Monday, June 19, 2023

इस्लाम ते सनातन, घरवापसीचा एक अविश्वसनीय प्रवास!

 "इथे आत्ता माझ्यासमोर अनेक पालक बसलेले आहेत ज्यांची मुलं सज्ञान वयाची असतील" तोडक्या मोडक्या हिंदीत व्यासपीठावरून एक प्रश्न येत होता, "तर अशा पालकांना त्यांच्या मुलांनी जर वाईटसाईट बोलून अपमान केला, तुमचा माझा काही एक संबंध नाही असं म्हंटलं, तर कसं वाटेल?" 

संपूर्ण सभागृह शांत होतं. अर्थपूर्ण विरामानंतर तोच आवाज पुढे बोलू लागला, "मी केलंय असं, मी अशी वागले आहे माझ्या पालकांशी". एक जोरदार आघात व्हावा त्याप्रमाणे संपूर्ण प्रेक्षागृहाला धक्का बसला होता. "मी आपल्या हिंदू मंदिरात जाऊन थुंकले आहे, देवदेवतांच्या मूर्त्यांना शिव्या दिल्या आहेत, घरात होणाऱ्या पूजाअर्चेला विरोध केला आहे, देवाचा प्रसाद खायला नकार दिला आहे."


प्रेक्षकांना एकामागून एक धक्के बसत होते. व्यासपीठावरून ओ श्रुती बोलत होत्या. निमित्त होतं वंदे मातरम संघ आणि दीनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'धर्मांतराचे वास्तव आणि सामान नागरी कायदा' या कार्यक्रमाचं. संध्याकाळी ५ वाजता, आणि ते ही सोमवारी संध्यकाळी, होणारा कार्यक्रम सुमारे साडे चार पासूनच हाऊसफुल व्हायच्या बेतात आला होता. सभागृहात किमान तीनशे प्रेक्षक उपस्थित होते तर किमान साठेक लोकांनी तर उभं राहून कार्यक्रम बघितला. आणि तरीही कोणाचीही कसलीही तक्रार नव्हती. 

'ओम नमः शिवाय' च्या धीरगंभीर मंत्राने सुरुवात करून आपल्याला हिंदी नीट येत नसल्याबद्दल क्षमा मागून आपण हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलणार असल्याचे सांगून ओ श्रुती यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. एका हिंदू संस्कारयुक्त घरात बालपण गेल्याचे सांगून त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनादरम्यान आलेले अनुभव सांगायला सुरुवात केली. 'केरला स्टोरी' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हळूहळू गोड बोलून, टोमणे मारून, हिंदू देव देवतांना नावं ठेवून हिंदू धर्माबद्दल पायरीपायरीने अविश्वास, तिरस्कार आणि क्रोध उत्पन्न होईल अशा प्रकारे सापळे रचण्यात आले. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या श्रुतीजी हळूहळू इस्लामी विळख्यात अडकत गेल्या. सुमारे पाच वर्षं त्यांनी इस्लामचं शिक्षण घेतलं. पालकांना ही अजिबातच जुमानत नव्हत्या. अगदी शेवटचा उपाय म्हणून पालक त्यांना 'आर्श विद्या समाजम्' संस्थेच्या आचार्य मनोजजी यांच्या भेटीला घेऊन गेले. तिथे जातानाही श्रुतीजींच्या मनात हाच विचार होता की आपण खुद्द मनोजजींचं विचार परिवर्तन करून त्यांना इस्लाममध्ये घेऊन येऊ. मात्र त्यानंतर आचार्य मनोजजींबरोबर फक्त अडीच तास झालेल्या चर्चेनंतर श्रुतीजींच्या विचारात आमूलाग्र बदल झाला आणि त्या हिंदू धर्मात परत आल्या. आणि त्यानंतर 'आर्श विद्या समाजम्' संस्थेच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या झाल्या. १९९९ साली स्थापन झालेल्या या संस्थेनं आत्तापर्यंत ७००० हून अधिक स्त्री-पुरुष-मुले-मुली यांना इस्लाम मधून सनातन धर्मात परत आणलं आहे. 

त्यांच्या मते हे मतांतरण किंवा विचारधारेतला बदल अर्थात ideological conversion आहे आणि या बहुसंख्येने होणाऱ्या धर्मांतरांसाठी कारण ठरणाऱ्या चार प्रमुख गोष्टी म्हणजे 

१. आपल्या धर्मात योग्य वयात धार्मिक स्वरूपाचं मार्गदर्शन मिळत नाही, प्रश्नांना उत्तरं दिली जात नाहीत,

२. आपल्याला शाळेत इतिहासातल्या महान लोकांच्या चरित्राबद्दल शिक्षण दिलंच जात नाही. उलट अकबरासारख्या लोकांची चरित्र शिकवली जातात. 

३. आजच्या तरुणपिढीला चालू घडामोडी अर्थात current affairs बद्दल काहीही माहिती नाही. ही पिढी रील्स बनवण्यात आणि बघण्यात व्यग्र आहे.

४. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे Comparative religious studies चा अर्थात सर्व धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासाचा अभाव 

कुराणातल्या आयतींचे संदर्भ देत त्यांनी इस्लामचा काफरांकडे बघण्याचा दृष्टिकोन विशद केला. त्याचप्रमाणे आपल्याला श्री शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या तेजस्वी व्यक्तिमत्वांची गरज आहे असेही यांनी नमूद केले. 



श्रुतीजींच्या कार्यक्रमापूर्वी 'केरला स्टोरी' चे दिग्दर्शक श्री सुदिप्तो सेन यांचेही भाषण झाले. 'केरला स्टोरी' दरम्यानचे काही अनुभव आणि त्याचप्रमाणे सात-आठ वर्षांपूर्वी श्रुतीजींशी झालेल्या त्यांच्या पहिल्या भेटीचे अनुभवही त्यांनी सांगितले. केरळ आणि कर्नाटक सीमेवर असलेले कासारगोड, मलापूरम सारखे प्रदेश या धर्मांतरांच्या विषयाच्या बाबतीत फार भयंकर आणि कट्टर आहेत. सौदी आणि अन्य इस्लामी राष्ट्रांचा पैसे वापरून या प्रदेशांमध्ये कशा प्रकारे धर्मांतरं केली जातात यावर त्यांनी महत्वाची माहिती पुरवली. अखेरीस "काही चित्रपट शंभर कोटींचा गल्ला जमा करण्यासाठी बनतात, तर काही शंभर कोटी हिंदूंना जागृत करण्यासाठी जन्माला येतात." असं सांगून त्यांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.  

श्रुतीजींचे अनुभव मल्याळी भाषेत पुस्तकरूपातही आले असून त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करणाऱ्या विशाली शेट्टी याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विशालीजींनी त्या TCS मध्ये नोकरीला असताना त्यांच्यावरही इस्लामचा कसा प्रभाव पडला होता परंतु वेळीच 'आर्श विद्या समाजम्' च्या संपर्कात आल्याने कशा प्रकारे त्या इस्लामच्या विळख्यातून बाहेर पडल्या याविषयीचे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमादरम्यान अ‍ॅडव्होकेट अंजली हेळेकर यांनी सामान नागरी कायदा, त्याची आवश्यकता, अमंलबजावणी याविषयी त्यांचे विचार मांडले. त्याचप्रमाणे भाजपचे माजी आमदार श्री आशिष शेलार यांचेही घणाघाती भाषण झाले. कार्यक्रमानंतर श्रुतीजींच्या पुस्तकासाठी प्रेक्षक आणि वाचकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. पुस्तकं संपल्याने निम्म्याहून अधिक लोकांना पुस्तक न घेताच परत जावं लागलं. 



इस्लाम मध्ये गेलेल्या एखाद्या व्यक्तीने आणि विशेषतः स्त्रीने, काही वर्षांनी स्वधर्मात परत येऊन त्यानंतर त्याच कामात स्वतःला वाहून घेणं ही एवढी मोठी गोष्ट आहे की ती स्वतः त्या व्यक्तीने सांगितल्याशिवाय त्यावर विश्वास बसणं कठीणच. श्रुतीजींचे अनुभव पुस्तकरूपात अधिक विस्तारपूर्वक आलेले असतील आणि ते वाचणं ही एक पर्वणी असेल हे नक्कीच. तिथे पुस्तक न मिळाल्याने अखेरीस ऑनलाईन मागवलं. अर्थात इतकी पुस्तकं समोर असताना काही न घेता परत येणं ही निव्वळ अशक्य बाब होती. आणि सुदैवाने गेले काही महिने शोधत असलेलं डॉ श्रीरंग गोडबोले यांचं 'इस्लामचे अंतरंग' तिथे मिळाल्याने ते ताबडतोब घेऊन टाकलं. आता श्रुतीजींचं पुस्तक हातात पडण्याची उत्सुकता आहे. लवकरच ते मिळेल अशी अपेक्षा. 

राष्ट्र आणि धर्मकार्याला आपलं आयुष्य वाहून घेणं ही सोपी बाब नक्कीच नाही. परंतु अर्थातच ते प्रत्येकाला जमणंही शक्य नाहीच. पण त्यांना मदत म्हणून आणि त्याचबरोबर इस्लामी धर्मांतराच्या विळख्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी आपण श्रुतीजींचं पुस्तक ऑनलाईन नक्कीच मागवू शकतो.  

--हेरंब ओक

पुस्तक ऑनलाईन मागवण्यासाठीची लिंक 

https://www.arshaworld.org/avs/books/story-of-a-reversion/






No comments:

Post a Comment

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...