Sunday, April 18, 2010

पुन्हा चोरशील ??

आजपासून एक नवीन ब्लॉग सुरु करतोय. पण ब्लॉगची जाहिरात करण्यासाठी वगैरे म्हणून ही पोस्ट लिहीत नाहीये. हा ब्लॉग आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षेने आणि खात्रीनेच हे पाउल उचलतो आहे. ब्लॉगचे तपशील पुढीलप्रमाणे 

ब्लॉगचं नाव : पुन्हा चोरशील
पहिली पोस्ट : पहिली चोरी

तीच पोस्ट इथे खाली चिकटवतो आहे.
---------------------------------------------------------------------------------------
गेल्या ५-६ महिन्यांत मराठी ब्लॉग्सच्या जगात मुक्त मुशाफिरी करताना एक लक्षात आलं की इथे एकापेक्षा एक सशक्त लेखन करणारी मंडळी आहेत. नुसतं वाचक म्हणून इथे वावरलो तरीही आपल्या साहित्यविषयक किंवा एकूणच जीवनविषयक ज्ञानात, अनुभवात खूप भर पडेल, पडते आहे. पण दुर्दैवाने लवकरच हेही लक्षात आलं की इथे असे एकसेएक भन्नाट लिहिणारे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोक ते लेखन सरळ, जसंच्या तसं, मूळ लेखाचा आणि मूळ लेखकाचा साधा उल्लेखही न करता, त्यांना योग्य ते श्रेय न देता बिनदिक्कतपणे आपल्या ब्लॉगवर टाकणारे, कॉपी+पेस्ट करून इमेल मध्ये चिकटवून फॉरवर्ड करणारे आहेत. अनेक महिने वेगवेगळया अनेक ब्लॉग्सचं वाचन केल्याने (जवळपास) प्रत्येक ब्लॉगरची भिन्न, युनिक शैली, विषय, मांडणी, रचना आणि एकूणच लेखन यामुळे ते लेखन त्या त्या ब्लॉगवर न वाचता (दुर्दैवाने आणि चुकूनमाकून) इतर कुठे वाचायची वेळ आली तरी मूळ लेखक सहज ओळखता येऊ लागला. सुरुवातीला काय करावं ते न कळल्याने 'हे असं चालायचंच' असं वाटून त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्ष केलं गेलं. पण बघता बघता या गोष्टी वारंवार होतायत असं लक्षात यायला लागलं किंवा अशा बाबतीत नजर थोडी जास्तच शोधक बनल्याने अशा चोर्‍या (यापेक्षा सौम्य शब्द मला तरी माहित नाही) जास्तच चटकन दृष्टीस पडू लागल्या. आणि एक दिवस चक्क माझ्याही कवितेची दुसर्‍या एका अशी चोरी झाल्याचं लक्षात आलं. तेव्हा मग त्या ब्लॉगच्या त्या पोस्ट वर जाऊन मी आणि आपल्या ब्लॉगु-ब्लगिनींनी अनेक प्रतिक्रिया देऊन मूळ कवितेची लिंक दिली. कालांतराने त्या ब्लॉगमालकाने माफीही मागितली. पण एक लक्षात आलं की हा प्रकार आपल्या नजरेस पडला म्हणून आपण तिथे जाऊन प्रतिक्रिया देऊन आणि आपल्या मित्रांना प्रतिक्रिया द्यायला सांगून त्या ब्लॉगमालकाला त्याची चूक मान्य करायला भाग पडू शकलो. पण असे असंख्य गुणी लेखक/लेखिका असतील की ज्यांच्या लेखनाच्या रोज चोर्‍या होत असतील आणि त्या बिचार्‍यांना आपलं लिखाण दुसरा कोणीतरी परस्पर आपल्या नावावर खपवून उगाच आपलं श्रेय लाटतोय याची कल्पनाही नसेल. तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा अशा चोर्‍या नजरेस पडल्या तेव्हा तेव्हा त्या लेखाखाली जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायला लागलो. तर बयाच वेळा अशा प्रतिक्रिया दिल्यावर ते ब्लॉगमालक ती पोस्ट अपडेट करून लगेच मूळ लेखकाचं नाव आणि मूळ लेखाची लिंक द्यायला लागले. पण सगळ्यांचं कारण जवळपास एकच असे की "मला हा लेख/कविता इमेल मधून आली होती आणि तिथे मूळ लेखकाचं नाव नव्हतं." खरंतर मूळ लेख शोधणं आजच्या गुगल जमान्यात अजिबात अवघड नाही हे वेगळं सांगायला नको. असो. पण सगळेच जण असे लगेच माफी मागणारे नव्हते. याच्या उलट अनुभवही आले. चोराच्या ब्लॉगवर जाऊन तिथे त्याला मूळ लेखनाबद्दल माहिती करून देणारी प्रतिक्रिया दिली की ती प्रतिक्रिया कधी प्रकाशितच केली जायची नाही. उलट इमेल मधून धमक्या यायच्या की "या ब्लॉगवरील लेखन माझे आहे असं मी कुठेच म्हटलेलं नाही. हा ब्लॉग म्हणजे माझ्या आवडत्या लेखांचा, कवितांचा संग्रह आहे. प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करत जा."  असा उद्धटपणाआड लपलेला साळसूदपणाचा आव आणला जायचा. किंवा कधी कधी तर त्या लेखावर "वा वा ", "सुंदर..", "फारच छान.. खूप आवडलं." अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जायच्या पण मूळ लेखनाचा दुवा दिलेली प्रतिक्रिया मात्र हटकून प्रसिद्ध केली जायची नाही. हे असं झालं की संताप व्हायचा. तेव्हा मग मी अजून एक प्रकार करणं सुरु केलं. मूळ लेखकाच्या ब्लॉगच्या त्या लेखावर जाऊन त्याच्या खाली "आपला हा लेख अमुक अमुक ब्लॉगवर चोरीला गेला आहे"' असं लिहून चोरट्या ब्लॉगची लिंक द्यायचो. ही मात्रा मात्र बरेचदा काम करायची. मूळ लेखकाने चोरट्याला मेल/प्रतिक्रिया देऊन खडसावाल्यावर बरेच (सगळे नव्हे. तरीही शिरजोरी करणारेही अनेक बघितले) चोर सरळ व्हायचे आणि मग त्यांच्या ब्लॉगवरून तो लेख काढून टाकायचे. यातला एकही प्रसंग उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी दिलेला नाही. प्रत्येक चोरीचे/मेलचे/प्रतिक्रियांचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण मुद्दामच मी आत्ता इथे एकाही ब्लॉगचं, लिंकचं, लेखकाचं नाव देत नाहीये. कारण जवळपास बरीच प्रकरणं मिटलेली आहेत. तर हे असं पुन्हा पुन्हा झालेलं बघितल्यावर मात्र काहीतरी करायला हवं हा विचार डोक्यात घुमायला लागला. "आपण साधे मराठी ब्लॉगर. आपण काय करणार?" असा विचार मनात येतो ना येतो तोच त्याचं उत्तर मिळालं. आपण ब्लॉगर .. आपण काय करणार?? सोप्प आहे. आपण नवीन ब्लॉग सुरु करणार. हो हो.. नवीन पोस्ट नाही.. नवीन कोरा करकरीत ब्लॉग. कशासाठी?? तर या अशा चोर्‍या सगळ्यांसमोर याव्यात यासाठी. अशा चोर्‍या सगळ्यांसमोर आल्या की आपोआपच त्या कमी होतील. अर्थात पूर्ण नाहीशा होतील असं नाहीच. प्रमाण तरी कमी होईल. तेवढाच आपला खारीचा वाटा.
थोडक्यात काय तर जेव्हा जेव्हा आपल्याला अशी चोरी दिसेल तेव्हा आधी नेहमीप्रमाणे मूळ लेखावर जाऊन चोरीच्या लेखाची आणि चोरीच्या लेखावर जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायची. १-२ दिवस वाट बघूनही चोरीच्या ब्लॉगमालकाचं काही उत्तर आलं नाही तर ती चोरी सरळ या आपल्या नवीन ब्लॉगवर टाकायची. म्हणजे जास्तीतजास्त लोक ते वाचतील. चोरी जगजाहीर होईल आणि आपोआपच चोराला नमतं घ्यावं लागेल. यात फायदा आपल्या सगळ्यांचाच आहे. आपले अनेक लेख/कविता चोरीला जात/गेले असतील पण आता अशा चोर्‍यांवर लक्ष ठेवणारे आपण एकटेच नसू. सगळेजण मिळून हे काम करतील आणि चोरी पकडून देतील. आणि आपल्या या  संघटीत कामामुळे असे चोर आपोआपच दबकून राहतील आणि त्यामुळे कदाचित आपल्या लेखांच्या भविष्यात होऊ शकणार्‍या चोर्‍या रोखल्या जातील. अर्थात या प्रश्नाचा आवाका खूप मोठा आहे. त्याच्यावर ठोस उपाय सध्यातरी कोणालाच माहित नाही (कोपीराईट वगैरे सगळं ठीक आहे. पण त्याच्याने हे प्रकार रोखले जातायत का या प्रश्नाचं उत्तर हो असतं तर हा ब्लॉग सुरु करायची वेळच आलिओ नसती.). पण त्यामुळे स्वस्थ बसण्यापेखा आपण स्वतः काहीतरी केल्याचं आणि हे प्रकार थोडे तरी कमी केल्याचं समाधान. आणि त्यासाठीच हा नवीन ब्लॉग सुरु करतोय. पण आधी म्हटल्याप्रमाणे हा ब्लॉग माझा एकट्याचा नाही. आपल्या सगळ्यांचा आहे. 
आणि हो.. या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागल्या नाही, तशी वेळ आली नाही तर आनंदच आहे.. नाही का? :-)

तर आजच्या चोरीचे तपशील पुढीलप्रमाणे..

मूळ लेख

आणि भाग तिसरा येतोय. म्हणजे मूळ लेखकाने बिचार्‍याने एका पोस्ट मध्ये लिहिलेल्या लेखाची ही अनेक भागांमध्ये चोरी. छान चाललंय !!!!
मी भाग-१ वर मूळ लेखाची लिंक दिली होती. पण आज बघतो तर भाग-२ सुद्धा आला. म्हणून मी भाग-१ वर जाऊन माझ्या प्रतिक्रियेला काय उत्तर दिलं आहे  हे बघायला गेलो तर तिथे माझी प्रतिक्रिया सोडून इतर सगळ्या "वा वा छान छान" वाल्या प्रतिक्रिया प्रकाशित झालेल्या आहेत. मग लक्षात आलं की "अरे चोरा, मूळ लेखक अज्ञात नसून तो तुला मुद्दाम अज्ञात ठेवायचा आहे.". पण त्याच्या दुर्दैवाने अति झालेल्या या चोरी प्रकरणांमुळे या ब्लॉगची कल्पना सुचली आणि पाहिलं अपीलही झालं. आता विकेट कधी पडते ते बघुया. मग? बघता काय? चोरीच्या लेखांवर जाऊन पाडा प्रतिक्रियांचा पाउस.

आणि आधी म्हटल्याप्रमाणे या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागू नयेत हीच सर्व चोरांना आणि देवाला प्रार्थना !! :-)

42 comments:

  1. मस्तच...सर्व ब्लॉगर्स या उपक्रमास नक्की प्रतिसाद देतील.
    अभिनंदन!!!

    ReplyDelete
  2. आभार सागर. सगळ्यांची साथ मिळेल याची खात्री होतीच कारण सगळ्यांच्याच बाबतीत हे प्रकार थोड्या फार फरकाने घडताहेत !!

    ReplyDelete
  3. http://punha-chorashil.blogspot.com/

    ya blog varun hee post chorli ahe !! Hahaha..

    Ekdam chan upkram

    ReplyDelete
  4. प्रीतेश :-) .. आभार..

    ReplyDelete
  5. Khoop mast upakram aahe dada....!!!
    Mi tya chorachya blog war comment takli aahe pan to ti publish karel ase watat tari nahi......

    ReplyDelete
  6. आभार मैथिली. अग हो. तो कमेंट्स प्रकाशित करतच नाही. माझी त्याच्याशी मेलामेली चालू आहे. बघू काय होतंय.

    ReplyDelete
  7. तुझा हा नवीन उपक्रम स्तुत्य आहे, आणि या ब्लॉगची जाहीरात झालीच पाहीजे... म्या तर माझ्या ब्लॉगवर याचं विजेट चिकटवणारच.. लवकर तयार कर...

    ReplyDelete
  8. हेरंब,पर्फेक्ट. हा अनुभव सगळ्यांनाच येतोय... :(

    ReplyDelete
  9. आभार आनंद. हा हा विजेट? अजून विजेटचा विचारही नाही केला. सध्या ब्लॉग जरा बारा दिसावा आणि पोस्ट निदान नीट वाचता तरी यावी म्हणून थोडी डागडुजी करतो आहे. ते thumbs down नीट दिसत नाहीये.. बघू.... विजेटचं डोक्यात पण नव्हतं. पण आता नक्की तयार करतो विजेट :-) .. आभार

    ReplyDelete
  10. आभार श्रीताई. हो ना. म्हणूनच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन असे प्रकार थांबवले पाहिजेत. !!

    ReplyDelete
  11. अरे वाह! भारी आयडीआ आहे! त्या चोरलेल्या लेखाच्या पानावर खाली "links to this post" मध्ये छानपैकी "वटवट सत्यवान !!: पुन्हा चोरशील ??" असं येतंय! उत्तम! :) फारच आवडलं मला! :D

    ReplyDelete
  12. आभार मेघा :-).. अग ते कसं आलं मला माहित नाही :-) .. असो..

    पण एक मात्र झालं त्या ब्लॉगवाल्याने त्याच्या लेखाखाली मूळ लेखाची लिंक दिली. चला.. काहीतरी परिणाम झाला तर. :-)

    इथे बघ.. http://arunoday2010.blogspot.com/2010/04/3.html

    ReplyDelete
  13. pahili wicket padali re...
    tyane comments disable kelyat asa vatatay!

    ReplyDelete
  14. काही प्रमाणात नक्कीच आला बसेल, हे प्रकार थोड्याफार प्रमाणात सर्वीकडे आढळतात ,पण आपण याची योग्य वेळी दखल घेतली हि चांगली गोष्ट आहे,
    --

    ReplyDelete
  15. हो विद्याधर.. अरे आणि आता तर त्याने ती पोस्टच काढून टाकली आहे त्याच्या ब्लॉगवरून. :-)

    ReplyDelete
  16. आभार काका. आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच हे प्रकार थांबवले पाहिजेत.

    ReplyDelete
  17. सर्वाना अरुणोदय चा नमस्कार.
    आपल्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा.
    मी याठिकाणी श्री हेरंब यांना दिलेल्या प्रतीउत्ताराची नोंद करत आहे.हे स्पष्टीकरण मी त्यांनी पाठवलेल्या ई-मेलला प्रतिउत्तर दिलेले आहे.अपना सर्वाना वाचण्यासाठी येथे देत आहे.
    प्रिय मित्र,
    आपली पाहिली प्रतिक्रिया मिळाली नाही.दुसरी मिळाली.त्याबद्दल धन्यवाद.
    सदरचा लेख मला e-mail ने मिळाला होता.परंतु त्यावर कोणाचेही नाव नव्हते.हा मी माझ्या संग्रहात जपून ठेवला होता जेणेकरून तो लोकांबरोबर शेअर करता येईल.
    सदरचे लिखाण हे त्यामुळे संग्रहित म्हणून प्रसिद्ध केले आहे.हा लेख मी निश्चितच माझ्या नावावर प्रसिद्द केलेला नाही.त्यामुळे चोरीचा प्रश्नच नाही.तसं उद्देश असता तर तो संग्रहीत म्हणून प्रसिद्ध न करता माझ्या नावावरच प्रसिद्ध केला असता.एखादा आपल्याला आवडलेलं लिखाण दुसरयाला वाचायला देणं ही चोरी होत नाही.पण ते लिखाण स्वतःच लिहिलेलं आहे असं सांगणे चोरी आहे.
    ब्लॉगवरील इतर साहित्य हे प्रत्येकाच्या नावानिशी प्रसिध्द केलं आहे.त्यामुळे साहित्याचोरीचा प्रश्नच येत नाही.फक्त या लेखाच्या बाबतीत मला मूळ लेखकाची माहिती नव्हती.
    केवळ तुम्ही सांगताय म्हणून तो लेख मुळचा तेथील आहे असे म्हणणे चुकीचे आहे कारण तो तुम्ही लिहिला नाही.कदाचित उद्या दुसरा कोणीतरी म्हणेल की कोणीतरी माझा लेख त्या ब्लॉगवर ठेवलेला आहे. त्यापेक्षा सद्यातरी त्या लेखकाचा उल्लेख 'अज्ञात' असाच करणे मला योग्य वाटते.
    तसेच तुम्हाला माझ्या ब्लॉग लिखानासंदर्भात थोडसं सांगतो.मला स्वतःला लिखाणात इंटरेस्ट नाही पण एखादे चांगले लिखाण दुसरयाला वाचावयास दयायला खूप आवडते.मी कोठेही माझ्या नावाचा उल्लेख लेखक असं केलेला नाही.लिखाण करून प्रसिद्धी मिळवण्याची माझी काहीही इच्छा नाही.तो माझा प्रांताच नाही.
    ग्रामीण भागातील बरेचसे नवोदित लेखक केवळ technology च्या अज्ञानामुळे लोकांपर्यंत पोहचू शकत नाहीत.असे बरेचसे लेखक आहेत जे केवळ आपले लिखाण लोकांपर्यंत पोचावे यासाठी धडपडत आहेत.माझ्या मित्रवर्गातील बरयाच लेखकांचे प्रतिनिधित्व मी 'अरुणोदय' मधून करत आहे. प्रत्येक लिखानाचे सर्व श्रेय मूळ लेखकाला दिले गेलेले आहे. ज्यावेळी गावातील लेखकाच्या चेहऱ्यावर आपले लिखाण blogvar दाखवल्यावर जो आनंद दिसतो तो केवळ अवर्णनीय आहे.माझ्या थोड्याफार शिक्षणाचा उपयोग माझ्या लोकांना हे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी करू शकलो तर माझ्या गावाने केलेल्या ऋणातून थोडंफार उतराई होता येईल.''

    यावरून मला हे स्पष्ट करावेसे वाटते की सदरचा लेख हा संग्रहित म्हणून प्रसिद्धः करणे यावरूनच हे कळते की मला हा माझ्या नावावर द्यायचा नाही.एकदा लिखाण आपल नाही ते संग्रहित किंव्हा अज्ञात लेखकाचे आहे असे नमूद केलं काय किंव्हा ते मूळ लेखकाचे नाव देऊन (जसे इतर लिखाणाच्या बाबतीत केलेलं आहे)मला फरक पडण्याचं कारण नाही.
    इतर काही लोकांनी याची मूळ ठिकाण दाखवल्यामुळे मी तसा उल्लेखही केला आहे.हा sourse मी स्वतः अगोदर पहिला असता तर निश्चितच लेखकः अज्ञात ऐवजी त्याची नोंद केली असती.
    माझं सर्व प्रकाशन हे वाचकांना व सर्व ज्ञात लेखकांना आनंद देण्यासाठी व त्यांना जवळ आणण्यासाठी आहे यामध्ये माझा काहीही वाक्तिगत फायदा नाही हे आपण माझ्या बाकीच्या प्रकाशानावरून समजुन घेऊ शकता.
    माझ्या ब्लॉगवर हे लेख केवळ 'लेखक अज्ञात' आहे (म्हणजे मला माहित नाही)यामुळे आपल्याला आवडले नाहीत त्यामुळे याठिकाणी मी हे सर्व लेख पाठीमागे घेत आहे.यामुळे बरयाच वाचकांना या सुंदर लेखांपर्यंत मी पोहचवू शकलो नाही याची खंत वाटते.
    कळावे
    आपला
    अरुणोदय

    ReplyDelete
  18. अरुणोदय,
    माझं आपल्याशी वैयक्तिक शत्रुत्व काही नाही. आपल्या आधीच्या लेखांबद्दलही मला काहीही म्हणायचं नाही. आपलं संभाषण या लेखाबद्दल चालू होतं. पण आपण माझी पहिली प्रतिक्रिया प्रकाशित केली नाहीत. दुसरीही केली नाहीत. मी मूळ लेखाची लिंक दिली होती तरी आपण माझ्या माझ्या मेलला उत्तर देताना म्हणालात की "सध्यातरी त्या लेखकाचा उल्लेख 'अज्ञात' असाच करणे मला योग्य वाटते.". आणि आता इथे म्हणताय की "हा sourse मी स्वतः अगोदर पहिला असता तर निश्चितच लेखकः अज्ञात ऐवजी त्याची नोंद केली असती." . आता यातलं कुठलं म्हणणं खरं मानायचं???
    मी दोन वेळा प्रतिक्रिया देऊन तुम्हाला मूळ लेखाची लिंक दिली होती. तरीही "source माहित नव्हता" असं आपण कसं म्हणू शकता? माझ्या प्रतिक्रिया/मेल मिळाल्यावर तुमच्या लेखात ताबडतोब बदल करून तिथे लेखक अज्ञात ऐवजी मूळ लेखकाचं नाव देऊ शकला असतात. पण तरीही "सध्यातरी त्या लेखकाचा उल्लेख 'अज्ञात' असाच करणे मला योग्य वाटते." असाच आपला पवित्रा होता. मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय लेख प्रकाशित करणे हेदेखील चूक आहे हे आपल्याला माहित आहे का? असो. मला जास्त खोलात शिरायचं नाही.

    >>यामुळे बरयाच वाचकांना या सुंदर लेखांपर्यंत मी पोहचवू शकलो नाही याची खंत वाटते.

    आपण अजूनही मूळ लेखकाची परवानगी घेऊन आपल्या ब्लॉगवर त्या लेखाची लिंक देऊ शकता. सुंदर लेख अनेक वाचकांपर्यंत पोचवण्याचा सर्वात सोप्पा आणि योग्य मार्ग. !!!

    तुमच्या ग्रामीण भागातील नवोदित लेखकांचे लेख लोकांपर्यंत पोचवण्याच्या कामाबद्दलही मला काहीही म्हणायचं नाही. पण सदर लेखात आपण 'लेखक अज्ञात' लिहून आपला हा उद्देश कसा सफल झाला हे माझ्या समजण्यापलिकडचं आहे.

    >> ज्यावेळी गावातील लेखकाच्या चेहऱ्यावर आपले लिखाण blogvar दाखवल्यावर जो आनंद दिसतो तो केवळ अवर्णनीय आहे.
    मूळ लेखकाचं नाव लेखाखाली असल्यावर तो आनंद द्विगुणीत होईल (आपला आणि वाचकांचाही) याची मी आपणास खात्री देतो.

    गेल्या सहा महिन्यात असे कमीकमी २०-२५ प्रकार नजरेस आले. आणि दर वेळी त्या ब्लॉगवर जाऊन तिकडे मूळ लेखाची लिंक देऊन मूळ लेखकाला श्रेय मिळावं यासाठी मी धडपड केलेली आहे. अनामिक म्हणून आलेल्या फॉरवर्ड्स न देखील मी मूळ लिंक देऊन रिप्लाय करतो. आणि एक सांगतो. हा असा परस्पर कविता/लेख ब्लॉगवर देण्याचा प्रकार माझ्या एका कवितेच्या बाबतीत फक्त एकदाच घडला होता मागे. उरलेल्या एकाही प्रकारातल्या लेखकांसाठी झगडण्यात माझा वैयक्तिक फायदा काहीही नाही. काही अपवाद वगळले तर यातल्या एकालाही मी व्यक्तिगतरित्या ओळखत नाही. भेटलेलो तर कोणालाच नाही. फक्त प्रत्येक लेखकाला त्याचं योग्य श्रेय मिळावं आणि सगळ्यांमध्ये या प्रकाराबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी ही धडपड.

    ReplyDelete
  19. हेरंब तुझे कार्य स्तुत्य आहे...आम्ही तुझ्या बरोबर आहोत...

    ReplyDelete
  20. आभार देव. कार्य वगैरे काही नाही रे. असाच छोटा ब्लॉग एक..

    ReplyDelete
  21. हया चोरीविरुदध आजवर जे केलस (वर पोस्ट्मध्ये लिहल आहे ना) ते कार्य म्ह्टल मी... :)

    ReplyDelete
  22. ते लक्षात आलं रे. :-) .. पण कार्य वगैरे म्हणजे जरा मोठे शब्द वाटतात..

    ReplyDelete
  23. अरुणोदय,

    उद्धट आणि उर्मट प्रतिक्रिया मलाही देता आली असती. पण मी तसं करत नव्हतो आणि करणारही नाही. परंतु त्याप्रमाणेच एखाद्याची अपमानास्पद प्रतिक्रिया मी माझ्या ब्लॉगवरून उडवूनही लावू शकतो आणि त्याचा मला पूर्ण अधिकार आहे याचा आपणास विसर पडलेला दिसतो. मी उगाचच विरोधात आलेल्या कुठल्याही प्रतिक्रिया डिलीट करत असतो तर तुमच्या आधीच्या प्रतिक्रियांनाही इथे स्थान मिळालं नसतं. पण आधीच्या प्रतिक्रिया मर्यादेत होत्या आणि चर्चेला अनुसरून होत्या त्यामुळे त्या अजूनही दिसताहेत. मात्र आत्ताच आलेल्या प्रतिक्रियेतून आपला संताप आणि frustration स्पष्ट दिसत आहे. आणि त्यामुळेच मला आयुष्यात पहिल्यांदा माझ्या ब्लॉगवरची एखादी प्रतिक्रिया डिलीट करावी लागली. चांगलं काय, वाईट काय, चूक काय, बरोबर काय, हास्यास्पद काय आणि गैर काय, मी कोण मोठा लागून चाललोय, माझं 'so called' कार्य काय इत्यादी सल्ले मला आपल्याकडून घेण्याची गरज वाटत नाही. पुन्हा अशीच उद्धट प्रतिक्रिया आली तर तिलाही कचर्‍याची टोपली दाखवली जाईल हे लक्षात असू द्या.

    हेरंब

    ReplyDelete
  24. अरुणोदयच म्हणणे एकदम बरोबर आहे.
    हेरंब असं दाखवतोय कि संपूर्ण मराठी ब्लॉग जगताची ठेकेदारी त्याच्याकडे आहे.
    नाहीतरी आत्तापर्यंत मराठी साहित्य,साहित्य परिषद, संमेलन यांची ठेकेदारी 'ओक' वगैरे मंडळींकडेच होती त्यात एका क्षेत्राची भर
    राजेंद्र भणगे
    from ,
    जगात भारी आम्ही कोल्हापुरी

    ReplyDelete
  25. बा राजेंद्रा, मी असं काहीही दाखवत नाहीये. तुम्हाला ते तसं दिसत असेल तर तो तुमचा शुद्ध अक्कलशून्यपणा आहे.

    >>
    नाहीतरी आत्तापर्यंत मराठी साहित्य,साहित्य परिषद, संमेलन यांची ठेकेदारी 'ओक' वगैरे मंडळींकडेच होती त्यात एका क्षेत्राची भर

    यासारखं बिनडोक वाक्य मी ऐकलं नसेल. आपल्याच वाक्याचा आधार घेऊन मी हे म्हणू इच्छितो की समस्त 'ओक' वगैरे मंडळींची ठेकेदारीही मी घेतलेली नाही.

    कुठलीही गोष्ट जातपातीच्या वादात खेचणा-या तुमच्यासारख्या मुर्खांना उद्देशून मी मागेच लिहिलं आहे. ते वाचा आणि डोळे उघडतात का ते पहा.

    http://www.harkatnay.com/2009/10/blog-post_29.html

    ReplyDelete
  26. स्वाती said
    अरे पण संग्रहित म्हणून लिहिलं आहे ना, स्वत्याचा नावावर नाही टाकला. प्रोब्लेम काय आहे? मी असे बरेच संग्रहित लिखाण ब्लॉगवर वाचलेले आहे. afterall it's a diary open to all. माझ्या डायरी मध्ये असा संग्रह करून दुसर्याला दाखवू शकते (जर ते माझे आहे असे म्हंटले नाही तर)
    तुम्ही खरी चोरी शोधा ज्यामध्ये लोक बिनधास्त दुसर्याचे लिखाण आपल्या नावावर खपवतात....

    ReplyDelete
  27. swati said,
    माझी प्रतिक्रिया का आली नाही? का हि प्रतिक्रिया न publish करण्याची दुसरी वेळ आहे? ha ha ha

    ReplyDelete
  28. स्वाती, मी स्वतः तिथे जाऊन मूळ लेखाची लिंक दिली. पण ती प्रतिक्रिया प्रकाशित झाली नाही. पण इतर "वा छान, मस्त लिहिलंय" वाल्या प्रतिक्रिया प्रकाशित झाल्या. लगेच दुसरा भाग आला. म्हणून दुसर्‍या भागावर प्रतिक्रियेत पुन्हा मूळ लेखाची लिंक दिली. तीही प्रतिक्रिया प्रकाशित झाली नाही. आणि वरून उर्मट उत्तरं आणि प्रतिक्रिया (ज्या ब्लॉगवरून उडवाव्या लागल्या.. नाईलाजाने)

    दुसरी गोष्ट म्हणजे मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय लेखन आपल्या ब्लॉगवर छापणं हेही चुकीचंच आहे.

    माझ्या बाबतीत हे असं घडलं आहे म्हणून मला ते थोडं जास्त लागलं. असो.

    सगळ्यांना जर वाटत असेल की मी काही चुकीचं केलं आहे तर मी इथेच थांबतो. यापुढे या फंदात पडणार नाही. !!!

    ReplyDelete
  29. तीन दिवसांपूर्वी हा सांगलीकर वगैरेचा लेख मराठीकट्टावर प्रसिध्द झालेला आहे. त्यावर श्रेय दिलेले नाही मात्रक ोणीतरी याबद्दल टणकावल्यानंतर रिप्लायमध्ये मूळ ब्लॉग मालकाचं नाव दिलं आहे.

    http://www.marathikatta.com/General/

    ReplyDelete
  30. शिनु, बघितलं मी. अग मराठी कट्टा वरचा तो लेख मूळ लेखाचा पॉइंटर आहे.

    ReplyDelete
  31. स्त्युत्य उपक्रम. मला इमेलमधे आलेल्या लेख/विडंबन/कवितांचे लेखक/कवी माहिती असतील तर मी Reply All करुन मूळ लेखाची लिंक, नाव वगैरे माहिती देते. एकदा एका संकेतस्थळावर प्रकाशित केलेला माझाच एक लेख मी ढापून (माझ्याच) ब्लॉगवर प्रकाशित केल्याचा इमेल मला आला होता ;) मराठी वाचक जागरुक आहे ह्याचेच हे लक्षण :)

    ReplyDelete
  32. तृप्ती, ब्लॉग वर स्वागत आणि आभार.

    बाप रे. आपल्या बाबतीत घडलेलं हे उदाहरण विरळाच :-) .. पण खरंच अशा जागरूक लेखक/वाचकांची संख्या वाढायला हवी !!

    ReplyDelete
  33. सहीच, मस्तच ... माझ्याबाबतीत दोनही किस्से झालेत, एकदा मी काढलेले डुड्ल्स लोकांनी‌ इमेलवर पाठवले त्यावर मी‌सुद्धा निषेध नोंदवला होता :) http://thelife.in/?p=390 आणि एकदा गुरूव्हिजनवर मंदारने ला-कोडतोड्याची गोष्ट टाकली होती‌, पण पहिल्या कमेन्टवरच लिन्क देण्याचं काम त्याने केलं, तेथिल चर्चाही रंगतदार आहे, http://blog.guruvision.in/?p=283 .तिथेही एकाने a नावाने टोमणा मारायची संधी सोडली‌ नाही .. या निनावे कमेन्ट लिहिणाऱ्यांची एकदा xथा केली‌ पाहिजे, काय वाटेल ते वर एकाने असाच एकदा गोंधळ घातला होता ..

    ReplyDelete
  34. आभार सोमेश. आणि दुर्दैवाने हे किस्से एवढे सतत, वारंवार होतायत त्यामुळे या अशा लोकांचे हे प्रकार थांबवण्यासाठी (किंवा निदान कमी तरी करण्यासाठी) सरळ नवीन ब्लॉग सुरु करावा लागला.

    तू दिलेले दोन्ही किस्से वाचले. कठीण आहे एकूणच !!

    ReplyDelete
  35. बरीच गम्मत झालेली दिसते की ह्या ब्लॉग वर... च्यायला , नेमका मी नव्हतो गेले चार पाच दिवस नेट वर.. सगळी मज्जा मिस केली मी .. श्याः..

    ReplyDelete
  36. अहो एकदम धम्माल चालू होती. शेवटी तर मी 'ओक' असल्याने हे असं करतोय हे ही मला नव्याने कळलं :P

    ReplyDelete
  37. उशीरा लेख वाचला पण एकंदरच तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. माझ्या स्वताच्या लेखाबाबतीच असंच एक प्रकरण तू उघडकीस आणलं होतं. मला वाटत हेरंब तू बरोबर करत आहेस. उगाचच कुणी जातीपातीच्या नावाखाली बदनाम करू नये. माझ्यासारखे बरेचशे ब्लॉगर तुझ्या पाठीशी आहेत.

    -अजय सोनवणे

    ReplyDelete
  38. आभार अजय. हो तुझ्या लेखाचं प्रकरण तर सगळ्यात ताजं आहे.

    मला खात्री होतीच की वारंवार चालणारे हे सगळे प्रकार थांबवण्यासाठी सगळ्यांची साथ मिळेलच.. आणि जिथेतिथे जातीवाद आणणार्‍या लोकांबद्दल तर न बोलणंच बरं. सगळ्या प्रतिक्रिया वाचून त्याला उत्तर मिळालंच असेल !!

    ReplyDelete
  39. हे निनावे असतात ना, ते दोन - तीन नावाने प्रतिक्रिया देतात. आतली अपराधीपणाची जाणीव खुडून टाकता आली नाही की ते नैराश्य लपवण्यासाठी असले उद्योग करतात.

    ReplyDelete
  40. ह्म्म्म.. शक्य आहे. कदाचित तसंही असेल. कधीकधी वाटतंय कशाला भाजतोय लष्कराच्या भाक-या. उगाच मनःस्ताप..

    ReplyDelete
  41. http://my.opera.com/bharatbanate/blog/show.dml/10668841

    punha ek chori, yachyvar permanent ilaj kahi nahi asa vataty...

    ReplyDelete
  42. काय फालतूपणा चालू आहे यार.. :( कमेंट टाक त्या ब्लॉगवर. मीहि कमेंटलोय तिकडे.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...