. नेत्रदानाचा, देहदानाचा फॉर्मही भरलेला आहेच. तुम्हीही यंदाच्या दिवाळीत अन्य दाने करण्यापेक्षा रक्तदान करावं आणि नेत्रदान/देहदान याचे फॉर्म भरावेत असं मी आवाहन करतो.

आपणा सर्वांना दिवाळीच्या 'दवात भिजलेल्या' शुभेच्छा !

============

- आई काल रात्री मला म्हणाली "शनु, लवकर झोप. उद्या सकाळी लवकर उठून देवळात जायचं आहे.". मग मी दुदु पिऊन लगेच झोपून गेलो. सकाळी लवकर उठून आम्ही गाडीतून देवळात जाऊन आलो. तिथे मला सगळ्या दादा-ताईंनी खूप चॉकलेट दिली. सगळेजण मला 'सगळ्यांत छोटा ब्लॉगर' असं काहीतरी म्हणत होते पण त्याचा अर्थ काय हे काही मला कळलं नाही. मी मोठा झाल्यावर त्याचा अर्थ कळेल असं बाबा म्हणाले.  मग मी ती सगळी चॉकलेट शहाण्या बाळासारखी आईला देऊन टाकली. मग आम्ही घरी आलो. घरी गोड गोड मम्मं करून मी लगेच झोपलो.

तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या 'छोटुकल्या' शुभेच्छा !!

============

- दिवाळी म्हणजे अक्षरशः सैतानासारखे वागायचो आम्ही. अर्थात तेव्हा हे कळतही नव्हतं. आता जरा अक्कल आलीये म्हणून हे एवढं लिहितोय.

"दिवाळीचा बॉम्ब सरळ वातीला उदबत्ती लावून इमाने इतबारे फोडल्याची आठवणच नाही.  उदबत्ती किती मिनिटांत किती जळते त्याच्या खुणा उदबत्तीवर  पेन्सिलीने करायच्या आणि पाच मिनिटांच्या खुणेवर सुतळी बॉम्बची वात बांधायची.  मग उदबत्ती पेटवून हे सर्व प्रकर्ण रस्त्याकडेला सिमेंटच्या पायपात, अंगणात गडग्याच्या पोकळीत, आणि कुठे कुठे वळचण शोधून  तिथे कोंबायचं.  त्यानंतर लपून हुरहुरत वाट बघायची.  पाच मिनिटं संपण्याची.  पाच मिनिटं संपता संपता नेमका कोणीतरी त्या पाईप जवळून चालला असेल, किंवा गडग्यावर बसला असेल तर मग चेकाळ्याला उकाळा.. ढम्म..करून तो फुटला आणि बाजूचा जीव धसक्याने उडाला की मनातला सैतानी स्फोट त्या सुतळी बॉम्बच्या हजार पट असायचा..हायड्रोजन बॉम्बसारखा."

ही दिवाळी साजरी करण्याची आमची साधी सोप्पी आणि आवडती पद्धत. पण आता विचार केल्यावर जाणवतं ते सगळं करणारा मी कोण? तर कोणी नाही. खरं तर 'सुरमई शाम' वाला मी ही मी नाहीच की विमानं उडवणाराही मी नाही. 'थंड पिंप' वाला मी नाही की 'कॉल सेंटर' वालाही मी नाही. तो दुसराच कोणीतरी आहे. फक्त त्याला "मी" म्हणावं लागतं  कारण ”तो” जो कोणी ”मी” नामक जन्मतो तेव्हा जग निर्माण होतं आणि तो “मी” मरतो तेव्हा जग नाहीसं होतं ही साधी थियरी मोडून काढण्यासाठी केलेला कॉस्मिक आटापिटा वाटावा म्हणून.

दिवाळीच्या भुस्स भुर्रर्र भुर्रर्र शुभेच्छा !

============

* दिवाळीच्या शुभेच्छा गद्यातून द्यायला मला आवडत नाहीत. दिवाळीच्या शुभेच्छा या कशा गुलजारच्या एखाद्या नज्मेतून किंवा अमृता प्रीतम च्या एखाद्या छान शेरातून, गझलेतून दिल्या जाव्यात. खालीच अमृता प्रीतमच्या एका कवितेतला छोटासा शेर देते. खरं तर दिवाळीच्या शुभेच्छा अशा दुःखद शेरातून द्यायला नकोत. पण गेले काही दिवस या कवितेने, या शेराने माझ्या मनात अक्षरशः घर केलंय. बघा आवडतोय का.

मिरा शहर इक लम्बी बहिस वरगा है
सड़कां-बेतुकीआं दलीलां दी तरह
ते गलीआं इस तरह-
जिउं इको गल्ल नूं कोई इधर घसीटदा कोई उधर

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'गझलमयी' शुभेच्छा !!

============

- हल्ली आपली विशेष भेट होत नाही कारण हल्ली हा शॉन जाम बीजी झालाय अस वाटत असेल तुम्हाला. थोडफार खर आहे ते. कारण मी बीजी आहे हे तर खरच. ट्रेक-ट्रेक, खादाडी-खादाडी चालू आहे नुसतं सारखं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी काही आता शॉन राहिलेलो नाही. आता मी बदललोय. सांगेन लवकरच.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'उधाणलेल्या' शुभेच्छा !!

============

* माझे सगळे फ्रेंड मला छोटू बच्चू असं काय काय म्हणतात. पण मला राग नाही येत. मला उलट आवडतं ते. कारण आहेच मी सगळ्यांपेक्षा छोटू आणि बच्चू. आणि इथे ब्लॉगविश्वात तर सगळेच माझे ताई आणि दादा आहेत. मी थिंक करत नाही असं मी खोटं खोटंच सांगितलं सगळ्यांना मेळाव्यात. खरं तर मी खूप थिंक करत असते. सतत काहीतरी विचार डोक्यात चालू असतो. फक्त इथे लिहायला कंटाळा येतो.

माझ्या सगळ्या ताईदादांना दिवाळीच्या 'छोटू-बच्चू' शुभेच्छा !!

============

- रँडम थॉट्स - २५

१. पुण्यात एवढा भयंकर विचित्र ट्राफिक असतानाही त्याविषयीचे रँडम थॉट्स फक्त एकाच ब्लॉगवर का लिहिले जातात?
२. 'आवरा' या शब्दाचा खरा अर्थ काय याचा विचार कोणी केला आहे का?
३. मुक्तपीठ शांत असलं की अनंत लोकांना अनंत यातना होतात याबद्दल सकाळ आणि मुक्तपीठ यांचं काय म्हणणं आहे?
४. अल्ताफ राजाला पद्मश्री, मिथुनदांना पद्मभूषण आणि रजनीकांतला पद्मविभुषण पुरस्कार मिळावा का?
५. सीआयडी संपलं याबद्दल निषेध नोंदवण्यासाठी एखादी एनजीओ स्थापन करण्याची कल्पना कशी वाटते?

दिवाळीच्या 'रँडम' शुभेच्छा !

============

* परवा घरी आले आणि बघते तर माझ्या गच्चीतल्या बागेत चक्क आल्याचं फुल. कधीच बघितलं नव्हतं आतापर्यंत. त्यामुळे लगेच त्याचे फोटोही टिपले. ही दिवाळी एकंदरीत मजेत जाणार तर. आल्याचं फुल, माझे 'स्कॉलर आणि राक्षस', हावरटपणाने घेतलेली ढीगभर पुस्तकं.. मजा एकदम.. यावरून एक जर्मन कविता आठवली.

wünsche Ihnen und Ihrer Familie
ein sehr, sehr glücklich Diwali
und erfolgreiches neues Jahr.
genießen!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'आकाशी' शुभेच्छा !

============

- "मला आयुष्यातील प्रत्येक क्षण नव्याने जगायला आवडत. मी खुप मूडी आहे. मी माझ्या मनाला जे योग्य वाटत तेच मी करतो." असं माझ्याविषयी बरंच काही मीच लिहून ठेवलेलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र मी फार हळवा आहे. कधी मुस्कानच्या आठवणीने रडणारा, कधी त्या टीव्हीवाल्यांच्या फालतूपणाला वैतागून त्यांना झोडणारा, कधी देवस्थानांमध्ये मांडलेला बाजार बघून विषण्ण होणारा तर कधी 'जगात भारी कोल्हापुरी' खादाडी करणारा. यंदाची दिवाळी जोरात आहे माझी. अहो पहिला दिवाळसण आहे ना. म्हणून तर.. !

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'मौजी' शुभेच्छा !!

============

* यंदा जरा वेगळं वेगळं वाटतंय दिवाळीला.. राजधानीत साजरी करते आहे मी दिवाळी. त्यामुळे जरा वेगळं किंवा चुकल्यासारखं वाटतंय. पण असं काही वाटायला लागलं की खैरखेडीतला अंधार आठवते आणि मग जाणवतं की समाजातल्या अनेक घटकांपेक्षा आपण कितीतरी पटींनी सुखी आहोत.

आपणा सर्वांना दिवाळीच्या 'शब्द' शुभेच्छा !

============

- कालच दिवाळीवरची एक अतिशय सुंदर आणि वेगळी कविता वाचायला मिळाली आणि ती मला इतकी आवडली की पहिली ओळ वाचता वाचताच तिची चाल आपोआप माझ्या मनात तयार झाली. कवीने यात शब्दांची जी छान हळुवार गुंफण केली आहे ना तिची मजा काही औरच. माझ्या पुढच्या उन्हाळी अंकात ही घेईन म्हणतो.

<कविता>

इथे चाल ऐका.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'चालदार' शुभेच्छा !!

==============

* बघता बघता दिवाळी आली. पण खरं सांगायचं तर राममंदिराच्या बाजूने निकाल लागला तेव्हाच माझी दिवाळी साजरी झाली होती. सध्या खूप घाईत आहे त्यामुळे जास्त लिहीत नाही. पुढच्या कॅनडा दौर्‍याच्या नवीन आठवणी घेऊन लवकरच हजर होईन.

तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या 'शत' शुभेच्छा !!

============

- दिवाळी असतानाही आणि नसतानाही माझं आवडतं पक्वान्न एकच. बर्फ्या !! मला खूप आवडतात बर्फ्या. तसा मी खूप सद्गुणी मुलगा आहे आणि परीक्षा जवळ आली की मला अभ्यासाचा एकच ध्यास लागतो. नुकतीच परीक्षा संपली असल्याने या दिवाळीत बर्‍याच बर्फ्या खाता येतील. आणि थोडीफार इनस्टॉलेशन्सही करायची आहेत.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'बर्फ्यामय' शुभेच्छा !!

============

* ओमानचा निसर्ग, ओमानचा चहा, ओमानमधली गाणारी विहीर, मस्कतचे 'ज्वेल ऑफ मस्कत', सलाला वगैरे माझ्या विशेष आवडीच्या गोष्टी. यंदाची दिवाळी भारतात साजरी होणार आहे. अजिंक्यला आपल्या देशातली दिवाळी कशी असते हे कळावं म्हणून आम्ही दिवाळीला नेहमी भारतातच येतो.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'अक्षर' शुभेच्छा !!

============

- या दिवाळीत खूप कामं करायची आहेत. नवीन लेख निवडून दिवाळी विशेषांक तयार करायचा आहे. ब्लॉगवर बर्‍याच टेक्निकल टिप्सही टाकायच्या आहेत. हे सगळं सगळं घेऊन लवकरच भेटीला येऊ.

दिवाळीच्या 'नेट' शुभेच्छा !!

============

- मी खरं तर कोकणातल्या खार्‍या हवेवर आणि माश्यांवर पोसलेला/वाढलेला आणि जिभेचं वळण तिरका असणार्‍या अंतू बर्व्यासारखा माणूस पण इथे दक्षिणेत येऊन पडल्याने हल्ली 'येनु सार' ऐकत ऐकत मांसाहार करत असतो. पण काही झालं तरी दिवाळीला कोकणात जाऊन माश्यांचा आणि बकर्‍यांचा फडशा पडल्याशिवाय चैन पडणार नाही.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'गजालवाडी' शुभेच्छा !!

============

- यंदाची दिवाळीही नेहमीप्रमाणे रजनीव्रतकथा वाचून, रजनी महाराजांचं डीव्हीडीवर दर्शन घेऊन, पिवळा रुमाल आणि काळा गॉगल रजनीभक्तांमध्ये वाटून, दिवाळीच्या तिन्ही दिवसांचे २४ तास रजनीदेवांचे चित्रपट बघत बघत साजरी करणार आहोत. तेव्हा शुभेच्छा द्यायला वेळ मिळणार नाही. म्हणून आत्ताच देतो.

दिवाळीच्या 'MIND IT' शुभेच्छा, अण्णा !!!!

============

- गेल्या दिवाळीत जाम जाम फिरलो. ते वर्णन या दिवाळीत 'माचाफुको'च्या सिरीज मधून टाकतोय. 'माचाफुको' सिरीज सुद्धा आधी इंसेप्शन प्रमाणे 'सी' मध्येच लिहिणार होतो. पण माचाफुको पडला पक्का फिरता. त्यामुळे बरेच भाग टाकतोय. एवढं 'सी' प्रोग्रामिंग आणि तेही प्रत्येक भागात करायला वैताग येईल राव.

तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या 'सौर आणि माचाफुको' शुभेच्छा !!

============

- माझ्या बिनभिंतीच्या घरातल्या लोकांना या वेळी मी प्रेमळ दम भरलेला आहे की या दिवाळीत कोणीही फटाके फोडू नका आणि वीज वाचवा, पाणी वाचवा आणि झाडं लावा, झाडांवर प्रेम करा झाडांवर प्रेम करा.

दिवाळीच्या 'मनाच्या' शुभेच्छा !

============

- मनसोक्त फिरण्याची ही माझी शेवटची दिवाळी असेल असं सगळे चिडवत असले तरी पुढच्या दिवाळीत मी सगळ्यांना दाखवून देईनच की मी काय चीज आहे. जाउदे. पुढचं पुढे. या दिवाळीचा कोटा पूर्ण करायचा आहे.

सॅक : टिक
कॅमेरा : टिक
रोप : टिक
मॅगी : टिक
मेणबत्त्या : टिक

चला मी तयार आहे. येताय ना तुम्ही?

तुम्हाला दिवाळीच्या 'भटक्या' शुभेच्छा !!

============

- या दिवाळीत बरंच काही लिहायचं आहे ब्लॉगवर. नवीन टेम्प्लेट, ब्लॉग सजवण्याच्या नवीन युक्त्या, वर्डप्रेससाठी खास नवीन माहिती असं बरंच काही. बर्‍याच ब्लॉगर्सनी विजेटस बनवून देण्यासाठीही विनंती केली आहे. तेही काम करायचंय. पण हे फुकट क्रेडीट कार्डवाले कॉल्स साले थांबले तर वेळ मिळणार ना लिहायला. शांत बुलेटधारी (भीम) शांत !!

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'बंबल-बी' शुभेच्छा !!

============

- हल्ली जाम बिझी झालोय त्यामुळे जास्त वेळ मिळत नाही. पण या दिवाळीच्या मुहूर्तावर एक नवीन कथा घेऊन वाचकांच्या भेटीला येतो आहे. सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, ड्रामा असं सगळं सगळं असणार आहे या नवीन कथेत. लवकरच भेटू नवीन कथा घेऊन.. 'द डीप व्हॅली ऑफ मनी'

दिवाळीच्या 'मनातल्या' शुभेच्छा !!

============

- ही दिवाळी आमचं आराध्य दैवत रारा पपु श्री शिरीष कणेकर यांची फिल्लमबाजी आणि फटकेबाजी ऐकत व्यतीत करण्याचे मनी वसते आहे. पण नेमका ओबामा फोन करून निद्राराणीचा नाश करायचा आणि ओबामाचा पत्ता शोधत पत्तेशोधनाचं चिंतन करत तातडीचा वॉशिंग्टन दौरा करावा लागायचा. त्यापेक्षा नकोच ते. एकदा या ओबामाचे प्रॉब्लेम्स सोडवले म्हणजे मग मी फटकेबाजी ऐकायला आणि करायला मोकळा.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'जीवनगाणी' शुभेच्छा !!

==============

- दिवाळी एवढी घाईघाईत जाणार आहे की मनातल्या अनेक लघुकथा लिहायला, मनातल्या चाफ्याचा गंध ब्लॉगवर उतरवायला वेळ मिळेल का हे सांगता येत नाही. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'गंधित' शुभेच्छा !!

============

- या दिवाळीत मी दोन नवीन पोस्ट्स टाकणार आहे ब्लॉगवर. एक म्हणजे लिनक्स मधल्या काही महत्वाच्या पण सर्वसामान्यांना माहित नसलेल्या कमांड्स आणि दुसरी पोस्ट म्हणजे नासाने काढलेल्या मंगळाच्या छायाचित्रांवर लिहिलेली पोस्ट. लवकरच टाकेन.

दिवाळीच्या 'सुरुवातीच्या' शुभेच्छा !!

============

- या दिवाळीत गावाला जायच आहे. मजा येईल. 'ती' ही भेटेल. 'ती'च्याशी बोलायला मजा येईल. पण अप्सरा तिथे नसेल, अप्सरा भेटणार नाही याचं खूप वाईट वाटत आहे. तिचा तो लाल ड्रेस.. उफ्फ. माझं हृदयच बंद पडेल अस वाटत. दिवाळीत तर ती साडी नेसणार असेल. किती गोड दिसेल ना ती. ती आहेच गोड म्हणा. मीच हा असा फुस्स. तिच्यासमोर गेलं की काहीच सुचत नाही. मी मित्राला बोललो तर तो मला हसायला लागला. हे मित्र पण ना यार. जाउदे. सोडा ते. बोलूच.

दिवाळीच्या 'अप्सरा' शुभेच्छा !!

============

टीप :

१. ज्या शैलीत,भाषेत शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत ती त्या ब्लॉगरची निव्वळ एकमेव शैली, भाषा, निवड, विषय मांडणी आहे असं मुळीच नाही. फक्त ही शैली त्याच्या/तिच्या इतर शैली/मांडणी पेक्षा अधिक वापरली गेली आहे किंवा प्रभावीपणे वापरली गेलेली आहे असं मला वाटतं (ते पूर्णतः सत्य असेलच असं कदाचित नाही). त्यामुळे त्याचा प्रभाव वाचकांवर (किंवा फक्त माझ्यावर) अधिक पडलेला आहे असं समजावं.

२. कुठेही कुठल्याही ब्लॉगचा, ब्लॉगरचा किंवा त्याच्या/तिच्या मताचा/शैलीचा उपमर्द करण्याचा किंचितही उद्देश नाही. कोणाचा अपमान करण्याएवढा अजून मी मोठा झालेलो नाही आणि एवढं मोठं होण्याची इच्छाही नाही ;)

३. तरीही कोणालाही चुकून माकून आपला स्वतःचा, ब्लॉगचा, आपल्या शैलीचा, मताचा, पद्धतीचा, मांडणीचा अपमान झाल्यासारखं वाटल्यास ताबडतोब कळवणे. ते उल्लेख काढून मी पोस्टमधून काढून टाकेन. पण कोणी अशा प्रकारची तक्रार केल्यास ती तक्रार म्हणजे मला त्या ब्लॉगरची शैली व्यवस्थित कळली आणि मी ती हुबेहूब उचलूही शकलो आणि त्या पद्धतीने लिहूही शकलो याला पावती दिल्यासारखं होईल हे मात्र लक्षात असू दे ;)

४. चुकून एखाद्या ब्लॉगचा उल्लेख राहिला असल्यास तो माझा 'कपटीपणा' वा 'उद्दामपणा' नसून निव्वळ 'धांदरटपणा' वा 'वेंधळेपणा' समजावा. कुठल्याही ब्लॉग/ब्लॉगरला कपटीपणे वा उद्दामपणे वगळण्याएवढा मोठा... <यापुढे टीप क्र. २ वाचावी>

५. सर्व ब्लॉगर्स, वाचक, हितचिंतक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'ना हरकत' शुभेच्छा !! :D

============

वर म्हटल्याप्रमाणे ब्लॉगर लोक गप्पाटप्पा टाकायला जमले होते तेव्हा तिथे येऊ न शकलेल्या काही लोकांनी नंतर मेल करून शुभेच्छा संदेश पाठवले होते पण तळटीप क्र. ४ मध्ये उल्लेखिलेल्या माझ्या अचाट गुणविशेषांमुळे ते संदेश वरील विभागात नोंदवण्याचे राहून गेले होते. ते आता खाली देत आहोत. अर्थात तळटीप क्र. ४ मध्ये उल्लेख केलेल्या कारणांमुळे ते माझ्यावर रागावले नाहीयेत ही बाब तर नक्की..

============

- मी अलिकडे लिहिणं जरा कमी केलेलं असलं तरी सगळे ब्लॉग्ज नियमित वाचतो आणि आवडलेल्या पोस्ट्सवर प्रतिक्रियाही देतोच. या दिवाळीपासून पुन्हा नियमित लिखाण सुरु करण्याचा विचार आहे. आणि आमचा प्रिय मित्र 'अखिल वेगळे' देखील सतत मागे लागला आहे. त्यामुळे लिखाण सुरु होणार हे नक्कीच.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'मेवामय' शुभेच्छा !!

============

- वर उल्लेख केलेल्या सगळ्या ब्लॉगर मित्रांच्या मानाने ब्लॉगिंगच्या दुनियेतला माझा प्रवेश तसा नवाच. अनेक दिवस इतरांचे ब्लॉग्ज वाचून, तिथे प्रतिक्रिया देऊन झाल्यावर आपण आपलाही ब्लॉग सुरु करायला हवा असे स्वच्छंदी विचार माझ्या मनात दाटायला लागले आणि लगेच पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी माझा ब्लॉग सुरुही केला. बघा कसा वाटतोय तुम्हाला ते.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'स्वच्छ' शुभेच्छा !!

============

तर हे आमचे असे गुणविशेष पुनःपुन्हा जागृत होऊन नवनवीन यंट्रया येऊन अजून अजून नवनवे शुभेच्छासंदेश मिळत राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या पानाला भेट देत रहा वरचेवर !

91 comments:

  1. हेरंब, तेलाचं आणि दिवाळीचं अतुट नातं आहेच ते "माझिया मना"तून इतक्या व्यवस्थित वटवटीवर आणल्याबद्द्ल खरंच आभार...अगदी भरुन आलं बघ....अरे इतकी अचुक जर्मन कविता तुला इतक्या लगेच कशी मिळाली...खरंच हं कौतुक करावं तितकं कमीच रे.....:)

    आणि ही अखंड पोस्ट म्हणजे वटवटरुपी दि.शु. आहेत हे सु.सां.न.ल....दि.च्या हा. हा. शु......(थांबा जरा आदितेय काय करतो त्याआधी तिथे मायदेशात ओबामांना पाठवलंय त्यांची खरडपट्टी{(’आमचे ते ओबामा आणि त्यांचे ते मामा’ असं काहीसं शीर्षक द्यावं म्हणतो)} काढतो....) ......आता हे कोण म्हणून विचारु नकोस....तुझेच ब्लॉग मित्र-मैत्रीणी आम्ही एक उगीच प्रयत्न.......

    ReplyDelete
  2. अरे मज्जा आली एकदम... बहुतेक सर्व ओळखले.. १-२ नाही ओळखता आले... :( पण हरकत नाय...

    हा अतिथी संपादक बनून सर्वांच्या ब्लॉग मध्ये डोकावण्याचा परिणाम का रे??? हा हा हा ... :) कैच्याकै भारी केलेस हे काम तू...

    ReplyDelete
  3. त्यावेळी असं ठरलं की प्रत्येकाने स्वतःच्या ब्लॉगवरून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी सगळ्यांनी एकत्र मिळून एकाच ठिकाणाहून म्हणजे एकाच ब्लॉगवरून शुभेच्छा देऊया. >>>>> अरे आणि हे वाचून आधी मला कळेचना की हे कधी ठरले??? मला कसे कळले नाही... नंतर वाचत गेलो तशी पेटली... :D

    ReplyDelete
  4. दिन दिन दिवाळी... गाई म्हशी ओवाळी (टिच्युक टिच्युक) :P :D ;)

    तुला, (सूंसूंसूंई) तुझ्या कुटुंबियांना, (तडतडतडतड) ब्लॉगवाचकांना दिवाळीच्या (फटफटफटफट... धडाम) अगणित शुभेच्छा!!! :)

    () ()
    ---- ----
    \__/ \__/

    ReplyDelete
  5. हा हा हा एकदम मस्तच..दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा :)
    ..()()..

    ReplyDelete
  6. हेरंबा अरे माणसा कौतूकाला नवनवे शब्द आम्ही कुठे रे बाबा शोधायचे सारखे....

    क्या बात है, मस्त, भन्नाट वगैरे कितीवेळा वापरून झालेय तुझ्या पोस्टांसाठी.... ही पोस्ट तुझी दुसरी मास्टरपीस झालीये...

    जाम जाम आवडली, आणि सगळयांना सोबत घेऊन चालण्याच्या तुझ्या वृत्तीको हमारा एक सलाम!!! :)

    तूला, अनूजाला आणि आदिला दिवाळीच्या आम्हा सगळ्यांतर्फे अनेक अनेक शुभेच्छा!!!जियो!!!!

    तसेच याच पोस्टेतल्या सगळ्या ब्लॉगर्सला आणि ही पोस्ट वाचणाऱ्या तमाम वाचकांनाही आम्हा सगळ्या ब्लॉगर्सतर्फे पुन्हा एकदा अनेक शुभेच्छा!!! :)

    ReplyDelete
  7. हे तू बाकी बरं केलंस. माझा त्रास वाचला. आम्ही यंदा नाशिकला दिवाळी करणार आहोत, बहीणी कडे सगळे जण एकत्र!!

    ReplyDelete
  8. :D :D :D

    टीप:
    १. ह ह पु वा.
    २. दिवाळीच्या शुभेच्छा.**
    ----

    {[(सूचना १: (अजून एका वटवट्या ब्लॉगूला ऍड करायला हरकत हाय का? ()))]}

    ----
    ** चं पहिलं स्पष्टीकरण: तुला, आदिला, आदिमातेला दिवाळीच्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  9. जबरी ! एवढं भन्नाट कस्काय सुचतं ?

    ReplyDelete
  10. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'बर्फ्यामय' शुभेच्छा !!>>>

    हे भारीच होतं.. ;-)

    आणि अप्सरा शुभेच्छा... खी खी खी...

    चायला सुचत कसं तुला हे रे.. ;-)

    ReplyDelete
  11. दिवाळीच्या सांजमय शुभेच्छा माझ्याकडुन... ;-)

    ReplyDelete
  12. कस काय सुचत तुला एवढ छान लिहायला हे मला समजत नाही यार
    एकदम सही सही लिहिले आहेस रे :)
    माझ्यातर्फे सर्व ब्लॉगर्स, वाचक, हितचिंतक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !!

    ReplyDelete
  13. हेरंबा,
    तू कधि काय लिहीशील खरच भरवसा नाही. पण पोस्ट बेफाट झाल्ये.
    रोहनसारखे मलाही वाटले, अरे! हे एकत्र शुभेच्छांचे मला कसे नाही कळले? तेव्हढ्यात ’माझ्या शनूचे’ बोल वाचायला मिळाले.
    तुम्हाला सगळ्याम्ना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  14. तुम्हां सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

    ReplyDelete
  15. झकास.. लय भारी .. बर झालं 'मी' त्या मिटींगला नव्हतो ते !

    ReplyDelete
  16. लेकाला सगळ्यांच्या नाड्या बरोबर माहीत आहेत. हरकत नाय अशा शुभेच्छांना... मी ही इथेच देऊन घेतो.

    तुम्हाला दिवाळीच्या 'भटक्या' शुभेच्छा !!

    ReplyDelete
  17. आयच्यान्‌ म्यापन? दिवाळीच्या ‘स्वच्छ’ शुभेच्छा बघून धक्काच बसला राव. मस्तच लिहिली आहेस पोस्ट. (आता यात माझं नाव आहे म्हणून मी हे असं म्हणतोय असं नाही हां.. ;-) खर्रोखर्र छान आहे पोस्ट) तुला, तुझ्या कुटुंबीयांना, तुझ्या ब्लॉगला आणि इतर सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा... :-)

    ReplyDelete
  18. अखिल वैश्विक MIND IT मित्र मंडळातर्फे सर्व रजनी भक्त-अभक्तांना(रजनीधर्म सर्वसमावेशक आहे,आम्ही नास्तीकांचापण आदर करतो.) दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
    स्वामी संकेतानंदांच्या वतीने शुभेच्छा दिल्याबद्दल सत्यवानाचे जाहीर आभार !
    प्रत्येकाची नाडी सही ओळखलीस. अर्थात शैल्या उचलत्या आल्या नाहीत सर्वांच्या(उदा. माझी,सौरभची,(माझी सध्यातरी कोणती शैली नसेल,इतक्या कमी लेखांत शैली बनणे अवघड आहे खरे )),पण तो ब्लोग ओळखू येईल इतपत त्यांच्या ब्लोग-वैशिष्ट्यांची दखल घेतलीये(उदा. "Random thoughts" ,माझी रजनीव्रते
    ).सगळेच ब्लोग ओळखू आलेत त्यामुळे. जबरी शुभेच्छा लिहिल्याबद्दल अभिनंदन.

    दिवाळीच्या 'MIND IT' शुभेच्छा, अण्णा !!!!

    ReplyDelete
  19. कै च्या कै भन्नाट आहे ही पोस्ट...( आणि ही पोस्ट लिहिणारा दादा पण... :-) )
    हल्ली मला इथे comment करायला उशीर होतो आणि माझ्या आधी सगळ्यानी माझ्या मनातले आधीच लिहून टाकलेले असते. :(
    तर, माझी प्रतिक्रिया म्हणून सगळ्या comment punha ekda vach... ;)
    असो, रोहन दादा प्रमाणे मी पण आधी खट्टू झाले... कधी ठरले हे सगळे.. आणि मला का नै सांगितले...वैगरे वैगरे...!!! :P
    नंतर वाचत गेले तशी tube पेटली. :)
    खूप सही रे... :)
    [ कित्ती दिवसानी इतकी लांबलचक प्रतिक्रिया देते इथे...मज्जा आली... :) ;) ]
    Nwys, तुला, आदीतेय ला आणि अनुजा ताई ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!! :-)

    ReplyDelete
  20. >>एकदम काटाकीर्र , अशक्य, पोस्ट
    (माझा जन्म पुण्यातला आहे...त्यामुळे मी दुसर्‍या पुणेकराची कॉमेंट कॉपी करून कीस्ट्रोक्स वाचवलेत! :) )

    ReplyDelete
  21. तुम्हा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  22. अपर्णा, तेलाचं दिवाळीशी आणि 'माझिया मना' शी जेवढं अतूट नातं आहे तेवढंच सत्यवानाशीही आहे त्यामुळे आपोआप जमलंच ते ;)

    अग आणि ते जर्मन भाषेत जिच्यासाठी लिहिलं आहे तिने ते वाचून त्याला मी कविता म्हणतो आहे हे पाहून तिची काय अवस्था झाली असेल हे मला दिसतंय.. अग मी फक्त माझ्या 'गुग्ल्या भाषांतर' मित्राची मदत घेतली. मी लिहिलंय ते गुग्ल्याकडे जर्मन -> इंग्रजी असं टाकून बघ.. सगळी कोडी सुटतील लगेच ;)

    >> आता हे कोण म्हणून विचारु नकोस

    कोण ग? कळलं नाही.. :P lol

    ReplyDelete
  23. रोहण्णा, कुठले कुठले ओळखता नाही आले ते सांग. मग लिंक देतो त्यांची.

    >> हा अतिथी संपादक बनून सर्वांच्या ब्लॉग मध्ये डोकावण्याचा परिणाम का रे?
    हा हा.. अरे आधीपासूनच डोकावत होतोच ना.. म्हणून तर 'अतिथी' झालो ;)

    >> अरे आणि हे वाचून आधी मला कळेचना की हे कधी ठरले???

    घ्या.. असं होईल तरी का कधी? सेनापतींना न सांगता कुठलाही बेत/दौरा आखला जाईलच कसा? काळजी नसावी. :)

    ReplyDelete
  24. सौरभ, दिवाळीच्या दिन दिन फटाक फुटूक शुभेच्छा.. तुला आणि माचाफुको दोघांनाही :)

    ReplyDelete
  25. धन्स धन्स सुहास.. तुलाही दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! उधाणलेल्या ;)

    ReplyDelete
  26. तन्वे, तुझ्या माझ्या प्रत्येक पोस्टवरच्या प्रतिक्रियेने आमच्या अंगणातलं हरभर्‍याचं झाड मोडतं.. आणि आजच्या प्रतिक्रियेने तर दोनदा मोडलं.. त्याबद्दल णी षे ढ :P

    गौरा, ईशान, अमितला आणि तुला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  27. काका, बर्‍याच दिवसांनी तुमची प्रतिक्रिया बघून खूप बरं वाटलं. प्रतिक्रिया टाकता न येण्याचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर एकदाचा ! बरं झालं.

    काळजी नको मी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्याच आहेत. :) .. ओह यंदा नागपूर ऐवजी नाशिक आहे तर.. उत्तम..

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

    ReplyDelete
  28. गौरी.. हा हा हा.. पण ही अशी कंस आणि * ने भरलेली प्रतिक्रिया का टाकली आहेस तू? :P

    रच्याक, जर्मनचे खून पाडूनही तू कुठलाही ग्रह मनात न धरता प्रतिक्रिया दिलीस त्याबद्दल आभार .. हेहे लोल..

    तुला आणि घरी सगळ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  29. क्षितीज, सुचतं जरा अधूनमधून ;) ..

    दिवाळीच्या 'हास्य' शुभेच्छा !! :D

    ReplyDelete
  30. आका, हा हा.. आता मलाही वाटायला लागलंय कसं काय सुचलं. ब्लॉगवाचन जरा कमी केलं पाहिजे ;)

    तुलाही दिवाळीच्या 'खरड' शुभेच्छा :)

    ReplyDelete
  31. विक्रमा, हाहा .. आभार रे... हे कसं सुचलं हा प्रश्न आता माझाही पिच्छा पुरवणार हे नक्की. ;)

    एकेक प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात येतंय की कित्येक ब्लॉग्जचे उल्लेख अनवधानाने राहून गेले. पण तरीही तुम्ही कोणीही न रागावता प्रतिक्रिया दिल्यात किंवा माझ्या ब्लॉगचं नाव नाहीये ना मग मी कशाला प्रतिक्रिया देऊ असे विचार केले नाहीत हे बघून खूप खूप बरं वाटतंय. खरंच !!

    तुला आणि तुझ्या कुटुंबियांनाही दिवाळीच्या 'जीवनमूल्य' शुभेच्छा !!

    ReplyDelete
  32. सोनाली/आर्यन, अग असं काय तुम्ही दोघेही होतात की त्या मिटींगला. विसरलीस? ;) हेहे..

    शनू बाळ कसा आहे? त्याचे नवीन पराक्रम ऐकवले नाहीस तू कित्येक दिवसांत. पटकन टाक ना काहीतरी ब्लॉगवर.

    तुला आणि घरी सगळ्यांनाही दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

    ReplyDelete
  33. अनघा, सॉरी.. तुझ्या ब्लॉगचाही उल्लेख राहिला.. मगाशी ब्लॉगवाचन कमी करावं लागेल म्हणत होतो. उलट वाढवावं लागेल असं वाटतंय आता. :)

    तुलाही दिवाळीच्या 'non-resting' शुभेच्छा !!

    ReplyDelete
  34. सोमेशा, अरे तू नव्हतास तरी तू पाठवलेल्या शुभेच्छा मिळाल्या आम्हाला.. :)

    तुलाही दिवाळीच्या 'full-of-life' शुभेच्छा !!

    ReplyDelete
  35. पंकज, अरे सगळ्यांच्या नाड्या जवळपास सारख्याच.. थोडं इकडे तिकडे.. जमल्या तशा उचलण्याचा प्रयत्न केलाय :) .. सगळ्यांना आवडला हे बघून बरं वाटतंय :)

    तुलाही दिवाळीच्या 'भटक्या' शुभेच्छा !

    ReplyDelete
  36. संकेत, अरे तुझ्या 'स्वच्छ' शुभेच्छा आल्या होत्या पण टाकायला उशीर झाला. म्हणून शेप्रेट टाकल्यात ;)

    तुला आणि तुझ्या कुटुंबियांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  37. संकेतअण्णा, रजनी-अभक्तांनाही शुभेच्छा दिल्यात हे एक लय बरं केलंत. ;)

    अरे हो. माझा खरं तर शैली उचलण्याचाच प्लान होता.. पण पहिल्या २-३ शुभेच्छा लिहून झाल्यावर लक्षात आलं की हा त्या त्या ब्लॉगरच्या शैलीत लिहिण्याचा प्रकार फार अवघड आहे. त्यामुळे मग जमतील तेवढ्या शैल्या उचलण्याचा प्रयत्न केला. जिथे नाही जमलं तिथे शैली नाही पण तो ब्लॉग/ब्लॉगर व्यवस्थित ओळखता येईल अशी शब्/वाक्य रचना केली.. जवळपास सगळे ब्लॉग्ज ओळखू आले म्हणजे प्रयोग यशस्वी ठरला म्हणायचा.

    तुलाही दिवाळीच्या 'MIND IT' शुभेच्छा ! :)

    ReplyDelete
  38. विक्रांता, हे सगळं अगदी असंच कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय.. कुठे ते आठवत नाहीये ;)

    हा हा हा हा हा हा.. जाम भारी कमेंट.. 'तळटीप - १ - (रिकामी)' हे तर महान अशक्य आहे. !! लोळालोळी नुसती :)

    विषयांतरातल्या तिन्ही प्रकारच्या शुभेच्छा तुलाही ;)

    ReplyDelete
  39. हा हा मैथिली.. आभार.. हो.. हल्ली तू फार गायब गायब असतेस.. लेटेस्ट पोस्ट (तुझ्या ब्लॉगवरच्या) चा परिणाम का? लोल ;)

    अग तुम्ही सगळेजण असे विसरताय काय. तुही होतीस की त्या मिटींगला. आरुष, आर्यन आणि आदितेयची चॉकलेटस आपण दोघांनी मिळून नाही का गुपचूप संपवली.. आठवलं का आता? ;) हे हे..

    >> [ कित्ती दिवसानी इतकी लांबलचक प्रतिक्रिया देते इथे...मज्जा आली... :) ;) ]

    मलाही :)

    तुला आणि घरी सगळ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  40. बाबा, तरी नशीब तुम्ही दोन्ही पुणेकर एकारांत आडनाववाले नाही आहात. नाहीतर एवढीही कमेंट मिळाली असती की नाही देव जाणे.. लोल :P

    मी इ-पानं वाचवली आणि तू कीस्ट्रोक्स.. वा वा.. चांगली चाललीये वाचवा वाचवी :P

    ReplyDelete
  41. रविंद्रजी, तुम्हा सर्वांनाही दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  42. दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
    सुखाचे किरण येती घरी,
    पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
    आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
  43. भुंगाबा, आभार.. तुला आणि तुझ्या कुटुंबियांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  44. मी खट्टू नं.३. आधि वाटले हे यांचे कधी ठरले?
    मग कळाले.. :D :D
    भार्री..
    लोळालोळी..
    अशक्य ख्या ख्या ख्या..

    दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  45. रच्याक....अशक्य भारी...तुझी पोस्ट वाचली अन हाफ़िसातील कामाचा सर्व थकवा पळाला बघ....कैच्याकै भारी पोस्ट झाली आहे.

    तुला, आदिला व सर्व कुटुंबीयांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  46. चला, तीन खट्टे पोस्ट वाचून मिठ्ठे झाले तर ;) .. हेहे..

    प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल खूप खूप हाबार्स !!

    तुलाही दिवाळीच्या भर्पूर शुभेच्छा !

    ReplyDelete
  47. योग्या, क्या बात !! हपिसातला थकवा पळाला ना? म्हणजे सार्थकी लागली पोस्ट :) आभार रे..

    तुला आणि घरी सगळ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! पहिला दिवाळसण दणक्यात होऊ दे ;)

    ReplyDelete
  48. दिवाळीच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा !! आणि पोस्ट तर एकदम मस्तच आहे !!!! कस सुचत हो इतक छान लिहायला तुम्हा लोकांना? मला जमतच नाही.

    ReplyDelete
  49. हेरंब खुपच छान जमल आहे. कस सुचल हे? वाचून बहुतेक ब्लॉग ची ओळख पटली. त्यात माझा दमबाजीचा सुध्दा आहे.

    ReplyDelete
  50. D;vali diwa-li, DEEp avali shubhechha kasala? ARe leko tumci tar varsbarac diwali asate

    ReplyDelete
  51. are balaanno, aamhi shetkaryaanchi diwali kayn sangu, fukat bomblat nhiye, pan gelya 4 divsat itka pauus padla ki sagla zendu vaya gela, ata maaza oos janaar decemberla, tyache 4/5 lakh yetil mag diwali . nahitar kara marwadyachya udharrya. ek tarkhecha pagaar sodun ugich sheti karat baslo

    ReplyDelete
  52. जीवनिका कसचं कसचं ;) ... तुला आणि घरी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  53. काका धन्यवाद. अतिब्लॉग वाचनाचा परिणाम दुसरं काय ;) हेहे..

    ReplyDelete
  54. मजा आली एकेक वाचून.. दिवाळीचा मस्त 'mix' फराळ दिलास ...
    दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा..

    ReplyDelete
  55. Happy Diwali(belated)!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  56. हे..हे..हे...हू...हू...हू...ही...ही...ही...
    हुश्श...
    दिवाळीच्या शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  57. मस्त रे ! लेख जमलाय एकदम !

    दिवाळीत बाहेरगावी गेलो होतो त्यामुळे उशिरा प्रतिक्रिया टाकतोय.

    ब्लॉगर्सच्या शैल्या(शैली चे अनेकवचन !) व्यवस्थित उचलल्या आहेस. माझे आणि विभीचे या विषयावर एकदा बोलणे झाले होते कि इतर ब्लॉगर्सच्या शैली मध्ये लेख लिहिण्याचा खो-खो चालू करायचा.(अजून एक random thought :P) पण त्याचे पुढे काही झाले नाही. पूर्ण मोठ्या लेखापेक्षा हि शुभेच्छांची कल्पना चांगली आहे.

    दिवाळीच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  58. Diwali cha faral changla milala. Avadla pan.. Tula pan Diwali cha Khuup khuup shubhechcha. Asach lihit ja. Pan mi blaog vishwat atach padarpan kelay. Tyamule mi kunalach olkhat nai. An tyanche blaog links pan mahit nai.

    ReplyDelete
  59. योग, मनःपूर्वक धन्यवाद. मलाही लिहिताना मजा आली :)

    ReplyDelete
  60. Anee, Thanks a lot. Hope you had a great Diwali too :)

    ReplyDelete
  61. सागरा, धन्स धन्स.. तुलाही दिवाळीच्या 'माझ्या मनातल्या' शुभेच्छा ! :)

    ReplyDelete
  62. धन्यु अभिजीत.. ब्लॉगर्सच्या शैल्यांमधल्या लेखांच्या खो-खो चा रँडम थॉट भारी आहे एकदम. ट्राय करायला हरकत नाय ;)

    पुन्हा एकदा दिवाळीच्या रँडम शुभेच्छा ;)

    ReplyDelete
  63. प्रिय अनामिक,

    तुलाही दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! पुढचे काही दिवस marathiblogs.net वर नवीन येणारा प्रत्येक लेख (आणि तो ब्लॉगही) वाचून काढ.. महिनाभराच्या आत सगळे ब्लॉग्ज ओळखू यायला लागतील ही आपली ग्यारंटी ;)

    ReplyDelete
  64. तो तूच असणार होतास...पण माझ्या फसलेल्या प्रयत्नापेक्षा मला विक्रांतने लिहिलेय जास्त आवडलय...म्हणून माझं सोड..
    तू पाहिलस का तुला मैथिलीने दादा म्हटलंय... ते ठीक आहे...आरे पण अनुजा ता..................ई...............................सांग तिला ....काल तसंही भाऊबीज आणि पाडवा एकत्र होतं न मला इतका हसायला येत होत......तुझी दिवाळी मजेत गेली असणार यात काही शंका नाही....:)

    ReplyDelete
  65. अपर्णा,

    पाडवा, भाऊबीज ख्या ख्या ख्या.. एकदम कैच्याकै :)

    ReplyDelete
  66. बावा!! दिवाळी होऊन गेली, पण आमची दिवाळी अजून सुरूच आहे!!
    घ्या तर!! तुम्हाला पण दिवाळीच्या शुबेच्छा!

    ReplyDelete
  67. आण्णा!! दिवाळीच्या शुभेच्छा रजनी देवाजी कडून आण्यात जरा उशीर झाला, तरी वट-वटीच्या वातीला दिवाळीच्या धमाकेदार शुभेच्छा :)

    ReplyDelete
  68. Thanks for wishing everyone (meaning those who read your blog!) on behalf of me. I read it today :-)

    ReplyDelete
  69. वा वा वा.. साक्षात केरळ-कन्याकुमारीधिश्वर माचाफुको महाराजांचे पाय लागले तर आमच्या ब्लॉगला.. धन्स धन्स माचाफुको.. आठवडाभर मजा आली तुमच्याबरोबर केरळ फिरताना.. आमचीही दिवाळी झाली ! :) .. ब्लॉगवर स्वागत. !

    ReplyDelete
  70. आकाशाण्णा, रजनीदेवाजी कडून दिलेल्या इस्पेशल शुभेच्छांबद्दल वटवट मंडळ आभारी आहे. :) ब्लॉगवर स्वागत.. ! :)

    ReplyDelete
  71. सविताताई, ब्लॉग वाचणार्‍या सगळ्यांतर्फे तुमचे आभार :).. आणि दिवाळीच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  72. अरे माय.., मराठीत बोले तो 'माझ्या'पण नेहमीप्रमाणे एकदम फुल्ल टू 'भ'हरलेल्या भरपुर शुभेच्छा.
    बाकी आयची, बोले तो आयडियाची कल्पना एकदम 'भ'हरलेली... 'भ'न्नाट... एकदम किचाट, आडस्!!!

    ReplyDelete
  73. सिद्धार्थ, 'भ'हरलेल्या 'भ'न्नाट कोकणी शुभेच्छांबद्दल 'भ'रपूर, 'भ'यंकर, 'भ'यानक आभार ;)

    ReplyDelete
  74. आधी मी प्रचंड प्रचंड प्रचंड रागावलो होतो, माझ्या शुभेच्छा शिवाय तू कसं करू धजलास, तुला शिव्या (होय शिव्याच) देण्यासाठी गुगल टॉकवर शोधलं पण.... आणि तू न सापडल्यामुळे (नाईलाजाने) पोस्ट वाचली आणि देवाचे आभार मानले..(नाहीतर मलाच उलट्या हजार शिव्या खाव्या लागल्या असत्या)...
    पण काय भन्नाट कल्पना आहे आणि मी जवळपास सर्वांना ओळखले देखिल.. तुला मानलं राव (कितव्यांदा ते विचारू नको)...
    दिवाळीच्या उशीराने तुला आदीला आणि वहिनींना शुभेच्छा.... स्वदेस पाहत दिवाळी साजरी नाही झाली तरी नव वर्ष करेन त्या सोबत साजरं ;)

    ReplyDelete
  75. चला लोकं नाईलाजाने का होईना पोस्टी वाचतात तर माझ्या.. :P

    >> नाहीतर मलाच उलट्या हजार शिव्या खाव्या लागल्या असत्या

    असत्या म्हणजे काय रे? वेळेवर पोस्ट न वाचल्याबद्दल आणि वाचली तीही नाईलाजाने वाचल्याबद्दल तुला आत्ताही हजार शिव्या घालतोच आहे मी. ठसके लागत असतील बघ. ('इतर' ठसक्यांशी कदाचित मिक्सप होईलही. पण आमचे ठसके जहाल आहेत कारण ते शिव्यावाले आहेत ;) ) ;)

    ReplyDelete
  76. झकास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स..मस्त लिहिले आहेस..तुला आणि तुझ्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा !!
    शुभेच्छा द्यायला उशिर कारण गोव्याला जाउन आले..आल्यावर पोश्टी पाहिल्या म्हटल उशिरा का होईना शुभेच्छा तर द्यायच्याच.. तु समजुन घेशिल...

    ReplyDelete
  77. Ok, ya shubechcha itaranchya shaieet tu dilya ahes hee gosht kaLaleesuddha nahee until I read other bloggers's comments, mee yateel kahee blogs taree almost regularly vachate:-)tyamuLe I can appreciate this. chanach jamalay. ha thoda e-nakalanchach karyakram zala:-) good fun! and of course belated wishes too!!

    ReplyDelete
  78. कया बात ,क्या बात, क्या बात.............ग्रेट यार

    ReplyDelete
  79. माऊ, धन्स धन्स... गोव्यात दिवाळी ... हम्म्म्म.. झक्कास ग एकदम..

    रच्याक, तुझ्याही ब्लॉगचा उल्लेख राहून गेला अनवधानाने. त्याबद्दल क्षमस्व.

    तुला आणि तुझ्या कुटुंबियांनाही दिवाळीच्या 'मन मानसी' शुभेच्छा :)

    ReplyDelete
  80. हाहा स्मिता.. आभार्स.. एक जरा वेगळा प्रयत्न (आणि टीपी ;) )..

    इ-नकला... हा हा हा.. अग सुरुवातीला माझ्याही डोक्यात अगदी हेच आलं की हे म्हणजे मिमिक्री आर्टिस्ट सगळ्या कलाकारांच्या आवाजात एखादा डायलॉग बोलतात त्या टाईपचं काहीतरी वाटतंय.. पण म्हटलं चलता है.. कोणी रागावणार नाहीत. सगळे आपलेच आहेत. :)

    तुला आणि तुझ्या कुटुंबियांनाहि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

    ReplyDelete
  81. देवेन, आभार्स आभार्स दोस्त :)

    ReplyDelete
  82. हेरंब, धन्यू रे बाबा. मी विचारच करत होते, माझ्याकडे एकतर इंटरनेट नव्हते त्यातून इतक्या वर्षांनी मायदेशी दिवाळी पण सगळ्यांना शुभेच्छा तर द्यायच्या होत्या... जागलास रे तू वचनाला. :D
    सहीच अवलोकन आहे बरं. बरीच उशीरा पोच देतेय पण कारणे तुला माहीत आहेतच तेव्हां... :)

    ReplyDelete
  83. श्रीताई, काळजी नको.. मी आहे ना.. मी सगळ्यांच्या वतीने दिल्यात शुभेच्छा !! इतक्या वर्षांनी मायदेशी दिवाळी साजरी करणार्‍या ताईसाठी एवढं तरी करायला हवंच ना :)

    ReplyDelete
  84. गेल्यावर्षीचं दिवाळी मिक्स तितकंच खास आणि खमंग... दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!

    ReplyDelete
  85. हेरंबा, तुम्हां सर्वांना मनापासून शुभेच्छा ! :)

    ReplyDelete
  86. हा हा हा हा
    या पोस्त वर माझी कोमेंट नव्हती हे आत्ता कळल.
    मस्त आहे हि पोस्ट
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  87. हेरंब,
    ... तब्बल वर्षभराने हे पोस्ट वाचनात आले.माझ्या सारखे अनेक ब्लॉगर अजून एल अँड टी मध्ये आहेत म्हणजेच लिंबू-टिंबू ,त्या मुळे, माझे नेहमी प्रमाणे वरती नंतर घोडे... माझ्या हि दिवाळीच्या ... नव्हे....... आता येणाऱ्या वर्षभरासाठी हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  88. हाहाहा.. आभार सुहास. आणि दिवाळीच्या शुभेच्छा !

    ReplyDelete
  89. अनघा आभार. तुम्हा सगळ्यांनाही दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

    ReplyDelete
  90. हेहेहे.. सागर.. आभार.. आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

    ReplyDelete
  91. प्रतिक्रियेबद्दल आभार, सदानंद दादा. तुला आणि तुझ्या कुटुंबियांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...