Friday, December 11, 2009

झिप झॅप ........ झो S S S प !!!

परवा अस्मादिकांचा दिवस नेहमी प्रमाणेच उगवला. अर्थात आधीचा दिवस पण नेहमी प्रमाणेच मावळला होता. म्हणजे अंथरुणाला पाठ टेकायला १:३० वाजून गेला.. रात्रीचा.. (उगाच am/pm चा गोंधळ नको व्हायला... तुमचा... आणि माझाही थोडा..) आमच्या छोट्या डॉन च्या कृपेने झोपायला जवळपास २ वाजले. (आणि हे अस बरेच दिवस चालू होत. शेवटी त्याची सगळी कसर आज भरून निघाली.) कसाबसा ८ ला उठलो सकाळी आणि धडपडत, अर्धवट झोपेतच १० च्या सुमारास पोचलो ऑफिसला. (ही अतिशयोक्ती नाही).. अर्थात ऑफिसमध्ये जाऊन कामाला लागलं कि काही विशेष वाटत नाही झोपेचं किंवा दमल्याचं. साधारण १ च्या सुमारास काम ब-यार्पैकी संपवून जरा निवांत वेळ मिळतो ना मिळतो तोच एका कलीगने पिंग केलं की आत्ता कॉन-कॉल आहे लगेच. जॉईन होशील का? आणि वेब-प्रेझेन्टेशन ची लिंक पण दिली. अस्मादिक झाले जॉईन. प्रेझेन्टेशन छान होत अगदी. नवीन backup प्रोडक्टची छान माहिती होती त्यात. सुरुवातीला मी लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होतो आणि यशस्वीही होत होतो. पण जेमतेम १५ मिनिटेच. त्यानंतर इतका वेळ राखलेला संयम सुटला. झोपेला अडवून धरण्याचे सगळे प्रयत्न धुळीला मिळाले. प्रचंड झोप यायला लागली. अर्थात ऑफिस मध्ये झोप येणे हे काही मला नवीन नाही ;).. पण यावेळी काहीतरी भयंकरचं प्रकार होता. मी अक्षरशः पेंगत होतो. जागा राहण्यासाठी अक्षरशः धडपडत होतो. समोरच्या स्क्रीन वर काय चाललय हे कळून घेण्यासाठी आणि एकीकडे मान वाकडी करून कान आणि मानेच्या मध्ये धरलेला रिसिव्हर खाली पडू नये म्हणून मी अगदी जंग जंग पछाडत होतो. काय काय केलं नाही त्यासाठी. २ चुइंगगम्स टाकली तोंडात, डोळे चोळले, स्क्रीन थोडा वर केला जेणेकरून मान वर करून बघायला लागेल, खुर्चीची उंची कमी केली जेणेकरून मान वर ......... पण नाहीच. Benadryl घेतल्यासारख किंवा चरस गांजा प्यायल्यासारखी झोप येत होती. (अर्थात स्वानुभव शून्य, निव्वळ ऐकीव वर्णन. benadryl चं नव्हे हो , गांजाचं. एकदा benadryl घेऊन मी जवळपास १४-१५ तास गाढ झोपलो आहे. असो. विषयांतर होतंय. (विषय काय होता आपला? कुठे होतो मी? पुन्हा झोप येतेय कि काय? ;) ). झोप यायला लागली तेव्हाच खरतर पटकन बाहेर जाऊन एक राउंड मारून किंवा तोंडावर गार पाणी मारून झोप घालवता आली असती. पण या सेशन रुपी राक्षसाने आणि त्याच्या रिसिव्हर आणि स्क्रीन रुपी २ यमदुतांनी मला खुर्चीवर बांधून टाकल होत. नशिबाने ते इंटर अक्टिव सेशन नव्हत. मी म्हंटल जरा वेळ बडबडून (म्हणजे बडबड ऐकून) सेशन संपेल. पण कसलं काय. माझ्या आयुष्यातले चांगले २ तास कुरतडल्या नंतर त्यांनी announce केलं कि आता QnA सेशन आहे. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकतात. (QnA सेशन कधी संपणार असा प्रश्न विचारावा अस हळूच माझ्या मनात डोकावून गेल.). त्यानंतर आमच्या टीम मधल्या अतिउत्साही कलीग्सनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला. (ज्याने मला लॉगीन व्हायला सांगितलं होत त्याच्यावर दगडांचा भडीमार करावा की विटांचा या प्रश्नात मी स्वतःला गुंतवून ठेवून झोप पिटाळण्याचा व्यर्थ प्रयत्न मी करून पहिला. पण डुलकी लागून जाग आली तेव्हा कळलं की तो प्रयत्नही फसला होता.)
शेवटी एकदाची ती मीटिंग संपली. आमच्या manager ने सगळ्या टीमच्या वतीने त्या प्रेझेंटरचे आभार बिभार मानले. आणि शेवटी हे पण म्हणाला कि "we had a little quiet gentleman today, who didn't ask much(???) questions". म्हणजे अस्मादिकच एवढ न कळण्याएवढा काही मी झोपेच्या आधीन झालो नव्हतो. मी पटकन आजूबाजूला कुठे हिडन कॅमेरा वगैरे नाहीयेना ते बघितलं. संपली मीटिंग एकदाची. कसाबसा दिवस ढकलला आणि आज रात्री लवकर झोपायचंच असा ठरवून घरी गेलो. पण कसलं काय आज पण डॉनच जिंकला आणि आमच्या झोपेचे दीड वाजले. आता वीकेंडला जास्तीत जास्त झोप पूर्ण करून घ्यायची या (गुलाबी!!) विचारांनी आत्ताच मला गुदगुल्या व्हायला लागल्यात.. बघूया कस जमतंय ते :)

(ब्लॉग लिहावा कि झोप काढावी अशा द्विधा मनःस्थितीत सापडल्यावर नेहमीच ऑप्शन # २ जिंकल्याने ब्लॉग टाकायला उशीर झाला.)

14 comments:

  1. मजा आली वाचायला....विकेन्डला तुमचा झोपेचा कोटा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा...:)

    ReplyDelete
  2. धन्यवाद अपर्णा.. होप सो :)..
    तुमचा ब्लॉग नेहमी वाचतो मी. छान लिहिता तुम्ही.

    ReplyDelete
  3. मस्त...तुमचे दु:ख समजू शकते माझंही पात्र नं दोन माझी कार्टी पहिलं पुर्ण वर्ष अशीच रोज रात्री जागायची..............
    छान लिहीलय!!!!
    Tanvi

    ReplyDelete
  4. धन्यवाद तन्वी.. माझ्यासारख्या झोपाळू माणसाला तर ते फारच कठीण जातंय :) .. बघूया हळू हळू सवय होईल..

    ReplyDelete
  5. तीच तर खरी गम्मत आहे जोवर आपल्याला सवय होते आपली गुणी लेकरं त्यांची सवय बदलून रात्री गुडूप झोपायला लागतात मग आपण बसा आढ्याला नजर लावून झोपेची वाट बघत!!!!!!!!!!

    ReplyDelete
  6. हा हा हा ... झोप न येण्याची सवय आणि मला?? अवघड वाटतंय जरा.. बघूया .. पोस्ट टाकल्याच चिरंजीवांना कळलं बहुतेक. आज गुणी बाळासारखे १२ ला च झोपले.. :)

    ReplyDelete
  7. ajun ek post takali hoti na madhech...disat nahi aahe aata.....

    ReplyDelete
  8. हो.. टाकली होती.. पण नीट जमली नाही. आवडली नाही मला. म्हणजे जरा एकांगी होत होती. नीट न वाचताच चुकून घाईघाईने टाकली गेली. दोन्ही बाजू मांडून लवकरच टाकेन ती पोस्ट.

    ReplyDelete
  9. ata ofc madhye ahe...zop ghalvnyasathi tumcha blog vachat ahe :)

    ReplyDelete
  10. अरे वा. माझा ब्लॉग तुम्ही झोप येण्यासाठी नाही तर झोप घालवण्यासाठी वाचताय हे ऐकून बरं वाटलं ;)

    ReplyDelete
  11. हे..हे..हे..मस्तच वर्णन आहे, लंच नंतरच्या मिटिंग्स मध्ये अशिच मजा येत असते, सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे असतात. :)

    ReplyDelete
  12. हो ना आनंद. हे तर नेहमीचंच आहे (माझं).. पण त्या दिवशी जी वाट लागली तशी कधीच लागली नव्हती :)

    ReplyDelete
  13. लेख आवडला. ९ लेखांनंतरचा हा पहिलाच इनोदी लेख. चांगला बदल आहे. :-) माझ्या बाबतीत हे नेहमीच होतं. माझ्यावर तर निद्रादेवी जरा जास्तच खूष आहे. कुठेही आणि कधीही झोप लागते मला. भीष्म जसे इच्छामरणी होते तसा मी इच्छाशयनी आहे. ऑफिसात झोप लागणं ही फार सौम्य गोष्ट झाली. मला तर समोरचा माणूस माझ्याशी बोलत असतानाही झोप लागली आहे बर्‍याच वेळा. बस स्टॉपवर बसची वाट बघत असताना मी एकदा तिकडच्या दांड्याला टेकून उभा होतो. तेव्हाही मला झोप लागली होती! उभ्या उभ्या!

    ReplyDelete
  14. धन्यवाद संकेत. अरे तेव्हा मी नुकतंच विनोदी लिहायला सुरुवात केली होती.

    हा हा इच्छाशयनी.. भारी टर्म आहे. समोरचा माणूस बोलत असताना झोप?? बाप रे.. असं मला फक्त एकदाच झालं आहे. जेटलॅगचा इफेक्ट असताना. पण अदरवाइज नाही कधी. आणि उभ्या उभ्या झोप म्हणजे कहर झाला.. आपण महान आहात.. निद्रादेवीचे सच्चे भक्त आहात. आमचा सला.... म zzzzzz

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...