Saturday, March 27, 2010

मटाला 'अनावृत' पत्र


माननीय संपादक,
उगाच काहीतरी भारदस्त दिसावं किंवा लेख प्रचंड वैचारिक वगैरे वाटावा म्हणून असं जडसर शीर्षक देतोय असा समज होत असेल तर तो चुकीचा आहे. किंबहुना एवढं समर्पक शीर्षक मी आत्तापर्यंत माझ्या कुठल्याही लेखाला दिलं नसेल. मी मटा ऑनलाइन चा गेल्या ६-७ वर्षांचा नियमित वाचक. मटा कित्येक वर्षं घरी येत असल्यामुळेच फक्त तो आवडता होता असं मुळीच नाही उलट (निदान मुंबईतल्या तरी) लोकसत्ता किंवा सकाळ, लोकमत आणि इतर असल्या अनेक पेपर्सपेक्षा मटा, त्याच्या बातम्या, अग्रलेख, विविध सदरं, माहितीपूर्ण चर्चा यामुळे तो नेहमीच हवाहवासा वाटायचा. त्यामुळे मुंबई/देश सोडून बाहेर जायची वेळ आल्यावर महाराष्ट्राशी, मुंबईशी नाळ जोडलेली राहण्यासाठी मटा म्हणजे माझा सर्वोत्तम (पत्र नव्हे) मित्र होता. महाराष्ट्रातल्या घडामोडी रोजच्यारोज न कंटाळता, न थकता, न चुकता (आणि फुकट) माझ्यापर्यंत आणून ठेवणारा  मटा हा एक महत्वाचा दुवा ठरला. पण दुर्दैवाने मी हे वाक्य असंच्या असं आताच्या मटा विषयी म्हणू शकत नाही. आताच्या म्हणजे साधारण गेल्या दोन वर्षातल्या मटाला. अनेक कारणं आहेत पण त्यातल्या सर्वात महत्वाच्या आणि मला मटाचा जवळजवळ तिरस्कार करायला भाग पाडणार्‍या कारणाविषयीचं फक्त बोलू आज. कारण इतर कारणांनी मला मटाचा राग येत असला तरी तिरस्कार करावसं कधी वाटलं नव्हतं. ती कारणंही आपण थोडक्यात बघूच नंतर. पण आत्ता मूळ मुद्दा. 

आणि तत्पूर्वी माझी मतं म्हणजे समस्त ऑनलाइन वाचक वर्गाची प्रातिनिधिक मतं आहेत असे भासवण्याचा माझा कुठलाही अविर्भाव नाही. परंतु अनेकांशी झालेल्या चर्चेतून  हेही सांगतो की कदाचित हे प्रातिनिधिक मत असण्याची शक्यता आहे. प्रातिनिधिक नसण्याचं कदाचित अजून एक कारण म्हणजे मी हे बर्‍याच सौम्य भाषेत लिहीत असलो तरी प्रातिनिधिक मत हे अजून जहाल असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

डावा हात आणि घाणेरड्या गोष्टी यांचा परस्पर संबंध जोडून की काय कोणास ठाऊक परंतु ऑनलाइन मटाच्या डावीकडच्या वरच्या कोपर्‍यातल्या बातम्या सोडून आपण खाली सरकलो की तिथल्या बातम्या, त्यांची शीर्षकं बघून मटा आणि त्याच्यामुळे आपणही प्रचंड खाली घसरलो असल्याची जाणीव उगाचच होते. काही वर्षांपूर्वीपासून तिथे 'झणझणीत वेब मसाला' नावाचं नावातच पुरेपूर उथळेपणा असणारं सदर (!!) सुरु झालं आणि तिकडे उगाच मायापुरी किंवा तत्सम तद्दन गल्लाभरू मासिकाचं मुखपृष्ठ वाटावं अशा स्टाईलचे फोटोज आणि बातम्या चमकू लागल्या. आपलं हे सदर भलतंच लोकप्रिय होतंय अशी (अवास्तव) कल्पना मटाने कशाच्या आधारे करून घेतली हे समजण्यास कुठलाही मार्ग नसला तरी त्यांनी त्यानंतर 'मटा फोटोगॅलरी' च्या नावाखाली जे भयंकर फोटोज आणि त्याहूनही भयंकर त्यांची शीर्षकं द्यायला सुरुवात केली त्यावरून 'गॅलरी नको पण शीर्षकं आवर' असं म्हणण्याची पाळी प्रत्येक कुटुंबकबिला असणार्‍या सामान्य माणसावर आली एवढं मात्र नक्की. "एन. डी तिवारी यांचं भांडाफोड" दाखवण्याच्या नावाखाली तीच बातमी वारंवार चघळायची असं टीव्ही स्टाईल वाटत असेल तरी तसा कुठलाही उद्देश नसल्याने आजच्याच (२७ मार्च २०१०) च्या अंकातल्या फक्त २-३ शीर्षकांची उदाहरणं देतो. आणि मटाच्या सुदैवाने आजची शीर्षकं नेहमीपेक्षा फारच साधी आहेत हेही लक्षात असुद्या.

१. जीवाची होतेया कायली...
२. बॉलिवूड बेड पार्टनर्स
३. रात्रीची मोहाली

आणि या तीन शीर्षकांच्या (पुन्हा डावी बाजू) डाव्या बाजूला एक अर्धअनावृत तरुणी लोळताना दाखवली आहे. पुन्हा सांगतो की आजचा फोटो आणि आजची शीर्षकं ही फार म्हणजे फारच साधी वाटावी इतकी भयानक परिस्थिती इतर दिवशी असते. आता अशाच अर्धअनावृत तरूण्या लोळताना (नुसत्याच लोळताना नव्हे तर त्याबरोबरच कायकाय करताना) बघण्याची २४ तास टीव्ही वाहिन्यांमुळे सवय (की सोय?) झाली असतानाच्या या युगात उगाच कुठल्या तरी पेपरमधल्या कुठल्यातरी सदरात उगाच चार थिल्लर फोटो छापून आले म्हणून एवढं आरडाओरडा करणं म्हणजे उगाच संस्कृतीरक्षकाचा आव आणून 'धर्म वाचवा' अशी आरोळी ठोकत धर्मरक्षणाची गुढी खांद्यावर घेऊन नाचत असल्यासारखं वाटत असलं तरी मटा म्हणजे उगाच कुठलाही पेपर नव्हे आणि हे असे चार थिल्लर फोटो रोज छापून येतात हे तपशील विचारात घेतले की हा आक्रोश वृथा नव्हे हे पटेल.

आता अशा प्रसंगांमध्ये किंवा अशा प्रकारच्या चर्चा, लेख यामध्ये सामान्यपणे आणि सातत्याने तोंडावर फेकला जाणारा एक मुद्दा म्हणजे 'रिमोट तुमच्या हातात आहे ना मग बदला ना चॅनल, नका बघू असले प्रकार'. पण हा मुद्दा इथे तेवढाच गैरलागू आहे. कसा ते सांगतो. टीव्हीवर हे दिसणार अशी मनाची तयारी असल्याने वेळप्रसंगी (किंबहुना बर्‍याचदा) चॅनल बदलायच्या तयारीनेच पालक बसलेले असतात. यातला अतिरेक सोडला तरीही दरवेळीही ते करणं शक्य नसतं किंवा एम टीव्ही, एफ टीव्ही, झी टीव्ही आणि २६ इंग्रजी अक्षरांतल्या अशा अनेक एकेका अक्षराने सुरु होणार्‍या विविध वाहिन्यांवर असले प्रकार दिसणारच अशी पालकांनी मानसिक तयारी केलेली असते. पण पेपर आणि त्यातून पुन्हा मराठी पेपरचं असं नसतं. तो पत्र नव्हे मित्र असतो. एखादा वयात आलेला किंवा किंबहुना न आलेला मुलगाही ही अशा प्रकारची माहिती, फोटो इतर अनेक साईट्सवरून मिळवून सहज बघू शकतो हे खुलं सत्य उगाच का नाकारा परंतु अशा फोटोंची ओळख माझ्या मुलाला/मुलीला मटाच्या माध्यमातून होऊ नये अशी कुठल्याही सुजाण पालकाची अपेक्षा असेल आणि ती अवास्तव आहे किंवा रास्त नाही असं मला तरी कुठेही वाटत नाही. आत्ता माझा मुलगा मी ऑनलाइन मटा वाचत असताना माझ्यामागे येऊन उभा राहून "बाबा, तू हे काय वाचतो आहेस" किंवा "काय बघतो आहेस" असं विचारण्याच्या वयाचा सुदैवाने नसला तरीही इतर अनेक पालकांच्या बाबतीत हे असे प्रसंग गेल्या दोन वर्षांत अनेकदा आले असणार. किंवा एखादा मुलगा/मुलगी मटा वाचत असाल तर तो/ती ते तसले फोटो बघतील म्हणून त्यांना काय मटा वाचूच द्यायचा नाही?

मुंबईबाहेरच्या वाचकांना कदाचित असं वाटेल की "काय तो एक पेपर आणि त्यातलं एक सदर त्यावर एवढं लिहायची काय गरज आहे? नका वाचू ना मटा, सोडून द्या तो विषय, झालं संपलं". परंतु पुण्यातील वाचकांच्या मनात सकाळला जे स्थान आहे, जो मान आहे तेच स्थान, तोच मान मुंबईकरांच्या मनात मटाबद्दल आहे. एकदा हे मटा आणि सकाळ (किंवा इतर शहरांतील तत्सम पेपर्स) यांच्यातलं साधर्म्य ताडून बघितलं की माझा मुद्दा कळायला मदत होईल अशी अपेक्षा. 

दुसरं असं की "एवढा राग येतो, नाही आवडत तर नका वाचू मटा" असा इतर वाचकांचाच नव्हे तर कदाचित मटाचाही आक्षेप असू शकतो. यावर उत्तरं एकच "राग कोणाचा येतो? तर आपल्या माणसाचा.. सचिनचं शतक हुकल्यावर त्याला जेवढ्या शिव्या पडतात तेवढ्या दादाला, द्रविडला, सेहवागला किंवा धोनीला पडत नाहीत.."

सध्या तरी फक्त याच मुद्द्यावर लिहिलं आहे. कारण शुद्धलेखनाच्या असंख्य चुका, पानोपानी इंग्रजाळलेल्या आणि हिंदाळलेल्या वाक्यांचा आणि शब्दांचा सढळ  हस्ते वापर ह्या चुका तर मी सध्या गृहीतही धरत नाहीये. पण एवढं एकच सांगतो की यापुढे ही डावी बाजू धुवून, पुसून साफ झाल्याशिवाय "मी मटा वाचणार नाही". याला धमकी समजून "काय वाकडं करणार आहेस" किंवा निषेध समजून "एका वाचकाच्या निषेधाने, बहिष्काराने काय होतंय" अशा प्रकारचे विचार करायला मटाच्या संपादक मंडळाला अर्थातच माझ्या संमतीची आवश्यकता नाही. अर्थात "माझ्या एकट्याच्या निषेधाने काय होणार आहे?" हे मलाही माहित आहे परंतु तुमची रोजची वाचक संख्या जर ९९९९९ (एक काल्पनिक संख्या म्हणून घेतलीये) असेल तर माझ्यामुळे ती उगाच १००००० व्हायला नको एवढाच हेतू. असा एखादा लेख लिहून काय होणार आहे हा प्रश्नच असला तरीही अशा लेखामुळे अशा प्रकारचे अनेक लेख, मतं, प्रतिक्रिया यांना चालना मिळून त्यानिमित्ताने या 'डाव्या' बाजुमुळे त्रासलेल्या सर्व वाचकांनी आपली मतं मांडल्याने मटाचं हे 'वाकडं पडलेलं डावं पाउल' सावरलं तर उत्तमच !!

-हेरंब ओक, न्यू जर्सी 

---------------------------------------------------------------------------------------

मागे 'तो आणि ती' वर आलेल्या अनेक प्रतिक्रियांमुळे डोक्यात घोळत असलेल्या या विषयाला शेवटी मी कागदावर उतरवलंच. हे पत्र मी जसंच्या तसं mttumchepan@indiatimes.com आणि bk.raut@sansad.nic.in या इमेल आयडिज वर पाठवलं होतं पण ते दोन्हीकडून बाउन्स होऊन परत आलं. कोणाला मटा संपादक/भारतकुमार राउत किंवा तत्सम योग्य व्यक्तीचा इमेल आयडी माहित असल्यास कमेंट मध्ये टाकावा ही विनंती.

47 comments:

  1. हेरंब, अगदी खरं!
    म.टा. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाची केवळ मराठी आवृत्ती बनुन राहिलाय अश्यात....

    ReplyDelete
  2. अगदी खरंय आनंद. ती डावी बाजू आणि ती भयंकर टायटल्स बघितली की नुसता संताप होतो !!

    ReplyDelete
  3. Khare aahe tuze.....!!! Aani he kharech pratinidhik mat aahe ase mhanayala harkat nahi...
    BTW, kitti patapat posts takto aahes tu sadhya.
    Comment dyayalahi jamat naahi...Suttitali bhatakanti suru asalyane... [Tu kaay niyamit pane pizza khatos vatate sadhya; wid reffernce 2 Pizza,pot,blog,shiksha vaigare.. :)]
    N e ways, lihit raha asech.... comment takayala jamli nahi tari tuzya sagalya posts vaachate mi... after all I m ur Fan.... :)
    Aani ho Aaditey la congo sang "pahile paaul" takalya baddal...
    Baap rre.... post peksha mothi comment hotey...Aavarate gya... :)

    ReplyDelete
  4. खरय..आणि तू ही पोस्ट टाकलीस ह्या बद्दल विशेष अभिनंदन.
    आपण तो आणि ती च्या वेळी ह्या विषयावर बोललो होतो. काय बोलाव ह्याना समजत नाही. हा पेपर ऑनलाइन वाचणा म्हणजे डाव्या बाजूचे "आजचे हॉट पीक्स" "बिकिनी सीरीज" "कतरिनाचा टूकार बेडरूम एमएमस" अश्या ह्या लिंक्स ने भरभरून असतो. अतिशय वाईट वाटत हे बघून

    ReplyDelete
  5. mi mata la hyabadal email lihinarach hoto...kharech ashlil pan chalu..hi loka patrakarita visarlet..fakta paise/glamour/new khapacne hyachya mage ahet..hya lokavar karwai zali pahijel...

    ReplyDelete
  6. January 14, 2009 च्या आमच्या पोस्ट मधून.
    मटा (पत्र नव्हे चावट मित्र !)वाले तर जाम माजलेत. वाचक वर्ग जास्त आहे.जिच्या घरी ताक तिचे वरती नाक अशी जगाची रीत असल्याने आपण काय करु शकतो? किती वेळा सांगितले तरी आचकट विचकट बातम्या पहिल्या पानावर टाकतात. त्यांना वाटतं त्याचं सेक्स न्यूज सेगमेंट सगळ्या जगात हॉट आहे. हॅट तुमच्या. अर्ध्या अधिक बातम्या कुठल्यातरी अमेरिकन संशोधनाचा मराठी अनुवाद. आणि नेहमी पहिल्या तीन बातम्यां मध्ये टाकतात. वैताग येतो. मी काय ते पहायला मटावर येतो का?
    चिकार टुकार साईट्स पडल्या आहेत त्यासाठी. एका जनार्दनी आणि सेक्स न्यूज अगदी एक मेकांना चिकटून- हे फक्त मटाच करु जाणे.
    http://sussat.blogspot.com/2009/01/blog-post_14.html

    ReplyDelete
  7. प्रातिनिधिक असेल याची मला खात्रीच होती. पण उगाच आपण आपल्या तोंडाने तसं म्हणणं म्हणजे आत्मप्रौढी वाटू शकते. असो..

    हा हा .. सुचतायत जरा फटाफट म्हणून टाकून देतोय लगेच. कधी कधी जाम ब्लँक व्हायला होतं त्यापेक्षा हे बरं :-) .. असो तुझी भटकंती चालुदे मनसोक्त. ब्लॉग, कमेंट काय कधीही बघता येतील.. हा हा.. अग उलट बरेच दिवसांत नाही खाल्लाय पिझ्झा तरी सुचतंय जरा बरं लिहायला.. सुधारलो मी :P
    आदितेयला निरोप दिला. त्याने धन्यु सांगितलं आहे.

    आणि अशा मनापासून आलेल्या कमेंटची लांबी बघायची नसते. उलट मस्त वाटतं वाचून. :-)

    ReplyDelete
  8. आभार सुहास. हो बरोबर.. तू आणि अपर्णा म्हणाला होतात. डोक्यात होतंच कधीपासून पण इथे यायला जरा वेळच लागला. खरंच रे डावी बाजू बरबटून ठेवली आहे या लोकांनी. TOI मध्ये येतं म्हणून तुम्ही पण द्यायला पाहिजे का? Know your audience !! .. खरंच वाईट वाटतं रे चांगल्या पेपरचं असं रूप बघून. !! :(

    ReplyDelete
  9. आभार Sam आणि ब्लॉगवर स्वागत.. अगदी खरं आहे. विचित्र प्रकार आहे हा. आणि त्यांना पाठवलेले दोन्ही इमेल्स बाउन्स झाले. तुमच्याकडे योग्य आयडी असेल तर कळवावा.

    ReplyDelete
  10. अनामिक, अगदी योग्य लिहिलं आहेत तुम्ही. सवय दुसरं काही नाही. तुम्हाला इतक्या वर्षांची जशी 'सकाळ' ची सवय तशी आम्हाला 'मटा'ची. पण त्या सवयीवर विजय मिळवलाय मी तूर्तास तरी. मटा वाचणं बंद म्हणजे बंद. !!!

    ReplyDelete
  11. pls see http://batmidar2.blogspot.com and send u r mail to them....

    ReplyDelete
  12. हेरंबजी, आपला हा लेख म.टा पयर्ंत पोचविण्याचा एक मागर् आहे. आपण बातमीदार ब्लाॅग वाचता एकदा वाचून पहा.
    http:batmidar2.blogspot.com आणि तुमता हा लेख
    blogeditor.acidic@gmail.com यांना पाठवा. पहा मग तो किती लोकांपुढे जातो तो.

    ReplyDelete
  13. अगदी मनात होते खूप दिवस तेच लिहिले आहेस रे
    मागील लेखा वेळीच तुला सांगणार होतो परंतु राहून गेले भारतकुमार राउत शिवसेनेचे खासदार झाल्यापासून म टा चे संपादक नाही आहेत त्यांनी ते तेंव्हाच सोडून दिले आहे
    ते होते त्या वेळचा म टा काय खास असायचा राव त्यांचे अग्रलेख तर जबरयाच
    आजचा म टा रेड लाईन एरियात उभा राहून लोकांना खुणावणाऱ्यासारखा वाटतो मला
    आजकाल मीही त्याच्या साईट वर जायचे कमी केले आहे आणि तुला समर्थन म्हणून मीही आजपासून जाणार नाही त्याच्या साईट वर आता १००००० होण्यास नक्कीच २ कमी पडतील त्यांना

    ReplyDelete
  14. आभार अनामिक. दोन्ही प्रतिक्रिया एकाच व्यक्तीच्या असतील असा अंदाज. :-)
    आत्ताच blogeditor.acidic@gmail.com वर माझा लेख मेल करून त्यांना भारतकुमार राउत यांचा इमेल आयडी देण्याविषयी सांगितलं आहे. आपल्या मदतीबद्दल आभार.. !!

    ReplyDelete
  15. आभार विक्रम. माझ्या पण मनात होतंच खूप दिवसांपासून. भारतकुमार राऊतांचे अग्रलेख हे एकमेव आकर्षण राहिलं होतं मटा वाचण्याचं.
    आणि या डाव्या बाजूबद्दल तर ती रेड लाईट एरियाची उपमा एकदम चपखल.. वा. समर्थनाबद्दल आभार. अनेक जागरूक वाचकांनी जर असाच निषेध नोंदवला तर मटाला डावी बाजू साफ करावीच लागेल !! पुन्हा आभार !!

    ReplyDelete
  16. हेरंब,सर्वप्रथम तुझे अभिनंदन व आभार. सगळ्यांच्या मनातला खदखदता रोष तू बाहेर काढलास. डावी बाजू म्हणजे भयंकर झालेत. एके काळी मटाची शान होती. उत्तम अग्रलेख, उगाच फालतू बातम्यांचा आधार घेऊन सवंग प्रसिध्दी मिळवण्याची काडीमात्रही गरज नव्हती. सिने नट्या-मॉडेल्स यांचे असे उत्तान फोटो-बिकीनी सिरीज या सगळ्याची मटासारख्या पेपरमध्ये रोजच्या रोज भडकपणे व उथळपणा दाखवणारी चित्रे येतात याचे फार नवल वाटते. थोडक्यात मटाही गल्लाभरूच झालाय. या पेक्षा देण्यासारखे खूप काही आहे. अगदी काहीच नसले तर निसर्गसौंदर्य टाका. ज्यांना सेक्स पाहिजे ते घेतील हो स्वत:ची सोय करून, तुम्ही नका पुरवू त्यांना मटेरियल. आपण मारे आरडाओरडा करू रे.... घेतेय कोण त्याची दखल. पण निदान यामुळे त्यांचे काही हजार वाचक नक्कीच कमी होतील. आपण-आपल्या घरचे-मित्रमैत्रिणी-ओळखीचे.... माउथ पब्लिसिटी...

    ReplyDelete
  17. मी ऑनलाइन मटा वचने खुप मागे सोडून दिले ... मी लोकसत्ता वाचतो ... मला तो अधिक माहिती पूर्ण वाटतो आता... :)

    ReplyDelete
  18. आभार भाग्याश्रीताई.. खरंच ती डावी बाजू भयंकरच झाली आहे. आणि ती टायटल्स तर असली डोक्यात जातात ना. हे असलं काही हवं असणारे इतर खंडीभर साईट्स मटाच्या साईटवर कशाला येतील? मटावर हे असले प्रकार देणं म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे. असो. हजारे हजारे लाखे साचे !! असेच हजार हजार करत एक दिवस सगळेजण मटा वाचण बंद करतील आणि मग आपसूकच त्यांना ते दावे प्रकार थांबवावे लागतील अशी अपेक्षा. बघू. हा लेख त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे फक्त..

    ReplyDelete
  19. रोहन, तेच करावं लागणार आहे आता. मला लोकसत्ता न आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे कुमार केतकरांच्या अग्रलेखांमध्ये आणि लोकसत्ताच्या एकूणच बातम्यांमध्ये काठोकाठ भरलेलं अनाठायी आणि अंध कॉंग्रेस प्रेम. वीट यायचा त्याचा म्हणून मागे लोकसत्ता वाचणं सोडलं होतं.. पण हल्ली लोकसत्ता इफेक्ट, मूषकांची मुंबई वगैरे जब्बरदस्त सदरांमुळे पुन्हा एकदा लोकसत्ता वाचावासा वाटायला लागला आहे !!

    ReplyDelete
  20. वृत्तपत्रे या जळाऊ लाकडांच्या वखारी आहेत. तो जळकेपणा लपविण्यासाठी अशा उपद्व्यापांची गरज पडते.

    ReplyDelete
  21. अनामिक, खरं आहे. पण अशा उपद्व्यापांनी तो जळकेपणा अधिकच उठून दिसतो दुर्दैवाने !!

    ReplyDelete
  22. अगदि मनातल लिहलत.आजकाल मटा वरती वाचण्यासारख काहीच नाही. अगदी Page3 करुन टाकलाय मटा. निव्वल ईग्रजी times मधले मराठी रुपातंर करुन टाकतात आणि ते ही सगळ ईग्लिशमराठी.
    आणि शीर्षक तर कहरच आहे त्यानचा तो.

    मी पण मटा वाचायच सोडुन दिलय.लोकसत्ता वाचतो आता. बाकी केतकरांचे राजकीय लेख(य़ात फक्त त्याचा एकच देव आहे) सोडले तर बाकीचे लेख विचार करायला लावणारे असतात.

    -
    सचिन

    ReplyDelete
  23. अरे हेरंब,
    नवभारत टाईम्सला शिव्या घालायचो आम्ही मित्र, थिल्लर थिल्लर म्हणून, पण मटा हळूहळू त्याच लेव्हल ला जातोय. आणि हा थिल्लरपणा कमी कि काय म्हणून हल्ली अग्रलेखांमध्ये उघड कॉंग्रेस मुखपत्राचे लेख असतात. उदा.”आता जनतेनेच ठरवायचे कि भाजप ला मत द्यायचे कि स्थैर्यासाठी कॉंग्रेसला”. तुम्ही खरं ते लिहा न, मुखपत्राचा आवेश कशाला. हे सगळं बघून डोकच सुन्न होता

    ReplyDelete
  24. हेरंब,
    सही रे - अगदी मनातलं आणि फटकारुन लिहिलंस!
    गेल्या वर्षी मी ही सकाळच्या ऑनलाईन जाहिराती बद्दल त्यांना लिहिलं होतं.. त्यावरही अशाच "उघड्या - नागड्या" जाहिराती - गुगलद्वारा - यायच्या. कदाचित मी भारताच्या बाहेरुन ती वेबसाईट पहात असल्याने अशी जाहिराती येत असाव्यात. पण म्हणुन काय झालं - वाचणारा - मी - मराठी - भारतीय - आहेच ना.. पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. मात्र आता तरी त्या जाहिराती दिसत नाहीत.

    म.टा. चं ही कदाचित तेच असावं. ऑनलाईन वाचक वाढवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात म्हण अथवा - अजुन कशाच्यातरी. म.टा.वर दिसणार्‍या या जाहिराती - बातम्या म्हणजे कळसच! काही दिवसांपर्यत तर सेक्स वरील आर्टीकल्स पहिल्या पानावर असायची - त्याच डाव्या - उजव्या - कॉलममध्ये.आता तु म्हणतोस त्या कॉलमच्या खाली आहे - "झणझणीत वेब मसाला" तोही तसाच... आणि कळस म्हणजे - त्याखाली आहे - आजचा गणपती!

    भले बहाद्दर!

    ReplyDelete
  25. एकुणच वृत्तपत्रांचा दर्जा पार घसरलाय.... त्यात चांगल्या दैनिकांचा नंबर लागला की दुःख होणारच.
    देव करो अन सगळे म.टा. वाचकांचे लक्ष या मुद्याकडे जावो. इंटरनेट आणि ब्लॉग खरोखरच वरदान आहेत असे मुद्दे लोकांना कळवण्याचा.

    ReplyDelete
  26. आभार सचिन.. ब्लॉगवर स्वागत. खरंच एवढ्या सोन्यासारख्या पेपरची वाट लावून टाकली या मुर्ख लोकांनी. आणि ती शीर्षकं तर नुसती वात आणतात.. केतकरांचा एकच देव तो म्हणजे कॉंग्रेस आणि सोनिया/राहुल. पण त्या माणसाचा व्यासंग, वाचन, अनुभव अफाट दांडगा आहे. पण एवढं सगळं कुठेतरी वाया जातं असं वाटतं मला. असो जास्त नावं ठेवून नाही चालणार. आता लोकसत्ताच वाचायचा आहे.

    ReplyDelete
  27. अगदी बरोबर विद्याधर. इतरांना नावं ठेवता ठेवता मटा पण त्याच वाटेने जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. होना अगदी खरं. हल्ली पूर्वी सारखे निष्पक्षपाती लेख नसतातच. सगळे एकांगी. सगळी घाण झालीये साली !!

    ReplyDelete
  28. आभार भुंगाभाऊ :-) .. वा तुझ्या मेलने त्यांनी तसल्या जाहिराती बंद तरी केल्या. मटाचे डोळे कधी उघडणार आहेत देव जाणे. अशा पद्धतीने त्यांचे ऑनलाइन वाचक वाढतात असं त्यांना वाटत असेल तर तो नक्कीच त्यांचा भ्रम आहे. उलट अशाने वाचक कमी होतात. असले प्रकार बघण्यासाठी कोणी मटा ऑनलाइन वर कशाला विजिट करेल? इतर अनेक साईट्स आहेत की असल्या मागण्या पुरवणार्‍या..

    आणि हो अगदी खरं. त्याखालीच "आजचा गणपती" .. हा म्हणजे खरंच कहर झालाय !!!! :-(

    ReplyDelete
  29. प्रशांत, ब्लॉगवर स्वागत !!

    अगदी खरंय सगळी वृत्तपत्र म्हणजे एकाला झाकावं आणि दुसर्‍याला काढावं अशी झाली आहेत. पण त्यात मटाचं नाव आलं त्यामुळे वाईट वाटतं. मला वाटतं आपल्यासारखेच इतरही अनेक लोक वैतागले असणार आणि मेलामेली झाली असणार. पण तरीही मटाला जाग येत नाहीये. लवकरच कर्माची फळं भोगायला लागतील. हिट्स कमी झाल्या की कळेल.

    आणि ब्लॉग म्हणजे खरंच खूपच सशक्त माध्यम आहे आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचवायला !!

    ReplyDelete
  30. मी पण मटा रोज वाचायचे online नव्हे खराखुरा, पण आता तो सुद्धा वाचण बंद केलयं कारण काहिच्या काही बातम्या. तसेच बातम्या कमी जाहिराती जास्त.
    Online मटा काहीवेळा पाहिला आहे, डावी बाजू फारच भयानक!
    सोनाली

    ReplyDelete
  31. सोनाली, हो ना बातम्या/अग्रलेख हल्ली बरेच एकांगी व्हायला लागले आहेत. पण ती डावी बाजू फारच भयंकर झाली आहे. डोकं फिरतं नुसतं !!

    ReplyDelete
  32. आता एवढ्या कॉमेंट्स मध्ये सर्व मुद्दे आले आहे तेंव अजून काय बोलणार...सर्वानी मेल पाठवा बागू काही फरक पडतो का ते...
    परत एकदा सांगतो तू चांगल लिहितोस.. :)

    ReplyDelete
  33. सागर, तुला आभार आवडत नाही म्हणून आभार नाही म्हणत :-) .. आणि हो ते मेल्स बाउन्स होतायत. योग्य इमेल आयडी मिळालं की मी टाकतो इथेच. मग सगळेजण इमेल्स करू शकू...

    ReplyDelete
  34. मी ऑनलाइन मटा वाचणे खुप मागे सोडून दिले ... मी लोकसत्ता वाचते ... लहानपणापासून कायम लोकसत्ता वाचायची सवय होती मला पण सुरूवातीला मटा ऑनलाईन वाचला काही दिवस.... आणि मग तेच डावी भयंकर बाजू पाहिली आणि नाद सोडला....

    खणखणीत झालेत तुझे मुद्दे...

    ReplyDelete
  35. खरंच खूप सुखी आहेस ग तू तन्वी. आणि लकीही... लोकसत्ता मी केतकरांच्या अंध-कॉंग्रेस-प्रेमामुळे बंद केला. पण आता मटाची डावी बाजू पाहता अंध-कॉंग्रेस-प्रेम परवडलं असं वाटायला लागलं आहे. आणि अर्थात लोकसत्ताची बरीच सदरं हल्ली खुपच वाचनीय असतात नक्कीच !!

    ReplyDelete
  36. हेरंब!
    योग्य शब्दात प्रत्येक (सुजाण) मटा वाचकांच्या भावनेला तु वाचा फोडलीस ......पुर्वी आंतरजालावर प्रवेश करताच मटाला भेट देण्याची सवय गेल्या काही काळापासुन जाणिवपुर्वक मोडून काढली......दिवसाची सुरुवात असे काहीसे बघुन व्हावी हे टाळण्याचा हा प्रयत्न, कारण नंतरचे २४ तास हे असल बकवास काहितरि
    वाहिन्यांच्या व वॄत्तवाहिन्यांच्या कृपेने नजरेस पडतेच.
    खरच या पत्राची गरज होतीच.......आणि तु मांडलेले मत हे नक्कीच प्रातिनिधिक आहे..
    अनामिका

    ReplyDelete
  37. आभार अनामिका. मीही आंतरजालावर आल्यावर मटाची लिंक उघडण्याचा मोह टाळून इतर साईट्स वर जातोय. होईल सवय हळूहळू..

    या आणि अशा अनेक त्रस्त वाचकांच्या पत्रांमुळे मटाचे डोळे उघडतील अशी क्षीण आशा करू !!

    ReplyDelete
  38. हेरंब अगदी मनातल लिहल आहेस. . .मी तर म.टा. वाचायच सोडून दिलय. . .त्यापेक्षा लोकसत्ता चांगला आहे.खुप माहितीपूर्ण असतो!!

    ReplyDelete
  39. हेरंब यांची डावी बाजु पाहुन पाहुन मी डावखुरी असल्याचं पण वाईट वाटायला लागलं होतं बघ..म्हणून मग तुला तो आणि ती च्या वेळी म्हटलं की लिही बाबा....अगदी योग्य शब्दात कानउघाडणी केलीस खरी पण हे बोके गळ्यात घंटा बांधुन घेणार आहेत का माहित नाही..मी तर माझ्या बाबांना घरचा म.टा.ही बंद करायला लावला आहे....त्यांना कदाचित फ़रक पडणारही नाही पण असलं काही आपल्या डोळ्यासमोरून काढून आपण स्वतःसाठी नक्कीच फ़रक पाडू शकतो....तसंही त्यांच्या मराठी बाबतीत म्हणायला तर आपुले बापुडे शब्दही कमीच पडतील पण संस्कृती म्हणजे रे काय रे भाऊ असंही विचारायला लागावं म्हणजे अती होतंय....

    ReplyDelete
  40. खरं आहे मनमौजी.. मी पण सोडला मटा.. परवापासून. जिद्दीने सिगरेट सोडणा-या लोकांना कसं वाटत असेल तसं होतंय मला आत्ता. पण सुदैवाने अजून एकदाही गेलेलो नाही मटाच्या साईटवर. ३ दिवसात.. That's record for me.. आता लोकसत्ताची सवय करावी लागेल.

    ReplyDelete
  41. हो.. तू 'तू आणि ती' च्या वेळी म्हणालीस तेव्हापासून घोळत होतं डोक्यात पण परवा somehow कडेलोट झाला म्हणून मग लिहून काढलं. त्यांना काही फरक पडणार नाही हे नक्की. पण आपल्या मनाला समाधान आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे चुकून माकून यामुळे का होईना अनेक लोकांनी मटा वाचणं बंद केलं तर चांगलाच फरक पडेल.
    अग आणि यांच्या डाव्या बाजुमुळे तुला कशाला वाईट वाटायला हवं. in fact lefties are genious in their respective fields. लारा, दादा.. सॉरी लेफ्टी, रायटी म्हटलं कि फक्त क्रिकेटच आठवतं म्हणून तिथलीच नावं दिली :)

    ReplyDelete
  42. म टा बद्दल काय बोलावे!! मला लिहताना प्रचंड शरम वाटते पण जे लोक "बायकोच्या दुधाचे चीज बनवले" अशी बातमी फोटो सकट डावीकडच्या बाजूला बेशरम पणे देतात त्यांचा कडून कसली अपेक्षा करणार? माझ्या अगदी मनातले लिहले आहे तुम्ही!

    ReplyDelete
  43. संपादक बदला कि अशीच वाट लागते,आपण त्यांना पत्रं लिहून कळवले हे फार चांगले केले ,कुणीतरी हे करावयास पाहिजे होते,आभिनंदन काका

    ReplyDelete
  44. प्रसाद, अगदी अगदी.. मी पण ती बातमी बघून असा संतापलो होतो ना मटावर.. आणि हे असले प्रकार गेले कित्येक महिने चालु आहेत. शेवटी सगळी खदखद बाहेर निघाली या लेखातून !!!

    ReplyDelete
  45. काका, आभार. पण मी मेल भारतकुमार राउत यांनाच केलं आहे (कारण फक्त त्यांचाच आयडी मला मिळाला). बघुया ते अशोक पानवलकरांना काही निरोप देतात का ..

    ReplyDelete
  46. गेल्या वर्षीपर्यंत माझ आवडत वर्तमान पत्र होत हे....पण आता...तुम्ही अगदि मनातल लिहल आहे..

    ReplyDelete
  47. धन्स .. हो रे. माझा तर दिवस सुरु होत नसे मटा शिवाय. गेली अनेक वर्षं... :-( ..

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...