Monday, August 23, 2010

...... !!!

ज्जे ब्बात.. असं कन्फ्युजिंग शीर्षक टाकण्याचा एक फायदा असतो तो म्हणजे सदरहू लेख किती विस्कळीत आहे याचा थोडाफार तरी अंदाज येऊन वाचक नाईलाजाने का होईना जरा सावरून बसून वाचायला लागतात. आता आपल्यात म्हणून सांगतो खरं तर 'शॉपिंगिंग' (शॉपिंग 'करणे' म्हणून शेवटचा शेपरेट इंग ) किंवा 'माझे खादाडीचे प्रयोग : भाग ४' यापैकी एक नाव देणार होतो पण शॉपिंग विषयी वाचायला आलेल्यांना विंडो कसलं विंडोच्या साध्या गजाच्याही शॉपिंगचं सुख मिळालं नसतं आणि खादाडीवर वाचायला आलेल्यांना काहीतरी अर्धकच्चं, शिळंपाकं वाचायला लागल्याने खर्रेखुर्रे वैताग-निषेध नोंदवावे लागले असते त्यामुळे मग 'खेळ सुरक्षित' (हे तिसरं शीर्षक नाही.. 'प्ले सेफ' चा भावानुवाद आहे. आयला त्या खोखोच्या. तो सुरु झाल्यापासून भाषांतर च्या ऐवजी भावानुवादच तोंडात येतं सारखं..) म्हणत '...' हे दिलं. जो जे वांछील तो ते लाहो... अर्थात 'बाजार.... हाट !!' असंही एक शीर्षक डोक्यात होतंच पण 'शॉपिंगिंग'चं च विश्लेषण (आवरा !!) यालाही लागू होतं म्हणून वगळलं. ही पोस्ट कुठूनही कुठेही भरकटत गेलेली आहे हे शीर्षक आणि पहिल्या परिच्छेदावरून दिसतंच आहे. (नाममहात्म्य असतं पण म्हणून पहिल्या ८ ओळी त्यासाठीच?)... पोस्टबाळाचे पाय पहिल्या परिच्छेदातच दिसतात. दुसरं काय. मुळात दोन पोष्टींमधलं अंतर [तारीख (पे तारीख)] पाहता सुचलेलं धाडधाड लिहून टाकण्याऐवजी "हे असं काय सुचतंय विचित्र." किंवा "जरा विषयाला धरून नाही वाटत नै" असले लाड करून घेतले तर मग (ब्लॉगची) उपासमारच की.

तर परवाची गोष्ट. "ती नाही रे.. ती.. तिच्या बाजूची.. पिवळी डाळ", "अरे पातळ पोहे नकोत.. जाड घे तिथले", "अरे इडली रव्याने कसा करणार उपमा? इडली रवा नकोय.. त्याच्या बाजूचा घे.. 'सुजी' लिहिलेला" अशा बाजारहाट (घरगुती खरेदीला शॉपिंगिंग म्हणणं हा समस्त मॉलांचा अपमान आहे खरं तर) हे (जणु) एक महादिव्य काम आहे (अर्थात ते आहेच.), तुला काहीही कळत नाही, मी नसले की काहीही उचलून आणतोस अशा छुप्या हल्ल्यांनी भरलेल्या सूचनास्त्रांचा वर्षाव चुकवण्याचा असफल प्रयत्न करत त्या सगळ्या सूचना पाळत पाळत (न पाळून सांगतोय कोणाला?), ती अवाढव्य ट्रॉली त्या टीचभर सुपरमार्केटच्या इवल्याशा गल्ल्यांमधून नेत नेत मी कसाबसा काउंटरच्या रांगेपाशी येऊन पोचलो. (हे 'पॅसिव्ह' प्रकारचं वाक्य आहे ज्यात (सूचना)कर्त्याचा नामोल्लेख करावा लागत नाही आणि तरीही कर्ता(र्ती) कोण हे सर्वांना ठाऊक असतं). समोर बघतो तर तिथल्या ट्रॉलीत एकावर एक तीन ट्रॉल्या भरतील एवढ्या सामानाचा डोंगर. मला एकदम तो डोनाल्ड डक मगात चिक्कार पाणी भरतो तरी ते सांडण्याऐवजी खांबासारखं सरळ वर वर जातं त्याची आठवण झाली. आयला म्हणजे असं प्रत्यक्षात सुद्धा होतं तर. उगाच त्या अ‍ॅनिमेशनमधल्या अतिशयोक्तीला नावं ठेवायचो. सॉरी डिस्ने आजोबा. जवळपास पंधरा मिनिटं स्थितप्रज्ञासारखं उभं राहूनही रांगेत एक इंचही पुढे सरकलो नव्हतो. कॅशिअरबाई त्या सामानाच्या ढिगार्‍यात हात घालून एकेक जिन्नस बाहेर काढून ते बारकोड-रीडरसमोर धरून बील करत होत्या. कित्येक वस्तू त्या ढिगार्‍यातून बाहेर पडून काउंटरच्या दुसर्‍या बाजूचा ढिगारा तयार करण्यात खर्ची पडल्या तरीही इकडचा ढिगारा काही कमी होण्याची लक्षणं दिसत नव्हती. कॅशिअरबाईंचा कारभारही जगाची पर्वा नसल्याप्रमाणे अगदी निवांत असा चालला होता. थोडक्यात सोमालिया किंवा तत्सम कुठल्याशा आफ्रिकेतल्या देशातल्या एखाद्या बाईला पकडून तिला एक लाख रुपये देऊन "बाई ग, कर तुला हवी ती हवी तेवढी खरेदी" असं सांगितलं तर ती जेवढी खरेदी करेल तेवढी खरेदी करणारी बाई काउंटरच्या या बाजूला आणि पुण्याच्या चितळ्या-पितळ्यांच्या दुकानातल्या निवांतपणाने काम करणार्‍या बाईला इथे आयात केलं किंवा तिचा क्लोन केला तर जे काही तयार होईल ती बाई काउंटरच्या त्या बाजूला असा दोन सर्वस्वी भिन्न संस्कृत्यांचा अनोखा संगम माझ्या (कंटाळलेल्या) डोळ्यांसमोर घडत होता. काउंटरच्या अलिकडलीचा बाजाराहाटीचा दांडगा उत्साह आणि पलीकडलीची निवांत स्थितप्रज्ञता यासमोर माझा अवसानघातकी संयम दुबळा ठरला. त्या आत्यंतिक धिम्या गतीने आकुंचन पावणार्‍या (ट्रॉलीतल्या) ढिगार्‍याकडे पहात राहण्याएवढं धैर्य माझ्या अंगी नव्हतं. सुस्कारे टाकत, चकचुक करत "तू थांब इथेच जरा वेळ, मी पटकन राउंड मारून येतो" असं बायकोला सांगून मी रांगेतून बाहेर पडलो. आमच्यात दुकानातल्या रांगेत उभं राहिल्यावर हे 'राउंडयुद्ध' फार रंगतं. समोरचा बेसावध असताना शिताफीने जो "मी जरा राउंड मारून येतो/ते" हे वाक्य टाकतो तो/ती जिंकला/ली. यात तो-ला कधीच जिंकत नाहीत आणि ते-ली कधीच हरत नाहीत. पण आज सचिनच्या खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हची आठवण करून देणारं टायमिंग वापरून मी या युद्धात जिंकलो होतो. त्या अतीव आनंदात आधीच्या पंधरा मिनिटांची कटकट विसरूनही गेलो. हे शेवटच्या क्षणी राउंड मारणं म्हणजे काय तर उगाच दुकानात चकरा मारत राहणं. हातात ट्रॉली नसते की कडेवर लेक नसतो. बागडा हवं तेवढं. तर असाच बागडत बागडत एकेक सेक्शन फिरत फिरत मी फ्रोझन सेक्शनपाशी जाऊन पोचलो..... आणि तिकडे घडलेला अजून एक अनोखा संस्कृतीसंगम पाहून फ्रीझ झालो !!! हा संगम होता रुचकर इटालिअन संस्कृती आणि रांगड्या पंजाबी संस्कृतीचा... !! तिथल्या फ्रीजमधून फ्रोझन पिझ्झाची बरीचशी पुडकी डोकावत होती. "नान पिझ्झा"... नान पिझ्झा.. नान पिझ्झा? नान पिझ्झा?????? नानाची टांग तुमच्या.. त्या पिझ्झाच्या पुडक्यांवर एक सरदार आपल्या मिशीला ताव देत पिझ्झावर ताव मारत होता. आणि त्या पिझ्झाचे प्रकार तरी किती .. पालक पिझ्झा, पनीर पिझ्झा, छोले पिझ्झा, मेथी पिझ्झा.... बास, पुरे.. च्यायला, मेथीच्या आणि पालकाच्या भाज्यांबरोबर नान खायला घालतायत आणि नाव मेथी नान-पिझ्झा !! हट् साला.. हा संस्कृत्यांचा संगम कसला ही तर एतद्देशीय आणि परदेशी खाद्यसंस्कृतीची मारामारी होती, युद्ध होतं, खडाजंगी होती.. संग्राम होता... संगम सोडून दुसरं काहीही होतं.. मी त्या मिशीला ताव देणार्‍या सरदाराकडे बघून कुत्सितपणे हसलो. तेवढ्यात काय झालं काय माहित पण अचानक त्या सरदाराने रागावून त्याच्या हातातला पिझ्झाचा तवा दाणकन माझ्या डोक्यातच घातला आणि खदाखदा हसायला लागला. पण बघता बघता हसायचं थांबला आणि मी जोरजोरात हसायला लागलो. कारण तव्याला सरसरून टेंगुळ आलं होतं. त्यानंतर मी असा एक जोरदार पंच त्या तव्याच्या टेंगळावर दिला की तवा सपाट होऊन ते टेंगुळ सरदाराच्या पगडीतून बाहेर येऊन रसरसून वर आलं. तव्याचं टेंगुळ आणि त्यानंतर स्वतःला आलेलं टेंगुळ पाहून 'नान पिझ्झा' चा एव्हाना 'ना ना पिझ्झा' झाला होता.


"माफ करना पाजी" सरदार कळवळून म्हणाला
"अरे पाज्या, माफी तर तुला मागितलीच पाहिजे. उगाच कैच्याकै काय खायला घालता तुम्ही लोक पिझ्झाच्या नावावर? आणि वरून दादागिरी? आणि त्या पिझ्झाला काहीतरी अर्थ नको? नान पिझ्झा काय नान पिझ्झा ? अरे अशाने उद्या चितळ्यांनी 'भाकरी पिझ्झा', पटेलांनी 'खाखरा पिझ्झा', शेट्टींनी 'डोसा पिझ्झा', सिंधवान्यांनी 'पापड पिझ्झा' आणला म्हणजे मग? आम्ही काय पिझ्झाच्या नावावर हे असले प्रकार खायचे? आणि हे प्रकार फोफावायला लागले तर ओरिजनल पिझ्झाची चव पुढच्या पिढीला कळणार कशी?"
"ओरिजनल? म्हणजे ते इटालियन?"
"अरे हट. मी ओरिजनल म्हणतोय आणि तू इटालियन इटालियन काय लावलंयस?"
"अच्छा म्हणजे अमेरिकन?"
"अरे ए सरदारा. गपतो का आता? मी ओरिजनल पिझ्झाविषयी बोलतोय आणि तू काय इटालियन, अमेरिकन करतोयस रे? इटालियन, अमेरिकन असतात ते पिट्झा असतात. मी पिट्झा नाही ओरिजनल पिझ्झाविषयी बोलतोय.. जाउदे च्यायला.. मीही कोणाशी वाद घालतोय.. नानवर भाज्या घालून तो पिझ्झा म्हणून विकणार्‍या अज्ञानी जीवाशी?"
"दादा, असं काय करता..? मग तुम्हीच सांगा की नीट." .. मी चुकून अर्धी चड्डी घालून बाहेर भटकतोय की काय आणि असेलच तर तिची नाडी बाहेर लोंबते आहे की काय असे दोन अत्यंत स्वाभाविक प्रश्न 'दादा' हे संबोधन ऐकल्यावर माझ्या मनात डोकावले. पण मी मात्र खाली डोकावलो नाही. स्वतःच्या मतांशी आणि कृतीशी ठाम असल्याचे फायदे मी ऐकले होते आणि पण आज ते एका मठ्ठ सरदाराशी वाद घालताना असे उपयोगी पडतील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.
मलाही उत्तर माहीत नाहीये की मला ते ठाऊक असूनही मी उगाचंच भाव खातोय हे न कळल्याने "दादा, सांगा ना" असा पुकारा त्याने पुन्हा एकदा केला. यावेळी मात्र कोणीच कुठेच डोकावलं नाही. (आठवा : कृतीशी ठाम).. पण आता बोललो नाही तर ही 'दादा' ची पुंगी काय थांबायची नाही हे लक्षात येऊन मी म्हंटलं "अरे बाबा, पिझ्झा भारतीयच.." टॉमची बुबुळं गरागरा फिरतात तशी त्याची बुबुळं क्षणभर फिरली. त्याच्या बुबुळांचे टप्पे थांबण्याची वाट बघत असताना मी गुपचुप खाली डोकावून खात्री करून घेतली. फुक्कट रिस्क का घ्या..? जस्ट इन केस.. क्काय?
"अरे म्हणजे पिझ्झा हा पदार्थ इटालियन असला तरी आपल्याला आवडणारा ओरिजनल पिझ्झा हा आपल्याच स्टाईलचा, आपणच तयार केलेला, आपल्याला आवडणारा आणि अतिमहत्वाचं म्हणजे ज्यात खाली नान आणि त्याच्यावर मेथी, पालक, छोले असे काहीही प्रकार नसतील असा".. टोमणा कळून तो अचानक मान खाली घालून चक्क लाजला. आधी मला वाटलं डोकावूनच बघतोय की काय. "च्यायला लाजतो काय? कैच्याकै !!" वगैरे बडबडणार होतो मी पण काही उपयोग झाला नसता हे समजून घेऊन शांत राहिलो. पुरेसं लाजून, ओशाळून वगैरे झाल्यावर तो म्हणाला
"म्हणजे कसं हो नक्की?"
"आता तुला ते इथे कसं सांगू? असं तोंडी नाही सांगता येणार."
"अहो चालेल की. तोंडी कशाला मी लिहूनच घेतो".. "अरे एSS .. माझ्या तोंडी न सांगता येण्याचा आणि तुझ्या लिहिण्याचा काय संबंध?" हे वाक्यही मी आधी प्रमाणेच गिळून टाकलं.
"बोला ना दादा, सांगा ना"
"अरे, असं सांगता, लिहिता नाही येणार बाबा."
"असं कसं?? तुम्ही तर प्रत्यक्ष मॅगीचे वडे केलेत, पास्त्यात सॉरी पास्तुल्यात खरवडलेलं खोबरं घातलंत.. त्या मॅगीवर, त्या पास्तुल्यावर कसं का असेना पण तुम्ही लिहिलंतच ना. तसंच हे पिझ्झाचं. सांगा ना." माझा ब्लॉग अमेरिकेत (की पंजाबात?) ही वाचला जातो या नवीन मिळालेल्या माहितीने आनंदी आनंद गडे होऊन मी ते 'कसं का असेना' साफ विसरूनच गेलो किंवा त्याच्याकडे अंमळ दुर्लक्षच केलं आणि 'कसं का असेना' हे लिखाणाला उद्देशून नाही तर कृतीला उद्देशून असावं अशी स्वतःची समजून घालून घेतली.
"बरं तर. होऊनच जाऊदे."
"अरे वा. मग करायची सुरुवात?"
"हम्म चला."
"बरं आता पहिल्यांदा काय करायचं?"
"पहिल्यांदा मी म्हणतो ते ऐकायचं.
१. मी सांगतो ते, सांगतो तसं फटाफट लिहून घ्यायचं."
त्या मंद जीवाने तेही फटाफट लिहून घेतलं. "गधड्या, हे लिहून नको रे घेऊ. या मी तुला आपली पिझ्झाची रेसिपी सुरु होण्याआधीच्या माझ्या अटी सांगतोय."
"अच्छा अच्छा.. असं होय. मला वाटलं पिझ्झा करण्याआधी काहीतरी फटाफट लिहून घेण्याची तुमची शिक्रेट रेसिपी असेल."
"२. कमी बोलायचं. प्रश्न विचारायचे नाहीत. आता पुढे काय? काय छान वास सुटलाय नै? असलं काहीही बडबडायचं नाही. थोडक्यात सगळ्या अटींचं एक सामायिक एकत्रीकरण अर्थात सगळ्यांत सोप्पी अट म्हणजे स्वतःला प्रशांत दामले समजायचं नाही."
त्याला काहीही कळलं नाही. त्याला प्रशांत दामले माहीत नाही पण माझा ब्लॉग मात्र माहिती आहे हे कळल्यावर तर मला अजूनच मुठभर मांस चढलं आणि त्या आनंदातच मी एकदम भाषण देण्याच्या आवेशात उभा राहिलो आणि त्याला (त्याच्या मते) माझी शिक्रेट रेसिपी सांगायला लागलो.

१. महिन्याची तारीख आणि खिशाचं जडत्व यांची सांगड घालून, हिशेबाहिशेबी करून, अचूक उत्तर मिळवून त्यानुसार पिझ्झा खाण्यास बाहेर जावयाचे आहे की सासर्‍याचे आहे हे ठरवावे. आपलं सॉरी.. जावयाचे आहे की ... नकोच ते.. जायचे आहे (आंग्गाश्शी) की पिझ्झा घरीच करायचा आहे हे ठरवावे.

२. ही कृती सार्वकालिक असली तरीही सध्या महिन्याचा शेवटचा आठवडा चालू असल्याने वास्तव वाटावं म्हणून आणि खरोखरचं खिशाचं हलकत्व अधिक असल्याने घरी पिझ्झा करण्याची कृती आधी पाहू या. अद्यापही जड खिसे असणारे डायरेक्ट पायरी क्र. अमुक अमुक पासून वाचू शकतात.

तेवढ्यात अचानक त्या सरदाराने माझा दंड पकडला आणि एकदम ओढत मला कुठेतरी न्यायला लागला. माझे खांदे गदागदा हलवायला लागला.


"अरे काय झालं? असा भाषण दिल्यासारखे हातवारे का करतो आहेस? काय बडबडतो आहेस? आणि अरे इथे काय करतो आहेस? अख्ख्या दुकानात तुला फ्रोझन पिझ्झाचं सेक्शन सोडून दुसरं काही दिसलं नाही?" बायकोने वैतागून माझ्या दंडाला धरून ओढत ओढत मला काउंटरजवळ आणलं. त्या सोमालियाच्या बाईचा आणि पितळ्यांच्या ताईचा द्विराष्ट्रीय आयात-निर्यात कार्यक्रम नुकताच आटपला होता. द्विराष्ट्रीय आयात-निर्यातीच्या तुलनेने अतिशयच तोकडं आणि चिरकुट भासणारं आमचं सामान बायको काउंटरवर काढून ठेवायला लागली.

"काय झालं हो यांना अचानक?" रांगेतली तिच्या मागची बाई एकदम म्हणाली.
"काही नाही हो. असंच.." सौ.
"पण तरीही?"
अखेर सौचा बांध (बडबडीचा व्हो) फुटला असावा. तिला राहवलं नाही.
"मगाशी जाड पोह्यांचं एकच पाकीट घेतलं ते कमी पडेल कदाचित. अजून एक पाकीट घेऊन ये" असं सांगून मला लांब पिटाळून ती त्या बाईंकडे आपलं मन मोकळं करायला लागली.
"अहो काय सांगू तुम्हाला.. सगळंच विचित्र.. याला पिझ्झा अतिशय म्हणजे अतिशय आवडतो. पण मध्यंतरी डाएटिंगचं भूत शिरलं डोक्यात. त्यामुळे चीज, पिझ्झा वगैरे एकदम बंद करायचं ठरवलं याने. हळूहळू कडक पथ्य पाळायलाही लागला. पण काही दिवसच. काही दिवसांनी त्याला आपोआप पिझ्झाची आठवण यायची आणि मग पिझ्झा खावासा वाटायचा. कुठेही दुकानात, हॉटेलमध्ये पिझ्झा दिसला की याची पिझ्झा खाण्याची इच्छा अनावर व्हायची. मग तो एकदम ट्रान्समध्ये जायचा. भास व्हायला लागायचे. विचित्र वागायचा. म्हणून मग हे टाळण्यासाठी आम्ही जिथे पिझ्झा मिळतो किंवा अगदी दृष्टीक्षेपातही येतो अशा ठिकाणी जाणंच बंद केलं. अमेरिकन स्टोर्समध्ये जाणं बंद, अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये जाणं बंद. पण इंडियन स्टोरमध्ये जाणं कसं सुरक्षित होतं एकदम. पण आता यांनी काय तो नवीन नान पिझ्झा का काय तो नवीन काढला आहे ना.. आता हा नेमका त्या पिझ्झासमोर जाऊन थडकला. आणि मग नेहमीसारखेच हातवारे, बडबड वगैरे वगैरे.. नशीब मी वेळेवर पोचले तिकडे. नाहीतर उगाच शोभा झाली असती."
"हो ना. अरेरे."
सगळ्या वस्तूंचं बिल करून त्या कॅरीबॅगमध्ये भरून झाल्या. पैसे देऊन झाले. रिसीटवर पन्नास डॉलरांचा आकडा बघून पितळेताई लगबगीने उठल्या आणि एका बॅगेत काहीतरी भरून ती बॅग आमच्या पुढ्यात ठेवून सुहास्य वदनाने वदत्या झाल्या "हे तुमचे नान पिझ्झा. अहो आमच्या इथे ही स्कीम चालू आहे. पन्नास डॉलर्सचं शॉपिंग करणार्‍यांना दोन 'नान पिझ्झा' फ्री. एन्जॉय.."

बायको फ्लॅट झाली आणि मी पुन्हा पाजीशी बोलण्यात मग्नाळलो !!!

तळटीप : स्वप्नात कायपण घडू शकतं आणि त्या कायपणचं उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही. ख्रिस्तोफर नोलान परमानेच.. !!

42 comments:

  1. अगदी अशक्य झालाय तुझा पिझ्झा आयमीन पिझ्झाप्रकरण. कशाला उगा उपासमार करतो आहेस. मग ही अशी वेळ येतेय. तुझ्यावर असे म्हणतेय वाटले की काय तुला... मी आदिच्या आईबद्दल बोलतेय. :P

    काउंटरच्या अलिकडलीचा बाजाराहाटीचा दांडगा उत्साह आणि पलीकडलीची निवांत स्थितप्रज्ञता यासमोर माझा अवसानघातकी संयम दुबळा ठरला..... हे अगदी सेम टू सेम... इति नचिकेत. :)

    आयला, नवरेही चक्क हातमिळवणी करायला लागले की काय... चूक माझी नं... तुझी ही भन्नाट स्वप्नगिरी मी त्याला वाचून दाखवली... :D

    मजा आला. (आज माझ्या स्वप्नात तू आणि विभीच्या या जबरी कलाकृती धुमाकूळ घालणार... कोई मुझे बचावो.... )

    ReplyDelete
  2. "बायको फ्लॅट झाली आणि मी पुन्हा पाजीशी बोलण्यात मग्नाळलो !!!

    तळटीप : स्वप्नात कायपण घडू शकतं ."

    ही लाखोंकी बात आहे.अगदी खरी खरी. फक्त तळटिप हा शब्द त्या वर लिहिलेल्या पहिल्या वाक्याच्या आधी हवे होते का?

    ReplyDelete
  3. य्ये ब्बात्त... :)

    आणि हेरंब सुटला (पुन्हा एकदा :) )... आता असे म्हणायला हरकत नाही की आदि नंतर पिझ्झा हा विषय आला की ही डोंबिवली फास्ट पळायला लागते... :)


    बाकि पोस्ट जोरजोरात वाचली... अमितचे दु:ख जरा कमी झाले त्यामूळे की सगळ्याच बायकांच्या मते नवरे मठ्ठ असतात... तोच काय तो स्पेशल नाही ;)

    आयला पोस्ट भन्नाट.... लिही रे तू!!

    ReplyDelete
  4. जबरा...तुझ्या पेटंट स्टाईलमधला...शेवट आणि तळटीप (आमच्या इथे ही स्कीम चालू आहे. पन्नास डॉलर्सचं शॉपिंग करणार्‍यांना दोन 'नान पिझ्झा' फ्री. एन्जॉय.."बायको फ्लॅट झाली आणि मी पुन्हा पाजीशी बोलण्यात मग्नाळलो !!!) पण एकदम भारी शेवटच्या चेंडुवर पण षटकार मारल्यासारख...

    ReplyDelete
  5. हेरंब दादा, लय लय म्हणजे लय भारी.

    ReplyDelete
  6. एकदम शॉलीड....सत्यवान फ़्लेवर रॉक्स....

    जबर्‍या लिहल आहेस.

    ReplyDelete
  7. हेरंब दादा,पोस्ट खुपच मजेशीर आहे....... तळटिप वाचुन आई आणि मी मनसोक्त हसले........

    ReplyDelete
  8. प्रचंड भारी रे भावा...
    पिझ्झा म्हणजे आपला पण जीव की प्राण...
    पण,, पण... मला ओरिजिनल इटालियनच जास्त आवडतो... का कुणास ठाऊक! ;)
    ता.क. - हल्ली सगळ्यांना फारच जास्त स्वप्न पडायला लागलीयेत!

    ReplyDelete
  9. Extraordinary closing statement,it's like signature of Heramb,Great job

    ReplyDelete
  10. "आता पुढे काय? काय छान वास सुटलाय नै? असलं काहीही बडबडायचं नाही. "
    हे मस्त होत

    ReplyDelete
  11. अथ पिझ्झापुराण संपूर्ण...
    - पौरोहित्य by हेरंब भट

    ReplyDelete
  12. हेरंबशेठ षटकार...सत्यवान स्टाइल पोस्ट, दिल खुश केलास बघ एकदम ...
    तव्याला सरसरून टेंगुळ आलं होतं. त्यानंतर मी असा एक जोरदार पंच त्या तव्याच्या टेंगळावर दिला की तवा सपाट होऊन ते टेंगुळ सरदाराच्या पगडीतून बाहेर येऊन रसरसून वर आलं :)
    स्वप्नात काही होऊ शकत..आणि जर ती नोलानकडून इन्स्पाइयर्ड असली की संपलच की रे :)

    ReplyDelete
  13. हेहेहे श्रीताई.. आभार्स.. अग कधी कधी हे प्रकरण असंच अशक्य होतं आणि मग कैच्याकै स्वप्न पडायला लागतात.. आणि तो 'नान पिझ्झा' नामक भयंकर प्रकार बघितला आणि म्हटलं खर्‍या पिझ्झा प्रकारची माहिती लिहूया.. तर तोवर स्वप्नच संपलं ;) जाउदे.. काहीही बडबडतो आहे मी..

    नचिकेतना सेम पिंच सांग :) आणि त्यांना म्हणावं अजून अनेकजण आपल्याशी हातमिळवणी करायला तयार आहेत ;)

    >> (आज माझ्या स्वप्नात तू आणि विभीच्या या जबरी कलाकृती धुमाकूळ घालणार... कोई मुझे बचावो.... )

    तरी नशीब अजून ब्लॉगविश्वात इंसेप्शन वाला स्वप्नात स्वप्न वाला प्रकार आलेला नाहीये.. तो आला की तर धुमाकूळ होईल नुसता ;)

    ReplyDelete
  14. धन्स काका... हाहाहा.. तुमची तळटीपेची जागा आवडली.. ;)

    ReplyDelete
  15. धन्स तन्वे..

    >> आदि नंतर पिझ्झा हा विषय आला की ही डोंबिवली फास्ट पळायला लागते... :)

    हो मलाही अलीकडे जाणवायला लागलंय तसं ;)

    नवरे मठ्ठ??? याबद्दल महानिषेध ;) .. उलट सगळेच नवरे 'स्पेशल' असतात..

    लिहितोय लिहितोय.. जमेल तसं.. हळूहळू.. निवांत.. पितळे बाईंसारखं ;)

    ReplyDelete
  16. आभार देवेन.. शेवटच्या चेंडूवरच्या षटकारासाठी आधी जाम बॅटिंग करावी लागली ;)

    ReplyDelete
  17. सचिनराव, लय लय आभार्स !!

    ReplyDelete
  18. धन्स यवगेशा.. आयला फ्लेवर काय, पेटंट काय... हरभर्‍याची लागवड जोरात आहे सध्या ;)

    ReplyDelete
  19. सुषमा, धन्स धन्स.. मलाही तुझी प्रतिक्रिया मनसोक्त आवडली :)

    ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा नेहमी..

    ReplyDelete
  20. आभार्स बाबा.. आपण जेव्हा भेटू तेव्हा जोरदार पिझ्झा पार्टी होऊन जाऊदे.. क्या बोलता?
    अरे तसा मलाही हल्ली अमेरिकन पिझ्झा आवडायला लागलाय. पण तरीही आम्ही घरी जो पिझ्झा करतो ना त्यासमोर अमेरिकन, इटालियन आणि अजूनही कुठकुठले पिझ्झे झक मारतात.. :)

    तुझ्या ताकाबद्दल रारा नोलानसाहेब सर्वस्वी जवाबदार आहेत :P

    ReplyDelete
  21. Hey Anee. Thanks a lot dude.. Thanks for such a wonderful comment.

    ReplyDelete
  22. आभार सागरा..

    अरे प्रशांत दामले माझा प्रचंड आवडता कलाकार असला तरी त्या कार्यक्रमात तो जाम डोक्यात जातो यार :)

    ReplyDelete
  23. ओम शांतिः शांतिः शांतिः ..

    भारत :)

    ReplyDelete
  24. आभार सुहासशेठ.. अरे स्टाइल बिइल काही नाही रे.. असाच आपला थोडा पांचटपणा..
    त्या नोलानने स्वप्नांची ताकद आणि जादू दाखवून दिल्याने हल्ली आपण सगळे सुटलो आहोत ;)

    ReplyDelete
  25. सुरूवात अडखळत झाली तरी शेवटाला पोस्ट भन्नाटाकडं वळली आहे....
    पिझ्झा हे तुझं होम पीच झालंय (आयला तूही इटलीकर की काय ???? )
    आला आमचा गडी फॉर्मात ;)

    ReplyDelete
  26. अरे ते दोन विषयांचं विचित्र मिश्रण झाल्याने सुरुवातीला थोडा कंटाळा आला असेल कदाचित.. पिझ्झा म्हणजे पहिल्यापासूनच आपला जीव की प्राण आहे रे.. त्यामुळे आपोआपच :)

    विसु : फॉर्म कधीही जाऊ शकतो याची नोंद घ्यावी ;)

    ReplyDelete
  27. पोस्ट वाचताना ते न्यू जर्सीचे पटेल केश न केरी टाइप दुकान डोळ्यासमोर आले :) तुला पिझा खूप आवडत असेल तर jackson heights भागातील फेमस पिझा आहे तिकडे जरूर जा. "आमची कोठेही शाखा नाही" टाइप दुकान पण पिझा मस्त! अधिक माहिती साठी येथे पहा:

    http://www.yelp.com/biz/elmhurst-famous-pizza-of-jackson-heights-jackson-heights

    ReplyDelete
  28. निरंजन, अगदी बरोब्बर ओळखलंस :) तुही जर्सीतच होतास का?
    आणि पिझ्झा म्हणजे जीव की प्राण आहे माझा.. तू सांगितलेला पिझ्झा ट्राय करून बघतोच या विकांतात :).. आभार

    ReplyDelete
  29. हेरंब,
    मी कनेक्टिकट मध्ये होतो. पण आमच्या काळी देशी दुकानांची जवळपास वानवा होती. तेव्हा महिन्या दोन महिन्यात जीवाची न्यू जर्सी करणे व्हायचे :) सकाळी येऊन भारतीय जेवण, मग सीडी डीवीडी खरेदी आणि मग ग्रोसरी असा बेत असे! आता मी राहायचो त्या गावात सुद्धा देशी दुकान आले आहे.

    ReplyDelete
  30. he he he heतुफ़ानच झालंय सगळं. नान पिझ्झा काय???? काहिच्या काहीच...बाकी आजकाल लोकांचा नवनवीन पादार्थ खाण्याचा आणि बनवण्याचा दांडगा उत्साह बघता काहीही ्होऊ शकतं.

    तुझं ते राऊंड प्रकरण आहे नां, तस आमच्याकडे शर्मन इरिटेट झालाय हे कळीचं वाक्य जो आधी म्हणेल तो रांगेच्या कटकटीतून सुटला.

    ReplyDelete
  31. @ आनंद, अरे हेरंब इटलीकर नाही, मागच्या जन्मी तो पिझ्यावरचं ्चीझ होता बहुतेक म्हणूनच त्याला पिझ्झाचा इतका लळा आहे :)

    ReplyDelete
  32. ओह अच्छा... हो पूर्वी शिट्टी(CT)करांची फार बिकट अवस्था होती देशी शॉपिंगच्या बाबतीत.. ऐकलंय मी.. आता तिकडे बरीच दुकानं आली आहेत :)

    जीवाची न्यूजर्सी :)

    ReplyDelete
  33. अग नाहीतर काय.. नान पिझ्झा बघून डोकंच फिरलं माझं. काहीही खपवतात यार पिझ्झाच्या नावावर.

    हाहा.. कळीचं वाक्य भारी आहे एकदम.. घरोघरी ....... :)

    पिझ्झावरचं चिज !!! वावा.. माझा मागचा जन्म पावन केलास तू तर ;)

    ReplyDelete
  34. मला एक कळत नाही. सगळ्याच पोस्ट्स कशा काय आवडू शकतात? कोणीतरी एखादा असेल ज्याला एखादी पोस्ट आवडली नसेल. मला ही पोस्ट नाही बुवा आवडली. मागेही एक न आवडलेली पोस्ट होती आणि मी तशी प्रतिक्रियाही दिली होती. पण न आवडल्याची प्रतिक्रिया माझी सोडून दुसर्‍या कोणाचीही मला आत्तापर्यंत दिसलेली नाही. नक्की काय आहे? मी जास्त फटकळ आहे का लोक भिडस्त आहेत? का मला लेखनातलं काही कळत नाही?

    ReplyDelete
  35. >> स्वतःला प्रशांत दामले समजायचं नाही. :))

    ReplyDelete
  36. सौरभ :)

    अरे मी प्रशांत दामलेचा पंखा आहे खरं तर पण त्या प्रोग्राममध्ये तो जे काही तारे तोडतो ना ते (कधीमधी) बघून खरंच वैताग येतो त्याचा.

    ReplyDelete
  37. हे हे संकेत, अरे फटकळ, भिडस्त वगैरे काही नाही. ब्लॉगविश्वाचा (मला जाणवलेला) एक अलिखित नियम आहे. कोणीच कोणाला थेट लेख आवडला नाही असं तोंडावर सांगत नाही. लेख आवडला नसला की प्रतिक्रिया येत नाहीत किंवा अगदी थोडक्यात मस्ट, छान, उत्तम अशा एका शब्दाच्या प्रतिक्रिया येतात. त्यावरून काय ते समजून जायचं ;)

    >> सगळ्याच पोस्ट्स कशा काय आवडू शकतात?

    मलाही हे मान्य आहे की सगळ्याच पोस्ट्स एकदम चांगल्या होऊच शकत नाहीत.

    ReplyDelete
  38. आणि अजून एक म्हणजे या पोस्टच्या आधी मला ब्लॉगर्स ब्लॉक (रायटर्स ब्लॉक सारखा) आला होता. कित्येक दिवसांत ब्लॉगवर काहीही लिखाण झालं नव्हतं. आधीची पोस्ट किती जुनी आहे ते बघ. त्यामुळे बर्‍याच दिवसांनी नवीन पोस्ट आलेली बघूनच बर्‍याच जणांना एकदम आवडून जाते पोस्ट :)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...