Friday, October 28, 2022

रीचरभर शुभेच्छा


ली चाईल्डचं रीचर सिरीजमधलं नवीन पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं.

ली चाईल्डचं रीचर सिरीजमधलं नवीन पुस्तक प्रकाशित होणार आहे.

मुखपृष्ठ अजून तयार होतंय.
होय. दोन्ही वाक्यं खरी आहेत. आज, अर्थात २९ ऑक्टोबरला ली चाईल्ड आणि जॅक रीचर या दोघांचाही वाढदिवस असतो. ली चा जन्म १९५४ सालचा तर रीचरचा १९६० चा. तर आपल्या आणि आपल्या मानसपुत्राच्या जन्मदिनाचा मुहूर्त साधून ली चाईल्ड त्याच्या रीचर सिरीजमधलं (अर्थात हे पुन्हा पुन्हा सांगायची गरजच नाही. कारण ली ने गेल्या पंचवीसेक वर्षांत रीचर सोडून अन्य काहीही लिहिलेलं नाही आणि तरीही तो एवढा अफाट लोकप्रिय आहे!) नवीन पुस्तकं दरवर्षी प्रकाशित करत असतो. अर्थात हे झालं सांगायचं कारण. पण खरं तर अमेरिकेतले थँक्सगिविंग, नाताळ हे सण, त्यामुळे एकत्र येणारी कुटुंब, त्यांची फॅमिली गॅदरिंग्ज, भेटवस्तूंचं आदानप्रदान, त्याचप्रमाणे कडक हिवाळा आणि हिमवृष्टीमुळे लोकांच्या बाहेर फिरण्यावर येणाऱ्या स्वाभाविक मर्यादा या सगळ्या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून ही तारीख निवडलेली असते. कारण याचवेळी लोकांची पैसे खर्च करण्याची इच्छा आणि शक्ती दोन्हीही असतात. आणि अर्थात हे एकटा ली च करतो असं नाही. तर जॉन ग्रीशम, जेम्स पॅटर्सन, मायकल कॉनली, जेफरी आर्चर, डेव्हिड बॅलडाची असे अनेक प्रथितयश त्याचबरोबर कित्येक होतकरू लेखकही ही युक्ती वापरतात. अनेक नवीन वेबसिरीजची किंवा त्यांच्या नवीन सिझन्सची सुरुवातही साधारण याच दोनेक महिन्यांच्या कालखंडात होत असते. Capitalism 101!

दोन नावांच्या आकारांचं गुणोत्तर.
तर No Plan B हे ली चं २८ वं पुस्तक २५ ऑक्टोबरला प्रकाशित झालं. आणि आता त्याच्या २९ व्या पुस्तकाची घोषणा झाली ही. वर म्हंटल्याप्रमाणे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ली नवीन पुस्तक प्रकाशित तर करतोच पण त्याचबरोबर गेली अनेक वर्षं नित्यनेमाने १ सप्टेंबर या तारखेला पुढच्या पुस्तकाचा श्रीगणेशा ही करतो. २०१० मध्ये त्याची 61 Hours आणि Worth Dying For अशी दोन पुस्तकं अनुक्रमे मार्च आणि ऑक्टोबर महिन्यांत प्रसिद्ध झाली. 61 Hours चा शेवट थोडा संदिग्ध आहे. त्यामुळे रीचर कुठे आहे? कसा आहे? वाचला का? कसा वाचला? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारून चाहत्यांनी ली आणि प्रकाशकांना भंडावून सोडलं. हे सगळे प्रश्न एकदाचे निस्तरावेत आणि वाचकांना त्यांच्या लाडक्या रीचरबद्दल कळण्यासाठी अजून एक वर्ष थांबायला लागायला नको या उद्देशाने ली ने 61 Hours मधल्या कथानकाला जोडूनच Worth Dying For हे पुस्तक लिहिलं आणि ते त्याच वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केलं. तेव्हापासून त्याच्या पुस्तक प्रकाशनाचा महिना मार्च वरून ऑक्टोबरवर स्थिर झाला तो झालाच.

दरम्यान ली त्याच्या नवीन पुस्तकाची सुरुवात १ सप्टेंबर या दिवशी करतो असं बोललं जाऊ लागलं. त्याने त्याच्या पहिल्या पुस्तकाचं लिखाण १ सप्टेंबर या दिवसापासून सुरू केलं असल्याने दरवर्षी नवीन पुस्तकाच्या लिखाणाची सुरुवात त्याच दिवसापासून होते असं स्वतः ली ने काही मुलाखतीं दरम्यान सांगितलं. यंदाचं पुस्तक प्रकाशित व्हायच्याही आधी पुढच्या वर्षीच्या पुस्तकाबद्दलची वाचकांची ओढ आणि उत्सुकता वाढवण्याची ही मार्केटिंगची युक्ती जबरदस्त फळाला आली. सुरुवातीला फक्त शीर्षक दिसेल असं पण मुखपृष्ठ कोरं असलेलं म्हणजे प्रगतीपथावर असतानाचं चित्र प्रकाशित केलं जातं. कालांतराने मुखपृष्ठ ठरल्यावर पुन्हा जाहिरात केली जाते. त्यात पुन्हा ली च्या पुस्तकांची अमेरिकेत एक आणि ब्रिटनमध्ये एक अशी दोन वेगवेगळी मुखपृष्ठं असतात. रीचर सिरीजमधल्या चौथ्या पुस्तकाच्या वेळी तर हद्दच झाली होती. त्यावेळी अमेरिकन आणि ब्रिटिश पुस्तकांची फक्त मुखपृष्ठंच नव्हे तर त्यांची शीर्षकंही पूर्णतः भिन्न होती. ब्रिटिश व्हर्शनचं शीर्षक होतं The Visitor. मात्र तेच अमेरिकेत Running Blind या नावाने प्रकाशित केलं गेलं. पण असं करण्यात फार गोंधळ उडतो हे लक्षात आल्याने पुन्हा असले विचित्र प्रयोग केले गेले नाहीत. पण मुखपृष्ठं मात्र जाणीवपूर्वक भिन्न असतात. ब्रिटिश पुस्तकावर शक्यतो रीचरचा लॉंग शॉट असतो तर अमेरिकन मुखपृष्ठावर मात्र रीचरचा मागमूसही नसतो. रस्ते/गाड्या/ट्रेन वगैरे रँडम गोष्टी असणारं एक सामान्य चित्र मुखपृष्ठाची जबाबदारी बजावतं.


The Visitor म्हणजेच अमेरिकेतलं रनिंग ब्लाइंड.


Running blind म्हणजेच ब्रिटनमधलं द विझिटर.

तर सालाबादप्रमाणे आणि रीचर पंथाच्या परंपरेनुसार २५ ऑक्टोबरला No Plan B हे पुस्तक तर प्रकाशित झालं आहेच पण त्याचबरोबर ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रकाशित होऊ शकणाऱ्या बिनमुखपृष्ठाच्या पुस्तकाची घोषणाही झाली आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे The Secret. पुस्तकाच्या ओळखीत देण्यात आलेले तपशील रीचरच्या नेहमीच्या शैलीशी प्रामाणिक राहणारे असेच आहेत.



पहिल्या पुस्तकाचं ब्रिटिश मुखपृष्ठ.



सुमारे आठ महत्वाच्या व्यक्तींचा निरनिराळ्या स्थळी मृत्यू होतो. त्यात काही आत्महत्या असतात तर काही अपघात. पण एका अपघातामुळे संशयाची सुई घातपाताकडे वळते आणि रहस्य सोडवण्यासाठी रीचर साहेबांना आवताण धाडलं जातं. हे पुस्तक रीचर अमेरिकन सैन्याच्या
110MP या स्पेशल युनिट मध्ये कार्यरत असतानाचं अर्थात फ्लॅशबॅक मधला काळ मांडणारं असावं असं वर्णनावरून वाटतंय. रीचरची वाचकांशी ओळख झाली ती किलिंग फ्लोअर या पहिल्या पुस्तकात. त्या पुस्तकात सैन्यातून निवृत्त झालेला रीचर वाचकांच्या भेटीस येतो. रीचर सैन्यात कार्यरत असतानाची अर्थात फ्लॅशबॅक/प्रिक्वल मांडणारी यापूर्वी तीन पुस्तकं ली ने लिहिली आहेत. The Enemy, The Affair आणि Night School.  यातलं Night School वगळता उरलेली दोन्ही पुस्तकं वाचकांनी प्रचंड डोक्यावर घेतली आहेत. इतकी की पुढचं पुस्तक रीचरच्या सैन्याच्या कारकिर्दीतलं लिही अशी वाचक ली कडे वेळोवेळी मागणी करत असतात. यावेळी जवळपास सहा (Night School २०१६ मध्ये प्रकाशित झाला होतं) वर्षांनी सैन्यातला रीचर पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे मुखपृष्ठ विरहित पुस्तकाचं शीर्षक बघून आणि वर्णन वाचून आत्तापासूनच चाहत्यांच्या उत्साहपूर्ण प्रतिक्रिया येत आहेत. पण अर्थातच सगळ्याच वाचकांच्या नाही. त्याला कारणही तसंच आहे.

काही वर्षांपूर्वी, आता रीचरबद्दल पुढे काही लिहिण्यासारखं उरलेलं नाही आणि त्याचं वयही झालंय, असं वाटून ली ने एका पुस्तकात रीचरचा शेवट करायचं ठरवलं. अगदी Dying Lonely असं रीचरच्या एकूण आयुष्याला साजेसं शीर्षकही देऊन तो मोकळा झाला. मात्र प्रकाशकांना हे कळताच त्यांचं धाबं दणाणलं. सोन्याची अंडी देणारी कोंबडी फक्त जन्मदात्या लेखकाला वाटतं म्हणून अशीच मारून टाकण्याचा अवसानघातकीपणा त्यांच्यातल्या भांडवलदारांना पटेना. Again Capitalism 101. त्यांनी रीचरला न मारण्याविषयी ली ला परोपरीने समजावून सांगितलं. तरीही ली ऐकेना तेव्हा रीचरचा भार अन्य कुठल्या लेखकाच्या खांद्यावर सोपवावा असंही त्याला सुचवलं गेलं. पण तेही ली ला मान्य नव्हतं कारण कुठलाही अन्य लेखक रीचरला न्याय देईल अशी त्याला खात्री वाटत नव्हती जे स्वाभाविकच होतं.

दरम्यान ली च्या मनात गेली काही वर्षं आकार घेत असलेली एक योजना त्याने बोलून दाखवली. ली चा त्याच्याहून तब्बल १४ वर्षांनी धाकटा असणारा भाऊ अँड्र्यू हा ही लेखनक्षेत्रात हातपाय मारत होता. त्याची काही पुस्तकंही प्रकाशित झाली होती परंतु ली सारखं तर जाऊद्याच पण म्हणावं असंही यश पदरात पडत नव्हतं. याच संधीचा लाभ घेण्याचं ठरवून ली ने लेखनाची धुरा अँड्र्यूच्या खांद्यावर सोपवण्याचं ठरवलं. कदाचित रीचरचं पात्र अगदीच हाताबाहेर जाणार नाही आणि जातंय असं वाटलंच तर वेळीच हस्तक्षेप करून त्याला त्याच्या मूळ व्यक्तिरेखेशी प्रामाणिक तर ठेवता येईलच पण सोबतीला त्याच निमित्ताने धाकल्या भावाचं गाडंही थोडं रुळावर आणता येईल अशा दोन्ही हेतूंनी या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता मिळाली. असं म्हणतात की पुस्तक क्रमांक २२ ते २४ -- Midnight Line, Past Tense, Blue Moon -- ही तीन पुस्तकं लीच्या मदतीने अँड्र्यूने लिहिली पण त्यांच्यावर लेखक म्हणून नाव मात्र एकट्या ली चं लागलं. वाचकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी आणि रीचरचं भविष्य ठरवण्यासाठी ही सगळी खटपट असावी. अर्थात पट्टीच्या रीचरप्रेमींना शैलीतला फरक, बारकाव्यांचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं. पण तरीही पुस्तकं अगदीच टाकाऊ आहेत असा टोकाचा प्रतिसाद मात्र कोणकडूनच आला नाही एवढं मात्र नक्की. रीचरचा प्रवास पुढे चालू ठेवायला ली आणि प्रकाशकांना हे एवढं कारण पुरेसं होतं.

ली आणि अँड्र्यू.
त्यानंतर अनुक्रमे २०२० आणि २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या The Sentinel आणि Better Off Dead या दोन पुस्तकांवर ली च्या अगदी बरोबरीने नसलं तरी थोडं खाली आणि लहान फॉन्टमध्ये सहलेखक म्हणून अँड्र्यूचं नाव झळकलं. The Sentinel वर अपेक्षेप्रमाणेच कडाडून टीका झाली. Better Off Dead किंचित बरं आहे असा मतप्रवाह आहे पण तरीही जुन्याजाणत्यांचं मात्र ली ने एकट्यानेच लिहावं किंवा रीचर ला निवृत्ती देऊन स्वतःही निवृत्त व्हावं असं ठाम मत आहे. अँड्र्यू, प्रकाशक आणि खुद्द ली यांनी हे सगळं सगळं गृहीत धरलं असणारच. अँड्र्यू आणि ली या दोघांनी लिहिलेली अशी ५-७ पुस्तकं काढावी असा काहीसा त्यांचा करार झाला असावा. कालांतराने प्रेक्षक अँड्र्यू आणि त्याच्या रीचरलाही स्वीकारतील आणि मग ली ला अधिकृतरीत्या आणि सन्मानाने निवृत्ती घेता येईल अशी काहीशी योजना असावी. वाचकांच्या टीकेकडे फार लक्ष न देता ठरलेल्या योजनेबरहुकूम शांतपणे काम करावं यावर त्यांचं एकमत झालं असणार हे एवढ्या टीकेनंतरही यावर्षी प्रकाशित होणाऱ्या आणि सालाबादप्रमाणे पुढच्या वर्षीच्या पुस्तकाची घोषणा करण्याच्या निर्णयावरून लक्षात येतंच आहे.

अर्थात सहलेखक ही संकल्पना पाश्चात्य साहित्यसृष्टीसाठी अगदीच काही नवखी आहे असंही नव्हे. जेम्स पॅटर्सन निरनिराळ्या लेखकांसोबत गेली कित्येक वर्षं हे करतोय. स्टीव्हन किंगने आपल्या मुलासोबत एक पुस्तक लिहिलं आहे. डग्लस प्रेस्टन आणि लिंकन चाईल्ड हे दोन लेखक तर पहिल्या पुस्तकापासून प्रेस्टन अँड चाईल्ड या नावानेच लिहितात.

दरम्यान गेल्या वर्षी प्राईमवर प्रदर्शित झालेल्या रीचर या मालिकेच्या 'किलिंग फ्लोअर' या पुस्तकावर आधारित पहिल्या पर्वाला (सिझन) तुफान लोकप्रियता मिळाली आणि त्यामुळे त्यापासून प्रेरणा घेऊन 'बॅड लक अँड ट्रबल' या ली च्या अन्य एका लोकप्रिय पुस्तकावर आधारित दुसरं पर्व येणार असल्याची घोषणाही पहिल्या पर्वानंतर काही दिवसांतच करण्यात आली. दुसऱ्या पर्वाची तयारी सध्या जोरात चालू असून फेब्रुवारी २०२३ पर्यंत तो प्रेक्षकांच्या भेटीस येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मालिकेच्या यशामुळे रीचरच्या पात्राला अनेक नवीन चाहते मिळाले, कित्येक लोकांनी सिरीजमुळे प्रभावित होऊन किलिंग फ्लोअर वाचलं. सिरीजच्या लोकप्रियतेचाही पुस्तकांचा प्रवास पुढे चालू राहण्यासाठी निश्चितच उपयोग होईल अशी आशा आहे.

अर्थात अँड्र्यूला रीचरचं शिवधनुष्य पेलता येतं का आणि ते त्याला पेलता येतंय असं वाचकांना वाटतं का यावर रीचरचं जीवन-मरण अवलंबून आहे हे मात्र नक्की. ते पेलता येवो,  रीचर औक्षवंत होवो आणि ली ला अधिकृतपणे, सन्मानाने निवृत्ती घेता येवो यासाठी त्याला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांकडून 'रीचरभर' शुभेच्छा!

जाता जाता : ली चाईल्ड हे त्याचं मूळ नाव नव्हे. हे त्याचं टोपणनाव. त्याचं मूळ नाव आहे जेम्स डोवर ग्रांट. आणि त्याच्या धाकट्या भावाचं नाव आहे अँड्र्यू ग्रांट. पण ली चाईल्ड हे नाव असलेल्या लेखकाच्या पुस्तकांचा सहलेखक असलेल्या त्याच्याच धाकट्या भावाचं आडनाव ग्रांट असून कसं चालेल? (आणि मीटरमध्येही बसत नाही). त्यामुळे त्याचं नाव तेच राहू दिलं (असावं) पण आडनाव मात्र चाईल्डचे धाकटे बंधुराज आहेत हे पटावं यासाठी चाईल्ड केलं गेलं (असावं) आणि त्यामुळे अँड्र्यू चाईल्ड हे नाव जन्माला आलं. तस्मात् अँड्र्यूने रीचरपूर्व काळात लिहिलेल्या पुस्तकांवर त्याचं नाव अँड्र्यू ग्रांट असं आहे तर रीचरच्या पुस्तकांवर मात्र अँड्र्यू चाईल्ड 😃

जाता जाता - पर्व २ : सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी किलिंग फ्लोअर वाचल्यानंतर झपाटल्यागत ली ची सगळी पुस्तकं वाचून काढल्यानंतर रीचरचं पात्र, त्याचं व्यक्तिमत्त्व आणि त्याचबरोबर ली, त्याची लेखनशैली, लेखनविशेष आणि एकूणच लेखनप्रवास यावर तपशीलवार लेख मागेच लिहिला आहे. पुनरुक्ती होऊ नये म्हणून काही अपवाद वगळता त्या लेखातले उल्लेख वगळले आहेत.

जाता जाता - पर्व ३ : नुकतंच प्रकाशित झालेलं No Plan B हे पुस्तक माझं सुमारे २०% वाचून झालं आहे आणि आधीच्या दोन पुस्तकांपेक्षा ते नक्कीच उजवं वाटतंय. तस्मात् रीचर पंथ फोफावत राहील अशी आशा वाटते आहे.

-हेरंब ओक

इच्छुकांसाठी जुन्या लेखाचा दुवा : https://harkatnay.blogspot.com/2020/10/blog-post.html

No comments:

Post a Comment

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...