Thursday, December 16, 2010

'मॅजिक'चं 'दगडावर'चं गारुड !!

"लेडीज अँड जंटलमन, प्लीज वेलकम.. मेरा दोस्त, मेरा भाई, जोसेफ मॅस्कार्हेनSSSस"

बास रे बास. हे वाक्य ऐकलं आणि मी जोरजोरात टाळ्या वाजवल्या नाहीत किंवा "यस्स यस्स" करत मुठ हवेत उडवली नाही किंवा आनंदातिशयाने उठून उभा राहिलो नाही असं कधीच झालं नाही. पहिल्यांदा 'रॉक ऑन' बघताना तर या जोसेफ मॅस्कार्हेनसच्या शेवटच्या प्रसंगातल्या स्टेजवरच्या आगमनानंतर आणि आदि श्रॉफने खणखणीत आवाजात केलेल्या त्याच्या स्वागतानंतर मी अक्षरशः नाचलो होतो.

त्यानंतर गंभीर चेहर्‍याचा, लांबलचक केस मोकळे सोडलेला, खांद्याला गिटार अडकवलेला जोसेफ स्टेजवर प्रवेश करतो आणि पुढची पाच-सात मिनिटं 'सिंदबाद द सेलर' सादर करत नाचत, गात, ओरडत, उड्या मारत, थिरकत हे दोघे सभोवतालचं वातावरण अक्षरशः भारून टाकतात. त्यानंतर अचानक जोसेफच्या पत्नी आणि मुलाला स्टेजच्या एका कोपर्‍यातून प्रवेशताना बघून आदि हळूच जोसेफच्या कानात पुटपुटतो आणि माईक जोसेफच्या हातात देतो. जोसेफ त्या दोघांकडे बघतो आणि किंचित स्मित करत शांत, संयत 'तुम हो तो' चं रॉक व्हर्जन गायला लागतो. आवाज, संगीत चढत जात जात 'तुम हो तो' कधी 'सिंदबाद द सेलर' शी एकरूप होतं हे कळतही नाही.


एवढा दिमाखदार, उत्साही, सकारात्मक शेवट असलेल्या 'रॉक ऑन' मधे संपूर्ण चित्रपटभरच या उस्फुर्ततेचे, उत्साहाने सळसळणार्‍या, रसरसणार्‍या तरूणाईचे अनेक छोटे छोटे प्रसंग विखुरलेले आढळतात. हा चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या न बघण्याचा कपाळकरंटेपणा मी केला होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे एकूण जाहिराती, ट्रेलर्स, त्या चौघांचे गेटप, गाणी वगैरे बघून मला हा चित्रपट म्हणजे बॉलिवूडी रॉकच्या नावाखाली चाललेला काहीतरी विचित्र प्रकार असेल असं उगाचंच वाटलं होतं. त्यामुळे अंमळ उशिरानेच म्हणजे रिलीज झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी हा चित्रपट बघायचा योग आला किंबहुना माझ्या एका मित्राला तो काही करून बघायचा असल्याने त्याच्याबरोबर अपघातानेच बघितला गेला. आणि बघितल्यावर लक्षात आलं की कसल्या अफलातून अनुभवला आपण मुकणार होतो.

नावात रॉक असलं तरीही रूढार्थाने फक्त रॉकला वाहिलेला हा चित्रपट नाही. सॉरी.. हे वाक्य सिनेमाच्या प्रिव्ह्यूमधे लिहितात तसं झालंय. म्हणजे येत्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि एखाद्या समीक्षकाने चित्रपटाचा प्रि-रिलीज शो बघून आपल्या ब्लॉगवर लिहावं तसं. खरं तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर २-३ वर्षांनी त्यावर काही लिहिताना ही अशा प्रकारची वाक्यं लिहिली नाहीत तरी चालतं. कारण रॉक ऑन सारखा चित्रपट आवडला नाही (यावर मतभेद होऊ शकतात, म्हणून सेफ गेम म्हणून)/ पाहिला नाही असा माणूस विरळाच.. पण तरीही मुद्दा तसाच महत्वाचा असल्याने प्रि-रिलीज टाईप वाक्य तसंच लिहिलं. तर रॉक संगीत या पैलूएवढेच अन्य दोन ठळक महत्वाचे पैलू या चित्रपटात आहेत. एक म्हणजे चित्रपट पाहताना आपल्याला नोस्टॅल्जिक व्हायला भाग पाडणारी मित्रामित्रांमधली हलकीफुलकी पण लाईव्हली दृश्यं आणि दुसरं म्हणजे चित्रपटाच्या टॅगलाईनमधे थेट दिला जाणारा आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा 'लिव्ह युअर ड्रीम' हा ठळक मेसेज. चित्रपटांमधल्या संदेशांनी जग बदलत नसतं असं कोणीही कितीही म्हणालं आणि क्षणभर का होईना त्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं तरीही मला अजूनही संदेश देणारे चित्रपटच आवडतात. म्हणजे देशप्रेम, भ्रष्टाचारमुक्ती असे मोठमोठे संदेशच असावेत असं काही नाही किंबहुना अनेकदा हे असले संदेश बटबटीत आणि उथळपणे दाखवले गेल्याने त्यातली परिणामकारकता कमी होऊन उलट ते हास्यास्पदच वाटायला लागतात. याउलट अनेकदा हे 'लिव्ह युअर ड्रीम' सारखे साधे, सरळ संदेश पोकळ देशप्रेमाच्या 'एन्नाराय' गप्पा ठोकणार्‍या संदेशांपेक्षा अधिक जवळचे वाटतात.

भन्नाट शब्द आणि रँडम सीन्सची भलतीच देखणी सरमिसळ केलेलं उल्हसित टायटल सॉंग.. एकत्र जमलेला, मजामस्ती करणारा मित्रमैत्रिणींचा ग्रुप, गाणी, गिटार, मस्करी, बाईकवरच्या शर्यती, समोरच्या जलाशयात धावत जाऊन मारलेल्या उड्या या सगळ्यासगळ्यांत एक जिवंतपणा आहे. ओरिजिनॅलिटी आहे. टायटल सॉंग, त्यातलं एकूण एक दृश्य आपल्याला भूतकाळात घेऊन जातं. प्रत्येक प्रसंग कुठूनही कसाही आपल्याच कॉलेजजीवनातल्या कुठल्यातरी प्रसंगाशी नकळत आणि तितकाच सहज जोडला जातो, जोडता येतो. प्रत्येक फ्रेम एकतरी जुना प्रसंग जिवंत करते. प्रत्येक गाणं एकातरी लाडक्या मित्राची/मैत्रिणीची आठवण करून देतेच देते.

रॉक ऑन बघून झाल्या झाल्या मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना मेल करून या चित्रपटाबद्दल कळवलं होतं.

"Aatta ch just "Rock On" baghitala.. I dont know whether u guys have watched it or not.. but i loved it and regretted why i didnt watch it earlier.. it is an awesome movie.. felt very nostalgic.. mala tumachi jaam aathavan yayala lagali.. the days, evenings, nights, midnights (and rare mornings) together.. the time we spent together, the fun, masti and all.. u shud watch it.."

आणि एका मैत्रिणीचं लगेच उत्तर आलं.

"ya,when i saw it, i also felt the sameway.... that night only i told x "mi ice-cream gatarat fekale to kissa" & he also shared some of the funny kissa's from his frnd circle.

yesterday only x ,Myself & y we met & spoke abt those "best days of our life" & also discussed abt so many people & now wht they do & all... we too missed u a lot!!"

याहून काही लिहीत नाही..

असो... गंमत म्हणजे या चित्रपटात सगळे साईडहिरो आहेत. रूढार्थाने हिरो कोणीच नाही. श्रेयनामावली दाखवताना सगळी नावं एकत्र दाखवता येत नसल्याने ती पुढे मागे दाखवली गेली इतकंच. आपल्या हातात गिटार आहे म्हणून ते विचित्र अंगविक्षेप करूनच वाजवलं पाहिजे या दशकानुदशकांच्या कल्पनेला मुठमाती देणारा वास्तव (हिरो नव्हे तर) साईडहिरो यात आहे. शांतपणे, चेहर्‍यावर मंद स्मित असणारी व्यक्तीही गिटारिस्ट असू शकते किंबहुना गिटारिस्ट हा हिरो नसून साईडहिरो असू शकतो (आणि त्याला खरोखरीचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक मिळू शकतं) आणि गिटार हे पोरी पटवण्यासाठी न वापरता छंद, आवड, करियर म्हणूनही वाजवता येतं असे (बॉलीवूडच्या) प्रस्थापित नियमांना छेद देणारे अनेक प्रकार यात आहेत. तसंच पार्श्वगायनासाठी भारदस्त किंवा हाय पीचचा आवाज असणारे गायक अत्यावश्यक आहेत याही लोकप्रिय समजाला किंचित किनरा पण प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला आवाज वापरून जबरदस्त छेद देण्याचं कामही या चित्रपटाने केलंय. थोडक्यात नियमाला अपवाद असणारे असे अनेक प्रकार प्रचंड ताकदीने आणि कल्पकतेने वापरून त्यांना रूढ नियमांचा दर्जा मिळू शकेल इतकी सुंदर कलाकृती निर्माण करण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी ठरला आहे.


वर सांगितलेला नोस्टॅल्जियावाला भाग संपेसंपेपर्यंत दुसरा तेवढाच इंटरेस्टिंग आणि महत्वाचा प्रकार सुरु होतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं नाव 'लिव्ह युअर ड्रीम'.. छोट्या कारणावरून मतभेद होऊन, गैरसमज होऊन, संगीतापासून, ग्रुपपासून, आपल्या 'मॅजिक'बँड पासून, आपल्या स्वप्नापासून, एकमेकांपासून दुरावलेले आणि आपापल्या उद्योगात रमलेले (निदान रमल्याची बतावणी करणारे) पण आतल्या आत कुढणारे चार मित्र हातातली सगळी काम, सगळे उद्योगधंदे, सगळे गैरसमज आणि अशाच छोट्या-मोठ्या अडचणी दूर सारून सळसळत्या तारुण्यात पाहिलेलं स्वप्न पुन्हा एकदा पेलायला तयार होतात ही कल्पना ऐकायला साधी वाटली तरी दिग्दर्शकाने ती ज्या काही ओघवत्या शैलीत मांडली आहे तिला तोडच नाही. चित्रपटाच्या मध्यापर्यंत विनाकारण आपापले इगोज जपत राहणारे हे चौघे कालांतराने एक होतात आणि आपल्या जुन्या स्वप्नाच्या शोधात, ते सत्यात उतरवण्याचा ठाम निश्चय करून, अनेक अडचणींना तोंड देत देत, प्रसंगी जीवघेण्या रोगाची पर्वा न करता आपलं उद्दिष्ट कसं गाठतात याचा प्रवास म्हणजे चित्रपटाचा उत्तरार्ध. पण दोन्हीही तेवढेच सशक्त आणि दर्जेदार. कित्येकदा, वेगळं होण्यापूर्वीचा तरुण मित्रांचा, धम्माल मजेचा नोस्टॅल्जिक भाग खमंग जमलाय की अचानक गृहस्थाश्रमातून बाहेर पडून आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रचंड धडपड करणार्‍या, निरनिराळ्या अडचणींना तोंड देत देत शेवटी आपलं ध्येय गाठणार्‍या मध्यमवयीन काका लोकांचा उत्तरार्ध जास्त चमचमीत झालाय अशा कोड्यात आपण पडतो.

पण आपल्यापैकी प्रत्येकानेच अगदी तीच नाही पण बरीचशी तसीच मजा, गप्पाटप्पा, जागरणं, गाणी, पिकनिक्स, ट्रेक्स आपापल्या ग्रुप बरोबर केली असल्याने पूर्वार्ध तर आवडतोच पण खूपच प्रॉमिसिंग, पॉझिटिव्ह, आशादायी असल्याने उत्तरार्धही तेवढाच आवडतो. पण मला उत्तरार्ध आवडण्याचं अजून एक कारण आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चित्रपटातच्या उत्तरार्धात घडतं तसं आपल्याही आयुष्यात घडावं, लहानपणी, तरुणपणी किंवा अगदी काही वर्षांपूर्वी बघितलेली आपलीही काही छोटी स्वप्नं पुरी व्हावीत अशी सुप्त इच्छा असतेच परंतु ती स्वप्नं पूर्ण होणार नाहीत याची जवळपास खात्रीही असल्याने प्रत्यक्षात नाही तर निदान पडद्यावर तरी ती पूर्ण झालेली बघताना मला प्रचंड आनंद होतो !! मला वाटतं 'रॉक ऑन' एवढा भिडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे. 'लिव्ह युअर ड्रीम' चा स्वैर अनुवाद करायचा झाल्यास मी तरी 'कुठलंही स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटा.... अक्षरशः कुठल्याही वयात !!' असा करीन.

रॉकऑन प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी त्यावर लिहिण्याचं कारण म्हणजे ....... म्म्म्म कारण काही नाही. परवा पुन्हा एकदा रॉक ऑन बघितला. गेल्यावेळेस पेक्षा अजून आवडला. लिहावसं वाटलं. हेच कारण.. आंबरसाच्या वाटीत पाची बोटं बुडवून ती चाटून खाताना मिळणाऱ्या सुखाचं काय कारण? सचिनचं शतक झाल्यावर आनंदाने उर भरून येतो याचं काय कारण? काहीकाही आनंदांची कारणं शोधायची नसतात. फक्त मनावर होणारं त्यांचं गारुड अनुभवायचं असतं !! बस्स... !!

* हे गारुड यापूर्वी जालरंग प्रकाशनाच्या दीपज्योती इ-दीपावली अंकात  करून झालेलं आहे.

41 comments:

  1. बघितलाय रे बाबा! तुमचं हे चित्रपटाविषयी सुरु झालं ना कि आधी मला प्रश्नच पडतो! कि मी बघितलाय कि नाही हा सिनेमा!? पण येस्स! मी हा सिनेमा बघितलाय! 'कुठलंही स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटा.... अक्षरशः कुठल्याही वयात !!' हे खूप पटलंय!! मनापासून! :) पोस्ट एकदम छान! :D

    ReplyDelete
  2. सुंदर लेख!
    खरोखर मित्रांशिवाय या जगात काय आहे !
    लिव्ह युवर ड्रीम ! नथिंग लाईक इट!
    हा मुव्ही थिएटरमध्ये बघता नाही आला, इतकीच काय ती खंत वाटली!

    ReplyDelete
  3. prachand aavadelela cinema
    aani tu aata lihille vaky
    LIVE YOUR DREAM
    am lovin it ...

    ReplyDelete
  4. अनघा, हेहे... असं माझं मतकरींचा सिनेमास्कोप ब्लॉग वाचताना होतं.. आणि त्यातले ९९.९९% सिनेमे मी बघितलेलेच नसतात :)

    हा माझा प्रचंड आवडता चित्रपट. पारायणं झाली, डीव्हीडी घेतली. कितीही वेळा बघू शकेन अशा काही चित्रपटांपैकी हा..

    >> 'कुठलंही स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटा.... अक्षरशः कुठल्याही वयात !!'
    आणि तो लिव्ह युअर ड्रीम चा माझ्या नजरेतून केलेला मुक्त अनुवाद :)

    ReplyDelete
  5. दीपक, आभार्स.. खरंय सोप्या शब्दात फार तगडा संदेश दिलाय त्यांनी.. मलाही फार वाईट वाटतंय हा मुव्ही थिएटरमध्ये न बघता आल्याने :(

    ReplyDelete
  6. धन्स विनायक.. आहेच हा प्रचंड आवडण्यासारखा..

    अरे आणि ती चित्रपटाची टेंगलाईन आहे... मी मला रुचला तसा अनुवाद केला :)

    ReplyDelete
  7. शोमूने चारपाच वेळा मला आग्रह केला होता पण मी केवळ नाव आणि पोस्टर पाहूनच नाक मुरडले. :( कधी कधी एखादा सिनेमा पाहावा असे मन मुळी तयारच होत नाही. मग असे झाले की अशा सुंदर परिक्षणाच्या प्रोत्साहनाची वाट पाहायची आणि मग बिनधास्त पाटी कोरी करून तो पाहायला बसायचे. धन्यू रे. :)

    ReplyDelete
  8. Hi!
    बहुतेक माझी ही पहिलीच कमेंट या ब्लॉगवरची - त्याचं कारण म्हणजे मी इथले लेख वाचले नाहियेत. ’वटवट सत्यवान’ हे टायटल जरा repelling वाटतं - त्यापेक्षा ’हरकत नाय’ लई भारी.
    मध्ये इथे कि आणखी कुठेतरी तुझा कुणाशीतरी काहितरी विषयावरुन वाद झाला होता - तेव्हा एक मैत्रिणीने तावातावाने सबंध वाद मला ई-मेल केला होता. तिच्या वैतागाचं कारण तेव्हा कळलं नव्हतं (अजुनही नाही), कारण तु काही वावगं बोलतोयस असं वाटलं नव्हतं (आता वाद आठवत नाही तरिही).
    ’रॉक’ म्युझिक वगैरे माझ्या डोक्यावरुन जातं - त्यामुळे (कदाचित तु लिहिलेल्या कारणांमुळेच) मी ही बराच उशीरा पाहिला हा पिक्चर बायकोच्या आग्रहावरुन - आणि मला ही असाच आनंद झाला - हे सांगायला ही कमेंट.

    लेख चांगला लिहिलायस - Keep it up.

    ReplyDelete
  9. हेरंब मित्रा, अप्रतिम परीक्षण...मी हा शिनेमा थेटरात बघितला व्हता. त्या शिट्या, कोरसमध्ये पब्लिक गाण्याचा बेधुन्द आणि मनापासून लावलेला स्वर. सगळा सगळा अनुभवल होत बघ मी. तुझी पोस्ट अंकात आवडली होतीच इथे अजुन अजुन जास्त आवडली. परत वाचताना नॉस्टॅल्जिक झालो.

    खरच यार यू रॉक :)

    ReplyDelete
  10. रॉक ऑन आहे चांगला. मलाही आवडला होता तो बघितला तेव्हा...

    >> त्यानंतर गंभीर चेहर्‍याचा, लांबलचक केस मोकळे सोडलेला, खांद्याला गिटार अडकवलेला जोसेफ स्टेजवर प्रवेश करतो
    त्याचा चेहरा नेहमीच असाच असतो. अर्जुन रामपाल आणि अभिनय यांचा छत्तीसचा आकडा आहे असं मला नेहमीच वाटतं. प्रसंग आनंदी असो किंवा दुःखी, साहसी असो वा रोमँटिक, विनोदी असो वा गंभीर... या मठ्ठाच्या चेहर्‍यावर एकच भाव असतात. बाप मेल्यासारखा चेहरा करून वावरत असतो!

    ReplyDelete
  11. हा लेख दिवाळी अंकात वाचला होता. आज पुन्हा वाचल्यावर पुन्हा "रॉक ऑन" आठवला. मी नाही पाहिला अजुन. आत्ता पाहावा वाटतोय. गाणी मात्र प्रचंड आवडतात. खास करून "सोचा है" आणि "पिछले सात दिनों में"

    ReplyDelete
  12. हेरंबा मी नाही पाहिलेला हा शिणेमा :(

    आता पहावा लागेल कारण पुर्वी मी कुठलाही सिनेमा श्रीकांत बोजेवारांच्या परिक्षणानंतर पहात असे, आता तू, बाबा आणि आनंदच्या परिक्षणानंतर :)

    पोस्ट एकदम स्टायलीत :)

    ReplyDelete
  13. हम्म...खर्रेच सहिये RoCk..oN...!!!
    आणि छान झालिये पोस्ट पण...त्या मेल्स ने मस्त इफेक्ट आलाय पोस्ट ला... :-) :-) :-)

    ReplyDelete
  14. रॉक ऑन ...जबर्‍याच आहे...२-३ पारायण करुन झाली आहेत..

    ReplyDelete
  15. हा लेख आधी कुठे टाकला होतास??? दिवाळी अंकात? वाचलाय.. छान आहे... मुळात चित्रपट छान मग त्यावर लेख पण चांगलाच असणार ना... मी परत कामावर आलोय म्हणजे लवकरच तुझा नंबर लागणार... :)

    ReplyDelete
  16. मी रॉकवगैरे विषयावरचे सिनेमे बघत नाही. पण हे वाचून बघावासा वाटतोय. केबल वर लागला कधी तर बघेन नक्की :)

    ReplyDelete
  17. श्रीताई, नक्की बघ.. तुला गॅरंटेड आवडेल.. खात्री आहे मला.. कारण माझंही "मी केवळ नाव आणि पोस्टर पाहूनच नाक मुरडले" अगदी असंच झालं होतं. पण हा चित्रपट म्हणजे 'का रे भुललासी वरलिया रंगा'चं उत्तम उदाहरण आहे !!!

    ReplyDelete
  18. हाय अभिजीत. सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. हरकत नाय, वटवट सत्यवान वगैरे नावं घेण्यामागची कारणमीमांसा (उग्गाच जड झाला शब्द) "'हरकत नाय' ची गोष्ट !!" आणि "'सकाळ' मध्ये" या दोन स्टॅटीक पेजेस मध्ये वाचायला मिळेल. वेळ मिळाल्यास वाच..
    मलाही तुझं नाव ऐकल्यासारखं वाटत होतं पण पटकन क्लिक होत नव्हतं. मग एकदम गणेशच्या ब्लॉगवरचं 'कोलाज' पोस्ट (magnolia) आठवलं आणि मग लक्षात आलं. तुझा हॉलीपटांचा अभ्यास चांगला दिसतोय.. गुड..

    तुला कुठल्या व्यक्तीने कुठल्या विषयावरून झालेला वाद इमेल केला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. एक त्रयस्थ व्यक्ती या नात्याने बघत असतानादेखील तुला मी काही वावगं बोलतोय असं वाटलं नाही यातच सगळं आलं. कदाचित 'माजबोली'च्या 'ग'च्या घराच्या सातव्या आसमानात असलेल्या काही निवडक आणि नेहमीच्या यशस्वी स्वघोषित बुद्धीवाद्यांना ते कधीच कळणार नाही हे दुर्दैव... त्यांचं !! .. असो. विषय तो नाही.. उगाच भरकटलो. स्वारी..

    अरे मला तर रॉक आवडत असूनही मी हा चित्रपट बघितला नव्हता.. आता बोल.. ! मला 'डेथ/हेवी मेटल' जाम आवडायचं पूर्वी आणि कदाचित त्यामुळेच बॉलीवूड रॉक आपल्याला झेपणार नाही या भीतीने कधी जवळ गेलो नव्हतो रॉक ऑन च्या.. पण एकदा बघितल्यानंतर पारायणं झाली अगदी.. आवर्जून कमेंट दिलीस.. आवडलं.. आभार्स.. !! असाच भेट देत राहा..

    ReplyDelete
  19. सुहास, सहीयेस तू.. खरंच लकी आहेस. मला हा सिनेमा थेटरात बघण्याची मजा घ्यायची आहे कधीतरी !! जाम धमाल येत असेल यार. मी ही पुन्हा पोस्ट टाकताना पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिक झालो. धन्स रे..

    ReplyDelete
  20. हा हा संकेत.. माझंही अगदी हेच सेम मत होतं अर्जुन रामपाल बद्दल.. अजिबात आवडायचा नाही. पण या चित्रपटात त्याचा शांत संयत अंडरप्ले प्रचंड आवडून गेला.. !

    ReplyDelete
  21. सिद्धार्थ, हा चित्रपट मस्ट वॉच आहे यार. नक्की बघ वेळ काढून.. गाणी तर क्लासच.. कित्येक दिवस माझा मोबाईल रिंगटोन, एसएमएस टोन, अलार्म, रिमाईंडर वगैरे वगैरे सगळे टोन्स म्हणजे रॉक ऑन चं एकेक गाणं होतं :)

    ReplyDelete
  22. तन्वे !!!!!!

    आमच्या अंगणातलं हरभर्‍याचं झाड एवढ्या जोरात मोडलं की आता पुन्हा कधीच दुसरं झाड येणार नाही.. मग आता आम्ही चढायचं कुठल्या झाडावर?

    अग काय हे.. कुठे बोजेवार कुठे आम्ही (प्रथमपुरुषी एक वचनी याअर्थी).. हे म्हणजे "सुर्व्याने काज्यव्यासमोर चमकण्यासारखे आहे".. जय पुलं..

    ReplyDelete
  23. मैथिली, धन्स धन्स.. अग चित्रपटच मस्ट आहे त्यामुळे पोस्ट आपोआप चांगली झाली :)

    >> त्या मेल्स ने मस्त इफेक्ट आलाय पोस्ट ला..

    आभार्स.. आधी ते मेल्स टाकू की नको कळत नव्हतं.. पण मग टाकले शेवटी..

    ReplyDelete
  24. सही सही योगेश. तू पण आपल्याच क्लबमधला आहेस तर :)

    ReplyDelete
  25. रोहणा, हो.. अरे देवकाकांच्या दिवाळी अंकात आला होता.
    खरंय.. मुळात चित्रपटच खूप छान आहे त्यामुळे त्याविषयी लिहिताना मला विशेष मेहनत घ्यावी लागली नाही :)

    > मी परत कामावर आलोय म्हणजे लवकरच तुझा नंबर लागणार... :)

    चला.. म्हणजे पुन्हा एकदा माझा मेलबॉक्स तुझ्या कमेंट्सनी भरणार तर.. (अजून संकेतच्या जुन्या कमेंट्सना उत्तरं द्यायची राहिलीच आहेत माझी. :( )

    ReplyDelete
  26. मंदार, अरे मीही. म्हणून तर आधी बघितला नव्हता ना. पण हा फक्त रॉकवरचा सिनेमा नाहीये.. केबलवर लागायची वाट बघत बसू नकोस. सरळ डीव्हीडी घेऊन ये रे.. it's worth !

    ReplyDelete
  27. 'रॉकऑन' पाहिल्यावर मला तर तो 'दिल चाहता है' चीच आवृत्ती वाटला. फरहान अख्तर दिग्दर्शित तीनही चित्रपट आवडले. पण हा तेवढा नाही आवडला. पण हा त्याने दिग्दर्शित नाही केला आहे.

    ReplyDelete
  28. mast...khup chan lihalay!!
    atta parat (kadachit 1601vyanda) movie baghtana nakki blogchi athvan yeil :)

    ReplyDelete
  29. देवदत्त, नाही मला तरी दिल चाहता है पेक्षा रॉक ऑन खूप जास्त आवडला. अर्थात दोन्ही चित्रपट भिन्न प्रकारचे आहेत. दिल चाहता है मध्ये नुसती मस्ती मजा टाईमपास आहे (ते वाईट आहे असं मी म्हणत नाहीये) याउलट रॉक ऑन बराचसा मेसेज ओरियंटेड चित्रपट आहे. DCH मध्ये मध्यांतरानंतरचा तो ऑस्ट्रेलिया एपिसोड मला प्रचंड बोर झाला होता आणि शेवटही टिपिकल करण जोहर टाईप.. आकाश वेगळा म्हणता म्हणता टिपिकल फिल्मी स्टाईलने प्रपोज वगैरे करतो हे तर मला अजिबात पटलं नव्हतं.. असो.. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  30. मुकुल, आभार्स रे..

    १६०१ व्यांदा... हेहे.. वुई आर सेलिंग ऑन अ सेम 'रॉक ऑन' बोट :)

    ब्लॉगवर स्वागत !

    ReplyDelete
  31. Cool movie !!! This one is my fvt too. My son loves pichle saat dinon me song. In fact that was my last resort to put him to sleep when he was a yr old :)

    ReplyDelete
  32. पोस्ट परत एकदा आवडली ... मी पण तसा उशिराच बघितला हा चित्रपट पण खुप आवडला.शेवटी अर्जुन गाडीतुन उतरुन स्टॆजवर येतो तो प्रसंग तर खुप भावुक करुन टाकतो...गाणीही छान आहेत ..रॉक ऑन यार..

    ReplyDelete
  33. changala lihila aahe parikshan...mala pic khup awadala hota..

    Farhan akhtar cha aawaj dokyat jato kadhi kadhi...

    ReplyDelete
  34. धन्यवाद तृप्ती.. खरंच भन्नाट चित्रपट आहे हा !!

    >> In fact that was my last resort to put him to sleep

    इन फॅक्ट मीही पूर्वी कित्येकदा रॉक ऑनची गाणी हळू आवाजात ऐकत ऐकत झोपायचो.. हे हे

    ReplyDelete
  35. देवेन, धन्स धन्स.. हो रे.. मलाही वाईट वाटतं हा चित्रपट उशिरा बघितल्याबद्दल. खरं तर थेटरमध्ये जाऊन बघायला हवा होता !!

    शेवटचा प्रसंग माझाही सगळ्यात लाडका आहे. तो प्रसंग पाहताना दर वेळी एक वेगळाच आनंद मिळतो !!

    ReplyDelete
  36. धन्यवाद अवधूत.. खुपच सुंदर चित्रपट आहे हा..

    हे हे.. सुरुवातीला मलाही आवडला नव्हता फरहान अख्तरचा आवाज.. पण ऐकून ऐकून आपोआप आवडायला लागला. किंचित वेगळा आवाज असला तरी तो कुठेच बेसूर होत नाही..

    ReplyDelete
  37. Rock On definitely is perfect combination of Rise and Fall And rise of a rock band.Nice article too,thought for the first time when I read this was quite confused about"DAGAD"

    ReplyDelete
  38. Yes Anee.. It's perfect combo of several things.. Loved it for that..
    हे हे.. ते 'दगड' असंच जरा टीपी म्हणून लिहिलं ;)

    ReplyDelete
  39. मला हा चित्रपट आवडलाही नाही अन नावडलाही नाही खरंतर...
    कारण बहुतेक मी त्यांच्या तरूणाईशी आयडेंटिफाय करू शकलो नाही..कारण माझे कॉलेज दिवस असे कधीच नव्हते (सुदैवाने की दुर्दैवाने माहित नाही)..असंच माझं DCH च्याबाबत होतं...पण त्यात ह्यूमर अधिक होता...
    असो..मी सिनिक वाटतो कधीकधी स्वतःलाच.. पण...
    आणि एक म्हणजे रॉक ऑन मध्ये त्या शहाना गोस्वामीच्या पात्राची पार वासलात लावलीय... ते थोडं खटकलं होतं..
    :) अति होतंय का? :-S

    ReplyDelete
  40. बाबा, खरंय.. अशीही बरीच मतं ऐकली आहेत मी.

    >> कारण माझे कॉलेज दिवस असे कधीच नव्हते

    माझे ही.. किंबहुना आपल्यासारख्या कुठल्याही मध्यमवर्गीय घरातल्या मुला/लींचे असे नव्हतेच.... पण जागरण, गप्पा, गैरसमज, थट्टा, मस्करी, हे सगळं तसंच सेम होतं ना.. म्हणजे असावं असं मला तरी वाटतं.. म्हणूनच मी म्हटलंय पोस्ट मध्ये "पण आपल्यापैकी प्रत्येकानेच अगदी तीच नाही पण बरीचशी तसीच मजा, गप्पाटप्पा, जागरणं, गाणी, पिकनिक्स, ट्रेक्स आपापल्या ग्रुप बरोबर केली असल्याने "

    DCH वगैरे तर आपल्या कॉलेज डेजशी तुलना करता way different, way high होता !! ते सगळं हायफाय होतं.. आणि म्हणूनच DCH एक चित्रपट म्हणून मला आवडला (pre-australia era) पण रिलेट नाही होऊ शकलो. पण रॉक ऑन च्या बाबतीत हे रिलेट होणं झालं खरं !

    ReplyDelete
  41. Hi,

    We have shortlisted this article for Netbhet eMagazine Dec 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.

    Please provide your full name and email id.
    Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary - 09819128167 for more information.

    Regards,
    Sonali Thorat
    www.netbhet.com

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...