Tuesday, March 1, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-४

* भाग १ इथे  वाचा
* भाग २ इथे  वाचा

* भाग ३ इथे  वाचा

हे अचानक काय चाललंय आम्हाला कळेना. तरी आम्ही त्याच्याकडे लक्ष न देता पुढे जाणार इतक्यात त्याच्या आजूबाजूच्या अजून ५-६ जणांनी अचानक आमच्या समोर उभं राहून आम्हाला जागच्या जागी उभं राहायला भाग पाडलं. आता मात्र आम्हाला नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. भीतीही वाटायला लागली.

आम्ही काही बोलणार एवढ्यात आमचा रस्ता पहिल्यांदा अडवणारा माणूस म्हणाला,

"तुम्हाला साहेबांनी बोलावलंय"

"कोण साहेब?"

"इथले फॉरेस्ट ऑफिसर साहेब"

"फॉरेस्ट ऑफिसर? आणि आम्हाला कशाला बोलावलंय?"

"तुम्ही जंगलाला आग लावलीत. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचाय. त्या आगीच्या बाबतीत तुमची चौकशी करायची आहे त्यांना. तुम्हाला नुकसानभरपाई द्यावी लागेल".. हे ऐकताक्षणी आम्ही गळपटलो. हे म्हणजे "मरे हुए को और मारना" प्रकारचं होतं. तरीही त्यातल्या त्यात काहीतरी प्रयत्न करणं भागच होतं.

"ओ गुन्हा बिन्हा काहीही काय बडबडताय? आणि आग लावली काय लावली. चुकून लागली आग. आणि नुकसानभरपाई कसली. थोडंसं गवत तर जळालंय. तेही चुकून पेटलं तर त्याची चौकशी कसली आणि नुकसानभरपाई कसली त्यात?" प्रकरण भलतंच भरकटतंयसं वाटून आमच्यातल्या दोन-तीन जणांनी पुढे होऊन आमची बाजू मांडायचा प्रयत्न केला.

"ते काय ते तुम्ही साहेबांशी बोला" त्या माणसांनी साफ हात झटकून टाकले.

काही झालं तरी त्यांच्या आणि त्यांच्या त्या सायबाच्या मनातलं खरं झाल्याशिवाय आमची काही इथून सुटका नाही हे त्यामानाने चटकन लक्षात येताच प्रकरण झटपट मिटवावं म्हणून आम्ही विचारलं "बरं, कुठे आहे तुमचा साहेब?"

"हे इथेच मागे आहे फॉरेस्ट ऑफिस" त्यांच्यातल्या एकाने लांब कुठल्यातरी एका टोकाला हात दाखवला. त्याने हात दाखवलेल्या ठिकाणी आम्हाला मोठं अंधारं माळरान सोडून बाकी काहीही दिसत नव्हतं.

"त्याच्यापेक्षा त्यांना इकडे यायला सांगा. आम्ही इथेच थांबतो ते येईपर्यंत" हा नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार आहे याची जाणीव झाल्याने आम्ही त्यातल्या त्यात शेवटचा प्रयत्न करून बघितला. पण सकाळपपासूनच्या एकूणएक प्रयत्नांप्रमाणेच या प्रयत्नालाही यश आलं नाही. पुढच्या पाच मिनिटांत आम्ही त्यांच्या मागोमाग चालायला लागलो. आमच्या पुढे, मागे आणि भोवताली प्रत्येकी चार-पाच जण आणि त्या पंधरा जणांनी आवळलेल्या अदृश्य रिंगणात आम्ही थकलेभागलेले उपाशी दहा-बारा जण अशी सगळी वरात चालली होती. त्या सगळ्यांच्या हातात मोठमोठ्या काठ्या होत्या, चेहरे चांगले रापलेले आणि म्हणूनच भीतीदायक होते. सभोवताली मोठा मोकळा माळ आणि लांबून सतत न थांबता ऐकू येणारी रातकिड्यांची किरकिर या भयानक मिश्रणात आकाशातून येणारा शीतल चंद्रप्रकाशच काय तो मोहक वाटत होता.

होता होता चालून पंधरा वीस मिनिटं होऊन गेली तरी त्यांच्या साहेबाचं 'जवळच' असलेलं ऑफिस काही येईना. आम्ही मधेमधे दोन-तीन वेळा विचारण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दोन वेळा "आहे. इथे जवळच", "आलंच" सारखी उत्तरं मिळाली. जसजसे आम्ही जास्त जास्त चालत गेलो तसतशी ती उत्तरं मिळणंही बंद झाली. एक मात्र लक्षात येत होतं ते म्हणजे आम्ही बरंच अंतर कापलं आहे आणि पुन्हा गडाच्या पायथ्याच्या दिशेने कुठेतरी चाललो आहोत. ही लोकं आम्हाला कुठे घेऊन चालली होती याचा काहीच अंदाज येत नव्हता आणि त्यांनी घातलेल्या त्या अदृश्य कुंपणाने आणि त्यांच्या हातातल्या जाड काठ्यांनी मात्र अजूनच भीती वाटत होती. शेवटी जवळपास अर्धा-पाऊण तास चालल्यावर आमची प्रतीक्षा संपली.

आम्ही एका छोट्याशा उंचवट्यावर असलेल्या एका लहान बंगलीवजा घरासमोर येऊन थांबलो. कौलारू छपराच्या त्या घराला समोरून एक दार होतं आणि त्यातून आतला मंद पिवळा प्रकाश दिसत होता. सगळाच विचित्र प्रकार वाटत होता पण त्याहीपेक्षा विचित्र वाटत होता तो त्या घराभोवती जमलेला, लाठ्याकाठ्या हातात घेतलेला, जोरजोराने आरडाओरडा करणारा २५-३० माणसांचा जमाव. ही एवढी लोकं अचानक कुठून आली, आम्ही नक्की कुठे आहोत काही कळेना. ती मगासची माणसं म्हणतात त्याप्रमाणे हे फॉरेस्ट ऑफिसरचं आहे म्हणावं तर त्या घराच्या बाहेर कुठली पाटी-बिटीही नव्हती. जरा वेळ त्या घराबाहेर उभं राहायला लावून नंतर आम्हाला आत नेण्यात आलं. आत एक खुर्ची, टेबल, त्यावर बरीच कागदपत्रं, एक छोटा टेबलफॅन वगैरे ऑफिसात असणारं किरकोळ साहित्य होतं. पण ते ऑफिसचं सामान बघूनही आम्हाला इतकं हायसं वाटलं म्हणून सांगू. आम्ही फॉरेस्ट किंवा कुठल्याही का असेना पण एका (बहुतेक सरकारी) ऑफिसात होतो एवढं मात्र नक्की. पण ते हायसं वाटणं संपायच्या आतच उगाचंच एवढ्यात हायसं वाटून घेतलं असं वाटायला लागावं असं काहीतरी झालं.

आम्ही आत प्रवेश केल्या केल्या त्यांनी आम्हाला बाजूच्या एका खोलीत जायला सांगितलं. आम्ही सगळेजण निमूटपणे आत जायला लागलो. तेवढ्यात "फक्त मुलांनीच आत जा" असं हुकुम सुटला. आता मात्र आम्हाला प्रचंड टेन्शन आलं होतं. पण तिथे त्याक्षणी प्रतिकार करणं अधिक धोकादायक होतं. नक्की काय चाललंय ते बघून किंचित थांबून मग काय घडतंय किंवा काय करता येईल याचा विचार करू असं आम्ही ठरवलं. कदाचित आम्हाला वाटतं तितकं काही गंभीर नसेलही अशी मनाची समजूत घालून घेऊन, मुलींना डोळ्यांनीच "सांभाळून राहा.. आम्ही आलोच" असं सांगून आम्ही त्या खोलीत शिरलो. मला कल्पना आहे की आमचं हे वागणं आत्ता हे वाचणार्‍यांना प्रचंड विचित्र वाटत असेल (कारण आमचं आम्हालाही तेव्हा ते खूपच विचित्र वाटलं होतं.. पण करतो काय). पण आम्ही किती असहाय होतो हे मला खरंच आत्ता शब्दांत सांगता येणार नाही. कदाचित कधीच येणार नाही. असो. आम्ही आत शिरल्या शिरल्या खोलीचं दार बाहेरून बंद झालं. कडी लावल्याचा अस्पष्ट आवाजही आला.

खोलीत अंधुक पिवळा प्रकाश होता. एका कोपर्‍यात मोठ्ठा दोर ठेवला होता. त्याच्या बाजूला जाड बांबू, काठ्या, सळया,  सुतळी असं बरंच काही ठेवलं होतं. ते सामान बघून आम्हाला चांगलीच धडकी भरली. एकीकडे बाहेर काय होतंय या कल्पनेने आमचे जीव टांगणीला लागले होते. कानात प्राण आणून आम्ही बाहेर काय घडतंय याचा कानोसा घ्यायचा प्रयत्न करत होतो पण काहीच ऐकू येत नव्हतं, काहीच कळत नव्हतं, काहीच सुचत नव्हतं.... आम्ही जवळपास दहा-पंधरा मिनिटं अशीच असहायपणे काढली.

आणि अचानक बाहेरून दाराची कडी उघडल्याचा आवाज आला ....... !!!!

क्रमशः

- भाग ५ इथे  वाचा.

42 comments:

 1. झायीर णिशेद देवानु :)
  का पिडतासा आमास्नी ?

  ReplyDelete
 2. च्यामारी टोपी तुझी... धर्माधिकारी बंधूनीं झपाटलं रे तुला.

  दिमाग अजुन खराब. हे असं टांगवण्यापेक्षा हा आणि पुढचा असे दोन्ही भाग एकदम टाकले असतेस तर परवडलं असतं. आत्ता त्या काठ्या घेऊन उद्यापर्यंत दांडिया खेळत बसावं लागणार.

  >> "आणि अचानक बाहेरून दाराची कडी उघडल्याचा आवाज आला ....... !!!!"

  नशीब हे तीनदा नाही लिहिलंस.

  ReplyDelete
 3. बाप रे जाम टरकली असणार तेव्हा तुम्हा सगळ्यांची.. एकदम बाका प्रसंग..
  उद्या पुढचा भाग येऊ देत. कितीही निषेध केला तरी वाचायाचा आहे, सो येऊ देत लवकर लवकर.. :)

  ReplyDelete
 4. बापरे अवघड आहे... लवकर टाक बरं पुढचा भाग..

  ReplyDelete
 5. खरंच काल लावलेल्या आगीचा धूर पार फॉरेस्ट ऑफीसरपर्यंत जाईल असेल वाटले नव्हते.

  ReplyDelete
 6. नका तानू.......
  का उगा जीव टांगनीला लावतायसा.........
  येकडाव क्काय त्ये सांगून सोडा.....पी..ली...ज!!!

  ReplyDelete
 7. सिद्धार्थ ++.

  आधी पुढचे काय असतील ते सगळे भाग पटापट एकदमच टाक बघू. कधी आणि कसं वाचायचं ते आम्ही ठरवतो मग :)

  ReplyDelete
 8. छान भट्टी जमली आहे -

  लवकर लवकर येउंद्यात. :)

  ता.क. - मोठ्ठे मोठ्ठे भाग लिहिले तरी चालतील. :)

  ReplyDelete
 9. वाचूनच टरकली. तुमचं काय झालं असेल?!

  ReplyDelete
 10. सिद्धार्थ आणि गौरी ++ :)

  कोण म्हणालं रे तूला मोठ्या पोस्ट वाचायला लोक कंटाळतात, अरे बाबा असे असते तर रात्री जागून जागून डोळे ताणतही पुस्तकांचा फडशा पाडला असता का कोणी कधी... पोस्ट पोस्ट पे लिखा होता है कंटाळे का नाम, आणि त्यात तूझ्या पोस्ट येत नाहीत रे बाबा...

  जाता जाता...

  >>>>>आत्ता त्या काठ्या घेऊन उद्यापर्यंत दांडिया खेळत बसावं लागणार. ...:)

  त्यापेक्षा त्या काठीने क्रमश: ला फटका मारावा वाटतोय मला :)...लिही पटापट...

  ReplyDelete
 11. नमस्कार!
  रोज तुझ्या पोस्ट्स वाचतेय मी.. पण कमेंट पहिल्यांदाच टाकतेय.. ते फक्त हे सांगण्यासाठी की लवकर लवकर येउदे पुढच्या पोस्ट्स!!!!! बास झाले तुझे क्रमश:! :)

  ReplyDelete
 12. हेरंब!!!!!!!!!!!!
  :( :( :(

  ReplyDelete
 13. बट बट सत्यवान... व्हाय आर यू डुईंग धीस???
  अरे समाप्त असं दिसल्याखेरीज मी भाग १ ला सुरूवात करणार नाही असा केलेला निश्चय आज मोडला अन शॉट लागला लवकर पुढे लिही रे बाबा :(

  ReplyDelete
 14. प्रिय हेरंब,

  हा treak कधी केलास.. मला माहित नव्हते. आणि मी कुठे होतो तेव्हा?
  मा वी सं चा treak होता का?
  आता पर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे आता तुला थांबता येणार नाही लवकर पुढे काय झाले ते सांग!

  तुझा
  अमेय

  ReplyDelete
 15. प्रॉफेटांच्या कमेंटला मी लाईकते आहे... :)

  बट बट सत्यवान... व्हाय आर यू डुईंग धीस??? :)

  ReplyDelete
 16. :D हेहे!! विद्याधर!! 'बट बट सत्यवान... व्हाय आर यू डुईंग धीस???'
  बरं सुचतं ह्याला हे असलं काही पटापट! :)

  ReplyDelete
 17. देवानु, आता थोडीच राहिली पिडापीडी.. :)

  ReplyDelete
 18. धर्माधिकारी नाही रे डॅन ब्राउनने. नुकतीच त्याची दोन पुस्तकं वाचली. कुठे थांबायचं ते बरोब्बर कळतं त्या माणसाला. तेच मी इथे पोस्टांमधे केलं :)

  >> नशीब हे तीनदा नाही लिहिलंस.

  हे वाक्य लक्षात ठेव.. शेवटच्या भागात कळेल याचा अर्थ.. शेवटच्या भागाच्या शेवटी :D

  ReplyDelete
 19. सुहास, खरंच जामच बाका प्रसंग आला होता. बेक्कार वाट लागली होती.

  उद्या नक्की येतोय पुढचा भाग.. रोज एक भाग येणार ये अपना वादा हय ;)

  ReplyDelete
 20. हो आनंदा. पार वाट लागली होती. उद्या येतोय पुढचा भाग.

  ReplyDelete
 21. सिद्धार्थ, अगदी अगदी. ते त्या फॉरेस्ट ऑफिसरला कसं कळलं हे आम्हाला कळलंच नाही. पहिला कागद पेताल्यापासून कदाचित त्याच्याकडे आगीची वर्दी गेली असावी. एकंदरीत आम्ही बराच वेळ असणार त्या टेकडीवर.

  ReplyDelete
 22. रोहितभाऊ, जास्त येळ नाही र्‍हानार जीव टांगनीला.. होतच आलं आता.

  ReplyDelete
 23. गौरी :)

  हे पटापटच सगळ्यात अवघड आहे. पण रोज एक भाग येणार ये प्रॉमिस हय..

  ReplyDelete
 24. धन्स अर्जुन.. उद्याच्या चाह/कॉफीच्या पहिल्या कपाबरोबर पहिला भाग येतोय.

  अरे प्रत्येक संकटासाठी एक भाग आहे. दोन संकटांना एकाच भागात कोंबून उगाच संकटांवर अन्याय नको. (आमच्यावर झाला तेवढा पुरे ;) )

  ReplyDelete
 25. कांचन, आमचा पुनर्जन्म झाला एवढंच म्हणेन.

  ReplyDelete
 26. अग पुस्तकं वाचताना जागणं ठीके कारण ते झोपून, लोळून वगैरे कसंही वाचता येतं. हे स्क्रीनसमोर बसून मोठमोठ्या पोस्टा वाचायच्या म्हणजे कंटाळा येतो जाम (मलाही..) .. म्हणून एकेक करत लिहितोय.

  >> त्या काठीने क्रमश: ला फटका मारावा वाटतोय मला

  ओह क्रमशःला फटका ना? मग ठीक आहे ;)

  ReplyDelete
 27. प्रतिक्रियेबद्दल धन्स, केतकी.

  पुढचा भाग येतोय उद्या सकाळच्या चहा/कॉफीला (भारतात असशील तर) .. च्यामारिकेत असशील तर झोपायच्या आत नक्की. इतर कुठे असशील तर.. तूच तुझ्या टाईमझोनप्रमाणे ठरव :)

  अजून एक.. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 28. अनघा, हीच अवस्था होती आमची त्यावेळी.

  ReplyDelete
 29. हाहाहा बाबा.. एकदम 'सत्यवान पासष्टी' लिहिलीस भिंतीवर बसून ;)

  अरे एवढं मोठं प्रकरण आहे की भागात लिहिण्याशिवाय गत्यंतर नाही.. त्यामुळे रोज एकेक प्रकरण टाकतोय. पुढचा भाग उद्या नक्की.

  ReplyDelete
 30. प्रिय अमेय,

  अरे हो माविसंचाच ट्रेक होता. तुला मेल करतो डीटेलमधे. आठवेल तुला.. तू का नव्हतास आठवत नाहीये मलाही.

  पुढचा भाग टाकतो उद्या.

  तुझा,
  -हेरंब

  ReplyDelete
 31. हाहा तन्वी.. मीही..

  ReplyDelete
 32. सत्यवान करतो वटवट
  बाबा म्हणतो बटबट
  अनघा आली पटपट

  (त्रिवेणी) ;)

  ReplyDelete
 33. मला हे माहितच व्हतं की आज पन हा वटवट्या जीव टांगणीला लावनार.. पण इतकं कायतरी इपरित घडलेलं असल असं वाटत न्ह्वतं... :(:(:(

  आता तू एकच मोठ्ठठ्ठठठठीईईईई पोस्ट टाक रे बाबा. किती जीव ताटकळवयाचा... कधी नव्हे ते माझा जोरदार णिशेध आहे. :D

  हेरंब, खरेच काय टरफाटली असेल रे तुमची! :(

  ReplyDelete
 34. श्रीताई, सुरुवातीपासून ते शेवटच्या समाप्तपर्यंत सगळं विपरीतच घडलं होतं. पूर्ण वाट लागली होती. मोठा धडा मिळाला. डोळे उघडणारा अनुभव !

  अग एवढं भोगलं त्याला न्याय देण्यासाठी एका पोस्टीत एकच संकट कव्हर करतोय :)

  ReplyDelete
 35. हाय रे हेरंब...
  आज सुट्टी महाशिव रात्रीची...काल सगळे ब्लॉग वाचले तुझे...आता सकाळी सकाळी उठलो वाटलं कि शेवटचा भाग टाकला असशील... पण काय राव अजून वाट पहावी लागेल वाटत....असो...जरा लवकर टाकला तर उपकार होतील हो सगळ्यांवर....अतिशय जबरदस्त लिहिलंय....जियो...!!!

  ReplyDelete
 36. हाय परिचित. आत्ताच पुढचा भाग टाकलाय बघ. आता अजून एकच क्रमशः फक्त :)

  ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 37. सलग भाग वाचायला कसली मजा येते आहे...दुःखामागुन सुखाची सावली येते...हे म्हणतात ते खर आहे...कारण तु बझ वर पोस्ट टाकतो म्हणुन मी तिकडे फ़िरकलो पण नाही.

  यामागे माझे किती कष्ट आहेत हे कळेल का तुला??

  आता माझ्या हाफ़िसात आमच ISO certification साठीच ऑडीट चालु आहे. ऑडीटर पलीकडच्या केबिन मध्ये बसलाय अन मी इथे अगदी छोट्या खिडकीत पोस्ट ओपन करुन वाचतो आहे.

  ReplyDelete
 38. अक्षरशः खरं आहे रे.. सुखदुःखाची पकडापकडी चालली होती अगदी.

  >> यामागे माझे किती कष्ट आहेत हे कळेल का तुला??

  कळलं कळलं योगेश राव :)

  अरे शेवटचे भाग मीही असेच कसे बसे लिहिले आहेत वेळ काढून, विंडो लहान करून :)

  ReplyDelete
 39. पुढचा भाग वाचतो...

  ReplyDelete
 40. रोहणा, वाका वाका ... आपलं सॉरी वाचा वाचा ;)

  ReplyDelete
 41. एखाद्या मालिकेसारखं चालू आहे हे. प्रत्येक भागात प्रेक्षकांची उत्कंठा वाढेल असं काहीतरी होतं आणि ते काय असतं हे कळण्याआधीच भाग संपतो... :-(

  ReplyDelete
 42. खरंय संकेत.. त्या दिवशी आम्ही तोंड दिलेल्या प्रत्येक संकटाला योग्य न्याय मिळावा म्हणून एका भागात एकच संकट कव्हर करतोय. :)

  ReplyDelete

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...