Tuesday, March 9, 2010

'ग्रिशमा'तला श्रावण

*  नायक वॉशिंग्टन डीसी मधला प्रथितयश वकील. अनेक वजनदार नेते, सिनेटर्स, मोठमोठे वकील, उद्योजक, कारखानदार यांच्याशी वैयक्तिक, आर्थिक संबंध असलेली एक बडी असामी. काहीतरी बिनसतं (काय ते कालांतराने कळतं) आणि या वैभवाच्या शिखरावर असलेल्या वकिलाला सात वर्षं अंधारकोठडीची शिक्षा होते. अगदी भयंकर मानसिक हाल करणारी ही शिक्षा. पण काही वर्षं शिक्षा भोगून एफ बी आय च्या दबावाने आणि प्रेसिडंटच्या हस्तक्षेपामुळे त्याला शिक्षा माफ केली जाते आणि युरोपातल्या एका देशात सोडून दिलं जातं. अनेक देशांच्या गुप्तहेर संघटनांचे मातब्बर गुप्तहेर त्याच्या मागावर, त्याच्या जीवावर टपलेले... कारण काय त्याला मारण्यासाठी एवढं जीवाचं रान करण्याचं? त्याच्यापुढे सुटकेची आशा जवळपास शून्य, इतकंच काय तर त्याला आपला शत्रू कोण आहे, कोण आहे आपल्या मागावर हेही माहित नसतं. तो एक कळसूत्री बाहुली बनून गेलेला असतो. काय होईल शेवटी?

----

* एका माणसाला ब्राझील मध्ये पकडलं जातं. हालहाल करून काही विशिष्ठ माहिती त्याच्याकडून मिळवली जाते. पण अर्धवटच माहिती. कारण तेवढ्यात त्याने आधी रचलेल्या सापळ्याप्रमाणे पोलीस आणि एफ बी आय चे लोक त्याला पकडणा-या गँगच्या मालकालाच पकडतात. त्याला सोडून दिलं जातं पण ते एफ बी आय च्या तावडीत देण्यासाठीच. हाही वकीलच. तो तुरुंगात बसून,कैद्याला जेवढे मर्यादित अधिकार असतात त्यांचा खुबीने वापर करून, वकील मिळवून, केस लढवून आणि आधीच्या प्लान प्रमाणे सगळ्या गोष्टी घडवून आणून, अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं देत आणि थक्क करणा-या किंबहुना प्रसंगी अशक्य वाटाणा-या गोष्टी प्लान करून एक विलक्षण शेवट घडवून आणतो. अर्थात तो त्याच्या (किंवा आपल्याही) मनासारखाच शेवट असतो का हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे.

-----

* एका नुकत्याच लॉ कॉलेजमधून बाहेर पडलेल्या आणि होऊ घातलेल्या वकिलाला (पुन्हा एकदा वकील नायक) कॉलेज जीवनातल्या काही गुन्ह्यांवरून एफबीआय चे लोक पकडतात आणि त्याला ब्लॅक मेल करून एक मोठं रहस्य उलगडण्यासाठी एक कळसूत्री बाहुली म्हणून त्याला वापरण्याचा प्लान केला जातो. सगळ्या दिशांनी मार्ग बंद झालेला हा असहाय्य वकील एक विलक्षण खेळी खेळतो. पण शेवटी काय होतं?

-----

रहस्यमय कादंब-यांचे पंखे असलेल्यांनी एव्हाना ही वर्णनं कसली आहे हे नक्कीच ओळखलं असेल. किंबहुना पुस्तकं कोणती तेही ओळखलं असेल. तर हा आहे माझा अत्यंत आवडता लेखक जॉन ग्रिशम. आणि वरचे तीन प्रसंग म्हणजे मला (अतिशय आवडलेल्या.. कारण त्याची सगळीच पुस्तकं आवडतात ) आवडलेल्या पुस्तकांची एक ढोबळ रूपरेषा.

ग्रिशमच्या पुस्तकात काही काही साम्यस्थळं हटकून आढळतात. एक तर ९९% नायक वकील असतो. खून, रहस्य, सिनेटर, ब्लॅकमेल , एफ बी आय, वाक्यावाक्यातल्या शब्दाशब्दागणिक लॉं-फर्म्स, त्यांची दादागिरी, लोभी आणि मतलबी प्रवृत्ती, या सगळ्या स्वार्थी व्यवस्थेचे एक अंग झालेले वकील या काही किंवा प्रसंगी सगळ्याच गोष्टी या प्रत्येक पुस्तकात आढळतात. पण तरीही प्रत्येक कादंबरीत एक वेगळा विषय असतो, वेगळी आव्हानं असतात. नायकाला हतबल करणारे घटक, संकटं वेगळी असतात. त्यावर मात करण्याची त्या त्या नायकाची शैली आणि पद्धत सर्वस्वी वेगळी असते. इतकी की ही पुस्तकं एकाच लेखकाने लिहिली आहेत ना असा संशय येतो कधी कधी.

पण नुसत्या चक्रावून टाकणा-या घटना आणि वेगवान कथा हा एकमेव गुण किंवा USP (Unique Selling Point) असता तर असल्या चिल्लर कादंब-या पडणारे पैशाला पसरी मिळतात. पण ग्रिशमच्या पुस्तकांमध्ये आढळणारा महत्वाची बाब म्हणजे त्याची वाहती  वर्णनशैली. वाक्यावाक्यात केलेली शब्दांची कलाकुसर. म्हणजे क्लिष्ट अशा अर्थाने नव्हे उलट हलकीफुलकी, प्रसंगी चिमटे काढणारी. शब्दांशी खेळून नवीन नवीन वाक्प्रचारांना जन्म देण्याची त्याची हातोटी तर विलक्षणच.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याचं सामाजिक भान. वास्तवाशी असलेली नाळ. तो नायकांची उंची जीवनशैली, रंगिलेपण, महागड्या गाड्या, क्लब्स, राजकारण, प्रेसिडंट ऑफिस, एफ बी आय, सी आय ए आणि त्यांच्यातले हेवेदावे, छुपी युद्ध जेवढ्या ताकदीने उतरवतो तेवढ्याच किंवा प्रसंगी जास्त आत्मीयतेने वर्णन करतो ते समाजातील भेदभाव, आर्थिक, सामाजिक उच्चनीचता, कातडीच्या रंगावरून केले जाणारे भेदभाव.

त्याच्या जुन्या पुस्तकांमध्ये ब-याचदा क्लू-क्लक्स-क्लान (केकेके)ची वर्णनं आढळतात. काही कादंब-या तर सर्वस्वी त्या विषयाला वाहिलेल्या आहेत. केकेके ही संस्था अमेरिकेतील सवर्णांनी (म्हणजे गो-यांनी) स्थापन केलेली एक संस्था. पूर्णतः हुकुमशाही तत्वांनी बाधित. गोरे लोक हे शक्तिमान आहेत, त्यांचा अमेरिकेवर प्रथम अधिकार आहे आणि त्यांना त्यांचे अधिकार, गतवैभव परत मिळावं (?) या हेतूंनी (???) ही संस्था अमेरिकेतील दक्षिण भागातील मेम्फिस, मिसिसिपी, अलाबामा या आणि अशा ब-याच राज्यात पूर्वी काम करत असे. अमेरिकेत होणा-या गुलामांच्या खरेदी-विक्रीला विरोध करणारा कायदा अस्तित्वात आल्यावर त्या कायद्याला, सिव्हील राईट्स मुव्हमेंटला विरोध करणा-या आणि पर्यायाने अमेरिकन सिव्हील वॉरला कारणीभूत ठरलेल्या समूहांमध्ये केकेके ग्रुप आघाडीवर होता. या केकेकेचे सभासद अमेरिकेत अजूनही आहेत अर्थात त्यांच्या चळवळीला आता अर्थ राहिला नसल्याने ती संस्थाही आता क्षीण झालेली आहे. तर अगदी ७०-८० च्या दशकातही हा काळा-गोरा वर्णभेद, कृष्णवर्णीयांची घरं जाळणे, त्यांना जिवंत जाळणे, छळ करणे, लुटमार करणे, कृष्णवर्णीयांना मदत करणा-या गो-या किंवा ज्यू लोकांवर हल्ले करणे, धमकावणे असले प्रकार या दक्षिणेतील राज्यांत राजरोसपणे चालू होते. त्या काळातली अंगावर काटा आणणारी अन्यायाची वर्णनं, स्त्रियांवरील अत्याचार, अशा प्रसंगात जर आरोपी गोरा असेल तर त्याला केकेकेकडून बिनदिक्कतपणे दिला जाणारा पाठिंबा, किंबहुना बरेचदा न्यायाधीश, ज्युरी असे न्यायप्रणालीत, निर्णयात महत्वाची भूमिका बजावणारे लोकही केकेकेला सामील असत किंवा केकेकेचे छुपे सभासद असत. असो विषयांतर झालं. पण विकीवर यासंबंधात चिक्कार माहिती आहे. सुरुवातीला कधी कधी ग्रिशमची पुस्तकं वाचताना काही तपशील कळत नसत. तेव्हा मी असाच विकी करायचो.

तर या सगळ्या गोष्टींवरची ग्रिशमची मतं, त्यासाठी त्याने दिलेले दाखले त्याच्या सामाजिक जाणीवा जागृत असण्याची साक्ष देतात. किंबहुना त्याच्या एका कादंबरीत त्याने बेघर, गरीब लोक, त्यांचे हाल, त्यांच्यावर होणारे अन्याय या सगळ्याला अप्रतिमरित्या वाचा फोडली आहे. आणि एका जीवनमरणाच्या प्रसंगामुळे आयुष्याला कलाटणी मिळालेला एक कॉर्पोरेट वकील (पुन्हा वकील) आपलं करियर, लाखो डॉलर्सची नोकरी यांच्यावर पाणी सोडून या बेघर लोकांसाठी कळकळीने काम करण्यासाठी कसा उद्युक्त होतो याचं उत्तम वर्णन त्याने केलं आहे.


प्रत्येक कादंबरीतील नायक वकील असणे हा योगायोग आहे का? तर मुळीच नाही. कारण ग्रिशम स्वतः शिक्षणाने वकील आहे. आठ-दहा वर्षं वकिली केल्यानंतर एका हादरवून टाकणा-या केसमुळे त्याला पुस्तक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली आणि १९८९ मध्ये जन्माला आलं त्याचं पाहिलं पुस्तक "A Time to Kill". अर्थात त्यानंतर काही वर्षांतच त्याने वकिली सोडून पूर्णवेळ लेखणी (की-बोर्ड) हाती घेतला. अजून एक गम्मत म्हणजे बेसबॉलवर प्रचंड प्रेम असल्याने त्याला बेसबॉल प्लेयर व्हायचं होतं. पण त्यासाठी आवश्यक गुण आपल्यात नाहीत हे कळून चुकल्यावर त्याने वकिली शिक्षण घेतलं, वकिली केली आणि कालांतराने तेही सोडून देऊन एकापेक्षा एक धडाकेबाज legal thrillers लिहून "Master of the legal thrille" बनला. संदेश बिंदेश देत नाहीये फक्त माहिती सांगतोय काय तो अर्थबोध ज्याने त्याने घ्यायचा.

त्याने १९८९ पासून लेखनाला सुरुवात केली आणि आजतागयात दर वर्षाला त्याची एक कादंबरी प्रकाशित होते आहे. यातल्या २ कादंब-या वगळता सगळ्या रहस्यमय कादंब-या आहेत. आणि कित्येक कादंब-या अनेक आठवडे/महिने न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेल्या. अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे पहिली कादंबरी सोडली तर प्रत्येक कादंबरीचं शीर्षक "The" ने सुरु होतं. त्याच्या अनेक कादंब-यांवर अमेरिकेत चित्रपट निघालेत आणि त्यांनी करोडोंनी गल्ला केला आहे. त्याच्या कादंबरीवर आधारित चित्रपटांमध्ये (माझ्या मते) 'The Pelican Brief' सर्वोत्कृष्ठ आहे. अर्थात त्यात ज्युलिया रॉबर्टस आणि डेन्झेल वॉशिंग्टन सारखे सामर्थ्यवान आणि गुणी कलावंत आहेत. तसेच 'The Firm', 'The Client', 'A Time to Kill' हेही  आवर्जून पहावेत असे चित्रपट.


अर्थात आखुडशिंगी, बहुदुधी काहीच नसतं. ग्रीशमही त्याला अपवाद नाही. त्याच्या लिखाणामध्ये, कादंब-यांमध्ये काही काही दोष आहेत. अर्थात मला आढळलेले दोष. "पर अप्पुन पब्लिक है पब्लिक. जो अच्छा नही लगा उसका डब्बा गुल" असा प्रेमळ, लडिवाळ संदेश रंगील्या मुन्नाने आधीच देऊन ठेवल्याने ग्रिशमच्या लेखनातले दोष काढण्याचं धाडस करतोय. त्याची वर्णनं, कादंब-यांमधल्या घटना कधी कधी फारच लांबतात, रटाळ होतात. तो कादंबरी, प्रसंग पाणी घालून उगाच वाढवतोय असं वाटत राहतं. अनेक घटना घडतात त्या उगाच क्लिष्ट, लांब लचक, अनाठायी  वाटतात. त्या घडल्या नसत्या किंवा त्यांचं इतकं तपशीलात वर्णन आलं नसतं तरी चाललं असतं असं वाटत राहतं. आणि याचा अगदी हटकून अनुभव घ्यायचा असेल तर 'The Chamber' वाचा. प्रत्येक कादंबरीत असे काही काही असणारे रटाळ प्रसंग या कादंबरीत पानोपानी भरलेत. किंबहुना ही कादंबरीच तद्दन टाकाऊ वाटली मला कारण शेवटी काहीच घडत नाही. या कादंबरीत चांगलं असं काहीच वाटत नाही. अर्थात केकेकेच्या अन्यायाचं अंगावर काटा आणणारं भयंकर वर्णन सोडलं तर. किंवा 'Playing for Pizza' हे देखील त्याचं असंच एक रटाळ पुस्तक. पण खिळवून ठेवणा-या, पुढे काय घडतंय, घडेल या विचारात कादंबरीच्या नायकाशी एकरूप व्हायला भाग पाडणा-या अनेक कादंब-या विचारात घेतल्या तर अशा एक-दोन कादंब-यांना माफी देऊ एक डाव :D

नुसतं नावडत्या कादंब-यांची नावं सांगण्याचा कद्रूपणा करणार नाही मी. आवडते चित्रपट वर सांगितलेच. आवडत्या कादंब-या सांगायच्या तर

१. The Broker
२. The Partner
३. The Associate
४. The Street Lawyer
५. The Testament

अर्थात या यादीतही 'The Firm', 'The Client', 'A Time to Kill', 'The Pelican Brief' हे आहेतच पण मी आधीच चित्रपट बघितल्याने ही पुस्तकं वाचली नाहीयेत.

त्याच्या  सगळ्या पुस्तकांची यादी इथे मिळेल किंवा त्याच्या स्वतःच्या संकेतस्थळावरही मिळेल. थोडक्यात एकदा तरी अनुभावावाच असा हा 'ग्रीशमा'तला श्रावण आणि एकदा अनुभवलात की पुन:पुन्हा अनुभवल्याशिवाय चैन न पडू देणारा !!

26 comments:

  1. माझा पण फेवरेट आहे जॉन.. मस्त लिहितो . इतक्यात वाचलं नाही बरेच दिवसापासून त्याचं पुस्तक.

    ReplyDelete
  2. हो मला आठवतंय तुम्ही मागे लिहिलं होतंत एका पोस्ट मध्ये. सहीच लिहितो तो..

    ReplyDelete
  3. माझ्या क्यु मध्ये नेक्स्ट हेच! धन्यवाद हेरंब!

    ReplyDelete
  4. आनंद, नक्की वाच आणि चित्रपटही बघ. जबरदस्त आहे सगळं !!

    ReplyDelete
  5. जॉन ग्रिशम माझा पण आवडता लेखक आहे. त्याची The Client, The Rainmaker, The Pelican Brief ही पुस्तके पण भारी आहेत.

    ReplyDelete
  6. भारीच आहे तो. तू उल्लेख केलेले चित्रपट बघितले आहेत मी त्यामुळे पुस्तकं वाचायची राहून गेली. पण चित्रपटापेक्षा मूळ पुस्तक नेहमीच फार छान असतं.

    ReplyDelete
  7. ठरलं तर मग... येत्या वर्षभरात ग्रिशमची तू सांगितलेली सगळी पुस्तकं मिळवून वाचून काढायची. :) (मी त्या यादीपैकी फक्त ’द पेलिकन ब्रीफ’ सिनेमा पाहिला आहे. आणि माझंही असंच मत आहे की चित्रपटापेक्षा मूळ पुस्तक नेहमीच फार छान असतं.)
    मस्त पोस्ट... शीर्षकासकट !!

    ReplyDelete
  8. सही.. नक्की वाच. जमलं तर 'द ब्रोकर' पासून सुरुवात कर. पंखाच होऊन जाशील..

    ReplyDelete
  9. वर्णनावरून कळतयं नकीच interesting असणार 'ग्रीशम' ,मी इंग्रजी पुस्तकं फारशी वाचत नाही. रहस्यमय पुस्तक वाचायला घेतल की ते पुस्तक संपेपर्यंत मला तर चैनच पडत नाही.

    ReplyDelete
  10. अग जामच इंटरेस्टिंग आहे. आणि रहस्यमय पुस्तकं आवडणा-यांसाठी तर पर्वणीच आहेत त्याची पुस्तकं.

    ReplyDelete
  11. माझाहि तो आवडता लेखक आहे. अमेरिकेतील लीगल सिस्टिमचं त्याच्या पुस्तकांतील वर्णन प्रत्ययकारी असते.

    ReplyDelete
  12. फडणीस काका, ब्लॉगवर स्वागत. अगदी खरं आहे. खुपच जिवंत आणि वास्तववादी वर्णन असतं त्याच्या पुस्तकांमध्ये..

    ReplyDelete
  13. जॉन ग्रिशॅमचं माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे 'द रेनमेकर'. पण 'द टेस्टामेंट' आणि 'द समन्स' सुद्धा आवडतात.

    ReplyDelete
  14. ब्लॉगवर स्वागत, विद्याधर. मी रेनमेकर वाचलं नाहीये पण चित्रपट बघितलाय. आता लवकरच वाचतो. बाकी ग्रिशमच्या 'द ब्रोकर', 'द पार्टनर', 'द टेस्टामेंट ' सारखंच तुमचं 'द प्रोफेट' आवडलं. :)

    ReplyDelete
  15. रहस्यमय कादंब-यांची मी पण मोठा पंखा आहे...माझं केकेके बद्द्दलचं मोठं शिक्षण यानेच केलंय असं म्हणेन मी..खूप विस्तृत लिहिलं होतं एका कादंबरीत आता नाव विसरलेय...
    सध्या ग्रीश्माला बर्‍याच दिवसात वाचलं नाहीये..पण लवकरच वाचेन....
    नेमकं मी पहिल्यांदी त्याचं पुस्तक वाचलं होतं तेव्हा मुंबईचा मेचा कडक उन्हाळा होता २००२ बहुधा...त्यामुळे त्याचं नाव नेहमी ग्रीश्म असंच मनात येतं...तुही त्याला खूप छान कव्हर केलंस पोस्टमध्ये..आवडलं...

    ReplyDelete
  16. अगदी. माझं पण केकेके बद्दलचं ज्ञान यानेच वाढवलं. माझ्या मते केकेके बद्दल सगळ्यात विस्तृत 'द चेंबर' मधेच आहे.
    माझं सध्या ग्रिशमचं बरंच वाचन चाललंय. म्हणून टाकली पोस्ट. कमेंट्स वरून कळलं ब-याच जणांचा आवडता आहे तो :)

    ReplyDelete
  17. A Time to Kill पहिला आहे का? अतिशय सुंदर आणि तरीही अंगावर काटा आणणारा सिनेमा आहे. ह्या चित्रपटातही नायक परत वकीलच. केकेके ची वर्णनं आणि दृश्य ह्या चित्रपटातही आहेत. व्यक्तिरेखा ही अतिशय सुस्पष्ट आणि मानवी लिहिल्या आहेत. मी पुस्तक वाचलं नाहीये पण जर चित्रपटात त्या इतक्या ठळक असतील तर त्या पुस्तकात नक्कीच असतील. हे पुस्तक बऱ्याच प्रकाशकांनी प्रकाशित करण्यास नकार दिला होता. कारण विषय-गोरे विरुद्ध काळे.

    लेख मस्त. पुढील लेखनास शुभेच्छा!
    पोस्टचं नाव फार आवडलं.

    ReplyDelete
  18. खूप आभार संपदा आणि ब्लॉगवर स्वागत. हो in fact मी ग्रिशमचा सगळ्यात पहिला चित्रपट बघितला तो 'A Time to Kill' आणि त्यातला शेवटचा सीन बघून मी वेडाच झालो. आणि त्यानंतर धडाधड त्याच्या पुस्तकांचा आणि चित्रपटांचा फडशा पाडत गेलो. Grisham Rocks !!

    ReplyDelete
  19. माझाही आवडता लेखक आहे ग्रिशम. कॉलेजला असताना जेफ्री आर्चर आणि ग्रिशम यांची तोवर प्रकाशित झालेली सगळी पुस्तकं मी एकापाठोपाठ वाचून काढली होती, आणि दोघांचाही ओव्हरडोस झाल्यामुळे कॉलेजनंतर त्यांच्या एकाही पुस्तकाला हात लावला नाही :)

    ReplyDelete
  20. हा हा हा.. हो कधी कधी लागोपाठ वाचली की तोचतोचपणा वाटतो खरा. मग मी लेखक बदलतो :).. आर्चरचं मी फक्त "Not a Penny More, Not a Penny Less" वाचलंय. बाकी काही नाही :(

    ReplyDelete
  21. मी अजुन ग्रिशमच एकही पुस्तक वाचल नाहिये...पण ही पोस्ट वाचल्यावर वाचावीशी वाटत आहेत..बघुया मुहुर्त..

    ReplyDelete
  22. अरे नक्की वाच. एकदा वाचायला लागलास की एका मागोमाग फडशा पाडशील सगळ्या पुस्तकांचा.

    ReplyDelete
  23. नाव ऐकले होते पण कधी काही वाचलेले नाही... किती वाचले तरी वेळ पुरेल तर शप्पथ... :) काय काय वाचायचे रे!!!

    ReplyDelete
  24. जमलं तर नक्की वाच. अफाट लिहितो हा माणूस. आणि अगदी अगदी... "काय काय वाचायचं रे.. किती लिहितात रे लोकं" हे असे प्रश्न मला नेहमीच पडतात :(

    ReplyDelete
  25. हो रे .. पण आपण सुद्धा त्यातलेच ... हेहेहे ... ;)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...