Friday, October 29, 2010

अतिथी....

जेव्हा आपल्याला एखादा लेख, कविता, स्फुट, ब्लॉगपोस्ट, उतारा प्रचंड प्रचंड आवडतो, आपण त्याच्या प्रचंड प्रेमात पडतो तेव्हा आपण काय करतो? तेव्हा तो लेख आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लोकांना मेल करतो, बझ करतो, फोनवरून कळवतो, फेसबुकवर टाकतो, ऑर्कट स्टेटस अपडेट करतो, ट्वीटचा चिवचिवाट करतो. अधिकाधिक लोकांनी ते वाचलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं कारण लेख वाचून आपण जसे भारावून गेलेलो असतो, आनंदी झालेलो असतो, हसलेलो असतो, टाळी दिलेली असते, डोळ्याची कड हळूच पुसलेली असते, "आपल्याला असं लिहिता आलं असतं तर काय मजा ('जहाजा'तला ज) आला असता यार !!" असा विचार केलेला असतो किंवा क्वचित प्रसंगी आपल्या काळजात जशी एक किंचितशी कळ आलेली असते तो अनुभव , अगदी तसाच्या तसा अनुभव आपल्या सुहृदांना, समविचारी मित्रमैत्रिणींना यावा असं आपल्याला मनापासून वाटत असतं. पण तरीही आपण किती लोकांपर्यंत पोचणार? शंभर? दोनशे? पाचशे ? बास एवढेच... यापेक्षा अधिक खचितच नाही. पाचशे पेक्षा जास्त *चांगले* मित्रमैत्रिणी असलेल्या व्यक्तीचा मी आजन्म गुलाम म्हणून राहायला तयार आहे. असो. तर या अशा 'सोसल 'नॉट'वर्किंग' च्या माध्यमातून जरी आपण पाचशे किंवा समजा अगदी हजार लोकांपर्यंत आपली आवड पोचवली पण तरीही आपल्या यादीत नसलेल्या अन्य हजारो लाखो लोकांचं काय?.. तर या अशा 'काय?' वाल्या प्रश्नाचा आपण फक्त विचारच करत असताना किंवा कदाचित तोही करत नसताना सलील आणि प्रणवने तो विचार प्रत्यक्षात आणून दाखवला. काय केलं त्यांनी? त्यांनी एक सही काम केलं.. नियमित नव्या लेखनाची प्रचंड वेगाने भर पडत असलेल्या मराठी ब्लॉगजगतातल्या निवडक उत्कृष्ट लेखांचं एकत्रीकरण करून दर महिन्याला ते नेटभेटच्या इ-मासिक रुपात प्रकाशित करायला सुरुवात केली. यामुळे झालं काय की नियमितपणे जालावर नसणार्‍या तस्मात असे उत्तमोत्तम ब्लॉग्ज/लेख नियमित वाचू न शकणार्‍या अनेक लोकांना 'अ‍ॅट यॉर फिंगरटिप्स' म्हणतात तसं एका टिचकीसरशी हे लेख इ-पुस्तकाच्या स्वरुपात आपल्या मेलबॉक्स मध्ये मिळवून वाचण्याची सोय झाली. बघता बघता नेटभेट इ-मासिक ही कल्पना सुपरहिट झाली. लोकांना दर महिन्याला नवनवीन लेखन वाचायला मिळायला लागलं, नेटभेटचे वाचक वाढत गेले, वाचकसंख्येने एक लाखाचा आकडा पार केला, इ-मासिकांत लिहिणार्‍या ब्लॉगर्सना नित्य नवीन वाचक लाभत गेले.

एक दिवस सकाळी माझ्या मेलबॉक्समध्ये सलीलचं मेल चमकलं. उघडून बघतो तर चक्क नेटभेटच्या ऑक्टोबर अंकासाठी अतिथी संपादकपद स्वीकारण्याची विनंती. मध्यंतरी २-३ महिने कार्यबाहुल्यामुळे सलील/प्रणवला नेटभेटसाठी वेळ काढणं शक्य होत नव्हतं याची कल्पना होती. तसंच सलीलच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या ब्लॉगरने संपादकपद स्वीकारून स्वतः लेख निवडून अंक काढला तर तो नक्कीच वाचनीय होईलच. आपण सुरुवातीला जे वाचत होतो, कालांतराने ज्यात आपले लेख यायला लागले त्या मासिकाचा अतिथी संपादक म्हणून काम पाहणं ही कल्पना एकदम मस्त होती. मी ताबडतोब होकार कळवला. सलीलशी फोनवर बोलून अंक कसा अपेक्षित आहे, काय करायचं/काय करायचं नाही पक्षि 'डूज अँड डोंटस' (डोंटस असे काही नव्हतेच खरं तर) वगैरे वगैरेवर चर्चा झाली.. आणि बरोब्बर त्याच वेळी माझा *लाडका* बॉसबाबा माझ्या मदतीला धावला. म्हणजे थोडं (अधिकच) जास्तीचं आणि नवीन काम मागे लावून. पुढच्या ४-५ दिवसांत तर काम इतकं वाढलं की "मी का या अंकासाठी 'हो' म्हणालो, अंक (माझ्याच्याने) निघणार तरी आहे का" असं वाटायला लागलं. पण आठेक दिवसांत बाबा जरा थंड झाला आणि मी ऑक्टोबरात अपडेट झालेले आणि माहित असलेनसलेले जवळपास सगळे ब्लॉग्ज पालथे घालायला सुरुवात केली. पालथे घातले, भ्रमंती केली, डेरे टाकले, पडीक राहिलो काय हवं ते म्हणा. एकेक ब्लॉग, एकेक लेख पूर्वी नुसतं वाचक म्हणून वाचताना आणि आता तात्पुरत्या का होईना पण अतिथी संपादकपदाच्या चष्म्यातून म्हणून वाचताना माझ्या दृष्टीकोनात फरक पडला एवढं नक्की जाणवलं. म्हणजे नक्की काय ते मला माझ्या तोकड्या शब्दसामर्थ्यामुळे कदाचित व्यवस्थित समजावून सांगता येणार नाही. पण दृष्टीचे कोन निराळे होते हे नक्की जाणवलं.

अमाप शब्दसागरातून निवडक लखलखते मोती वेचून आणले किंवा साहित्याच्या विशाल आसमंतातून अविरत तळपणारे तेजोगोल निवडून काढले असली जडजंबाळ वाक्यरचना टाळून एवढंच सांगतो की एकापेक्षा एक भार्री सरस लेख गवसले. जगावेगळ्या माणसांवरचे महेंद्र कुलकर्णी आणि चंद्रशेखर आठवले यांचे झपाटून टाकणारे लेख असोत किंवा अम्माच्या खडतर जीवनप्रवासाच्या पुस्तकावरचा तन्वीचा लेख असो किंवा मग खैरेखेडीतल्या नागरी जीवन आणि सुधारणांपासून शेकडो योजने दूर असलेल्या लोकांच्या खडतर आयुष्याचं वर्णन करणारा सविताताईंचा लेख असो... वाचता वाचताच भारून टाकणार्‍या रोहनच्या सप्त शिवपदस्पर्शाच्या लेखमालेचा अखेरचा भाग असो की सत्तापिपासू अमेरिकेचा बुरखा फाडणार्‍या निर्भीड वेबसाईटविषयी माहिती देणारा विद्याधरचा लेख असो की एका लढवय्याच्या अखेरच्या प्रवासाची डोळे पाणावणारी सौरभची कहाणी असो.. चार रंगांना लघुकथांत गुंफणारी सुषमेयची लघुकथामाला असो वा नारीचं दुर्गेच्या विविध रूपांशी असलेलं साधर्म्य दाखवणारं जास्वंदीचं स्फुट असो किंवा मग लहान मुलं ज्यांच्या तालावर नाचतात त्या बडबडगीतांच्या मागची कांचनने सांगितलेली दुःखद कहाणी असो... किंवा मग रोजच्या धावपळीत ओठांचे कंस सुलटे करण्यास भाग पाडणारी अपर्णाची सॉफ्टवेअर कामगाराची हलकीफुलकी कहाणी असो किंवा धो धो हसून मुरकुंडी वळवणारी गुरुदत्तची मुंबई-पुणे सायकल ट्रीप असो... हे सगळं एकापेक्षा एक आहे.. विलक्षण आहे.. सरस आहे.. ऑस्सम आहे.. जबरा आहे.. लय भारी आहे.

हे सगळे माझे प्रचंड आवडते लेख आहेत या महिन्यातले. या सगळ्या लेखांचा आणि लेखकांचा मी निर्विवाद चाहता आहे. हे लोक तसेही लिहितातच मस्त पण सुदैवाने माझ्या टाळक्यावर संपादकपदाची टोपी असताना यांनी हे एवढे छान लेख लिहिणं आणि मला ते आपल्या या महिन्याच्या अंकात समाविष्ट करायला मिळणं हा माझा बहुमान आहे का ते माहित नाही किंवा माझं सदभाग्य आहे का याचीही कल्पना नाही पण हे लेख घेता आल्याने प्रचंड आनंद झाला, समाधान लाभलं एवढंच सांगतो.

आणि हो जाताजाता.. यात माझाही एक लेख आहे. पण यात खुर्चीचा, सत्तेचा, पदाचा गैरवापर वगैरे अजिबात काही नाही हो.. कारण हा खरंच माझा मला खूप आवडलेला लेख आहे.. आणि आता ही आत्मप्रौढी वगैरेही नाही. आपण मित्राला ट्रेकचे किंवा असेच कुठलेही फोटो दाखवताना म्हणतो ना की "हा बघ .. माझा हा फोटो एकदम मस्त आलाय.." तर त्याला कोणी आत्मप्रौढी/आत्मस्तुती म्हणेल का? नाही ना? तर हाही त्यातलाच प्रकार आहे..

"हा अंक वाचकांच्या हातात देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे" किंवा "हा आम्ही आमचा बहुमान समजतो" वाली टिपिकल वाक्य नसणारं, सलीलच्या नेहमीच्या स्वतःच्या शैलीत लिहिलेलं संपादकीय वाचायची सवय असलेल्या आणि त्यामुळेच हे असलं उथळ, पाचकळ संपादकीय (!!) वाचून उरलेला अंक न वाचण्याचं जवळजवळ नक्की केलेल्या बा वाचकांनो !!!!! असं प्लीज करू नका. असं केलंत तर तो या चतुरस्त्र लेखन करणार्‍या लेखकांवर, त्यांच्या लेखांवर आणि सगळ्यांत महत्वाचं सांगायचं तर तुम्हा स्वतःवर भलामोठा अन्याय ठरेल. 'शितावरून भाताची परीक्षा' वाले नियम सगळ्या ठिकाणी लावायचे नसतात हो. तेव्हा उलटा पानं, करा सुरुवात वाचायला आणि फडशा पाडा याही अंकाचा.

तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! दिवाळीच्या शुभेच्छा देऊन हे लांबलेलं संपादकीय संपवण्यापूर्वी एकच सांगतो. हा दिवाळी अंक नाही पण तरीही शुभेच्छा मात्र अस्सल बावनकशी आणि मनापासून आहेत.. त्या दिवाळीपर्यंत पुरवा.. कारण पुढच्या महिन्यातला दिवाळी अंक घेऊन येणारी संपादक व्यक्ती माझ्यापेक्षा चिक्कार सिनियर आहे. दर्जेदार लिहिणारी आहे. त्यामुळे पुढच्या अंकाची वाट आत्तापासूनच पाहायला लागा.. चला भेटूच... अंकाच्या पानापानांत !!



---------------------------------------------------------------------------------------

आत्ताच प्रकाशित झालेल्या 'नेटभेट' च्या ऑक्टोबर इ-मासिकासाठी लिहिलेलं हे संपादकीय. संपूर्ण अंक इथे वाचता येईल.

38 comments:

  1. क्य बात है! हार्दिक अभिनंदन... :-)

    ReplyDelete
  2. संकेत !!! सुपरडुपर फास्ट प्रतिक्रियेसाठी सुपरडुपर आभार :D

    ReplyDelete
  3. >> चला भेटूच... अंकाच्या पानापानांत !!

    खास... प्रस्तावना तर छानच लिहली आहेस.

    ReplyDelete
  4. खूप आभार सौरभ. अंकही कसा झालाय ते कळव.

    ReplyDelete
  5. हेरंब आतापर्यंत फक्त तुझ्या पोस्टची पंखा....(ची पंख संपूर्ण स्त्रीलिंगात कसं लिहायचं रे....) होते...आता संपादकीय पण एकदम जबरा...तू म्हणजे ब्लॉग दुनियेतलं चतुरस्त्र व्यक्तिमत्व होणार आहेस...अंक चाळला छान आहे.....आणि तुही तुझ्या धावपळीतून हे कामं केल्याबद्दल अभिनंदन...
    रच्याक....त्यानिमित्ताने माहिते का?? चक्क पहिल्यांदी माझी एखादी पोस्ट या अंकांत येतेय....:) तर त्या भल्या भल्यांच्या पंगतीत 'माझिया मनाला' नेऊन बसवण्याच श्रेय तुलाच द्यायला हव...आभार...

    ReplyDelete
  6. न्यायाधीश महाराज.. आपण तर कमालच केलीत... :) आम्हास अतीव हर्ष जाहलेला आहे.. कसे सांगू आम्ही. एक सो एक भारी लेख आहेत की ह्यात... पुढे सुद्धा आपण ही कामगिरी पार पाडावी अशी इच्छा आहे..
    आता आम्ही तर म्हणू 'अतिथी... तुम नाही जावोगे... '

    ReplyDelete
  7. न्यायाधीश महाराज.. आपण तर कमालच केलीत... :) आम्हास अतीव हर्ष जाहलेला आहे.. कसे सांगू आम्ही. एक सो एक भारी लेख आहेत की ह्यात... पुढे सुद्धा आपण ही कामगिरी पार पाडावी अशी इच्छा आहे..
    आता आम्ही तर म्हणू 'अतिथी... तुम नाही जावोगे... ' +१००

    हेरंबा संपादकीय तर अप्रतिम झालय!! जियो!!!

    सलील-प्रणव आणि हेरंबा तुमचे तिघांचे आभार आणि अभिनंदनही!!

    ReplyDelete
  8. अभिनंदन. छान आहे अंक! आणि तुझी प्रस्तावना देखील. :)

    ReplyDelete
  9. हेरंबा ! खरतर हि माझी तुझ्या ब्लॉग वरची माझी पहिलीच प्रतिक्रिया आहे ,

    खरच अप्रतिमच लिहतोस तू ! राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का ?

    कौनसी चक्की का आटा खाता हैं रे तू ?

    APART FROM JOKE अगदी छान लिहतोस आणि मी तुझ्या त्या 'बरगड्डी संघटनेवर लिहलेला त्या BLOG मस्तच होता ,

    तुझ्याच शब्दात सांगायचे झाले तर मी पंखा झालोय यार तुझा !

    KEEP IT UP अश्याच झणझणीत लेखनाची अपेक्षा !

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या !

    ReplyDelete
  10. सहीये संपादकराव!
    लगे रहो!!

    ReplyDelete
  11. अप्रतिम हेरंब..अभिनंदन

    ReplyDelete
  12. संपादकीय सकाळीच वाचलं होतं. कसलेला संपादक वाटतोस तू? खरंच सांग! कौनसी चक्की का आटा खाते हो तुम?

    ReplyDelete
  13. Uttam kaamgiri !!!!lage raho !!!

    ReplyDelete
  14. हार्दिक अभिनंदन हेरंब

    ReplyDelete
  15. सुंदर अप्रतिम

    ReplyDelete
  16. अपर्णा, खूप खूप धन्स.. :) रच्याक, ओरेगावात हरभर्‍याचं पिक जास्त यायला लागलंय वाटतं.. म्हणून एक्स्ट्रॉ हरभरा इकडे पार्सल करून पाठवते आहेस मला चढून बसायला? ;)

    हो ग धावपळ तर खूप झाली.. पण जमलं.. नेटभेटमध्ये एकदा लेख आला की मग नियमित यायला लागतो.. तुझंही तसंच होईल कदाचित :)

    ReplyDelete
  17. सेनापती उर्फ खाणापती, त्रिवार धन्यवाद. कमाल कसली.. कमाल तर तुम्ही लेखक लोकांनी केलीत मी फक्त ते अलगदपणे निवडले :)

    >> पुढे सुद्धा आपण ही कामगिरी पार पाडावी अशी इच्छा आहे..
    आता आम्ही तर म्हणू 'अतिथी... तुम नाही जावोगे... '

    अरे पुढचा/ची अतिथी संपादक तर अजून भारी असेल.. बघच तू.

    ReplyDelete
  18. हे हे तन्वे.. तुम्ही सगळ्यांनी काय हरभर्‍याचं घाऊक उत्पादन चालवलंय वाटतं ;)

    तुम्हा सगळ्यांना संपादकीय, अंक आवडला हे वाचून बरं वाटतंय.. आभार्स ग..

    सलील/प्रणवचे तर विशेष आभार.

    ReplyDelete
  19. अनघा :) .. मनःपूर्वक आभार !

    ReplyDelete
  20. तुळजाराम, एवढ्या छान मनमोकळ्या (आणि हरभर्‍याच्या झाडाच्या शेंड्यावर नेऊन ठेवणार्‍या) प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

    पीठ कुठल्या चक्कीतून येतं ते विचारायला लागेल.. कारण इथे चक्क्या नाहीत डायरेक्ट पीठच मिळतं ना ;)

    बरगड्डीवर लिहिताना मी तसाही जाम भडकलो होतो त्यांच्यावर. त्यामुळे आपोआपच जरा तिखट लिहिलं गेलं. पुन्हा एकदा प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच नियमित भेट देत रहा..

    ReplyDelete
  21. बाबा, खूप खूप आभार रे.

    ReplyDelete
  22. सुहास, मनापासून धन्यवाद.. !

    ReplyDelete
  23. कांचन, अनेक आभार.. कसलेला? कसलं कसलं ;) कसलेली संपादिका तर तू आहेस.. कळेलच ते उद्या मोगरा फुलला चा दिवाळी अंक बघताना :)

    ReplyDelete
  24. माऊ, मनःपूर्वक धन्यवाद ग.

    ReplyDelete
  25. मंदार, अनेक आभार.

    ReplyDelete
  26. काका, खूप खूप धन्यवाद.. !

    ReplyDelete
  27. अजुन एक पिस तुझ्या तुरयात... :)
    अभिनंदन हेरंबा,लगे रहो...
    नेटभेट चेही अभिनंदन पुनरागमनाबद्दल..
    अंकातले दोन-चार लेख मी वाचलेले नाहीत बाकी माझेही आवडते आहेत...पण तुझ हे संपादकीय भारीच.
    रच्याक, पुढच्या महिन्यात काढायचा होतास ना हा अंक..सध्या लोकांसमोर वाचायला भरपुर खुराक पडला आहे...

    ReplyDelete
  28. हे हे देवेन.. एकदम कोंबडा करून टाकलास की माझा ;)

    खरंच.. एकसेएक लेख लिहिलेत लोकांनी.

    >> रच्याक, पुढच्या महिन्यात काढायचा होतास ना हा अंक..सध्या लोकांसमोर वाचायला भरपुर खुराक पडला आहे...

    अरे पुढच्या महिन्यात दिवाळी विशेषांक येईलच नेटभेटचा.. नवीन संपादक असलेला.. :)

    ReplyDelete
  29. too late pratikriya detoy.. swaarrryyyyy... tya laghukatha sodun saglech vachlele ani avadlele hote.. ata laghukatha vachlya ,awadlya... mast ank hota.. sahi..
    Tuza sampadakiy abhutpurva ahe, asla sampadkiya kadhich vachlela navhata.. agadich navi shaili, tu mhanje yugpurush tharlas re!!! ata tu swatahach niyamit sampadak ho.. atithi honyat fayda nahi.. gharacha sadasya ho re herambaa !!!

    ReplyDelete
  30. संकेत, मनापासून आभार दोस्ता :)

    अभूतपूर्व काय, युगपुरुष काय.. रजनीदेव संचारलेत जणु तुझ्या अंगी ;)

    अरे असं संपादकीय एकदा वाचायला बरं वाटतं. दर महिन्यात हे असं वाचायला लागलं की कंटाळा येईल कदाचित.. त्यामुळे मी अतिथीच बरा ;)

    ReplyDelete
  31. अभि+नंदन...अंक वाचला नाही अजुन...निवांत वाचेन...वरचेवर पाहिला...मस्त झाला आहे.

    ReplyDelete
  32. खूप आभार योगेश :) .. नक्की वाच वेळ मिळाला की. सही लेख लिहिलेत सगळ्यांनी.. !!

    ReplyDelete
  33. अरे वा! निवांत वाचून पाहीन..
    शुभेच्छा!

    ReplyDelete
  34. तू ग्रेट आहेस.. परत मानलं तूला... आणि कितीही नवे पंखे झाले तरी माझ्यासारख्या जुन्या गंजलेल्या पंख्यांना विसरू नको रे ;)

    ReplyDelete
  35. धन्यवाद मीनल.. नक्की वाच. सुंदर लिहिलंय सगळ्यांनी

    ReplyDelete
  36. >> तू ग्रेट आहेस..

    आय क्नोव :P

    >> कितीही नवे पंखे झाले तरी माझ्यासारख्या जुन्या गंजलेल्या पंख्यांना विसरू नको रे

    जे का रंजले 'गंजले', त्यासी म्हणे जो आपुले, तोचि ब्लॉगरु ओळखावा, 'माज' तेथेचि जाणावा.


    (संपूर्ण कमेंट कैच्याकै हलकी घेणे.. काहीही लिवलंय मी :P)

    ReplyDelete
  37. netbhet viShayee malaa maahitee navhata :( baki tujhe abhinandan sampadak padaasaaThee.

    ReplyDelete
  38. आभार तृप्ती..

    अग नेटभेट अंक खूप लोकप्रिय आहे ब्लॉग दुनियेत. नियमित ब्लॉग वाचन न करू शकणार्‍या लोकांच्या मेलबॉक्समध्ये निवडक लेख पीडीएफ स्वरुपात पोचल्याने ब्लॉगर आणि वाचक दोघांचीही सोय होते.
    http://netbhetmagazine.blogspot.com/ ला भेट देऊन जुने अंक चाळून बघ वेळ मिळेल तेव्हा. खूप मस्त उपक्रम आहे हा..

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...