Wednesday, May 5, 2010

संभ्रम आणि कोंडमारा


मागे एका पुस्तक प्रदर्शनातून दोन पुस्तकं आणली. 'संभ्रम' आणि 'कोंडमारा'. दोन्ही अनिल अवचटांची. निव्वळ अनिल अवचटांची आहेत म्हणून डोळे झाकून घेतली. त्यापूर्वी स्वतःविषयी, माणसं, छंदाविषयी, अमेरिका, मोर, धागे आडवे उभे, प्रश्न आणि प्रश्न, दिसले ते, कार्यरत अशी अनेक पुस्तकं वाचली होती आणि प्रत्येक पुस्तक वाचून झाल्यावर (अपवाद छंदाविषयी, दिसले ते आणि मोर. ही तीन मला विशेष आवडली नाहीत.) काही वेळा निराशा, तगमग काही वेळा सामाजिक जाणीवा वृद्धिंगत होण्याचा अनुभव, काही वेळा 'तेथे कर माझे जुळती' चा अनुभव असे वेगवेगळे अनुभव घेतले होते. पण ही 'संभ्रम' आणि 'कोंडमारा' बहुतेक आउट-ऑफ-प्रिंट होती काही महिने. त्यामुळे ती त्या प्रदर्शनात दिसताक्षणी उचलली.

**
संभ्रम 

अनिल अवचटांच्या नियमित वाचकांना त्यांची लेखन शैली माहीत आहेच. ते नेहमी समाजातले जातीभेद, शोषितांच्या समस्या, तळागाळातल्या लोकांची दु:ख, धार्मिक/समाजिक/आर्थिक भेदभाव इत्यादी विषयांवर अत्यंत तळमळीने लिखाण करतात. परंतु त्यांचं  लिखाण कधीही प्रक्षोभक नसतं. अन्यायाविरुध्द लिहितानाही अतिशय संयत लिहितात ते.

त्यांनी अनेक पुस्तकांमध्ये तळागाळातल्या लोकांच्या अंधश्रद्धांवर प्रहार केले आहेत पण संभ्रम या पुस्तकाचं वैशिष्ठ्य म्हणजे या पुस्तकात त्यांनी चक्क मध्यमवर्गीय लोकांच्या अंधश्रद्धांवर आसूड ओढला आहे. खरं तर त्यांची संयत शैली पाहता त्या लेखनाला आसूड म्हणणं थोडं धारिष्ट्याचं होईल. पण शहाण्याला शब्दाचा (आसूड) !! या पुस्तकात त्यांनी पुण्यातला मीरा दातारचा दर्गा, काळूबाईच्या डोंगरावरची जत्रा, रमा माता, भगवान रजनीश (ओशो), सदानंद महाराज, न्यायरत्न धुंडीराज विनोद, देवदासी वगैरे विषय तर घेतले आहेतच परंतु आश्चर्यकारकरित्या त्यांनी शिर्डीचे साईबाबा आणि समर्थ रामदासांच्या पादुका या विषयांवरही एकेक प्रकरण लिहिलं आहे. पण लेखकाचा साईबाबा आणि समर्थ रामदास या संतांवर हल्ला करण्याचा नसून त्या त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, भक्तांकडून जोपासल्या जाणार्‍या अंधश्रद्धांवर हल्ला करणे हा मुख्य हेतू आहे हे त्या त्या प्रकरणांना दिलेल्या शीर्षकांवरून जाणवतं. 

- समर्थांच्या पादुका 
- साईबाबांची शिर्डी

अर्थात नेहमीप्रमाणेच हा हल्ला कुठेही जराही आक्रमक वगैरे होत नाही. उलट लेखक जास्तीत जास्त सौम्य भाषेत परंतु सभोवतालच्या  परिस्थितीचं अगदी बारीकसारीक वर्णन करून त्यातून काय अर्थ घ्यायचा हे वाचकांवर सोडतो. या पुस्तकात भक्तांची जी विविध विचित्र उदाहरणं, प्रसंग, अनुभव दिलेले आहेत ते वाचता वाचता कित्येकदा मला आश्चर्यचकित होऊन हसायला येत होतं. पण हसता हसता अचानक मनात कुठेतरी एक विचारही चमकून गेला की ज्यांना आपण हसतो आहोत त्यांच्या इतका नाही तरी त्यांच्या अगदी जेमतेम १% मुर्खपणा आपणही करत नाही का रोजच्या आयुष्यात अनेक वेळा?? आणि जाणवतं, खरंच संभ्रम आहे .. !!

**
कोंडमारा 

'कोंडमारा' चं एकेक प्रकरण वाचताना जीवाची अक्षरशः घालमेल होते.. खरंच कोंडमारा होतो जातीपातीच्या भिंती आणि त्यातून येणारे जातींवर आधारलेलं उच्चनीचपणाचे समज, आणि अजूनही खेडेगावात (काही प्रकरणं मुंबईतली सुद्धा आहेत. उदा. वरळीची दंगल.. खरंच विश्वास बसत नाही !!!) कसोशीने पाळले जाणारे (पाळायला भाग पाडले जाणारे) जातीपातींचे नियम वाचून. 

या पुस्तकात महाराष्ट्राच्या गावागावात दलित, महार, मातंग, मांग, नवबौद्ध या 'तथाकथित' नीच जातींवर मराठे, पाटील आणि इतर 'तथाकथित' उच्च वर्णीयांकडून वेळोवेळी केला गेलेला भयानक अत्याचार मांडला आहे. सगळी प्रकरणं दंगली -- म्हणजे दलितांविरुद्ध मुद्दाम घडवून आणलेल्या दंगलीं -- वर, किंवा खुनाखुनी आणि उघड उघड हल्ल्यांवर, अत्याचारांवर आणि त्यानंतर केल्या जाणार्‍या न्यायालयीन चौकशी आणि खटल्यांच्या नाटकांवर झगझगीत प्रकाश टाकतात. आणि ही सगळी प्रकरणं ७०-८० च्या दशकातली आहेत. माझ्या पिढीला हे असे काही प्रकार माझ्या महाराष्ट्रात घडतात हे खैरलांजीच्या 'भैयालाल भोतमांगे' प्रकरणामुळे कळलं. (हो खैरलांजी म्हणजे तेच गाव जिथे काही वर्षांपूर्वीच एवढं भीषण हत्याकांड घडून, आरोपींना निर्दोष सोडून दिलं गेलं आणि तरीही त्याला आंधळ्या सरकारने नुकतंच 'तंटामुक्त' गावाचं पारितोषिक दिलं. किती हा दुर्दैवीपणा !!!) पण त्याही आधी कित्येक गेली वर्षं हे 'दलितांविरुद्ध मुद्दाम दंगलीं घडवून आणण्या'चे प्रकार चालूच आहेत !!!   

'कोंडमारा' मधल्या नुसत्या प्रकरणांची नावं वाचूनही घुसमटायला होतं. काही नावं सांगतो.

- वरळीची दंगल
- मराठवाड्यातील दंगल
- फलटणची दंगल
- सत्यभामेची विटंबना
- एका गोसाव्याची तोड (यात त्या गोसाव्याला डोळे फोडून हालहाल करून मारलं जातं.)
- पार्टीबाजीचे बळी
- पोलीसकोठडीतील मृत्यू 
- पारधी मेळावा (हे प्रकरण पारध्यांच्या अमानुष कत्तलीविषयी आहे.)

या पुस्तकातल्या सगळ्या घटना साधारणपणे १९७४-७८ या ४-५ वर्षांत घडलेल्या आहेत. घटना घडल्यानंतर काही महिन्यांनी/वर्षांनी लेखकाने तिथे जाऊन अत्याचारपिडीतांशी, गावकर्‍यांशी, ज्यांनी प्रत्यक्षात ते अत्याचाराचे गुन्हे केले आहेत त्यांच्याशी, पोलिसांशी बोलून, स्वतः घटनेची अधिक माहिती गोळा केली आहे आणि त्यांच्या आधारे हे लेख लिहिले आहेत.

पण या पुस्तकाचं एक अतिशय दु:खद वैशिष्ठ्य आहे ते म्हणजे या सगळ्या ठिकाणी पहिली भेट देऊन झाल्यानंतर साधारण ५-७ वर्षांनी लेखक पुन्हा तिथे भेट देतो, तिथे कशी परिस्थिती आहे ते पाहतो आणि काय दिसलं ते सांगतो. आणि आपण पुन्हा हादरून जातो.

खटले भरलेले आरोपी पुराव्यांच्या अभावी निर्दोष सुटलेले असतात, गावात मोकाट फिरत असतात, त्याच प्रकारचे अनेक गुन्हे तिथे घडून गेलेले असतात, केस सशक्त असूनही निव्वळ पैशाची आमिषं दाखवून गरीब साक्षीदार फितवले गेलेले असतात... आणि अन्यायाचं चक्र चालूच राहतं !!

**

थोडक्यात, दोन्ही पुस्तकं संग्रही असणं अत्यावश्यक !!


महत्वाची तळटीप : या लेखात आलेले सर्व जातीपातींचे उल्लेख पुस्तकातून जसेच्या तसे घेतलेले आहेत. कोणालाही किंचितही दुखावण्याचा इथे अजिबात उद्देश नाही. कृपया गैरसमज नसावा ही विनंती !!

28 comments:

  1. यस्स, अनिल अवचटांची पुस्तके आहेत म्हटल्यावर..... इथेच मागवता येतात का पाहते. दोन चांगल्या पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  2. श्रीताई, नक्की बघ मिळाली तर. खूप भयंकर (छान म्हणणं शक्य नाही) वर्णनं आहेत.

    ReplyDelete
  3. मस्त, मी पण मागवतो लवकरच...:)

    ReplyDelete
  4. नक्की वाच सुहास. आणि मी वर यादीत दिलेली अनिल अवचटांची पुस्तकं वाचली नसशील तर तीही नक्की वाच. प्रत्येक पुस्तक म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे.. !!

    ReplyDelete
  5. अरे हो रे अवचट सरांची सर्वच पुस्तके छान आहेत.
    एकदम आपल्या मातीशी एकरूप होणारी. सगळ काही खरखुर खोट्याचा अजिबात स्पर्श नाही.
    सगळ कस नितळ......

    ReplyDelete
  6. nice post..
    thanks for sharing..

    ReplyDelete
  7. सचिन, अगदी सहमत. किती साधेपणा असतो त्यांच्या पुस्तकांत. उगाच मोठेपणाचा आव नाही, भूलभूलैया नाही. ते फक्त मुद्दे आणि वस्तुस्थिती मांडतात.. काय तो अर्थ वाचकांनी घ्यावा..

    ReplyDelete
  8. हेरंब, धन्यवाद.. बघतो आता पुण्याला गेल्यावर ही पुस्तकं मिळतात का ते..

    ReplyDelete
  9. खूप आभार योग !!

    ReplyDelete
  10. आनंद, पुण्यात सगळी पुस्तकं मिळतील अवचटांची. नक्कीच.

    ReplyDelete
  11. नुकतच अनिल अवचटांच "पुर्णिया" वाचल....ते पण खूप सुंदर पुस्तक आहे ..त्यांच लेखन खूप नितळ असत....अरे तुला अजुन एक सांगु का??? अनिल अवचट आमच्या गावाकडचे बर का...म्हणजे ओतूरचे (कॉलर एकदम टाइट :) ...)....आमच्या मूळ गावापासून अगदी जवळच...

    ReplyDelete
  12. एखाद्यावर तो केवळ एक ठराविक जातीत जन्माला आला आहे म्हणून कुठल्याही प्रकारचा अन्याय करणे यासारखा मुर्खपणा नाही. परंतु ही बाब आरक्षणाच्या नावावर "तथाकथीत" उच्चवर्णियांवर होणाऱ्या अन्यायालादेखिल लागू पडते. मुळ मुद्यापासून प्रतिक्रिया भरकटल्याबद्दल क्षमस्व.

    ता.क: या प्रतिक्रियेतून कुठल्याही ठराविक जातीतील लोकांना दोष देण्याचा माझा हेतू नाही. आरक्षणाच्या नावाखाली मतांकरिता चाललेलं राजकारण हा खरा मुद्दा आहे.

    ReplyDelete
  13. मी मागे वाचली होती रे अवचटांची पुस्तकं.... त्यातले ’माणुस’ वाचून अस्वस्थ व्हायला झालं होतं...मग पुढे कधितरी गंभीर वाचन जरा कमी केलं....

    आता भारतात जातेच आहे तर तू म्हणतोस ती पुस्तकंही नक्की वाचायला घेऊन येइन.

    ReplyDelete
  14. संभ्रम मी खूप दिवसांपूर्वी वाचलंय. अतिशय संयत शैलीत लिहिलेलं पुस्तक आहे. ८० च्या दशकात relevant असलेले हे लेख आजही तितकाच विचार करायला भाग पाडतात. वाढत्या अनिश्चितता आणि स्पर्धात्मक वातावरणाचा परिणाम असेल पण गेल्या ३० वर्षांत मध्यमवर्गीय अंधश्रद्धांचं प्रमाण वाढलेलंच जाणवतं.

    कोंडमारा मात्र वाचनात आलं नाही. आता मिळवून वाचेन.

    ReplyDelete
  15. अनिल अवचटांची पुस्तके वाचनीय असतात, दोन्ह्नी पुस्तके मी आवश्यक वाचील आपण पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  16. धन्यवाद, अनिल अवचटांची ही पुस्तकं बघीतली नाहीत. पुण्याला गेले की ऐ बी सी त चक्कर असतेच तेव्हा बघेन. :-)

    ReplyDelete
  17. आता ह्यावेळेच्या ट्रीपमध्ये अवचटांच्या पुस्तकांवर धाडी घालाव्या लागणार....

    ReplyDelete
  18. योगेश, 'पूर्णिया' बद्दल ऐकलं आहे. पण वाचायचा योग आला नाही अजून.

    काय? तू अवचटांचा गाववाला? सहीच !! अरे कॉलर काय अख्खा शर्ट टाईट करून घे :)

    ReplyDelete
  19. अभिलाष, तुझा मुद्दा अगदी मान्य. पण थोडक्यात अजूनही खैरलांजीसारख्या घटना घडताहेत म्हणजे आरक्षण त्या लोकांपर्यंत खरंच पोचलं आहे का हा विचार झाला पाहिजे. असो.

    ReplyDelete
  20. तन्वी, त्यांची "माणसं, धागे आडवे उभे, प्रश्न आणि प्रश्न, कोंडमारा" ही पुस्तकं वाचून कधीकधी अक्षरशः घृणा यायला लागते माणसांची !! आणि कुठलाही भयंकर अनुभव ते एवढ्या संयतपणे मांडतात की त्याचा अजूनच त्रास होतो.. नक्की वाचावीशी आहेत.

    वेगळ्या अनुभवासाठी अमेरिका, स्वतःविषयी नक्की वाच.


    "स्वतःविषयी" त्यांनी त्यांची बायको सुनंदा यांना अर्पण केलं आहे. ती अर्पणपत्रिका एवढी भावपूर्ण आहे माहित्ये !! मला आत्ता नक्की शब्द आठवत नाहीत पण भावार्थ असा आहे.

    "प्रिय सुनंदा, हे पुस्तक तुला अर्पण करण्यासाठी म्हणून क्षणभर का होईना तुला मनातून दूर करावं लागत आहे. त्याबद्दल क्षमा कर."

    अर्पणपत्रिका वाचूनच मी पुस्तकाच्या प्रेमात पडलो आणि पुस्तक प्रत्यक्ष वाचल्यावर अवचटांच्या अजूनच प्रेमात पडलो !!

    ReplyDelete
  21. विवेक, अगदी सहमत. संभ्रममध्ये ते आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या अंधश्रद्धांवर इतक्या सहजतेने प्रहार करतात की कित्येकदा ते प्रहार सुरुवातीला कळतच नाहीत. आणि अचानक कधीतरी आपण त्या लेखांमधल्या पात्रांच्या वागण्याशी आपलं वागणं ताडून बघतो आणि मग आपलीही तशीच गफलत झाली आहे हे जाणवतं !!!

    कोंडमारासुद्धा अगदी must read !! नक्की वाचा.

    ReplyDelete
  22. काका, दोन्ही पुस्तकं अप्रतिम आहेत. नक्की वाचा..

    ReplyDelete
  23. अपर्णा, अनिल अवचटांच्या पंख्यांसाठी ही पुस्तकं संग्रही असणं अत्यावश्यक. नक्की वाच.

    ReplyDelete
  24. विद्याधर, नक्की धाडी घाल. मोठ्ठं घबाड हाती लागेल याची खात्री !!

    ReplyDelete
  25. हेरंब,
    ह्या पुस्तकांच्या माहितीबद्दल धन्यवाद. वाचायला हवीत. बाकी, तळटीप टाकलीस ते बरं झालं बुवा. जात हा विषय उगाच एव्हढा नाजूक करून टाकलाय की काय नुसत्या उल्लेखान सुद्धा नको त्याच्या भावना दुखावल्या जायच्या.

    ReplyDelete
  26. आभार निरंजन. माझ्या अवचटांच्या आवडत्या पुस्तकांपैकी आहेत ही दोन.

    हो. काही जणांशी चॅटिंग झाल्यावर ती तळटीप टाकणं आवश्यक आहे आणि योग्यही आहे असं वाटल्याने दुसर्‍या दिवशी ती टाकली.

    या जातीपाती आपल्याला सामर्थ्यवान राष्ट्र बनण्यापासून हजारो योजनं दूर ठेवताहेत आणि ठेवत राहतील हे कोणाच्या पचनीच पडत नाही हे आपलं दुर्दैव !!!

    ReplyDelete
  27. हेरंब,
    "संभ्रम" मी ८० च्या दशकातच वाचले होते नि नंतर संग्रही तर ठेवलेच.अनिल अवचटांची पुस्तके हि वैचारिक नि अस्वस्थ करणारी असतात ह्यात शंकाच नाही पण त्यांचे सर्वात मोलाचे कार्य ज्यांनी जवळून बघितले आहे ते त्यांना साष्टांग नमस्कार घातल्या शिवाय रहात नाहीत. त्यांचे मुक्तांगण च्या माध्यमातून पुण्यात व्यसन मुक्तीकार्य जे माझ्या माहितीत निदान गेले ३० वर्षे किंवा कदाचित त्याहून जास्त काळ सुरु आहे त्याला तोड नाही. मी स्वतः AA च्या मिटींग्ज अटेंड केल्या आहेत.माझ्या मामाचे १० वर्षाचे नि आमच्या शेजारच्या कुटुंबातील एकाचे २३ वर्षाचे दारूचे व्यसन त्यांच्या मुळेच सुटले.ह्या दोघांनाही रोज सकाळ दुपार संध्याकाळ लागायची.आज मला हे सांगायला अतिशय आनंद होतो कि गेल्या २५ वर्षात त्या दोघांनी दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श केला नाहीये.ते एके काळी अट्टल बेवडे होते हे कुणाला सांगून हि खरे वाटणार नाही.खरी कमाल तर पुढे आहे...एका सुसंस्कृत घरातील आमचा हा मामा... ज्याच्या अनपेक्षित टोकाच्या व्यसनाधीनतेच्या धक्क्याने आमची आजी अकाली गेली, जिला आम्ही मामीच म्हणायचो... तिच्या अंत्यविधीच्या वेळी सुद्धा जो आमचा हा मामा शुद्धीत नव्हता, तो मामा, आज गेली २५ वर्षे ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये काम करतो नि तरी हि दारू त्याच्या पासून कोसो मैल दूर आहे.त्या दुसऱ्याचे हि काही वेगळे नाही... त्याच्या वडिलांच्या चितेस अग्नी देतेवेळी पहिल्यांदा त्याला स्वतःला आधार द्यावा लागला होता नि मग ह्याचा थरथरता हात दुसऱ्याला हातात धरून कार्य पार पाडावे लागले होते अशी त्याची अवस्था होती....मी माझ्या आयुष्यात जी काही टोकाची उद्विग्न करणारी दृश्ये,प्रसंग बघितले त्यातील ह्या गृहस्थाचे उदाहरण आहे.सांगायला नि लिहायला अतिशय वाईट वाटते कि मुलाच्या ह्या व्यसनाधिनतेचा त्याच्या वडिलां वर सुद्धा इतका खोल वर परिमाण झाला कि ते सुद्धा नंतर दारुच्या प्रचंड आहारी गेले.नि त्यातच गेले.त्या एका सुसंस्कृत घरातील मुलगा नि वडील शेवटी शेवटी तर एकाच गुत्यात दारू पिताना बघून मनाला किती वेदना झाल्या असतील ?नुसत्या त्या आठवणीनी सुद्धा मन बेचैन झाले.पण मुक्तांगण मुळे नंतरच्या काळात तो सुद्धा अगदी मित्रांच्या दारूच्या पार्टीत असताना सुद्धा गेल्या २५ वर्षात दारू पासून लांब आहे.त्या मुळे आमच्या सारख्यांचा तर अवचट साहेबांना साष्टांग नमस्कार.विशेष म्हणजे हे दोघे आज हि मुक्तांगणचे दारूमुक्ती कार्यातील स्वयंसेवक आहेत.आपण नुसते माणसे जोडणे जोडणे म्हणतो पण अवचट साहेब पशुचा प्रथम माणूस बनवतात,नंतर त्याला असा काही घडवतात कि नंतर तो आपोआप जोडला जातो. त्यांना सलाम....हेरंब, खरे तर प्रतिक्रिया हि वाजवी पेक्षा फारच मोठी झालीये, पण इथे तुझ्या पोस्ट मध्ये अवचट साहेब पाहिले नि मला माझ्या कुटुंबाचा तो काळ आठवला नि राहवले नाही, तरी ह्या मोठ्या प्रतिक्रिये बद्दल मला मोठ्या मनाने माफ कर.

    ReplyDelete
  28. धन्यवाद mynac दादा.. अरे माफी वगैरे काय? उलट तुझी प्रतिक्रिया म्हणजे एक सर्वस्वी वेगळा, नवीन अनुभव आहे आणि अवचटांचं आणि त्यांच्या कार्याचं महत्व अधोरेखित करणारं आहे. खरंच फार ग्रेट माणूस आहे तो !!

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...