Wednesday, November 9, 2011

सिनेमाच्या ऑटोमॅटिकली प्रेमात पाडणारं 'सिनेमॅटिक'

- अतिशय प्रसिद्ध आणि सगळ्यात गाजलेल्या ' द एक्झॉर्सिस्ट' या भयपटाचा निर्माता आणि त्याच नावाच्या कादंबरीचा लेखक विल्यम पीटर ब्लॅटी हा त्यापूर्वी विनोदी पटकथाकार म्हणून प्रसिद्ध होता आणि 'द एक्झॉर्सिस्ट' लिहिण्यापूर्वी आर्थिकदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थितीत असलेल्या ब्लॅटीने त्या काळात विनोदी लेखन/चित्रपटांची लाट ओसरल्याने निव्वळ प्रयत्न म्हणून आणि उपजीविकेचं साधन म्हणून एका १४ वर्षांच्या मुलाच्या अंगातलं भूत उतरवण्याच्या अमेरिकेत प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आधारित ' द एक्झॉर्सिस्ट' नावाची कादंबरी लिहिली.

- मेट्रिक्स चित्रत्रयी बनवताना वाचोस्कींनी त्यांच्यारोबरच 'अ‍ॅनिमेट्रिक्स' ही नऊ अ‍ॅनिमेटेड लघुपटांची मालिका आणि 'एन्टर द मेट्रिक्स' हा संगणकीय खेळ तयार केला. मेट्रिक्स चित्रत्रयीबरोबरच ही लघुपटांची मालिका आणि संगणकीय खेळ बघितल्या/खेळल्याशिवाय मेट्रिक्सचा आनंद पूर्णपणे उपभोगता येत नाही.

- ९/११ ची ऐतिहासिक दुर्घटना घडल्यानंतर पुढची कमीतकमी ४ ते ५ वर्षं अमेरिकन चित्रसृष्टीने त्या विषयाकडे (काही मोजकेच अपवाद वगळता) जाणूनबुजून संपूर्णतः दुर्लक्ष केलं होतं. प्रेक्षक त्या घटनेला पडद्यावर कसे स्वीकारतील हे त्यामागचं प्रमुख कारण होतं.

एक्झॉर्सिस्ट, मेट्रिक्स किंवा ९/११ शी संबंधित चित्रपट माहिती नसलेले/न बघितलेले (इंग्रजी चित्रपटांचे) रसिक हे नक्कीच अगदी फार फार विरळ असतील परंतु वर दिलेले हे मुद्दे किंवा या प्रकारची माहिती ठाऊक नाही असे लोक मात्र नक्कीच तितकेसे विरळ नसावेत. किंबहुना विपुल असतील.

किंवा मग पायरसीच्या विरोधात बोलण्याची (काही प्रमाणात रास्त) पद्धत असतानाही "निव्वळ पायरसीमुळे का होईना दुर्मिळ किंवा आपल्या इथे प्रदर्शित न होणारे चित्रपट सहजगत्या लोकांपर्यंत पोचवणार्‍या पायरेटेड डीव्हीडी मार्केटच्या प्रेक्षक घडवण्याच्या प्रक्रियेतल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल पायरसीचे आभार" अशा प्रकारचा खळबळजनक आणि तितकाच क्रांतिकारक विचार एका सिनेपरीक्षकाकडून मांडला जाऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसेल का?

विशेष आवड म्हणून, लक्षपूर्वक चित्रपट बघणारे , चित्रपट या प्रकारावर प्रेम करणारे असा एक गट आणि जड विषय न आवडणारे आणि मेंदूला उगाच ताण न देता हलकेफुलके, डोकं बाजूला ठेवून बघायचे चित्रपट आवडणारे असा दुसरा गट असे प्रेक्षकांचे दोन ढोबळ प्रकार पाडता येऊ शकतात. पण तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रेक्षक असलात तरीही चित्रपट बघण्यापूर्वी तो चित्रपट कुठल्या घटनेवर बेतला आहे (असल्यास) , तत्कालीन सामाजिक, जागतिक परिस्थिती, लेखक/दिग्दर्शकाची पार्श्वभूमी, विचारधारा, वैशिष्ठ्य इत्यादी तुरळक गोष्टी माहित असतील तर मग कुठलाही चित्रपट अगदी तद्दन विनोदी किंवा गल्लाभरू हाणामारीचा चित्रपट बघतानाही जरा वेगळीच मजा येते किंवा तो चित्रपट आपल्यापर्यंत पोचल्याची एक हलकीशी का होईना जाणीव निर्माण होऊ शकते. अशी चित्रपटांची अंतर्बाह्य ओळख करून देऊन, चित्रपट कसा बघायचा, त्यात नक्की काय बघायचं याची माहिती करून देऊन चित्रपट बघायला शिकवणारे आणि चित्रपटांच्या प्रेमात पडायला लावणारे अशा प्रकारच्या सिनेसमीक्षकांमध्ये गणेश मतकरी यांचं नाव निर्विवादपणे बरंच वर आहे. सुरुवातीला दिलेले तीन मुद्दे आणि ते क्रांतिकारक विधान (आणि इतरही असंख्य महत्वपूर्ण गोष्टी) त्यांच्या नुकत्याच शिकागो येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात प्रकाशित झालेल्या 'सिनेमॅटिक' या पुस्तकाद्वारे आपल्या भेटीस येतात.

'सिनेमॅटिक' म्हणजे मतकरींनी दिवाळी अंक किंवा तत्सम सिनेविषयक विशेषांकांमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या माहितीपूर्ण लेखांचा संग्रह. त्यात रहस्यपट, भयपट, युद्धपट, सुपरहिरोपट, लघुपट, मराठी चित्रपट, साय-फाय यावर प्रत्येकी एक आणि समांतर सिनेमा व ९/११ यावर प्रत्येकी दोन लेख अशा विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या एकापेक्षा एक माहितीपूर्ण लेखांची भरगच्च मेजवानी आहे. या पुस्तकाला अरुण खोपकरांसारख्या दिग्गज जागतिक चित्रपट-अभ्यासकाची प्रस्तावना लाभली आहे.

मागे एकदा रॉजर एबर्ट या जगप्रसिद्ध चित्रपट-समीक्षकाविषयी लिहिताना मतकरींनी समीक्षकांचे ढोबळ मानाने तीन प्रकार सांगितले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर

१. दैनिका, साप्ताहिकांत निव्वळ जागा भरून काढण्यासाठी लिहिणारे.. चित्रपटांचं परीक्षण करण्यापेक्षा गोष्ट तपशीलात सांगून जागा भरण्याकडे या मंडळींचा कल असतो. त्यांना प्रेक्षकांच्या चित्रपट विषयक ज्ञानात भर टाकण्याची गरज वाटत नाही, किंबहूना ते मुळात असावं असाही त्यांचा आग्रह नसतो.

२. चित्रपटांचे अभ्यासक असणारे आणि चालू चित्रपटांना बऱ्या वाईटाची लेबलं लावण्यापेक्षा एकूण चित्रपटांच्या इतिहासात अधिक रस असणारे. हे लोक बऱ्यापैकी दुर्मिळ असतात.

३. आणि तिसरे म्हणजे या दोन्ही प्रकारांचा सुवर्णमध्य साधणारे. या मंडळींचा स्वतःचा असा अभ्यास आहे. त्यांच्याकडून होणारा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे चित्रपट रसिकांना होऊ शकणा-या अचूक मार्गदर्शनाचा. यांचं लिखाण क्लिष्ट नाही, पण काही विशिष्ट अभ्यासातून आलेलं आहे. ते शक्य तितक्या सोप्या भाषेत आपल्या वाचकांपर्यंत नेण्य़ाची त्यांची हातोटी आहे.

मला वाटतं मतकरींनी रॉजर एबर्टसाठी लिहिलेलं हे वर्णन त्यांच्या स्वतःसाठीही अगदी चपखलपणे लागू होतं. सिनेमॅटिकमधला प्रत्येक लेख हा याचा पुरावा आहे. प्रत्येक लेखात त्या त्या प्रकारच्या चित्रपटांच्या निर्मितीपासून तत्कालीन सामाजिक, राजकीय, जागतिक परिस्थितीवर प्रकाश टाकून कुठलाही चित्रपट हा तसाच का बनवला गेला, त्यामागची प्रेरणा काय होती, दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचं होतं या साऱ्या साऱ्या विषयीची विपुल माहिती अजिबात रटाळ किंवा किंचितही क्लिष्ट न होता ओघवत्या स्वरूपात आपल्यापुढे येते. या पुस्तकात उल्लेखलेले काही चित्रपट आपण कधी ऐकलेलेही नसतील पण तरीही त्याची निर्मिती प्रक्रिया, कार्यकारणभाव, उद्देश, त्यासाठी घेतली गेलेली मेहनत आणि त्या चित्रपटाचा समाजावर, लोकमनावर आणि अन्य चित्रपटांवर झालेला परिणाम इ. इ. तर आपण अक्षरशः जगतोच. पण खरी मजा तर पुढेच आहे. कित्येक माहित असलेल्या, लाडक्या असलेल्या आणि अनेकदा पाहिलेल्या चित्रपटांविषयी तो कसा बघायचा, त्या चित्रपटात नक्की काय बघायचं, प्रसंगी त्यात काही काही उणीव कशा आहेत हे दाखवून देऊन आपण इतक्या वेळा बघितलं तरी हा मुद्दा किंवा हा दृष्टीकोन किंवा अगदी हा कॅमेरा अँगल आपल्या अजिबातच कसा लक्षात आला नाही याप्रकारची माहिती वाचून आपण अचंबित होऊन जातो. ठाऊक असलेला चित्रपटही अधिक चांगल्या प्रकारे कसा बघायचा याचं रसाळ मार्गदर्शकच जणु..

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातली ओळ न् ओळ वाचताना हे सगळं प्रचंड अभ्यासातून आणि निरीक्षणातून आलेलं आहे हे सतत जाणवत राहतं. प्रत्येक लेख, प्रत्येक नवीन परिच्छेद आपल्या चित्रपटविषयक ज्ञानात भर घालत असतो. आणि पुस्तकाच्या अखेरीस दिलेली संदर्भग्रंथांची सूची पाहता त्याची सत्यताही पटते. जागतिक चित्रपटाच्या विविध अंगांवरच्या अनेक पुस्तकांच्या वाचनातून आणि अभ्यासातून प्रत्येक लेख जन्माला आला आहे हे सतत जाणवत राहतं.

प्रत्येक लेख हा निर्विवाद अप्रतिम आहेच तरीही माझे या पुस्तकातले विशेष आवडते लेख म्हणजे 'रम्य नसलेल्या युद्धकथा', 'गरीबांचा सिनेमा', 'समांतर - एका चित्रप्रकाराचा प्रवास', 'हॉलिवूड पोस्ट ९/११' आणि 'हॉलिवूडचा पडदा आणि ९/११' हे लेख. बाकीचे लेखही अत्यंत माहितीपूर्ण आणि अप्रतिम आहेतच परंतु हे लेख अधिक आवडण्याची विशेष कारणं आहेत. युद्धपटांवरच्या लेखात युद्धपटांच्या संक्रमणाचा जो प्रवास मांडला आहे त्याला खरंच तोड नाही. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातल्या किंबहुना अगदी युद्धाच्या आणि त्यानंतरच्या काही वर्षांतल्या चित्रपटांत सैनिक, सैन्य, युद्ध इत्यादींना जे एक स्वप्नील रूप देऊन, हिरो बनवून, युद्धांना रम्यकथा म्हणून दाखवण्यापासून ते काही वर्षांतच युद्धांचे भीषण दुष्परिणाम जाणवायला लागल्यानंतर समाजाच्या आणि त्यामुळे चित्रकर्त्यांच्याही युद्धपटनिर्मितीच्या बदललेल्या जाणिवांवर आणि प्रतिमांवर हा लेख अगदी अचूक बोट ठेवतो. युद्धपटांचं संक्रमण अक्षरशः आपल्यासमोर घडताना दिसतं. तर समांतर सिनेमे खूप जास्त प्रमाणात बघितले नसल्यामुळे समांतर चित्रपटांचा इतिहास, प्रवास वेगवेगळया दिग्गजांनी केलेली हाताळणी, त्याची कारणमीमांसा इ सगळं वाचायला खूप आवडलं. 'गरीबांचा सिनेमा' मध्ये एका पूर्णपणे वेगळ्या ज्यॉनरमधल्या चित्रपटांविषयी लिहिताना 'बायसिकल थिव्ज', 'पथेरपांचाली', 'दो बिघा जमीन' पासून ते थेट 'पीहोटे', 'सलाम बॉम्बे' आणि अगदी आजच्या 'स्लमडॉग मिलिअनेअर पर्यंतच्या चित्रपटांचा तपशीलवार घेतला गेलेला मागोवा फारच रोचक वाटला. अर्थात ९/११ वरचे दोन लेख विशेष आवडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ९/११ बद्दल मला व्यक्तिशः असलेलं प्रचंड आकर्षण किंवा आवड. अर्थात आकर्षण किंवा आवड हे शब्द योग्य आहेत की नाहीत याची कल्पना नाही पण थोडक्यात हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्या विषयावरचा आणि तो विषय हॉलिवूडसारख्या सतत नवनवीन प्रकार लीलया हाताळणाऱ्या चित्रसृष्टीने कसा मांडला हे समजून घेण्याच्या दृष्टीने ९/११ वरचे लेख खूपच आवडले.

पुस्तकाचं मुखपृष्ठही खरंच अतिशय सुंदर आहे. दहा विषयांवरच्या दहा लेखांना दहा स्तंभांमध्ये मांडून दाखवल्याने पुस्तकातल्या विषयांची व्याप्ती मुखपृष्ठापासूनच ध्यानात येते. पण मुखपृष्ठापेक्षाही त्याच्या पुढचं पान हे माझं जास्त आवडतं आहे. त्याला कारणही तसंच आहे !!!
नुकताच गणेश मतकरींच्या भेटीचा योग आला आणि त्यावेळी चित्रपटांवरच्या भरपूर गप्पांच्या मेजवानीबरोबरच प्रत्यक्ष मतकरींकडूनच त्यांनी स्वाक्षरी केलेलं पुस्तक मिळवण्याची सुवर्णसंधी लाभली.

एवढं सगळं लिहिल्यावरही पुस्तक नक्की वाचा असं वेगळं सांगण्याची गरज नाहीच पण तरीही सांगतो प्रत्येक चित्रप्रेमीने अगदी आवर्जून वाचण्यासारखं असं हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगत व्यक्त करताना मतकरी म्हणतात की "मला वाटतं चित्रपट कसा पाहावा या प्रश्नाचं माझ्यापुरतं उत्तर म्हणून 'सिनेमॅटिक' कडे पाहता येईल." यातलं "माझ्यापुरतं" काढून टाकून "चित्रपट कसा पाहावा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'सिनेमॅटिक' आहे" असं मी म्हणेन. !!

प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन
ऑनलाईन वितरक : बुकगंगा

-मीमराठी.नेटच्या २०११ च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

23 comments:

 1. हा लेख मी मराठी मधे पण वाचला होता. मतकरींचा दांडगा व्यासंग पहाता हे पुस्तक नक्कीच संग्रहणीय़ असणार यात काही संशय नाही.
  सिनेमाची कथा न सांगता तो सिनेमा कसा आहे हे सांगण्याची मतकरींची हातोटी वाखाणण्यासारखी आहे यात संशय नाही.

  ReplyDelete
 2. अगदी खरंय, पुस्तक नक्कीच वाचनिय असणार आहे. सिनेमा कसा पहावा हे खरं तर मतकरींच्या ब्लॉगमुळेच नीटसं कळायला लागलंय.. पुस्तकाच्या प्रतिक्षेत आहे आता.. :)

  ReplyDelete
 3. चित्रपटाचं कथानक संपूर्ण न कळू देता त्याचं विश्लेषण करणं, चित्रपटातील प्रसंगांची आवश्यकता/अनावश्यकता यांचं स्पष्टीकरण हे तर फक्त मतकरींनीच करावं. पडेल सिनेमा पडेल का आहे किंवा त्यात काय असतं/नसतं तर तो पडेल ठरला नसता हे विशद करताना मतकरींनी दिलेले पूर्वीच्या चित्रपटांचे किंवा पटकथांचे दाखले हे तर त्यांचं लेखणीविशेष. मतकरींच्या विचारांची अनुभवसमृद्धीची कल्पना त्यांचा "आपला सिनेमास्कोप" वाचताना येतच असते. (क्वचित त्यांचं लेखन बाऊन्सर जाऊ शकतं. तेव्हा ते दोन वेळा वाचावं लागतं. इतकंच.). मतकरींचं फिल्ममेकर यापूर्वी वाचलं आहे. सुंदर अनुभव होता. ते पुस्तक पुन्हा एकदा वाचण्याचा योग यावा. आता सिनेमॅटीकदेखील अवश्य वाचेन. माहितीबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 4. तुझा लेख वाचला मी मराठीमध्ये आणि लगेच पुस्तकाची ऑर्डर दिलीय... तू आणि आप्पा यांच्यामुळे मतकरींची ओळख झाली.. सो तुम्हा दोघांचे आभार्स :) :)

  सिनेमा कसा पहावा हे खरं तर मतकरींच्या ब्लॉगमुळेच नीटसं कळायला लागलंय.. +१

  ReplyDelete
 5. Recently started reading Mr. Ganesh Matakari's blog and I am amazed at the clarity of thoughts and analysis he provides. I will certainly find out this book and read.

  ReplyDelete
 6. हेरंबा नक्की मिळवून वाचावे लागेल हे पुस्तक.... असेच आणि एक अत्यंत सुंदर पुस्तक (किंवा माहितीचा खजिना) म्हणजे विश्वास पाटलांचे नॉट गॉन विथ द विंड ... मिळाल्यास ते ही वाच.... आपण फक्त पडद्यावर दिसतं तेव्हढंच पहातो पण त्यापलीकडे पहाण्याची ’नजर’ मात्र या लोकांनी दिलीये आपल्याला....

  ReplyDelete
 7. मतकरींच्या ब्लॉगचा मी पण आधीपासून पंखा आहेच... बुकगंगा वर ऑर्डर केल होत पण त्यांचा मेसेज आला पुस्तक ऑऊट ऑफ स्टोक आहे म्हणून दुसर मागवायच असेल तर सांगा ...पण मी तेच हव आहे बोललो आणि आता दोन तीन दिवसापूर्वीच त्यांचा मेल आलाय पुस्तक पाठवलं आहे म्हणून .... "सिनेमाच्या ऑटोमॅटिकली प्रेमात पाडणारं 'सिनेमॅटिक'" कधी एकदा हातात येते अस झालाय.......... -एक अस्सल सिनेप्रेमी :)

  ReplyDelete
 8. मला विजय पाडाळकरांचे अशा प्रकारचे लिखाण देखील खूप आवडले होते. विशेषत: रशियन लेखक, चित्रपट ह्याविषयीचे लिखाण.
  मतकऱ्यांचे लेख मी तुम्हां सर्वांमुळे वाचू लागले. आणि खरोखर खूप सुंदर. गुंतागुंतीचे सिनेमे देखील सुस्पष्ट करण्याची त्यांची हातोटी अतिशय नावाजण्याजोगी. वाचायलाच हवं पुस्तक. :)

  ReplyDelete
 9. ह्म्म ... वाचायलाच हवं म्हणजे हे पुस्तक. आणि त्याआधी थोडे सिनेमे पण बघायला हवेत :)

  ReplyDelete
 10. अगदी अगदी सहमत काका. त्यांचं लेखन खुपच ओघवतं आणि अभ्यासपूर्ण असतं !

  >> सिनेमाची कथा न सांगता तो सिनेमा कसा आहे हे सांगण्याची मतकरींची हातोटी वाखाणण्यासारखी आहे यात संशय नाही.

  +१

  ReplyDelete
 11. आनंदा, मस्तच पुस्तक आहे :)))

  ReplyDelete
 12. कांचन, जबरदस्त.. मतकरींच्या लेखनाबद्दल मोजक्या शब्दांत अप्रतिम प्रतिक्रिया :)

  मला त्यांचं फिल्ममेकर्स वाचायचं आहेच. त्यांच्याशी बोलताना कळलं की लवकरच त्यांचं अजून एक पुस्तक येतंय. त्यात बरेच जास्त लेख असणार आहेत.. त्याही पुस्तकाची वाट बघतोय आता !

  ReplyDelete
 13. सुहास, नक्की वाच रे हे पुस्तक. माहितीचा खजिना आहे ! :)

  ReplyDelete
 14. सविताताई, या माणसाला असणारी चित्रपटमाध्यमाची जाण बघितली की स्तिमित व्हायला होतं ! नक्की वाचा त्यांची पुस्तकं !

  ReplyDelete
 15. तन्वे,

  'नॉट गॉन विथ द विंड' बद्दल बरंच ऐकलंय. तेही वाचायचं आहेच.

  >> आपण फक्त पडद्यावर दिसतं तेव्हढंच पहातो पण त्यापलीकडे पहाण्याची ’नजर’ मात्र या लोकांनी दिलीये आपल्याला

  अगदी अगदी !

  ReplyDelete
 16. देवेन, प्रत्येक सिनेप्रेमीसाठी मेजवानी आहे हे पुस्तक म्हणजे !

  ReplyDelete
 17. अनघा, विजय पाडाळकरांबद्दल ऐकलंय पण त्यांचं लेखन वाचलं नाहीये..

  मतकरींचं लिखाण ग्रेटच असतं ! खूप गोष्टी नव्याने कळतात त्यांच्यामुळे. नक्की वाच.

  ReplyDelete
 18. >> आणि त्याआधी थोडे सिनेमे पण बघायला हवेत :)

  गौरी, काळजी नको :) एकदा पुस्तक वाचायला घेतलंस की आपोआपच बघशील सिनेमे :)

  ReplyDelete
 19. हेरंब तुला हे पुस्तक मतकरींच्या हस्ते मिळण योग्य आणि मस्त...अभिनंदन ..आणि पुस्तक वाचो ब्लॉग वाचो काहीही करो मी आणि चित्रपट म्हणजे पहिले पाढे पंचावन्न माहिते न तुला...त्यामुळे खर तर पुस्तक वाचून काही फरक पडेल का माझ्यात माहित नाही कदाचित थोडे चांगले चित्रपट पाहण्यात येतील हे मात्र नक्की...

  ReplyDelete
 20. हेरंब, मस्त लेख. आता लवकरात् लवकर् वाचणे राहील पुस्तक (कसे राहून् गेले कुणास ठाऊक्). मतकरींच्या 'फिल्ममेकर्स' ह्या पुस्तकातला 'द मॅट्रिक्स' वरील लेख मला फार आवडला होता.

  छान् पुस्तकाच्या छान् परिचयाबद्दल् ठांकु ठांकु तुला :)

  ReplyDelete
 21. >> हेरंब तुला हे पुस्तक मतकरींच्या हस्ते मिळण योग्य आणि मस्त

  कसचं कसचं ;)

  >> पुस्तक वाचून काही फरक पडेल का माझ्यात माहित नाही

  अग तू पुस्तक वाच तर खरं मग बोलू आपण. तुलाच जाणवेल तुझ्या चित्रपट बघण्याच्या सवयीत किती फरक झालाय ते.

  ReplyDelete
 22. धन्स राफा. माझं 'फिल्ममेकर्स' राहिलंय अजून..

  नक्की वाच हे पुस्तक. यातही मेट्रिक्सबद्दल खूप छान आणि माहितीपूर्ण लिहिलंय मतकरींनी.

  ReplyDelete
 23. Hey keep posting such good and meaningful articles.

  ReplyDelete

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...