Saturday, October 2, 2010

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ४

'माझे खादाडीचे प्रयोग : भाग १' इथे  वाचा
'माझे खादाडीचे प्रयोग : भाग २' इथे  वाचा
'माझे खादाडीचे प्रयोग : भाग ३' इथे  वाचा

हल्ली हा माणूस ब्लॉगची जाहिरात करण्यासाठी स्वतःच्याच जुन्या पोस्ट्सचे दुवे देत असतो असा विचार करणार्‍यांनी ही पोस्ट इथपासून वाचावी आणि असा विचार न करणार्‍यांनी वाचन चालू ठेवण्यास हरकत नाय.

पूर्वसूचना किंवा वैधानिक इशारा किंवा 'डिस्को ला लेमन' लावतात ते कायतरी (पाकिटावरचा वैधानिक इशारा वाचता वाचता लोकं त्याच्यावरच धूर सोडतात तसा हा इशारा वाचूनही तुम्ही त्याच्याकडे धूर सोडलात आपलं दुर्लक्ष केलंत तर ......... काय होईल ते मग सांगतो) :

१. ही कुठलीही कथा नाही
२. तसेच ही कुठलीही लेखमाला, स्तंभ, दीर्घकथा, कादंबरी वगैरे वगैरे काहीही नाही.
३. (त्यामुळेच) 'भाग १' चा 'भाग २' शी काहीही संबंध नाही. तसेच 'भाग २' चा 'भाग ३' शी काहीही संबंध नाही आणि अर्थातच 'भाग ३' चा 'भाग ४' शी पक्षि या भागाशी काहीही संबंध नाही.
४. (अजून एक....) 'भाग २' चा 'भाग ४' शी तसेच 'भाग ३' चा 'भाग ४' शी व यांचा कोणाचाही उलट्या क्रमाने कोणाशीही कसलाही काहीहीहीहीहीहीही संबंध नाही.

"वुई नॉक्ड ऑन नेहाज विंडो युजिंग सम पेबल्स फ्रॉम द रूफ. नथिंग हॅपन्ड अ‍ॅट द फर्स्ट पेबल, नथिंग ऑन द सेकंड अँड थर्ड" हे भगतच्या एफपीएस मधल्या माझ्या अनेक आवडत्या भारीभारी वाक्यांपैकी एक वाक्य. त्याच्या सदृश एखादं वाक्य मला कधीपासून एखाद्या पोस्टीत वापरायचं होतं.. अनायासे संधी चालून आली म्हणून वापरून टाकलं. ठांकतू चेतू... हे 'उप-डिस्को-लेमन' हे अट क्र ३ आणि क्र ४ यांच्यासाठी होते हे ज्यांच्या लक्षात आले नसेल त्यांनी 'फाईव्ह पॉईंट समवन' वाचण्याचे ताबडतोबीने करावे. (अर्थात ही पोस्ट वाचून झाल्यानंतर)

असो. तर या चारी पोस्टींचा एकमेकींशी असलेला संबंध आला लक्षात? थांबा.. अजून सोपं करून सांगतो. 'एमबीबीएस' आणि 'लगे रहो' मध्ये मुन्नाभाई (आणि हो सर्किटही) सोडून सामाईक काय आहे? काहीही नाही ना? तसंच या सर्व भागांमध्ये खादाडी सोडून अन्य काहीही सामाईक नाही. आलं लक्षात? हुश्श [टण्ण : जीव भांड्यात पडल्याचा आवाज. (वाचकांचा) ] .. ('चित्रपटांचे जनमानसावर होणारे दुरगामी परिणाम' या विषयावर लवकरच एक प्रबंध लिहिण्याचे चित्ती वसते आहे.)

ही पोस्ट कशाबद्दल होती बरं? अरे हो आठवलं आठवलं. खादाडीचे प्रयोग नाही का.... सूचना जरा जास्तच लांबल्या खर्‍या.. पण पोस्टीपेक्षा प्रस्तावना जड असं होतं कधीकधी (????).. तुम्हाला तर सवय आहेच. असो.

खाली एक महत्वाचा व उपयुक्त फोटू दिला आहे. परंतु पूर्ण पोस्ट वाचून झाल्याशिवाय तो फोटू बघू नये. जे वाचक ही आज्ञा धुडकावतील त्यांच्या

१. प्लेटमधल्या लाडवांची शंभर शकलं होऊन त्यांच्याच प्लेट मध्ये लोळत पडतील.
२. मॅगीवडे तळले जाणार नाहीत.
३. नान-पिझ्झा खाणे नशिबी येईल
४. चिवड्याचे पोहे मऊ होतील, दाणे खवट निघतील (या शापांवर विश्वास नसणार्‍यांनी चिवड्याची आपलं विषाची परीक्षा घेऊन बघाच.)

चला तर मग.. करुया आजच्या खादाडीची सुरुवात. पण आजची खादाडी ही नेहमीच्या खादाड्यांपेक्षा वेगळी आहे. बरीच वेगळी आहे. सगळ्या खादाडी ब्लॉग्ज आणि पुस्तकांमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या एका विषयावर आपली आजची खादाडी पोस्ट आहे. म्हणजे तिखट/गोड जेवण, पंचपक्वान्नं, नाश्त्याचे पदार्थ, ब्रेडचे प्रकार, भाताचे प्रकार, पराठ्यांचे प्रकार, उपमा, पोहे, लाडू, मोदक, पंजाबी डिशेस, पिझ्झा, पुलाव, बिर्याणी किंवा अगदी वरणभात (हो. एका साईटवर मी हे ही बघितलं आहे.) या पदार्थांच्या यादीत न बसणारा आणि या गर्दीत कव्हर न होणारा एक पदार्थाचा प्रकार आहे जो मलातरी नियमित लागतो आणि ही पोस्ट वाचणार्‍या माझ्यासारख्याच (अधाशी) वाचकांनाही तो लागतोच लागतो हे ही मला नक्की माहित आहे. कारण आपल्यापैकी कोणीच (कितीही ठरवलं आणि कितीही कंट्रोल केला तरी) नाश्ता, जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण एवढ्या (च) 'चौफेर' आहारात स्वतःला सीमित ठेवू शकत नाही. या चौफेर्‍यांच्या मधल्या चार फेर्‍यांचं काय? त्याचा कोणीच म्हणजे कोणीच विचार करत नाही. मग तो अगदी संजू असो कि कमलाबाई असोत ;) (ह. घे.) .. तर आजच्या पोस्टच्या खादाडी प्रकाराचं नाव आहे 'अधल्यामधल्या वेळेत तोंडात टाकायचे पदार्थ' .. अहा .. बघा, अधल्या मधल्या वेळचा पदार्थ आहे पण नाव कसं भरभक्कम.. भारी एकदम.. एकदम मूर्ती लहान पण कीर्ती महान. पण घाबरू नका. एवढं भलंमोठं नाव असलेला पदार्थ बनवणं अगदी सोप्पं आहे. एकदमच सोप्पं. तर आजचा पदार्थ आहे........ बोर्नव्हिटा-साखर.

बोर्नव्हिटा-साखर :

१. एक वाटी घ्या.

२. एक चमचा घ्या

३. हात वर करून वरच्या खणाच्या कोपर्‍यात ठेवलेली बोर्नव्हिटाची बरणी खाली काढा. बोर्नव्हिटा वर ठेवलेला नसल्यास हात वर करण्याची आवश्यकता नाही. तसाच काढा. ही डिश अधिक चवदार बनवायची असेल तर हीच बरणी गुपचूप काढल्यासारखा अभिनय करा. आपल्याकडे विचित्र नजरेने बघणार्‍या आजूबाजूच्या (असल्यास) 'बायको' किंवा (नसल्यास) अन्य कोणीही यांना अनुल्लेखाने मारा.

४. एक भलामोठा, रांगड्या गड्याला शोभेसा (स्त्रीवाचकांनी इथे 'रणरागिणीला' असे वाचावे) टेबलस्पून घेऊन तो बोर्नव्हिटाच्या बाटलीत बुडवा आणि खसकन वर काढा.

५. चमच्यावर स्फिंक्सच्या पिरॅमिडाला लाजवेल असा आकार तयार होत नाही तंवर चौथी पायरी चढत रहा.

६. तो सुबक आकार क्र. १ च्या वाटीत (म्हणजे क्र. १ च्या पायरीत सांगितलेल्या वाटीत.) ओता. हा कंस खरं तर "क्र. १ ची वाटी? म्हणजे? आणि क्र. २ ची वाटी कुठली मग?" वगैरे असे प्रश्न विचारणार्‍या वाचकांसाठी होता पण हे स्पष्टीकरण टाकायला कंसाच्या आधी जागा नसल्याने ते इथेच टाकलं आहे आणि त्यामुळे हे प्रश्न न विचारणार्‍या वाचकांनाही तो दुर्दैवाने वाचावा लागला. (आमच्यात इतरांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची पद्धत नाही याची कृ नों घे.)

७. आता क्र. ३ मधल्या बोर्नव्हिटाच्या बरणीप्रमाणेच साखरेची बरणी काढा, आवश्यकता असेल तरच हात वर करा, अभिनय करा, अनुल्लेखाने मारा वगैरे वगैरे सगळं शेम टू शेम.

८. पुन्हा क्र. १ च्या वाटीत (यावेळी स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही याची खात्री आहे. तरीही हवं असेल तर पायरी क्र. ६, कंस क्र. १ पहा.) चवीपुरती साखर घाला. बेचवीपुरती घातलीत तर अजून चांगलं.

९. वाटीतलं मिश्रण किंचित ढवळल्यासारखं करून एक चमचाभर तोंडात घाला.

१०. एक हात पोटावर फिरवत तोंडाने 'अम्हहहहहह' असा तृप्तीचा (म्हणजे स्वतःचाच हो. नाहीतर उगाच मिमिक्र्या करत बसाल.) आवाज काढा. क्र. ५ आणि क्र. ८ मधले स्फिंक्सचे आकार जितक्या प्रमाणात लहान असतात तितक्या प्रमाणात हे 'अम्हहहहहह' वाले तृप्तीचे (स्वतःचे) आवाज लहान येतात हा स्वानुभव आहे. तेव्हा चांगल्या आवाजासाठी क्र. ५ आणि क्र. ८ चा चांगला सराव करा. ही डिश (पक्षि वाटी) दिसते तेवढी, वाटते तेवढी सोपी नाही त्यामुळे सगळ्याच पायर्‍यांचा जेवढा अधिक सराव कराल तेवढेच अधिकाधिक समाधान पावाल !!!!


अर्थात हे मिश्रण गार दुधातून घेतल्यासही असेच स्वर्गसुख लाभते हा ही स्वानुभव आहे. त्याची रेसिपी देण्याचेही मनात होतेच परंतु ती विषयाशी प्रतारणा ठरेल. कारण आपला आजचा विषय हा खादाडी आहे परंतु 'कोल्ड बोर्नव्हिटा' हा पिदाडी विभागात येत असल्याने ते 'आउट ऑफ सिल्याबस' आहे. त्यामुळे ती रेसिपी आज इथे देऊ शकत नाही. पायरी क्र. ६ मधील कंस क्र. २ इथे लागू होतो हे विसरू नये.

एक काम करुया. 'पिदाडीच्या प्रयोगां' वरच्या पुढच्या एखाद्या पोस्टीत 'कोल्ड बोर्नव्हिटा' कव्हर करू. मात्र तोवर वाचकांनी स्वतः प्रयोग करून बघावेत असे आम्ही मुळीच सुचवणार नाही. कारण पुरेशा मार्गदर्शनाअभावी 'कोल्ड बोर्नव्हिटा' चा 'लोल बोर्नव्हिटा' झाल्यास गुर्जी जवाबदार नाहीत याची समस्त 'उतावीळ एकलव्यांनी' नोंद घ्यावी.

34 comments:

 1. >>>>
  कारण पुरेशा मार्गदर्शनाअभावी 'कोल्ड बोर्नव्हिटा' चा 'लोल बोर्नव्हिटा' झाल्यास गुर्जी जवाबदार नाहीत याची समस्त 'उतावीळ एकलव्यांनी' नोंद घ्यावी. ... :)... :D

  गुर्जी मानले तुम्हाला... :)

  .....एक रणरागिणी

  ReplyDelete
 2. काय आवडलं हे सांगण्यासाठी काय काय पेस्टू ? प्रत्येक वाक्यावर हसू आलं, तरी पिदाडी विभाग लय भारी....
  ह ह पो दु ( हसून हसून पोट दुखलं)

  खुप भारी ;)

  ReplyDelete
 3. हेरंबा, बोर्नव्हिटा आपला खूप फेवरेट. राजमाची ट्रेकला जेव्हा त्या जंगलात आम्हाला काही गरम प्यायची इच्छा झाली तेव्हा कॉफी ऐवजी बोर्नव्हिटाच निवडला, प्रचंड पावसात बोर्नव्हिटा घेतल्यावर पॅकेट मधला बोर्नव्हिटा खराब होईल म्हणून तो तळहातावर घेऊन जिभेने चाटत चाटत चालू लागलो...ती चव विसरू शकणार नाहीच कधी :)

  ReplyDelete
 4. एकंदरीत तुला "बझोपास" भलताच मानवला आहे असं दिसतंय. पण जास्त गोडाचं बोलशील तर निषेधाच्या वर काहीतरी कराव लागेल....सध्या तरी खा खा...साखरेचे इतकच...

  ReplyDelete
 5. हा प्रकार मी खूपदा केलाय... जबरदस्त आवडायचं मला.चमचाभर बोर्नविटामधे १ किंवा २ चमचे साखर टाकायचो, मूड असला तर ३ चमचे सुद्धा. कधी कधी याला फ़्रीजरमधे ठेवून ते गारेगार पि-खाण्या्चे (semisolid असते ना!)प्रकार करायचो...मजा येते. तू यार कोणत्याही विषयावर भन्नाट पोस्टतोस. माझा आवडता "बोसा" अजरामर केल्याबद्दल धन्स.धन्स..धन्स. त्रिवार धन्स..MIND IT मित्र मंडळातर्फे आपले जाहीर आभार...
  त .टी. :- १. तू आपल्या लेखांची विपुस्तक किंवा छापुस्तक काढ. छापुस्तक काढल्यास मराठी साहित्य प्रकाशन व्यवसायाला सुगीचे दिवस येतील.
  २. पांचटपणाची फोडणी थोSSSडी कमी करणे.(असं माझं वयक्तिक मत आहे(हे असं सांगितले की बरं असतं.)बाकी आप सोचें.)

  ReplyDelete
 6. =)) लौली... पौष्टीक आहार आहे हा...

  ReplyDelete
 7. बोर्नव्हिटा-साखरेची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. कुकींग ब्लॉगवर वरणभात? आयला! बझ्झवर नसल्याचा सुपरिणाम दिसतो आहे. तो तसाच राहू दे. जय हिंद! (हे का म्हटलं ते विचारू नकोस. खूप दिवस म्हटलं नव्हतं म्हणून म्हणावसं वाटलं. नेमकी आजच गांधी जयंती आणि ललबहादूर शास्त्री जयंती आहे. हा योगायोग आहे. याचा शेवट्च्या [म्हणजे ( असा कंस सुरू होण्याधीच्या] उद्गारांशी काहीही संबंध नाही.)

  ReplyDelete
 8. आनंद पत्रे +१
  आणि सौरभ +२
  त्यापुढे
  तन्वीताई +१
  आणि शेवटी ... चॅलेंज (हद्द झाली पाचकळपणाची)

  ReplyDelete
 9. गुर्जी नम्स्कार,
  खमंग पोस्ट एकदम अधाशासारखी वाचत गेलो...आणि 'अम्हहहहहह' 'अम्हहहहहह' 'अम्हहहहहह' ...

  ReplyDelete
 10. हीहीही... छान हाय. मजा आली वाचताना.

  ReplyDelete
 11. मला बोर्नविटा त्यासाठीच आवडतो...रात्री अपरात्री झोपेतून उठून हेच खायचो...शेवटी दात खराब झाले :( कारण ते खावून तसाच झोपायचो ..
  बाकी पोस्ट मस्तच

  ReplyDelete
 12. आपल्याला ज्याम आवडली ही खादाडी, हेरंबभौ !!

  ReplyDelete
 13. ya resipivar aamhi daha varshe kadhalit.....hostelvar....ratri hamakhas dudha nasalela asayacha......

  ReplyDelete
 14. हा हा हा.... जबरदस्त! पायरी क्र. ३ सगळ्यात भारी!!

  ReplyDelete
 15. रणरागिणीताई, प्रतिक्रियेची तलवार सपासप फिरवल्याबद्दल गुर्जी हाबारि हायेत ;)

  ReplyDelete
 16. आनंदा, हाबार रे.. पिदाडी विभाग आयत्या वेळी सुचलेला प्रकार होता.. मलाई आवडला म्हणून शेवटी टाकला पटकन.. :)

  ह ह पो दु वर 'बोसा' खाणे हा एक चांगला उपाय आहे. ट्राय करून बघ :P

  ReplyDelete
 17. सुहास, बोर्नव्हिटाला पर्याय नाही यार. खरंच अमृत आहे अमृत. पण मला गरमपेक्षा थंडगार जास्त आवडतो.

  >> पॅकेट मधला बोर्नव्हिटा खराब होईल म्हणून तो तळहातावर घेऊन जिभेने चाटत चाटत

  आयला डोळ्यासमोर दिसतंय ते.. (आणि रात्री २ वाजता मला बोर्नव्हिटाची तल्लफही आलीये ;) )

  ReplyDelete
 18. अपर्णा, अग मानवला बिनवला कसला... आत्ता या क्षणी मी कंप्लीट ब्लँक आहे. पुढे काय सुचेल, कधी सुचेल याची कणमात्रही कल्पना नाही. असो..

  निषेधाच्या वर काहीतरी करायचं असेल तर एक खादाडी निषेधावर पोस्टच टाकून दे कशी :)

  ReplyDelete
 19. संकेत, वा वा.. समसुखी भेटला तर.. मला वाटायचं मलाच हे असलं आवडतं की काय :)

  >> पि-खाण्या्चे

  हे भार्री होतं यार...

  MIND IT मित्र मंडळातर्फे एवढं कौतुक ??? रजनी रजनी रजनी (हे "राम राम राम" च्या तालात वाचावे..) .. लवकरच हे उपकार यथासांग 'रजनीव्रत(थ)' करून फेडले जातील याची का(खा)त्री बाळगा;)

  हरभर्‍याच्या झाडाच्या शेंड्यावर वर ढकलून देत देत शेवटच्या वाक्यात एकदम रोखलंस त्याबद्दल खूप खूप आभार्स.. अरे या पोस्टीत फार म्हणजे फारच पांचटपणा झाला हे जाणवलं मलाही लिहून झाल्यावर. पण ते त्या फ्लो मध्ये लिहिलं गेलं. एक बार पांचट लिहानेका ठरवा तो मै अपने आप की भी नही सुनता.. पण पुढच्या वेळेस पासून काळजी घेईन.. भर्पूर हाबार !!

  ReplyDelete
 20. सौरभ, लौली.. हा हा हा ... हा हा हा .... हा हा हा हा हा हा !!! भर्पूर हाबार !!

  ReplyDelete
 21. कांचन, चला तुही आहेस तर बोर्नव्हिटा-साखर टीम मध्ये.. लय भारी !!

  सुपरिणाम !! ह्म्म्म.. अग बघू किती दिवस राहतोय.. आत्ता अपर्णाला म्हटल्याप्रमाणे सध्या तरी डोळ्यापुढे अंधारी आहे.. असो.. बघू :)

  जय हिंद.. जय हिंद... (मीही हे दोनदा का लिहिलं त्याचं कारण विचारू नकोस. कारण कारण मलाच माहित नाही ;) )

  ReplyDelete
 22. बाबा, पाचकळ ब्लॉगच्या पाचकळ पोस्टींवर पाचकळपणाच्या हद्दीच्या बाहेरच्या कमेंट्स येणार नाहीतर काय होणार? ;) .. भप्रूर हाबार रे..

  आणि ह्यो घ्या आमचा (पुन्यांदा, अजून एक) पाचकळपणा.... उचलेंज !!!! ;)

  ReplyDelete
 23. वत्सा देवेन, तुजप्रत कल्याण असो :P

  तुझी अधाशी प्रतिक्रिया वाचून आम्हीही 'अम्हहहहहह' 'अम्हहहहहह' 'अम्हहहहहह' ;) .. लय हाबार रे !!

  ReplyDelete
 24. संकेत (आपटे), धन्यवाद शेठ.. खुप्खूप हाबार !!

  ReplyDelete
 25. सागरा, अरे 'बोसा' खाऊन 'लोल बोर्नव्हिटा' ने खळखळून चूळ भरली की दात एकदम स्वच्छ आणि निरोगी होतात असं ऐकलं आहे.. ट्राय मारून बघ ;) ... प्रतिक्रियेबद्दल हाबार्स !!

  ReplyDelete
 26. विक्रांतशेठ, आहेच ही एकदम भारी खादाडी !! :).. खूप आभार्स !!

  ReplyDelete
 27. सुषमेय, हा हा दहा वर्षं .. सहीच.. तुही चांगलाच कसलेला आहेस.. थोडक्यात 'बोसा'चे अनेक चाहते आपल्यातच मौजूद आहेत तर !! सही सही जाम सही.. :)

  ReplyDelete
 28. अभिलाष, हे हे .. धन्स रे.. माझीही ती पायरीच एकदम फेव्हरेट आहे.. (अनुल्लेखाने मारायला मिळाल्यामुळे :P)

  ReplyDelete
 29. लोळा...लोळी....हसु हसुन पुरेवाट...

  ReplyDelete
 30. यवगेश :D ... हाबार्स रे बंधु !!

  ReplyDelete
 31. शब्दार्थ:
  अफलातून = वरील मजकूर.

  बाय द वे. नुसता कोरडा बोर्नव्हीटा फक्की स्वरूपात मारला असेलच.

  त्याचा ठसका घशात गेला तर ब्रह्मांड.

  ReplyDelete
 32. बघ मी आज घरी येताना बॉटलच घेऊन आलो बोर्नव्हिटाची, चहा बंद ;)

  ReplyDelete
 33. नचिकेत, खू हाबार्स :)

  हो तेही केलंय एकदा. नाकातून गाळला होता बोर्नव्हिटा तेव्हा.. ;) शिंकांनी हैराण :)

  ReplyDelete
 34. सुहास, चला.. चहासारख्या 'उत्त्तेजक पेयापासून अलिप्त' झालास हे बरं केलंस :P

  ReplyDelete

हिंसक आंतरराष्ट्रीय राजकारणाचं प्रत्ययकारी चित्रण : 'राजकीय हत्या'

आपल्या (तथाकथित!) सुसंस्कृत समाजात नियमितपणे घडणाऱ्या मोर्चे ,  धरणी , आंदोलनं यांसारख्या घटना किंवा अगदी सार्वजनिक उत्सव , समारंभ , मिरवणुक...