Friday, November 17, 2017

स्मायली

"आई, आज हिंदीचा पेपर मिळाला."

"फक्त हिंदीचा? आणि बाकीचे? बाकीचे कधी मिळणार?" लेक रिसर्च पेपर प्रेझेंट करून आल्याच्या उत्साहागत आईने पृच्छा केली.

"ते माहीत नाही." तोडीस तोड निरुत्साहात उत्तर आलं.

"बरं ठीके. बघू हिंदीचा. किती मिळाले?" 'रिसर्च पेपर' मोड ऑनच होता.

"एटीन करेक्ट, वन रॉंग आणि एक स्मायली. !!!!"

"एक काय?" आता बाबाचंही कुतूहल चाळवलं होतं

"ए टी न क रे क्ट, व न रॉं ग आ णि ए क स्मा य ली. !!!!" पुनर्मतमोजणीचा निकाल तोंडावर मारण्यात आला.

"स्मायली??? म्हणजे? कुठे दिला? पेपरात? आणि का ते??"

"ते मला काय माहीत. तूच बघ आणि सांग मला" एवढा निरुत्साह कुठून येत असावा??

मातोश्रींनी घाईघाईने पेपर हातात घेऊन उलट सुलट मागे पुढे करत चाळायला सुरुवात केली आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. एका प्रश्नाला काहीच मार्क दिले नव्हते परंतु मुलांच्या तोंडून देवाने वदावे तद्वत 'स्मायली' मात्र खरोखरीच विराजमान जाहला होता.

दोनेक मिनिटं सगळं वाचून झाल्यावर मातोश्रींना हसणं आवरेनासं झालं. मातोश्रींचा अवतार पाहता एव्हाना तीर्थरूपांनीही रिंगणात उडी घेतली होती.

"अग काय झालं तरी काय? काय पराक्रम केलेत?"

"थांब जरा" असं म्हणत मातोश्री वाचून दाखवायला लागल्या.

"एक जंगल मी एक खरगोश और एक कछुआ रहते थे. दोनो बहोत अच्छे दोस्त थे." साध्या ससा कासवाच्या बोधकथेवरच्या प्रश्नोत्तरांमध्ये शाळेच्या म्याडमला स्मायली द्यावासा का वाटला असावा हे एक कोडंच होतं.

एव्हाना मातोश्री कथा संपवून प्रश्नोत्तरांवर आल्या होत्या.

"इस कथासे आपको क्या बोध मिलता है? " ... स्मायली वालं काय तात्पर्य असावं बरं??

"इस कथासे मुझे ये बोध मिलता है के प्रतियोगिता में सोना नही चाहिये"


आई-बापाच्या धो धो हसण्याच्या शर्यतीत "आई सांग ना. का दिला स्मायली?" हा प्रश्न साफ विरघळून गेला. !

1 comment:

  1. आपण मोठ्यांनी कधी विचारही केलेला नसतो असं या मुलांना सुचतं. परिक्रमाही भारीच झाली :-)

    ReplyDelete

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...