Sunday, June 20, 2010

चौ-किडे !!

संताप झाला होता नुसता. त्या तिरीमिरीतच घरी गेलो. कपाटातला खण उघडून ती छोटीशी डबी बाहेर काढली आणि टेबलावर ठेवली. त्यातून ते चार किडे बाहेर काढले आणि टेबलावर ठेवले. रागारागाने चौघांकडे बघत होतो. डोळे आग ओकत होते.

"पुन्हा एकदा जिंकलात तुम्ही"
ते शांतच होते. चेहर्‍यावर एक छद्मी विजयी हास्य होतं.

जमेल तेवढी आग डोळ्यातून ओकत पहिल्या किड्यावर खेकसलो.

"१५००० लोकांचा खून, २६ वर्षांचा लढा आणि त्याची शिक्षा १ लाख रुपडे दंड आणि २ वर्षं कैद? अरे शिक्षा होती की बक्षीशी ? हे असे हजारो माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्ह्याचे खटले २६-२६ वर्षं चालवता कसे तुम्ही लोक? आणि १ लाख रुपड्यांचा दंड? अरे त्या लोकांनी साधा खिसा झटकला तर तेवढे पैसे खाली पडतील. आणि तेवढा तुम्ही त्यांना दंड म्हणून लावता? आणि वर जामीनही? अशा गुन्ह्याला जामीन? अरे हा न्याय आहे की पैसे कमाईचं दुकान?"

त्या 'अन्यायालय' नावाच्या किड्याला माझं हे रूप अपेक्षित होतंच कारण त्याच्यासाठी ते नेहमीचं होतं. त्याने चेहर्‍यावर नेहमीचे निर्लज्ज भाव आणून बेशरम आवाजात बोलायला सुरुवात केली.

"हे बघ. उगाच आरडओरडा करू नकोस. एवढ्या मोठ्या खटल्याला २६ वर्षं लागणारच. त्यात काय एवढं? आणि त्यांच्यावर पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले होते त्या गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त शिक्षा ही २ वर्षंच आहे आणि दंडही तेवढाच आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या गुन्ह्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त शिक्षा मिळाली आहे. आणि तो गुन्हा जामीनपात्र आहेच. त्यामुळे त्यासाठी एवढा त्रागा करायची आवश्यकता नाही. बाकी हे कायदे, नियम असे का आणि या अशा कलमांचे गुन्हे आरोपींवर का लावले ते मला माहित नाही. ते तू याला विचारू शकतोस"... माझ्या सगळ्या मुद्यांचं, शंकांचं, प्रश्नांचं यथास्थित समाधान केल्याचा आव आणत त्याने उरलेले सगळे प्रश्न बाजूला उभ्या असलेल्या किड्याकडे वळते केले. मी पुन्हा त्याच प्रश्नांचा भडीमार करू नये म्हणून मला बोलायची संधीच न देता तो 'सरकाट' नावाचा किडा थेट बोलायला लागला.

"तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही पण तरीही मला ठाऊक आहे की जे मी केलं आहे तो योग्य आणि न्यायाला धरून होतं आणि आहे. खटला सुरु झाल्यावर त्या अँडरसनला मीच तर अमेरिकेतून इथे आणलं, त्याच्यावर खटला चालवला. अरे त्याला मोकळं सोडलं असतं तर अनर्थ झाला असता, लोकांनी कायदा हातात घेतला असता. त्याला ठार केलं असतं. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असती. त्यामुळे मी केलं ते योग्यच होतं. आणि तुला काय वाटतं त्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी होती? अरे ते शक्य नाही. आणि आता तर मुळीच शक्य नाही."

"आणि त्याचं कारण मी सांगतो." दुसर्‍या किड्याचं बोलणं संपतं ना संपतं तोच 'मानवाधिक्कार संघटना' नावाचा तिसरा किडा मध्ये लुडबुडला. "अँडरसनचं आता वय झालं आहे. त्यामुळे त्याचं वय, तब्येत वगैरे गोष्टी लक्षात घेता त्याच्यावर खटला चालवणं शक्य नाही. त्याला फाशीच काय कुठलीच शिक्षा करणं शक्य नाही. मानवाधिकाराच्या विरुद्ध आहे ते. आणि तसंही फाशीच्या शिक्षेला अनेक प्रगत देशात मान्यता नाही. एखाद्या व्यक्तीचा कायद्याने खून करायचा आपल्याला काय अधिकार तो आपल्याला कोणी दिला? त्याला मारल्याने ते मेलेले लोक परत येणार आहेत का?"

एव्हाना माझं डोकं गरगरायला लागलं होतं. तो सारा प्रकार असह्य होऊन मी दाणकन टेबलवर माझी मुठ आपटली.

"अरे तुम्ही किडेच. शेवटी किड्यांसारखाच विचार करणार. त्यात तुमची चूक नाही पण तरीही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय माझ्या जीवाची तगमग कमी होणार नाही. मला उत्तरं मिळालीच पाहिजेत.

१. एवढ्या महत्वाच्या खटल्याचा, ज्यात हजारो जीव अक्षरशः तडफडत तडफडत गेले, नवीन येणारे कित्येक जीव जन्मतःच अपंगत्व घेऊन आले, ज्या दुर्घटनेमुळे एक पिढीच्या पिढी करपली, पुसली गेली अशा खटल्याचा निकाल लागायला २६ वर्षं लागतात? का???????? फास्टट्रॅक कोर्ट किंवा असंच काही करून लवकर निकाल का लावला गेला नाही? की फास्टट्रॅक कोर्ट हे सुद्धा फक्त रंगीबेरंगी नाव असलेलं एक अन्यायालयच आहे?

२. एवढ्या भयानक गुन्ह्यांसाठी एवढी कमी शिक्षा असलेली पर्यायाने अयोग्य कलमं आरोपींवर कोणी लावली? त्यात कोणाचे हितसंबंध गुंतले होते?

३. त्या अँडरसनला जामीन मिळवून देऊन सरकारी गाडीतून चोख बंदोबस्तात सोडणार्‍या नेत्यांच्या घरचे किती जण भोपाळ वायूदुर्घटनेचे बळी आहेत? किती जणांनी तो त्रास, छळ, यातना, अपंगत्व या सगळ्याला तोंड दिलं आहे?

४. भोपाळच्या पाण्यातून, हवेतून, जमिनीतून, वार्‍यातून त्या विषाचा अंश पूर्णतः काढून टाकण्याची जवाबदारी तुम्ही कधी पार पाडणार आहात? तेवढंच तुमच्या महापापाचं थोडंसं प्रायश्चित.. उरलेल्या जगल्या वाचलेल्यांचा दुवा तरी घ्या निदान.

५. प्रगत देशांच्या सोयीस्कर गोष्टींचं अंधानुकरण करणार्‍या आणि त्याची टिमकी वारंवार वाजवणार्‍या किती लोकांना हे ठाऊक आहे की अशा घटना परदेशात घडतात तेव्हा आरोपींना ३०-४०-५० वर्षांच्या शिक्षा होतात, फाशी किंवा तत्सम शिक्षा नाकारणार्‍या, त्यांचा निषेध करणार्‍या किती लोकांनी आपले आप्तजन भोपाळ दुर्घटनेत किंवा एकूणच दुर्दैवी अशा बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले यांसारख्या घटनांमध्ये गमावले आहेत?

६. तुमचं कणभरही वैयक्तिक नुकसान झालेलं नसताना लोकांच्या भावनांची खिल्ली उडवून त्यांना कायदा आणि मानवाधिकाराचे डोस पाजण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले?

७. जे हजारो निरपराध लोक स्वतःचा काहीही दोष नसताना त्या भीषण वायुगळतीमुळे (किंवा भयानक बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले यांमुळे) मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांच्या मानवाधिकाराचं, त्यांच्या जगण्याच्या हक्काचं काय?

८. .......

----
--
----
---
---
--

१२ .......

-----

---
--
-
-
---
-
-

२५. ......

---
--
-
-
-

५७. .......

----
-
-
-
---
-

१०३. .......

----
---
-
--
-

२२१. .....
----
--
-
---
--

त्यानंतर असं बरंच बरंच बरंच काहीसं मी बोलत राहिलो, सांगत राहिलो, बडबडत राहिलो, माझी कैफियत मांडत राहिलो, मुद्दें सांगत राहिलो.... बर्‍याच वेळ !!! कारण यादी खूप मोठी होती.. मुद्दे, आरोप, प्रश्न अनेक होते. आणि सारेच अनुत्तरीत.. नेहमीसारखेच.. खूप वेळ अशी काहीशी बडबड करून झाल्यावर मी क्षणभर थांबलो. बघितलं तर ते चौघे शांतपणे उभे होते आणि गालातल्या गालात हसत होते. त्यांना काही फरक पडत नव्हता मी काय बोलतोय, काय सांगतोय, काय मागतोय, काय मांडतोय याच्याशी.. ते मुक्त होते. तृप्त होते. रक्त पिऊन पिऊन त्यांचे खिसे आणि पोटं भरलेली होती. 'जनता' नावाच्या एका क्षुद्र, तुच्छ, हलक्या जनावराच्या पोटतिडीकीने बोलण्याला त्यांच्या दृष्टीने एक निरर्थक, फालतू बडबड, अनाठायी केलेला त्रागा याउपर किंमत नव्हती. त्या बेशरम हास्यातून लोंबणारा क्षुद्र कोडगेपणा मला असह्य झाला. माझी उरली सुरली आशा संपुष्टात आली.

आणि संतापाने लाल होऊन, न राहवून त्या तिन्ही किड्यांना मी एका मागोमाग नखाने चिरडून  चिरडून टाकलं... आणि हो.... त्या अँडरसन नावाच्या चौथ्या किड्यालाही............

मागे अफझल गुरु, कसाब वगैरे वगैरे किड्यांना चिरडून टाकलं होतं ना तसंच. अगदी तसंच. नेहमीप्रमाणेच... !!!

अजून करू तरी काय शकणार होतो मी !!!!!!

** हा लेख या अशा भाषेत टाकू की नको याचा बराच विचार करत होतो. पण जर माझ्या भावना (कितीही कठोर असल्या तरीही) मला माझ्या ब्लॉगवर व्यक्त करता येणार नसतील तर ते ब्लॉगच्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करणारं ठरेल असं वाटलं. त्यामुळे त्या जशाच्या तशा मांडण्याचा प्रयत्न केला.

32 comments:

  1. यस्त्ववध्यवधे दोषः स वध्यस्यावधे स्मृतः।

    The sin in not killing a man who is worthy of death is considered to
    be the same as the sin in killing an innocent man.

    महाभारत(शान्तिपर्व)

    एखादा माणूस मृत्युदंडास पात्र असूनही जर राजा त्याला मृत्युदंडाची शिक्षा देवू शकत नसेल तर ते म्हणजे राजाने एका निरपराध माणसाला मृत्युदंड देण्यासारखे आहे.

    या न्यायाने भारतीय न्यायव्यवस्था आणि शासन हे निरपराध लोकांचे जीवच घेत आहेत. त्यांनाच मृत्युदंड देत आहेत.

    ReplyDelete
  2. भारतात लोकशाही, न्यायव्यवस्था या दोन वेश्या षंढ राजकारण्यांच्या लहरीवर नाचतात.
    माझ्या-तुमच्यासारखी सामान्य माणसे त्रागा करून घेतात.
    इथं दिवसा-ढवळ्या माणसं मारली जातात आणि हे लुच्चे कोर्टात काय झाटा सिध्द करतात?
    मला तर आश्चर्यच वाटतं हा निकाल देण्याची तरी काय गरज होती?
    जाऊ द्या ! डोकं भणभणतंय !

    ReplyDelete
  3. तुला बहुतेक मच्छर चावला नाही अजुन म्हणून तू नेहमी अशी चीडचीड करत असतोस. इथे जन्माला यायचे आणि जगायचे म्हणजे हिजडेगिरी अंगात मुरवून घ्यायला हवी.

    ReplyDelete
  4. आपण असेच त्रागा करून घेत मरणार. इतक्या लोकांच्या मरणाची व पुढच्या दोन पिढ्यांच्या बरबादीचा इतकाच दंड मिळणार तेव्हां होऊन जाऊ दे पुन्हा, वारंवार... असा खुला परवानाच मिळालाय की आता.

    ReplyDelete
  5. अपर्णा, तो श्लोक पूर्णतः पटला. आपल्या राजकारण्यांना आणि त्यांच्या नतद्रष्ट साथीदारांना तंतोतंत लागू होतो. हे लोकच या सर्व निरपराधांच्या हत्यांना कारणीभूत आहेत... पण .... !!!

    ReplyDelete
  6. खरंय यशवंत. आपण फक्त त्रागाच करू शकणार..

    इतका विक्षिप्त निकाल आणि वर हे लोक त्याचं समर्थन करतायत. ते पाहून तर जीव घ्यावासा वाटला त्यांचा.. असो..

    ReplyDelete
  7. न्यायमूर्ती आपली त्रागा आम्हाला कळते आहे... आपल्यासारखे विचार करणारे खुर्चीच्या त्याबाजुस का नसतात ते समजत नाही... की त्या बाजुस गेले की ते सुद्धा बदलतात??? मी जाहीरपणे न्याय प्रणालीचा निषेध करतोय... (त्याने काय होतय??? काय मोठे उखाड़णार आहेस निषेध करून)

    कौटिल्य म्हणतो की... राज्याचे न्यायाने परिमालन राजाने केले नाही तर राजाची हत्या करण्याचा पूर्ण नैतिक हक्क जनतेला आहे... राजा म्हणजे बोकड.. त्याने चमड़ी द्यावी, मांस द्यावे आणि गरज असेल तेंव्हा जीव देखील... लोकशाहीमध्ये मात्र जनतेचाच बोकड झाला आहे... किंबहुना केला गेला आहे. प्रत्येक गोष्टीचे जितके चांगले तितकेच वाईट पैलू असतात. लोकशाहीचे चांगले पैलू संपलेत किंवा वापरून झालेत आता जे काही वाईट आहे ते येतय समोर... न्यायव्यवस्था आणि सत्ताप्रणाली बदल करण्याची नितांत अवश्क्यता आहे आता नाहीतर आपला देश पुन्हा ...........

    ReplyDelete
  8. सिद्धार्थ, असे प्रकार सहन करत राहिलो तर त्या लोकांत आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही. खूप अवघड आहे पण काहीतरी केलं पाहिजे !!

    ReplyDelete
  9. >> असा खुला परवानाच मिळालाय की आता.<<

    खरंय श्रीताई.. आणि हे तर भीषण आहे. कारण आता पुढे कुठल्याही निकालाच्या वेळी या निकालाचा आधार घेतला जाईल आणि मोठ्यात मोठ्या गुन्ह्याला कमीत कमी शिक्षा ठोठावून सगळं मॅनेज केलं जाईल. हे थांबलं पाहिजे. बदललं पाहिजे...

    ReplyDelete
  10. रोहणा, खुर्चीवर बसलं की प्रत्येक गुन्ह्याला जास्तीत जास्त कठीण शिक्षा देऊन योग्य न्याय करणं अपेक्षित असतं परंतु प्रत्यक्षात राजरोसपणे याच्या अगदी उलट घडताना पहावं लागतं. मोठ्यात मोठ्या गुन्ह्याला लहानात लहान शिक्षा असा काहीसा प्रकार चालू आहे..

    >> लोकशाहीचे चांगले पैलू संपलेत किंवा वापरून झालेत आता जे काही वाईट आहे ते येतय समोर...<<

    हे पूर्णपणे पटलं. लोकशाहीचे फक्त वाईट आणि अधिकाधिक वाईटच पैलू दिसताहेत. चांगले पैलू पार गायब झालेत..

    ReplyDelete
  11. These kind of problems can't be tackled by the law which was imposed on us centuries ago, mainly to oppress us. Events in recent and not so recent past demands for a deep sense of nationalism. We need to get our pride back. Good article though. Very articulate.

    ReplyDelete
  12. खरोखर खूप भयानक आहे हे सगळ........मॅझिनी म्हणतो तेच खरय "जे राष्ट्र देशातील लोकांना..त्यांच्या भावनांना..हक्कांना..ओळखू शकत नाही त्या राष्ट्राला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घेण्याचा कसलाच अधिकार नाही.." आणि माझ्या मते आपण गुलामगिरीतच आहोत ....
    अँडरसन बद्दल अमिरेकेशी एक शब्द बोलू शकत नाही...पाक ला धमकवण्याची आपल्यात हिम्मत नाही..आतंक वाद्यांना हात लावू शकत नाही ....देशातील नागरिकांचे रक्षण करू शकत नाही ...मग असले स्वातंत्र्य काय कामाचे.....

    ReplyDelete
  13. पुर्ण पोस्ट मध्ये केवळ तळटीप खटकली...

    ReplyDelete
  14. तुमचा त्रागा, राग, निराशा मला समजते.. पण आपण २६ वर्षांनी जागे होतो हीदेखील वस्तुस्थिती आहे. media सोयिस्करपणे बातम्या आणतो, चघळतो आणि विसरून जातो.. आपलेही - म्हणजे आपल्या सर्वांचे, फक्त तुमचे असे मला अभिप्रेत नाही, मीही त्यातलीच एक- तेच होते की काय असा मला कधीकधी प्रश्न पडतो...

    ReplyDelete
  15. हरी ओम....राम कृष्ण हरी...पांडुरंग हरी!!!!!

    ReplyDelete
  16. अजब न्याय नशिबाचा (काय न्याय देवता असते ) राजकारण ह्याला कारणीभूत आहे(भारतात)

    ReplyDelete
  17. बाबाच्या भिंतीवर आणि श्री ताईच्या ब्लॉगवर कमेंट टाकली होती हया विषयावर..आता काही बोलावस वाटत नाही...बाकी लेखाची शैली नेहमीप्रमाणे छान आहे..

    ReplyDelete
  18. Thanks Sarang. True.. Ours are are really centuries-old laws whereas crimes are reaching new higher levels with each passing day. It's imposs to fight with tank with a bi-cycle or to use a lathi against AK-56.. पण लक्षात कोण घेतो !!!

    ReplyDelete
  19. पुष्पराज, आभार.

    अगदी सहमत. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षं झाली तरीही आपण अजून वैचारिक, भाषिक गुलामगिरीत आहोतच. स्वाभिमानाचा गळाघोट ही अजून एक गुलामगिरी. आणि आता तर आपल्या असहिष्णू बुरख्याच्या आत दडलेला भ्याडपणा जग ओळखू लागलं आहे. त्यामुळे इथे येऊन राजरोसपणे माणसं मारायला कोणालाच काही वाटत नाही..

    >>अँडरसन बद्दल अमिरेकेशी एक शब्द बोलू शकत नाही...पाक ला धमकवण्याची आपल्यात हिम्मत नाही..आतंक वाद्यांना हात लावू शकत नाही ....देशातील नागरिकांचे रक्षण करू शकत नाही ...मग असले स्वातंत्र्य काय कामाचे.....
    <<

    पूर्णतः सहमत !!

    आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete
  20. आनंद, न्यायालयांबद्दल आणि त्यांच्या न्यायाच्या मूर्तींबद्दल असे अपशब्द वापरणं हे चूक आहे. त्यांचा अपमान होऊ शकतो. !!!!!
    १५००० खुनांच्या मारेकर्‍यांना अभय देण्याचा त्यांचा गुन्हा त्यामानाने काहीच नाही. अगदीच किरकोळ.

    ReplyDelete
  21. सविता, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. मलाही मिडीयाच्या दिखाऊपानाची किळसच आहे. परंतु तरीही हजारो लोकांवर अन्याय झालाय हा मुद्दा आपण दुर्लक्षित करू शकत नाही. कधीही कुठल्याही घटनेबद्दल, खटल्याबद्दल कुठे काही छापून आलं किंवा मंत्र्यासंत्र्यांना प्रश्न विचारले की ते नेहमीच म्हणतात की भारताच्या न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायालयात खटला चालू आहे तोवर त्याविषयी काही बोलणे म्हणजे न्यायालयाच्या कार्यकक्षेत ढवळाढवळ केल्यासारखं आहे. या अशा उत्तरांनी प्रश्न विचारणार्‍याचं तोंड बंद केलं जातं. आणि खटला संपल्यावर निकालात हे असं अन्यायदान केलं जातं.

    ReplyDelete
  22. भाषा अगदी योग्य आहे. आणि लेख पण व्यवस्थित लिहिला आहे. थोडी अजून वाईट भाषा पण चालली असती.

    ReplyDelete
  23. खरंय.. संन्यास घेऊन, डोळे आणि तोंड बंद करून हरी हरी करायची वेळ आलीये. या लोकांना एकच भाषा समजते जसं तुकोबा म्हणतात "तुका म्हणे ऐशा नरा मोजूनि माराव्या पैंजारा"

    ReplyDelete
  24. काका, नशिबाचा कसला हो. या सडलेल्या न्यायव्यवस्थेचा अजब न्याय आहे हा.

    ReplyDelete
  25. देव, असं होऊन चालणार नाही. मागे कुठेतरी वाचलं होतं ते आठवलं. ओळी नीट आठवत नाहीत पण भावार्थ तोच आहे.

    दुर्जनांच्या दुष्कृत्यांपेक्षा सज्जनांच्या विरोधाचा अभाव अधिक भयावह आहे. !!!

    ReplyDelete
  26. अगदी खरं काका. अजूनही खूप वाईट भाषा वापरायची इच्छा होत होती. पण संयम राखावा लागला.

    ReplyDelete
  27. हाच त्रागा थोड्याफार फरकाने आपण सर्वच न्यायप्रिय आणि हतबल नागरिक करतो. पण तू ते अगदी रॉ, नैसर्गिक असं छान व्यक्त केलंयस! दुःख होतं आणि स्वतःचीच कीव करावीशी वाटते!

    ReplyDelete
  28. xactly yach shabdat mi pan traga karun ghetala :( karan dusara karnyasarakha kahich nahi....sheee he asa sagala aapalya ithech ka ghadata????

    ReplyDelete
  29. अरे या न्यायप्रियत्वाची आता लाज वाटायला लागली आहे. पराकोटीचा अन्याय होऊनही जे पेटून उठत नाही ते रक्त काय कामाचं?

    ReplyDelete
  30. शिनु, फक्त आणि फक्त त्रागा करणं एवढाच पर्याय आपल्या भ्रष्ट सरकारने आपल्या हातात ठेवला आहे. फक्त आपल्या इथेच हे असं घडतं कारण आपलं पळपुटं सरकार साम-दम-दंड-भेद वापरून काहीही करून न्याय मिळवून द्यायला सक्षम नाही. !!!

    ReplyDelete
  31. अशा बातम्या वाचून मन विषण्ण होतं. कधीतरी आपलाही नंबर लागेल आणि ती बातमी वाचून दुसरा कुणीतरी असाच विषण्ण मनाने विचार करत बसेल, असं वाटतं. हे चक्र असंच चालू रहाणार बहुधा.

    ReplyDelete
  32. खरंय. असंच होणार. किंबहुन तोवर असा विचार करणारं कोणी उरलं असेल का हीही शंकाच आहे. अशा बातम्या वाचल्यानंतरही 'माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे' म्हणणार्‍या लोकांची कीव येते.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...