Wednesday, March 2, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-७ -- अंतिम

* हा सातवा अर्थात अंतिम भाग वाचण्यापूर्वी सहावा  भाग वाचला आहेत याची खात्री करून घ्या. पाचव्या भागानंतर सहावा आणि सातवा दोन्ही लागोपाठ टाकलेत म्हणून सांगतोय.

भाग १ इथे  वाचा
भाग २ इथे  वाचा
भाग ३ इथे  वाचा
भाग ४ इथे  वाचा
भाग ५ इथे  वाचा
भाग ६ इथे  वाचा

त्या खिडकीच्या बाहेर 'नेरळ जंक्शन' असा ठसठशीत मोठ्या अक्षरात लिहिलेला रेल्वेचा बोर्ड दिसत होता आणि बाजूलाच नेरळ स्टेशनचे ऐसपैस लांब प्लॅटफॉर्म पसरले होते. आमच्या खिडकीपासून ते स्टेशन जेमतेम चार-पाचशे मीटर (होहो.. म्हणजे आम्ही जाळलेल्या (!!!) दुर्मिळ (!!!) गवताच्या सो कॉल्ड क्षेत्रफळाच्या जेमतेम चार-पाचपट) अंतरावर होतं. म्हणजे आम्ही आमची सुटका करायला येणार्‍या ट्रेनरूपी वैकुंठ विमानापासून जेमतेम अर्ध्या किलोमीटर अंतरावर होतो. त्या कल्पनेनेही इतकं हायसं वाटलं म्हणून सांगू !! अजून पंधरा मिनिटांत आम्ही ट्रेनमध्ये असणार होतो अर्थात हा जंगल्या आमची ट्रेन चुकू देणार नाही हे गृहीतक सत्य मानलं तर..

"हे बघा. इकडून आपल्याला इथे येणारी प्रत्येक गाडी आधीच दिसते. त्यामुळे तुमची ट्रेन चुकणार नाही हे नक्की."

खरं तर त्याच्या त्या वाक्याचा, त्या खिडकीचा आणि आमची ट्रेन मिळण्या-न मिळण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. पण कदाचित तो ते फॉर्म येईपर्यंत असाच काहीतरी वेळ काढत असावा. आणि अर्थातच एवढ्या जवळ स्टेशन बघून आमच्या मनाला एक उभारी मिळाली होती हे मात्र नक्की.

पुढच्या दहा मिनिटांनी दोन गोष्टी झाल्या.. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा तो माणूस फॉर्म घेऊन आला. तो आल्या आल्या लगेच ते फॉर्म त्याच्याकडून अक्षरशः हिसकावून घेऊन भरून टाकावेत आणि इथून सुटावं असा विचार मनात आला होता. पण त्या माणसाने आपल्या साहेबाच्या स्टायलीतच हळूहळू एकेक करत ते फॉर्म्स त्याच्या सायबाला दिले. साहेब एकेक फॉर्म काळजीपूर्वक भरायला लागला.

एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आपण जे काम हातात घेतो ते तडीला जातं, हात लावू त्या गोष्टीचं सोनं होतं, प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. पण काही दिवस असेही असतात की त्या दिवशी प्रत्येक गोष्टीचा विचका होतो, हात लावू त्या कामाची माती होते.. आमचा हा दिवस त्यातलाच होता.

दुसरी गोष्ट अशी झाली की त्या हरकाम्याच्या मागोमाग आम्हाला ट्रेनचा मोठा हॉर्न ऐकू आला आणि त्यामागोमाग ट्रेनच्या हेडलाईटने ती खिडकी उजळून निघाली. आल्यानंतर अक्षरशः दोन मिनिटांत ट्रेनने स्टेशन सोडलं आणि त्याबरोबरच आजच्या दिवसात घरी जाऊन, मस्त गरम पाण्याने शेकत शेकत आंघोळी करून, आईच्या हातचं गरम गरम जेवून, पांघरुणात गुडुप्प होऊन, दुसर्‍या दिवशी दुपारी बाराशिवाय न उठण्याच्या आमच्या साध्या-सोप्या स्वप्नाची राखरांगोळी झाली.

"हं.. इथे करा सह्या" असं म्हणून त्याने पॅडला लावलेले फॉर्म्स आणि पेन आमच्या दिशेने सरकवलं. एका पेनाने किंवा पॅडला असलेल्या त्या स्प्रिंगने एखाद्या माणसाला जास्तीत जास्त किती जखमी करता येऊ शकतं असे आसुरी विचार मनात डोकावून गेले. आणि त्यासाठी कुठलीही शिक्षा भोगण्याची आमची तयारी होती. निदान न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्यापेक्षा ते शतपटीने चांगलं होतं. अर्थात आम्ही काही न बोलता अर्धवट बघत/वाचत त्या फॉर्म्सवर सह्या केल्या आणि काही न बोलता तिथून उठून बाहेर पडायला लागलो.

"तुमचं नशीब म्हणून आज तुम्हाला सोडतोय. पण पुढच्या वेळी सांभाळून राहा. दरवेळी माझ्यासारखा चांगला माणूस तुम्हाला भेटेलच असं नाही" असा शेरा आमच्या पाठीवर पडला. आता मात्र काय व्हायचं ते होवो. पुढच्या ट्रेनला म्हणजे पहाटेच्या पहिल्या ट्रेनला निदान ४-५ तास तरी होतेच. तोवर याची चांगली कणिक तिंबायचीच. आपलं काय व्हायचं ते होवो. असे अविचार मनात मुळ धरायला लागले. पण पुन्हा एकदा संयम राखून आम्ही तिथून बाहेर पडलो. काही क्षणांपूर्वी फक्त अर्धा किलोमीटर वाटणारं ते अंतर आता पा-च-शे मीटर वाटायला लागलं होतं. कोणाच्याही अंगात आता काडीचाही उत्साह राहिला नव्हता. कसेबसे धडपडत, पाय खेचत आम्ही स्टेशनपर्यंत पोचलो. किती वेळ लागला, किती वाजलेत कशाकशाची आम्हाला पर्वा नव्हती.

तेवढ्यात स्टेशनच्या जवळच 'पीसीओ' असं लिहिलेला एक मोठ्ठा बोर्ड दिसला आणि अचानक आम्हाला किती उशिरा झालाय, घरचे कसे आपली वाट बघत असतील, काळजीने बेजार झाले असतील वगैरे वस्तुस्थितीचा साक्षात्कार झाला. सगळ्यांनी फोन करायला जाण्यापेक्षा कोणीतरी एकानेच घरी फोन करायचा आणि त्यांच्याकडे सगळ्यांचे नंबर्स देऊन त्यांना पुढे सगळ्यांच्या घरी फोन करायला सांगायचे असा एक अतिशय विचित्र निर्णय आम्ही घेतला. आधीच्या प्रत्येक चुकीच्या (बरोबर निर्णय जवळपास नगण्य होते) निर्णयाप्रमाणेच हाही निर्णय आम्ही का घेतला याचं कुठलंही स्पष्टीकरण माझ्याकडे नाही.. कदाचित हा निर्णय पूर्णतः चुकीचा नसेलही पण माझ्यापुरता तरी तो पूर्णतः चुकला. कारण आमच्या घरी तेव्हा फोन नव्हता आणि मी आमच्या शेजारच्यांचा नंबर दिला होता. त्यांचा फोन लागला नाही किंवा त्यांना मेसेज मिळाला नाही आणि त्यामुळे आमच्या घरीही मला यायला उशीर होतोय वगैरे काहीही निरोप मिळाला नाही. (अर्थात हे सगळं मला नंतर कळलं)

स्टेशनमध्ये शिरल्याशिरल्या आम्ही प्लॅटफॉर्मवर असलेल्या टाईमटेबलमध्ये पुढची गाडी बघितली. चुकली ती खरोखर शेवटची गाडी होती की अजून एखादी गाडी नंतर आहे अशी वेडी आशाही त्यात होतीच. पण रेल्वेला आमच्या शहाण्या/वेड्या आशेशी काही घेण-देणं नव्हतं. चुकली ती ट्रेन शेवटचीच होती आणि पुढची ट्रेन पहाटे सव्वाचारला होती. थोडक्यात आम्हाला कमीतकमी चार तास तरी या थंडीत कुडकुडत काढायचे होते. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरच्या दिसेल त्या जागेवर आम्ही बसलो आणि सॅक उशाशी घेऊन पसरलो. जरा वेळ झोप लागलीही पण भरपूर डास आणि प्रचंड थंडी यामुळे खूप त्रास होत होता. अखेरीस झोपण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आल्यावर आम्ही तसेच आडवे पडून, बसून गप्पा आणि डास मारत वेळ काढायला लागलो. डोंबिवली स्टेशनवर असणार्‍या रात्रभर चालणाया चहाच्या टपरीसारखी टपरी इतर कुठेही नसते या इतर वेळी अभिमानाने मिरवण्याच्या गोष्टीचं निदान त्यावेळी तरी आम्हाला चांगलंच दुःख झालं.

काही किलो गप्पा आणि अंदाजे सहा डझन डास मारायला चार तास लागत असावेत. कारण तेवढं होईस्तोवर आम्हाला ट्रेनचा प्रखर हेडलाईट आणि त्याच्या मागोमाग आमचा त्याक्षणीचा सगळ्यात आवडता आवाज म्हणजे ट्रेनचा भोंगा ऐकू आला. गाडी थांबताक्षणी आम्ही आत शिरलो आणि मिळेल त्या ठिकाणी लवंडलो. थंडगार वार्‍यात तासभर चांगली गाढ झोप लागली. तासाभराने 'डोंबिवली' असा बोर्ड दिसल्यावर आमचा क्षणभर विश्वासच बसेना. पण ते खरं होतं.

उतरल्यावर पटापटा फायनल टाटा-बाय करून आम्ही सगळे दोन ग्रुपमध्ये स्टेशनच्या दोन दिशांना पांगलो. चालत जात जात स्टेशनच्या एका टोकाला आल्यावर बाहेर पडणार एवढ्यात समोर उभ्या असलेल्या एका माणसाने आम्हाला अडवलं. तो कोण आहे वगैरे क्षणभर आम्हाला कळलंही नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा अशक्य संताप झाला........................

आता यापुढे मी जे लिहिणार आहे ते म्हणजे निव्वळ फेकाफेकी किंवा शेवटचा प्रसंग उगाच अजून चढवून चढवून सांगण्यासाठी केलेली योजना वाटण्याची दाट शक्यता आहे. कदाचित तुमच्या जागी मी असतो तर मलाही असंच काहीसं वाटलं असतं. म्हणून मुद्दाम स्पष्टीकरण देऊन सांगतोय की जे घडलं ते अगदी असंच घडलं होतं................

सोमवारचे पहाटेचे साडेपाच वाजलेले आणि हा काळा डगला घातलेला माणूस त्या निर्मनुष्य प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला उभा राहून आमच्याकडे तिकीट मागत होता. त्याच्या तोंडावर तिकीट मारून तिथून ताबडतोब बाहेर पडावं म्हणून आम्ही खिशात हात घातला आणि चर्र झालं, बॅगा तपासल्या आणि ठार मेलो. काल पहाटे (म्हणजे बरोबर चोवीस तासांपूर्वी) ज्याने आमची सगळ्यांची तिकिटं काढली होती ती तिकिटं त्याच्याकडेच राहिली होती. पूर्ण वेळ एकत्र असल्याने ती तिकिटं मागून घेण्याचं आमच्या कोणाच्या डोक्यातही आलं नव्हतं की त्याची तशी गरजही वाटली नव्हती. पण आता या बाप्याला हे समजावणार कसं?? तिकीट नाही आणि दंड भरायला पैसेही नाहीत.. थोडक्यात नेरळचा टाळलेला तुरुंग डोंबिवलीत येऊनही आमची पाठ सोडणार नव्हता. गेल्या चोवीस तासात आमच्या मानसिकतेत कसला बदल झाला होता !! पूर्वी तुरुंग हा विचारही मनात न
आणू शकणारे आम्ही तोच शब्द किती सहजपणे उच्चारू शकत होतो..

पण नाही. अचानक आमच्यातल्या एकानेच उरलंसुरलं प्रसंगावधान आयत्या वेळी वापरलं आणि त्या टीसीला समजावलं. त्याला सगळी कहाणी इत्यंभूत कथन केली. अर्थात इत्यंभूत म्हणजे आग लागली, दंड भरला वगैरे प्रकार वगळून.. उतरताना रस्ता चुकलो, शेवटची गाडी चुकली त्यामुळे रात्रभर स्टेशनवर बसून राहायला लागलं, आमची तिकिटं मित्रांकडेच राहिली आणि ते आत्ताच दुसर्‍या बाजूने बाहेर पडले वगैरे सगळं त्याला समजावून सांगितलं. आमची एकंदर अवस्था बघून त्याचाही आमच्यावर विश्वास बसला असावा.त्याने काही न बोलता हसून आम्हाला सोडून दिलं. गेल्या चोवीस तासात आमच्याबरोबर घडलेली ही एकमेव चांगली घटना आणि त्यामुळेच इतकी छोटी असूनही (अर्थात सहीसलामत सुटल्याने आता ती आम्हाला छोटीशी वाटत होती.) आम्ही डोंबिवलीतल्या जगप्रसिद्ध २४x७ टपरीवर चहा पिऊन ती सेलिब्रेटही केली.

घरी पोचल्यावर दार उघडता उघडताच आईचा काळजीने काळवंडलेला चेहरा, रात्रभर जागरण केल्याने तारवटलेले डोळे आणि "अरे काय हे? होतास कुठे तू रात्रभर??" ने झालेलं स्वागत पाहताच मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. पण दुसर्‍याच क्षणी लक्षात आलं की निरोप पोचलेला नसावा !! त्यामुळे शूज काढता काढताच दिवसभर घडलेले वेगवेगळे किस्से आणि ओढवलेले प्रसंग यांचं साग्रसंगीत (पण अर्थातच तीव्रता कमी करून) कथाकथन करून आणि फोन करून निरोप द्यायला सांगितलं होतं हेही अगदी हायलाईट करून सांगून झालं. गरमागरम खाऊन, पिऊन गादीवर अंग टाकताना अजूनही हे खरं घडतंय यावर विश्वास बसत नव्हता. काल याच गादीवरून उठताना परत झोपायला जाईपर्यंत थेट चोवीस तास उलटून जातील आणि त्या चोवीस तासांत "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" किंवा "जान बची लाखो पाए" असल्या वाक्प्रचारांचे अर्थ एवढे जवळून आणि ठसठशीतपणे समजण्याइतके अनुभव गाठीशी बांधले जातील याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर आजूबाजूला झाडं, जंगल, दगड-धोंडे (आणि फॉरेस्ट ऑफिस आणि तुरुंगही) नसून आपली नेहमीची गादी, उशी, पांघरूण आहे हे पाहून प्रचंड हायसं वाटलं. बहुतेक स्वप्नातही मी पुन्हा एकदा प.. प.. पेब उतरून आलो होतो.. !!! संध्याकाळी सगळ्यांशी बोलताना जवळपास प्रत्येकाच्या घरी असंच स्वागत झालं असल्याचं कळलं. पण एवढं सगळं होऊनही एक गोष्ट मात्र चांगली झाली ती म्हणजे कोणाच्याही घरून ट्रेक्सना बंदी आली नाही, ट्रेक्स चालूच राहिले. मात्र त्या दिवसानंतर आम्ही कोणीही कधीच त्या दिवसाविषयी, त्या पेब ट्रेकविषयी एकमेकांशी आणि कोणाशीच कधीच विशेष बोललो नाही.

त्यानंतर अनेक ट्रेक केले.. पेबच कमीत कमी ४-५ वेळा केला. अनेक ट्रेक्सना चुकलो, पडलो, घसरलो, धडपडलो, उपाशी राहिलो, पाण्यासाठी वणवण केली, वैतागलो, चिडलो, संतापलो, डिप्रेस झालो. पण दर वेळी ८ फेब्रुवारीचा पेब ट्रेक आठवला की अचानक सगळं सुसह्य वाटायला लागायचं. त्या दिवसाच्या मानाने आजचा दिवस एवढा वाईट नक्कीच नाही असं जाणवायचं, वाट आपोआप सापडायची, आपोआपच धीर यायचा, सगळं सहज शक्य वाटायला लागायचं..... हा त्या पेब ट्रेकमधून मिळालेला पॉझिटिव्ह धडा !!!

या ट्रेकनंतर मी ट्रेकशी संबंधित तीन गोष्टी कधीही केल्या नाहीत

१. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.

२. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.

३. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही. !!!!!

- (एकदाचं) समाप्त

70 comments:

 1. मायला... खरंच भारी रे.. आयुष्यातले सगळे धडे टिपिकल इंजिनियरिंग स्टुडेंटप्रमाणे एकाच दिवसात घोकलेस! :P
  जबरा झाले साती भाग... शेवटचा आजच टाकल्याबद्दल इशेष आभार! :)
  बा द वे... ते शेवटचं वाचून मला हे आठवलं..
  प्लॅन ए - टू लिव्ह ऍन्ड डाय इन लिबिया
  प्लॅन बी - टू लिव्ह ऍन्ड डाय इन लिबिया
  ऍन्ड प्लॅन सी - टू लिव्ह ऍन्ड डाय इज्न लिबिया
  -सैफ-अल-इस्लाम गद्दाफी! :D

  ReplyDelete
 2. हुश्श! आम्हांला वाचताना इतका त्रास झाला तर तुम्हाला हे कधी संपतंय असं किती झालं असेल!! :)
  सगळं वर्णन अगदी अगदी रसभरीत, उत्कंठावर्धक, भीतीदायक...आणि कायकाय असतात विशेषणं?! जी असतील ती सगळी!! :)

  ReplyDelete
 3. हुश्श्श ....

  एकदम जबरदस्त अनुभव घेतला रे तुम्ही ट्रेकिंगचा.

  ReplyDelete
 4. ( विभी,अनाघाताय )+++++++++
  आपण एक चित्रपट काढूया या घटनेवर. संवाद वगैरे तूच लिहायचे... सुपरहिट होईल.
  देव करो आणि माझ्या शत्रुनांसुद्धा असल्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू नये.
  बरेच धडे घेतले रे तुझ्या या अनुभवापासून ..

  ReplyDelete
 5. हा हा हा हा
  लई भारी

  अन शेवटचा भाग टाकल्याबद्दल विशेष आभार

  ReplyDelete
 6. this is unbelievable... seriously.. you should have gone back and kick his a** off...

  ReplyDelete
 7. @हेरंब , खूप थरारक , रहस्यमय व अतर्क्य अशा सगळ्या घटना यात बाप्पाने अगदी ठासून भरून तुमची endurance परीक्षा घेऊन तुम्हाला भावी आयुष्यात सर्व परिस्थितींना सामोरे जायला तयार करून सोडलेले दिसतेय, एक क्रॅश कोर्स घेऊन !!
  खूप सुंदर लिहिलेयस सगळे भाग. रामसे बंधूंच्या पेक्षा जास्त सुंदर !!

  ReplyDelete
 8. हेरंबा..काय बोलू...एकदम झकास...खरच फार टेन्शन आलं होतं वाचतांना...पण हे खर आहे कि असं काही घडल्यावर आपला जीवनाप्रती दृष्टीकोन बदलून जातो... जियो यार..!!!!

  ReplyDelete
 9. कसला जबरी हिसका दावलाय तुम्हास्नी ’ पेब च्या दरवडेखोरांनी ’. पण तो डोबिंवलीचा टिसी छान छान, :) पण पुढे कधीतरी तुम्ही पुन्हा जाऊन ’ त्या ...ला ’ जरा पाहून घ्यायचे ना. :D

  जय हो! ट्रेकायनम:!

  ReplyDelete
 10. || इति श्री हेरंब संकटोध्याय समाप्त ||

  जो कुणी वटवट वाचक हे सात अध्याय पूर्ण मनोभावे वाचेल त्याचे सगळे ट्रेक सुरळीत पार पडतील. त्याची कधी कड्याकपारीतदेखील वाट चुकणार नाही. त्याचे सगळे ट्रेक फॉरेस्ट ऑफीसपासून दूर हिरव्यागार गवतात, आजूबाजूला सदैव खळखळ वाहणार्‍या पाण्याच्या सान्निध्यात होतील. केवळ मोबाईल जीपीएस् नव्हे तर त्याला निबीड अरण्यात देखील WLANची रेंज मिळेल.

  ReplyDelete
 11. सर्वप्रथम आभार शेवटचा भाग टाकल्याबद्दल...
  खरचं भारी रे...जबरदस्त अनुभव रे......

  ReplyDelete
 12. हुश्श...

  अरे महाशिवरात्रीचा उपास रे आज... आता लॅपटॉपला हात लावायचीही ईच्छा नव्हती.... अशक्तपणा आलेला (मानसिक );).. पण म्हटलं छ्याट हे काही संकट नाही... पेबवाले घरी पोहोचले की नाही ते पहावे आधि....

  पोहोचलात रे बाबा एकदाचे!!

  आमची सुटका क्रमश:च्या तावडीतून :)

  शेवटच्या पोस्टला निषेधेन म्हटलं होतं ना... तर जाहिर मोठ्ठा निषेध यासाठी की कधीचा ब्लॉग लिहितो आहेस ’पेब’ ईतक्या उशिरा का लिहिलास???? :)

  सही आहे सगळं प्रकरणं :)

  ReplyDelete
 13. Hello heramb, me Tumche sarva lekh vachale aahet. Chan lihita tumhi. Hi majhi pahili vel aahe comment dyayachi. Keep up the good work. Thanks.

  ReplyDelete
 14. फायनली संपले बाबा एकदाचे !!! आम्हाला क्रमश: बघायचा कंटाळा आला होता. नशीब आपल्यापेक्षा एक तंगडी वरच असते.

  ReplyDelete
 15. मस्तच..काय बोलू अजुन. तुझ्या घडलेला तो अनुभव वाचून सगळ सगळ डोळ्यासमोर उभ राहील बघ...अप्रतिम. खुप मज्जा आली. मला माहितेय सगळे आग्रह करत होते म्हणून जागून, ऑफीसचा काम सांभाळून तु रेकॉर्डवेळात पोस्ट पूर्ण केलीस. थॅंक्स रे.

  खुप थकलोय, भूक लागलीय. आता मला एक खादाडीची पोस्ट हवीय ;)

  ReplyDelete
 16. भा...री!!!!!
  आणि धन्यवाद पटकन २ पोस्ट्स टाकल्याबद्दल!
  अजून एक दिवस टांगणीला लागला असता नाहीतर जीव!

  खूप छान लिहिलेस सुद्धा!

  ReplyDelete
 17. खरा सांगू का - नशीबवान आहेस हेरम्बदादा!

  साला - पुढच्या पिढीला गोष्टी सांगायला कसली खतरनाक गोष्ट जगलीस तू. :)

  सुरेख शब्द निवड.

  असेच ट्रेक्स तुला घडो आणि आम्हाला अजून अजून वाचायला मिळो ही सदिच्छा(??)!! :-P

  ReplyDelete
 18. हुश्श.... पोचलात सगळे सुखरूप यातच सगळं आलं.
  >> ‘बाबा’ची भिंत - आयुष्यातले सगळे धडे टिपिकल इंजिनियरिंग स्टुडेंटप्रमाणे एकाच दिवसात घोकलेस!
  यासाठी +१००
  रच्याक - तुमची लिहण्याची स्टाईल भारी आहे. रामगोपालच्या ’रोड’ सारखा एखादा चित्रपट पाहतेय असे वाटत होते.

  ReplyDelete
 19. दुसऱ्या भागानंतर आता प्रतक्रिया टाकणार म्हणजे जरा जास्तच मोठी आहे रे..असं करते तुला एक फोनुच करते..तुला तसाही प्र ला प्र करायला वेळ नाहीये कारण ४३ का काय प्र आहेत अस म्हणतोयस..मला टंकायला नको आणि मला प्र ला प्र लगेच मिळेल कस....:)
  इथे फक्त आमेन + ५ (उरलेले)

  ReplyDelete
 20. Gr8 experience i swear!! Life gives each one of us so many different experiences and instances. And you have a knack of good writing!!

  ReplyDelete
 21. सात भाग माफ म्हणावं लागेल ....
  क्रमश:मुळे उलट जास्त मजा आली ...
  खूपच सही वर्णन केल आहेस ...प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर आला अगदी....
  आणि एक चांगल कि ट्रेकत राहिलात त्यानंतरही.....

  ReplyDelete
 22. हुश्श ... पोहोचलात एकदाचे सुखरूप घरी.
  एव्हाना एवढ्या प्रतिक्रिया आल्यात, की मला वेगळं काही लिहायची गरज नाही. तेंव्हा

  विभि ++
  अनघा ++
  सिद्धार्थ ++
  तन्वी ++

  ReplyDelete
 23. सिध्द +१

  >>पण काही दिवस असेही असतात की त्या दिवशी प्रत्येक गोष्टीचा विचका होतो, हात लावू त्या कामाची माती होते.

  हे एकदम पटेश.

  हुश्श....तु ह्या ट्रेकला जेवढी कसरत केली तितकीच मी ह्या पोस्ट वाचण्यासाठी केली आहे.

  ReplyDelete
 24. हुश्शsssssssssssss सुटलात एकदाचे.............. कसलं सुंदर लिहिलंय. शेवटा आलो असं भासलं पण ट्रेकिंग संपत का??????????

  ReplyDelete
 25. पाचव्या आणि सहाव्या भागाच्या प्रतिक्रियांना उत्तरं देऊन झालीत. या भागाच्या प्रतिक्रियांना सवडीने देतो उत्तरं.

  ReplyDelete
 26. Nice . tu sahavya bhagachya shevaTee aksharasha: "aa" vasalas tenva amhee shwas rokhun dharale hote satva bhaag vachayala suru kareparyant!:-))

  ReplyDelete
 27. हाहाहा.. खरंच रे.. अगदी टिपिकल.... अगदी आयुष्यभर पुरतील असे धडे मिळाले. धन्स रे..

  तुझं म्हणजे सध्या इट गद्दाफी, ड्रिंक गद्दाफी झालंय.. ! ;)

  ReplyDelete
 28. अनघा अनेक अनेक आभार.. खरंच.. तो प्रकार संपला तरी खरंच संपलाय यावर आमचा विश्वासच बसत नव्हता.

  ReplyDelete
 29. धाब्यावाद सचिन.. दहा ट्रेक फिके पडतील असा अनुभव होता तो :)

  ReplyDelete
 30. यस्स स्वामी. पण हिरो पण मीच पाहिजे तरच.. (ज्याची बॅट असते त्याला पहिली बॅटिंग ;) )

  खरंच. कोणावरच असला प्रसंग ओढवू नये !! हो आम्हालाही धडाधडा धडे मिळाले एकदम :)

  ReplyDelete
 31. धन्स सागरा. सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघून मी ठरवलंच होतं की शेवटचे दोन्ही भाग एकदम टाकायचे म्हणून.

  ReplyDelete
 32. yah Saurabh.. Desperately wanted to do that.. But the day was not ours !!

  ReplyDelete
 33. धन्यवाद राजीवजी,

  सगळंच एखाद्या रहस्यमय कादंबरीला किंवा चित्रपटाला लाजवेलसं होतं. एखादं काल्पनिक कथानक म्हणून सहज खपून जाईल !! पण खरंच त्या ट्रेकने बऱ्याच गोष्टी शिकवल्या हे मात्र नक्की.. प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार.

  आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 34. मनःपूर्वक आभार परिचित.. खरंच भयंकर प्रकार. कसे आम्ही त्या प्रकारातून निभावलो आमचं आम्हाला माहित..

  >> असं काही घडल्यावर आपला जीवनाप्रती दृष्टीकोन बदलून जातो...
  अनुमोदन

  ReplyDelete
 35. हो ग श्रीताई, चांगलाच हिसका दाखवला अगदी. माणसं तर माणसं पण वेळही आमच्या बाजूची नव्हती. सगळंच चुकत होतं.. नशिबाने सुटलो. आणि तय टीसीचे स्पेशल आभार.

  >> पण पुढे कधीतरी तुम्ही पुन्हा जाऊन ’ त्या ...ला ’ जरा पाहून घ्यायचे ना. :D

  त्याला एवढे शिव्याशाप दिलेत की तो त्यानंतर कुठेतरी पेबच्या जंगलात अडकला असेल तो अजूनही सुटला नसेल (फक्त एका प्रसंगात माझा शाप या गोष्टीवर विश्वास आहे ;) )

  ReplyDelete
 36. हा हा हा सिद्धार्थ..

  याच्या सगळं उलट आणि अजून वाईट त्या जंगल्याला होईल असं पण म्हण ;)

  ReplyDelete
 37. धन्स धन्स माऊ.. हो ग. फारच भयंकर अनुभवातून नशिबानेच सुटलो.. वाचलो..

  ReplyDelete
 38. तन्वे, आभार्स आभार्स.

  >> पण म्हटलं छ्याट हे काही संकट नाही...

  हाहाहाहा :)

  तुम्ही क्रमशःच्या तावडीतून सुटलात आणि आम्ही जंगल्याच्या तावडीतून ;)

  अग पेब उशिरा लिहिण्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे मुद्दाम ठरवून उशिरा लिहिला असं नाही. मला अनुजा नेहमी म्हणायची लिही म्हणून. पण मला स्वतःला वाटलं नव्हतं की तो प्रकार वाचायला इतका इंटरेस्टिंग वाटेल म्हणून. (अर्थात तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांनी मला खोटं ठरवलं.. याचा आनंदच आहे :) ) ..

  दुसरी गोष्ट म्हणजे तो प्रकार घडला त्याच्यानंतर त्यावर कधीच काही चर्चा झाली नव्हती. त्यामुळे सगळे तपशील अगदी बरोबर आठवतील की नाही याची खात्री वाटत नव्हती. पण जसजसा लिहीत गेलो तसं सगळं आपोआप आठवत गेलं (थोडक्यात मी ते विसरलोच नव्हतो कधीच. )..

  तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कं.. मला माहित होतं की लिहायला बसलं की हे प्रकरण खूSSSSSप मोठं होणार आहे. (तरी पहिल्या तीन भागात अजून काही तपशील होते ते मी वगळले आहेत.) त्यामुळे एवढं सगळं लिहायचा मला प्रचंड कंटाळा आला होता. त्यामुळे सारखं पुढे ढकललं जात जात शेवटी आत्ता एकदाचा मुहूर्त मिळाला :)

  ReplyDelete
 39. स्नेहा, मनःपूर्वक आभार्स.. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 40. आशिष आभार. तुम्हाला क्रमशः वाचताना कंटाळा आला होता आमची काय वाट लागली असेल बघा. खरंच नशीबच म्हणावं लागणार ! आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 41. धन्स धन्स सुहास.. अनेक धन्स.. मलाही लिहिताना ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं होतं बघ. आम्ही सहीसलामत सुटलो हा एक चमत्कारच होता.

  अरे आणि माझा सगळा लेख लिहून पूर्ण झाला होता पण शुद्धलेखन/व्याकरणाच्या चुका वगैरे बाकी होतं आणि त्यात सहावा भाग अर्धा आणि सातवा पूर्ण दोनदा उडाले घामेल्याच्या ड्राफ्टमधून. घमेल्यातला किडा (बग) आहे तो बहुतेक. त्यामुळे शेवटी शेवटचे दोन भाग (दोन वेळा) पुन्हा लिहून सात भागांचे वेगळे सात ड्राफ्ट बनवून टाकले. प्रत्यक्ष प्रसंगासारख्याच कटकटी झाल्या लिहितानाही :) पण वाचलो शेवटी..

  >> खुप थकलोय, भूक लागलीय. आता मला एक खादाडीची पोस्ट हवीय ;)

  चांगली आयडिया आहे. टाकतोच काहीतरी लवकरच :)

  ReplyDelete
 42. आभार्स केतकी. २ भाग लागोपाठ टाकले नसते तर भरपूर शिव्या खायला लागल्या असत्या सगळ्यांच्या :)

  ReplyDelete
 43. प्रतिक्रियेबद्दल आभार अर्जुन.. खरंच.. खुपच नशीबवान आहे. वादच नाही.. गोष्ट जगलो.. हेहे.. ऐकायला पण भारी वाटतंय.. :)

  >> असेच ट्रेक्स तुला घडो आणि आम्हाला अजून अजून वाचायला मिळो ही सदिच्छा(??)!! :-P

  असेच??? अरे असे नाही असा अजून एक जरी ट्रेक झाला तरी पुढच्या वेळी लिहायला असेन की नाही काय माहित :)

  ReplyDelete
 44. मनःपूर्वक आभार्स प्रज्ञा.. सुटलो एकदाचे.. एवढ्या छान प्रतीक्रीयेवाद्दल पुन्हा एकदा आभार.. रामगोपाल, रोड.. हेहे :)

  ReplyDelete
 45. वक्के अपर्णा.. फोनवर प्रतिक्रियांची देवाणघेवाण करू आपण :)

  ReplyDelete
 46. Thanks a lot Saisakshi.. The experience itself was so unique and new, I guess, it just came out on paper so easily.

  ReplyDelete
 47. हा हा हा लीना.. सात भाग माफ.. लोल..

  >> क्रमश:मुळे उलट जास्त मजा आली ...

  चला कोणीतरी भेटलं क्रमशः ला शिव्या न घालणारं :)

  प्रतिक्रियेबद्दल आभार.. हो ट्रेक बंद होणं तसंही कठीण होतं. पण सुरुवातीला चुटपुट होती की कोणाच्या घरून काही फतवे निघतायत की काय..

  ReplyDelete
 48. धन्स विशालभौ !

  ReplyDelete
 49. धन्स धन्स गौरी.. हो पोचलो उर्फ वाचलो एकदाचे.. :) .. प्रतिक्रियेबद्दल आभार

  ReplyDelete
 50. आभार यवगेशा.. आमचा तो दिवस तसाच होता अगदी..

  >> हुश्श....तु ह्या ट्रेकला जेवढी कसरत केली तितकीच मी ह्या पोस्ट वाचण्यासाठी केली आहे.

  हो ते दिसतंच आहे तुझ्या आधीच्या भागांवर आत्ता आलेल्या प्रतिक्रिया पाहून :) .. त्यांनाही उत्तरं देतो आता.

  ReplyDelete
 51. आभार आभार कल्पेश.. खरंच आम्ही पण अगदी असाच सुटकेचा निःश्वास सोडला होता :)

  ReplyDelete
 52. आपण सिनेमा काढू.. ते २४ अवर्स..
  नक्की ऑस्कर मिळवू ;)

  खुप मस्त लिहिलंस.. डोळ्यासमोर दिसलं सर्व...

  ReplyDelete
 53. हाहाहाहा.. ते २४ अवर्स... सहीये.. चला दोन ऑफर्स आल्या चित्रपटाच्या ;) .. आणि ऑस्कर पण का? वा वा :) .. आभार्स आभार्स..

  ReplyDelete
 54. >>> मला अनुजा नेहमी म्हणायची लिही म्हणून. पण मला स्वतःला वाटलं नव्हतं की तो प्रकार वाचायला इतका इंटरेस्टिंग वाटेल म्हणून. (अर्थात तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांनी मला खोटं ठरवलं.. याचा आनंदच आहे :) ) ..

  कुलकर्ण्यांच्या मुली हुशारच रे :) ... ऐकावं त्यांचं (नेहेमीच :) ), हो किनई अनुजा :)

  ReplyDelete
 55. हाहाहा.. ते तर आहेच ग..

  अमित म्हणतो तसं "घरोघरी, कुलकर्ण्यांच्या मुली" ;)

  ReplyDelete
 56. अरे बापरे. जीवघेणा अनुभव आहे. ही कॉमेंट टाकायचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा. कदाचित या वेळेस तरी नक्की होईल पोस्ट :)
  स्वतःची फजिती प्रामाणिक पणे लिहिली आहेस, त्यामुळे वाचतांना पुर्णपणे गुंतून गेलो होतो. मस्त पोस्ट>

  ReplyDelete
 57. हो ना काका.. खरंच जीवावरच बेतलं होतं. नशिबाने सुटलो.. एक मोठ्ठा धडा मिळाला :)

  ReplyDelete
 58. Excellent,that is what adventure is all about.Another Invitation for movie!!!!!!

  ReplyDelete
 59. आभार्स सुदीप..

  ReplyDelete
 60. तुमच्या गावाकडे पण ३१ मार्च असतुया काय ? म्हंजी आमच्या गावाकडे असतुया तसा हो - समदी कामं ३१ मार्च आहे अस म्हणून लटकवलेली असत्यात !! तसा नाय न झाला तुमचं? त्ये लयी दिस झाले काय बी पोस्त नाय म्हनूनशान इचारलं .. काय नाराज हाये का ? असाल तर सपष्ट बोला कि राव आणि पोष्टा कि बिगी बिगी !! २६ दिवस झाले कायी खबर बात न्हायी !

  ReplyDelete
 61. नाराज न्हाय म्हाराज.. नाराज कश्यापायी?? खरं म्हंजी नाराज होन्याएवढाही वेळ नाही. सध्या प्रचंड गडबड चालू आहे.. प्रचंड काम, धावपळ.. घरी आणि हापिसात दोन्हीकडे.. बघू.. बरंच काही आहे ड्राफ्टस मधे. लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करतो. आवर्जून चौकशी केल्याबद्दल आभार्स !

  ReplyDelete
 62. वा... सच और साहस जिसके मनमे.... अंतमे जीत उसीकी हो... :) पोचला बाबा एकदाचा घरला... अरे त्या नंतर पेब केलास ना... बराय नाहीतर मीच तुला बोलणार होतो की जाऊया एकदा आपण... :) संपूर्ण ट्रेक वर्णन भारीच... म्हणजे किस्से आणि घडामोडी तर अस्सल आणि अव्वल दर्जाच्या घडल्याच पण त्याची मांडणी आणि सादरीकरण मनोभावक होते... :) भलतेच आवडले....

  ReplyDelete
 63. हेहे आभार्स रोहणा.. झाली बाबा एकदाची अंतमे जीत ;)

  नंतर पेब बर्‍याचदा केला.. पण 'त्या' प्रसंगाच्या आठवणी कायम कोरल्या गेल्या मनावर. मी आलो की आपण एकदा एकत्र पेब करायचा हे तर अगदी नक्की :)

  ReplyDelete
 64. भारी होतं.... लई भारी. रामगोपाल वर्माला ही स्टोरी ऐकवली नाही वाटतं अजून कोणी... :-)

  ReplyDelete
 65. इतके दिवस मला पत्ताच नव्हता तुझ्या ब्लॉग चा . परवाच लागला आणि काय आणि किती वाचू असे झाले . आज पेब वाचले . लोकांची क्रमश: वाचताना काय हालत झाली असेल ते समजले. तुमचा सगळाच चुकत गेलेला ट्रेक जबराच ...आणि तुमच्या पेशन्स ला सलाम !

  ReplyDelete
 66. संकेत, ऐकवणार होतो रे.. पण तेवढ्यात 'रामूची आग' रिलीज झाली आणि मग विचार बदलला ;)

  ReplyDelete
 67. सुमेधा, खूप आभार.. हो ग.. तो ट्रेक, तो दिवस सगळंच काहीतरी विचित्र होतं. धडधाकट घरी आलो हेच मोठं !!

  प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...