"आज आपण बघणार आहोत पास्तुला कसा करायचा" झगावाल्या बाई हात जोडून सुहास्य वदनाने वदत्या झाल्या.
पोस्टची सुरुवातच ढळढळीत खोट्या वाक्याने करू शकत नसल्याने आधीच कन्फेशन देऊन टाकतो की असं काहीसं त्या झगावाल्या बाई न कळणार्या विंग्रजीत (की स्पॅनिशात ?) म्हणाल्या असाव्यात असा तर्क मांडून मी या वरच्या वाक्याने सुरुवात करून पुढची प्रक्रिया बायकोला सांगायला सज्ज झालो. काही नीट कळत नाहीये ना मी काय बडबडतोय ते? माझं पण अगदी अस्संच झालं होतं ती रेसिपी बघताना आणि त्याचं धावतं समालोचन बायकोला देताना.
पुन्हा सुरुवात करू.. म्हणजे रेसिपीची नव्हे, प्रसंगाची.. झालं काय की परवा सुदैवाने (की दुर्दैवाने?) आमचा रिमोट हरवला न.. व्ह.. ता... आणि आम्ही चक्क चॅनेल सर्फिंगची लक्जरी उपभोगत होतो आणि अचानक (माझ्या) दुर्दैवाने मी एका इटालियन रेसिपीच्या चॅनेलवर स्थिरावलो. 'अडकलो' हा शब्द जास्त समर्पक आणि वस्तूस्थिती-निदर्शक आहे खरा पण असुदे.. उगाच कशाला खाडाखोड.. तर त्या अडक्या चॅनेलवर कसले कसले भन्नाट (येथे भन्नाट हा विचित्र या अर्थी वापरला आहे याची कृपया समस्त रसिकांनी आणि खादाडांनी नोंद घ्यावी. आमचे सगळे वाचक हे एकतर रसिक तरी असतात किंवा खादाड तरी त्यामुळे आम्ही 'वाचक' हा गुळमुळीत वृत्तपत्रीय शब्द वापरत नाही याचीही इथे नोंद घ्यावी. भरली आजची नोंदवही.. आता पुढे.) पदार्थ घालून कायतरी वाफवून, तापवून, ढवळून 'पास्तुला' (आता हाही शब्द माझाच याचीही नोंद तमाम ........ घ्यावी वगैरे वगैरे) नावाचा पदार्थ करण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात होतं. ते पाहून बायकोने मला तिथेच थांबण्याची (टीव्हीच्या चॅनेलवर याअर्थी) खुण केली. आणि अर्थातच मी त्या चॅनेलवरच थांबलो. आता हे काय वेगळं सांगण्याची गरज होती का? उगाच 'पुन्हा' पुनरुक्ती.. 'पुन्हा' पुनरुक्ती, 'पाठीमागची' बॅकग्राउंड , 'खरी' फॅक्ट वगैरे वगैरे वगैरे.. असो.
तर ते 'पास्तुला' नामक भयंकर खाद्यान्न आणि त्याहूनही भयंकर त्याची कृती बघावी लागणार अशा विचारात असताना युवराजांनी तोंड वेडंवाकडं करून निसर्गराजाने त्यांच्या डायपरमध्ये अनंतहस्तांनी दान दिल्याची वर्दी दिली. बायको डायपर बदलायला धावली आणि मी चॅनेल बदलायला. पण माझा आनंद नशिबाला (आणि बायकोला) बघवला नाही. बायकोने हुकुम सोडला की "चॅनेल बदलू नकोस. ती रेसिपी नीट बघ आणि एकीकडे मला सांग ते काय आणि कसं करतायत ते.."... "अरे कर्मा.. आली का पंचाईत.. आता डायपर बदलताना तू ती रेसिपी ऐकून काय करणार आहेस?" वगैरे प्रश्न मी (नेहमीप्रमाणे) गिळून टाकून 'हो' म्हटलं.
तर यानंतर त्या सुरुवातीला सांगितलेल्या काल्पनिक वाक्याचा जन्म झाला. तेच ते हो 'हात जोडून', 'पास्तुला' वगैरे.. ही पोस्ट म्हणजे रामूच्या किंवा एखाद्या विंग्रजी पिक्चरासारखी होतेय नाही? जसं ते म्हणतात (समजतात) की कुठलाही प्रसंग मी कुठेही, कशाही क्रमाने दाखवणार आणि प्रेक्षकांनी (आपल्या इथे रसिकांनी, खादाडांनी) आपलं डोकं वापरून क्रम जुळवायचा. असो. आचरटपणात तेवढाच काहीतरी वेगळेपणा..
तर त्या काल्पनिक वाक्याकडे अर्थातच दुर्लक्ष करून बायकोने महत्वाच्या कामाकडे लक्ष वळवलं आणि मी त्या झगावाल्या बयेकडे.. म्हणजे रेसिपीकडे.. कायतरी उगाच.. ती बया पास्तुला करण्यासाठी आवश्यक पदार्थ (इन्ग्रिडियंट्स व्हो) सांगताना असले काही भन्नाट पदार्थ आणि शब्द वापरत होती की असे काही पदार्थ अस्तित्वात आहेत आणि ते पदार्थ (या आपल्याच मनुष्यलोकात) खाण्यासाठी वापरतात हे मला पहिल्यांदाच कळलं. आणि तेही सबटायटल्स ऑन असल्याने ते शब्द निदान कळले तरी, कारण उच्चारांच्या नावाने बोंबच होती.
तर सुरुवातीचे (काल्पनिक) नमस्कार-चमत्कार झाल्यावर, इन्ग्रिडियंट्स सांगून झाल्यावर झब (झगावाली बया) कृतीकडे वळली.
१. एका पातेल्यात भरपूर (किती ते तिने आमचा त्या चॅनेलवर प्रवेश होण्याआधी सांगितलं होतं. त्यामुळे मी भरपूर असा सर्वसमावेशक शब्द वापरतो आहे) पाणी घेऊन ते रटारटा उकळत ठेवा. (पातेलं, रटारटा आणि उकळत हे अर्थातच झबच्या शब्दांचं मराठीकरण आहे)
२. आता सगळा (आम्या.. म्हणजे 'भरपूर'वाला) पास्ता घेऊन तो फेका... फेका? फेका?? वा वा .. फेका .. "पास्ता फेका" हे असं मी मोठ्याने ओरडून बायकोला सांगितलं तेवढ्यात झब पुढे म्हणाली "into container" .. म्हणजे "Throw the pasta into the container".. च्यायला त्या विंग्रजी भाषेच्या.
३. एकेक करत समोर दिसतील तेवढे (झबकडे सुदैवाने (फक्त?) चारच होते.) सगळे टिन्स, कॅन्स धडाधड उघडा आणि मिसळा. एकमेकांत नव्हे हो. पास्तुल्याच्या पातेल्यातल्या पाण्यात. (प प प... आता पुढची सगळी वाक्यं 'प' ने सुरु होणारी लिहू का? पको.. पाऊदे पुढच्या पेळी पधीतरी. पाहीतर पात्ता पेवटी "पास्तुला खा" प्या पैवजी "पास्तुला प्या" पसं पिहावं पागेल.. परं पाटतंय.. आपलं सॉरी.. बरं वाटतंय. पुढच्या वेळी नक्की ट्राय करतो. ).. आणि हो ते टिन्स, कॅन्स कसले होते याची नक्की कल्पना नाही कारण आम्या. पण वाण्याच्या दुकानात गेल्यावर 'पास्ता सॉस' लिहिलेले कुठलेही (त्यातल्या त्यात जरा 'दिसायला आणि रंगाने' बरे असलेले. 'वधू-वर पाहिजे' ची अॅड वाटतेय.) टिन्स/कॅन्स उचललेत तरी चवीत काडीमात्रही फरक पडणार नाही ही आमची (म्हणजे माझी, झब ची नव्हे) 'गॅरंटेड' खात्री. ('पुन्हा' पुनरुक्ती, 'पाठीमागची' बॅकग्राउंड , 'खरी' फॅक्ट, गॅरंटेड खात्री वगैरे वगैरे वगैरे.. )
४. ते सगळं मिश्रण ढवळा. कारण ढवळलं नाहीत तर आजचा पदार्थ 'पास्तुला'च्या ऐवजी 'सॉसचा डोंगर' हा आहे असं वाटेल.
५. त्यात ते खरवडलेलं खोबरं, वितळलेलं चीज आणि किसलेले बदाम घाला आणि ढवळत रहा.
झालं.. त्या झब ने एवढं म्हणताक्षणी स्क्रीनवर कुठलीतरी झाडं दिसायला लागली. मी--आधी मनात आणि मग मोठ्याने ओरडून--म्हटलं "संपली रेसिपी."
"संपेल कशी?"
"मग ही झाडं कुठून आली मधेच? पुढचा प्रोग्राम सुरु झाला."
"ती त्या बदामाची झाडं आहेत. त्या बदामांची पैदास कशी होते, ती झाडं कुठे, कशी असतात, त्यावर कशी प्रक्रिया करतात आणि मग ते बदाम आपल्यापर्यंत कसे येतात, त्यांचा दर्जा कसा उच्च प्रतीचा आहे हे सगळं ते सांगतायत"
डायपर बदलण्याचं काम मगाशीच संपलं असल्याने बायकोही माझ्याबरोबर त्या झब चं प्रवचन ऐकते आहे हे माझ्या लक्षातच न आल्याने मी उगाचच धावतं समालोचन देत बसलो होतो एवढा वेळ. आता एवढा वेळ बघितलंच आहे तर पुढेही बघू आणि हा पास्तुला नक्की दिसतो कसा तेही बघू अशा विचाराने मी वेगवेगळ्या ३९४ (अंअं) कोनातून दाखवली जाणारी ती बदामाची झाडं बघत बसलो. अचानक (अं) सव्वाचार मिनिटांनी स्क्रीनवरची झाडं धुरकट पुसट होत जात जात गोल गोल फिरत खोल खोल जायला लागली आणि तोवर उलट्या दिशेने पांढर्या रंगाचं काहीतरी गोल गोल फिरत बाहेर येताना दिसलं. ती 'गरगर' थांबून सगळी चित्रं स्थिर झाल्यावर तो पांढरा रंग म्हणजे पांढरं वाडगं (झबच्या भाषेत बौल) आणि त्या पांढर्या रंगाच्या वाडग्यातला पांढरा पास्तुला आहे हे कळलं.
"हा चीजसॉस मध्ये केला असल्याने पांढरा दिसतोय. आपण टोमॅटो सॉस मध्येही करू शकतो आणि टोमॅटो सॉस घालून केल्यावर पास्ता छान लाल आणि जरा तिखट होतो" अशी (तिच्या मते) अत्यंत उपयुक्त माहिती बायकोने पुरवली. डोळे फाडफाडून बघितलं तरीही त्या चार टिन्समधले ते विविध रंगांचे पदार्थ आणि ते बदामाचं झाड मला त्या पास्तुल्यात कुठेही दिसलं नाही.
"कोण खाणार हा पास्तुला?" असं मी म्हटल्यावर बायकोने "ए ते 'पास्तुला पास्तुला' म्हणणं बंद कर बघू आधी. त्याला सरळ सुटसुटीत भाषेत 'पास्ता' म्हणतात सगळेजण. तुही तसंच म्हणालास तर जरा बरं वाटेल. तुझं तुलाच." असे शालजोडीतले हाणेपर्यंत झब ने स्क्रीनच्या उजव्या कोपर्यात दिसणार्या नंबरवर फोन करण्याविषयी सुचवलं.
"ते वेगवेगळे सॉसेस, चीज, बदाम आणि पास्ता असं सगळ्याचं एकत्र पॅकेज मिळतं फक्त $१९.९९ ला. ते ज्यांना हवं असेल त्यांनी त्या नंबरवर फोन करायचा " असं बायकोने झब च्या भाषेत सांगितलं.
माझ्या आधीच्या प्रश्नातला 'खाणार' काढून तिथे 'घेणार ' टाकून आधीचा प्रश्न मी 'पुन्हा' रिपीट केला. ('पुन्हा' पुनरुक्ती... ते ... 'पुन्हा' रिपीट.. चालू द्या..)
आणि माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर बायकोऐवजी झब नेच दिलं. ती सुहास्य वदनाने वदती झाली की २४ कॉलर्स वेटिंगमध्ये आहेत आणि अजून फक्त ९ मिनिटंच ही ऑफर आहे.
मी वैतागून जाऊन आणि यावेळी बायकोला न जुमानता चॅनेल बदलायला धावलो. आयुष्यात पुन्हा कधीही हे चॅनेल लावायचं नाही हे लक्षात ठेवून , त्याला अॅडल्ट-लॉक लावायचं हे ठरवून ते चॅनेल कुठलं आहे ते बघायला गेलो तर चॅनेल होतं Thirteen .... थर्टीन.... तेरा... १३....
आणि सायबाच्या शुभ-अशुभाच्या कल्पनांना मी मनोमन दंडवत घातलं !!!!!
तळटीप : हा ब्लॉग पहिल्यांदा वाचणार्या रसिकां/खादाडांसाठी हे काही सुटसुटीत कं-फॉर्म
आम्या : आधीचा म्याटर
अंअं : अंदाजे अंक
अं : अंदाजे
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
हा हा हा.. हेरंब पहिल्या प्रथम अशावेळी डायपर बदलायचा मान स्वतःकडे घ्यायचा असतो..(आणि इतर वेळीही मध्ये मध्ये तो मान घेत जा) अशी एक उपसुचना आहे...बघ पटली तर पण नाहीतर काय आम्हाला अशा पास्तुल्या धम्माल गोष्टी वाचायला मिळतील...तू काय सेनापतींना जायच्या दिवशीचा नजराणा म्हणून ही पोस्ट टाकलीस की काय??? भन्नाट (खर्या अर्थाने) झाली आहे...
ReplyDeleteअग डायपर बदलण्याचा रेशो १०:१ असतो. ;-)
ReplyDeleteहो ना. खानापती तर पहाटेच उडाले. म्हणून मग त्यांच्या नावाने चांगभलं करायला म्हणून पोस्ट टाकली.
आणि हो. बरंचसं काल्पनिक असलं तरी डायपर सीन, बदामाची झाडं आणि थर्टीन हे सगळं अगदी खरं आहे. :-)
पास्तुला...मस्त शब्द आहे..मी खाल्ला होता..मला विशेष नाही वाटला...आता घरी पास्तुला कधी बनवणार?त्यावर एक खादाडी येवू देत...
ReplyDeleteअरे घरी मधून मधून होतच असतो पास्ता. मलाही आवडतो. मस्त लागतो. कारण त्यात आम्ही 'खरवडलेलं खोबरं, वितळलेलं चीज आणि किसलेले बदाम' घालत नाही ;-). आम्ही यकदम देसी इष्टाइलने करतो. मस्त लालेलाल, तिखट बिखट .. !!
ReplyDeleteआणि त्या घरच्या खादाडीवर असं इनोदी लिहिलं तर मला आयुष्यात घरचा पास्तुला खायला मिळणार नाही, झब चा पास्तुला खायला लागेल. नको रे बाबा. !!
पास्तुला कसा स्प्याच्युला सारखं वाटतं. पास्तुला करताना स्प्याच्युला लागतो का हो ?
ReplyDeleteनॅकोबा :-) .. आधी गोंधळूनच गेलो मी की हा कुठला अजून एक प्रकार पास्तुल्याचा.. मग कळलं झब च्या भाषेतला स्प्याच्युला म्हणजे आपला डाव, चमचा, उलथणं वगैरे वगैरे..
ReplyDeleteलागतो लागतो स्प्याच्युला लागतो .. :-)
केला होता रे मी एकदा हा प्रयत्न..पण माहीत नाही मी चुकीचा केला की ते तसच लागत मिलमिलित :) त्यामुळे खरी चव माहीत नाही कोणीतरी निइत सांगा बघू मला..हेरंब बनव तूच आणि पोस्ट टाकून दे माझे खादाडीचे प्रयोग : भाग ४
ReplyDeleteअरे त्याची खरी चव म्हणजे मिळमिळीतच कारण तो इटालियन पदार्थ आहे. त्यामुळे चीझी आणि मिळमिळीत. टोमॅटो सॉस घालून थोडा लाल दिसतो इतकंच.. म्हणून मी सागरला म्हटल्याप्रमाणे आपण देशी इष्टाइल तिखट तिखट करायचा.. मग छान लागतो.
ReplyDeleteRambo.. mast re..
ReplyDeleteइथे मराठी नाही टाइप होत का?
मा.बो. ची कृपा वापरुन इथे पेस्टतोय....
लय भारी रे.. काही वाट्टेल त्या रेसिप्या असतात..
पण मला वाटलं होतं की फक्त जुन्या पिढीमधल्या माताभगिनींमधे असला "पास्तुल्या"चा "घरी बनवुया!" टाइप उत्साह होता. (एकदा करुन बघेपर्यंत....) पण नव्या भिडु लोक्समधेही तो "गुण" आहे तर :)
............... नव्या बापबंधुंमधेही मग जुन्या पिढीमधला "सुंदर झालंय" चा "नाटक" गुण असायलाच हवा !
"तु बघ आणि मला सांग! " हे बरं आहे.... :O
लिही लिही.... शुभेच्छा :)
-Mayur
हा हा :-) .. ऋयामा, ब्लॉगवर स्वागत आणि आभार..
ReplyDeleteहो रे वाट्टेल त्या रेसिप्या असतात हे तर खरंच.. म्हणून तर त्या नुसत्या बघायच्या (आणि त्याही चुकून. असंच सर्फ करता करता अडकलो तर) आणि करताना मात्र आपलं तिखट, मसाला, मीठ, कांदा, बटाटा आणि 'तुम्हाला काय हवं असेल ते' घालून चमचमीत, खमंग, तेलकट पदार्थ तयार करायचा..
मी गुगल IME वापरतो. त्याने तरी होतंय नीट मराठी टाईप. बरहावाल्यांचं पण होतं बहुतेक.. तू काय वापरतोस मराठी टंकायला? असो काहीच नाही झालं तर माबो आहेच :-)
पास्ता....अरे यार एकदाच ट्राय केला होता....पचवला होता कसा बसा!!! पोस्ट नेहमीप्रमाणेच भन्नाट झाली आहे
ReplyDeleteहा हा धन्स... अरे देसी स्टाईलने बनवला की जबर्या लागतो.. भारतात सनफिस्टचा मिळतो त्यात थोडा मसाला आणि तिखट घालून घरीच बनवून बघ एकदा..
ReplyDeleteभन्नाट हेंरब... ऍडल्ट लॉक हे...हे..हे..
ReplyDelete"युवराजांनी तोंड वेडंवाकडं करून निसर्गराजाने त्यांच्या डायपरमध्ये अनंतहस्तांनी दान दिल्याची वर्दी दिली. "
:)))))))))))))))))))))))))))))))
अरे खरंच त्या सगळ्या खाना-खजाना टाईप चनल्सना अॅडल्ट-लॉक लावणार आहे मी. उगाच काहीही दाखवत राहतात..
ReplyDeleteआणि युवराजांच्या तोंड वेडंवाकडं करण्यामध्ये कणभरही अतिशयोक्ती नाही :-)
धन्स !!
पास्तुला हा मस्त शब्द आहे, रे! लाडाने जसं ताईला तायडे म्हणतात तसं पास्ताला पास्तुला म्हणायचं. किती धिराचा तू? पास्तुलयाची भयंकर रेसिपी बघण्याचं अचाट धैर्य तू दाखवलंस आणि त्याचं धावतं समालोचनही दिलंस.
ReplyDeleteअगदी अगदी. लाडाने किंवा चिडाने :-) पण पास्तुला चपखल बसतं..
ReplyDeleteआणि ते धावतं समालोचन म्हणजे मी ज्यातून गेलो त्याची निदान झलक तरी सगळ्यांना मिळावी म्हणून मुद्दाम दिलं ;-) हा हा ..
अरे हेरंब... आपण बघितलेल्या त्या दिवशीच्या पास्त्यात सॉरी तुझ्या पास्तुल्यात 'खरवडलेलं खोबरं' नव्हतंच. ते bread crumbs होते.
ReplyDeleteआता यावर काय अपील? bread crumbs तर bread crumbs.. मी नाही म्हटलं तर उद्या तोच पास्तुला करून खायला घालशील !!
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteभन्नाट झालयं रे पोस्ट.... तुला म्हटलं ना अतिशयोक्ती करायची म्हटली ना की खेकडे एकदम सुसाट धावतात (अगदी एकमेकांचे पाय न ओढता :) ) बरं ती पण एकदम खमंग खुसखूशीत.... पर्फ्येक्ट येकदम!!
अरे काय पास्तूला काय , ऍडल्ट लॉक काय, निसर्गाचे दान काय :) :)त्यात भरं झब, सॉसचा डोंगर ..आहाहा....
मरो तो पास्तूला (अनुजा रागावेल आता) पण पोस्ट मात्र सहीच!!!
कठीण आहेस तू!!!!
अरे हो जाता जाता(लवकर जायचे नाय काय....पोस्टयेव्हढे नाही तरी निम्मे तरी कमेंटले नाही तर समस्त खेकडे वर्गाच्या थोडक्यात [?] मत मांडण्याच्या सवयीशी [!] ती गद्दारी ठरेल :)) माझे बाबा ईथे आले असताना माझ्या मैत्रीणीने त्यांच्यासाठी पास्ता ईन व्हाईट सॉस केला रे...बाबांनी तो प्रकार खाताना जो काही भयंकर चेहेरा केला होता सांगू....पुन्हा वर्षाने बाबा आल्यावर त्याच मैत्रीणीने पुरणपोळी, मसालेभात केला :)
अजुनही पास्ता का नास्ता म्हटलं की बाबा म्हणतात तुम्हीच खा ते गिळगिळीत शंख शिंपले :)
हुश्श!!! संपली कमेंट!!!!
पास्ता ! जगातल्य़ा सगळ्या खाण्याचा वस्तू संपल्या की मी पास्ता खाणार आहे. मुली घरी करतात तेंव्हा चिझ वगैरे घालुन तेंव्हा घरामधे अगदी उलटी सारखा विचित्र वास सुटतो.. :(
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteएकदम मस्त. आमच्याकडे पण टीव्ही बघायला बसलं की मधुनच उठण्याचे प्रसंग जास्त येतात :)
झब, सॉसचे टिन, बदामाची झाडं सगळ वाचुन सॉलिड हसायला आलं.
पोस्ट वाचताना मला सारख वाटत होतं पास्त्यामधे खोबरं कस बर घालतील? अनुजाने त्याचे उत्तर दिले :)
मी तर तेव्हाही खाइन की नाही शंकाच आहे... (मलाच अजुन कुणाला असणार? ;))
ReplyDeleteअसो.... हेरंब दर वेळीप्रमाणे हा प्रयोगदेखील जमला आहे... :) मज्जा आली वाचताना... समालोचन करतानाच्या तुझ्या धावपळीचा अन्दाज आला... :)
लिहित राहा... :)
-स्वाती....
अरे गुगल ट्रान्सलिटरेशन तुझ्या वेबपेज वर लोड होत नाही....काहीतरी लफडा होतो. असो...मी आपला कुठेतरी दुसरीकडे टंकतो आणि मग कापून इथे चिकटवतो...बाकी मी इटलीतच असल्याने 'रोजच पास्तुला नशिबी माझ्या...".पोस्ट नेहमीप्रमाणेच...(आता कशी ते मी सांगणार नाही..सुज्ञांस सांगणे...)
ReplyDeleteपास्तुला शब्द योग्य वाटतो, तुझे समालोचन चांगले वाटले .मस्त वाटला तुझा पास्तुला
ReplyDeleteहा हा हा .. तन्वी.. यकदम भार्री कमेंटलीयेस !!! जाम आवडेश..
ReplyDeleteआणि ते अतिशयोक्ती करणं सोपं असतं.. काहीही लिहिलं तरी चालतं. कोणी काही म्हणालं तर आपण म्हणायचं 'अरे मी गंमतीत म्हणत होतो. ते खरं नव्हतं काही.' .. जसा आत्ता अनुजाने माझा bread crumbs वरून पोपट केला तेव्हा त्या अतिशयोक्तीच्या बुरख्यामुळे तर वाचलो ;-)
आपल्यासाठी (म्हणजे समस्त भारतीयांसाठी) पास्तुला बनवण्याची/खाण्याची एक युक्ती सांगतो. तो कधीही व्हाईट (चीज) सॉस मध्ये बनवायचा नाही. फार बेचव, गिळगिळीत लागतो. मी चीजचा डाय-हार्ड पंखा असूनही हे म्हणतोय म्हणजे बघ.. व्हाईट सॉसऐवजी टोमॅटो फ्लेवर्ड सॉस वापरायचा आणि त्यात आपल्या नेहमीच्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ, मसाले घालायचे.. मग असला भारी लागतो पास्ता माहित्ये.. अर्थात पास्ता काय त्याचा बाबा आला तरी पुरणपोळी, मसालेभाताची सर त्याला कुठली येणार म्हणा.. in fact no comparison.. संबंधच नाही :-)
हा हा हा .. काका :-) .. चीज सॉस मध्ये पास्ता खाणं अशक्य आहे आपल्यासाठी. तन्वीला म्हटलं तसं टोमॅटो फ्लेवर्ड सॉस वापरून त्यात तिखट, मीठ, मसाले घालायचे.. मग जाम सुस्साट लागतो पास्ता.. आणि हो कसला वास बिस न येता :-)
ReplyDeleteधन्स सोनाली. अग पास्ताच्या रेसिपीत बदामाची झाडं बघून मला असलं गरगरल्यासारखं झालं होतं ना. झाडांचा काय संबंध कळेना मला.. :-) .. शेवटी कळला.. ते खोबरं, bread crumbs, अतिशयोक्तीचा बुरखा वगैरे वगैरे वगैरे.. ;-)
ReplyDeleteपण ते bread crumbs होते हे मला काळ अनुजाने सांगेपर्यंत माहित नव्हतं. मला ते किसलेलं खोबरंच वाटलं होतं. दिसायला तर तसंच दिसत होतं. (अंदरकी बात : मला bread crumbs हा शब्दही कालपर्यंत माहित नव्हता.. आता बोल ;-) )
धन्यु स्वाती.. !!
ReplyDeleteतेव्हाही म्हणजे? bread crumbs घातल्यावर का? :-)
अग चांगलीच धावपळ झाली. खरंच अॅडल्ट-लॉक लावून टाकणार आहे त्या थर्टीन चॅनेलला ;-)
हो का? काय प्रोब्लेम आहे काय माहित. मी गुगल इमे वापरतो त्यामुळे कुठेही मराठी टंका दणादण :-)
ReplyDeleteअरे (देवा) वा इटलीत? म्हणजे 'निसर्ग'सौंदर्य भरपूर पण खाण्याची बोंब !! :-)
काका आभार. ते पास्तुला म्हणजे असंच आपलं टीपी... :-)
ReplyDeleteहा हा.... तुझ्या पास्तुलाच्या.... अर्रर्रर्र.. टिव्हीवरच्या रेसिपीचे भन्नाट समालोचन वाचून एकदम मूड चेंज हो गया रे... लेकाला आवडतो म्हणून मी करते पण एकदम देशी स्टाईलमें... यांची ही दणादण टिनची ओताओती पाहिली की मला तर धडकीच भरते... पोस्ट एकदम धमाल रे.
ReplyDeleteहा हा.. धम्माल दाखवला होता पास्तुला त्या दिवशी.. (येथे धम्माल हे भयंकर या अर्थाने घ्यावे) .. मूड चेंज.. गुड गुड..
ReplyDeleteखरंय.. आपण आपला देशी इष्टाईलने करावा हेच बेष्ट.. मस्त लागतो एकदम..
श्रीताई, तुमची प्रतिक्रिया इतक्या दिवसांनी बघून खरंच खूप आनंद झाला.. का ते तुम्ही जाणताच !!
लेख नेहमीप्रमाणेच एकदम झक्कास झाला आहे.(कारण त्या नैसर्गीक क्रियेच्या निमित्ताने का होइना आदितेय होता ना त्यात :) )...्बाकी तुम्ही आता एक नवी डिक्शनरी बनवायला घ्या मराठीची...
ReplyDeleteहा हा .. बरोबर बोललास.. आदितेय असला की लेख सुपरहिट ;-)
ReplyDeleteझब, पास्तुला, आम्या, अंअं... हा हा .. अरे मराठीची डिक्शनरी कसली? उलट हे वाचलं तर राज ठाकरे त्याच्या माणसांना पाठवेल माझ्याकडे.. मला शुद्ध मराठी शिकवायला.. ;-)
झगावाल्या बाई, pastula, hehehehe, sahich re.. kas suchat re tula ase shabda.. pekdam pajja paali pasta prakaran pachayala, I mean wachayala.. :P
ReplyDeleteहा हा.. अग असंच जरा टीपी. शब्द काय असेच कुठेही वळवले, जरा उगाच आकार उकार दिले की नवीन तयार होतात ;-)
ReplyDeleteपुला पाचायला पज्जा पाली पे पाचून पलाही पुप पज्जा पाली. :-)
लय भारी पोष्ट........[:))]
ReplyDeleteपास्तुला.. मला अजिबात आवडत नाही.. एकदा शमिने केला होता आपल्या पद्धतीने फ़ोडणी घालून. बरा झाला होता... तो 'पास्ता फेका' शब्द मस्त... :) आणि किती ते कंस रे... जय श्री कृष्णा... :D
ReplyDeleteहा हा .. रोहणा.. अरे त्यांच्याप्रमाणे केला तर फालतू लागतो. आपल्याप्रमाणे करायचा.. तिखट, झणझणीत. मग एकदम सही लागतो. आम्ही बरेचदा करतो :)
ReplyDeleteकंसांशिवाय (आणि टिपांशिवाय) माझ्या पोस्ट्स कशा पूर्ण होणार :-) हरे कृष्णा !! ;-)
माऊ, भरपूर आभार्स :)
ReplyDelete:):) मस्त !!
ReplyDeleteआभार भालचंद्र.. आणि ब्लॉगवर स्वागत.. !!
ReplyDeleteझ्याक आहे लेख. मजा आली वाचताना. (नेहमीसारखी ही प्रतिक्रिया विस्तृत नाही, कारण खाणं या विषयात मला अजिबात गती नाही. (विषयात गती नाही याचा अर्थ ’मी कमी खातो’ हा होत नसून ’मला चवीबद्दल, खाण्याच्या रंगरूपाबद्दल आणि एकंदरीतच खाण्याच्या पदार्थांबद्दल ज्ञान कमी आहे’ असा होतो) त्यामुळे आणखी काय लिहावं ते सुचत नाहीये...)
ReplyDeleteआभार्स संकेत :) .. तुझा संपूर्ण कंस मलाही जसाच्या तसा लागू होतो. पण पोस्टी खरडताना काहीतरी कंपनीक अतिशयोक्ती करायला लागते कधीकधी (?).. ती मात्र मला चांगली जमते ;)
ReplyDelete