Tuesday, May 17, 2022

'तंतू' नावाचं महाकाव्य

गेल्या दोन आठवड्यांत डॉ भैरप्पांची दोन पुस्तकं वाचून झाली. धर्मश्री आणि तंतू.

धर्मश्री (अनुवाद : विजयालक्ष्मी रेवणकर) : 'धर्मश्री' तसं छोटंसं पुस्तक. जेमतेम दोनेकशे पानी. विषय प्रामुख्याने ख्रिस्ती धर्म, त्यांचे धर्मप्रसारक, त्यांनी छळकपटाने किंवा हरतऱ्हेची आमिषं दाखवून भारतभर केलेला धर्मप्रसार आणि धर्मांतरं. कट्टर हिंदू विचारसरणीच्या मुलाचा ख्रिस्ती मुलीच्या प्रेमात पडून, ख्रिस्ती धर्म स्वीकारून परत हिंदू धर्मात (सपत्नीक) परत येण्याचा प्रवास म्हणजे धर्मश्री. (गेल्याच आठवड्यात वाचलेल्या Christopher Hitchens च्या Missionary Position या पुस्तकात हेच 'कार्य(!)' मदर तेरेसाने जगभर कसं आणि किती शिताफीने राबवलं याचे असंख्य संदर्भ वाचले होतेच).

पण डॉ भैरप्पा त्यांच्या नेहमीच्या शैलीत धर्माची ओळख, पात्रांची ओळख, त्यांची विचारसरणी, नातेसंबंध, स्वभाववैशिष्ट्यं या सगळ्याचं एक परिपूर्ण चित्रण वाचकांपुढे उभं करतात. भैरप्पांच्या चाहत्यांनी आवर्जून वाचावं असं पुस्तक. याच पुस्तकातली स्थळं आणि (काही) पात्रं भैरप्पांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'गृहभंग' या पुस्तकात भेटीस येतात असं आत्ताच 'गृहभंग' च्या मनोगतात वाचलं. त्यामुळे ती एक उत्सुकता आहेच.

तंतू (अनुवाद : उमा कुलकर्णी) : 'तंतू' आज संपवलं. चांगलं लांबलचक, जाडजूड ८७८ पानांचं पुस्तक. पुस्तक कसलं, ग्रंथच. पण त्यात शेकडो वर्षांचा, कित्येक पिढ्यांचा इतिहास आहे असंही नाही. कथा घडते ती साधारण १९५५ ते १९७५ या वीसेक वर्षांतच. पण मग तरी इतक्या आठेकशे पानांत एवढं घडतं तरी काय नक्की? तर ते म्हणजे यात असलेली किमान वीस हून ही अधिक 'प्रमुख' पात्रं आणि प्रत्येक पात्र खरोखरच महत्वाचं पात्र आहे. प्रत्येक पात्राला कादंबरीत एक महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक पात्राची विचारसरणी, स्वभाव इत्यादींची अतिशय तपशीलवार माहिती देऊन त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं एक परिपूर्ण चित्रण वाचकांपुढे उभं करण्यात भैरप्पा कमालीचे यशस्वी ठरले आहेत. प्रत्येक पात्राचं वर्णन, त्याचे/तिचे गुणविशेष इतक्या कमालीच्या बारकाव्यांसह रंगवले गेले आहेत की प्रत्येक पात्राचा त्याचा एक स्वतःचा असलेला असा चेहरा वाचकांसमोर उभा राहतो. एकदा का त्या त्या पात्राचे व्यक्तिविशेष आणि स्वभाव वाचकांना सुपरिचित झाले की काही प्रसंगी विचित्र किंवा अविश्वसनीय वाटणारे प्रसंग किंवा कृती यांवर आक्षेप न घेता वाचक त्या त्या प्रसंगांत, त्या त्या पात्राशी पूर्णतः एकजीव होतो, समरस होतो. इतका की जणू हे सगळं आपल्या स्वतःच्याच आयुष्यात घडत आहे असं वाटावं किंवा टीव्ही/ओटीटीवर एखादी महा-मालिका बघत आहे असं वाटावं!

'तंतू' कुठल्याही एकाच विषयाला वाहिलेली नाही की एकाच मुख्य विषयावर भाष्य करते असंही नाही. ती सर्वसमावेशक आहे. मानवी भावभावना, परस्पर नातेसंबंध, संस्कार, विवाहबाह्य संबंध, पुरुष-स्त्री संबंध, आधुनिकीकरण, शिक्षण, संगीत, गुरू, ध्यानधारणा, रसातळाला चाललेली जीवनमूल्यं, वाढता अविवेक, सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार आणि अखेरीस बाईंनी लादलेली आणीबाणी अशा अनेकानेक विषयांवर, वेगवेगळ्या पात्रांच्या आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून केलेलं दीर्घ भाष्य म्हणजे तंतू. इतकी पात्रं, घटना आणि मुख्य म्हणजे सुमारे ९०० पृष्ठसंख्या असूनही कधीही कंटाळा येत नाही की घटनांची संगती तुटत नाही. अनेकदा एका प्रकरणानंतर पुढची ५०-१०० पानं त्या पात्राचा साधा उल्लेखही येत नाही. पण जेव्हा येतो तेव्हा मात्र "आता हा/ही कोण आहे बाबा?" असा प्रश्न वाचकाला पडत नाही. पूर्वी घडलेल्या घटना आणि सद्यस्थितीत घडणारे प्रसंग यांची अगदी सहज संगती लागते आणि अतिशय समरस होऊन वाहक पुढे वाचत राहतो हे या पुस्तकाचं सर्वात मोठं यश.

या पुस्तकात इतकी पात्रं आणि घटना आहेत की त्या सगळ्यांचा परामर्ष घेणं कठीण आहे. त्यापेक्षा 'तंतू' आवर्जून वाचून, अनुभव घेणं उत्तम. इतकं सशक्त कथाबीज असलेल्या पुस्तकावर आत्तापर्यंत वेबसिरीज कशी बनली नाही, बनत नाही हे आश्चर्यच आहे. अर्थात त्यासाठी लागणाऱ्या अफाट परिश्रमाची आणि अभ्यासाची, तयारीची वानवा हे एक कारण असू शकतं. असो. भैरप्पांच्या चाहत्यांनी दोन्ही पुस्तकं वाचायलाच हवीत एवढंच सांगेन.

No comments:

Post a Comment

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...