Wednesday, September 29, 2010

णिषेढोपणिषड

नमो नमः सुजनहो, सृजनहो व भक्तजनहो. 'आदिलीलापुराणा'च्या आजच्या श्रवणोपासनेत आपले स्वागत. विविध आदिलीलांनी ओतप्रोत भरलेल्या 'आदिलीलापुराणा'चे अमृत आपल्या कानांत साठवून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या, विशाल संख्येने उपस्थित पावलेल्या या विशाल जनसागराचे मी 'आदि-दास' मनःपूर्वक स्वागत करतो. आजवरच्या आपल्या 'आदिलीलापुराणा'च्या प्रवासादरम्यान आपण 'दंतोपनिषद', 'निद्रानाशानुभव', 'पुनर्दंत विवेचन', 'प्रथम-पाद्या-नुभुति', 'प्रथमग्रासोपनिषद' अशा आदिस्वामींच्या अनेकानेक लीलांचे मनोभावे श्रवण केले. पण आजचा अध्याय थोडा वेगळा आणि म्हणूनच गंमतीशीर आहे. त्यात एक आगळीच मौज भरलेली आहे. बाल-आदिने आपल्या बंडखोर बाललीलांनी त्याच्या मातापित्याच्या तोंडचे पाणी कसे पळविले होते याचे समग्र वर्णन आद्य 'आदि-दासां'नी या खंडात केले आहे. ते तुमच्यासमोर मांडणारा हा एक सामान्य 'आदि-दास' आहे. तर आजच्या अध्यायाचे नाव आहे 'निषेधोपनिषद' किंवा आदिस्वामींच्या तातांच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'णिषेढोपणिषड'.. क्षमायाचना.. 'णिषेढोपनिषद'. या 'णिषेढोपनिषदा'त आदिस्वामींच्या मनाविरुद्ध काही घटना घडल्यास--ज्या कधी घडू शकतील हे साक्षात आदि-स्वामी सोडून कोणासही उमगत नसे--त्यांनी वेळोवेळी केलेल्या निषेधांचे संकलन केलेले आहे. परंतु हे निषेध स्वामींनी अशा विविधांगी, विविध रूपांत, निरनिराळ्या मार्गांनी नोंदवले आहेत की आपल्यासारखी सामान्य माणसे त्यांचा विचारही करू शकत नाहीत व त्यांच्या या विविध लीलांची निव्वळ श्रवणभक्ती करणे एवढेच काय ते आपल्यासारख्या पामर भक्तांच्या हाती उरते. इतुकेच नव्हे तर कित्येकदा हा निषेधाचाच एक प्रकार आहे हे खुद्द स्वामींच्या मातापित्यांनाही उमगत नसे असे स्वतः त्यांनीच सांगून ठेवल्याचीही नोंद आहे. असो. 'णिषेढोपनिषद' वर्णिण्यासाठी, श्रवण्यासाठी ही एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. संपूर्ण णिषेढोपनिषद हे अत्यंत मधुर आणि श्रवणीय आहेच परंतु कालाभावामुळे आज आपण त्यातील काही महत्वाच्या मुद्यांबाबत व अनुभवांबाबत विवेचन करू.

'वस्तू-क्षेपण' णिषेढ :

एके समयी बाल आदिस्वामी त्यांच्याकडे असलेल्या अनेक लहान चारचाकी खेळण्यांपैकी एका चारचाकीशी खेळण्यात मग्न होते. चारचाकीशी खेळणे म्हणजे चारचाकी उलटी करून तिची चाके फिरवणे आणि मधेच मुखात घालणे अशा स्वरूपाची क्रीडा चालू होती. स्वामींच्या मातोश्रींनी ते पाहताच लगेच त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला व स्वामींना असे न करण्याविषयी बजावले. झाले !! त्याक्षणी स्वामींना क्रोध अनावर झाला व अकस्मात स्वामींनी ती छोटी चारचाकी उचलून मातोश्रींच्या दिशेने भिरकावली. ते देखोन मातोश्री अजूनच संतापदग्ध झाल्या आणि त्यांनी स्वामींना तसे न करण्याविषयी पुनश्च एकवार दटावले. जे अर्थातच स्वामींना सहन होणे शक्य नव्हते. त्यामुळे स्वामींनी दुसरी चारचाकी घेऊन ती भिंतीवर आणि तिसरी चारचाकी सज्जाच्या काचेच्या दिशेने आदळली. मातोश्रींनी लगबगीने महालातल्या सर्व चारचाक्या जमा करून त्यांच्यावर तात्पुरती जप्ती आणविली खरी पण अर्थातच स्वामींच्या अभिनव णिषेढ प्रकाराने स्वामींचे माता-पिता चांगलेच दिग्मूढ व चिंतीत झाले.

'हस्त-पार्श्वे-बंधित दौड' णिषेढ :

णिषेढाचा हा एक आगळा प्रकार स्वामीलीलांमध्ये वाचावयास मिळतो. आदिस्वामींनी हे असे विविध णिषेढांचे प्रकार कसे शोधून काढले असावेत या विचाराने त्यांचे अपार कौतुक वाटत राहते. अखेर स्वामीच ते !! तर उपरोल्लेखाप्रमाणे हा प्रकार काहीसा निराळा आहे. स्वामींना सतत निरनिराळी पुस्तके, विविध धातूंची अथवा काचेची पात्रे, अन्य अवजारे, भोजनाची अन्यान्य उपकरणे यांच्याशी खेळण्यास आवडत असे. अर्थातच त्यांना पुस्तके आणि काचेची उपकरणे इत्यादींशी खेळण्यास मज्जाव असे. तरीही अनेकदा ते माता-पिताश्रींचा डोळा चुकवून शिताफीने या वस्तू मिळवीत असत. परंतु अनेकदा तत्क्षणीच किंवा काही कालानंतर ती वस्तू त्यांचेपासून हिरावून घेतली जाई. एकदा असाच एक काचेचा घट त्यांच्या हातातून हिरावून घेतला गेला असता त्यांना अचानक काय झाले त्याची कल्पना नाही परंतु स्वामींनी अचानक आपले दोन्ही हात मागे बांधले आणि दाणदाण पावले टाकीत दौडत तेथून निघून महालाच्या एका कोपर्‍यात निघून गेले गेले आणि तिथून जोरजोराने चित्कारत, आक्रोश करत आपला णिषेढ णोंडवू ... क्षमायाचना.. नोंदवू लागले. परंतु त्यांचे ते उच्चरवाने ओरडणे विसरून जात त्यांचे माता-पिता त्यांचे हात मागे बांधून धावत जाण्याचे विचित्र, विनोदी परंतु तितकेच विलोभनीय दृश्य मोठ्या कौतुकाने पहात राहिले. अशा रीतीने स्वामींच्या मातापित्यांना स्वामींच्या णिषेढ-कृत्याचे एक अनोखे स्वरूप पहावयास मिळाले. अर्थात तदनंतर हे दृश्य वारंवार पहावयास मिळू लागले हे सांगणे न लगे.

'शीघ्र-कोने-दौड' णिषेढ :

'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' हा 'हस्तपार्श्वेबंधित दौड-णिषेढा'शी बहुतांशी साधर्म्य साधतो. या णिषेढाची पार्श्वभूमी आणि दरम्यान घडणार्‍या किंवा थोडक्यात म्हणजे त्यासाठी कारणीभूत असणार्‍या विविधतम घटना या अनेकदा एकसमान असत. फक्त त्या घटनेनंतर येणारी स्वामीमहाराजांची प्रतिक्षिप्त क्रिया जरा वेगळी असे. उदाहरणादाखल म्हणून आपण उपरोल्लेखित घटनाच घेतली तर काही प्रसंगी स्वामी 'हस्तपार्श्वेबंधित दौड-णिषेढा' चा वापर करीत तर कधी 'शीघ्र-कोने-दौड णिषेढा'चा. या 'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' प्रकारचा वापर करताना स्वामी घटनास्थळावरून अकस्मात दौडत दौडत निघून जात व महालाच्या एखाद्या कोन्यात--ज्यास 'कोपरा' असेही संबोधले जाते--जाऊन थांबत आणि त्या कोन्यातून उच्चरवातील आरोळ्या चालू राहत असत. तर असा हा 'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' स्वामी कोणत्या प्रसंगी वापरत ते तपशीलात पाहू.
एके समयी स्वामींचे तात उर्ध्वपटावर कार्यरत असता स्वामी तेथे अचानक विराजमान झाले आणि वविध कळांवर आपले हस्तकौशल्य आजमावू लागले. अर्थातच तातांनी त्यांस तेथोन तत्क्षणी दूर लोटले. अर्थातच स्वामी प्रचंड क्रोधित झाले व दौडत दौडत तातांपासून दूर निघोन महालाच्या एका कोन्यात गेले. तातांकडे पाठ करून, चेहरा भिंतीच्या कोन्याच्या दिशेला ठेवून तीव्र स्वरात उद्घोषू लागले. णिषेढाचा हा प्रकार पाहून तात व माता यांच्या मुखकमलावर हास्याची कारंजी उडाली.

'मही-अधर-निद्रित' णिषेढ :

स्वामींनी अवलंबिलेल्या णिषेढांच्या विविध प्रकारांपैकी 'मही-अधर-निद्रित' हा णिषेढाचा प्रकार खरंतर फारच विलक्षण, अगम्य आणिक दुर्मिळ संबोधला पाहिजे. या प्रकाराचा त्यांनी जेव्हा सर्वप्रथम उपयोग केला त्या प्रसंगाचा तपशील जाणून घेऊन मग आपण या प्रकाराचा अधिक परिचय करून घेऊ. एके दिनी स्वामी त्यांच्या माता-पित्यांसमवेत एका भ्रमणध्वनीशीयंत्रांशी संबंधित आस्थापनाच्या केंद्रात गमते झाले. स्वामींच्या माता-पित्यांना नूतन भ्रमणध्वनीयंत्रांची आवश्यकता होती. अर्थात जुनी भ्रमणध्वनीयंत्रे कार्यरत नसण्यास बव्हंशी स्वामीच कारणीभूत होते. कारण स्वामींच्या मुखग्रंथीतून स्त्रवलेल्या द्रवाने सचैल न्हाऊन निघाल्याने जुनी भ्रमणध्वनीयंत्रे गतप्राण झाली होती. असो. तर स्वामींचे माता पिता भ्रमणध्वनीयंत्रे बघण्यात गर्क असताना स्वामींनी अचानक जमिनीच्या दिशेने बोट दाखवून त्यांना खाली ठेवण्याची मागणी केली. मातोश्रींनी लगबगीने त्यांना खाली ठेवले व एकीकडे स्वामींवर लक्ष ठेवत ठेवत त्या विविध भ्रमणध्वनीयंत्रे तपासू लागल्या. स्वामी आसपास डकवलेल्या भ्रमणध्वनीयंत्रांच्या विविधरंगी कागदी पत्रकांशी खेळत होते. अकस्मात ते ज्या कारणामुळे त्यांना पुस्तकांपासून कटाक्षाने दूर ठेवले जाते हे कसे योग्य आहे हे सिद्ध करू लागले. अर्थात नित्याच्या सवयीप्रमाणे निमिषार्धातच स्वामी त्या विविधरंगी कागद व पुस्तके यांचे तुकडे तुकडे करू लागले. मातोश्री आणि यावेळी तर पिताश्रींनी त्यांना तसे न करण्याविषयी फर्मावले व बळाचा वापर करून ती कागदपत्रे त्यांच्या हातून काढून घेतली. स्वामी एक दोन वाकडी-तिकडी पावले टाकून अचानक धरतीवर गडबडा लोळवयास लागले. मधेच पालथे होणे, चित्कारणे, पुनः उताणे होऊन अजून उच्च स्वरात ओरडणे चालू होते. अधून मधून तीव्र स्वरात रोदनही चालू होते. केंद्रातील समस्त जन विस्मयाने स्वामी आणि त्यांच्या मातापित्यांकडे पाहू लागले. शरमेने गोरेमोरे होऊन स्वामींच्या मातापित्यांनी त्यांना तेथून उचलले आणि केंद्राबाहेर चालते झाले. या धरतीवर गडबडा लोळून राग व्यक्त करण्याच्या पद्धतीचा तस्मात् 'मही-अधर-निद्रित णिषेढ' पद्धतीचा स्वामींनी तदनंतरही अनेकदा उपयोग केल्याचे असंख्य उल्लेख णिषेढोपनिषदाच्या पानापानांत आढळतात.

तर भक्तजनहो. आदिस्वामींनी त्यांच्या बालपणी योजिलेले व उपयोजिलेले णिषेढांचे विविध प्रकार ऐकताना नेहमीच असे लीन, तल्लीन, मंत्रमुग्ध झाल्याचे अनुभव येतात. थोडक्यात या 'णिषेढोपणिषडा'चे प्रत्येकाने हरदिनी पारायण करावेसे आहे. नियमित पारायण करणार्‍यास अनेक सुखद व चमत्कृतीपूर्ण अनुभव येतात. मनाविरुद्ध घडणार्‍या प्रत्येक गोष्टीचा णिषेढ अर्थात निषेध व विरोध करण्यासाठी हे णिषेढोपणिषड वाचावे. हे वाचल्याने

१. 'णिषेढा' च्या विविधतम व नाविन्यपूर्ण संकल्पना सुचू लागतात.
२. 'णिषेढां' च्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे विरोधक विस्मयचकित व दिग्मूढ होऊन जातात.
३. विरोधकांच्या विरोधाची तीव्रता कमी होते अथवा तो पूर्णतः गळून पडतो.
४. बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी 'णिषेढां'च्या भयापोटी तुमच्या कुठल्याही कल्पनांना विरोध केला जात नाही.
५. धनहीनाला धन मिळते, अपत्येच्छुकांना अपत्यप्राप्ती होते.
६. अंतःकरणातल्या सर्व इच्छांची पूर्ती होते.
७. 'णिषेढां'च्या वैविध्याच्या भयाने कोणीही विरोधक नुरल्याने हमखास यशप्राप्तीची हमी.
८. थोडक्यात सर्व आकांक्षा पूर्णत्वाला पोचल्याने चिरंतन यश लाभते.

|| इति णिषेढोपणिषडः समाप्तः ||


बोला आदिस्वामींचा विजय असो. णिषेढोपणिषडाचा विजय असो. ओम शांतिः शांतिः शांतिः ... इत्यलम

58 comments:

  1. बोला आदिस्वामींचा विजय असो!!!! :)

    आई गं!!! अरे कमाल केलीयेस रे बाबा हेरंबा!!!

    >>>उर्ध्वपट :)

    पुन्हा पुन्हा वाचावे असेच झालेय हो हे आदिपुराण!!!
    अरे एकेक वाक्य असले जमलेय ना की याँव रे याँव अगदी.... जियो बाप बेटे आणि हो मातोश्रीदेखील!!! :)

    ReplyDelete
  2. हा: हा: हा: जबरी ... आदिलीला चक्षुसमोर उभ्या राहिल्या. हे निषेधाचे प्रकार समग्र भूलोकी आढळतात. पण लेखकाने नाविन्यपूर्ण शैलीत विवेचन केले आहे. अभिनव पद्धत!!! हे उपनिषद कालप्रवाहात अखंड वाहत राहील याची स्वामी संकेतानंद ग्वाही देतात.

    ReplyDelete
  3. हेरंब दादा,एकदम झकास रे......अल्टी झालाय....अजून पण बऱ्याच गोष्टी वाढतील न या मध्ये......एक नंबर....ह!!!!

    ReplyDelete
  4. hehe..couldnt stop laughing..
    Hats off..Marathi wishayat PhD keli aahe ka tumhi?
    Ashyach bal-leela aikayla milot pudhe!

    ReplyDelete
  5. हा हा हा जबरा... स्वामींची "लोळालोळी" लीला वाचून आम्हीदेखील इथे भक्तिभावाने लोळलो. भविष्यात स्वामीजी "खळ्ल्ळ-खटाक" लीला दाखवणार तेंव्हा स्वामींचे ते तेज तुम्हाला सहन होईल असे दिसत नाही. तेंव्हा हेरंब आत्तापासून कर तप आरंभ...

    टिप: घरातील काचसामान स्वामीजींच्या हाती लागेल असेल ठेवा म्हणजे त्यांच्या लीलेचा पुढचा अध्याय हा डॉल्बी डिजिटलमध्ये श्रवण करता येईल.

    ReplyDelete
  6. बाल आदिस्वामींचे जनक व या णिषेढोपणिषडाचे रचनाकार म्हणून आपण या निरूपणात जे लेखनलालित्य प्रकट केले आहे, त्याला सीमा नाही. आम्हांस विदीत झालेल्या साक्षात्कारून असे अनुमान आम्ही काढले आहे की भविष्यात या णिषेढोपणिषडाची आम्हांला पावलोपावली नितांत आवश्यकता भासणार आहे. सबब, आतापासून याची पारायणे करावयास सुरूवात करावी, असे आमच्या मनाने योजिले आहे. आदिस्वामींच्या लीलांचे अनेक अध्याय आपण भविष्यातही आम्हां अज्ञांनासाठी प्रस्तुत करत जाल, अशी अपेक्षा आहे.

    हेरंबा, पार उलटं पालटं व्हावंसं वाटलं वाचून. धमाल! आदितेयाने मोठा झाल्यावर हे वाचावं.

    ReplyDelete
  7. सही.. स्वामींच्या या लिला वाचून आम्ही आदि-दास झालो आहोत...
    सुटलायस एकदम जबर्‍या....

    ReplyDelete
  8. हेरंबा...
    लय लय लय भारी!!!!!!!!!
    आदि रॉक्स!!!

    ReplyDelete
  9. हाहाहा आदिस्वामींच दर्शन घेतलं पाहिजे एकदा... बाळलीला भन्नाट शब्दबद्ध केल्या आहेत...

    ReplyDelete
  10. बोला आदिस्वामींचा विजय असो!!!! :)

    ReplyDelete
  11. "मी 'आदि-दास' मनःपूर्वक स्वागत करतो"
    हे असो किंव्हा
    "या 'णिषेढोपनिषदा'त आदिस्वामींच्या मनाविरुद्ध काही घटना घडल्यास--ज्या कधी घडू शकतील हे साक्षात आदि-स्वामी सोडून कोणासही उमगत नसे--"
    किंव्हा मग हे....

    संपूर्ण पोस्ट एवढी आवडली कि बस काही विचारता सोय नाही.....
    या मध्ये काय आवडलं हे लिहायाला बसलो तर पूर्ण पोस्ट मला इथेच पेस्ट कारवाई लागेल...
    खुपच सही रे....मी मागे म्हटल्याप्रमाणे आदिमहाराज म्हंटल कि तुझी पोस्ट डोळे झाकून *****

    ReplyDelete
  12. धन्य जाहलो 'आदिलीलापुराणा' वाचुन....कालाच्या अंतापर्यंत हे असच वाचल जाइल...हया महिन्यातली तुझी सगळ्यात बेश्ट पोस्ट...लगे रहो...युवराज आदित्यांचा विजय असो...!!!

    ReplyDelete
  13. Well described. I wish your son enjoyes this as much when he grows up :-) May be, your parents too enjoyed this! They might have similar stories :-) ??

    ReplyDelete
  14. बोला आदिस्वामींचा विजय असो. ;)

    ReplyDelete
  15. आदिस्वामींचा, विजय असो.
    आद्योपासक, आदिदासाचा विजय असो.

    आयला. कसलं भारी. :)

    ReplyDelete
  16. आयला, किती गोड पोर आहे रे तुझ..दृष्ट नको लागायला त्याला माझी. तुझ्या लहान मुलाच्या अश्या मुद्रा, पराक्रम बघताना डोळे आनंदाने पाणावले रे. खूप मज्जा करू दे त्याला, यू आर वेरी लकी :)
    जेव्हा तो मोठा होईल आणि हे वाचेल तर त्याची काय प्रतिक्रिया असेल तो विचार करतोय...हा हा हा

    आदिस्वामींचा त्रिवार विजय असो !!! God Bless you all

    ReplyDelete
  17. एकदम जबर्‍या....apun ki bolti band

    ReplyDelete
  18. हेहे तन्वे.. धन्स धन्स.. उर्ध्वपट देवकाकांचा शब्द आहे. अग वाक्यावाक्यात संस्कृतप्रचुर शब्द पेरताना वाट लागली होती.. पण जमलं कसंबसं ;)

    ReplyDelete
  19. धन्व्यावाद धन्यवाद स्वामी. खुद्द स्वामी संकेतानंदांनी ग्वाही दिली म्हंटल्यावर आदि-दासास चिंता कसली? आभार्स :)

    ReplyDelete
  20. स्वप्ना, खूप आभार ग.. अजून बऱ्याच गोष्टी आहेतच.. येतील पुढच्या भागांमध्ये :)

    ReplyDelete
  21. खूप धन्स प्रसाद. अरे पीएचडी कसली. ततपप उडाली होती शब्द शोधताना :) .. येतील येतील.. अजूनही बाललीला येतीलच. त्या तर चालूच राहणार ..

    ReplyDelete
  22. भक्तिभावाने लोळलो.... हा हा हा.. म्हणजे तुम्हाला णीषेढाचा एक प्रकार जमला तर ;)

    हो रे ते तेज सहन व्हावं यासाठी तपारंभ केलेला आहेच..

    डॉल्बी डिजिटलमध्ये लीलाश्रवण !!! जाम भारी आहे आयडिया.. जमवू जमवू ;)

    ReplyDelete
  23. परम आदि-भक्त आदि-दास कांचनदेवी यांसी. या णिषेढोपणिषडाची प्रत्येक भक्तास नितांत आवश्यकता आहेच. प्रत्येकाने लवकरात लवकर पारायणास सुरुवात करावी हे उत्तम.. काळानुरूप पुढील अध्याय येतीलच.

    त्याने मोठेपणी वाचलं तर त्याची प्रतिक्रिया एकदम धमाल असेल कदाचित :)

    ReplyDelete
  24. आभार्स आनंद. चला अजून एक आदि-दास पंथात सामील झाला तर ;)

    ReplyDelete
  25. आभार आभार आभार विद्याधरा.. तो तर नेहमीच रॉकत असतो. :P

    ReplyDelete
  26. धन्स धन्स भारत.. लवकरच दर्शनाचा योग येवो अशी आशा करुया :)

    ReplyDelete
  27. सचिन, आदि-स्वामींतर्फे धन्यु :)

    ReplyDelete
  28. हा हा सागर.. भरपूर धन्यु.. म्हटलं बऱ्याच दिवसात टीपी पोस्ट झाली नाही. म्हणून साहेबांच्या नावाने टाकली एक पोस्ट.. ;)

    स्वामींतर्फे फाईव्ह स्टार धन्स !!

    ReplyDelete
  29. कालाच्या अंतापर्यंत ... हा हा हा.. शक्य आहे शक्य आहे.. कारण अनेक मातांना आणि तातांना याची गरज पडत राहणार आहेच.. ;)

    वा.. या महिन्यातले सगळ्यात मोठ्ठा धन्स तुला :P

    ReplyDelete
  30. Thanks Savitata tai,

    I wish he does :)

    >> They might have similar stories :-) ??

    hehe possible.. Never gave a thought about it.. Gotta check with them ;)

    ReplyDelete
  31. विक्रम, आदि-स्वामींतर्फे धन्यु :)

    ReplyDelete
  32. आदिदास ऋयामा, खूप खूप आभार्स.. ;) (मंडळी, मी येता जाता हा जो 'आभार्स' शब्द वापरत असतो तो या ऋयाम शेठचा आहे बरं)

    ReplyDelete
  33. सुहास, अनेक आभार रे.. अरे त्याचे पराक्रम सतत चालूच असतात.. आवरता आवरता डोळ्यात पाणी येतं आणि नाकी नऊ ;)

    इतक्या सगळ्यांनी म्हटल्याने आता मीही विचार करतोय की मोठेपणी हे वाचल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल ;)

    पुन्हा एकदा खूप आभार !!

    ReplyDelete
  34. धन्स अपर्णा... आमची तर सदैवच बोलती बंद होत असते ;)

    ReplyDelete
  35. स्वमिच्या लीला वाढत जाणार सुदर

    ReplyDelete
  36. हा हा .. ते तर आहेच... आभार काका..

    ReplyDelete
  37. wallah kya bat hai !!

    ata ek puneri prashan vicharu ka ? "tu BalMohan cha ka re???" evdha marathi ani sanskrut dho-dho wahtay mhanun vicharala !! Don't mind !! hi aamachi daad denyachi puneri paddhat ahe !! :)

    ReplyDelete
  38. विक्रम, वल्लाह आणि पुणेरी .. दोन्ही एकदम? हा हा..

    अरे मी फक्त मला माहित असलेले संस्कृत शब्द एकमेकांना जोडून उगाच जडबंबाळ शब्द बनवले बाकी काही नाही. ;)

    बालमोहन नाही रे.. मी डोंबिवलीच्या स्वामी चा. डोंबिवलीची बालमोहनच म्हणालास तरी चालेल :P


    >> hi aamachi daad denyachi puneri paddhat ahe !! :)

    "ये बाबुराव का श्टाईल हय" हे वाजलं मागे डोक्यात कुठेतरी ;) (हघे)

    ReplyDelete
  39. आई ग...कित्ती गोड...!!! :)
    Btw, जसा जसा तो मोठा होत जाइल ना तसे तसे Emmotional अत्याचाराचे निषेध सुरु होतील...मग तर अजुन मज्ज्जा,,,!!!

    ReplyDelete
  40. धन्यु मैथिली.. अग तो इमोशनल अत्याचार, इमोशनल ब्लॅकमेलिंग इ इ वर तर मोठी पोस्ट होईल.. बरंय अजून त्या अत्याचाराला सामोरं जायला निदान ३-४ वर्षं तरी आहेत :)

    ReplyDelete
  41. अप्रतिम पोस्ट!

    ReplyDelete
  42. पोष्ट छान हाय :-) भेटायला हवं एकदा आदितेयला. :-)

    हेरंबतात्या,
    तुमी बरहा वापरता काय मराठी लिवायला? मग ‘र्‍या’ या अक्षरासाठी ‘r^yaa’ आसं लिवा. त्येच एक अक्षर तुमास्नी लिवायला जमत न्हाई असं दिसतंय... :-)

    ReplyDelete
  43. संकेतराव, धन्स धन्स.. :)

    नाही .. अरे मी गुगल इमे वापरतो. त्यात र्‍या काढताना व्हर्च्युअल कीबोर्ड वापरावा लागतो. पोस्ट टाकताना मी तो वापरतो पण प्रतिक्रिया टाकताना तो वापरायचा कंटाळा करतो त्यामुळे प्रतिक्रियांमधला र्‍या हा ऱ्या असा येतो :)

    ReplyDelete
  44. हे पोस्ट वाचायचं राहून गेलं होतं . मन्थ एंडच्या कामात वेळच झाला नाही. आता एक पुर्ण पोथी लिहून काढ. हा अध्याय तर अगदी पूर्ण चित्त एकग्रीत करून वाचला.. दुसरा येऊ दे..

    ReplyDelete
  45. आभार काका.. मला वाटलंच तुम्ही बिझी असाल म्हणून..

    अहो सगळे 'अध्याय' एकत्र केले कि पोथी होईलच तयार :)

    पुढच्या पराक्रमावर पुढचा अध्याय टाकतो लवकरच..

    ReplyDelete
  46. >(मंडळी, मी येता जाता हा जो 'आभार्स' शब्द वापरत असतो तो या ऋयाम शेठचा आहे बरं)

    आरे बास!!! ;)
    तो ओपन सोर्स केलाय आता...

    ReplyDelete
  47. Zakas, ajun thode divasani hya pothiche itake adhyay hotil ki ek navin harkatnay.com sarakh aaditeyay.com kiwa aadidasay.com tayar karayala lagel tula. aani bolayala lagalyawar tar bap re maja yeil.

    ReplyDelete
  48. :D वाह कमालीच्या रंगवल्यात ह्या णिषेढलीला :))

    ReplyDelete
  49. ऋयामा, मी तो आधीच इतक्या वेळा वापरला की तुला तो ओपन सोर्स करण्याशिवाय पर्यायच नव्हता.. ;) लोल.

    ReplyDelete
  50. हेमाली,

    हा हा हा आदितेयाय.कॉम किंवा आदिदासाय.कॉम !!!!!! भन्नाट !!

    आत्ताच त्याची बडबड सुरु झालेली आहे थोडी थोडी.. पूर्ण बोलायला लागल्यावर तर बहुतेक ब्लॉगवरून गायब झालेला असेन मी ;)

    ReplyDelete
  51. सौरभ, आभार रे.. अरे या णिषेढलीला सहन करता करता चेहर्‍याचा रंग उतरतो ;)

    ReplyDelete
  52. आपल्याकडे एकच स्वामी आहेत आणि आपण असे त्रस्त झाला आहात.
    आमच्याकडे जेष्ठ कन्यकारूपी भवानी माता आणि आता एक सुपुत्ररूपी श्रीमंत पेशवे आले आहेत तेव्हा आम्हा पामरांची काय अवस्था होत असेल त्याची कल्पना करा.

    ReplyDelete
  53. राजे, खरंय.. आपलं नुकतंच प्रमोशन झालंय.. मस्त मजा करा.. तुमच्या अनुभवांचं भांडार लवकरच खुलं होऊदे आमच्यासारख्यांसाठी !!

    ReplyDelete
  54. स्वामी बाबा... (आदीस्वामींचा baba) आपले बहुमोल बोल आम्ही नोंदवून घेतले आहेत... पुढे आम्हास नक्कीच उपयोग होईलच... :D

    ReplyDelete
  55. रोहनबुवा, जरूर जरूर.. आमच्या अनुभवाच्या रसामृताचा स्वाद सार्‍यांना घेता यावा यासाठीच तर ही धडपड :)

    ReplyDelete
  56. कोपरापासून नमस्कार..

    ReplyDelete
  57. कोपरापासून स्वीकार आणि उलटटपाली कोपरापासून नमस्कार.. आदि आणि आदिदास दोघांकडूनही :P

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...