Wednesday, March 2, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-६

भाग १ इथे  वाचा
भाग २ इथे  वाचा
भाग ३ इथे  वाचा
भाग ४ इथे  वाचा
भाग ५ इथे  वाचा

सकाळपासून वेगवगळ्या प्रसंगी आम्हाला आमचे ब्रेकिंग पॉईंट आलेत असं वाटत होतं. आधी त्या टेकडीच्या समोर अडकलो तेव्हा नंतर सँडविचेस खराब झाल्याचं लक्षात आलं तेव्हा, नंतर त्या ओहोळात रस्ता चुकतो तेव्हा, त्याच्यानंतर आग लागली तेव्हा आणि नंतर जेव्हा या सायबाच्या तावडीत सापडलो त्या पहिल्या क्षणी. दर वेळी आम्हाला "झालं.. आता सगळं संपलं. आम्ही संपलो" असं वाटत होतं पण दर वेळी कधी प्रयत्नांनी कधी नशिबाने पण आम्ही उठून उभे राहत होतो.

पण आता मात्र आमचा सगळा त्राण संपला होता. आम्ही अगदी गलितगात्र झालो होतो. एकाचंही शरीर, मेंदू साथ देत नव्हतं. अशा अवस्थेत अजून नवीननवीन धक्के पचवायला आमची सिस्टम तयार नव्हती. बाहेर काहीही दाखवत असला तरी आमच्यातला प्रत्येकजण आतल्याआत तरी पूर्णतः कोलमडला होता. त्यामुळे आता काय व्हायचं ते होऊ देत, आम्हाला त्याची पर्वा नाही असेही विचार डोक्यात येऊन गेले. पण या म्हणण्याला अर्थ नव्हता. कारण काहीही घडू शकणार होतं. त्या ऑफिसबाहेर असलेला जमाव अजूनही तसाच होता. उलट अजून थोडा वाढलाच होता असं आवाजावरून तरी वाटत होतं. ते नक्की कशासाठी उभे होते कळत नव्हतं. या जंगल्याच्या डोक्यात नक्की काय शिजतंय काही कळत नव्हतं. हार मानून चालणार नव्हतं. कितीही म्हंटलं तरी आमच्यावर जवाबदारी होती. विशेषतः मुलींची अधिकच. त्यांच्या आईबाबांना समजावून, मस्का मारून आम्ही ट्रेकला पाठवायला मोठ्या मुश्किलीने तयार केलं होतं. डोक्यात येणारे नाही नाही ते विचार झटकून टाकून आम्ही अखेरचा प्रयत्न करायचा ठरवलं.

"साहेब, प्लीज आम्हाला सोडा. आमच्याकडे हजार रुपये आहेत अंदाजे. आम्ही अजून शोधतो. सगळ्यांच्या सॅक, बॅग्ज, वॉलेट्स शोधतो. सापडतील तेवढे सगळे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. पण प्लीज आम्हाला जाऊद्या. आम्ही काहीही केलेलं नाही (आणि हे तुम्हालाही चांगलं माहित्ये). बोलता बोलता तुम्हाला चुकून काही उलटसुलट बोललं गेलं असेल तर त्याबद्दल सॉरी. पण प्लीज आम्हाला जाऊद्या." हे आणि असं बरंच कायकाय--जे आता मला आठवतही नाहीये--आम्ही बोलत राहिलो.. बोलत राहिलो. आणि मग एकदाचे थांबलो.

पुन्हा एकदा बाहेरून आरडाओरड्याचा आवाज आला. जंगल्या खूप काहीतरी विचार करतोय असं दाखवत शांत बसून होता. आम्ही सगळे आळीपाळीने एकदा त्याच्याकडे आणि एकदा बाहेर चाललेल्या गोंधळाकडे बघत होतो. बराच वेळ झाल्यावर अखेर त्याने त्याचं मौनव्रत सोडलं.

"बरं ठीके. तुम्ही चांगल्या घरची पोरं दिसता. (गेले चार तास काय डोळे फुटले होते का रे भाड्या?) आणि कदाचित तुम्ही काही केलंही नसावं.. (कदाचित?????) पण तरीही गवत तर जळलं आहेच."

"साहेब आमच्याकडे सगळे मिळून बाराशे रुपये आहेत." त्याच्या मुद्दा घोळवत, फिरवत, रवंथ करत करत बोलण्याच्या सवयीला ओळखल्याने आणि एव्हाना चांगलेच कंटाळल्याने आमच्यातला एकजण एक घाव दोन तुकडे करायचे म्हणून त्याला पुढे बोलू न देता सरळ मधे बोलला.

तो क्षणभर थांबला. चेहर्‍यावर मंद स्मित आल्यासारखं वाटलं.

"म्म्म्म बाराशे? बरं ठीके.. काढा बघू."

तो बाराशे कुठल्या बळावर म्हणाला होता याची कल्पना नव्हती पण सगळ्यांनी ताबडतोब आपापले खिसे, पाकिटं, पर्स उघडून त्यात होते नव्हते तेवढे सगळे पैसे समोर टाकायला सुरुवात केली. एकाचा त्या महिन्याचा पॉकेटमनी नुकताच झाला होता त्यामुळे त्याच्याकडून पाचशे रुपये निघाले आणि बाकी सगळ्यांचे थोडे थोडे करत जवळपास चौदाशे रुपये जमले. त्याने ते पैसे लगबगीने मोजायला सुरुवात केली. पॉकेटमनीवाल्याला आपला सगळा पॉकेटमनी एका फटक्यात जातोय हे सहन झालं नसावं. तो मधे पडला आणि म्हणाला

"साहेब, आमच्याकडे परतीच्या तिकिटाचेही पैसे नाहीयेत. निदान तेवढे तरी राहूदेत आमच्याकडे."

"तुमच्याकडे रिटर्न तिकिटं नाहीत?" त्याने जरा संशयानेच विचारलं

"नाही साहेब"

त्याक्षणी त्याने आमची किंवा आमच्या बॅग्जची वगैरे झडती घेतली असती तर आम्ही संपलोच असतो. कारण आमच्याकडे अर्थातच रिटर्न तिकिटं होती. पण तोही तितकासा मूडमधे नसावा. त्यालाही उशीर झाला होताच. आणि काही न करता चार तासात जरा धमक्या देऊन, घाबरवून चौदाशे रुपये म्हणजे त्याच्या दृष्टीने चांगलीच कमाई होती.

"नक्की?"

"खरंच नाहीयेत साहेब. परत जाताना टीसीने पकडलं तर खरंच आत जायला लागेल"

"बरोबर आहे.. बरोबर आहे.." तो उगाच खदाखदा हसत म्हणाला आणि शंभरची नोट पुढे करून म्हणाला.

"हे घ्या"

अजून एक शंभरची नोट मागायची असह्य उर्मी दाबून त्याने जेवढे मिळाले तेवढे परत घेतले.

"बरं साहेब. आम्ही जाऊ आता?"

"अरे थांबा. असं कसं?? फॉर्म भरायचे आहेत. तुमची नावं लिहायची आहेत. सरकारी काम आहे. अर्धवट करून कसं चालेल."

"पण साहेब, नावं तर मगाशीच लिहिली ना?"

"हो. पण ती डायरीत लिहिली होती. ती आता फॉर्ममधे भरायची आहेत. आणि त्याच्या खाली तुम्हाला सह्या करायला लागतील."

उगाच शब्दाने शब्द वाढवण्यात काही अर्थ नव्हता. उलट त्यापेक्षा तो म्हणतोय त्याप्रमाणे फटाफट वागलो तर आम्ही तिकडून लवकरात लवकर बाहेर पडू शकणार होतो कदाचित. त्यामुळे आम्ही (एवढ्या वेळ घेत होतो त्याप्रमाणे आत्ताही) त्याच्याच कलाने घ्यायचं ठरवलं.

"बरं.. कुठे आहेत फॉर्म्स? आम्ही सह्या करतो."

"थांबा. माझ्याकडे पुरेसे फॉर्म्स नाहीयेत. मी जरा फॉर्म्स मागवून घेतो." असं म्हणून त्याने दारात उभ्या असलेल्या एका हरकाम्याला (त्या रापलेल्या चेहर्‍यांच्या गँगमधल्या एकालाच) बोलावून त्याच्या कानात काहीतरी पुटपुटून त्याला फॉर्म आणायला पिटाळलं. एवढ्या अंधार्‍या रात्री, सुनसान माळरानावर तो इसम ते फॉर्म्स कुठून पैदा करणार होता याचं उत्तर फक्त वन-खातंच देऊ शकणार होतं. कदाचित त्याचं घर जवळपास असावं आणि तिथून त्याने फॉर्म आणायला सांगितले असावेत. अर्थात तो काय आणतो, कसं आणतो, कुठून आणतो याच्याशी आम्हाला काहीही घेणं-देणं नव्हतं. फक्त तो ते फॉर्म्स किती लवकर आणतो हाच आमच्या दृष्टीने एकमेव कळीचा मुद्दा होता.

बराच वेळ झाला तरी तो फॉर्मवाला हरकाम्या काही परतला नाही. इकडे आमची चुळबुळ वाढायला लागली. हे म्हणजे नरड्यात घास कोंबलाय पण गिळू देत नाहीयेत अशासारखं काहीतरी होतं. न जाणो असाच वेळ जात राहिला आणि त्या जंगल्याचे विचार बदलले तर?? आम्हाला कल्पनाही सहन होत नव्हती. शेवटी अगदीच अति झाल्यावर आम्ही (आमच्या) प्राप्त परिस्थितीची जाणीव आणि आठवण करून देण्यासाठी त्याला पुन्हा एकवार डिवचलं.

"अजून किती वेळ लागेल? जरा लवकर करा ना. पावणे बाराची आमची शेवटची गाडी आहे. ती चुकली तर आम्हाला पूर्ण रात्र स्टेशनवर कुडकुडत काढावी लागेल." हे बोलताना त्या कल्पनेनेही आम्ही अक्षरशः थरथरत होतो.

"ते मी बघतो. त्याची तुम्ही काही काळजी करू नका" असं म्हणून तो अचानक उठला आणि त्याच्या खुर्चीमागे असलेल्या दोन कपाटांच्या मधल्या जागेतून कपाटांच्या मागे जायला लागला. त्या कपाटांमुळे त्या ऑफिसचे दोन भाग पडले होते. एक दर्शनी ऑफिस आणि दुसरा म्हणजे त्या कपाटांच्या मागे असलेली खोलीसदृश जागा. आता हा माणूस नेमकं काय करतोय हे न कळल्याने आम्हीही दोन कपाटांमधल्या जागेतून डोकावून बघू लागलो. तोवर त्याने कुठल्यातरी अदृश्य भिंतीवरचं अदृश्य बटन सराईतपणे चालू केलं. अचानक त्याच टिपिकल मंद पिवळ्या प्रकाशाने खोली भरून गेली आणि मागच्या भिंतीवर असलेल्या ठसठशीत मोठ्या खिडकीचं आम्हाला दर्शन झालं. तोवर तो त्या खिडकीपाशी पोचलाही होता. त्याने ती खिडकी उघडली आणि आमचे अक्षरशः आ वासले..

(हा शेवटचा) क्रमशः

- भाग ७ अर्थात अंतिम भाग इथे  वाचा.

19 comments:

  1. बाबारे , शेवटचा क्रमशः आताच टाक ना !!! उद्या संध्याकाळपर्यंत ताटकळण्याची तयारी नाही माझी. आता धीर सुटला रे !!

    ReplyDelete
  2. आता चटचट सत्यवाना... पुढचा शेवटचा भाग टाकून दे आत्ताच!!! :-|

    ReplyDelete
  3. बाबारे, हे सगळं खरं आहे की प्रकाश मेहराचा कुठला सिनेमा आहे?? आणि तू अमिताभ बच्चन आहेस????

    ReplyDelete
  4. >>>त्याने ती खिडकी उघडली आणि आमचे अक्षरशः आ वासले..
    माझे सुद्धा .

    मस्त .विभी +१

    ReplyDelete
  5. सगळे साले एकजात चोर,डॅंबिस ( यापेक्षा जास्त वाईट शिव्या मला देता येत नाहीयेत म्हणून... ) होते ना? कसचे सरकारी ऑफिस आणि कसला साहेब. :(

    ReplyDelete
  6. मस्त..पुढचा भाग वाचतो लगेच... :)

    ReplyDelete
  7. आता नवीन तळमळ चालू केलीत हेरंब हा भाग अतिशय सुंदर आणि खरच एकदा जेव्हा माझा पास संपला होता आणि मी डोक्यात काहीच नाही कि तो तपासावा वैगेरे सरळ गेलो ट्रेन मध्ये चढलो जेव्हा भायखळा स्टेशन ला गाडीत टीसी चढला तेव्हा त्याने चेक करताना मला पास संपलाय म्हणून कोकलला आणि नंतर जो याच्या सारखा वेळ माझा त्याने खाल्ला तो आज वाचताना समोर आला. पुढील वाचन चालू करतो. चला

    ReplyDelete
  8. स्वामी, सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघून मी ठरवलंच होतं उरलेले दोन्ही भाग लागोपाठ टाकायचे म्हणून :)

    ReplyDelete
  9. हेहे बाबा.. बटबट, चटचट.. तुला आता वटवट बाबा म्हणायला हवं ;)

    ReplyDelete
  10. हेहे.. १०१% खरं. प्रकाश मेहराच्या आणि कोणाच्याही कुठल्याही चित्रपटापेक्षा अधिक खरं..

    अमिताभ बच्चन.... म्म्म्म व्हायला आवडेल ;)

    ReplyDelete
  11. सागर :) धन्स रे.

    ReplyDelete
  12. धन्यु धन्यु परिचित.

    ReplyDelete
  13. श्रीताई, दोन्ही खरं आहे.. चोर,डॅंबिस होता आणि (म्हणूनच) साहेबही होता :)

    ReplyDelete
  14. बघ सुहास, पुढच्या भागासाठी थांबावं नाही ना लागलं :)

    ReplyDelete
  15. नको त्या गोष्टी बरोबर नको त्या वेळी होतात. असंच तिकिटाचं लफडं झालंय आमच्या शेवटच्या भागात.

    ReplyDelete
  16. तुला आठवतंय का हे ऑफिस का काय नेमके कुठे आहे ते ... त्या माणसाचे नव, चेहरा लक्ष्यात आहे का? आपण आजही शोध घेऊ शकतो... :)

    ReplyDelete
  17. हाहा रोहणा.. नाही रे नाव, चेहरा, ठिकाण वगैरे आता काहीच लक्षात नाही.. (नको तेवढा 'क्षमाशील' आहे ना मी? ;) )

    ReplyDelete
  18. एक बरं आहे. मी खूप उशीरा वाचतो आहे. त्यामुळे सगळे भाग एकत्रच वाचायला मिळतील. उगीचच दोन-तीन दिवस थांबायला नको पुढच्या लेखासाठी.. :-)

    ReplyDelete
  19. हो रे.. शेवटचे टीन भाग लागोपाठच टाकले मी.. (नाहीतर लोकांनी निषेध, बहिष्कार असं कायकाय केलं असतं ब्लॉगचं) :)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...