Tuesday, February 16, 2021

वाटेवरची प्रार्थना

काल एक जरा वेगळाच किस्सा घडला. गुहागरहून थोडं उशिरा निघून आम्ही रात्री साधारण ८-८:१५ च्या आसपास कशेडी घाटाच्या तोंडाशी होतो. घाट जस्ट सुरू होणार होता. पण समोर बघतो तर वाहनांची खूप मोठी रांग लागली होती. प्रचंड ट्रॅफिक जॅम झाला होता. गाड्यांचे हेड-टेल लाईट्स वगळता किर्र काळोख होता. आमची गाडीही थोड्या वेळ थांबली. एव्हाना बाकीच्या गाड्यांमधले ड्रायव्हर्स बाहेर उतरले होते. त्यांच्या बोलण्याचा आवाज येत होता. खूप वेळ झाला, काहीच हालचाल नाही, सगळं बंद आहे, पोलीस सोडत नाहीयेत वगैरे वगैरे बोलणं ऐकू येत होतं. हळूहळू आम्हाला टेन्शन यायला लागलं. कारण गुगल मॅप्स तिथून पुढे ५ तास दाखवत होतं घरी पोचायला. आणि समजा हा ट्रॅफिक जॅम लवकर सुटलाच नाही किंवा अजून ३-४ तास राहिला तर घरी कसे आणि कधी पोचणार असं वाटायला लागलं. लेकाने ऑलरेडी प्रश्न विचारून हैराण करायला सुरुवात केली होती. समोर लांबच्यालांब नागमोडी वळणं घेतलेली वाहनांची रांग दिसत असल्याने त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. आता फक्त प्राप्त परिस्थितीला शरण जाऊन जे होईल ते स्वीकारायचं एवढा एकच मार्ग होता. आणि अचानक प्रकाशचा (आमचा ड्रायव्हर) फोन वाजला. त्याची रिंगटोन म्हणजे 'जाऊंद्या ना बाळासाहेब' या (अतिशय %@*) चित्रपटाचं टायटल सॉंग होतं. आणि ते गाणं म्हणजे

"वाट दिसू द्ये गा द्येवा वाट दिसू द्ये
वाट दिसू द्ये गा द्येवा गाठ सुटू द्ये"

हे गाणं म्हणजे अजय-अतुलच्या काही खास गाण्यांपैकी एक अतिशय गोड असं गाणं आहे. (ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी या युट्यूब लिंकवर जाऊन आवर्जून ऐका.
https://youtu.be/FeR81vxTdBs )

ते गाणं अचानक माझ्या डोक्यात वाजायला लागलं. आणि एकदा चुकून शेवटच्या "गाठ सुटू दे" ऐवजी "घाट सुटू दे" असंही म्हंटलं गेलं जे प्राप्त परिस्थितीत अतिशय चपखल बसणारं होतं. ते गाणं ऐकून काही क्षण तरी एकदम धीर आला.

लगान बघत असताना सर्वस्व हरलेला भुवनचा संघ ज्याप्रमाणे देवाला शरण जातो आणि अचानक कुठून तरी लांबवरून लताचे "ओ पालनहारे, निर्गुन और न्यारे" चे सूर येतात आणि भुवनबरोबर आपणही क्षणभर सगळं विसरून जाऊन त्या विधात्याला शरण जातो त्या प्रसंगाचीच एकदम आठवण आली. 

आणि काय आश्चर्य!!!! पुढच्या दोनेक मिनिटांत पुढच्या गाड्या हलायला लागल्या आणि सगळा ट्रॅफिक जॅम पाच मिनिटांत मोकळा झाला. थोडं अंतर गेल्यावर कळलं की सुमारे २०-२५ फूट लांबीच्या सळया वाहून नेत असलेला एक लांबच्या लांब फ्लॅट ट्रक एका मोठ्या जेसीबीवर आदळला होता. ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला होता. जवळपास ३-४ तास तरी पूर्ण ट्रॅफिक जॅम झाला असावा. आम्ही थोडे उशिरा निघाल्याने म्हणा किंवा व्याडेश्वराच्या कृपेने म्हणा त्यातून सुखरूपपणे सुटलो होतो आणि जणू आम्हीच प्रार्थना करावी तद्वत "वाट दिसू दे" हे गाणं वाजलं होतं आणि आमची प्रार्थना ताबडतोब ऐकली जाऊन अक्षरशः पाच मिनिटांत ट्रॅफिक जॅमही सुटला होता! सगळंच विलक्षण चमत्कारिक आणि अद्भुत!!

1 comment:

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...