दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनांनी उभारलेल्या छळछावण्या, लाखो ज्यूंची करण्यात आलेली कत्तल या विषयांवर शिंडलर्स लिस्ट, बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज, द पियानिस्ट असे कित्येक पुस्तकं/चित्रपट प्रकाशित झाले आहेत. परंतु 'इन्साईड द गॅस चेम्बर्स' या सर्वांहून थोडं वेगळं आहे आणि एक पाऊल पुढे आहे. इतर पुस्तकांमध्ये वाचायला मिळणारी छळछावण्यांची वर्णनं या पुस्तकातही वाचायला मिळतातच परंतु वेगळं आणि एक पाऊल पुढे यासाठी की यातली वर्णनं प्रत्यक्ष झॉंडरकमांडो मध्ये काम करावं लागलेल्या आणि केवळ नशिबाच्याच बळावर तिथून सुटू शकलेल्या एका कैद्याच्या लेखणी/वाणीतून उतरलेली आहेत.
काय आहे हे
झॉंडरकमांडो?
सुरुवातीच्या
काळात रोज शेकडो/हजारो ज्यूंना गॅस चेम्बर किंवा अन्य मार्गांनी ठार केल्यानंतर जमिनीत
मोठे खड्डे करून त्यांना सामूहिकरीत्या पुरलं जाई. परंतु जागेचा अभाव, पुरावे उरण्याची
शक्यता आणि अशाच अन्य कारणांमुळे ही प्रेतं जाळण्याचा फतवा निघाला. त्यासाठी २४ तास
चालू राहणाऱ्या मोठ्या भट्ट्या उभारण्यात आल्या. या अर्थातच या लोकांना जाळण्यासाठी
(आणि तत्पूर्वी त्याचने कपडे, चीजवस्तू जमा करणे) यासाठी अन्य ज्यू कैद्यांशिवाय दुसरा
उत्तम (!) पर्याय कुठला असणार होता? आपल्याच देश-धर्म बंधु-भगिनींच्या प्रेतांना भट्ट्यांमध्ये
टाकून देऊन निर्दयीपणे जाळण्याचं दुर्दैवी काम करण्यासाठी ज्या कामकरी तुकड्या बनवण्यात
आल्या त्यांना विशेष तुकड्या (स्पेशल युनिट) अर्थात झॉंडरकमांडो असं गोंडस नाव देण्यात
आलं.
झॉंडरकमांडोमध्ये
काम करणारे लोक तुलनेने सुदैवी म्हंटले जातात कारण त्यांना बऱ्यापैकी अन्न, विश्रांती,
कपडे मिळत असत. परंतु त्या बदल्यात त्यांना करावं लागणार किळसवाणं काम बघता त्यांना
सुदैवी म्हणणं कितपत योग्य आहे हाही प्रश्न पडतोच. प्रेतं जाळल्यानंतर, तिथल्या साच्याला
त्या प्रेतांची कातडी, मांस चिकटून राहत असे. ते मांस खरडून काढणे, शिल्लक राहिलेल्या
हाडांचं चूर्ण करून ते दूरवर टाकून येणे, खोलीत पडलेले रक्तामांसाचे डाग पाण्याने धावून
काढून खोलीची रंगरंगोटी करणे असली भयानक कामं झॉंडरकमांडोच्या तुकडीला नियमितपणे करावी
लागत असत. झॉंडरकमांडोंच्या तुकड्या निवडक कालावधीत बदलल्याही जात असत. नवीन तुकडी
आली की जुन्या चमूचं काय होत असे हे सांगायला आपण हिटलर असण्याची आवश्यकता खचितच नाही.
ज्या भट्ट्यांमध्ये दिवसचे दिवस अत्यंत विकृत स्वरूपाचं काम करावं लागलं त्याच भट्ट्यांचा
घास व्हावं लागणं याला दुर्दैव म्हणावं की काव्यात्म न्याय हे ज्याचं त्याने ठरवायचं.
श्लोमो व्हेनेत्सिया
तुलनेने सुदैवी यासाठी की त्याची तुकडी अनेक आठवडे बदलली गेली नाही. काही वेळा नवीन
ज्यू कैदी येण्याचं बंद झाल्याने किंवा कधी त्याच्या तुकडीचं अन्य छळछावणीत स्थलांतर
झाल्याने त्याची झॉंडरकमांडोमधली नियुक्ती कायम राहिली. तुलनेने सुदैवी म्हणण्याचं
कारण हे की जीव तर वाचला परंतु जे भयानक शारीरिक, मानसिक आघात आयुष्यभर झाले, त्यांनी
ज्या खोल जखमा दिल्या त्या या जन्मी तरी भरून येऊ न शकणाऱ्या अशाच!
श्लोमो व्हेनेत्सियाच्या
अनुभवांचं अजून एक किंवा किंबहुना सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य हे की त्याच्या (आणि त्याच्यासारख्या
इतरांच्या) लिखित अनुभवांमुळे झॉंडरकमांडोसारखी विकृत जागा/पद्धती अस्तित्वात होती
हे तरी जगाला कळलं. कारण हे काम इतक्या गुप्त पद्धतीने चालत असे की तिथे कोणालाही
(कुठल्याही जिवंत माणसाला) प्रवेश नसे. आपल्या अनुभवांबद्दल लिहिताना व्हेनेत्सियाला
आपल्या कृत्यांबद्दल वाटत असलेल्या पश्चात्तापाबद्दलचे उल्लेख वारंवार वाचायला मिळतात.
तो म्हणतो की मी स्वतःच्या हाताने कोणालाही मारलं नाही, पण त्यानंतर प्रेतांचं जे करावं
लागलं त्याला माझा इलाज नव्हता. मला जिवंत राहण्यासाठी तो एकमेव मार्ग होता. छळछावणीत
अन्नावरून होणाऱ्या मारामाऱ्या, चोऱ्या, लुबाडणूक यांचेही उल्लेख तो अनेकदा करतो. हे
सगळं केलं नसतं तर जिवंत राहिलेल्या मूठभर सुदैवी ज्यूंमध्ये आपण राहिलो नसतो. आमच्यात
एकी नव्हती. एकी केली असती तर सगळेजण ठार झालो असतो. मी फक्त माझा जीव वाचवण्याचे प्रयत्न
करत होतो आणि त्यासाठी लागेल ते करायला तयार होतो अशी खेदपूर्वक कबुलीही तो देतो. छळछावणीत
त्याचा भाऊ, काका, बहीण भेटण्याचे प्रसंग, काकाचं प्रेत भट्टीत न्यावं लागण्याचा प्रसंग
वाचताना अक्षरशः गुदमरल्यासारखं होतं.
फार काय लिहिणार?
आपल्या जबाबदारीवर वाचा एवढंच म्हणू शकतो!
--हेरंब ओक
No comments:
Post a Comment