Tuesday, November 8, 2022

नो लंडन नो बॉंबिंग !! (लंडन बॉंबिंग २००५)

सहसा मला पुस्तकावर आणि संबंधित लेखकावर टीका करायला आवडत नाही. कुठलंच पुस्तक तितकंसं टाकाऊ नसतं असं अनुभवाअंती झालेलं मत असो किंवा अगदी निवडून, पारखून घेऊनच पुस्तकं वाचण्याची लागलेली सवय असो, पण सुदैवाने अगदीच तुरळक अपवाद वगळता अमुक एक पुस्तक आवडलं नाही असं माझ्या बाबतीत फार कमी वेळा होतं. भ्रमनिरास होत असतीलही कदाचित पण तो वाचनसवयीचा एक अटळ असा भाग आहे.

पण काही पुस्तकं मात्र नैमित्तिक भ्रमनिरासाच्याही कैक योजनं पुढे जाऊन अक्षरशः कठोर अपेक्षाभंग करून प्रचंड निराश करतात किंवा अगदीच स्पष्ट शब्दांत बोलायचं झाल्यास अक्षरशः फसवणूक झाल्याचा अनुभव देतात तेव्हा मात्र आपला टीका न करण्याचा नियम मोडावा लागतो. किंवा मग आपण एवढं पारखून घेऊन पुस्तक निवडलेलं असतानाही कसे काय फसलो असं वाटायला लागतं. वस्तुतः ही फसवणूक सुरू झालेली असते ती पुस्तकाच्या शीर्षकापासूनच.

नुकतंच मी 'Among the Mosques' हे गेल्या शंभरेक वर्षांत ब्रिटनमध्ये फोफावलेला इस्लाम या विषयावर Ed Husain या ब्रिटिश मुसलमान लेखकानेच लिहिलेलं एक पुस्तक वाचलं. या पुस्तकाबद्दल लवकरच लिहायचा मानस आहे. अतिशय तपशीलवार माहिती, संदर्भ आणि पुराव्यांसकट लिहिलेलं ते पुस्तक वाचत असतानाच वाचनालयात निळू दामले लिखित 'लंडन बॉम्बिंग २००५' हे पुस्तक दृष्टीस पडलं आणि 'इम्पल्सिव' वाचकाप्रमाणे ते लगेच उचललं. अर्थात Among the Mosques मधले तपशील डोक्यात घोळत असल्याचाही परिणाम होताच. ब्रॅडफर्ड, ब्रिस्टन, मँचेस्टर ही दोन्हींमध्ये सामायिक असलेली ठिकाणं वाचून लंडन बॉम्बिंग वाचण्याची उत्सुकता अधिकच चाळवली गेली होतीच.


पुस्तकाच्या पहिल्या दोन पानांमध्ये ७ जुलै २००५ साली लंडनच्या भूमिगत रेल्वे आणि बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची अगदी थोडक्यात माहिती येते. बॉम्बस्फोटांबद्दल वाचून काहीच दिवसांत ते बॉम्ब्स् आणि आत्मघातकी हल्ले करणारे ते ब्रिटिश मुस्लिम तरुण यांच्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने लेखकाचा इंग्लंड दौरा कसा ठरतो त्याबद्दल तपशीलवार माहिती मिळते. (जी बॉम्बस्फोटांच्या तपशिलांपेक्षाही अंमळ अधिकच आहे.) लेखकाचा इराण मार्गे येण्याचा प्रयत्न कसा सफल होत नाही याचेही अनावश्यक तपशील येतात. त्यानंतर लेखक एकदाचा इंग्लंडमध्ये जाऊन पोचतो आणि मित्राकडे जाऊन उतरतो. लेखक इंग्लंडला पोचल्यावर बॉम्बस्फोट झाले ती ठिकाणं, तिथली पोलीस स्टेशन्स, संबंधित तपास अधिकारी, दहशतवाद विरोधी पथक (anti terrorist squad) आणि त्यांचे अधिकारी, अतिरेकी वास्तव्य करत असलेली शहरं, ठिकाणं, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शाळा, मशिदी, शिक्षक इत्यादींना भेटेल, अतिरेक्यांची आर्थिक/सामाजिक/सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचप्रमाणे इतक्या महाविघातक निर्णयामागची त्यांची कारणमीमांसा समजून घेईल आणि त्यादृष्टीने काही चौकशी करेल, भेटीगाठी घेईल आणि त्यातून त्याने केलेली निरीक्षणं, निष्कर्ष आपल्यापुढे मांडेल अशी कुठल्याही सर्वसामान्य वाचकाची अपेक्षा असते.


पण घडतं भलतंच. कुठल्या मित्राकडे गेलो, तिथे काय खाल्लं, कुठली दारू प्यायली, कुठल्या गावी गेलो, कसा गेलो, तिथे रस्ता कसा चुकलो, मग रस्ता कसा सापडला, कसा भटकलो, बस कशी पकडली, टॅक्सी कशी शोधली, चावी हरवल्याने शेजारच्यांकडे कसा अपरात्री गेलो, गप्पा मारल्या, खाल्लं, दारू प्यायली, परदेशी भारतीयांना कसा वेळ नसतो, ते कसे आत्ममग्न असतात, त्यांच्यापेक्षा मला त्यांच्या शहराची आणि शेजाऱ्यांची कशी अधिक माहिती आहे हीच बडबड पानंच्या पानं भरून चालू राहते.

अधेमधे अनेक लोकांना लेखक भेटतो त्याचे उल्लेख येतात. काही जण त्याला भेटीचा उद्देश विचारतात. तेव्हा काही वेळा लंडन बॉम्बिंग विषयी माहिती गोळा करायला आलोय हे सांगण्या ऐवजी लेखक म्हणतो की तुम्हाला हवं ते बोला..!!!! तर काही वेळा इतरच काहीतरी प्रश्न विचारत राहतो ज्यांचा लंडन बॉम्बिंगशी कणमात्रही संबंध नसतो.

दुसऱ्या एका शहरात तिथले नगरसेवक स्थानिक मुस्लिम लोकांना कसे भेटत नाहीत याबद्दल उगाचच एक लांबलचक भाषण झोडतो. एका ठिकाणी एका भारतीय व्यापाऱ्याच्या रोल्स रॉईस बद्दलचे गोडवे गायले जातात तर अन्य काही ठिकाणी अशाच लंडन बॉम्बिंगशी संबंध नसलेल्या गप्पा झोडल्या जातात.

नाही म्हणायला अधेमधे ओसामा, अमेरिका, टोनी ब्लेअर, मार्गारेट थॅचर, तालिबान यांचे उल्लेख येतात पण त्यांचे धागेदोरे प्रस्तुत पुस्तकाच्या विषयाशी अर्थात २००५ च्या लंडन बॉम्बस्फोटांशी मात्र जुळवले जात नाहीत. त्याचप्रमाणे वंशद्वेष, परदेशी आणि अन्य वंशीय लोकांना आपलंसं करण्यात स्थानिक ब्रिटिश कसे अपयशी ठरतात, त्यामुळे मुस्लिम तरुणांची माथी कशी भडकतात, त्यांच्या मनात स्थानिक नागरिक आणि त्यांचा धर्म, चालीरीती, संस्कार, जीवनशैली यांच्याबद्दल तुटकपणा, द्वेष कसा निर्माण होतो आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून मुस्लिम तरुण कसे आयसिस मध्ये जातात, कसे दंगली घडवून आणतात, कसे बॉम्बहल्ले करतात याची रसभरीत वर्णनंही येतात!

तब्बल दीडशे पानी पुस्तकात विषयाशी प्रामाणिक असणाऱ्या किंवा विषयाला धरून असणाऱ्या किमान दीडशे ओळीही (सलग नव्हे, एकूण) नसाव्यात हेच पुस्तकाचा रुपरंग स्पष्ट करायला पुरेसं आहे.

कच्ची डायरी किंवा खर्डा अखेरचा (किंवा सुरुवातीचाही) हात न फिरवता, घाईघाईने प्रिंटिंगला दिलं आहे असं वाटावं एवढं विस्कळीत पुस्तक वाचल्यावर सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे निव्वळ घोर फसवणूक झाल्याच्या अनुभवाखेरीज वाचकाच्या पदरी काहीही पडत नाही.

आणि त्यात पुन्हा एखाद्या महत्वाच्या आणि आवडीच्या विषयावर आणि तेही एखाद्या महत्वाच्या, प्रथितयश आणि गंभीर लेखन करणाऱ्या लेखकाने इतकं हलक्यात लेखन करावं हेही तितकंच वेदनादायी खरं तर.

अर्थात हे लेखकाच्या समग्र लेखनाविषयी मत नसून केवळ या पुस्तकाबद्दलचं मत आहे आणि सदर लेखकाची अन्य पुस्तकं दर्जेदार असतील या बद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही. फक्त मी ती वाचलेली नाहीत इतकंच. किंबहुना त्यांची सुसाट जॉर्ज, अफगाणिस्तान, लवासा वगैरे विषयांवरची पुस्तकं अतिशय दर्जेदार आहेत हेही मी ऐकून आहे. तरी सदर पुस्तक मात्र भ्रमनिरास करतं हे मात्र नक्कीच!

अर्थात हे ही पुस्तक अनेकांना आवडू शकेल किंवा आवडलंही असेल. हे पुस्तक वाचा किंवा वाचू नका हे सांगण्याचा मला अधिकार नाहीच. मात्र 'समानशीले' वाचक मंडळींचा अपेक्षाभंग होऊ नये म्हणून दिलेली ही एक सूचना म्हणून याकडे नक्कीच बघू शकता.

-हेरंब ओक


No comments:

Post a Comment

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...