Wednesday, December 23, 2009

तळमळला !!

सोमवारी (दर सोमवार प्रमाणेच) उठायला उशीर झाला. वीकेंडचा हॅंगओवर आणि आळशीपणा वगैरे वगैरे.. नाही हो.. सोमरस वाला हॅंग ओवर नव्हे.. आम्ही त्या क्षेत्रात "काला अक्षर भैस बराबर" आहोत. आमचा आपला नॉर्मल वीकेंड वाला हॅंग ओवर. आळशीपणातून आलेला.. असो. उगाच भरकाटतोय. मुद्दा हा की उशिरा उठल्यामुळे डबा नेता आला नाही ऑफीसला आणि दुपारी जेवायला बाहेर गेलो. आमच्या ऑफीसच्या जवळच एक छोटं सॅंडविच शॉप आहे तिकडे जाऊन बसलो. हॉटेल मधे ४-५ जणच होते. तसं सगळं शांत शांत होतं...
मी पण सॅंडविच वर ताव मारण्यात मग्न असताना माझ्या मागेच अगदी जवळ, अचानक धप्प असा आवाज आला. मी पटकन मागे वळून बघितलं. तर एक माणूस आडवा पडलेला दिसला. आधी काही नीट कळलंच नाही. मग पटकन लक्षात आलं की तो बहुतेक तोल जाउन पडला आहे. मी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा एक पाय टेबालाखली थोडा अडकल्या सारखा वाटला की ज्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती. आणि तो काही बोलत पण नव्हता. डोळे अर्धवट उघडे होते.. आणि अचानक माझ्या लक्षात आल की हे साधं तोल जाऊन पडण्यातलं प्रकरण नाहीये.. त्याला काहीतरी चक्कर वगैरे आली असावी आणि त्यामुळे तो पडला असावा. तो काही प्रतिसाद देत नाही हे पाहून मी पटकन आजूबाजूला नजर फिरवली. पण तो धप्प आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोचल्याचं निदान त्यांच्या चेहर्यावरून तरी दिसत नव्हात. (आणि तो माणूस एका कोपर्‍यात पडला असल्याने तो त्यांना दिसलाही नसावा असा मी आपला संशयाचा फायदा दिला त्यांना). कानाचा पडदा आणि सभोवतालचं जग या मधे आय-पॉड चे हेड फोन्स आल्याने तो धप्प आवाज हेडफोन्सच्या बाहेरच्या आवरणावर एकदा टकटक करून मावळला असणार. शेवटी मी पटकन ऑर्डर द्यायच्या काउंटरवर जाऊन त्या कोपर्याकडे बोट दाखवून काउंटर वरच्या मुलीला झाला प्रकार सांगितला. ती पटकन धावत आली माझ्याबरोबर. तिनेही आधार देऊन त्याला उठवायचा प्रयत्न केला. पण तिलाही ते शक्य झालं नाही.. एकीकडे मोबाइलची बटणं दाबून तिने पटकन इमर्जन्सी अँब्युलंस सर्विसला फोन लावून अँब्युलंस मागवली. आता माझं हळू हळू त्या माणसाकडे लक्ष गेलं. जरा म्हातारेच गृहस्थ होते. म्हणजे आपल्या आजोबांच्या वयाचे असतील. थोडे शुद्धीत आले होते आता. तोवर आम्ही त्यांना हात धरून भिंतीला टेकून बसवलं. त्यांनी डोक्यावरून टोपी काढून ठेवली. चेहर्यावर, कपाळावर चांगलाच घाम तरारला होता. अँब्युलंस काकुंनी त्यांना काहीही-अगदी पाणीही- न देण्याविषयी बजावलं होतं. माझं निरीक्षण चालूच होतं.. आजोबा चांगले उंच होते. सहा फूट तर आरामात असतील. चेहर्यावर छोटी दाढी, हसरे डोळे आणि एकदम धिप्पाड देह असा सगळा डौल होता. तेवढ्यात एक तरुण, उंच पोलिस हॉटेलमधे शिरला. अँब्युलंस काकुंनी त्या एरियातल्या पोलिसांना फोन करून इकडे यायला फर्मावलं होतं वाटतं. त्याने आजोबांजवळ बसून कसं वाटतंय वगैरे विचारून जुजबी चौकशीला सुरूवात केली. Chanton का असं काहीतरी नाव होतं त्यांचं. जवळच्याच चर्च मधे पादरीबाबा होते ते. गेली ३० वर्ष. त्यांचं आय-डी कार्ड दाखवलं पोलिसाला. त्याने वय विचारल्यावर त्यांनी ७८ असं सांगितलं. अरे म्हणजे साधारण माझ्या आजीच्याच वयाचे की. माझे आजोबा मी खूप लहान असतानाच गेल्याने आजी म्हणजे आमचं सर्वस्व होतं. आजी जायच्या आधीचा एक महिना सोडला तर कायम अगदी ठणठणीत होती. बाहेर पडली नाही तरी घरात अगदी व्यवस्थित फिरायची, स्वतःची कामं स्वतः करायची. म्हणजे ८०-८२ वर्षांची झाली तरी शेवटचा एक महिना सोडला तर म्हातारी वगैरे कधीच वाटली नाही.. अरे हो.. आता अजुन १५-२० वर्षातच आई-बाबा पण साधारण त्याच वयाचे होतील की म्हणजे म्हातारे होतील. कोणी सांगावं त्यांच म्हातारपण ८० मधे न येता थोडं आधी सत्तरीतच येईल. नको त्या दिशेला विचार वळतायत हे कळत असून ही मी त्यांना थांबवु शकत नव्हतो. आजी बरोबर तिच्या जवळपास निदान तिची मुलं म्हणजे माझे काका, आई-बाबा, तरी होते. पण आमच्या आई-बाबां बरोबर कोण आहे? त्यांना पण आमच्या बरोबर राहावसं वाटत असणारच ना . नातवला किती दिवस वेबकॅम वरुन बघणार ते? आणि त्यांचं म्हातारपण मला वाटतंय तसं सत्तरी ऐवजी साठीतच आलं तर? म्हणजे आत्ताच.. अरे बाप रे.. विचारांच्या नादात कधी हॉटेल मधून बाहेर पडलो कळलंच नाही. त्याच विचारांनी रस्त्यावरून चालत होतो. २ मिनिटे डोकं जरा दाबून धरलं, चेहर्यावरून हात फिरवला आणि पुन्हा चालायला लागलो.. जागा बदलली, रस्ता बदलला तरी विचार काही बदलत नव्हते.

*****
श्या.. बस झाल.. परत जायला हवं आता.. एक्सपोजर, करियर, लाइफ स्टाइल, एक्सपिरियन्स, मुलांच्या भवितव्यासाठीची तयारी अशी कितीही गोंडस वेष्टणं गुंडाळण्याचा प्रयत्न आपण केला ना तरी आपल्याला पण माहीत असतं की आतली गोळी शेवटी वेगळीच आहे, एकच आहे आणि ती म्हणजे पैसे, अजुन थोडे पैसे, अजुन थोडे जास्त पैसे.
हट्ट.. बस झाल.. कितव्यांदा हा असा विचार करतोय मी गेल्या २ वर्षात? परतीचा मार्ग एवढ्या जवळ नाही हे माहीत असूनही?? तसं म्हटलं तो तेवढा लांबही नाहीये.

ते मागे "सागरा प्राण तळमळला" कोणी लावलंय रे?? बंद करा बघू ते आधी.. की माझ्या मेंदूतच वाजतंय ते?

*****

पार्टनर म्हणाला "अशा संदेशासाठी बिलासारखा कागद नाही"
"असं कसं ?"
"माणूस नुसता काव्यावर जगात नाही. मागची बाजू व्यवहाराचीच"
"....."
"तू जी वेष्टनं म्हणतोयस ती खरोखर नुसतीच वेष्टण आहेत का? असं असेल तर ताबडतोब परत जा. पण तसं नसेल तर ? ती गोळीला पूरक असतील तर? किंबहुना गोळीचाच एक भाग असतील तर? गोळीलाही बिलाच्या कागदासारखीच मागची बाजू आहे हे विसरू नकोस. इतरांसाठी नाही पण निदान स्वतःसाठी तरी !!

(व पुं च्या सदाबहार पार्टनर मध्ये माझी सरमिसळ केल्याबद्दल कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार आहे.)

8 comments:

  1. अनुभवाने मला हे समजल आहे की ’तळमळण’ हा स्वभावाचा भाग असतो. मी भारतातच राहते म्हणून तळमळणे काही चुकत नाही.. मुद्दे बदलतात इतकच...

    ReplyDelete
  2. Chan jamlay lekh.....Mag kadhi yetay.????

    ReplyDelete
  3. हो aativas, बरोबर आहे तुमचं. तळमळण्याचा भौगोलिक स्थितीशी काही संबंध नाही.

    ReplyDelete
  4. धन्यवाद सागर. येऊ लवकरच. फक्त या "लवकरच" ची नक्की व्याप्ती उमगत नाही :(

    ReplyDelete
  5. तुमचं आमचं सेम असतं.....हिरवाई(?) मध्ये अडकतो...आणि अजुन थोडं अजुन थोडं करत वर्षानुवर्षं राहातो.......श्या...यावेळी जेव्हा मुव्हिंगसाठी पॅकिंग होऊन रिकाम्या घरात बसलो होतो तेव्हा जवळजवळ एकत्रच म्हणालो....मुंबईत जावसं वाटतं...................:(

    ReplyDelete
  6. हो ना खरंच. हरित क्रांतीच्या नादात जास्त अडकायला नको. आम्हाला तर आत्ताशी २ वर्षच झालीयेत पण already कंटाळा यायला लागलाय.. निम्मी सरली, निम्मी उरली :) ... आत्ताच समरमध्ये आई-बाबा येऊन गेल्यामुळे जरा जास्तच होमसिक व्हायला होत कधीकधी.

    ReplyDelete

पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन

श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...