Sunday, December 31, 2023

२०२३ चा वाचनप्रवास

२०२३ चा वाचनप्रवास

 

असत्यमेव जयते : अभिजीत जोग

ओरिजिन : डॅन ब्राऊन (अनुवाद : मोहन गोखले)

व्योमकेश बक्षी (भाग १) : शरदिंदू बंदोपाध्याय (अनुवाद : अशोक जैन

अरुणाची गोष्ट : पिंकी विराणी (अनुवाद : मीना कर्णिक)

डिटेक्शन ऑफ क्राईम : विलास तुपे

खेलंदाजी : द्वारकानाथ संझगिरी

कॉलिंग सेहमत : हरिंदर सिक्का (अनुवाद : मीना शेटे संभू)

जेव्हा मी जात चोरली होती : बाबुराव बागूल

फाळणीचे दिवस : गोविंद कुळकर्णी

१०

चंद्रविलास : नारायण धारप

११

आनंदमठ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (अनुवाद : कांचन जोशी)

१२

शौझिया : डेबोरा एलिस (अनुवाद : अपर्णा वेलणकर)

१३

यस, आय अ‍ॅम गिल्टी : मुनव्वर शाह

१४

संवाद : अच्युत गोडबोले

१५

डोनाल्ड ट्रम्प : अतुल कहाते

१६

मयादा इराकची कन्या : जीन सॅसन (अनुवाद : भारती पांडे)

१७

डायल डी फॉर डॉन : नीरज कुमार (अनुवाद: भारती पांडे)

१८

द लायन्स गेम : नेल्सन डेमिल (अनुवाद : अशोक पाध्ये)

१९

ओ हेन्रीच्या लघुकथा : अनुवाद : अनघा देशपांडे

२०

हाच माझा मार्ग : सचिन पिळगांवकर

२१

ड्रॅक्युला :  ब्रॅम स्टोकर  (अनुवाद : स्नेहल जोशी)

२२

द सिम्पल ट्रूथ : David Baldacci (अनुवाद : सुधाकर लवाटे)

२३

सोहळा : जयवंत दळवी

२४

इन द नेम ऑफ ऑनर : मुख्तार माई (अनुवाद : उल्का राऊत)

२५

अनिताला जामीन मिळतो : अरुण शौरी (अनुवाद : उदय भिडे)

२६

फुल ब्लॅक : ब्रॅड थॉर (अनुवाद : बाळ भागवत)

२७

सिमी : विजय वाघमारे

२८

पाकिस्तानचे जन्मरहस्य : व्ही. व्ही. नगरकर (अनुवाद: माधव लिमये)

२९

ओपेनहायमर : माणिक कोतवाल

३०

साम्राज्य बुरख्यामागचे : कारमेन बिन लादेन (अनुवाद : अविनाश दर्प)

३१

इनसाइड द गॅस चेंबर्स : श्लोमो व्हेनेत्सिया (अनुवाद : सुनीति काणे)

३२

गबाळ : दादासाहेब मोरे

३३

गांधी आणि आंबेडकर : गंगाधर बाळकृष्ण सरदार

३४

लैंगिक नीती आणि समाज : श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

३५

ओ : शरणकुमार लिंबाळे

 

 

सेतुमाधवराव पगडी

३६

एका माळेचे मणी

३७

भारतीय मुसलमान शोध आणि बोध 

३८

१८५७ चे आणखी काही पैलू

३९

काश्मीर : एक ज्वालामुखी

 

शेषराव मोरे

४०

अखंड भारत का नाकारला?

४१

सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद

४२

गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी

 

डॉ एस एल भैरप्पा - (अनुवाद : उमा कुलकर्णी)

४३

काठ

४४

मंद्र

 

रा चिं ढेरे

४५

लज्जागौरी

४६

श्री आनंदनायकी

 

डॉ श्रीरंग गोडबोले

४७

भागानगर (हैदराबाद) निःशस्त्र प्रतिकार

४८

बौद्ध-मुस्लिम संबंध

४९

इस्लामचे अंतरंग

 

ध्रुव भट्ट

५०

सागरतीरी

५१

तिमिरपंथी

 

अनुज धर

५२

नेताजींचा मृत्यू - भारताचे सर्वात मोठे रहस्य : अनुवाद - डॉ मीना शेटे-संभू

५३

युवर प्राइम मिनिस्टर इज डेड : अनुवाद - सीमा भानू

 

ना ह पालकर

५४

डॉ हेडगेवार (चरित्र) 

५५

इस्रायल - छळाकडून बळाकडे

 

रमेश पतंगे

५६

मी, मनु आणि संघ

५७

पाकिस्तान : सेक्युलर राज्य ते धर्मांध राज्य

 

वि. ग. कानिटकर

५८

इस्रायल - युद्ध, युद्ध आणि युद्धच

५९

धर्म - महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा

 

दिनेश कानजी

६०

त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार

६१

उसबा

 

विजय तेंडुलकर

६२

कन्यादान

६३

कमला

६४

बेबी

 

निरंजन घाटे

६५

शोधवेडे शास्त्रज्ञ

६६

आपल्या पूर्वजांचे विज्ञान

 

सुधा मूर्ती

६७

महाश्वेता : अनुवाद - उमा कुलकर्णी

६८

पितृऋण : अनुवाद - मंदाकिनी कट्टी

 

वसंत वसंत लिमये

६९

टार्गेट असद शहा

७०

कॅम्प फायर

 

फ्रेडरिक फॉर्सिथ

७१

द ओडेसा फाईल : अनुवाद : अशोक पाथरकर

७२

किल लिस्ट : अनुवाद - बाळ भागवत

 

सिडने शेल्डन

७३

ब्लडलाईन - अनुवाद : विजय देवधर

७४

द नेकेड फेस - अनुवाद : विजय देवधर

७५

टेल मी युअर ड्रीम्स - अनुवाद : अनिल काळे

७६

नथींग लास्ट्स फॉरेवर - अनुवाद : डॉ अजित कात्रे

७७

द बेस्ट लेड प्लॅन्स - अनुवाद : अनिल काळे

७८

मॉर्निंगनून अँड नाईट - अनुवाद : माधव कर्वे

 

सुहास शिरवळकर

७९

सहज

८०

मंत्रजागर

८१

चूक-भूल देणे घेणे

८२

प्राक्तन

८३

जाई

 

वपु

८४

कर्मचारी

८५

पार्टनर

 

डॉ. बाळ फोंडके

८६

ओसामाची अखेर

८७

भिंतींना जिभाही असतात

८८

गोलमाल

 

पूनम छत्रे (अनुवाद)

८९

प्राईज अ‍ॅक्शन ट्रेडिंग : इंद्रजित शांतराज

९०

लोकशाहीचे वास्तव : जोजी जोसेफ

९१

स्कॅम : देबाशिष बसू, सुचेता दलाल (अनुवाद : अतुल कहाते, पूनम छत्रे)

 

English

९२

Who painted my money white : Sree Iyer

९३

A river in darkness : Masaji Ishikawa

९४

Propaganda : Edward L. Bernays

९५

The Firm : John Grisham

९६

Friends, Lovers, and the Big Terrible Thing : Matthew Perry

Lee Child

९७

The Secret

९८

Bad luck and trouble

 

Andy Weir

९९

The Martian

१००

Project Hail Mary

 

Ian Fleming

१०१

Dr No

१०२

Goldfinger

१०३

Octopussy

Monday, December 25, 2023

प्रगत समाज आणि विकसित संस्कृतीला मान खाली घालायला लावणारं आत्मकथन : बिराड - अशोक पवार

सुखवस्तू जीवनशैलीचा उपभोग घेणाऱ्या शहरी वाचकांसाठी दलित साहित्य हा कायमच हादरून टाकणारा अनुभव असतो. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मकथन अशा विविध स्वरूपात व्यक्त झालेल्या दलित समाजाच्या भावनांच्या मुळाशी मात्र दुर्दैवाने त्यांच्या नशिबी आलेल्या हालअपेष्टा, दुःख, छळ, उपासमार, मारहाण, शिक्षणाचा ध्यास आणि त्यासाठी उपसलेले अविश्वसनीय कष्ट यांचीच भयकारी वर्णनं असतात. लक्ष्मण माने यांच्या 'उपरा', दादासाहेब मोरे यांच्या 'गबाळ' पासून ते अशोक जाधव यांच्या 'भंगार', लक्ष्मण गायकवाड यांच्या 'उचल्या' पर्यंत असो किंवा मग शरणकुमार लिंबोळे यांच्या 'अक्करमाशी', किशोर शांताबाई काळे यांच्या 'कोल्हाट्याचे पोर' पासून ते दया पवार यांच्या 'बलुतं' आणि आनंद यादव यांच्या 'झोंबी' पर्यंत कुठल्याही पुस्तकाचं कुठलंही पान उघडून बघितलं असता निव्वळ जातीपातींच्या अर्थहीन भेदांपायी या समाजातल्या लोकांना उर्वरित समाजाकडून दिल्या गेलेल्या, माणुसकीला लाजवेल अशा असह्य छळांच्या वर्णनांनी भरलेले प्रसंग वाचायला मिळतात. अशा कित्येक पुस्तकांमधून शिळ्या भाकरीच्या तुकड्यापायी करावी लागणारी वणवण, पोलिस आणि स्थानिक 'तथाकथित' प्रतिष्ठित लोक यांच्याकडून केले जाणारे अन्याय, हालअपेष्टा, माणुसकीला लाजवेल अशी दिली जाणारी वागणूक यांची वर्णनं अनेक वर्षं वाचून हळूहळू शहरी मनही निबर होत जातं आणि त्या वर्णनांची सवय होत जाते...... ..... ..... ..... असं आपल्याला वाटत असतानाच आपल्या हातात अशोक पवारांचं 'बिराड' पडतं आणि आपण सर्वस्व गमावल्यागत नैराश्याच्या काळ्याकुट्ट धुक्याने झाकोळून गेलो आहोत असं वाटायला लागतं.


अशोक पवारांचं 'बिराड' मी गेल्यावर्षी वाचलं आणि अंतर्बाह्य हादरून गेलो. अनेकदा प्रयत्न करूनही लिहायचा धीर झाला नाही. 'बेलदार' जमातीत जन्माला आलेल्या पवारांच्या आत्मकथनात जातीभेद आहे, छळ आहेत, बलात्कार आहेत, गर्भपात आहेत, उपासमार आहे, तुरुंगवास आहे, मारझोड आहे, पोलीसी अत्याचार आहेत, पेटवलेल्या झोपड्या आहेत, पुरात वाहून गेलेले तंबू आहेत आणि हे सगळं पानोपानी आहे. वाचकाला असह्य आणि हतबल करून सोडेल अशा विपुल प्रमाणात आहे. पुस्तकाबद्दल लिहीत असताना ते अनुभव पुन्हा आठवतानाही अंगावर शहारा यावा असे एकेक भयंकर प्रकार आहेत. त्यामुळे शक्य  तेवढ्या संक्षिप्त स्वरूपात लिहून काढण्याचा प्रयत्न आहे.

वस्तीवर हल्ले करून लहान मुलांना उचलून नेणाऱ्या वाघाची नुसत्या कुऱ्हाडीनिशी शिकार करणारी निडर जमात, समाजातील जातीभेदाच्या हल्ल्यांना मात्र केवळ आणि केवळ, सामाजिक उतरंडीत निम्नतम् स्थानी असल्याने, तोंड देऊ शकत नाही. 

पोलिसांनी केलेले अन्याय आणि अत्याचार, गावच्या सरपंच/पाटलांनी केलेले अत्याचार/बलात्कार आणि बेलदार जमातीच्या जातपंचायतीने त्यांच्याच लोकांसाठी केलेले विचित्र न्यायदान, असे अन्याय आणि अत्याचारांचे असंख्य विकृत प्रकार या पुस्तकात वाचायला मिळतात (वाचावे लागतात!). आणि या सर्व प्रकारच्या अत्याचारांना बळी पडणाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या सर्वाधिक असते हे आवर्जून वेगळं सांगायला नकोच. अनेक प्रसंगांमध्ये चोरीच्या निव्वळ आरोपांवरून बायकांना पोलीसस्टेशनमध्ये नागवं केलं जातं, त्यांच्यावर बलात्कार केले जातात, बायकांबरोबरच त्यांच्या मुलांनाही अमानुष मारहाण केली जाते, पोलीस मारहाणीत निर्दोष जीवांचे मृत्यू होतात, आणि हे पुरेसं नाही म्हणून वेळोवेळी गावचे प्रमुख (सरपंच/पाटील) हे ही अन्याय आणि विशेषतः लैंगिक अत्याचारांमध्ये बरोबरीने सहभागी होतात.

प्रगत समाज आणि विकसित संस्कृतीत मनुष्याचा जीव हा सर्वाधिक महत्वाचा समजला जातो. मात्र बेलदारांच्या जीवाला (न)असलेली किंमत बघून काळीज पिळवटून जातं. एका प्रसंगात बेलदार लोक एका गावात मुक्कामाला येतात. गावातल्या देवळात ते मुक्काम करणार तोच तिथे जागा नाही असं सांगून त्यांना तिथून पिटाळून लावलं जातं आणि एका पडक्या शाळेत जायला सांगितलं जातं. नेमकं तेव्हाच महाप्रलयी पावसाला सुरुवात होते. रात्रीच्या अंधारात, विजांच्या कडकडाटात, वादळी वाऱ्याला तोंड देत, रस्त्यातले खाचखळगे आणि नाले चुकवत बिराड शाळेच्या दिशेने मार्गक्रमणा करत असतानाच काळ्याकुट्ट अंधारात अचानक एका ओल्या बाळंतिणीच्या हातातलं तान्हं बाळ पाण्यात पडतं, वाहून जातं आणि हरवतं! प्रचंड शोधाशोध करूनही ते मिळत नाही.

पोलिसी बलात्काराचा परिपाक म्हणून जन्माला आलेलं नवजात बाळ जन्मताक्षणीच न्हाणीघरात जिवंत पुरून टाकायला लावलं जातं. एका प्रसंगात गरोदर सरीच्या पोटावर बुक्क्या मारून मारून तिचा गर्भपात केला जातो. अन्य एका प्रसंगात अंधारात उकळत्या चहाच्या भांड्यातला चहा अंगावर पडल्याने भाजून तडफडत तडफडत मृत्यमुखी पडलेल्या दुर्दैवी सोजीचं वर्णन वाचायला लागतं. अशी बघताबघता किडामुंग्यांप्रमाणे मरणाऱ्या माणसांची वर्णनं वाचून आपल्या समाजाची घृणा वाटायला लागते.

ही परवड मृत्यूनंतरही संपत नाहीच. एका प्रसंगात बेलदार लोकांनी एका लहान मुलीचं प्रेत अन्य जातीच्या लोकांच्या स्मशानात पुरलं म्हणून त्यांना ते जबरस्तीने उकरून काढायला लावून गावाबाहेर लांब नेऊन पुरायला लावलं जातं. हे असे कित्येक विकृत आणि भीषण प्रसंग वाचताना अंगावर भयाने शहारे येत राहतात.

या आत्मकथेत बेलदार समाजातल्या स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या दुर्दैवाच्या दशावतारांची काळीज पिळवटून टाकणारी वर्णनं आहेत. गावकरी किंवा पोलीस तर या स्त्रियांचा मग्रुरीने व उद्धटपणे उपभोग घेताना दिसतातच पण नात्यागोत्यातले पुरुषही ह्या स्त्रियांवर बरोबरीने तुटून पडताना दिसतात.

जमातीच्या जातपंचायतीने स्त्रियांचा जो छळ केला आहे तो तर केवळ रानटी प्रकारचा आहे. जातपंचायतीचे पंच दारू पिऊन न्यायनिवाडा करतात. जो पक्ष जास्त पैसे आणि दारू पुरवेल त्या पक्षाच्या बाजूने निवाडा करणाऱ्या जातपंचायतीची निकालपद्धत अक्षरशः जंगली आणि अनाकलनीय आहे. जात पंचायतीने दिलेल्या शिक्षा भोगतानाचे वर्णन हादरवून टाकणारं आहे.

भूक ही या आणि अशा प्रकारच्या कुठल्याही समाजाच्या पाचवीला पुजलेली समस्या! यांना दिवस चे दिवस खायला मिळत नाही. अशा वेळी लहान मुलं भुकेपोटी रडायला लागल्यावर आईबाप त्यांना आकाशाकडे बघायला सांगतात. आकाशाकडे बघितलं की भूक नाहीशी होते अशी यांची श्रद्धा आहे. काही वेळा भूक इतकी अनावर होते की ही मुलं अक्षरशः रस्त्यावरच्या कुत्र्याचा पाठलाग करून त्याच्या तोंडची भाकर पळवायलाही मागे पुढे पाहत नाहीत.

बेलदार जमातीत जातीपातीचा पगडा किती खोलवर रुजला आहे या प्रसंगाचं एक भयानक वर्णन आहे. बेलदार समाजातल्या एका मुलाने एका ब्राह्मण मुलीशी लग्न केलं म्हणून त्या दोघांना आणि मुलीच्या आईवडिलांना बेलदार लोक घरी बोलावतात, त्यांना बेदम मारहाण करतात, मारहाण करून झाल्यानंतर त्या मुलाला तिथेच बांधून ठेवलं जातं आणि मुलगी आणि तिच्या आईवडिलांना तिथून निघून जायला सांगितलं जातं. नंतर हे सगळं बघून दुःखातिरेकाने तो मुलगा आत्महत्या करतो. तर बेलदार लोक त्याला तिकडेच पुरून टाकतात आणि काही घडलंच नाही अशा प्रकारे तिथून निघून जातात.

आणि हे निव्वळ काही निवडक प्रसंग आहेत. संपूर्ण पुस्तकभर या अन्यायाच्या खुणा पसरलेल्या आहेत. लेखक आणि संपूर्ण बेलदार समाजाने काय आणि किती भोगलं आहे याची सामान्य शहरी वाचक कल्पनाही करू शकत नाही आणि कल्पना करू शकला तरी हे सत्य आहे यावर त्याचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे गेल्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं तेच पुन्हा लिहितो. "फार काय लिहिणार? आपल्या जबाबदारीवर वाचा एवढंच म्हणू शकतो!"

--हेरंब ओक

Monday, December 11, 2023

विकृततेची परिसीमा : इन्साइड द गॅस चेंबर्स

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनांनी उभारलेल्या छळछावण्या, लाखो ज्यूंची करण्यात आलेली कत्तल या विषयांवर शिंडलर्स लिस्ट, बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज, द पियानिस्ट असे कित्येक पुस्तकं/चित्रपट प्रकाशित झाले आहेत. परंतु 'इन्साईड द गॅस चेम्बर्स' या सर्वांहून थोडं वेगळं आहे आणि एक पाऊल पुढे आहे. इतर पुस्तकांमध्ये वाचायला मिळणारी छळछावण्यांची वर्णनं या पुस्तकातही वाचायला मिळतातच परंतु वेगळं आणि एक पाऊल पुढे यासाठी की यातली वर्णनं प्रत्यक्ष झॉंडरकमांडो मध्ये काम करावं लागलेल्या आणि केवळ नशिबाच्याच बळावर तिथून सुटू शकलेल्या एका कैद्याच्या लेखणी/वाणीतून उतरलेली आहेत.

काय आहे हे झॉंडरकमांडो?

सुरुवातीच्या काळात रोज शेकडो/हजारो ज्यूंना गॅस चेम्बर किंवा अन्य मार्गांनी ठार केल्यानंतर जमिनीत मोठे खड्डे करून त्यांना सामूहिकरीत्या पुरलं जाई. परंतु जागेचा अभाव, पुरावे उरण्याची शक्यता आणि अशाच अन्य कारणांमुळे ही प्रेतं जाळण्याचा फतवा निघाला. त्यासाठी २४ तास चालू राहणाऱ्या मोठ्या भट्ट्या उभारण्यात आल्या. या अर्थातच या लोकांना जाळण्यासाठी (आणि तत्पूर्वी त्याचने कपडे, चीजवस्तू जमा करणे) यासाठी अन्य ज्यू कैद्यांशिवाय दुसरा उत्तम (!) पर्याय कुठला असणार होता? आपल्याच देश-धर्म बंधु-भगिनींच्या प्रेतांना भट्ट्यांमध्ये टाकून देऊन निर्दयीपणे जाळण्याचं दुर्दैवी काम करण्यासाठी ज्या कामकरी तुकड्या बनवण्यात आल्या त्यांना विशेष तुकड्या (स्पेशल युनिट) अर्थात झॉंडरकमांडो असं गोंडस नाव देण्यात आलं.



अशाच एका झॉंडरकमांडो मधील श्लोमो व्हेनेत्सिया या ग्रीक ज्यू कैद्याच्या छळछावण्यांमधील अनुभवांवर आधारित, मुलाखतीच्या स्वरूपातलं पुस्तक म्हणजे ' इनसाइड द गॅस चेंबर्स'.
पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनीति काणे यांनी केला आहे. अनेक कैदी आपल्या आठवणी, अनुभव, पत्रं लिहून काढून ते कागद छळछावण्यांच्या आवारात पुरून ठेवत असत. हा सगळा विनाशकारी वाईट काळ संपल्यावर कदाचित कधीतरी, कोणाच्यातरी हाती आपली ही दुर्दैवी कहाणी पडेल आणि ती आपल्या मित्र-मत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, जगापर्यंत पोचेल या वेड्या आशेवर लिहिलेल्या या आठवणींमधील काही पत्रं नंतर खरोखरच जगाच्या नजरेस पडली. अशा पत्रांमधल्याही अनेक अनुभवांचा आणि प्रसंगाचा या पुस्तकात उल्लेख आहे.

झॉंडरकमांडोमध्ये काम करणारे लोक तुलनेने सुदैवी म्हंटले जातात कारण त्यांना बऱ्यापैकी अन्न, विश्रांती, कपडे मिळत असत. परंतु त्या बदल्यात त्यांना करावं लागणार किळसवाणं काम बघता त्यांना सुदैवी म्हणणं कितपत योग्य आहे हाही प्रश्न पडतोच. प्रेतं जाळल्यानंतर, तिथल्या साच्याला त्या प्रेतांची कातडी, मांस चिकटून राहत असे. ते मांस खरडून काढणे, शिल्लक राहिलेल्या हाडांचं चूर्ण करून ते दूरवर टाकून येणे, खोलीत पडलेले रक्तामांसाचे डाग पाण्याने धावून काढून खोलीची रंगरंगोटी करणे असली भयानक कामं झॉंडरकमांडोच्या तुकडीला नियमितपणे करावी लागत असत. झॉंडरकमांडोंच्या तुकड्या निवडक कालावधीत बदलल्याही जात असत. नवीन तुकडी आली की जुन्या चमूचं काय होत असे हे सांगायला आपण हिटलर असण्याची आवश्यकता खचितच नाही. ज्या भट्ट्यांमध्ये दिवसचे दिवस अत्यंत विकृत स्वरूपाचं काम करावं लागलं त्याच भट्ट्यांचा घास व्हावं लागणं याला दुर्दैव म्हणावं की काव्यात्म न्याय हे ज्याचं त्याने ठरवायचं.

श्लोमो व्हेनेत्सिया तुलनेने सुदैवी यासाठी की त्याची तुकडी अनेक आठवडे बदलली गेली नाही. काही वेळा नवीन ज्यू कैदी येण्याचं बंद झाल्याने किंवा कधी त्याच्या तुकडीचं अन्य छळछावणीत स्थलांतर झाल्याने त्याची झॉंडरकमांडोमधली नियुक्ती कायम राहिली. तुलनेने सुदैवी म्हणण्याचं कारण हे की जीव तर वाचला परंतु जे भयानक शारीरिक, मानसिक आघात आयुष्यभर झाले, त्यांनी ज्या खोल जखमा दिल्या त्या या जन्मी तरी भरून येऊ न शकणाऱ्या अशाच!

श्लोमो व्हेनेत्सियाच्या अनुभवांचं अजून एक किंवा किंबहुना सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य हे की त्याच्या (आणि त्याच्यासारख्या इतरांच्या) लिखित अनुभवांमुळे झॉंडरकमांडोसारखी विकृत जागा/पद्धती अस्तित्वात होती हे तरी जगाला कळलं. कारण हे काम इतक्या गुप्त पद्धतीने चालत असे की तिथे कोणालाही (कुठल्याही जिवंत माणसाला) प्रवेश नसे. आपल्या अनुभवांबद्दल लिहिताना व्हेनेत्सियाला आपल्या कृत्यांबद्दल वाटत असलेल्या पश्चात्तापाबद्दलचे उल्लेख वारंवार वाचायला मिळतात. तो म्हणतो की मी स्वतःच्या हाताने कोणालाही मारलं नाही, पण त्यानंतर प्रेतांचं जे करावं लागलं त्याला माझा इलाज नव्हता. मला जिवंत राहण्यासाठी तो एकमेव मार्ग होता. छळछावणीत अन्नावरून होणाऱ्या मारामाऱ्या, चोऱ्या, लुबाडणूक यांचेही उल्लेख तो अनेकदा करतो. हे सगळं केलं नसतं तर जिवंत राहिलेल्या मूठभर सुदैवी ज्यूंमध्ये आपण राहिलो नसतो. आमच्यात एकी नव्हती. एकी केली असती तर सगळेजण ठार झालो असतो. मी फक्त माझा जीव वाचवण्याचे प्रयत्न करत होतो आणि त्यासाठी लागेल ते करायला तयार होतो अशी खेदपूर्वक कबुलीही तो देतो. छळछावणीत त्याचा भाऊ, काका, बहीण भेटण्याचे प्रसंग, काकाचं प्रेत भट्टीत न्यावं लागण्याचा प्रसंग वाचताना अक्षरशः गुदमरल्यासारखं होतं.

फार काय लिहिणार? आपल्या जबाबदारीवर वाचा एवढंच म्हणू शकतो!

--हेरंब ओक 

 

Monday, June 19, 2023

इस्लाम ते सनातन, घरवापसीचा एक अविश्वसनीय प्रवास!

 "इथे आत्ता माझ्यासमोर अनेक पालक बसलेले आहेत ज्यांची मुलं सज्ञान वयाची असतील" तोडक्या मोडक्या हिंदीत व्यासपीठावरून एक प्रश्न येत होता, "तर अशा पालकांना त्यांच्या मुलांनी जर वाईटसाईट बोलून अपमान केला, तुमचा माझा काही एक संबंध नाही असं म्हंटलं, तर कसं वाटेल?" 

संपूर्ण सभागृह शांत होतं. अर्थपूर्ण विरामानंतर तोच आवाज पुढे बोलू लागला, "मी केलंय असं, मी अशी वागले आहे माझ्या पालकांशी". एक जोरदार आघात व्हावा त्याप्रमाणे संपूर्ण प्रेक्षागृहाला धक्का बसला होता. "मी आपल्या हिंदू मंदिरात जाऊन थुंकले आहे, देवदेवतांच्या मूर्त्यांना शिव्या दिल्या आहेत, घरात होणाऱ्या पूजाअर्चेला विरोध केला आहे, देवाचा प्रसाद खायला नकार दिला आहे."


प्रेक्षकांना एकामागून एक धक्के बसत होते. व्यासपीठावरून ओ श्रुती बोलत होत्या. निमित्त होतं वंदे मातरम संघ आणि दीनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'धर्मांतराचे वास्तव आणि सामान नागरी कायदा' या कार्यक्रमाचं. संध्याकाळी ५ वाजता, आणि ते ही सोमवारी संध्यकाळी, होणारा कार्यक्रम सुमारे साडे चार पासूनच हाऊसफुल व्हायच्या बेतात आला होता. सभागृहात किमान तीनशे प्रेक्षक उपस्थित होते तर किमान साठेक लोकांनी तर उभं राहून कार्यक्रम बघितला. आणि तरीही कोणाचीही कसलीही तक्रार नव्हती. 

'ओम नमः शिवाय' च्या धीरगंभीर मंत्राने सुरुवात करून आपल्याला हिंदी नीट येत नसल्याबद्दल क्षमा मागून आपण हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलणार असल्याचे सांगून ओ श्रुती यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. एका हिंदू संस्कारयुक्त घरात बालपण गेल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनादरम्यान आलेले अनुभव सांगायला सुरुवात केली. 'केरला स्टोरी' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हळूहळू गोड बोलून, टोमणे मारून, हिंदू देव देवतांना नावं ठेवून हिंदू धर्माबद्दल पायरीपायरीने अविश्वास, तिरस्कार आणि क्रोध उत्पन्न होईल अशा प्रकारे सापळे रचण्यात आले. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या श्रुतीजी हळूहळू इस्लामी विळख्यात अडकत गेल्या. सुमारे पाच वर्षं त्यांनी इस्लामचं शिक्षण घेतलं. पालकांना ही अजिबातच जुमानत नव्हत्या. अगदी शेवटचा उपाय म्हणून पालक त्यांना 'आर्श विद्या समाजम्' संस्थेच्या आचार्य मनोजजी यांच्या भेटीला घेऊन गेले. तिथे जातानाही श्रुतीजींच्या मनात हाच विचार होता की आपण खुद्द मनोजजींचं विचार परिवर्तन करून त्यांना इस्लाममध्ये घेऊन येऊ. मात्र त्यानंतर आचार्य मनोजजींबरोबर फक्त अडीच तास झालेल्या चर्चेनंतर श्रुतीजींच्या विचारात आमूलाग्र बदल झाला आणि त्या हिंदू धर्मात परत आल्या. आणि त्यानंतर 'आर्श विद्या समाजम्' संस्थेच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या झाल्या. १९९९ साली स्थापन झालेल्या या संस्थेनं आत्तापर्यंत ७००० हून अधिक स्त्री-पुरुष-मुले-मुली यांना इस्लाम मधून सनातन धर्मात परत आणलं आहे. 

त्यांच्या मते हे मतांतरण किंवा विचारधारेतला बदल अर्थात ideological conversion आहे आणि या बहुसंख्येने होणाऱ्या धर्मांतरांसाठी कारण ठरणाऱ्या चार प्रमुख गोष्टी म्हणजे 

१. आपल्या धर्मात योग्य वयात धार्मिक स्वरूपाचं मार्गदर्शन मिळत नाही, प्रश्नांना उत्तरं दिली जात नाहीत,

२. आपल्याला शाळेत इतिहासातल्या महान लोकांच्या चरित्राबद्दल शिक्षण दिलंच जात नाही. उलट अकबरासारख्या लोकांची चरित्र शिकवली जातात. 

३. आजच्या तरुणपिढीला चालू घडामोडी अर्थात current affairs बद्दल काहीही माहिती नाही. ही पिढी रील्स बनवण्यात आणि बघण्यात व्यग्र आहे.

४. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे Comparative religious studies चा अर्थात सर्व धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासाचा अभाव 

कुराणातल्या आयतींचे संदर्भ देत त्यांनी इस्लामचा काफरांकडे बघण्याचा दृष्टिकोन विशद केला. त्याचप्रमाणे आपल्याला श्री शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या तेजस्वी व्यक्तिमत्वांची गरज आहे असेही यांनी नमूद केले. 



श्रुतीजींच्या कार्यक्रमापूर्वी 'केरला स्टोरी' चे दिग्दर्शक श्री सुदिप्तो सेन यांचेही भाषण झाले. 'केरला स्टोरी' दरम्यानचे काही अनुभव आणि त्याचप्रमाणे सात-आठ वर्षांपूर्वी श्रुतीजींशी झालेल्या त्यांच्या पहिल्या भेटीचे अनुभवही त्यांनी सांगितले. केरळ आणि कर्नाटक सीमेवर असलेले कासारगोड, मलापूरम सारखे प्रदेश या धर्मांतरांच्या विषयाच्या बाबतीत फार भयंकर आणि कट्टर आहेत. सौदी आणि अन्य इस्लामी राष्ट्रांचा पैसे वापरून या प्रदेशांमध्ये कशा प्रकारे धर्मांतरं केली जातात यावर त्यांनी महत्वाची माहिती पुरवली. अखेरीस "काही चित्रपट शंभर कोटींचा गल्ला जमा करण्यासाठी बनतात, तर काही शंभर कोटी हिंदूंना जागृत करण्यासाठी जन्माला येतात." असं सांगून त्यांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.  

श्रुतीजींचे अनुभव मल्याळी भाषेत पुस्तकरूपातही आले असून त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करणाऱ्या विशाली शेट्टी याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विशालीजींनी त्या TCS मध्ये नोकरीला असताना त्यांच्यावरही इस्लामचा कसा प्रभाव पडला होता परंतु वेळीच 'आर्श विद्या समाजम्' च्या संपर्कात आल्याने कशा प्रकारे त्या इस्लामच्या विळख्यातून बाहेर पडल्या याविषयीचे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमादरम्यान अ‍ॅडव्होकेट अंजली हेळेकर यांनी सामान नागरी कायदा, त्याची आवश्यकता, अमंलबजावणी याविषयी त्यांचे विचार मांडले. त्याचप्रमाणे भाजपचे माजी आमदार श्री आशिष शेलार यांचेही घणाघाती भाषण झाले. कार्यक्रमानंतर श्रुतीजींच्या पुस्तकासाठी प्रेक्षक आणि वाचकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. पुस्तकं संपल्याने निम्म्याहून अधिक लोकांना पुस्तक न घेताच परत जावं लागलं. 



इस्लाम मध्ये गेलेल्या एखाद्या व्यक्तीने आणि विशेषतः स्त्रीने, काही वर्षांनी स्वधर्मात परत येऊन त्यानंतर त्याच कामात स्वतःला वाहून घेणं ही एवढी मोठी गोष्ट आहे की ती स्वतः त्या व्यक्तीने सांगितल्याशिवाय त्यावर विश्वास बसणं कठीणच. श्रुतीजींचे अनुभव पुस्तकरूपात अधिक विस्तारपूर्वक आलेले असतील आणि ते वाचणं ही एक पर्वणी असेल हे नक्कीच. तिथे पुस्तक न मिळाल्याने अखेरीस ऑनलाईन मागवलं. अर्थात इतकी पुस्तकं समोर असताना काही न घेता परत येणं ही निव्वळ अशक्य बाब होती. आणि सुदैवाने गेले काही महिने शोधत असलेलं डॉ श्रीरंग गोडबोले यांचं 'इस्लामचे अंतरंग' तिथे मिळाल्याने ते ताबडतोब घेऊन टाकलं. आता श्रुतीजींचं पुस्तक हातात पडण्याची उत्सुकता आहे. लवकरच ते मिळेल अशी अपेक्षा. 

राष्ट्र आणि धर्मकार्याला आपलं आयुष्य वाहून घेणं ही सोपी बाब नक्कीच नाही. परंतु अर्थातच ते प्रत्येकाला जमणंही शक्य नाहीच. पण त्यांना मदत म्हणून आणि त्याचबरोबर इस्लामी धर्मांतराच्या विळख्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी आपण श्रुतीजींचं पुस्तक ऑनलाईन नक्कीच मागवू शकतो.  

--हेरंब ओक

पुस्तक ऑनलाईन मागवण्यासाठीची लिंक 

https://www.arshaworld.org/avs/books/story-of-a-reversion/






Friday, June 2, 2023

स्थलकालाची बंधनं झुगारणारा पाशवी विखार : एका माळेचे मणी

सुविख्यात इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी पानिपत युद्ध ते हैद्राबाद स्वातंत्र्य चळवळ आणि समर्थ संप्रदाय ते भारतीय मुसलमान अशा अनेकविध विषयांवर लिहिलेली अनेक पुस्तकं लोकप्रिय आहेत. नुकतंच त्यांचं 'एका माळेचे मणी' असं इतिहासविषयक पुस्तकाला थोडंसं न शोभणाऱ्या अशा नावाचं एक पुस्तक वाचनात आलं. हा मुळात सेतुमाधवरावांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. हे लेख इतिहासातल्या वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटनांवर लिहिलेले असले तरी मूलतः या सर्वांचा पाया एकच आहे. या पुस्तकात टिपू, बेनझीर भुत्तो, झुल्फिकार अली भुत्तो, झिया उल हक, जिना, १९७१ चं बांगलादेश युद्ध, पाकिस्तान, पानिपत युद्ध आणि अगदी उझबेकिस्तान, सुदान आणि फ्रान्समधील मुस्लिम अशा विविध विषयांवर लिहिलेले लेख असून हे पुस्तक १९९१ साली प्रकाशित झालं आहे.


 

इस्लामला केंद्रस्थानी ठेवून त्यातील क्रूर चालीरीती, अन्याय, अंधश्रद्धा, क्रौर्य, इस्लाममधील स्त्रीचं यःकश्चित असं स्थान आणि त्याचबरोबर वर उल्लेखलेल्या देश आणि व्यक्तींची इस्लामच्या संदर्भातली मतं आणि त्या अनुषंगाने असलेली त्यांची वागणूक आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय या सगळ्याचा उहापोह या पुस्तकात केलेला आढळतो. थोडक्यात इस्लाम ही एक ‘माळ’ म्हणून गृहीत धरून इस्लामी कट्टरपणा आणि धर्मांधतेला स्थळकाळाचं बंधन नसतं हे सिद्ध करणारे वर उल्लेखलेले अनेक ‘मणी’ असा या शीर्षकाचा अर्थ आहे.

 


वेगवेगळ्या लेखांचा संग्रह असल्याने पुस्तक वाचताना किंचित विस्कळीतपणा जाणवतो. त्याचप्रमाणे हे लेख कालक्रमानुसार (chronological order) नसल्यानेही तसं होत असेल. सुरुवातीचे अनेक लेख टिपूवर असून नंतर बेनझीर मग पुन्हा जिना अशी लेखांची मांडणी आहे. परंतु पुस्तकाच्या मनोगतात या मुद्द्यालाही आधीच उत्तर देण्यात आलेलं आहे. यातले काही लेख हे नियतकालिकांमध्ये छापून आलेले असून काही स्वतंत्र आहेत. सेतुमाधवराव यांनी वयाच्या ब्याऐशीव्या वर्षी हे लेख लिहिलेले असून नजरेचा संपूर्ण असहकार असल्याने दुसऱ्याच्या नजरेने वाचन करून आणि दुसऱ्याच्याच लेखणीने अर्थात लेखनिकाच्या मदतीने हे दिव्य पार पाडलं आहे.

टिपूचा अतिशय निकटवर्ती असलेला अधिकारी मीर हुसेन अली किरमानी याने टिपूचं चरित्र लिहिलेलं असून टिपूच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन वर्षांत ते लिहिण्यात आलं होतं. टिपूवरील सर्व लेख हे या चरित्राचा संदर्भग्रंथ म्हणून वापर करून लिहिण्यात आले असल्याने त्यांच्या अस्सलते (authenticity) विषयी कुठलाही प्रकारचा संशय घेण्याची गरज नाही हे नक्की. यात टिपूची धर्मांधता, क्रौर्य, काफरांविषयी त्याला वाटत असलेली आत्यंतिक घृणा, हिंदुस्थानवर शरियतचे राज्य यावे यासाठी त्याने तुर्कस्तान आणि अफगाणिस्तानच्या मदतीने हिंदुस्थानवर आक्रमण करण्याच्या आखलेल्या (आणि फसलेल्या) योजना, त्याच्या अनेक अंधश्रद्धा आणि त्यातून निर्माण झालेल्या आख्यायिका तसेच त्याचे न्यूनगंड, भीती आणि या सर्वांमुळे त्याचा अखेरीस झालेला ऱ्हास अशा अनेकविध विषयांवर प्रकाश टाकणारे अनेक लहान मोठे लेख पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात वाचकांच्या भेटीस येतात. टिपूने निव्वळ संशय आणि गैरसमज यापायी कित्येक निष्पाप जीवांचे कसे बळी दिले हे वाचून जीवाचा अक्षरशः थरकाप उडतो. आणि मुख्य म्हणजे त्याले अनेकजण तर खुद्द त्याच्या सैन्यातले, त्याच्या विश्वासातले खास सरदार होते. जवळच्या माणसांची ही कथा असेल तर असहाय प्रजा आणि निष्पाप हिंदूंवर तो कुठल्या प्रकारचे अत्याचार करत असेल याची कल्पनाही करवत नाही. काही प्रसंगांमध्ये तर आपला सरदार मेल्यावर त्याच्या बायकोला टिपूच्या अंतःपुरात (जनानखान्यात) धाडण्यासाठी खुद्द टिपूच्या आईने पुढाकार घेतला असल्याचे वाचून लहानपणी 'श्यामची आई' चे संस्कार झालेला वाचक इस्लामच्या किळसवाण्या चालीरीती बघून नक्कीच हादरून जातो. आणि यावर किरमानीने टिपूची केलेली भलामण अजूनच हादरून टाकणारी आहे. किरमानीच्या मते “अशा स्त्रिया स्वतःहूनच टिपूच्या जनानखान्यात जात असत. जर त्या स्त्रियांना हे मान्य नव्हते तर त्यांनी कुठल्यातरी मार्गाने आत्महत्या करायला नको होत्या का?" !!! ही विचारमौक्तिके ऐकून फाळणीच्या वेळी "बलात्कार झालेल्या स्त्रियांनी प्रतिकार का केला? त्यांनी श्वास रोखून धरून आत्महत्या का केल्या नाहीत?" ही ‘महात्म्याची’ विचारमौक्तिके आठवल्यावाचून राहत नाहीत!

नंतरच्या भागात जुल्फिकार अली भुत्तो, जनरल झिया उल हक, बेनझीर भुत्तो आणि त्याचप्रमाणे १९७१ सालचं भारत-पाक युद्ध या व्यक्ती आणि घटनांबद्दलचे लेख आहेत. यात दोन विशेष उल्लेख करण्यासारखे प्रसंग म्हणजे पाकिस्तानात झालेल्या सुन्नी विरुद्ध अहमदिया दंगलीत हजारो अहमदिया मारले गेले. त्या दंगलींचा अभ्यास करण्यासाठी लाहोर हायकोर्टाचे सरन्यायाधीश मुनीर यांच्या समितीने सादर केलेला अहवाल अर्थात मुनीर रिपोर्ट. तो प्रकाशित होऊ नये आणि झाला तरी भारतात येऊ नये म्हणून पाकिस्तानी सरकारने जंग जंग पछाडले होते आणि तरी अखेरीस तो एका पत्रकाराच्या मदतीने भारतात कसा आला याचं वर्णन करणारा एक प्रसंग अतिशय रंजक आहे.

दुसरा एक प्रसंगही अशाच एका अहवालाशी निगडित आहे. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर तो का झाला हे शोधण्यासाठी जुल्फिकार अली भुत्तो सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली. या समितीने हजारो लोकांच्या मुलाखती घेऊन नांतर जो अहवाल लिहिला त्यात पाकिस्तानच्या पराभवासाठी पाकिस्तानी लष्कर, तिथला भ्रष्टाचार, अनागोंदी आणि जनतेची दिशाभूल करणारे पाकिस्तानी अधिकारी या सगळ्यांना जबाबदार धरण्यात आले होते. हा अहवाल वाचून भुत्तो अक्षरशः हादरून गेले. कारण हा अहवाल सामान्य जनतेच्या नजरेस पडला असता तर पाकिस्तानी जनता लष्कराविरुद्ध बंड करून उठेल अशी भीती त्यांना वाटत होती. या अहवालाच्या उपलब्ध असलेल्या केवळ पाच प्रतीही नष्ट करून टाकण्याचे आदेश भुत्तोने दिले. परंतु कर्मधर्मसंयोगाने एक प्रत खुद्द भुत्तोंच्या पलंगाखालीच राहून गेली. दरम्यान झिया उल हकने भुत्तोला फाशीची शिक्षा दिली. या गडबडीत कोणीतरी त्या अहवालाची झेरॉक्स काढून अमेरिकेला पाठवली आणि तिथून ती टाईम्स ऑफ इंडिया चे एक पत्रकार श्री परमू यांच्या हाती लागली. त्या अहवालाचं स्फोटक स्वरूप बघून श्री परमू यांनी तो अहवाल संक्षिप्त स्वरूपात १ ऑक्टोबर १९८८ च्या अंकात छापला. या अहवालामुळे पाकिस्तानची कशी यथेच्छ नालस्ती झाली याचं वर्णन एका लेखात वाचायला मिळतं.

पुढच्या काही प्रकरणांमध्ये इस्लामने आफ्रिका आणि युरोपमध्ये कसा पाशवी विस्तार केला आहे त्याची वर्णनं आहेत. फ्रान्समध्ये मुलींनी शाळेत हिजाब घालून जाणे यावरून सरकार विरुद्ध इस्लामी जनता अशा देशभर पेटलेल्या वादावर एक महत्त्वाचं प्रकरण आहे. त्यातली सगळी वर्णनं अगदी 'ओळखीची' वाटतात आणि इस्लामची पूर्वापार चालत आलेली कार्यपद्धती (modus operandi) लक्षात येते. त्याचबरोबर आफ्रिकेत सुदानमध्ये शरिया कायदा मुस्लिमांबरोबरच अल्पसंख्यांक अशा ख्रिस्ती आणि इतर धर्मियांनाही लागू करण्यात यावा या एकमेव कारणावरून संपूर्ण सुदानला वर्षानुवर्षं युद्धाच्या तोंडी देणाऱ्या इस्लामी प्रवृत्तीचं चीड आणणारं तपशीलवार वर्णन वाचायला मिळतं.

एका प्रकरणात उझबेकिस्तान येथील बुखारा शहरातील अमीराच्या दुष्कृत्यांचा पाढाच वाचला जातो. साधारण पहिल्या महायुद्धानंतर घडलेल्या अनेक भयानक घटना वाचकांच्या भेटीस येतात. शरिया कायद्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या अमानुष शिक्षांचं वर्णन यात आहे. डोळे फोडणे, उंच मनोऱ्यावरून खाली टाकून देणे, कोरड्या पडलेल्या खोल विहिरीत टाकून देणे अशा काही शिक्षा नुसत्या वाचूनही वाचक हादरून जातो. बुखाऱ्याच्या अमीराचा स्त्रीलंपटपणा, नुकत्याच वयात आलेल्या शेकडो तरुण मुलामुलींना जनानखान्यात डांबून ठेवणे, अन्नपाण्याचे हाल करणे, कुठल्याही मुलीला ती एखादी वस्तू असल्याप्रमाणे कधीही कुठल्याही अधिकाऱ्याला दान म्हणून देणे आणि एकूणच अशा स्त्रियांच्या आयुष्याची झालेली परवड याविषयी काही अनुभव आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या अत्यंत भयानक अनुभवांतूनही तावून सुलाखून बाहेर पडलेल्या एका स्त्रीचा जबरदस्तीने जनानखान्यात डांबण्यापासून सुरु झालेला प्रवास, एका म्हाताऱ्या अधिकाऱ्याशी लग्न, तिथून सुटका, एका तरुण विक्षिप्त शेतकऱ्याशी लग्न आणि घटस्फोट आणि अखेरीस सोव्हिएट सरकारात ट्रेड युनियनची अधिकारी म्हणून नियुक्त होणे अशा सुखकर टप्प्यावर येऊन संपलेला पाहून वाचकाला निदान एक तरी सकारात्मक अनुभव वाचल्याचं समाधान मिळतं.

प्रत्येक घटना आणि प्रसंगाचे यथायोग्य संदर्भ देऊन तो तपशिलाने मांडणे आणि त्यानंतर त्या घटना किंवा निर्णयावरील इस्लामचा प्रभाव विशद करून सांगणे अशा सोप्या पद्धतीने लेखकाने समस्त जगाला पडलेल्या इस्लामच्या पोलादी विळख्याचं प्रत्ययकारी वर्णन केलं आहे. सर्व संदर्भ समकालीन असल्याने त्यांच्या सत्यतेविषयी संशय घ्यायला तीळभरही जागा उरत नाही हे अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. इस्लामचा जगभरातला प्रवास आणि प्रभाव याचा संक्षिप्त लेखाजोखा वाचण्याची इच्छा असलेल्या कोणीही आवर्जून वाचावा असा हा लेखसंग्रह, आपण नजीकच्या भविष्यात 'माळेतले मणी' बनून जायचं की या क्षणापासूनच योग्य ती पावलं उचलून अटळ भासणारा विनाश रोखायच्या प्रयत्नांना निदान सुरुवात तरी करायची हा निर्णय घेण्यात वाचकांना मदत करणारा ठरेल हे मात्र नक्की!

रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन

काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) ' द हाऊसमेड ' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे , भरपू...