सुविख्यात इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी पानिपत युद्ध ते हैद्राबाद स्वातंत्र्य चळवळ आणि समर्थ संप्रदाय ते भारतीय मुसलमान अशा अनेकविध विषयांवर लिहिलेली अनेक पुस्तकं लोकप्रिय आहेत. नुकतंच त्यांचं 'एका माळेचे मणी' असं इतिहासविषयक पुस्तकाला थोडंसं न शोभणाऱ्या अशा नावाचं एक पुस्तक वाचनात आलं. हा मुळात सेतुमाधवरावांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. हे लेख इतिहासातल्या वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटनांवर लिहिलेले असले तरी मूलतः या सर्वांचा पाया एकच आहे. या पुस्तकात टिपू, बेनझीर भुत्तो, झुल्फिकार अली भुत्तो, झिया उल हक, जिना, १९७१ चं बांगलादेश युद्ध, पाकिस्तान, पानिपत युद्ध आणि अगदी उझबेकिस्तान, सुदान आणि फ्रान्समधील मुस्लिम अशा विविध विषयांवर लिहिलेले लेख असून हे पुस्तक १९९१ साली प्रकाशित झालं आहे.
इस्लामला केंद्रस्थानी
ठेवून त्यातील क्रूर चालीरीती, अन्याय, अंधश्रद्धा, क्रौर्य, इस्लाममधील स्त्रीचं यःकश्चित असं स्थान आणि त्याचबरोबर वर
उल्लेखलेल्या देश आणि व्यक्तींची इस्लामच्या संदर्भातली मतं आणि त्या अनुषंगाने
असलेली त्यांची वागणूक आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय या सगळ्याचा उहापोह या
पुस्तकात केलेला आढळतो. थोडक्यात इस्लाम ही एक ‘माळ’ म्हणून गृहीत धरून इस्लामी
कट्टरपणा आणि धर्मांधतेला स्थळकाळाचं बंधन नसतं हे सिद्ध करणारे वर उल्लेखलेले
अनेक ‘मणी’ असा या शीर्षकाचा अर्थ आहे.
वेगवेगळ्या लेखांचा संग्रह असल्याने पुस्तक वाचताना किंचित विस्कळीतपणा जाणवतो. त्याचप्रमाणे हे लेख कालक्रमानुसार (chronological order) नसल्यानेही तसं होत असेल. सुरुवातीचे अनेक लेख टिपूवर असून नंतर बेनझीर मग पुन्हा जिना अशी लेखांची मांडणी आहे. परंतु पुस्तकाच्या मनोगतात या मुद्द्यालाही आधीच उत्तर देण्यात आलेलं आहे. यातले काही लेख हे नियतकालिकांमध्ये छापून आलेले असून काही स्वतंत्र आहेत. सेतुमाधवराव यांनी वयाच्या ब्याऐशीव्या वर्षी हे लेख लिहिलेले असून नजरेचा संपूर्ण असहकार असल्याने दुसऱ्याच्या नजरेने वाचन करून आणि दुसऱ्याच्याच लेखणीने अर्थात लेखनिकाच्या मदतीने हे दिव्य पार पाडलं आहे.
टिपूचा अतिशय निकटवर्ती
असलेला अधिकारी मीर हुसेन अली किरमानी याने टिपूचं चरित्र लिहिलेलं असून टिपूच्या
मृत्यूनंतर अवघ्या तीन वर्षांत ते लिहिण्यात आलं होतं. टिपूवरील सर्व लेख हे या
चरित्राचा संदर्भग्रंथ म्हणून वापर करून लिहिण्यात आले असल्याने त्यांच्या अस्सलते
(authenticity) विषयी कुठलाही प्रकारचा संशय घेण्याची गरज नाही
हे नक्की. यात टिपूची धर्मांधता, क्रौर्य, काफरांविषयी त्याला वाटत असलेली आत्यंतिक घृणा, हिंदुस्थानवर शरियतचे राज्य यावे यासाठी त्याने तुर्कस्तान
आणि अफगाणिस्तानच्या मदतीने हिंदुस्थानवर आक्रमण करण्याच्या आखलेल्या (आणि
फसलेल्या) योजना, त्याच्या अनेक अंधश्रद्धा आणि त्यातून निर्माण
झालेल्या आख्यायिका तसेच त्याचे न्यूनगंड, भीती आणि या सर्वांमुळे त्याचा अखेरीस झालेला ऱ्हास अशा अनेकविध विषयांवर
प्रकाश टाकणारे अनेक लहान मोठे लेख पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात वाचकांच्या
भेटीस येतात. टिपूने निव्वळ संशय आणि गैरसमज यापायी कित्येक निष्पाप जीवांचे कसे
बळी दिले हे वाचून जीवाचा अक्षरशः थरकाप उडतो. आणि मुख्य म्हणजे त्याले अनेकजण तर
खुद्द त्याच्या सैन्यातले, त्याच्या विश्वासातले खास
सरदार होते. जवळच्या माणसांची ही कथा असेल तर असहाय प्रजा आणि निष्पाप हिंदूंवर तो
कुठल्या प्रकारचे अत्याचार करत असेल याची कल्पनाही करवत नाही. काही प्रसंगांमध्ये
तर आपला सरदार मेल्यावर त्याच्या बायकोला टिपूच्या अंतःपुरात (जनानखान्यात)
धाडण्यासाठी खुद्द टिपूच्या आईने पुढाकार घेतला असल्याचे वाचून लहानपणी 'श्यामची आई' चे संस्कार झालेला वाचक
इस्लामच्या किळसवाण्या चालीरीती बघून नक्कीच हादरून जातो. आणि यावर किरमानीने
टिपूची केलेली भलामण अजूनच हादरून टाकणारी आहे. किरमानीच्या मते “अशा स्त्रिया
स्वतःहूनच टिपूच्या जनानखान्यात जात असत. जर त्या स्त्रियांना हे मान्य नव्हते तर
त्यांनी कुठल्यातरी मार्गाने आत्महत्या करायला नको होत्या का?" !!! ही विचारमौक्तिके ऐकून फाळणीच्या वेळी
"बलात्कार झालेल्या स्त्रियांनी प्रतिकार का केला? त्यांनी श्वास रोखून धरून आत्महत्या का केल्या नाहीत?" ही ‘महात्म्याची’ विचारमौक्तिके आठवल्यावाचून राहत
नाहीत!
नंतरच्या भागात जुल्फिकार
अली भुत्तो, जनरल झिया उल हक, बेनझीर भुत्तो आणि त्याचप्रमाणे १९७१ सालचं भारत-पाक युद्ध या व्यक्ती आणि
घटनांबद्दलचे लेख आहेत. यात दोन विशेष उल्लेख करण्यासारखे प्रसंग म्हणजे
पाकिस्तानात झालेल्या सुन्नी विरुद्ध अहमदिया दंगलीत हजारो अहमदिया मारले गेले.
त्या दंगलींचा अभ्यास करण्यासाठी लाहोर हायकोर्टाचे सरन्यायाधीश मुनीर यांच्या
समितीने सादर केलेला अहवाल अर्थात मुनीर रिपोर्ट. तो प्रकाशित होऊ नये आणि झाला
तरी भारतात येऊ नये म्हणून पाकिस्तानी सरकारने जंग जंग पछाडले होते आणि तरी अखेरीस
तो एका पत्रकाराच्या मदतीने भारतात कसा आला याचं वर्णन करणारा एक प्रसंग अतिशय
रंजक आहे.
दुसरा एक प्रसंगही अशाच एका अहवालाशी निगडित आहे. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर तो का झाला हे शोधण्यासाठी जुल्फिकार अली भुत्तो सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली. या समितीने हजारो लोकांच्या मुलाखती घेऊन नांतर जो अहवाल लिहिला त्यात पाकिस्तानच्या पराभवासाठी पाकिस्तानी लष्कर, तिथला भ्रष्टाचार, अनागोंदी आणि जनतेची दिशाभूल करणारे पाकिस्तानी अधिकारी या सगळ्यांना जबाबदार धरण्यात आले होते. हा अहवाल वाचून भुत्तो अक्षरशः हादरून गेले. कारण हा अहवाल सामान्य जनतेच्या नजरेस पडला असता तर पाकिस्तानी जनता लष्कराविरुद्ध बंड करून उठेल अशी भीती त्यांना वाटत होती. या अहवालाच्या उपलब्ध असलेल्या केवळ पाच प्रतीही नष्ट करून टाकण्याचे आदेश भुत्तोने दिले. परंतु कर्मधर्मसंयोगाने एक प्रत खुद्द भुत्तोंच्या पलंगाखालीच राहून गेली. दरम्यान झिया उल हकने भुत्तोला फाशीची शिक्षा दिली. या गडबडीत कोणीतरी त्या अहवालाची झेरॉक्स काढून अमेरिकेला पाठवली आणि तिथून ती टाईम्स ऑफ इंडिया चे एक पत्रकार श्री परमू यांच्या हाती लागली. त्या अहवालाचं स्फोटक स्वरूप बघून श्री परमू यांनी तो अहवाल संक्षिप्त स्वरूपात १ ऑक्टोबर १९८८ च्या अंकात छापला. या अहवालामुळे पाकिस्तानची कशी यथेच्छ नालस्ती झाली याचं वर्णन एका लेखात वाचायला मिळतं.
पुढच्या काही प्रकरणांमध्ये इस्लामने आफ्रिका आणि युरोपमध्ये कसा पाशवी विस्तार केला आहे त्याची वर्णनं आहेत. फ्रान्समध्ये मुलींनी शाळेत हिजाब घालून जाणे यावरून सरकार विरुद्ध इस्लामी जनता अशा देशभर पेटलेल्या वादावर एक महत्त्वाचं प्रकरण आहे. त्यातली सगळी वर्णनं अगदी 'ओळखीची' वाटतात आणि इस्लामची पूर्वापार चालत आलेली कार्यपद्धती (modus operandi) लक्षात येते. त्याचबरोबर आफ्रिकेत सुदानमध्ये शरिया कायदा मुस्लिमांबरोबरच अल्पसंख्यांक अशा ख्रिस्ती आणि इतर धर्मियांनाही लागू करण्यात यावा या एकमेव कारणावरून संपूर्ण सुदानला वर्षानुवर्षं युद्धाच्या तोंडी देणाऱ्या इस्लामी प्रवृत्तीचं चीड आणणारं तपशीलवार वर्णन वाचायला मिळतं.
एका प्रकरणात उझबेकिस्तान येथील बुखारा शहरातील अमीराच्या दुष्कृत्यांचा पाढाच वाचला जातो. साधारण पहिल्या महायुद्धानंतर घडलेल्या अनेक भयानक घटना वाचकांच्या भेटीस येतात. शरिया कायद्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या अमानुष शिक्षांचं वर्णन यात आहे. डोळे फोडणे, उंच मनोऱ्यावरून खाली टाकून देणे, कोरड्या पडलेल्या खोल विहिरीत टाकून देणे अशा काही शिक्षा नुसत्या वाचूनही वाचक हादरून जातो. बुखाऱ्याच्या अमीराचा स्त्रीलंपटपणा, नुकत्याच वयात आलेल्या शेकडो तरुण मुलामुलींना जनानखान्यात डांबून ठेवणे, अन्नपाण्याचे हाल करणे, कुठल्याही मुलीला ती एखादी वस्तू असल्याप्रमाणे कधीही कुठल्याही अधिकाऱ्याला दान म्हणून देणे आणि एकूणच अशा स्त्रियांच्या आयुष्याची झालेली परवड याविषयी काही अनुभव आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या अत्यंत भयानक अनुभवांतूनही तावून सुलाखून बाहेर पडलेल्या एका स्त्रीचा जबरदस्तीने जनानखान्यात डांबण्यापासून सुरु झालेला प्रवास, एका म्हाताऱ्या अधिकाऱ्याशी लग्न, तिथून सुटका, एका तरुण विक्षिप्त शेतकऱ्याशी लग्न आणि घटस्फोट आणि अखेरीस सोव्हिएट सरकारात ट्रेड युनियनची अधिकारी म्हणून नियुक्त होणे अशा सुखकर टप्प्यावर येऊन संपलेला पाहून वाचकाला निदान एक तरी सकारात्मक अनुभव वाचल्याचं समाधान मिळतं.
प्रत्येक घटना आणि प्रसंगाचे यथायोग्य संदर्भ देऊन तो तपशिलाने मांडणे आणि त्यानंतर त्या घटना किंवा निर्णयावरील इस्लामचा प्रभाव विशद करून सांगणे अशा सोप्या पद्धतीने लेखकाने समस्त जगाला पडलेल्या इस्लामच्या पोलादी विळख्याचं प्रत्ययकारी वर्णन केलं आहे. सर्व संदर्भ समकालीन असल्याने त्यांच्या सत्यतेविषयी संशय घ्यायला तीळभरही जागा उरत नाही हे अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. इस्लामचा जगभरातला प्रवास आणि प्रभाव याचा संक्षिप्त लेखाजोखा वाचण्याची इच्छा असलेल्या कोणीही आवर्जून वाचावा असा हा लेखसंग्रह, आपण नजीकच्या भविष्यात 'माळेतले मणी' बनून जायचं की या क्षणापासूनच योग्य ती पावलं उचलून अटळ भासणारा विनाश रोखायच्या प्रयत्नांना निदान सुरुवात तरी करायची हा निर्णय घेण्यात वाचकांना मदत करणारा ठरेल हे मात्र नक्की!
बाप रे
ReplyDelete