सुखवस्तू जीवनशैलीचा उपभोग घेणाऱ्या शहरी वाचकांसाठी दलित साहित्य हा कायमच हादरून टाकणारा अनुभव असतो. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मकथन अशा विविध स्वरूपात व्यक्त झालेल्या दलित समाजाच्या भावनांच्या मुळाशी मात्र दुर्दैवाने त्यांच्या नशिबी आलेल्या हालअपेष्टा, दुःख, छळ, उपासमार, मारहाण, शिक्षणाचा ध्यास आणि त्यासाठी उपसलेले अविश्वसनीय कष्ट यांचीच भयकारी वर्णनं असतात. लक्ष्मण माने यांच्या 'उपरा', दादासाहेब मोरे यांच्या 'गबाळ' पासून ते अशोक जाधव यांच्या 'भंगार', लक्ष्मण गायकवाड यांच्या 'उचल्या' पर्यंत असो किंवा मग शरणकुमार लिंबोळे यांच्या 'अक्करमाशी', किशोर शांताबाई काळे यांच्या 'कोल्हाट्याचे पोर' पासून ते दया पवार यांच्या 'बलुतं' आणि आनंद यादव यांच्या 'झोंबी' पर्यंत कुठल्याही पुस्तकाचं कुठलंही पान उघडून बघितलं असता निव्वळ जातीपातींच्या अर्थहीन भेदांपायी या समाजातल्या लोकांना उर्वरित समाजाकडून दिल्या गेलेल्या, माणुसकीला लाजवेल अशा असह्य छळांच्या वर्णनांनी भरलेले प्रसंग वाचायला मिळतात. अशा कित्येक पुस्तकांमधून शिळ्या भाकरीच्या तुकड्यापायी करावी लागणारी वणवण, पोलिस आणि स्थानिक 'तथाकथित' प्रतिष्ठित लोक यांच्याकडून केले जाणारे अन्याय, हालअपेष्टा, माणुसकीला लाजवेल अशी दिली जाणारी वागणूक यांची वर्णनं अनेक वर्षं वाचून हळूहळू शहरी मनही निबर होत जातं आणि त्या वर्णनांची सवय होत जाते...... ..... ..... ..... असं आपल्याला वाटत असतानाच आपल्या हातात अशोक पवारांचं 'बिराड' पडतं आणि आपण सर्वस्व गमावल्यागत नैराश्याच्या काळ्याकुट्ट धुक्याने झाकोळून गेलो आहोत असं वाटायला लागतं.
अशोक पवारांचं 'बिराड' मी गेल्यावर्षी वाचलं आणि अंतर्बाह्य हादरून गेलो. अनेकदा प्रयत्न करूनही लिहायचा धीर झाला नाही. 'बेलदार' जमातीत जन्माला आलेल्या पवारांच्या आत्मकथनात जातीभेद आहे, छळ आहेत, बलात्कार आहेत, गर्भपात आहेत, उपासमार आहे, तुरुंगवास आहे, मारझोड आहे, पोलीसी अत्याचार आहेत, पेटवलेल्या झोपड्या आहेत, पुरात वाहून गेलेले तंबू आहेत आणि हे सगळं पानोपानी आहे. वाचकाला असह्य आणि हतबल करून सोडेल अशा विपुल प्रमाणात आहे. पुस्तकाबद्दल लिहीत असताना ते अनुभव पुन्हा आठवतानाही अंगावर शहारा यावा असे एकेक भयंकर प्रकार आहेत. त्यामुळे शक्य तेवढ्या संक्षिप्त स्वरूपात लिहून काढण्याचा प्रयत्न आहे.
वस्तीवर हल्ले
करून लहान मुलांना उचलून नेणाऱ्या वाघाची नुसत्या कुऱ्हाडीनिशी शिकार करणारी निडर जमात, समाजातील जातीभेदाच्या हल्ल्यांना मात्र केवळ आणि केवळ, सामाजिक उतरंडीत निम्नतम्
स्थानी असल्याने, तोंड देऊ शकत नाही.
पोलिसांनी
केलेले अन्याय आणि अत्याचार, गावच्या सरपंच/पाटलांनी केलेले अत्याचार/बलात्कार आणि
बेलदार जमातीच्या जातपंचायतीने त्यांच्याच लोकांसाठी केलेले विचित्र न्यायदान, असे
अन्याय आणि अत्याचारांचे असंख्य विकृत प्रकार या पुस्तकात वाचायला मिळतात (वाचावे लागतात!).
आणि या सर्व प्रकारच्या अत्याचारांना बळी पडणाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या सर्वाधिक
असते हे आवर्जून वेगळं सांगायला नकोच. अनेक प्रसंगांमध्ये चोरीच्या निव्वळ आरोपांवरून
बायकांना पोलीसस्टेशनमध्ये नागवं केलं जातं, त्यांच्यावर बलात्कार केले जातात, बायकांबरोबरच
त्यांच्या मुलांनाही अमानुष मारहाण केली जाते, पोलीस मारहाणीत निर्दोष जीवांचे मृत्यू
होतात, आणि हे पुरेसं नाही म्हणून वेळोवेळी गावचे प्रमुख (सरपंच/पाटील) हे ही अन्याय आणि
विशेषतः लैंगिक अत्याचारांमध्ये बरोबरीने सहभागी होतात.
प्रगत समाज
आणि विकसित संस्कृतीत मनुष्याचा जीव हा सर्वाधिक महत्वाचा समजला जातो. मात्र बेलदारांच्या
जीवाला (न)असलेली किंमत बघून काळीज पिळवटून जातं. एका प्रसंगात बेलदार लोक एका गावात
मुक्कामाला येतात. गावातल्या देवळात ते मुक्काम करणार तोच तिथे जागा नाही असं
सांगून त्यांना तिथून पिटाळून लावलं जातं आणि एका पडक्या शाळेत जायला सांगितलं जातं. नेमकं
तेव्हाच महाप्रलयी पावसाला सुरुवात होते. रात्रीच्या अंधारात, विजांच्या कडकडाटात,
वादळी वाऱ्याला तोंड देत, रस्त्यातले खाचखळगे आणि नाले चुकवत बिराड शाळेच्या दिशेने
मार्गक्रमणा करत असतानाच काळ्याकुट्ट अंधारात अचानक एका ओल्या बाळंतिणीच्या हातातलं
तान्हं बाळ पाण्यात पडतं, वाहून जातं आणि हरवतं! प्रचंड शोधाशोध करूनही ते मिळत नाही.
पोलिसी बलात्काराचा
परिपाक म्हणून जन्माला आलेलं नवजात बाळ जन्मताक्षणीच न्हाणीघरात जिवंत पुरून टाकायला
लावलं जातं. एका प्रसंगात गरोदर सरीच्या पोटावर बुक्क्या मारून मारून तिचा गर्भपात
केला जातो. अन्य एका प्रसंगात अंधारात उकळत्या चहाच्या भांड्यातला चहा अंगावर पडल्याने
भाजून तडफडत तडफडत मृत्यमुखी पडलेल्या दुर्दैवी सोजीचं वर्णन वाचायला लागतं. अशी बघताबघता
किडामुंग्यांप्रमाणे मरणाऱ्या माणसांची वर्णनं वाचून आपल्या समाजाची घृणा वाटायला लागते.
ही परवड मृत्यूनंतरही
संपत नाहीच. एका प्रसंगात बेलदार लोकांनी एका लहान मुलीचं प्रेत अन्य जातीच्या
लोकांच्या स्मशानात पुरलं म्हणून त्यांना ते जबरस्तीने उकरून काढायला लावून गावाबाहेर
लांब नेऊन पुरायला लावलं जातं. हे असे कित्येक विकृत आणि भीषण प्रसंग वाचताना अंगावर
भयाने शहारे येत राहतात.
या आत्मकथेत
बेलदार समाजातल्या स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या दुर्दैवाच्या दशावतारांची काळीज
पिळवटून टाकणारी वर्णनं आहेत. गावकरी किंवा पोलीस तर या स्त्रियांचा मग्रुरीने व उद्धटपणे
उपभोग घेताना दिसतातच पण नात्यागोत्यातले पुरुषही ह्या स्त्रियांवर बरोबरीने तुटून
पडताना दिसतात.
जमातीच्या
जातपंचायतीने स्त्रियांचा जो छळ केला आहे तो तर केवळ रानटी प्रकारचा आहे. जातपंचायतीचे
पंच दारू पिऊन न्यायनिवाडा करतात. जो पक्ष जास्त पैसे आणि दारू पुरवेल त्या पक्षाच्या
बाजूने निवाडा करणाऱ्या जातपंचायतीची निकालपद्धत अक्षरशः जंगली आणि अनाकलनीय आहे. जात
पंचायतीने दिलेल्या शिक्षा भोगतानाचे वर्णन हादरवून टाकणारं आहे.
भूक ही या
आणि अशा प्रकारच्या कुठल्याही समाजाच्या पाचवीला पुजलेली समस्या! यांना दिवस चे दिवस
खायला मिळत नाही. अशा वेळी लहान मुलं भुकेपोटी रडायला लागल्यावर आईबाप त्यांना आकाशाकडे
बघायला सांगतात. आकाशाकडे बघितलं की भूक नाहीशी होते अशी यांची श्रद्धा आहे. काही वेळा
भूक इतकी अनावर होते की ही मुलं अक्षरशः रस्त्यावरच्या कुत्र्याचा पाठलाग करून त्याच्या
तोंडची भाकर पळवायलाही मागे पुढे पाहत नाहीत.
बेलदार जमातीत
जातीपातीचा पगडा किती खोलवर रुजला आहे या प्रसंगाचं एक भयानक वर्णन आहे. बेलदार समाजातल्या
एका मुलाने एका ब्राह्मण मुलीशी लग्न केलं म्हणून त्या दोघांना आणि मुलीच्या आईवडिलांना
बेलदार लोक घरी बोलावतात, त्यांना बेदम मारहाण करतात, मारहाण करून झाल्यानंतर त्या
मुलाला तिथेच बांधून ठेवलं जातं आणि मुलगी आणि तिच्या आईवडिलांना तिथून निघून जायला
सांगितलं जातं. नंतर हे सगळं बघून दुःखातिरेकाने तो मुलगा आत्महत्या करतो. तर बेलदार
लोक त्याला तिकडेच पुरून टाकतात आणि काही घडलंच नाही अशा प्रकारे तिथून निघून जातात.
आणि हे निव्वळ
काही निवडक प्रसंग आहेत. संपूर्ण पुस्तकभर या अन्यायाच्या खुणा पसरलेल्या आहेत. लेखक
आणि संपूर्ण बेलदार समाजाने काय आणि किती भोगलं आहे याची सामान्य शहरी वाचक कल्पनाही
करू शकत नाही आणि कल्पना करू शकला तरी हे सत्य आहे यावर त्याचा विश्वास बसणार नाही.
त्यामुळे गेल्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं तेच पुन्हा लिहितो. "फार काय लिहिणार? आपल्या
जबाबदारीवर वाचा एवढंच म्हणू शकतो!"
--हेरंब ओक
No comments:
Post a Comment