Thursday, April 29, 2010

उत्तर : भाग-३

भाग-१ इथे वाचा.
भाग-२ इथे वाचा.



भर दुपारी २ वाजता दार वाजून झोपमोड झाली की की जो एक संताप होतो त्या संतापात मी दार उघडलं. आणि त्यात पुन्हा हा लंगडा पाय. म्हणजे तसा अगदी बरा होतो आता. थोडं लंगडणं सोडलं तर... माझ्या ऑफिससंबंधीच्या कामाचं एन्व्हलप आलं होतं. ऑफिसच्या कामाचं एन्व्हलप? आणि तेही घरच्या पत्त्यावर? कसं शक्य आहे? मला जरा आश्चर्यच वाटलं. मी बंगलोरहून परत आल्यानंतर मानसिकदृष्ट्या एवढा खचून गेलो होतो की मी जवळपास तीन आठवडे माझ्या त्या 'वन मॅन आर्मी' वाल्या ऑफिसच्या दिशेने फिरकलोही नव्हतो. मूडच लागत नव्हता. "त्यामुळे कदाचित घरी आलं असेल पत्र" असा विचार करून सही करून मी ते एन्व्हलप हातात घेतलं आणि उघडलं. बघतो तर आतून दोन पत्रं  बाहेर पडली. हा काय प्रकार आहे? जरासं गोंधळूनच मी त्यातलं एक पत्र उचललं आणि उघडून वाचायला लागलो. 

-------------------------------

श्री. देवेश रमानाथ राजे,

आपण पाठवलेल्या प्रोजेक्टचे तपशील आणि प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला मिळाले. आमच्या 'सर्वांसाठी संगणक' या नवीन योजनेसाठी आम्ही आपल्या प्रोजेक्टची निवड करत आहोत. सविस्तर चर्चेसाठी आणि इतर प्रक्रियांसाठी येत्या महिन्याच्या एक तारखेला आमच्या बंगलोर ऑफिस मध्ये येऊन भेटणे.

आपले कृपाभिलाषी,
संचालक,
'सर्वांसाठी संगणक' योजना

-------------------------------

माझा क्षणभर स्वतःवर विश्वासच बसेना. हे काय चाललंय, काय घडतंय काहीच कळत नव्हतं. मी आनंदाने वेडापिसा झालो होतो. जोरजोरात नाचावंसं, ओरडावंसं वाटत होतं. एका बोटभर चिठ्ठीने माझं आयुष्यच बदलून टाकलं होतं. थोड्या वेळाने भानावर आल्यावर "त्यांना माझा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा मिळाला? कुठून मिळाला?" असे प्रश्न पडले. काहीच कळत नव्हतं.. आणि ही दुसरी चिठ्ठी कशासाठी? त्यात काय आहे?.... या पहिल्या चिठ्ठीतला मजकूर तुमच्यासाठी नाही. ती चिठ्ठी तुम्हाला नजरचुकीने पाठवण्यात आली आहे" अशा तर्‍हेचा काही मजकूर असेल का त्यात असे वेड्यासारखे विचारही क्षणभर मनात येऊन गेले.

घाबरतच दुसरी चिठ्ठी उघडली.

दुसरी चिठ्ठी शुद्ध मराठीत होती.

-------------------------------

प्रिय देवेश,

मी देवदत्त रमाकांत राजे. 'सर्वांसाठी संगणक' योजनेचा संचालक. आपल्यात असलेल्या वयाच्या अंतरामुळे मी तुला अरे-तुरे संबोधण्याचं स्वातंत्र्य घेतो आहे. मला तुझा प्रोजेक्ट रिपोर्ट, तुझी कल्पना, मांडणी हे सगळं खूप आवडलं. त्यामुळे मी तुझ्या प्रोजेक्टची निवड आमच्या कंपनीच्या 'सर्वांसाठी संगणक' योजनेसाठी केली आहे. तसं मी तुला पहिल्या पत्रात कंपनीच्या ऑफिशियल लेटरहेडवर लिहिलेलंच आहे. ते ऑफिशियल लेटर मी आधी तुझ्या कंपनीच्या पत्त्यावर पाठवलं होतं. तेही दोन वेळा. पण दोन्ही वेळा ते घ्यायला तिथे कोणीच नसल्याने ते माझ्याकडे परत आलं. तुझ्या ऑफिसच्या नंबरवर फोन केला असता तोही कोणी उचलत नव्हतं. 

म्हणून मग तुझ्या लॅपटॉप बॅगमध्ये थोडी शोधाशोध केली. त्याबद्दल क्षमस्व. त्यात मला तुझा घरचा पत्ता सापडला. म्हणून पत्र तुला घरच्या पत्त्यावर पाठवत आहे. तुझी 'लॅपटॉप बॅग माझ्याकडे कशी आली?' वगैरे एकेका प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा सगळं काय नि कसं झालं आणि झालं असावं ते पहिल्यापासून सांगतो.

तू मुंबईहून बंगलोरला ज्या विमानातून आलास त्याच विमानात मीही होतो. मुंबई ऑफिसमधल्या माझ्या विकेंडच्या अर्जंट मीटिंग्स संपवून मी बंगलोरला येत होतो. सुदैवाने त्यादिवशीच्या अपघातात मला विशेष काही अपाय झाला नाही. फक्त खांद्याला थोडासा मुका मार लागला होता. त्यामुळे मला हॉस्पिटलमधून एका दिवसात डीसचार्ज मिळाला. घरी आल्यावर एक दिवस आराम करून मी दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये रुजू झालो. दोन दिवसांनी एअरलाईन्सच्या लोकांनी मला माझं सामान ऑफिसच्या पत्त्यावर पाठवून दिलं. खरं तर माझी एकच केबिन बॅग होती परंतु त्यांनी मला दोन बॅग्ज पाठवल्या होत्या. कदाचित नजरचुकीने झालं असेल म्हणून मी दुसर्‍या बॅगवरचं नाव बघायला म्हणून गेलो तर त्या बॅगवरचं तुझ्या नावाचं लेबल फाटून गेलं होतं आणि तिथे नुसता दोरा लटकत होता. पण लॅपटॉप बॅगच्या उजव्या तळाच्या कोपर्‍यात मला मार्करने ठळक अक्षरांत लिहिलेलं "Mr. D. R. Raje" असं दिसलं. एअरलाईन्स कंपनीला तुझ्या बॅगवर पत्ता न दिसल्याने अद्याक्षरांच्या साधर्म्याने त्यांनी चुकून तीही माझीच बॅग समजून माझ्या पत्त्यावर पाठवून दिली असावी. त्यामुळे ती बॅग ज्याची असेल त्याला पोचती करावी यासाठी पत्ता शोधण्याच्या उद्देशाने मी ती उघडली. बघतो तर आतल्या फाईलवर मला "प्रोजेक्ट रिपोर्ट : सर्वांसाठी संगणक" असं दिसलं. न राहवून मी ती फाईल उघडली आणि रिपोर्ट वाचून काढला. पुढचं सगळं तर तुला माहित आहेच. हे सगळं ऑफिशियल पत्रात लिहिणं अर्थातच शक्य नसल्याने आणि तू आमच्याबरोबर काम करावंस असं मनापासून वाटत असल्याने तुला हे वेगळं पत्र लिहिलं. लवकरच भेटू.

आपला,
श्री. देवदत्त रमाकांत राजे

---------------------------

आनंदातिशयाने माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. खरंच वेड लागायची पाळी आली होती. मी खूप खुश झालो होतो. क्षितीज हातात आल्यासारखं वाटत होतं. किती वर्षांनी मी यशाची चव चाखत होतो. आणि अचानक मला दादांच्या चिठ्ठीची आठवण झाली. ती अजूनही त्या पुस्तकात तशीच पडून होती. मी धावतच जाऊन ती चिठ्ठी उघडली. "तुला ज्याक्षणी वाटेल की  'मी यशस्वी आहेतेव्हाच उघडायची ही चिठ्ठी. तोवर नाही." दादांचे शब्द कानात घुमत होते. हो. मी यशस्वी होतोच आता. त्यामुळे आता चिठ्ठी उघडायला काहीच हरकत नव्हती. नुकत्याच उघडलेल्या दोन चिठ्ठ्यांतून मला इतक्या अप्रतिम बातम्या मिळाल्या होत्या. या तिसर्‍या चिठ्ठीत काय असेल बरं असा विचार करतच मी ती चिठ्ठी उघडली.



-- पुढचा भाग येतोय लवकरच !!


- भाग ४ अर्थात अंतिम भाग इथे  वाचा.

18 comments:

  1. पुढची चिठ्ठी (होपफुल्ली शेवटची)... आयमिन पोस्ट लवकर टाक... :)

    ReplyDelete
  2. यस्सर.. पुढची चिठ्ठी आणि भाग दोन्ही शेवटचे !! :)

    ReplyDelete
  3. झकास ! उत्कंठा वर्धक !

    ReplyDelete
  4. जबऱ्या रे,
    तिसऱ्या चिठ्ठीची वाट बघतोय :)

    ReplyDelete
  5. धन्स नचिकेत.. येणार येणार.. उद्या येणार..

    ReplyDelete
  6. उत्कंठा शिगेला पोहोचलियेयेयेयेयेयेयेयेये..... लवकररररर..... :)

    ReplyDelete
  7. आभार अभिलाष :) .. उद्या भेटूच..

    ReplyDelete
  8. पुढची पोस्ट येई पर्यंत पंकज उधासच " चिठ्ठी आयी है...." ऐकत बसतो...:)

    बाकी मस्तच जमली आहे....

    टीप: सगळे अंदाज हवामान खात्याच्या अंदाजानुसार सपशेल आपटले आहेत.....म्हणून आता अंदाज न करता गाणं ऐकत तुझ्या पोस्टची वाट बघतोय.

    ReplyDelete
  9. "चिठ्ठी आयी है"... हा हा..

    आभार..

    :-) मी म्हंटलं होतं ना पुढे बरेच ट्विस्टस आहेत. उद्या टाकतो पुढचा भाग. थोडा वेगळा आहे शेवट.

    ReplyDelete
  10. हेरंब,
    शेवटच्या भागा पर्यंत थांबणार होतो. पण राहावले नाही. मस्त चालली आहे गोष्ट! येऊ द्या पुढचा भाग!

    ReplyDelete
  11. खूप आभार निरंजन.. !!

    उद्या टाकतो पुढचा भाग..

    ReplyDelete
  12. ठरवलं होतं की जोवर गोष्ट पूर्ण करत नाहीस तोवर प्रतिक्रिया देणारच नाही.... :) पण राहावलं नाही.... काय करणार??? लिहीतोसंच एवढं छान... की आमच्याकडे दुसरा option च राहात नाही.... आता एवढं कौतुक केलंय ना... पटकन पुढचा भाग टाक... :) :)

    ReplyDelete
  13. >>या पहिल्या चिठ्ठीतला मजकूर तुमच्यासाठी नाही. ती चिठ्ठी तुम्हाला नजरचुकीने पाठवण्यात आली आहे" अशा तर्‍हेचा काही मजकूर असेल का त्यात

    हे मस्त वाटलं...असले प्रश्न मला बरेचदा पडतात....गोष्ट जबरदस्त परवान चढलीये! "येऊ दे! ये! ये! ये!"

    ReplyDelete
  14. :) :) .. खूप खूप आभार स्वाती.. सगळ्यांना कथा आवडते आहे हे पाहून बरं वाटतंय. शेवट थोडासा वेगळा आहे. तोही तेवढाच आवडेल का याविषयी मी थोडा साशंक आहे. बघू :)

    ReplyDelete
  15. विद्याधर, अगदी अगदी. माझंही असंच होतं अनेकदा :)

    आभार !! .. येणार येणार..

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...