Thursday, October 21, 2010

बा धनांधांनो... !!

रात्रीचा प्रसाद, आरती वगैरे सगळं आवरून झाल्यावर विठू नुकताच आडवा पडला होता. दिवसभरातले निरनिराळे प्रसंग डोळ्यासमोर तरळून जात होते. रोजच्यासारखंच आजही गरीब, आगतिक, आशाळभूत, खचलेल्या, खंगलेल्या, प्रामाणिक, दांभिक, निर्लज्ज, कोडग्या, मिजासखोर अशा अनेक चेहर्‍यांची दर्शनं झाली होती. त्यातले किती खरे-किती खोटे, किती सच्चे-किती उगाच आलेले हे आपल्याला आजतरी ओळखता आलंय का हे त्याला नीटसं कळत नव्हतं. काहीच सांगता येत नाही या माणूसजातीचं. कधी कसे दिसतील, कसे वागतील, काय करतील कोणीच सांगू शकणार नाही. विचारांची गाडी घरंगळत घरंगळत आपल्या नेहमीच्या विषयांवर आलेली पाहून त्याला स्वतःशीच हसू आलं. अचानक दार वाजल्याचा आवाज आला. बंद झालेल्या देवळात आत्ता यावेळी कोण येणार याची कल्पना न आल्याने विठूने किंचित उठत "कोण आहे?" अशी हाळी दिली.

"मी बाबा" नेहमीचा परिचित असा धीरगंभीर पण किंचित थकलेला आवाज ऐकून विठूने पटकन दार उघडलं.

"अरे बाबा तू? ये रे आत ये.. आत्ता यावेळी कसा आलास?"

"जरा महत्वाचं बोलायचं होतं रे तुझ्याशी. बरेच दिवस विचार करत होतो. पण आज ती महत्वाची गोष्ट ऐकली आणि ठरवलं की आजच जायचं तुझ्याकडे. म्हणून उठलो आणि तडक आलो तर तू हा असा दरवाजातच प्रश्नांची सरबत्ती करतोयस"

"हा हा हा. चुकलो बाबा. ये आत ये. बस इथे निवांत."

पाणी वगैरे पिऊन थोडी तरतरी आल्यावर बाबा म्हणाला,

"कसा आहेस रे विठू?"

"मी मजेत रे. तू बोल. आणि उभा का आहेस अजून? बस की खाली.. हां आता इथे माझ्याकडे तुझ्या घरच्यासारखी सोन्याची सिंहासनं नाहीत बाबा. मी स्वतः विटेवर उभा राहणारा साधा दगडाचा देव. मी कुठून आणू सोन्याचं सिंहासन? पण म्हणून तू बसणारच नसशील तर मग राहिलं. उभा रहा बापडा. मी मात्र बसतो." विठू मिश्कीलपणे म्हणाला. तो मिश्किलपणा कळला नसल्याप्रमाणे किंवा कळून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्यागत बाबाच्या चेहर्‍यावर एक किंचित वेदना उमटली.

"अरे बाबा.. एवढा चौकोनी चेहरा करायला काय झालं? मी गंमत करत होतो." विठू.

"अरे हो. मी काही रागावलो बिगावलो नाहीये. पण खरं सांगायचं तर मला त्याविषयीच बोलायचं आहे तुझ्याशी."

"बोल ना काय झालं?"

"मला एक मदत हवीये तुझ्याकडून"

"मदत? माझ्याकडून? काय हवंय बोल."

"म्म्म्म.. थेटच विचारतो कसा."

"बोल ना"

"मला सांग तू तुझ्या भक्तांना बुद्धी कसा देतोस?"

"काय? म्हणजे? कसली बुद्धी?"

"हेच रे वागण्या-बोलण्याची वगैरे."

"ए बाबा. मला काही कळत नाहीये. काय ते स्पष्ट बोल ना जरा"

"तुला आठवतं मी शिर्डीत बसायचो ती शिळा?"

"हम्म. तिचं काय?"

"आज तीही गेली. तीही सोडली नाही या लोकांनी. तिलाही मढवली  सोन्याने. आणि आता सोन्याने मढवलीये म्हणून कडीकुलुपात बंदही करून टाकली. सोन्याचे दागदागिने झाले, हार झाले, मुकुट झाले, मेघडंबर्‍या झाल्या, सिंहासनं झाली, वस्तूंचे लिलाव झाले, प्रसादाच्या किंमती लावून झाल्या, रांगांसाठी देणग्या घेऊन झाल्या, माझ्या पूजेसाठी दहापट भावाने रकमा उकळून झाल्या, भक्तनिवासाचे भव्य प्रासाद उभारून झाले.. सगळ्यासगळ्याचं बाजारीकरण करून झालं रे. सगळ्याला किंमतींची लेबलं लावून झाली. आता माझ्या अंगावरच्या वस्तू संपल्या म्हणून मग आजूबाजूच्या गोष्टी यांच्या तावडीत सापडल्यात. आज ही शिळा मढवलीये सोन्याने उद्या तर मला वाटतं हे लोक मलाच पूर्ण सोन्यात मढवतील. मढवतील कशाला सोन्यातच घडवतील. सोन्याची मूर्ती, सोन्याचं सिंहासन आणि असंच सगळं सगळं सोन्याचं.. माझं नक्की त्या मिडास राजासारखं होणार आहे. दिसेल तिथे सोनं.. पण अर्थात मिडास राजाची ती अवस्था निदान त्याच्या कर्माने तरी झाली होती. पण माझी ही अवस्था मात्र माझ्या या स्वतःला माझा भक्त म्हणवून घेणार्‍या स्वघोषित भाविकांच्या आततायीपणामुळे, श्रीमंतीच्या आणि ती मांडण्याच्या फसव्या भ्रामक हव्यासापायी होणार आहे. घुसमटतो रे जीव. मी कधी काही मागितलंय का यांच्याकडे? मला सोन्याने मढवा, चांदीने सजवा असं कधीतरी सांगितलंय का? मी स्वतः एका साध्या कफनीवर आणि फाटक्या धोतरात राहणारा माणूस. आयुष्यात कधी सोन्याचांदीला शिवलो सुद्धा नाही. पण माझ्यामागे यांनी माझे धिंडवडे आरंभलेत रे."

विठू गहिवरला. बाबाला यावेळी इथवर आलेलं पाहिलं तेव्हाच असं काहीसं ऐकायला मिळणार याची खात्री होती तरीही गहिवरला. वाईट वाटलं त्याला. विषण्ण झाला तोही.

बाबा बोलतच होता. "आज तुझ्या गाभार्‍याबद्दलची बातमी  वाचली आणि कोण आनंद झाला. खूप अभिमान वाटला तुझा म्हणून म्हटलं प्रत्यक्ष भेटूनच विचारावं की तुझ्या भक्तांना बुद्धी देतोस तरी कसा? समजावतोस कसा त्यांना?"

विठू खिन्नपणे हसला.

"का हसलास रे?"

"काही नाही रे. तू विचारलास तोच प्रश्न विचारायला माझ्याकडे आत्तापर्यंत अनेकजण येऊन गेले. बालाजी, दगडू गणेश, सिद्धिविनायक आणि अजूनही अनेक स्नेही. त्या सगळ्यांना सांगितलं तेच तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. कोणाला बुद्धी बिद्धी देणारे आपण कोणी नाही. ज्याचं त्याला कळत असतं. पापं करा, काळे पैसे कमवा आणि मग ते असे सोन्यानाण्याच्या रुपात वाहा देवाच्या पायावर. काळ्या पैशाच्या झंझटी मिटल्या आणि पुन्हा ढीगभर पुण्य गाठीशी मारल्याचं फसवं का होईना समाधान. एक देतो म्हणून दुसरा, दुसरा देतो म्हणून तिसरा... म्हणून सातवा.... शंभरावा.... हजारावा.. पंचवीस लाखावा... चालूच सतत. अनादि कालापासून चालू आहे आणि अनंतापर्यंत चालू राहील.. आणि वर पुन्हा देवाने सांगितलं, दृष्टांत दिला, दर्शन दिलं, कौल लागला, नवसाला पावला असे आपल्याच नावाचे उलटे ढोल बडवायचे. हे आपण शिकवतो त्यांना? ही बुद्धी आपण देतो? अजिबात नाही.. मुळीच नाही.. सगळा खोटेपणा आहे रे. म्हणून म्हणतो बुद्धी बिद्धी देणारे आपण कोणी नाही रे. किंबहुना कोणीच कोणाला कसलीच बुद्धी वगैरे देऊ शकत नाही. ते त्यांच्या मनाप्रमाणे वागत असतात. तोंडी लावायला फक्त आपलं नाव. करायचं तेच करतात. किंबहुना करू नये तेच करतात."

बाबा अवाक होऊन ऐकत होता.

"तुला खरं सांगू? चूक त्यांची नाही चूक आपलीच. खूप मोठी चूक."

"आपली चूक? म्हणजे? मी नाही समजलो."

"हो आपलीच चूक. आपण त्यांच्या हृदयात नांदत होतो तोवर ठीक होतं. त्यांनी आपल्याला त्यांच्या हृदयातून काढून देव्हार्‍यात बसवलं, गाभार्‍यात स्थानापन्न केलं तेव्हाच आपण त्यांना रोखायला हवं होतं. आपल्यासमोर पहिला नारळ फोडला गेला, आपल्या अंगावर पहिलं वस्त्र चढवलं गेलं, पहिले अंगारे धुपारे केले गेले, समोरच्या पेटीत पहिला पैसा पडला किंबहुना ती पेटी तिथे ठेवली गेली त्या वेळीच, त्या प्रत्येक वेळी त्यांना तिथल्या तिथे रोखलं असतं, अडवलं असतं तर आज ही वेळ आली नसती. ही सारी फसव्या श्रीमंतीची, भ्रामक वैभवाची आरास रोजच्यारोज पाहायची आणि सगळं बाबाच्या/देवाच्या/महाराजांच्या इच्छेने, कृपेने चाललंय हे वर ऐकून घ्यायचं !! हूं .. तू मारे माझं अभिनंदन करायला आला आहेस पण तुला एक सांगतो बाबा.. आज माझा गाभारा सोन्याचा नाहीये म्हणून उद्याही तो नसेल याची मी खात्री देऊ शकत नाही रे. तू जात्यात आहेस आणि मी सुपात.. इतकाच काय तो फरक."

एक मोठ्ठा उसासा सोडून बाबा हताशपणे उठला.

"निघालास? कंटाळलास का रे माझ्या बडबडीला?"

"नाही रे. कंटाळलो नाही. कंटाळतोय कशाला.. तू खरं तेच बोलतोयस. पण तरीही मला आता गेलं पाहिजे. काकड आरतीची वेळ होत आली. गाभारा उघडायच्या आत आतमध्ये जाऊन बसलं पाहिजे. नेमका रस्त्याने चालत जाताना कोणाला दिसलो तर तो रस्ताही सोन्याने मढवून ठेवतील. म्हणून त्याच्या आत पोचलं पाहिजे रे... त्याच्या आत पोचलं पाहिजे."


*****

तळटीप : माफी मागत नाही कारण कुठल्याही देवाचा, देवळाचा, धर्माचा, देवस्थानाचा, भक्तांचा अपमान करण्याचा अजिबात उद्देश नाही. तसंच मी नास्तिकही नाही पण म्हणून स्वतःला आस्तिक म्हणवणारे करतात ते सगळंच योग्य आहे असं मानणाराही नाही त्यामुळे....... !

64 comments:

 1. अगदी मनातल लिहिलंस बघ...यावेळी जवळ जवळ बाहेरून दर्शन घेऊन निघालो ते पण पतीदेवांची भक्ती अम्मळ जास्त आहे....
  आपल्या देशात हेच सोन योग्य जागी (आणि अर्थात भ्रष्टाचार न करता....) उपयोगी आणता आलं तर काही स्वप्न कधीच खरी होणार नसतात category मधलं एक तरी खर होईल.....

  ReplyDelete
 2. आभार अपर्णा. खरंच हा असा बाजार मांडलेला बघून डोकं फिरतं नुसतं. आणि दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच चालले आहेत नुसते. अग त्या कॅटेगरीमधली स्वप्न एवढी पक्की बसली आहेत ना की ती कधीही तिथून निघणार नाहीत दुर्दैवाने.. तिथेच राहणार कायम !

  ReplyDelete
 3. कसलं भारी फटकावतोस रे... हाहाहा... खुप सरस... :) :) :D

  ReplyDelete
 4. हेरंबा, चाबूक पोस्ट झालीये.

  या बडव्यांनी बाजार मांडलाय रे भावनेचा. आणि खर तर लोक पण इतके पापी झालेत कि स्वत: पापमुक्त व्हायला देवाला पण पैसे चारायला लागली आहेत रे. भीती रे दुसर काय.

  ReplyDelete
 5. अचूक...अतिशय मार्मिक लिहिलं आहेस....

  ReplyDelete
 6. देवाला पापं करून विकत घ्यायची किंवा आपण अनैतिक मार्गाने मिळवलेल्या पैशात भागीदार करून घ्यायची ही पद्धत फार जुनी आहे. देव म्हणजे या लोकांना फोरास रोडची वेश्या वाटते, फेक पैसा, की झालं.. तो आलाच जवळ आपल्या..
  जाउ दे, जास्तंच कडवट होते आहे कॉमेंट..

  ReplyDelete
 7. खूप छान लिहिलं आहेस. आजकाल देवाच्या भक्तीचाही बाजार मांडला गेला आहे. प्रत्येक गोष्टीला पैशांत मोजतात. देवाची भक्ती करायची तर वास्तविक पैशापासून, मोहमायेपासून लांब जायला हवं! पण कोण सांगणार? आणि मुख्य म्हणजे कितीही सांगितलं तरीही ऐकणार कोण? आपलं डोकं फुटेल, पण दगडांना पाझर फुटणार नाही...

  ReplyDelete
 8. खरं आहे. शाळेत असताना एक वाक्य होतं महापुरुषांच्या विचारसरणीचा अंत त्यांच्या पश्च्यात त्यांचे अनुयायीच करतात. हा देखील त्यातलाच एक प्रकार.
  गजानन महाराजांच्या ग्रंथात दासगणू महाराजांनी लिहाले आहे.

  हे नाणे तुमचे व्यवहारी | मला ना त्याची जरूरी ||
  भावभक्ति नाण्यावरी | संतुष्ट मी रहातसे||

  पण तरीही आजकाल लोकांना दानधर्म म्हणजेच भक्ति वाटते. सगळ्यात श्रीमंत देवस्थान कोणते ह्यावर जणू स्पर्धा सुरू असल्याप्रमाणे सगळे कारभार सुरू आहेत.

  ReplyDelete
 9. एक मोठ्ठा सटाऽक!

  चं.गो.ची चारोळी आठवली.

  देवळात गेल्यावर लोक
  बाजारात गेल्यासारखं वागतात
  चार आठ आणे टाकून
  काही ना काही मागतात

  पापाच्या पैशाने विकत घेतलेलं सोनं देवांच्या मूर्ती घडवायला वापरायचं. देवळं कशाला, हल्ली गणेशोत्सवांतही हेच होतं.

  ReplyDelete
 10. देवळांमधली स्थिती हल्ली खरंच आवरा झालेली आहे!
  मार्मिक लिहिलं आहेस!

  ReplyDelete
 11. मला नेहमी वाटत कि पूर्वी हे देव राहत असावेत सदर देवळात पण आजकल ते नुसत्या दगडी मुरत्या मागे ठेवून निघून गेले असावेत

  ReplyDelete
 12. लेख तर आवडलाच हेरंब पण सगळ्यात जास्त आवडली ती तळटीप...

  यावेळच्या भारतवारीत जेजुरीला गेलो होतो तिथे तर वैताग आला होता पैसे देण्याचा... सगळा खोटा कारभार, नमस्कार करायचाय १०० रुपये द्या.. डोके टेकवायचे आणि वेगळे १०० ..काय खोटा प्रकार सगळा!!

  देवाला आपल्या गैरव्यवहारात भागिदार करायचे आणि मग त्याचा वाटा त्याला द्यायचा, किती भयंकर आहे ही कल्पना, आणि देवस्थानंही त्याला आक्षेप घेत नाहीत याचे खरं तर जास्त दु:ख वाटते!!

  कितिही उगाळलं तरी काळा कोळसा हा!!

  पोस्ट अतिशय सुंदर!!

  ReplyDelete
 13. हेरंब.... यांनी देवाला अक्षरशः बाजारात आणला रे !

  ReplyDelete
 14. म्हणूनच मला देवळात जायला आवडत नाही.एखादे वेळीच जातो. जिथे शांती आहे अशी कोणतीही जागा माझ्यासाठी मंदिरच आहे.
  देवाला हे लोक लाखो रुपये दान देतात तोच पैसा एखाद्या गावाकडच्या शाळेत प्रयोगशाळा वा वाचनालय बांधायला दिला तर... मेळघाटच्या आदिवासींसाठी पोषक आहार पुरवण्यासाठी वापरला तर...असे कितीतरी ..तर... आहेत. शेगावचे संस्थान भाविकांच्या दानाचा मोठा भाग सेवाभावी कार्यासाठी वापरते..आदिवासी कल्याण वगैरे...शिर्डी संस्थान मात्र तसं करतांना दिसत नाही.. त्यांचा बराचसा पैसा बाबाला सोन्यात मढवण्यात जातो. सेवाकार्य होते, पण ते तेवढ्यापुरतेच... (लालबागच्या राजाचा पैसा कुठे जातो??)
  बरेचसे धनदांडगे गरजूंना देणार नाहीत मात्र देवावर लाखो उधळतील.याचा फ़ायदा संस्थानांना उचलता आला पहिजे.श्रीमंतांकडून देवाच्या नावावर पैसे घ्या आणि ते गरिबांचे राहणीमान सुधारण्यावर खर्च करा. काही संस्थान तसे करतातसुद्धा . शिर्डीसारख्या श्रीमंत संस्थानाने असंच करायला हवे. जो माणूस आजन्म फ़ाटक्या वस्त्रांत राहिला त्याला आता कशाला सोन्यात मढवता? त्याला आवडत असतील काय हे सगळे देखावे?

  ReplyDelete
 15. मूर्तिपूजा ही सुखदुःखाचा लाभ केवळ जागेपणीच होऊ शकतो असे मानणाऱ्या हिंदू धर्मातील संप्रदायाची देणगी आहे. आपण सांगितलेले प्रकार हे जागेपणी होते ते सुखदुःख या कल्पनेत गुंतून पडल्याने घडत असतात. त्यावर करण्याचा उपाय प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळा असू शकतो.

  ReplyDelete
 16. मनातल सहज, सोपं आणि मार्मिक...

  ReplyDelete
 17. हेरंब,
  तुमच्या लिखाणाचा मी नेहमीच चाहता राहिलेलो आहे.
  अतिशय प्रभावी शैलीने कमीत कमी शब्दात विषयाचा अचूक वेध घेणारं लिखाण आहे आपलं. शैलीतला वेगळेपणा आणखीच वेगळा!
  असेच येत राहू द्यात. वाचतो आहोतच!

  ReplyDelete
 18. सौरभ, खूप आभार.. अरे पण काहींना नुसत्या शब्दांचा नाही पुरत ;)

  ReplyDelete
 19. सचिन, अनेक आभार. खरंय रे. पापं करा, नोटा/सोनं-नाणं ओता देवळात आणि पुण्य विकत घ्या असला प्रकार चालू आहे. :(

  ReplyDelete
 20. आनंद, खूप आभार. त्या बातम्या वाचून वैताग आला होता नुसता. ते वाचल्यावर जे सुचलं ते लिहिलं तसंच.

  ReplyDelete
 21. काका, कडवट वगैरे काही नाही हो. उलट या पैसे फेकणार्‍यांचं यथार्थ वर्णन केलंत. अगदी हीच प्रवृत्ती आहे !!

  ReplyDelete
 22. हो ना संकेत.. आणि गंमत म्हणजे ज्या साधू, संत, बाबा लोकांवर हे लोकं सोन्या-चांदीचा वर्षाव करतात ते संत प्रत्यक्षात फाटक्या वस्त्रात, लंगोटी लेवून जगले होते हा तपशील मात्र विसरतात !!

  ReplyDelete
 23. सिद्धार्थ, अगदी योग्य बोललास. प्रत्येक महापुरुषाची हीच शोकांतिका आहे. त्यांच्या अनुयायांना ते कधीच कळले नाहीत.

  गजानन महाराजांच्या पोथीतल्या त्या प्रसंगातली तू दिलेली ओवी म्हणजे माझ्या पोस्टचं सार आहे.

  ReplyDelete
 24. कांचन आभार :)

  चंगोच्या निवडक आवडत्या चारोळ्यांमधली ही माझी आवडती चारोळी. चार ओळीत चार हजार फटके दिलेत त्याने.

  >> देवळं कशाला, हल्ली गणेशोत्सवांतही हेच होतं

  गणेशोत्सवांत तर हेच होतं.. दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा ..... यादी द्यावी तेवढी कमी आहे.

  ReplyDelete
 25. बाबा, अनेक आभार.

  देवळांच्या विश्वस्त कमिट्या एकमेकींशी "भला उसका मंदिर मेरे मंदिर से आमीर कैसा?" असले खेळ खेळत असाव्यात !!

  ReplyDelete
 26. लीना, मस्तच लिहिलंस. अगदी खरंय.. देव कधीच निघून गेलेत तिथून.. !!

  ReplyDelete
 27. खूप आभार तन्वी.. अग हो ना.. उगाच माफी बिफी कशाला. "मी अपमान केला नाही मी माफी मागणार नाही" [आठवा टरफलं ;) ]

  मागे योग्याच्या ब्लॉगवर पण जेजुरीच्या देवळातले पैसे काढण्याचे प्रकार वाचले होते. वाईट वाटतं वाचून :( सगळा मुर्खपणा !!

  >> देवाला आपल्या गैरव्यवहारात भागिदार करायचे आणि मग त्याचा वाटा त्याला द्यायचा, किती भयंकर आहे ही कल्पना, आणि देवस्थानंही त्याला आक्षेप घेत नाहीत याचे खरं तर जास्त दु:ख वाटते!!

  अग देवाला भागीदार करून घेणारे आधी देवस्थानाला भागीदार करून घेतात !! म्हणून तर..

  असो.. पुन्हा एकदा आभार..

  ReplyDelete
 28. खरंय विक्रांत... आणि दुर्दैवाने त्यांना रोज नवीन नवीन गिर्‍हाईकंही मिळतायत वाढत्या संख्येने !!

  ReplyDelete
 29. संकेत, अरे आदिवासी लोक, अशिक्षित लोक शहाणे झाले, उपाशी/अर्धपोटी लोक पुरेसे जेवू लागले तर यांची दुकानं कशी चालायची. आणि पुन्हा अशा गावातल्या प्रयोगशाळा/वाचनालयांना देणग्या दिल्या तर प्रसिद्धी थोडीच मिळते? थोडक्यात हे असंच चालू राहणार.

  >> याचा फ़ायदा संस्थानांना उचलता आला पहिजे.श्रीमंतांकडून देवाच्या नावावर पैसे घ्या आणि ते गरिबांचे राहणीमान सुधारण्यावर खर्च करा.

  संस्थानांचा स्वतःचा कट असतो की. त्यामुळेच तर हे सगळं निर्धोकपणे चालू आहे. तू मेरी खुजा मी तेरी खुजाऊ !!!

  प्रतिक्रियेसाठी आभार..

  ReplyDelete
 30. अनामिक, आपली प्रतिक्रिया मला नीट कळली नाही. काही झालं तरी सोन्याच्या पादुका, मुकुट, सिंहासन करणे हा कुठल्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही एवढं मात्र नक्की !!

  ReplyDelete
 31. आका, प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

  ReplyDelete
 32. एवढ्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, शेखर. अशा प्रतिक्रिया लिखाणाचा हुरूप वाढवतात.

  ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..

  रच्याक, मला अरे-तुरे चालेल.. आवडेल..

  ReplyDelete
 33. हेरंब मस्त लिहिलं आहेस... बाकी "भक्तांच्या" कृतींवर...no comments

  ReplyDelete
 34. अभिलाष, अनेक आभार.. हो ना.. 'भक्तांच्या' कृतीवर बोलण्याची आपली योग्यता कुठली... !!

  ReplyDelete
 35. हेरंब,
  हे आमच्या मार्केट सारखंच आहे.जस मार्केट सारख वर वर किंवा खाली खाली जाऊन एक वेळ अशी येते कि एका सर्टन लेव्हलला अतिरेका मुळे जस कोणी विकत घ्यायला किंवा विकायला येत नाही तसं आहे.ती वेळ ते मार्केट असल्याने दर २-४ वर्षांनी येते येथे ती वेळ यायला काही दशके-शतके जावी लागतात/लागतील.कारण हि आत्ता कुठे तर सुरुवात आहे.माझ्या लहानपणी देवधर्म,देवळे,सोवळे-ओवळे,नवस-सायास हि त्या वेळच्या फक्त म्हातार्या-कोतार्यांची मोनोपोली होती.माझ्या लहानपणी मी स्वतः हा दगडू हलवायाचा गणपती उत्सावा व्यतरिक्तच्या वर्षभरात कल्पना हॉटेल समोरच्या बंगल्याच्या रिकाम्या कार पार्किंग मध्ये "एकाकी" आयुष्य काढतांना नि तळ्यातल्या म्हणजेच सारस बागेच्या सिद्धिविनायकाला आख्या पुण्याच्या कचर्याचा "सुंगंध" घेताना बघितला आहे.(आत्ताची हिरवळ जेथे आहे ती जागा काही वर्षे पुण्याचा कचरा डेपो म्हणून वापरली जायची.)हि अवघ्या चाळीस पन्नास वर्षा पूर्वीची गोष्ट आहे त्या मुळे हि परिस्थिती इतक्यात पालटणार नाही.लहानपणी स्वा.सावरकरांचा "जसे लोक तसे त्यांचे देव"हा आम्हाला धडा होता,"द्रष्टा पुरुष"ह्या त्यांच्या बिरुदावालीचा अर्थ कळायला मला ५० वर्षे लागली,तुला कुठे तो मिळाला तर आवर्जून वाच एवढेच ह्या क्षणी मी म्हणू शकतो नि कॉमेंटचे पोस्ट मध्ये रुपांतर व्हायच्या आत थांबतो.

  ReplyDelete
 36. लेख आवडला चाबूक झाला यात शंका नाही ,लोकांनीच देवा निर्माण केले ना मग कशाला सोनाचे मुगुट हार देवाला पाहिजे हे लोकांनीच देवाला अर्पण करावे लोकांनीच त्याचे बाजारपणकेले आहे ,कुठेतरी नोद होते ना? प्रसिद्धी मिळते ना? देवाच्या नावावर खपते ना ? पाप करून पुण्य मिलावितायेते का?लोकांनी हे टाळावे ,सरकारेने पण राजकारण न करता आशा गोष्टीची नोद घ्यावी नाहीतर देवाला चुकल्या सारखे होईल ,वाम मार्गाने काहीजण पैसे मिळविता व देवाला नवस म्हणून सोन्याने मढवीतात ना?हे लक्षण काय सागतात .देव कधीच श्रीमत वा गरीब नसतो

  ReplyDelete
 37. नि:शब्द झालो वाचून. डोळ्यातलं पाणी मुश्कीलीने परतवलं.

  ReplyDelete
 38. हेरंबा अगदी योग्य तेच लिहलयस.माझ्या मनातही हे विचार आले होतेच.बरयाचश्या देवस्थानी जे चित्र दिसते ते पाहुन माझी तिथे जायची इच्छाच होत नाही. देव जर मानतात तर देवाला सांगण्यासाठी स्वत:लाच स्वत:च्या कार्यांबद्दल प्रश्न विचारुन पहावे...मनात श्रद्धा असावी...देवाचा १ % भक्त होण्यासाठी पण जी नजर लागते ती ने सोने आणि मातीत काहीच फ़रक नसतो...महेंद्रजींनी वर सांगीतल आहे त्याप्रमाणे खरच हे लोक देवाला..... :(

  ReplyDelete
 39. खूपच छान झालिये पोस्ट...
  काय बोलणार ह्या लोकांबद्दल...इगो सुखावतो ह्यांचा...असा पैसा खर्च केल्याचे दाखवून. मला कळत नाही...हे सगळे जग च ज्याचे आहे...त्याला आपण काय देऊ शकतो...तरीही हा फुकाचा अट्टाहास...!!! :-(

  ReplyDelete
 40. खूप छान लिहिलं आहे. अगदी मनातलं.

  ReplyDelete
 41. Too good...manatale vichar shabdat vachatoy ase vaatale.

  ReplyDelete
 42. Heramb, arre jara yachi dusri baju pan tu baghavis ase mala vatate! Te Dev jar bhaktachya navsala pavat astil an tya faidyatun bhakta jar tya devala kahi det astil tar... Arre ase sahaja sahaji apan (Manasa) kunala kahi usne det nahi. agadi Rs.100-200 suddha! Ithe tar yevdhe moth mothe daan hotay te hi mannasakadunach na! Bhaktanahi manasanche kahi vait anubhav ale astil mhanun te deva kade valale astil. Bhaktanahi kahi changle anubhav ale asatil tya tya devanche! Ugeech kon konala kahi deta ka re baba?
  An ho! tyancha paisa/sona te tya devala detat..Denara kuni ek (bhakta), ghenara kuni dusra (Dev), doghanchihi kahi harkat nahi. mag apan ka ugach jalfalat karaicha? Jara bhaktancha najaretun pan bagh ki..
  Ata rahila to paisa garibana/garjuna vata.. mhanje alach ka tyana aithkhau banavana!! Arre ithe dhanya sadat challai.. hajaro ton, supreme court mhantai, garibanna mofat dhanya vata, vaya ghalavu naka.. an aplya sarkarche pratinidhi mhantat, te shakya nahi.. An SUPREME COURT cha adeshachi amalbajavani ajunahi hot nahi. Jau de. Tukoba mhantat tech barobar vatatai "Tuka mhane ugi rahave, je je hoil te te pahave"
  Ek Bolu? Kai challay, kahi kalat nahi. Kahi kalat nahi, yevedha matra kalatay..

  ReplyDelete
 43. nynac दादा,

  दगडू हलवायाच्या, सारस बागेच्या सिद्धिविनायकाच्या विषयी काहीच म्हणजे अजिबात काहीच माहित नव्हतं. !! नवीन आणि वेगळीच माहिती सांगितलीस तू. त्याबद्दल आभार.

  खरंय.. ही तर सुरुवात आहे अजून. मला वाटतं काही वर्षांतच या मोठाल्या देवस्थानांचे राजप्रासाद झालेले असतील आणि दर्शन घेताना प्रवेश फी म्हणून किमान एक तोळा सोनं वाहायची अटही असेल !!!

  स्वा. सावरकरांचा लेख शोधायला लागतो ताबडतोब. कधी वाचतो असं झालंय आता. !

  ReplyDelete
 44. काका, आभार..

  नाहीतर काय. अवाजवी श्रीमंतीचं अनाठायी प्रदर्शन मांडण्याचा हा विचित्र प्रकार कधी थांबेल का शंकाच आहे !

  ReplyDelete
 45. मंदार.. खूप आभार रे !!

  ReplyDelete
 46. प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकाने असलेच अनुभव येतात रे. गाभार्‍यात बसलेल्या देवाची किती घुसमट, कुचंबणा होत असेल नाही? दुर्दैव !! :(

  ReplyDelete
 47. मैथिली, आभार.. बर्‍याच दिवसांनी आलीस. कॉलेजमस्तीत फुलटू बिझी का? :)

  अगदी योग्य.. हे सगळं स्वतःचे इगो कुरवाळण्यासाठीच चालू असतं आणि संपत्तीचं प्रदर्शन !!

  >> हे सगळे जग च ज्याचे आहे...त्याला आपण काय देऊ शकतो

  एकदम परफेक्ट !!

  ReplyDelete
 48. अनामिक, खूप आभार.

  ReplyDelete
 49. तेजस, प्रतिक्रियेबद्दल आणि ब्लॉगला भेट दिल्याबद्दल अनेक आभार. ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत राहा !!

  ReplyDelete
 50. साईसाक्षी,

  क्षमस्व पण मला तुम्ही म्हणताय ती दुसरी बाजू अजिबात पटली नाही. देव भक्ताचा फायदा करतो आणि म्हणून भक्त देवाला सोनंनाणं वाहतो.. !!! काय दुकान आहे की काय हे??


  >> Denara kuni ek (bhakta), ghenara kuni dusra (Dev), doghanchihi kahi harkat nahi. mag apan ka ugach jalfalat karaicha?

  दोघांनाही काही हरकत नाही हे तुम्हाला कसं कळलं बरं? देवाला हरकत असेल तर? आणि कदाचित काही भक्तांनाही हरकत असेल तर? "एक देतो म्हणून दुसरा, दुसरा देतो म्हणून तिसरा... म्हणून सातवा.... शंभरावा.... हजारावा.. पंचवीस लाखावा... चालूच सतत" यातून मी हेचतर सांगण्याचा प्रयत्न केलाय.. आणि माझा का जळफळाट होणार हो? इतरांची श्रीमंती बघून जळफळाट होत नसला तरी स्वतःला भक्त म्हणवणार्‍यांची बौद्धिक दिवाळखोरी बघितली की अपार विषाद मात्र होतो.. !!

  गरिबांना धान्य मोफत वाटण्याचा आणि देवळात सोनंचांदी वाहण्याचा/न वाहण्याचा बादरायण संबंध मला तरी कळला नाही. नाकी काय म्हणायचंय तुम्हाला? असो..

  प्रतिक्रियेबद्दल आभार. ब्लॉगवर स्वागत !

  ReplyDelete
 51. खरय हेरंब जेव्हा पहिल्यांदा शिर्डीला पाय लागले तेव्हा पासून हा बदल बघत आलोय रे...साईबाबांच्या त्या मुर्तीची शांत मुद्रा बघायला जातो प्रत्येकवर्षी..त्यांचा मी निस्सीम भक्त पण त्या फकिराच्या (माफ कर, पण..मी असा का म्हणतोय ते माहीत आहेच तुला) आजूबाजूला साई साई करत एवढे एवढे पैसे मढवले आहेत त्या लोकांनी की काय सांगू देवाचा देवपण हरवून बसलोय यार...आता ते बाबापण म्हणत असेल ह्या लोकांसाठी आता सबका मालिक एकच पैसा आणि पैसा कारण पैसाच माझा श्रेष्ठत्व घडवतोय
  :( :( :( :(

  ReplyDelete
 52. खरंय रे सुहास. तुझ्यासारख्या निस्सीम शिर्डीभक्तांना तर काय वाटत असेल याची कल्पनाच करवत नाही..

  सबका मालिक एकच.. पैसा !! हे दुर्दैवाने फार फार खरं आहे !!!

  ReplyDelete
 53. शिर्डीला जाऊन अनेक वर्षे झाली.. आता जावेसे नाही वाटत... मनाचे समाधान आणि शांती नाही मिळत. त्यापेक्षा ठाण्यात असलेले साईबाबा मंदिर किती छान आणि शांत असते.

  हेरंबा... आज नाही पण उद्याचा काय भरोसा??? वारकरी संप्रदायाने योग्य असा निर्णय घेतलाय... आनंद झाला...

  ReplyDelete
 54. रोहणा, बाबांच्या शिर्डीची त्यांच्या भक्त म्हणवणार्‍यांनीच लावलेली वाट पाहून खरंच विषण्ण व्हायला होतं !! कालाय तस्मै नमः !

  > वारकरी संप्रदायाने योग्य असा निर्णय घेतलाय.

  अर्थातच. पण कुठवर. किती दिवस?

  ReplyDelete
 55. well written. as our venerable thespian shree sriram lagoo has rightly said - "god should be retired" - how appropriate.

  ReplyDelete
 56. धन्यवाद उदय. पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे मी नास्तिक वगैरे नाही.. त्यामुळे 'देवाला रिटायर करा' या डॉ लागूंच्या विधानाशी मी पूर्णतः असहमत आहे.

  ReplyDelete
 57. तो सोन्याचा ढीग पाहून फकीर शब्दाची टर उडवल्यासारखे वाटते. बाबांनी जे नको म्हटले तेच त्यांच्या मूर्तीवर लादून भक्ती दाखवण्याचा काय प्रकार आहे कळत नाही. देवस्थानाला धनाची आवश्यकता भासतेच. त्यांचे अन्नछत्र चालू असते, भक्तीनिवास असतात, यासाठी इच्छुक सरळ देवस्थानाला पैसे का देत नाहीत? ते धन बाबांनाच पोहोचेल ना?
  त्यांची काय पध्दत आहे समजतच नाही.

  ReplyDelete
 58. अगदी खरं मीनल. आपल्याला माहित असलेल्या मराठी प्रमाणे फकीर आणि सोनं या एकमेकांच्या विरुद्धार्थी संज्ञा आहेत. पण या फकिराच्या भक्तांचे आणि आपले शब्दकोश जुळत नाहीत म्हणायचे.

  >> यासाठी इच्छुक सरळ देवस्थानाला पैसे का देत नाहीत? ते धन बाबांनाच पोहोचेल ना?

  ते धन बाबांपर्यंत पोचावं अशी कुठे इच्छा असते. काळा पैसा पांढरा व्हावा आणि त्यायोगे आपलं नावही मिरवलं जावं हे उद्देश सरळ देवस्थानाला पैसे दिल्याने सफल होणार नाहीत ना. !!

  ReplyDelete
 59. लेखच टायटल आणि सुरुवात प्रचंड आवडली... त्यामुळेच लेखही दोनदा वाचला...! तुमची आणि आमची बाबा आणि त्यांच्या भक्तांबाबतची मते सारखीच... धन्यवाद!

  ReplyDelete
 60. धन्यवाद अभिषेक. एवढ्या जुन्या लेखांवर प्रतिक्रिया आलेल्या बघून आनंदच होतो.

  ReplyDelete
 61. ek sangu ka manapsun tumche blog che backgound pahila badala vachata yet nahi o nit. vinanti manapasun vatvat satyavan

  ReplyDelete
 62. वर्षा, ओके. बॅकग्राउंड मध्ये काही बदल करता येतो का बघतो. तुम्ही कुठला ब्राऊजर वापरता आहात? कारण यापूर्वी कधीच कोणीच अशी काही तक्रार केल्याचं स्मरत नाहीये म्हणून विचारतोय.

  ReplyDelete

हिंसक आंतरराष्ट्रीय राजकारणाचं प्रत्ययकारी चित्रण : 'राजकीय हत्या'

आपल्या (तथाकथित!) सुसंस्कृत समाजात नियमितपणे घडणाऱ्या मोर्चे ,  धरणी , आंदोलनं यांसारख्या घटना किंवा अगदी सार्वजनिक उत्सव , समारंभ , मिरवणुक...