वाचकाला एखाद्या पूर्णतः भिन्न अशा आणि जवळपास अविश्वसनीय वाटावं अशा विश्वाची ओळख घडवून आणून, त्या विश्वातले रीतिरिवाज, नियम, जीवनशैली, चालीरीती, प्रसंगी आगळीवेगळी वाटणारी व्यक्तिमत्वं इत्यादी सगळ्या गोष्टी समोर मांडून, या सगळ्यांतून वाचकाला विश्वासार्ह वाटाव्या अशा विश्वाची मांडणी करणं यासाठी लेखकाकडे असामान्य प्रतीची प्रतिभा असावी लागते. ज्याप्रमाणे हॅरी पॉटर किंवा मार्व्हल/डीसी युनिव्हर्समधील अविश्वसनीय घटना आणि पात्रांवर आपण अगदी काहीही शंका/प्रश्न मनात ना आणता सहज विश्वास ठेवतो तद्वतच ख्यातनाम गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांनी आपल्या तत्त्वमसि या पुस्तकात महानदी नर्मदा आणि तिच्या तीरावरचे आदिवासी यांचं एक अजब पण तितकंच विश्वासार्ह आणि वाचकांचा सहज विश्वास बसेल असं एक अनोखं विश्व वाचकांसमोर उभं केलं आहे. आणि या मूळ गुजराती पुस्तकाचा तितकाच सशक्त मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. या 'नर्मदा युनिव्हर्स' मध्ये नर्मदा आणि नर्मदा परिक्रमा यांच्याबरोबरच तिच्या तटावरची गूढ आणि घनदाट जंगलं, तिथले अशिक्षित आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांच्या रूढी परंपरा, श्रद्धा/अंधश्रद्धा, बोलीभाषा, समजुती, त्यांची भीषण गरिबी, त्यांचे संस्कार, त्यांचा साधेपणा आणि नितळ सच्चाई आणि त्याचबरोबर सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, समजुती, सेवाभावाची आदिम प्रेरणा, एकूणच विश्व आणि निसर्ग, आपल्या सभोवतालची सृष्टी या सगळ्यासगळ्या कडे पाहण्याचा आपल्या संस्कृतीचा डोळस दृष्टिकोन आणि या सगळ्यांच्या मिश्रणातून उभं राहिलेलं एक अद्भुत जग आपल्या भेटीस येतं आणि आपल्याला थक्क करून सोडतं. हे विश्व आपल्यासमोर मांडलं जातं ते एका भारतीय वंशाच्या परंतु अमेरिकेत स्थित असणाऱ्या आणि नर्मदा भेटीसाठी काहीशा अनिच्छेनेच भारतात आलेल्या किंबहुना काहीशा जबरदस्तीनेच पाठवण्यात आलेल्या एका अनामिक तरुणाच्या नजरेतून आणि निरीक्षणांमधून.
ध्रुव भट्ट |
अर्पणपत्रिका हा तसं म्हंटल तर तुलनेने दुर्लक्षित असा विषय आहे. अनिल अवचट
यांच्या 'स्वतःविषयी' या पुस्तकाच्या अतिशय
सुंदर आणि तरल अशा अर्पणपत्रिकेनंतर इतकी सुंदर अर्पणपत्रिका मी प्रथमच वाचली.
"भारतवर्षाच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणाऱ्या, एकत्र बांधणाऱ्या, उभयान्वयी, भुवनमोहिनी महानदी
नर्मदेला —"
ही अर्पणपत्रिका वाचून अक्षरशः नतमस्तक व्हायला होतं. याच विचाराला अनुमोदन
देणारा एक प्रसंगही पुस्तकात आहे.
तिनं नकाशा उघडला. लक्षपूर्वक नर्मदेचं स्थान बघत ल्युसी म्हणाली,
‘‘सबंध भारताचे बरोबर मध्यावर दोन भाग करते नर्मदा.’’
‘‘माझं मत वेगळं आहे.’’ शास्त्री म्हणाले, ‘‘ही या देशाला जोडते.
उत्तराखंड आणि दक्षिणपथाला जोडून एकत्र ठेवते रेवा.’’
एकाच वस्तुस्थितीकडे बघण्याचे पौर्वात्य आणि पाश्चात्य संस्कृतींचे दोन पूर्णतः भिन्न असणारे असे दृष्टिकोन दोन संस्कृती आणि विचारसरणी यांमधला फरक लख्खपणे स्पष्ट करतात.
लेखकाचं नर्मदेवर असलेलं अपरंपार प्रेम प्रसंगाप्रसंगातून आणि नर्मदेला
उद्देशून त्यांनी ठायीठायी वापरलेल्या विशेषणांवरूनच कळतं. 'खाली दरीत चांदीचा दोर
दिसावा तसा दिसणारा नर्मदेचा प्रवाह', 'सदाजिवंत महानदी नर्मदेचा चांदीचा प्रवाह' किंवा 'भारतमातेच्या कंबरेभोवती
चमचमणारी साखळी' तसंच महानदी, भुवनमोहिनी, जीवनदायिनी, सदाजातिवंत, सोमद्रवा अशी अनेक अर्थपूर्ण विशेषणं मिरवत महानदी नर्मदा आपल्या भेटीस येते.
एका प्रसंगात लांबच्या एका उंच अशा टेकडीवरून खाली पाहत गुप्ताजी 'नर्मदे हर' असं म्हणून नमस्कार
करतात. इतक्या लांबवरही नर्मदा असेल यावर विश्वास न बसून कथानायक चमकून जाऊन
त्यांना विचारतो की इथे, एवढ्या लांब ही नर्मदा आहे? त्यावर गुप्ताजींचं अतिशय मार्मिक असं उत्तर येतं,
"‘इहां तो सब कुछ नर्मदाज है।" ..... अर्थात इथं तर सर्व काही
नर्मदाच आहे!
निसर्ग, हिरवी रानं, त्यातल्या पशुपक्ष्यांच्या असंख्य जाती, त्यांच्या विविध आवडीनिवडी/सवयी आणि या सगळ्यांकडे बघण्याचा आपल्या प्राचीन
संस्कृतीने शिकवलेला असा आदिवासी लोकांचा विशाल असा दृष्टिकोन यावर भाष्य करणारे
अनेक प्रसंग पुस्तकात आहेत.
एका प्राचीन महावृक्षात प्रत्यक्ष शिवाचा वास असून तो सर्वांचं संरक्षण करत
असून, त्याच्या परिसरात
कोणालाही काहीही धोका नाही यावर आदिवासींची ठाम श्रद्धा असते जे अर्थातच आधुनिक
विचारांच्या नायकाला पटत नाही. दरम्यान जंगलातून चालत असताना अचानक रस्ता चुकून, भरकटून भलतीकडेच
गेलेल्या नायकाला बऱ्याच वेळाने नर्मदेच्या प्रवाहाचं लांबवरून दर्शन होतं आणि
त्याला अचानक हायसं वाटून जातं. आणि त्यावेळी अचानक त्याच्या मनात येतं की बऱ्याच
वेळाने भेटलेला नर्मदेचा प्रवाह क्षणभराकरता दिसूनही तो आपल्याला मानसिक शांतता, निश्चिंतता प्रदान करू
शकत असेल तर वर्षानुवर्षं एखाद्या सुपरिचित आणि भव्य अशा वृक्षाच्या छायेत
राहिल्याने त्या परिसरात निर्भयता, सुरक्षितता अनुभवणाऱ्या आदिवासींना आपण नक्कीच खोटं ठरवू शकत नाही.
मधमाश्या पालन केंद्राविषयी लिहिताना मधमाश्या, त्यांच्या सवयी, त्यांची जीवनशैली इत्यादींचा लेखकाने तपशीलवार अभ्यास केल्याचं जाणवतं.
मधमाश्या मध कसा शोधतात, तो गोळा कसा करतात इत्यादींची इत्यंभूत माहिती लेखक विषयाच्या ओघात पुरवून
जातो. बित्तुबंगावरच्या वाघाच्या हल्ल्याचा प्रसंग असाच डोळ्यातून पाणी काढणारा
आहे. प्राणाहून प्रिय भावावर झालेल्या हल्ल्याचा सूड म्हणून वाघाला जिवंत न
सोडण्याची प्रतिज्ञा बित्तुबंगा करतात. त्यासाठी प्रचंड प्रयत्न करतात. अखेरीस वाघ
तावडीत सापडतो सुद्धा. वाघावर हल्ला न करण्याविषयी किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा
त्रास न देण्याबद्दलची तंबी त्याला खुद्द वन्य प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडूनही दिली
जाते. त्याकडे दुर्लक्ष करून तो निघून जातो आणि अचानक दुसऱ्या दिवशी एक अशक्य
कोटीतील वाटावा असा प्रसंग घडतो. तो प्रसंग मुळातून वाचण्यासारखा असल्याने आणि
मुख्य म्हणजे वाचताना हिरमोड होऊ नये म्हणून इथे देत नाही. पण एका छोट्याशा
प्रसंगातून विशालहृदयी आदिवासी, त्यांचं बंधुप्रेम, त्यांच्यातील ममत्व या सगळ्यासगळ्याचं एक अनोखं दर्शन घडतं.
पाप,
पुण्य, संस्कार, पुनर्जन्म इत्यादींवरही अनेक छोट्या छोट्या प्रसंगांतून सुरेख रीतीने भाष्य केलं
जातं. आवर्जून उल्लेख करावासा प्रसंग म्हणजे कथानायक आणि लक्ष्मण यांच्यातील एक
संवाद. वर सांगितलेला बित्तुबंगाचा प्रसंग आणि हा संवाद हे या पुस्तकातले माझे
विशेष दोन आवडीचे प्रसंग आहेत. कामादरम्यान अनेक विषयांवर चर्चा करत असताना एकदा
मागचा जन्म, पुनर्जन्म वगैरे विषयावर चर्चा येऊन पोचते आणि सहजच नायक लक्ष्मणाला विचारतो
की त्याचा गेल्या जन्मावर विश्वास आहे का? आणि त्यावर त्याला लक्ष्मणसारख्या सामान्य कार्यकर्त्याकडून जे सर्वस्वी
अनपेक्षित आणि धक्कादायक असं उत्तर मिळतं त्याने नायकाला त्या दोघांच्या
विचारसरणीमधला तीव्र फरक जाणवून जातो.
सगळ्यांत अप्रतिम आणि जमलेला भाग म्हणजे नायक आणि सुपरिया यांच्यात वेळोवेळी
घडणारे अर्थपूर्ण आणि तितकेच नायकाला नवी दृष्टी प्रदान करणारे अनेक प्रसंग. यातला
प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संवाद अतिशय चतुराईने लिहिण्यात आल्याचं जाणवतं जेणेकरून फार कमी
शब्दांत नायकालाच नाही तर किंबहुना वाचकालाही आधुनिक जग आणि भारतीय सनातन संस्कृती, धर्म, त्यांच्या
अंतर्प्रेरणा, संस्कार या साऱ्यासाऱ्याचं अतिशय विलोभनीय दर्शन घडतं. खरंतर एकच प्रसंग
निवडणं हे जवळपास अशक्य काम आहे तरीही प्रयत्न करतो. सुपरिया रोज महाभारत वाचत
असताना तिचा आणि कथानायकाचा संवाद सुरु होतो. बोलताबोलता त्याने महाभारत वाचलं आहे
का असं ती विचारते. तो नाही असं उत्तर देतो जे अर्थातच अपेक्षित असतं. त्यानंतर
महाभारतातल्या वेगवेगळ्या प्रसंगांवर त्यांची चर्चा होते ज्यातलं एकही प्रसंग
नायकासाठी अनोळखी नसतो. त्यापुढे काय होतं हे खरं तर सांगायचीही गरज नाही पण तरीही
मूळ प्रसंगामधली त्यांची प्रश्नोत्तरं आणि नायकाला अखेरीस बसणारा धक्का हा
अप्रतिमरित्या चित्रित केला गेला आहे.
ध्येयनिष्ठा, तत्त्वनिष्ठा हे गुण सांगणं वेगळं आणि ते विशेष काहीही वेगळं केल्याचा आव न आणता अट्टहासाने जगणं वेगळं आणि
तितकंच कठीणही. पण नर्मदेच्या तीरावरच्या दुर्गम रानवनातली ही साधीभोळी माणसं
नक्की कुठल्या मातीची बनलेली आहेत असा विचार करायला भाग पाडणारा एक प्रसंग आहे.
वणवा लागल्याने हजारो झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असतात. वणवा पसरत पसरत हळूहळू
आजूबाजूच्या गावांचा घास घेणार हे जवळपास नक्की होतं. त्यावेळी तिथून स्थलांतर
करायला तयार नसलेल्या विष्णू नावाच्या एका शिक्षकांशी आणि त्याच्या पत्नीशी
नायकाची भेट होते. भविष्यात शाळाच न राहिल्याने विष्णू मास्तरांची नोकरीही कदाचित
जाईल अशा विचाराने नायक मास्तरांजवळ हळहळ व्यक्त करतो. परंतु दुसऱ्या गावी बदली
होईल असं सांगून काही काळजी करण्याचं कारण नाही असा दिलासा मास्तर त्याला देतात.
पण खरी समस्या वेगळीच आहे असंही ते पुढे म्हणतात. ती समस्या ऐकून विष्णू
मास्तरांच्या चांगुलपणावर नायकाचा काय आपलाही विश्वास बसत नाही. इतकी अपार
ध्येयनिष्ठा, त्यागबुद्धी, स्वतःच्या कर्तव्याप्रती असणारी तळमळ आणि समाजाचं आणि विशेषतः नवीन पिढीचं भलं
व्हावं यासाठी अविरत झटणं या फक्त एखाद्या पुस्तकात किंवा एखाद्या आदर्शवादी
श्लोकात/गीतात शोभतील अशा गुणांचा एकाच व्यक्तीत आणि तेही अत्यंत सामान्य अशा
व्यक्तीत एकसमयावच्छेदेकरून वास असणं ही पूर्णतः अविश्वसनीय अशी गोष्ट प्रत्यक्ष
समोर घडताना बघून नायक हतबुद्ध होतो.
प्रचंड गरिबी, सततची उपासमार, अतीव कष्ट हे सगळं आयुष्याचा अविभाज्य भाग असूनही कधीही निराश न होता छोट्या
छोट्या प्रसंगांतून सहजसुंदर आनंद शोधणारे आदिवासी वेळोवेळी भेटतात. इतकं सगळं
असूनही अतिथी म्हणून आलेल्या अगदी अनोळखी अशा व्यक्तीचाही पाहुणचार करण्याची पद्धत, त्याचा यथायोग्य
आदरसत्कार केल्याशिवाय त्याला जाऊ न देणारे आदिवासी हे खरोखर पंचतंत्रातल्या
एखाद्या आदर्श बोधकथेत वगैरे शोभावेसे आहेत. इतकं महाप्रचंड दारिद्र्य असूनही
फसवाफसवी करणे, इतरांचे हक्क/लाभ पळवणे, कर्ज किंवा त्यावरचं व्याज बुडवणे, अफरातफर करणे असली शहरी जीवनात पावलोपावली घडणारी आणि कायद्याचं भय नसतं तर
ज्यामुळे सुंदोपसुंदीही माजू शकेल असली अनीतीपूर्ण कृत्यं करण्याचा साधा विचारही
कधी त्यांच्या मनाला शिवून गेल्याचं आढळत नाही.
नर्मदा परिक्रमेविषयी अधिक माहिती देताना ती कधी सुरु झाली असावी, का सुरु झाली असावी
आणि गेली कित्येक शतकं का चालू राहिली असावी या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांचा
वेध घेण्याचा प्रयत्न लेखक करताना दिसतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच
आपल्या प्राचीन संस्कृतीच्या विधायकतेशी निगडित आहेत. आणि त्यामुळे परिक्रमावासीला
नर्मदारूप मानणे, त्यांची सेवा करणे या सहज घडणाऱ्या कृती या कोणा एका परिक्रमावासीसाठी नाही तर
नर्मदेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतात यावर विस्ताराने भाष्य केलं जातं. इतकंच
नाही तर नर्मदा परिक्रमेत सप्त चिरंजीव वावरत असतात, ते भेटू शकतात इत्यादी गोष्टींवर या लोकांची असलेली अमाप श्रद्धा आणि
त्यामागचं कारणही तितकंच रोचक आहे. त्याचप्रमाणे त्यांची सेवा करणं हे आपलं
परमकर्तव्य असून त्यामागे 'कर्मण्येवाधिकारस्ते' सारखं थेट भगवद्गीतेतून आलेलं तत्त्वज्ञान असेल हे वाचूनही सुखद आश्चर्य
वाटतं.
या आदिवासींचं मूलस्थान हे एका वेगळ्याच प्रदेशातलं आहे आणि त्यावर त्यांचा
ठाम विश्वास असून ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे तसे पुरावेही आहेत हे वाचून तर
अजूनच धक्का बसतो. अर्थात विश्वास ठेवणं न ठेवणं हे लेखक नेहमीप्रमाणेच आपल्या
सद्सद्विवेकबुद्धीवर सोडून देतो.
निवडक, महत्वाचे प्रसंग लिहायचे म्हंटले तरी कुठले निवडावे आणि कुठले वगळावे अशी दोलायमान परिस्थिती होऊन जाते. तरीही आवर्जून उल्लेख करावाच किंवा ज्या उल्लेखाशिवाय हा लेखच काय कदाचित पुस्तकही अपूर्ण राहील तो म्हणजे अखेरचा प्रसंग. नायकाचा अखेरच्या प्रसंगाकडे येण्याचा प्रवास अगदी अवचितपणे, न ठरवता सुरु होतो. काही महत्वपूर्ण घटना घडत अखेरीस आपण परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यात येऊन पोचतो. नास्तिक असणाऱ्या, धर्म न मानणाऱ्या, लोकांच्या श्रद्धांवर टीका करणाऱ्या, त्यांच्या अज्ञानापायी क्रोधीत होणाऱ्या नायकाच्या आयुष्यात शेवटच्या क्षणी एक विलक्षण घटना घडते आणि जणू त्याची परिक्रमा पूर्ण होते आणि त्याचं अवघं विश्वच बदलून जातं. सुरुवातीच्या वस्तुनिष्ठ कट्टरतेपासून सुरु होणारा प्रवास एका हळुवार वळणावर संपतो. पण त्याच वेळी एक नवा प्रवास सुरु झालेला असतो. महानदी नर्मदा, तिची परिक्रमा, तिथले आदिवासी, त्यांच्या चालीरीती, संस्कार, हिंदू संस्कृती या सगळ्यासगळ्यांना कडकडून भेटावं अशी तीव्र इच्छा दाटून येणाऱ्या वाचकाच्या मनात. आणि हा प्रवास मात्र आपला आपल्यालाच पूर्ण करायचा असतो.
नर्मदे हर !!!!
-हेरंब ओक
No comments:
Post a Comment