Wednesday, June 2, 2010

माझे देव-दिलीप-राज

अतिशय मुख्य सूचना : हा संपूर्ण लेख आणि त्यातली मतं ही माझ्या दृष्टीने लिहिलेली आहेत. अनेक विधानं अनेकांना पटणार नाहीत. जे जे विधान पटत नाहीये त्याच्या सुरुवातीला "माझ्या दृष्टीने" किंवा "माझ्या मते" असे लिहून वाचावे. बाकी,

१. गजनी, रंग दे बसंती, लगान, जोधा अकबर, कमीने, भूत अप्रतिम/टाकाऊ आहे.
२. लता, हिमेश, आशा, अलका, सोनू, श्रेया यांना पर्याय नाही/यांच्याएवढ्या एकांगी गाणारं कोणी नाही.
३. करण जोहर, राजकुमार संतोषी, राजकुमार हिरानी, रामू, विक्रम भट्ट यांच्यासारखा दिग्दर्शक होणे नाही/यांचे मेंदू गुडघ्यात आहेत

ही आणि अशी इतर अनेक वाक्यं आपण वेळोवेळी ऐकतोच. त्या प्रत्येकाला "माझ्या दृष्टीने" किंवा "माझ्या मते" चा प्रिफिक्स लावला की सगळी कोडी सुटतात आणि सगळ्या शंका मिटतात  :)

**

मला कळायला लागल्यापासून जेव्हा जेव्हा मी वाचन (अर्थात अवांतर) करतोय तेव्हापासून मला एक लक्षात यायला लागलं होतं की चित्रपट, संगीत, दिग्दर्शन, अभिनय यातलं काहीही कणभरही करता आलं नाही तरीही या सगळ्या गोष्टींसंबंधी जे जे मिळेल ते ते सगळं वाचून काढण्याची आपल्याला जबरदस्त आवड आहे हे मात्र नक्की. आणि त्यासाठी हिंदी/मराठी चित्रपटच हवेत अशी काही सक्ती नव्हती. हॉलिवूड किंवा जगभरातल्या विविध भाषांमध्ये निर्माण होणारे कुठल्याही चांगल्याचुंगल्या चित्रपटांबद्दल काहीही वाचायला मला आवडायचं. माझ्या लहानपणी चित्रपट विषयावर निघणार्‍या जरातरी दर्जेदार मासिक/पाक्षिकांमध्ये जी, चंदेरी (बाकीची आता आठवत नाहीत) ही काही आघाडीची नावं. त्यांच्या दिवाळी अंकांवर तर मी तुटून पडायचो. बाबा कधी एकदा दिवाळी अंक आणतायत आणि कधी एकदा मी त्यावर तुटून पडून, त्यांचं पान न् पान वाचून काढून त्यांचा फडशा पाडतो असं व्हायचं मला. तर असेच अनेक लेख वाचताना वारंवार ज्यांच्या नावांचा उल्लेख व्हायचा ते त्रिदेव  म्हणजे देव-राज-दिलीप, राज-दिलीप-देव, दिलीप-देव-राज.. क्रम वेगवेगळा पण नावं तीच. लेख लिहिणार्‍या व्यक्तीच्या आवडीनिवडीप्रमाणे क्रम बदलत असतील कदाचित पण नावं तीच. तर अशा रीतीने या तिघांचे विशेष चित्रपट न बघताही (कारण आमच्या घरात "चित्रपट-बघणे" यासाठीचं पोषक वातावरण नव्हतं :) ) मी त्यांचा पंखा झालो. माझ्या वयाच्या इतर अनेकांसाठी असणारा देव आनंद माझ्यासाठी देव होता, राज कपूर राज होता आणि दिलीप कुमार हाही असाच दिलीप. कालांतराने त्यांचे चित्रपट बघितल्यावर दिलीप सदैव (म्हणजे अगदी त्याच्या तरुणपणीही) म्हातारा दिसत असल्याने ('अतिशय मुख्य सूचना' वाचणे) पुन्हा दिलीप कुमार झाला आणि राज सदैव बावळट/मंद दिसत असल्याने ('अतिशय मुख्य सूचना' विसरू नका) पुन्हा राज कपूर झाला. पण अभिनयाची वेगळी शैली, एका श्वासात सगळाच्या सगळा संवाद, मग तो कितीका मोठा असेना, म्हणण्याची लकब, सतत हात हलवत हलवत बोलण्याची स्टाईल, आणि डोळ्यातले मिश्कील भाव यामुळे बालपणी मासिकांतून भेटलेला देव मोठेपणी त्याचे अनेक चित्रपट बघितल्यावरही 'देव'च राहिला त्याचा 'देव आनंद' झाला नाही.


"जिया ओ SSS जिया ओ जिया कुछ बोल दो","फुलोंके रंग से दिल की कलम से", "मै जिंदगी का साथ निभाता चला गया", "दिल का भंवर करे पुकार " म्हणत नूतन बरोबर कुतुब मिनार उतरणारा देव हे सगळं दिग्दर्शक सांगतोय म्हणून नाही तर स्वतः, खरोखर, मनापासून, आतून, नॅच्युरली, सहजतेने करतोय असं वाटायचं आणि पटायचंही. अर्थात कालांतराने उतरत उतरत देव किती खाली गेला त्याचा हिशोब मांडायचा प्रस्तुत लेखाचा हेतू नाही. तर माझ्या आधीच्या पिढीला स्वप्नांच्या मनोहारी राज्यात भुलवून, भुरळ पाडून आपल्या असामान्य अभिनयाने त्यांच्या मनावर काही दशकं राज्य करणार्‍या त्रिदेवांचे आजच्या काळातले किंवा अगदी आत्ताच्या काळातले नाही तरी गेल्या वीस वर्षांतले उत्तराधिकारी कोण असं मला कोणी विचारलं तर मी क्षणाचाही विलंब न करता सांगू शकेन की आजच्या काळातले ते तिघेजण म्हणजे अनिल, अजय आणि नाना. ते कपूर, देवगण, पाटेकर विसरून कैक वर्षं झाली. मित्राला कधी पूर्ण नावाने हाक मारतं का कोणी? सचिनला सचिनच म्हणायचं उगाच सचिन तेंडूलकर कशाला..? तसंच हे.

तर या तिघांची आपापली शैली आहे. अभिनय, संवादफेक, चालणं, बोलणं, सरसर बदलणारे हावभाव, देहबोली, भावनांचं प्रकटीकरण या सगळ्या सगळ्याची प्रत्येकाची एक विशिष्ट शैली आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जब्बरदस्त ताकदीचा अभिनय. कमालीचा सशक्त. कालपरवाचे जॉन अब्राहम, सैफ, अक्षय (कुठलाही घ्या काय फरक पडतोय.. किंवा चला दोन्ही घ्या), विवेक, सुनील, शहीद, संजूबाबा, अनेक वेळेला शाहरुख, क्वचित काही वेळेला आमीर (वाचा वाचा 'अतिशय मुख्य सूचना'), दर वेळेला सलमान, या सगळ्यांत आणि अनिल-अजय-नाना या तिघांत आढळणारा हा महत्वाचा फरक. आता यांचे किती चित्रपट फ्लॉप झालेत, त्या चित्रपटातला तो प्रसंग, शेवट, सुरुवात, मध्य, गाणी, वगैरे कसे फालतू आहेत वगैरे सांगण्यात काही अर्थ नाही. निदान इथेतरी.. कारण ते गैरलागूच नाही तर चूक आहे. चित्रपटाचा सर्वेसर्वा हा दिग्दर्शक असतो त्यामुळे एखादा प्रसंग, त्यांची लांबी, सत्यासत्यता, आणि चित्रपटाचं एकूणच यश या सगळ्याची संपूर्ण जवाबदारी दिग्दर्शकाची असते. (टी-२० मध्ये ओव्हररेट कमी झाला की कप्तानाच्या मानधनातून पैसे कापून घेतात ना तसंच हे.). आणि या तिघांचे कुठलेही चित्रपट कितीही अयशस्वी झाले असले तरी त्या अपयशाचा कर्ता करविता, त्या मुर्ख प्रसंगांचा आणि कथारहित चित्रपटांचा धनी कोणीतरी वेगळा होता.. निदान या तिघांचा अभिनय हे कारण तर कधीच नव्हतं. उलट टुक्कारातल्या टुक्कार चित्रपटातही या तिघांचेही अभिनय नेहमीप्रमाणेच सर्वोच्च दर्जाचे आहेत. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी आलेला नानाचा 'एक' हा चित्रपट. अतिशय भिकार चित्रपट पण त्याच्या वाट्याला आलेल्या जेमतेम ४-५ प्रसंगांतून त्याने तो चित्रपट चित्रपटगृहात किमान एक आठवडा तरी चालेल याची दक्षता घेतली. अन्यथा बॉबी देओलने तो चित्रपट पहिल्या खेळालाच खड्ड्यात घालण्याची पुरेपूर तयारी केली होती. अनिलचा 'मुसाफिर' किंवा अजयचा 'कयामत'ही त्याच पठडीतले. या लोकांच्या बळावरच या चित्रपटांचा मान टाकण्याचा कालावधी निदान काही आठवड्यांनी तरी पुढे ढकलला गेला.

खरं तर हा लेख लिहायला सुरुवात करताना मी या तिघांवर वेगवेगळं लिहिण्याचं ठरवलं होतं परंतु अभिनयक्षमता, स्टाईल, भूमिकांमधील विविधता, संवादफेक, प्रसंग रंगवण्याची हातोटी हे सगळे गुण या तिघांत एवढे सामाईक आहेत की प्रत्येकाविषयी लिहिताना पुनरुक्तीचा दोष माथी आला असता. त्यामुळे तो टाळून सगळ्यांवर एकत्रच लिहिण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न करतो.


अप्रतिम अभिनयक्षमता आणि अतिशय उस्फुर्त व बोलके हावभाव या महत्वाच्या गुणांबरोबरच या तिघांनाउत्तमरित्या साधलेलं कसब म्हणजे भूमिकेत झोकून देणं. 'गंगाजल'मध्ये कायदा हातात घेणार्‍यांना शासन करणारा, बाणेदारपणे, ऐटीत चालत जाणारा एसपी अमित कुमार असो की 'जख्म'मध्ये जातीय दंगलींमध्ये असहायपणे लढणारा गायक अजय असो (या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे), स्वार्थापायी आणि पैशासाठी खून पाडत प्रसंगी आपल्या प्रेयसीलाही शत्रूच्या गोळीला बळी पडू देणारा 'खाकी' मधला यशवंत आंग्रे असो की आपल्या पत्नीची तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराशी भेट घडवून आणण्यासाठी धडपड करणारा 'हम दिल दे चुके' मधला विवश नवरा वनराज... 'पुकार' मध्ये देशासाठी जीवाची बाजी लावायला तयार असणारा मेजर जयदेव असो की 'बेटा' मधला आपल्या आईसाठी जीव द्यायला तयार असणारा भोळसट राजू, आपल्या मुलाला शोधण्यासाठी जीवाचं रान करणारा 'कॅलकटा मेल' मधला अविनाश असो की बलात्कारीत तरुणीला आपल्या घरात आश्रय देणारा 'हमारा दिल आपके पास है' मधला अविनाश ... "किसीको तो ये कचरा साफ करना पडेगाहीच ना" असं म्हणत दणादण एन्काऊन्टर्स करणारा 'अब तक ५६' वाला इन्स्पेक्टर साधू आगाशे असो की आग दिसली की आपल्या अपराधीपणाची भावना जागृत होऊन फटाफटा डोक्यावर हात मारून घेणारा 'परिंदा' मधला अन्ना असो, बायकोचा पाठलाग करत तिला मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारा 'अग्निसाक्षी' मधला विश्वनाथ असो की अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा 'अंकुश' मधला रवी असो.. हे सर्वजण त्या त्या वेळेला एसपी अमित कुमार, वनराज, राजू, मेजर जयदेव, अन्ना, इन्स्पेक्टर साधू आगाशेच वाटतात. त्यांच्यातून कधीही अजय, अनिल किंवा नाना डोकावत नाहीत की त्यांचा सूक्ष्मसा मागमूसही दिसत नाही हे त्यांचं प्रमुख यश. इतके की सस्पेंड झालेल्या एसपी अमित कुमारला न्याय मिळाल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, वनराजची तगमग आपल्याला पाहवत नाही आणि कितीही लाडकी असली (आठवा 'अतिशय मुख्य सूचना') तरी  ऐश्वर्याचा राग आल्याशिवाय रहात नाही, हा राजू एवढा मंद कसा असा प्रश्न पडतो आणि मेजर जयदेव क्लॉक टॉवरच्या दोलकावरून माधुरीला हात देऊन उतरवेपर्यंत आपल्या जीवात जीव येत नाही, शेवटी जॅकीने अन्नाला जाळून मारल्यावरच आपल्या जीवाची तगमग शांत होते आणि साधू आगाशेने जमीरच्या गोटात घुसून त्याला ठार मारल्यावर आपण मनोमन साधूला सलाम ठोकतो.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सतत किंवा अनेकदा वेगळ्या भूमिका, वेगळे चित्रपट करूनही वेगळं करूनही यांनी कधी त्याचे डिंडिम पिटले नाहीत. उगाच कशाची (अनावश्यक) प्रसिद्धी नाही की कसला गाजावाजा नाही. कधी उगाचच दिग्दर्शनात ढवळाढवळ केल्याचं ऐकिवात नाही की स्वतःला बुद्धिवादी आणि परफेक्शनिस्ट म्हणवून घेण्याचा किंवा स्वतःला ब्रांड म्हणून सादर करण्याचा वृथा अट्टाहास बाळगला नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे (सुरुवातीचा काळ वगळता) निवडक चित्रपटच स्वीकारले. उगाच चलती आहे म्हणून भारंभार चित्रपट साईन केले नाहीत की उगाचच वर्षातून फक्त एक म्हणजे एकच चित्रपट करायचा असे दंडक वगैरे घालून घेतले नाहीत. दर वेळी अगदी वेगळ्याच भूमिका केल्यात असंही नाही पण चाकोरीबद्धपणा, तोचतोचपणा शक्यतो टाळायचा प्रयत्न केला. अर्थात त्यांचे सगळेच्या सगळे चित्रपट दरवेळी दणदणीत यशस्वी झालेच असं मुळीच नाही. चिक्कार चित्रपटांनी दणदणीत मारही खाल्ला. पण आधी म्हंटल्याप्रमाणे त्याचं कारण यांचा अभिनय होता असं कधीच झालं नाही.

तसंच स्वतःची प्रसिद्धी करून घेण्याचा अट्टाहास नाही किंवा पत्रकार/पुरस्कार सोहळे मॅनेज करण्याची कला आणि इच्छा नाही त्यामुळे ढीगाने अ‍ॅवार्डस नाहीत. पण अर्थात त्यामुळे अ‍ॅवार्डस फंक्शन्सवर कधी बहिष्कार घातल्याचं स्मरत नाही किंवा उगाच सगळ्याच फंक्शन्स आणि पार्ट्यांना हजेर्‍या लावत सुटलेत असंही कधी झालं नाही. उगाच डझनावारी मासिकांच्या मुखपृष्ठांवर चमकणं नाही की पहिल्या स्थानासाठी कधी चुरस नाही. पीत प्रसिद्धीचा आधार घेत आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला हातभार लावण्याचे प्रकार नाहीत की उगाच अनाठायी वाद ओढवून घेऊन प्रसिद्धीचे झोत आपल्याकडे वळवून घेण्याची व्यर्थ खटपट नाही. अभिनय करणं आपलं काम आहे हे ओळखून, स्वतःच्या मर्यादा/व्याप्ती लक्षात घेऊन आपल्या परिघात राहून सतत उत्तमोत्तम भूमिका (दरवेळीच चित्रपट नव्हे) देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र केला आणि अजूनही करताहेत.

पण हल्ली उगाचच प्रयोगशीलतेच्या/वेगळेपणाच्या नावावर प्रेक्षकांना निर्बुद्ध समजून त्यांच्यावर मल्टिप्लेक्सी चित्रपटांचा मारा करण्याचं जे सत्र चालू आहे ते पाहून या त्रिदेवांचे जातीचे अभिनय बघायला मिळण्याचं प्रमाण फार कमी होतंय. अभिनय कशाशी खातात हे ठाऊक नसलेल्यांच्या या भाऊगर्दीत जातिवंत अभिनयाचा गळा घोटला जाण्याचीच शक्यता अधिक. तसंही अजयचा अपवाद वगळता बाकीच्या दोघांचं वय आता उतरणीला लागलं असल्याने (नाना : ५९, अनिल : ५१, अजय : ४१) हे केंद्रस्थानी असलेल्या भूमिका बघायला मिळणं कठीण आहेच आणि उत्तरोत्तर ते अजूनच अवघड होत जाणार. त्यामुळे यांचे उतरणीला लागलेले देव आनंद, दिलीप कुमार होण्यापेक्षा सदैव आपल्या नजरेतले 'देव-दिलीप-राज'च राहोत ही सदिच्छा !!!

जाता जाता : असाच विचार करत असताना हॉलीवुडातले माझे देव-दिलीप-राज कोण याचं उत्तर शोधत होतो. पण नंतर लक्षात आलं की हॉलीवुडात (माझ्यासाठी) दिलीप-राज नाहीतच. आहे तो फक्त देवच आणि त्याचं नाव टॉम हॅन्क्स !!!

-- सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.

60 comments:

  1. हेरंब, अगदी खर बोललास ह्यानी साकारलेले एसपी अमित कुमार, वनराज, राजू, मेजर जयदेव, अन्ना, इन्स्पेक्टर साधू आगाशेच वाटतात त्यात नाना, अजय, अनिल दिसत नाही. त्यासाठी त्यांची उत्कृष्ठ अभिनय शैलीच कारणीभूत आहेत. अजयचा लेजेंड ऑफ भगतसिंगपण मला भावला इतका की १५ दिवसात काही सीन परत परत बघतो सीडीवर आजही..जरी लोकांच्यामते त्याचा लुक बॉबी देओलच्या मानाने फिका होता मला आवडला...

    आशा करूया पुढे ह्या तीकडीकडून अजुन सशक्त अभिनयाची मेजवानी मिळेल..

    ReplyDelete
  2. अरे हो सुहास. लिजंड ऑफ भगतसिंग माझाही प्रचंड आवडता चित्रपट. अनेकदा बघितला आहे.
    इतरही अनेक चांगल्या चित्रपटांची नावं द्यायची राहून गेली आहेत. लिहितान लक्षात आलं नाही.

    ReplyDelete
  3. हेरंब
    खूप अभ्यास आहे रे तुझा या विषयावर. पण प्रत्येक मत पटलं . देव आनंद माझा खास आवडता आहे. अजूनही त्याचे हमदोनो, ९-२-११ , बात एक रातकी वगैरे चित्रपट खूप आवडतात. दिलिप ,राज कधीच आवडले नाहीत.
    नविन मधे खरं सांगायचं तर कोण आवडतं या बद्दल विचारच केला नाही कधी. पण आज तुझा हा लेख वाचल्यावर मात्र विचार करावासा वाटतोय. लेख मस्त जमलाय.
    अनिलचा मला तो तेजाब आवडला होता, बरेचदा पाहिला तो .

    ReplyDelete
  4. आभार काका. अभ्यास असं काही नाही पण प्रचंड आवड आणि त्यामुळे त्यासंबंधीचं वाचन (कारण प्रत्यक्ष चित्रपट खूप नंतर बघायला मिळाले.) मी देवआनंदचा पहिला चित्रपट बघायच्या आधी त्याच्या अनेक चित्रपटांबद्दल वाचून त्याच्या शैलीचा आणि अभिनयाचा पंखा झालो होतो. प्रत्यक्ष चित्रपट बघून एसी झालो.. :)

    हमदोनो, ९-२-११ माझेही प्रचंड आवडते आणि त्याबरोबरच लव्ह मॅरेज, तेरे घर के सामने, ज्वेल थीफ, जॉनी मेरा नाम ही. आणि दिलीप, राज बाबत अगदी सहमत. मलाही ते कधीच आवडले नाहीत.
    अनिलचे तेजाब, मि इंडिया, राम लखन, किशन कन्हैया हे सगळे माझे प्रचंड आवडते. सुहासला म्हंटलं तसंच.. अनेक चित्रपटांची नावं द्यायची राहून गेली.

    आणि तुमचे देव-दिलीप-राज कोण आहेत? मिळालं उत्तर? :)

    ReplyDelete
  5. tom hanks sarkha actor punha hone nahi yar...mala hi phar avadato specially cast away, philadephia and terminal. saglech changale ahet tyache cinemas.

    ReplyDelete
  6. आभार अजय. ब-याच दिवसांनी आलास.

    >> tom hanks sarkha actor punha hone nahi yar..

    अगदी अगदी सहमत. असा कलाकार शतकातून एखादाच जन्माला येतो !!

    ReplyDelete
  7. हेरंब हा लेख पुन्हा असाच्या असा माझ्या नावाने खपवला तरी चालेल...

    शेम टू शेम मतं हायेत येकदम!!! :)

    अनिल कपुर, नाना आवडणारे सापडतात एकवेळ पण अजय देवगण आवडतो म्हटलं की भुवया वर होतात लोकांच्या.... मगर म्येर्येको वो आवडता है!! परवा रात्री जागून अजयचा 'दिवानगी’ पाहिला.... जख्म तर माझा ATF आहे..... असाच ’प्यार तो होना ही था’ मधला शेखरही...वनराज असो की खाकीमधला अजय असो त्याचा अभिनय त्याने नेहेमी वेगळेपणानेच केलाय. असाच माझा आणि एक आवडता हिरो म्हणजे अक्षय खन्ना....
    नाना क्रांतीवीर छाप भुमिकेत एकदा आवडला, तोच तो पणा मात्र नको वाटला. पण प्रहार, अब तक ५६, टॅक्सी नं ९२११ तुफान ....

    हेरंब आजच्या तुझ्या पोस्टला कमेंट म्हणुन माझी आणी एक पोस्ट होऊ शकते :) ईतका लाडका विषय आहे हा (म्हण म्हण आता मनात त्यात नवे काय म्हणुन..ही बाई नेहेमीच मोठमोठ्या प्रतिक्रिया देते... :D)... पण पॅकिंग करायचे आहे तेव्हा आता कलटी...:)

    ReplyDelete
  8. अजय आणि नाना ह्यांचा मीही मोठा चाहता आहे. अनिल कपूरचीही आपली एक शैली आहे अभिनयाची आणि मी त्याचा अभिनेता म्हणून आदर करतो. पण माणूस म्हणून तो ह्या इतर दोघांच्या तुलनेत थोडा मार खातो(माझ्या मते).
    अजय तर माझ्यामते आजच्या काळातला अंडरप्ले करणारा सर्वोत्तम अभिनेता आहे.
    मस्त लिहिलंयस एकदम, संदर्भ घेत.

    ReplyDelete
  9. अजय आणि नानाचा मीही मोठा पंखा आहे.
    अजय चे चित्रपट कीतीही टुकार असले तरी त्याचा अभिनय एकदम मस्त.
    अजय सारखे जुल्मी डोळे आख्या बाँलीवुडात कुणाकडे नाहित.

    ReplyDelete
  10. Mast lihilayas...khare sangayache tar Picture, Hero, aani tyanchyashi nigdit goshti vaachayala mala muli mhanaje mulich aawadat nai... Ha phakt tujha lekh aahe mhanun vaachala...aani arthat aawadala..( Pan phakt tujhya lihinyachya style mule...) Newys, tuze te sarakhe Mukhya suchana vaacha che dhrupad bahrrii ekdam...!!! :)

    ReplyDelete
  11. Off all actors.....Ajay!!!! eiiiiiiii
    Amachya kajol shi agn kelya pasun tar to adhikach navadata zalay!

    ReplyDelete
  12. “अतिशय मुख्य सूचना” आधीच देऊन (आणि त्या सूचनांची वेळोवेळी आठवण करून देऊन (कंस वापरायची सवय लागली मलापण बहुधा)) फार बरं केलंस. नाहीतर किमानपक्षी दिलीप, देव, आणि आमिर यांच्याबद्दलच्या मतांवरून तरी गदारोळ झाले असते :).

    ऐश्वर्याबद्दल मात्र या सूचनेची गरज नव्हती :)!

    बाकी लेख छानच.

    ReplyDelete
  13. arre wah! wachla nahie ajun pan dilip-dev-raj, nana-anil kapoor-devgan baghun wachalyashiway rahawnar nahie.. wel milala ki lagech wachun kadhnar! bookmark karun reminder lawate :)

    ReplyDelete
  14. मित्राला कधी पूर्ण नावाने हाक मारतं का कोणी? सचिनला सचिनच म्हणायचं उगाच सचिन तेंडूलकर कशाला..? तसंच हे.अगदी अगदी.:)मात्र राज व दिलीप मला आवडत नाहीत. राजकपूर म्हणजे सतत दुस~याची हिरॉईन ढापणारा-गळेपडू व पिडूही (राजच्या पंख्यानो माफी द्या... हेरंबने दिलेली कंसातील अति मुख्य सूचना इथेही लागू आहे बरं का )
    अजयचा भगतसिंग, गंगाजल, वनराज, दिवानगी व तक्षक हे छाप सोडणारे. मुख्य म्हणजे उगाच अति बडेजाव, प्रसिध्दी यापासून दूरच असल्याने जास्त भावतो. नाना.... ह्म्म्म....साधू आगाशे हा आमच्याच घरात राहतो.:) आणि ब्लफमास्टर मधला शेवटचा सीन... अभिषेकला घाबरून छत्री घेऊन वर चढून बसलेला नाना... हा हा. मस्तच. पुण्याला चायनीज खायला गेलो असताना आम्हाला भेटला होता... खूप गप्पा झाल्या. अगदी एक मच्छरपासून ते साधूपर्यंत.
    अनिल मला आवडायचा पण त्या ऑस्कर सोहळ्यात अगदीच वेड्यासारखा करत होता.:( राजेंद्रकुमार, शशीकपूर आणि अनिल हे सारे एकाच माळेतले. त्यांचे सिनेमे संपूर्ण आपटले असे झालेच नाही ( तुरळक अपवाद सोडले तर ) ज्युबिलीस्टार,कासवाच्या जातीचे.
    तू अक्षय खन्नाबद्दल काहीच लिहिले नाहीस... का रे त्याला वगळलेस? बॅड,बॅड...मला तो भयंकर ( हा भयंकर शब्द कुठेही फिट होतो ते बरेयं, ही.ही..त्याही पेक्षा कुठला चपखल शब्द असेल तर तो इथे वापरायचायं मला )आवडतो. ( माझ्या प्रतिक्रियेची पोस्टच होतेयं की काय... थांबते रे इथेच. पण आता तू दिलसे सबजेक्ट छेडलास...तवा म्या जबाबदार न्हाई... कंसबाबा सलाम वो )

    ReplyDelete
  15. च्यामारी इतक्या सगळ्या हिरोंनी एकदम आक्रमण केल्याने आमचा टॉम हॅन्क्स राहिलाच की वो... पण असे दोन ओळीत त्याच्यावर काही लिहून होईल का... तेव्हां फक्त " सलाम " तो आणि तोच दुसरा होणे नाही.

    ReplyDelete
  16. महेन्द्रजी, श्रीताई, हेरंब...

    मला आता दिलिप-राजचे फॅन शोधावे लागणार... :-(

    कुणीच नाही माझ्या बाजूनं :-(

    मी मात्र देवचाही मोठ्ठा फॅन आहे...

    ReplyDelete
  17. हेरंब, नानाचा ’पक पक पकाक ’ आणि ’टॅक्सी ९२११’ ईशानचा जबरदस्त आवडता, अजयचा ’टारझन द वंडर कार’ आवडता आणि अनिलचा मि.ईंडिया असाच कायम आवडणारा त्याला त्यामूळे मला पुन्हा एक कमेंट टाकण्याची ऑर्डर देण्यात आली आहे...

    "तेव्हा हेरंब मामा (हा वाद मी मिटवला आहे, काका नको मामाच धावेल, तू माझ्या माहेरीच बरा :) )आपली आवड सेम आहे म्हणून सेम पिंच-ईशान "

    थोडक्यात गौरी सोडुन (अजुन वाचता येत नाही म्हणुन :) ) उरलेले देवडे कुटूंब तुझ्या वटवटीचे फ्यान आहे :)

    लगे रहो!!

    ReplyDelete
  18. सह्ही !! जख्म आणि ’प्यार तो होना ही था’ माझेही प्रचंड फेव्ह.. दिवानगी, खाकी, फुल और कांटे, राजुचाचा, गंगाजल, अपहरण, शिखर, इश्क, हम दिल दे चुके सनम कसल्या एकसे एक भूमिका केल्या आहेत ग त्याने !!!!!

    अक्षय खन्नाशी माझं जमत नाही. अपवाद DCH आणि हमराज. बाकी सगळी बोंब आहे (सूचना सूचना :) )

    क्रांतीवीर नंतर नानाचा थोडा तोचतोच पणा झाला होता खरा पण २-३ चित्रपटच.. नंतर त्यालाच त्याचं कळलं असावं. पण त्याचे एकूणातले चित्रपट बघायला गेलीस तर थोडासा रुमानी हो जाए, परिंदा, अंकुश, गुलाम-ए-मुस्तफा, अंगार, AT56, प्रहार, हमदोनो (नवीन), ९२११, पक पक पकाक, तिरंगा (राज कुमार वगळता) अशी कायच्याकाय मोठी यादी निघते ग :) त्यामुळे नानाला पर्याय नाहीच..

    बाकी (जसा मला अक्षय खन्ना आवडत नाही तसाच) तुला अनिल कपूर विशेष आवडत नसावा हे तू त्याला तुझ्या कमेंटमध्ये अनुल्लेखाने मारलंस त्यावरून कळलंच ;) .. असो.. शुभयात्रा. फेटला कल्टी मारा नीट. ;)

    ReplyDelete
  19. बाबा, अनिलच्या स्लमडॉग नंतरच्या मिरवामिरवीमुळे आणि ऑस्करमधल्या विचित्र वागण्यामुळे ब-याच जणांच्या मनातून तो उतरला. शक्य आहे. पण अभिनेता म्हणून तो आजही बाप आहे !!!

    >> अजय तर माझ्यामते आजच्या काळातला अंडरप्ले करणारा सर्वोत्तम अभिनेता आहे.

    १००१% सहमत !!!

    ReplyDelete
  20. सचिन, अजय आणि नाना यांच्या अभिनयसामर्थ्याबद्दल वादच नाही. :) (तूही तन्वीसारखाच अनिलला अनुल्लेखाने मारतो आहेस तर ;))

    ReplyDelete
  21. मैथिली !!!!!!!

    >> Picture, Hero, aani tyanchyashi nigdit goshti vaachayala mala muli mhanaje mulich aawadat nai...

    काय हे?? अरेरे .. भावी पिढीचं अध:पतन होतंय की काय ?? :P ..

    हा हा.. हरकत नाही.. माझ्या ओळखीतल्या अनेकांना, मित्रांना, (अगदी आमच्या घरातही) चित्रपटाचं किंवा त्यासंबंधी वाचनाचं वेड नाही. तुला हा लेख आवडला ना आता चित्रपटसृष्टीवर लिहिणा-या प्रो समीक्षकांचे लेख वाच. ते या लेखापेक्षा कैक पटीने माहितीपूर्ण आणि मुद्देसूद असतात. (आणि त्यात सूचनाही नसतात कारण अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या आधारे ते त्यांचा मुद्दा ठामपणे पटवून देऊ शकतात :) )

    ReplyDelete
  22. या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही प्रकारच्या सिनेमात मिसफिट असत नाहीत.

    ReplyDelete
  23. प्रिय अनामिक,

    तुमच्या लाडक्या काजोललाही आमचा लाडका अजय आवडला यातच काय ते आलं.. नाही का ?? ;)


    >> Off all actors.....Ajay!!!!

    *ALL* ?? अभिनेते आहेत कुठे बॉलीवूडमध्ये आता? सगळे शुंभ तर भरलेत !! :)

    ReplyDelete
  24. हा हा विवेक.. कंसाची सवय अगदी संसर्गजन्य आहे.. बघता बघता लागते आणि सुटता सुटत नाही :)

    दिलीप आणि राज मला कधीच आवडले नाहीत पण देव कायमच आवडला.. मला आमीरही आवडतो पण जेव्हा तो स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणवून घेतो तेव्हा दुर्दैवाने तो हे विसरतो की प्रेक्षकांकडून कलाकाराला दिलं जाणारं एरर मार्जिन तो जवळपास नगण्य करून टाकतो. त्यामुळे त्याची छोट्यात छोटी चूकही नजरेत भरते. उदा. त्याला मुळीच रडता येत नाही. किंवा असंच काही. हे परफेक्शनिस्टचं लेबल काढून टाकलं असतं तर (माझ्यासारख्या) प्रेक्षकांनी अशा छोट्या बाबींकडे लक्ष दिलं नसतं.. असो..

    ऐश्वर्याबद्दलची ती सूचना माझ्या स्वतःसाठी आहे कारण मी ऐश्वर्याचा डाय हार्ड चाहता आहे :)

    ReplyDelete
  25. मेघा, नक्की वाच.. वाचलास की नक्की कळव.. सूचना विसरू नकोस मात्र ;)

    ReplyDelete
  26. श्रीताई, राज-दिलीप चे पंखे फारच कमी आहेत वाटतं.. बिचारे आजच्या काळात असते तर फार बिकट प्रसंग होता म्हणायचा शोमन आणि निशान-ए-पाकिस्तान वर ;)

    खरंय.. अजयची प्रत्येक भूमिका छाप सोडणारी असते. काहीतरी वेगळं सांगणारी असते. खास अजय टच असतो तिथे.. आणि अगदी प्रसिद्धी परांङमुख !!

    ब्लफमास्टर चा तो शेवटचा टेरेसवरचा सीन जाम आवडतो मला. त्यात नानाने काय बेफ्फाट डायलॉगबाजी केलीये.. "साला मेरेको चुना लगाता है??? चुने की फॅक्टरी है मेरी और मेरेको चुना?" हा डायलॉग नाना त्याच्या विशिष्ट स्टाईलीत, हातवारे करत, डोळे फिरवत असा काही जबरी म्हणतो ना की बस !!! मी अक्षरशः हसून हसून गडबडा लोळलोय कित्येकदा.. :)

    >> साधू आगाशे हा आमच्याच घरात राहतो.

    हा हा :)

    >> पुण्याला चायनीज खायला गेलो असताना आम्हाला भेटला होता...

    वॉव !!!! ननाशी गप्पा??? क्या बात है.. सहीच !!

    अनिलने ऑस्कर सोहळ्यात जरा वेडेपणा केला खरा पण त्यामुळे त्याचं अभिनेता म्हणून माझ्या मनात असलेलं स्थान कधीच ढळणार नाही. he is simply great and most versatile !!

    राजेंद्रकुमार, शशीकपूर अगदी अशक्य आहेत मला. राजेंद्र कुमारचे चित्रपट दणादण चालवून त्याला ज्युबिली कुमारची उपाधी बहाल करणा-या प्रेक्षकांची, समीक्षकांची आणि त्यांच्या टेस्टची कीव येते मला !! :)

    अक्षय खन्ना बद्दल तन्वीला लिहिलंय बघ.. तो DCH आणि हमराज शिवाय कधीच झेपला नाही मला..

    आणि हो.. टॉम हॅन्क्सला आपण पामर फक्त सलामच करू शकतो.. त्याच्याशी स्पर्धा करायला हॉलीवूडमध्ये दिलीप-राज नाहीतच. तो एकमेवाद्वितीय आहे.

    ReplyDelete
  27. हा हा विवेक.. खरंच बाका प्रसंग आहे त्या दोघांवर ;)

    देव ग्रेटच होता (आहे म्हणून शकत नाही दुर्दैवाने :( )

    ReplyDelete
  28. चला.. तुम्ही लोकांनी माझा मामा करून टाकला तर ;)

    मलाही ईशानने सांगितलेले तिन्ही पिक्चर आवडतातच :) टारझन मध्ये अजयने छोटीशी भूमिका काय सही केलीये !!

    गौरी धरून (वाचता आलं नाही तरी तू सगळ्यांना वाचायला देतेस हेच मोठ्ठं काम आहे) सगळे देवडे कुटुंब, धन्स धन्स !! :)

    ReplyDelete
  29. अनामिक, अगदी खरंय. कुठल्याही भूमिकेत ते इतक्या चपखलपणे बसतात की जणू काही ती भूमिका त्यांच्यासाठीच लिहिली गेली असेल असं वाटतं.. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  30. शंतनू, मलाही रसेल क्रो आवडतो. पण तरीही टॉम हॅन्क्स तो टॉम हॅन्क्स. त्याची सर कोणालाच नाही. :)

    ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete
  31. हेरंब, बाबा तुझा दांडगा अभ्यास आहे बाबा...मी तर पूर्ण वाचलं पण नाही कारण मला पाहिलेले चित्रपट लक्षातच राहात नाहीत जास्त म्हणून डॊक्यावरुन डॉयलॉग जाण्यापेक्षा बरं...नाना पाटेकर बरोबर बी.एम.एम. ला एक मैफ़ल पाहताना कंपनी मिळाली होती म्हणून तो पण आवडतो (आणि अभिनयासाठी तसाही)
    टॉम हॅन्क्स पाहिला की अमीरचा भास होतो नेहमी(किंवा उलटसुलट...च्यामारी viceversa ला शबुद मिळाला का रे???) त्याचा अगदी लहानपणीचा एक चित्रपट होता बघ ज्यात तो लहान असतो पण ते नाणं टाकुन इच्छा मागण्याच्या गडबडीत मोठा होतो...(नावाची गोची जुनीच) तो पण छान आहे बरं.....
    बाकी या क्षेत्रातल्या जाणकारांनी वरती समदं लिवलंय...आम्चे दोन पैकं गोडं मानुन घ्या....

    ReplyDelete
  32. अभ्यास नाही.. आवड होय .. :) अग मी कितीही पिक्चर्स बघू शकतो. मागे एकदा एका वीकांतात २० बघायचे ठरवले होते पण १५ च बघून झाले (अर्थात सगळे विंग्रजी..)

    >> टॉम हॅन्क्स पाहिला की अमीरचा भास होतो नेहमी(किंवा उलटसुलट...च्यामारी viceversa ला शबुद मिळाला का रे???)

    अगदी अगदी !!!!!!! त्या चित्रपटाचं नाव Big http://www.imdb.com/title/tt0094737/

    टॉम हॅन्क्सचा मी पाहिलेला पहिला चित्रपट. कैक वर्षांपूर्वी.. बहुतेक शाळेत असताना.. स्टोरी आवडली होतीच. पण टॉम हॅन्क्स सेम आपल्या आमीर सारखा दिसतो हे ही तेव्हा लगेच जाणवलं होतं (तेव्हा नुकताच QSQT आला होता त्याचा इफेक्ट ;) ) त्यामुळे तो पिक्चर आणि टॉम हॅन्क्स दोघेही जाम आवडले आणि कायमचे स्मरणात राहिले. त्यानंतर टॉम हॅन्क्सचे चित्रपट बघायचा सपाटाच लावला होता मी.

    ReplyDelete
  33. अजय दे. च्या बाबतीत म्हणशील तर "हा पुढे चांगला ऍक्शन स्टार बनेल असं वाटत होतं" पण जख्म सारख्या चित्रपटांतून आपण अभिनयही करू शकतो हे त्याने दाखवून दिलं. नंतर तर लोक त्याला खरोखरच अभिनेता म्हणून ओळखू लागले एवढा सरस झाला तो. कच्चे धागे मधला आफताब तर लाजवाब. नानाचा मला न आवड्लेला एकमेव चित्रपट म्हणजे यशवंत पण तीसुद्धा दिगदर्शकाची चूक नाहीतर नानाने आपलं काम चोख केलं होतं. अनिल कपूर न आवडणा-यांमधे जमा होणा-यातला नाहीच. त्याचं ’झकास’ बोलणं तर मला खूपच आवडतं.

    गाईडसाठी पुरस्कार मिळालेल्या देव आनंदला तुरूक तुरूक पळण्यातच जास्त गोडी होती नाहितर आज तो खरोखरीचा देव असता, त्याचा आनंद झाला नसता. दिलीप आणि राज बद्दलची माझी मतं थोडी वेगळी आणि न पटणारी.. सो... लिव्ह इट.

    चित्रपटांची निस्सीम चाहती असल्याने बच्चन एका वेगळ्याच ठिकाणी आहे. त्याने नुसतं पाहिलं तरी तो अभिनय ठरतो, तर आता बाकी काय सांगणार? या व्यतिरिक्त कमल हसन मला जाम आवडतो. ’सागर’ मधे ऋषी कपूर जेव्हा डिंपल, तो आणि कमलमधल्या प्रेमाच्या त्रिकोणावर बोलत असतो, तेव्हा कमलने अशी ऍक्टींग केलीय की यंव रे यंव! शिवाय ’सच मेरे यार है’ गाण्यात ’अपनी तो हार है’ म्हणताना काय बोलतो चेहे-याने!! तो चांगला डान्सर आहे. पण त्याचे एकमेव हिरो असलेले हिंदी चित्रपट जास्त चालले नाहीत.

    ReplyDelete
  34. aprateem lihile aahe! aadhi purNa wachale navate.. dev majhahi prachand laaDaka aahe.. aani anil kapoor.. nana chi tar baat ch wegaLi.. devgan (ho, ajay nahie to ajun tari majhyasathi :) pan tendalya asato ki tasach! ;)) vanaraaj madhye prachand awadlela hota (salmaan awadat asun dekhil - ithe tujhyach atishay mahatwachya suchana wachawyat :D).. aso!
    shewatache vaaky prachand paTalele aahe.. Tom Hanks la paryaay nahie!

    ReplyDelete
  35. Post chaanach zaliye. Pan samajik bandhilkicha vichar kela tar NANA la tod nahi. Makrand (Anaspure)ne sangitlelya anubhava pramane to Mumbaila strugle karat astanna, Nanane tyala khup madat keli. Aani he to pratyeka sathi nehemich karat aalay. Baki junya abhinetyancha ullekh kela jato tevha faqt RAJ, DEV V DILIP yanchach ka ullekh hoto te kalat naahi. Abhinayachya babtit PRAN hyanchya peksha kititari pudhe hota. (Tuza kans ithehi lagu hoto).
    Thanks,
    Dinesh

    ReplyDelete
  36. @ कांचन:

    “थोडी वेगळी आणि न पटणारी” असली तरी दिलीप आणि राजबद्दलची तुझी मतं वाचायला नक्की आवडेल. त्यामुळं “जाऊ दे...” म्हणण्यापेक्षा इथं लिहिलंस तर जास्त छान वाटेल.

    ReplyDelete
  37. अनिल कपूर माझा फेवरेट, सिनेमा पहायला सुरुवात केली तिच अनिलच्या सिनेमांवरुन, तब्बल नऊ चित्रपट ओळीने... तो इतका आवडायचा की माधुरीने जर कुणाशी लग्न केले तर तो (आम्ही सोडुन अर्थात) अनिलच असावा असे वाटायचे ;-)

    आमीरखान बद्दलच्या मतांशी सहमत .. एकदम १००%.

    ReplyDelete
  38. @कांचन,

    अगदी अगदी.. अजयचा 'फुल और कांटे' बघून अजून एक अ‍ॅक्शन हिरोने एन्ट्री मारली आहे असंच वाटलं होतं पण नंतर त्याने एकापेक्षा एक सरस भूमिका केल्या. मला वाटतं जख्म, इश्क पासून त्याने आपण अभिनयही चांगला करू शकतो हे दाखवून दिलं.
    मला कच्चे धागे विशेष आवडला नव्हता पण आफताब बेष्टच.. चला म्हणजे तुलाही नाना आणि अनिल आवडतात तर :)

    >> दिलीप आणि राज बद्दलची माझी मतं थोडी वेगळी आणि न पटणारी.. सो... लिव्ह इट. <<

    डोन्ट लिव्ह इट. न पटणारी तर न पटणारी पण सांग तर खरं.. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असणारच..

    बच्चन, कमल हसन माझेही आवडते. ग्रेट लोकं आहेत ती. बच्चन ७० च्या दशकातला देव-दिलीप-राज ठरावा.. !! बच्चन तरुण असताना मला त्याच्याएवढाच आवडणारा अजून एक कलाकार म्हणजे विनोद खन्ना !! कुर्बानी, मेरे अपने बघून तर मी प्रचंड पंखा झालो होतो त्याचा.

    ReplyDelete
  39. धन्स मेघा.एकूण देव, नाना, अजय, अनिलचे चाहते बरेच आहेत तर.
    अग सलमान मलाही आवडायचा पूर्वी.. MPK आजही माझा फेव्ह पिक्चर आहे. पण तो MPK आणि HAHK मधेच बघवला गेला. बाकी आनंद !! जुडवा, प्यार किया तो डरना क्या आणि अशाच इतर चित्रपटांमधले त्याचे विचित्र अंगविक्षेप बघणं जड गेलं आणि हळू हळू तो माझ्या यादीतून बाद झाला. असो.. (अतिशय महत्वाची सूचना वाचली आहे. काळजी नसावी ;) )

    >> shewatache vaaky prachand paTalele aahe.. Tom Hanks la paryaay nahie!
    वादच नाही.. टॉम हॅन्क्स एकमेवाद्वितीय आहे !!!

    ReplyDelete
  40. आभार दिनेश. ब्लोगवर स्वागत..

    >> Pan samajik bandhilkicha vichar kela tar NANA la tod nahi.<<

    अगदी सहमत. कारगील युद्धाच्या वेळेस नाना महिनाभरासाठी तिथे गेला होता.. !!!

    >>Baki junya abhinetyancha ullekh kela jato tevha faqt RAJ, DEV V DILIP yanchach ka ullekh hoto te kalat naahi.<<

    बरोबर आहे. राज, दिलीप, देव यांचाच उल्लेख वारंवार होतो. कदाचित या तिकडीचे सगळ्यांत जास्त चित्रपट चालले म्हणून, किंवा त्या वेळच्या तरुण पिढीवर यांचा जबरदस्त पगडा असेल म्हणून आणि त्या तुलनेत (चांगला अभिनय करत असूनही) इतर कलाकार मागे पडले किंवा यशाची वारंवारता त्यांना राखता आली नाही म्हणूनही असेल. नक्की कारण माहित नाही. पण जुन्या मासिकांमध्ये या तिघांचाच उल्लेख प्रामुख्याने होतो हे मात्र नक्की..

    ReplyDelete
  41. विवेक, मलाही तेच म्हणायचंय. सगळ्यांची मतं वाचायला नक्कीच आवडतील !

    ReplyDelete
  42. >>तो इतका आवडायचा की माधुरीने जर कुणाशी लग्न केले तर तो (आम्ही सोडुन अर्थात) अनिलच असावा असे वाटायचे ;-)<<

    हा हा हा.. आनंदा.. तू खर्राखुर्रा चाहता रे अनिलचा !!! ;)

    तू नाना आणि अजयला अनुल्लेखाने मारतोयस वाटतं ;) :P

    ReplyDelete
  43. नाना पटेश व अजय काही प्रमाणात पटेश...
    अनिल बद्दल नो कॉमेंट्स ..

    ReplyDelete
  44. सागर, चल नाना तरी पटेश ना.. खूप झालं..

    मला वाटतं अनिलच्या सुवर्णकाळात तू बराच लहान असशील.. त्याचे तेजाब, मशाल, ईश्वर, मेरी जंग, परिंदा, किशन कन्हैय्या, रामलखन, कालाबाजार, चमेली की शादी, वो सात दिन, मि इंडिया, बेटा, कर्मा, लम्हे, बेनाम बादशाह हे आणि असे अनेक चित्रपट त्या त्या काळात पाहून भारावून गेलेली आमची पिढी. (हे असं आमची पिढी वगैरे म्हंटल्यावर उगाच फारच म्हातारं झाल्यासारखं वाटतं :( .. पण मुद्दा कळावा म्हणून म्हंटलं.) .. अजयच्या बाबतीतही थोड्याफार फरकाने कदाचित हेच मुद्दे लागू होऊ शकतील.. कल्पना नाही..

    ReplyDelete
  45. हेरंब दादा
    खर आहे तुझ पण नाना सुद्धा त्याच काळातला...
    अनिल नायक मध्ये आवडला पण तो कधीच नाना सारखा किंवा अजय(मोजक्या प्रमाणत (गोलमाल ,आल द बेस्ट,राजनीती,अपहरण ,गंगाजल )) आवडला नाही..
    असो तुझा सुरवातीला आलेला कंस महत्वाचा :)

    ReplyDelete
  46. हम्म. शक्य आहे.. अनेकांना अनिल आवडतोच असं नाही.. त्यामुळे ओक्के :) .. हरकत नाही..

    हो आणि कंस आहेच लक्षात :)

    ReplyDelete
  47. अरे नाना आणि अजय देवगण तर आहेतच, पण आपला पर्सनल फेवरेट असतो ना... तो अनिलच.

    ReplyDelete
  48. हो रे.. ते आलं लक्षात.. मी जस्ट गंमत करत होतो.. :)

    ReplyDelete
  49. >>कालांतराने उतरत उतरत देव किती खाली गेला त्याचा हिशोब मांडायचा प्रस्तुत लेखाचा हेतू नाही..
    :) खरयं.. पण जेव्हा टॉप वर होता तेव्हा, काय दिमाखात वावरला तो!
    तेरा मेरा प्यार अमरच चित्रिकरण, गोड हसत गल्लीबोळातून वाट काढणार्‍या देवमुळेच ज्यास्त लक्षात राहीलं.. (Thank God Sadhana changed her haircut in that song!)
    जन्मजात म्हातारा लिस्टमधे मी राज कपूरलाही टाकते.
    बाकी, नाना अनिल आपले भिडू लोक आहेत.

    ReplyDelete
  50. >>खरयं.. पण जेव्हा टॉप वर होता तेव्हा, काय दिमाखात वावरला तो!<<

    अग वादच नाही.. टॉपवर असताना तो एकमेवाद्वितीयच होता. म्हणून तर म्हंटलं की "कालांतराने उतरत उतरत देव किती खाली गेला त्याचा हिशोब मांडायचा प्रस्तुत लेखाचा हेतू नाही.."

    राज म्हातारा नाही वाटला मला पण कायमच बावळट, मंद, मख्ख, माठ, मुर्ख असा वाटला. आणि नाना अनिल भिडू लोक आहेतच.

    ReplyDelete
  51. मी तर लहानपणापासुन एकदम फ़िल्मीचक्कर वाला आहे आणि माझी आवड प्रत्येक चित्रपट बघितल्यावर बदलत असते.. :) बाकी अजय इतके बोलके डोळे सध्या तरी कोणाचे नाहीत.(एक चांगला माणुस ही आहे तो आताच राजनीतीच्या वेळी झा हयांना त्याने दोन वेळा विचारले खरच माझी गरज आहे का तुम्हाला हया चित्रपटात पुढे झांनी हो म्हटल्यावर तो पटत नसुन सुदधा राजनीतीच्या सेटवर हजर झाला).देवाआनंदसारखाच चिरतरुण राहिले्ल्या अनिल कपुरचीही गोष्टच वेगळी.दमदार अभिनय आणि अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे आजच्या अभिनेत्रींबरोबर काम करतांनाही तो थोडाही म्हातारा वाटत नाही.(त्याची स्माईलही लाजवाब आहे).बाकी नाना बद्दल काय बोलु ...त्याची गोष्टच निराळी.फ़क्त त्याच्या नावावर सिनेमा पाहणारी कितितरी लोक आहेत.(माझे वडील सिनेमा वैगेरे जास्त काही पाहत नाही.पण नाना त्यांचा आवडता अभिनेता).




    ***तुझी मुख्य सुचना इथेही लागु

    ReplyDelete
  52. वा वा देव. अगदी मनातलं लिहिलंस. प्रतिक्रिया वाचून तुझी आवड सतत बदलत असली तरीही नाना-अनिल-अजय कायमच तुझ्या आवडत्या लिस्ट मध्ये असतीलच याबद्दल वादच नाही :)

    ReplyDelete
  53. (हे अनिक कपूर स्टाइल मध्ये हसत वाचावे).. हे..हे.. एकदम झक्कास... पोस्ट..

    नानाने जो 'प्रहार' केला त्यानंतर तर मीच फ़ौजी व्हायचा बाकी होतो... दुर्दैवाने संधी हुकली... अजय खरा भावला तो भगतसिंगच्या भूमिकेत... :) अस्सल कलावंत...

    ReplyDelete
  54. धन्यु (तुला धन्स शब्द आवडत नाही म्हणून ;) ) रोहणा.

    तुलाही हे तिघे आवडतात हे ऐकून बरं वाटलं. बाप लोकं आहेत यार ही..

    ReplyDelete
  55. माहित नाही का पण मला 'धन्यु' सुद्धा नाही आवडत... सरळ आभार किंवा धन्यवाद ... :) असो... तिघे मात्र बाप लोक आहेत हे नक्की...

    ReplyDelete
  56. बरं :) ... आभार आणि धन्यवाद सेनापती..

    >>तिघे मात्र बाप लोक आहेत हे नक्की...

    +१

    ReplyDelete
  57. हेरंबा, अनिल- वो सात दिन, विरासत. अजय- जख्म. नाना- परिंदा!!! कशी रे बाबा ही माणसं दूर राहून आपल्याला काही सुंदर अभिनय बघितल्याचा आनंद मिळवून देतात! मला तरी बुवा तुझी सगळी मतं पटली! +१ :)

    ReplyDelete
  58. खरंच ग.. हे लोक म्हणजे चमत्कार आहेत.. चला तुलाही पटली तर.. बरं झालं..
    या मतांवरून एका फालतु मराठी साईटवर फार मोठा घोळ झाला होता. अर्थाचा अनर्थ केला त्यांनी तिथे. ते नंतर सवडीने सांगेन कधी. !

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...