मला पावसाळा आवडत नाही. कारण मला पाऊसच आवडत नाही. मला कल्पना आहे की मला शाहरुख आवडत नाही कारण त्याची स्टाईलच आवडत नाही किंवा मला द्रविड आवडत नाही कारण त्याची बॅटिंगच आवडत नाही किंवा मग अगदी काजोल आवडत नाही कारण तिची अॅक्टिंग आवडत नाही असं काहीतरी म्हणण्यासारखं हे आहे. जर कोणाला खरोखरच शाहरुख, द्रविड आणि काजोल (अरे हो.. आणि पाऊसही) आवडत नसतील तर तो योगायोग समजू नये. त्यांचं या एकखांबी तंबूत स्वागत आहे. कितीही वेड्यात काढलंत तरी ईलाज नाही. कारण हे शाश्वत आणि अंतिम नसलं तरीही माझ्यासाठी माझ्यापुरतं मात्र सत्य आहे.
पाऊस म्हटलं की लोकं एकदम नोस्टॅल्जिक होऊन मागे जात जात जात एकदम "आमच्या घरासमोर असलेल्या डबक्यात आम्ही कशा नावा करून सोडायचो.. कशा एकमेकांच्या होड्या सॉरी सॉरी नावा (नावा हे जास्त नोस्टॅल्जिक वाटतं खरं) पाण्यात बुडवायचो" किंवा मग "त्या बंड्याने कसं त्या चिंगीला धक्का देऊन पाण्यात पाडलं" किंवा "कसं ते डबक्यातलं पाणी तिच्या अंगावर उडवलं" पर्यंत मागे जाऊन येतात.. येतात कसले तिथेच थांबतात (राहतात या अर्थी. खरं तर थांबत नाहीत चालूच राहतात) म्हणणं जास्त योग्य. कोणावरही अविश्वास वगैरे दाखवणं असं काही नाही (आणि समजा मी दाखवलाच अविश्वास तर कोसळायला तुम्ही काय सरकार आहात का. उगाच कायच्याकाय) किंवा कदाचित माझ्या जात्याच कमी असलेल्या स्मरणशक्तीमुळेही (शंखपुष्पी की कायसं घेतल्यावर वाढायची म्हणे. च्यायला तेही आठवत नाही आता.. !!) असेल पण मला एकदाही "मी त्या प्रज्ञाची वेणी कशी ओढली होती" किंवा "त्या वैभवला कसा बदाबदा बुकलला होता" ते आठवत नाहीये. हो माझ्या बालपणात चिंग्या आणि बंडे (एक तितली अनेक तितलीया, एक बंड्या अनेक बंडे) वगैरे नव्हते. होत्या त्या प्रज्ञा, विद्या, वर्षा, वैभव, नवीन, राजेश वगैरेच... अरे हो पावसाच्या आठवणींबद्दल बोलायचं होतं नाही का. आणि ही वेणीवाली प्रज्ञा आणि बुकललेला वैभव आपल्या वरच्या यादीत नव्हताच की. उगाच केव्हाही काहीही आठवतं आणि म्हणे नाशतालज्यिक (हे 'नाशतालज्यिक' हे 'सलाम नमस्ते'वाल्या 'एकझ्याकली' च्या तालात वाचावे.)
तर पुष्पीच्या (नाही ही वर्षा, विद्या, प्रज्ञाच्या यादीतली माझी मैत्रीण नाही हे औषधाचं नाव आहे. मगाशी सांगितलं नाही का. ज्यांना आठवत नाहीये त्यांनी पुष्पी घ्यावी) कृपेने किंवा जी कोणी असेल तिच्या कृपेने मी मागे जात जात जात जिथे जाऊन धाडकन आपटतो (आणि डोक्याला टेंगुळ येतं वगैरे वगैरे) ती आठवण म्हणजे नावांची, होड्यांची (दोन्ही एकच हो पण एक नाशतालज्यिक आणि दुसरं ना-नाशतालज्यिक.. आठवत नसेल तर आता मात्र नक्की पुष्पी घ्याच), डबक्यांची किंवा टेंगुळांचीही नव्हे तर वेगळीच आहे. डोंबिवलीच्या रस्त्यांवरून चालताना गिरगावात घेतलेले आणि त्यामुळे गिरगावातले रस्ते आणि पावसाला अनुसरून बनवलेले सँडल्स वापरताना जो एक त्रास (म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला नसला तरी आमचंही बालपण हलाखीतच गेलंय. कळलं ना आता.. !!) होतो ना अगदी तसाच त्रास व्हायचा चालताना. ती चिखलाची चिकचिक, सगळीकडे साठलेलं पाणी सगळा नुसता किचकिचाट. (कुठे गेले रे सगळे पाऊस आवडतो म्हणणारे.). जाम वैताग यायचा ते पाण्याने, चिखलाने बरबटलेले सँडल्स घालून चालताना. पण माझ्या आई-बाबांच्या दृष्टीने मी अजून (म्हणजे तेव्हा) मोठा झालेलो नसल्याने मला गमबूट मिळणार नव्हते. (खरं तर याचा उच्चार 'गं बूट' असा असल्याने लिहितानाही 'गंबूट' असं लिहिलं पाहिजे. परंतु 'गंबूट' म्हणजे ते तंबूत बिंबूत असं काहीतरी विचित्र वाटतंय. त्यामुळे गमबूट असंच लिहितोय. परंतु लिखाण अधिक परिणामकारक वाटण्यासाठी तुम्ही 'गंबूट' असंच वाचा.) त्यामुळे मला वाटतं डोंबिवलीतले पहिले दोन पावसाळे मी त्या बरबट सँडल्सच्या साथीने काढले. त्यानंतर दोन वर्षांनी मी मोठा झाल्यावर म्हणजे गमबूट घेण्याइतका मोठा झाल्यावर त्या वर्षी मी पावसाची जेवढी वाट बघितली असेल तेवढी (अजून अजून मोठा झाल्यावर) दोघांनी एका छत्रीत चालायला मिळावं म्हणून पडाव्याश्या वाटणार्या पावसाचीही बघितली नसेल. बरं अतिशयोक्ती सोडून द्या. दुसरी उपमा सुचली नाही, आठवली नाही (पुष्पीनी, येना येना येना) म्हणून ही वापरली. थोडक्यात जाम लय भारी वाट बघितली होती त्यावर्षी. आणि ज्याप्रमाणे आकाशात चार काळे ढग जमा झाले की हार्बरच्या गाड्या बंद पडतात त्याप्रमाणे त्यावर्षीचे काळे ढग जमा झाल्यावर पहिला पाऊस पडण्याआधीच मी माझे सँडल्स बंद पडले असल्याचं आपलं खराब झाले असल्याचं आणि मला गमबूट(च) हवे असल्याचं घरात जाहीर केलं. काही झालं तरी त्या जुन्या, उष्ट्या सँडल्सनी मी यावर्षी पहिल्या पावसाला सामोरा जाणार नव्हतो. माझ्या गमबूटच्या मागणीला घरात मान्यताही मिळाली. झालं.. अचानक मला पावसाळा आवडायला लागला होता. निदान गमबूट मिळेपर्यंत तरी. जसा शुगरबॉक्सनंतर (आणि लग्नाच्या आधीपर्यंत) नवरा आवडायला लागतो ना मुलींना अगदी तसंच. (मुलींनो, हलकं घ्या. मुलांनो, अज्याबात कायपण हलकं नाय यात). तर बघता बघता तो सुवर्णदिन, प्लॅटिनम-क्षण माझ्या आयुष्यात उगवला. अगदी पहिला पाऊस पडायच्या आधी. त्यादिवशी संध्याकाळी दुकानात जाऊन आम्ही ते काळेभोर, मऊशार, देखणे, उत्तम, टिकाऊ गमबूट घेतले आणि दुसर्या क्षणीच मी ते पायात चढवले सुद्धा. आणि काय सांगू तो अनुभव अहाहा. दुकानातून घरी येताना सगळेजण माझ्याकडे आणि माझ्या गमबुटांकडेच बघताहेत असं वाटत होतं मला. अगदी पाडगांवकर बोलगाणीमध्ये म्हणतात ना तसंच.
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
हवं तर सिंहासारखं नको छाव्यासारखं म्हणू. म्हणजे लहान सिंह ना म्हणून छावा बाकी काही नाही. (तुम्हाला वाटतंय त्या अर्थी 'छावा' मी नंतर झालो. पण ते आत्ता नको. त्याच्याविषयी नंतर कधीतरी)
पण लोकांनी माझ्याकडे आदराने (मला तेव्हा आदराने वाटलं होतं पण खरं तर त्यांचं बघणं विचित्र या अर्थी होतं) बघण्याचं कारण वेगळंच होतं. आणि आमच्या मातोश्रींनी ते चटकन ओळखलं होतं. घरी आल्यावर, वीज कडाडावी तशा त्या कडाडल्या (आजची म्हण : पावसाळी लेखात विजेची उपमा) "असा लंगडत का चालत होतास ??". "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी" या म्हणीचा (सॉरी. या म्हणीशी तादात्म्य सांगणारी पावसाळी म्हण तयार करता आली नाही. त्यामुळे वरिजिनलच वापरतो आहे. शेवटी जुनं ते सोनं) अनुभव मला क्षणार्धात आला. "असा लंगडत का चालत होतास? चावले की काय नवीन बूट?" वीज पुन्हा कडाडली. ते गमबूट घालून दुकानातून पहिलं पाऊल बाहेर टाकल्यापासून ते थेट आत्तापर्यंत जो मी कळवळत चालत होतो ना तो सगळा त्रास, तो राग, बूट खसकन पायातून ओढून बाहेर काढून टाकला. बूट आणि राग दोन्हीही. बघतो तर दोन्ही पायांवर टाच आणि पोटरीच्या मध्ये जो एक असा बाहेर आलेला भाग असतो ना (काय म्हणतात त्याला मराठीत किंवा कुठल्याही भाषेत देव जाणे. तूर्तास आपण 'गमबूट चावण्याची जागा' असं म्हणू) तो अस्सा लाललाल झाला होता. 'गमबूट चावण्याची जागा' वर्णनातून कळली नसेल(च) तर त्यासाठी गुग्ल्याकडून हे चित्र उधार घेतलंय. त्यात ते खाली सर्वात शेवटच्या बाणाने जी जागा दाखवली आहे ना तिला (आमच्यात) 'गमबूट चावण्याची जागा' असे म्हणतात.
तर दोन्ही पायांवरच्या त्या 'गमबूट चावण्याच्या जागा' (एकूण चार. पाय नव्हे जागा.) एकदम लाल झाल्या होत्या. रबर घासून घासून, हुळहुळल्याने थोडी जखम झाल्यासारखीही झाली होती. मग त्यांना त्या बँडेड नामक चिकटपट्ट्या लावण्याचे कार्यक्रम झाले. पायात मोजे घालून त्यावर गमबूट घालण्याच्या सूचना मिळाल्या. अर्थात चावणं, दुखणं मात्र काही कमी झालं नाही. गमबूटवरचं प्रेम मात्र क्षणात ओसरलं. आणि पाऊस तर अजूनच नकोसा झाला तेव्हापासून. त्यानंतर ते पाऊस पडल्यावर मोजे ओले झाल्याने पाय चिकट होणे वगैरे प्रकार सुरु झाले. कालांतराने ते बूट चावणं प्रकरण कमी झालं नसलं तरी कदाचित त्या चावण्याची सवय झाल्याने काही विशेष वाटेनासं झालं असावं. (इतर कित्येक चावर्या गोष्टीं नाही का सहन करत आपण. त्यातलीच ही एक).
हे दुखरे पण सवयीचे झालेले बूट घालून असाच एकदा शाळेत मधल्या सुट्टीत खेळत होतो. शाळेत काहीतरी बांधकाम चालू होतं त्यामुळे मैदानात रेतीचा मोठ्ठा ढीग रचून ठेवलेला होता. सगळ्या कार्ट्यांच्या (मी सोडून) काय मनात आलं देव जाणे पण अचानक सगळेजण त्या ढिगाच्या दिशेने धावायला लागले आणि एकदम त्या ढिगावर उड्या मारायला लागले. अर्थात मीही त्यातलंच एक कार्ट असल्याने (च्यायला कबुल करावंच लागलं शेवटी.. अरेरे.) मीही धावत सुटलो आणि एकदम इश्टायलीत त्या ढिगावर एकदम लॉंग जंप, हाय जंप मारली. सगळी रेती शर्टवर, चेहर्यावर उडाली. अर्थात त्याचं मुळीच दु:ख नव्हतं. पण उठून उभा राहिलो, पाहिलं पाऊल टाकलं आणि एकदम सार्या जगाचं दु:ख, वेदना, यातना, त्रास, छळ, संकटं जणु माझ्याच शिरी ठेवल्यासारखा माझा चेहरा झाला. आधीच त्या 'गमबूट चावण्याच्या जागा' छळत होत्या ते दु:ख कमी होतं की काय म्हणून चढत्या भाजणीने अजून दु:ख उर्फ रेती बुटात भरली गेली आणि अक्षरशः एकही पाऊल टाकवेना. पाय उचलून खाली टेकवला की त्या एक-दीड सेकंदात असंख्य टोकदार, धारदार बाणांनी, तलवारींनी, भल्यांनी वार करावेत तसे त्या ओल्या, टणक, खरखरीत वाळूचे हल्ले पावलावर होत होते. कळवळत कळवळत हळूहळू दोन्ही बूट पायातून काढले तर पायाची अवस्था बघवत नव्हती. बूट नळाखाली धरून आत चिकटलेली रेती काढून टाकण्याचा सुपर-व्यर्थ प्रयत्न करून झाला. शेवटी घरी येताना अक्षरशः अनवाणी पायाने (हो त्याच त्या डबक्यांनी आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून) चालत घरी यायची पाळी आली. त्यादिवसापासून आयुष्यात कधीही गमबुटांचं नावही काढलं नाही......
तर आपटून टेंगुळ येण्याएवढं मागे गेल्यावर मला आठवतात ते पावसाचे अनुभव असेच भयंकर गंबुटी आहेत त्यामुळे टेंगळाच्या थोडं अलिकडे थांबायचं ठरवलं. पण तरी तिकडेही पावसाचा असाच एक निसरडा प्रसंग आठवतो. फुटबॉलच्या वर्ल्डकपवाला कुठलातरी एक पावसाळा होता. जास्त तपशीलात जात नाही कारण कुठला ते एक तर मला मला आठवत नाहीये आणि दुसरं म्हणजे ते आपल्या या प्रसंगाशी विशेष संबंधितही नाहीये. तर "फुटबॉल वर्ल्डकप चालू असताना फुटबॉल न खेळता क्रिकेट किंवा इतर काहीही खेळणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे" या आम्हीच तयार केलेल्या नियमाच्या आधारे दररोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर आमचं जोरदार फुटबॉल खेळणं चालू होतं. पण हळूहळू पाऊस खूप वाढायला लागला इतका की आमच्या फुटबॉल ग्राउंडची फुलटू वाट लागली होती (हो. माझ्या लहानपणी भरपूर पाऊस पडायचा हे मला नक्की आठवतंय. थांकु पुष्पिनी). पण काहीही होवो आणि कोणीही असो नियम तो नियम त्यामुळे आम्ही तो नियम इमानेइतबारे आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर पाळायला सुरुवात केली. आणि पाऊस पडत असेल तर न थांबता उलट "पावसात फुटबॉल खेळताना उलट अजूनच मजा येते "असं म्हणून आणि एकमेकांना समजावत, सांभाळत (पक्षि दुसर्या पार्टीतल्या पोरांना ढकलत) आम्ही अजून उत्साहाने खेळायला लागलो. पण क्ले कोर्टची सर सिमेंट कोर्ट किंवा तुटक्या-चिपा कोर्टला कशी येणार म्हणा. त्यात डोक्यावर पाऊस. त्यामुळे दणादण धडपडणं, घसरणं, आपटणं हे प्रकार नियमित होऊ लागले. पण तरीही त्याचंही काही वाटायचं नाही. पण त्या दिवशीपर्यंतच. त्या दिवशी आमच्यातलाच एक दादा मुलगा (म्हणजे 'भाई' वाला नाही 'वयाने मोठा' वाला) जोरदार आपटला आणि तेही डोक्यावर. क्षणभर आम्ही सगळे एकदम सुन्न. २ मिनिटांनी तो उठून बसला आणि मनमोहन देसाई किंवा यश चोपडाच्या चित्रपटातले कॅरॅक्टर अॅक्टर्स ज्या थंडपणे म्हणतात अगदी त्याच थंडपणे "मै कहां हुं" चं मराठी व्हर्जन वदता झाला "काय झालंय मला?". आमची तर बोबडीच वळली. थोड्या वेळाने इतर दादा लोकांनी त्याला जरा सावकाश उठवून बसवलं. पाणीबिणी पाजलं आणि हळूहळू त्याला माणसांत आणलं.
तर टेंगळाच्या असं विरुद्ध दिशेने चालत चालत येताना असे बरेच बोचरे, टोचरे, निसरडे, धडपडे, भिजवे, चिखले, चिकटे, कपडे-खराब-करे, पाणी-उडवे, छत्री-उलटे, छत्री-विसरे, विंचीटर-हरवे, ट्रेक-कोरडे, कॉलेजात/हापिसात-पोचल्यावर-ट्रेन-बंद-पडे, बिन-लाईटे, घरभर-पाणी-भरे असे अनेकानेक अनुभव आहेत. पण सगळे देत बसलो तर कंटाळून तुम्ही त्या वरच्या 'X' च्या खुणेवर टिचकी माराल. म्हणून फक्त ओझरतं सांगितलं. आता सांगा मला का बरं आवडावा पाऊस एखाद्याला? सांगा.. !! एक तरी कारण द्या. पण नाही. त्या पावसाच्या भीतीने कोणी काही बोलत नाही. जसं "शेर कळत नाहीत" किंवा "गझला आवडत नाहीत" म्हंटल्यावर जसा एक तुच्छ कटाक्ष नशिबी येतो त्याप्रमाणे "मला पाऊस आवडत नाही" म्हंटल्यावर त्या तु.क. ची सर धावून येते. त्यामुळे शेवटी ते तु.क. चुकवण्यासाठी (आम्हालाही माणूस म्हणून जगू द्या !!! ;) ) शेवटी 'पाऊस आवडण्याची' मी एक माझ्यापुरतीच नियमावली काढली. मागे मैथिलीच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना ती नियमावली लिहिली होतीच. अर्थात त्यात सगळे नियम कव्हर झाले नव्हते कदाचित. तीच नियमावली अजून थोडे नियम वाढवून इकडे देतो.
१. रात्री ११ ते सकाळी ६ मधेच पडावा. : उगाच दिवसा लुडबुड नको. गाड्या लेट होतात, रस्त्यावर पाणी साठतं, चिखल होतो, छत्र्या उडतात/हरवतात.
२. सगळ्या शेतांवर आणि धरणांवर जोरदार बरसावा. कधीही आणि कुठल्याही वेळी चालेल. आमची काही ना नाही. परंतु उगाच रस्त्यांवर पडून चिखल व्हायला नको. : "अरे पाऊस पाडला नाही तर आपण खाणार काय? शेती होणार नाही, धरणांत पाणी साठणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही" असा उपदेश माँसाहेबांकडून लहानपणी मिळाल्यावर या नियमाची निर्मिती केली गेली.
३. ट्रेकला गेलो असलो की दिवसभर नॉनस्टॉप पडावा. : स्पष्टीकरणाची गरज नाही.
४. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकेकदा इतका पडावा की गाड्या बंद पडतील. : तेवढीच मस्त सुट्टी. कारण आयत्या वेळी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी मिळालेल्या/घेतलेल्या सुट्टीची मजा 'प्लान्ड लिव्ह' मध्ये नाही.
५. वरच्या अटीतला पाऊस सोमवारीच पडावा. किंवा फार तर शुक्रवारी. : लॉंग वीकांत !! तुका म्हणे त्यातल्या त्यात..
तळटीप : लेखात दिलेली सर्व मतं ही लेखकाची लेख लिहीत असतानाच्या मानसिक अवस्थेतील मते आहेत आणि त्या सर्व मतांशी लेखक आत्ता म्हणजे लेख लिहून झाल्यावर सहमत असेलच असे नाही याची कृपया नोंद घ्यावी. परंतु काहीही झाले तरीही लेखकाला पाऊस आवडत नाही (उन्हाळ्यात सोडून) हे मात्र नक्की. !!!
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
तुझे सुरवातीचे बुटांचे वर्णन वाचत असतांना खरच खूप त्रास झाला।नाही खरच ती जखम एमएलए झालीये अस वाटत होत.तरी बर शेवट चांगला केलास नाहीतर सुरवातीला बूट चावण्याचे व ते रेतीचे वर्णन भयानक.एक नक्की तु वेदना खूपच प्रवीपणे मांडू शकतोस .बाकी लेख खूप झक्कास(वेदनदायी)जमलाय.अन हो पावूस आवडत नसला तरी तु पावसाळी विशेष अंकात केलेली कविता खूपच भावली रे.
ReplyDeleteतुझे सुरवातीचे बुटांचे वर्णन वाचत असतांना खरच खूप त्रास झाला.नाही खरच ती जखम मला झालीये अस वाटत होत.तरी बर शेवट चांगला केलास नाहीतर सुरवातीला बूट चावण्याचे व ते रेतीचे वर्णन भयानक.एक नक्की तु वेदना खूपच पप्रभावीपणे मांडू शकतोस .बाकी लेख खूप झक्कास(वेदनादायी)जमलाय.अन हो पावूस आवडत नसला तरी तु पावसाळी विशेष अंकात केलेली कविता खूपच भावली रे.
ReplyDeleteJUNE 17, 2010 6:48 PM
चला, गाडी पुन्हा रुळावर आली म्हणायची...कसला सुटलायस रे तू या पोस्टमध्ये....पण याच विषयावरची म्हन्जे पावसाळी पायताण तर माझी मागच्या पावसाळ्यातली चप्पल(http://majhiyamana.blogspot.com/2009/06/blog-post_24.html) आहे तीपण वाच...असो...(काहीतरीच काय उगाच कुठेही काहीही लिहायचं मी पण नं......)
ReplyDeleteए उगाच बुटाचं निमित्त काढुन आवडणार्या पावसाला नावडतं का म्हणालास त्ये अजाबात कळलं नाही..पण लेख एकदम ढासु नेहमीसारखाच....आणि काय रे सिटीत सारखाच येणारा पाऊस असतो नं तिथे तेव्हा काय करतोस ते पण लिही की एकदा.....:)
आभार सागर. अरे वेदनादायी वगैरे काही नाही रे. मी कम्प्लीट इनोदी लिहायचं या एका हेतूनेच सगळं टंकत गेलो. वेदनादायी वाटत असेल तर मग लेख फसला रे :( .. ;) .. अर्थात सगळे प्रसंग हे प्रत्यक्षात घडलेले आहेत. मी जरा त्यांना वाईस इनोदाची फोडणी दिली. बास..
ReplyDeleteहो पावसाळी विशेषांकातली कविता मात्र नक्की वेदनादायी आहे थोडी..
हा हा .. आल्यासारखी वाटतेय तरी.. बघू.. अजून सलग ४-५ पोस्ट्स कुरकुर न् करता/होता आल्या तर मग नक्की आली असं म्हणायचं.
ReplyDeleteजरा सुटासुटी झालीये खरी .. अर्थातच मुद्दामच केलीये ;)
तुझी पोस्ट वाचतो आता..
अग मला पाऊस खरंच अजिबात आवडत नाही. आणि आवडत असला तरी सगळ्या अटी अप्लाय करून :) आभार..
ह्म्म्म.. सिटीतल्या पावसाबद्दलही लिहून टाकतो काहीतरी लवकर.. पण जमायला हवं.. बघू.
शेम टू शेम ...
ReplyDeleteगंबुटाचा अनुभव न घेताही मी हेच म्हणतो, पाऊस मला केवळ कंडिशनल आवडतो...
>> फुटबॉल वर्ल्डकप चालू असताना फुटबॉल न खेळता क्रिकेट किंवा इतर काहीही खेळणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे
हे मस्तंच....
आणि हो, बर्याच गॅप नंतर लिहायला सुरुवात केली ते बरं केलंस....आता कसं नॉर्मल वाटतंय..(हे तुझंही स्वगत असावं)
ReplyDeleteहे..हे..हे...एकदम भन्नाट झालाय....मस्त रे!!
ReplyDeleteहा हा आनंद. धन्स.. चला.. पाऊस कंडिशनल आवडणारा अजून एक भेटला तर :)
ReplyDeleteआणि तुझं प्रकट आणि माझं स्वगत हे १०१% सेम आहे. D
धन्यु योगेश. बर्याच दिवसांनी तुझी प्रतिक्रिया बघून एकदम मस्त वाटलं. :)
ReplyDeleteBhannat yekdam !!!!
ReplyDeleteमस्त रे.
ReplyDeleteआपल्याला पण पाऊस काही अटीवर आवडतो.
जसा की मुबई-पुणे हायवे वरुन प्रवास कराताना जोरात धो-धो कोसळावा.
बाकी अटी तुझ्या नियमावली नुसार...
आणि पावसात भिजायला तर आजाबात आवडत नाही.
आलास एकदाचा ब्लॉगवर... आता कसं बर वाटतयं. :) जबरीच झालेयं गंबूट आख्यान आणि त्यांनी तुला चांगलेच तिंबूनही काढले की रे.तु.क.ही मस्तच. आजकाल त्यांच जरा पेवच फुटलया. बाकी डबक्यातल्या पाण्याने निरनिराळे रोग होतात या भितीने पाऊस ठरावीक वेळीच पडावा असे वाटते खरे.( मेली पावलागणिक डबकी. मग नाईलाज होतो.)तरीही मला पाऊस आवडतो.:)
ReplyDelete>>>कुठे गेले रे सगळे पाऊस आवडतो म्हणणारे... Aahot aahot aamhi ithech aahot...!!!
ReplyDeleteBarbatalele boot, Chavnaare Gumboot, itydi aamachyahi nashibi aale hote..pan aamhala Unconditionally pawasala aawadat aslyane hya goshti aamhi nimut swikaralya aahet...!!! :) (Aani atta tyahi aawadayala lagalya aahet...)
Aso, majhya blog khali mhatalya pramane tujhya sagalyachya sagalya ati mi aai mule lahan pana pasun aikate aahe... Tevha pasun aajata gayat majhe aani tiche hya vishaya war ateev matbhed hotat...So, ithe te hvayala nakot...mhanun aatapate ghete... ;)
Talteep : Kahihi jhale tari Pratikriya lihinarila Paaus aawadato ( kadhihi, kuthehi aani kasahi) He matr nakki... :D
Arre ho post lay bharii he sangayache rahilech ki paaus premat... :)
पाऊस सर्वांना (पहिला पाऊस एक वेगळीच मज्जा ) रेन बूट ची कथा आवडली ,सुंदर
ReplyDelete>>>कुठे गेले रे सगळे पाऊस आवडतो म्हणणारे :)
ReplyDeleteमी आहे की (हात वर करून)...पाउस आवडतो म्हणजे आवडायला लागला जेव्हा मी स्वत: पावसात पाण्यात पचाक पचाक आवाज करत जायचो, आमच्या क्लासची आवडती वर्षा आणि अक्सा सहल ह्याच पावसात..कॉलेजमध्ये फेस्टिवल्स आणि ट्रेकची सुरूवात...आआहाहा काय मस्त वाटायाच सांगू. आणि टपरीवरचा वाफळलेला चहा ओल्या अंगाने पिणे हे स्वर्गसुख आणि त्यात भजी किवा वडे मिळाले की दुग्धशर्करा योग..बाकी एवढ्या मोठ्या पॉज़ नंतर परत त्याच हेरंबला बघून अत्यानंद झाला (देव काका नाही बर..मनापासून आनंद झाला)...लिहते रहा
पोस्ट कशी गंबूटप्रमाणे मोठी आणि गरगरीत झालीय. मला पण गंबूटचे आकर्षण होते पण ते घालण्याचा योग आजपर्यंत आला नाही. आत्ता कुणी दिले तरी घालणार नाही ;-)
ReplyDeleteपावसाच्या नियमावलीला पूर्ण अनुमोदन. चहा आणि कांदा भजी नसेल तर इतर वेळी पडणारा पाऊस मला तितका आवडत नाही. घरातले सगळे सध्याकाळी घरी परत आले की पुन्हा सकाळी बाहेर पडेपर्यंत मला पाऊस हवाहवासा वाटतो ;-)
धन्स माऊ.. :)
ReplyDeleteसचिन, वेलकम टू द क्लब. कंडिशनल पाऊस लव्हर्सचा काउंट एकने वाढला :) .. मलाही फक्त ट्रेकलाच पावसात भिजायला आवडतं.
ReplyDeleteधन्स श्रीताई.. :) आलो आलो..
ReplyDeleteअगदी अगदी. गमबूटांनी चांगली कणिक तिंबली आहे माझी.
तु.क. ची सवय झालीये म्हणा. पाऊस आवडत नाही म्हटलं की सगळीकडून एकदम तु.क.तु.क. ;)
अच्छा म्हणजे तू अनकंडिशनल पाऊस लव्हर आहेस तर :)
बापरे.. बरबटलेले बूट, चावणारे गमबूट इ इ इ असूनही पाऊस आवडतो म्हणजे खरी पाऊस भक्त आहेस तू :) .. तळटीप लिहिली नाहीस तरीही :)
ReplyDeleteपण आम्हाला 'निमूटपणे स्वीकारणं' हा प्रकार जमायला जरा अवघड जातो ना म्हणून तर..
चला. काकू आमच्या बाजूच्या आहेत.. कंडिशनल मध्ये अजून एक भर :)
तू पाऊसप्रेमी असूनही पोस्ट आवडली हेच खूप आहे ;)
आभार काका.
ReplyDeleteधन्स सुहास.. मला पण सगळ्या सहली, ट्रिप्स, ट्रेक्सना पाऊस आवडतोच पण परत आल्यावर एक थेंबही पडायला नको :)
ReplyDeleteपॉज संपलाय असं वाटतंय तरी.. बघू.. :)
अरे ब-याच दिवसांनी लिहिल्याने साठलेलं सगळं एकाच पोस्टमध्ये उतरलं.. गमबूट घालायचा योग आला नाही म्हणजे नशीबवान आहेस खरा. खरंच यार आपले नियम आणि अटी पाळून पाऊस पाडला असता तर काय धमाल आली असती.
ReplyDeleteहेरंब,ते गमबुट प्रकरण आम्हीही अनुभवलेल आहे.पण तरीही पाउस आपल्याला एकदम अनकंडीशनल आवडतो.त्यामुळे पाउस न आवडणारया तुझ्या हया पोस्टला माझा (एका पाउसवेड्याचा) तीव्र निषेध... :)
ReplyDeleteबाकी काहीही असो तुझी वटवट अशीच चालु राहुन दे... :)
हा हा ..तरीच म्हंटलं कोणी अजून निषेधाचे फलक गाडले कसे नाहीत ;)
ReplyDeleteनिषेध तर निषेध पण आप्पूनको पाऊस कंडिशनलच आवडता है !!
आपल्याला एकदम अनकंडीशनल आवडतो.त्यामुळे पाउस न आवडणारया तुझ्या हया पोस्टला माझा (एका अजुन पाउसवेड्याचा) तीव्र निषेध... :)
ReplyDeleteहा हा .. निषेध फलक क्रमांक २... !!
ReplyDeleteनिषेध तर निषेध पण आप्पूनको पाऊस कंडिशनलच आवडता है !! :P
चला, पहिला पाउस पडल्यानंतर दुर होते त्याप्रमाणे तुझ्या ब्लॉगवरची मरगळ एकदाची दुर झाली :-) पाउस न आवडणाऱ्या गटात माझाही समावेश आहे. नियमावलीशी १००% सहमत! अरे हो, "गमबूट चावण्याच्या जागेला" मराठीत "पायाचा घोटा" असं म्हणतात. एका वाक्याचं स्पष्टीकरण हवं होतं>>> "इतर कित्येक चावर्या गोष्टीं नाही का सहन करत आपण. त्यातलीच ही एक" ह्या गोटात नक्की कोण कोण मोडतं? ;-)
ReplyDeleteआख्यान भारी.... मला सर्वात जास्त ती तळटीप आवडली.... हा हा हा.... आता तू कधीही अगदी ह्याच्या विरुध्द पोस्ट टाकायला मोकळा! :-)
ReplyDeleteHeramb,
ReplyDeleteHya vayat paus avadat nahi mhanaje kaay? Amha Marathwadyatalya lokanana pausach baghayala bhetat nahi jasti.. khupach musaldhar paus aala tar nadichya (khar mhanaje nalach)budashi panee yete. Tya mule paus kasahi, kuthehi, kiti hi padala tari khup aawadato.
Paus n avadylabaddal Tivra Nishedh... aani anek tu.k.(Tucch Kataksh)
Baaki blog mast jamlay..Aata avadnarya Pavsavarach (Shevatchya taltipi pramane) ekhada blog houn jau det..
Dinesh
चला, गमबूट मागाणाऱ्या माझ्या मुलाला तुझी गोष्ट सांगतो!
ReplyDeleteबाकी मलाही लहानपणी असंच वाटायचं की पाउस फक्त रात्री का पडत नाही!
-निरंजन
हो.. मरगळ दूर झाल्यासारखी वाटतेय तरी. बघू कितपत सत्य आहे ते... !!
ReplyDeleteअरे वा. तूही कंडीशनल लव्हर तर :)
अरे तो घोटा नाही. घोटा म्हणजे माझ्या मते तळपायाचा बोटांच्या पुढचा भाग..
अरे आणि चावर्या गोष्टींची प्रत्येकाची यादी स्वतंत्र.. तरीही अनेक गोष्टी कॉमन आहेतच.. मागच्या एका पोस्टवर किती चावाचावी झाली होती आठवतंय ना? ;)
आभार अरुंधती.. अगदी बरोबर पण शू SS.. हळू बोल.. ;) ब्लॉगच्या भिंतींनाही कान असतात ;)
ReplyDeleteहा हा .. आभार दिनेश.. या वयात म्हणजे? मी इतका काही तरुण राहिलेलो नाही आता (अर्थात अगदी म्हातारा झालेलो नसलो तरी ;) ) .. आणि खरं तर कुठल्याच वयात मला पाऊस आवडला नाही. ट्रेकिंग सोडून :)
ReplyDeleteमला वाटतं मराठवाड्यात पाऊस कमी असल्याने तुम्हाला तो आवडत असेल. पण मुंबईतल्या चिकचिक, चिखल, गाड्या लेट होणं, पाणी साठणं या आणि अशा सगळ्या प्रकारांमुळे कित्येकांना रोजच्या आयुष्यात पाऊस नकोसाच वाटतो..
आवडणा-या पावसाबद्दल .... म्म्म्म.. बघुया लवकरच काहीतरी..
अरे नक्की. ही गोष्ट वाचून तो आयुष्यात कधीच गमबुटांसाठी हट्ट करणार नाही ;)
ReplyDeleteचला म्हणजे तुही कंडीशनलवालाच दिसतोयस.. गुड गुड.
गमबुटासाठी नाही , पण भिजलेले सौंदर्य न्याहाळायला पावसाळा खूप आवडायचा. त्या साठी मुद्दाम पावसात फिरायला जायचॊ. :)
ReplyDeleteमी पाऊस फॅनक्लब वाला आहे. पण जेव्हा अंगाशी येतं(२६ जुलै) तेव्हा मात्र गपगुमान.
ReplyDeleteबाकी नॉस्टॅल्जिया वगैरे एकदम पटलं...
धन्स बाबा.. म्हणजे तसं म्हंटलं तर तूही पार्शियली कंडिशनल वालाच ;)
ReplyDeleteहो... अरे असे नॉस्टॅल्जिये बर्याच वेळा बघितले आणि म्हंटलं आपला तर काहीच नॉस्टॅल्जिया नाही.. म्हणून काहीतरी खरडून टाकलं. ;)
आईशपथ! मी पण अशी बरीच धडपडले आहे पावसात. प्रत्येक वेळेस मला पावसाळी चप्पल लागायची आणि पुढचे पंधरा दिवस त्याच्यावर बॅन्ड एड लावून तिरका पाय टाकत चालावं लागायचं. मला पाऊस फक्त पहिला आठवडा आवडतो.
ReplyDeleteहा हा.. घर घर की कहाणी आहे थोडक्यात. कोणी सांगतं, कोणी नाही आणि कोणाला कोणाला कितीही धडपडलं तरीही आवडत राहतो असा हा पावसाळा :)
ReplyDelete>>मला पाऊस फक्त पहिला आठवडा आवडतो.<<
ही सगळ्यांत युनिक कंडीशन आहे :)
Aaj firse vachya.maja aaya :)
ReplyDeleteहाहाहा.. धन्स सागरा.
ReplyDelete