Thursday, June 10, 2010

प्रतिक्रिया न देण्याच्या लायकीची पोस्ट उर्फ 'लाउड थिंकिंग'

कधी कधी होतं काय माहित्ये ? ब्लॉग एकदम मंदावून जातो. मंदावून कसला. किंबहुना निपचित पडतो, उसासे टाकतो, कण्हायला लागतो. काही म्हणजे काही हालचाल होत नाही तिथे. इतका म्हणजे इतका आळसटलेला, ढिम्म, मंद, हतबल झालेला असतो ना की घरपानावरून (होमपेज) उंदीर फिरवला तरी शेवटच्या पोस्टची धूळ चिकटते उंदराच्या पायांना. इतSSSSका मंद. वर्षानुवर्षं साफ न केलेल्या किंवा गृहिणीचा हात न फिरलेल्या एखाद्या ओसाड घरासारखा. (इथे 'वर्षानुवर्षं'चा अर्थ आठवडानुआठवडं आणि 'गृहिणी'चा अर्थ ब्लॉगर पक्षि मी स्वतः असा घ्यावा हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. (परंतु ज्यांनी ओळखले नाहीये त्यांच्यासाठी मुद्दाम कंसांची योजना केली आहे.) )

बरं निपचित पडलाय तर त्याची कारणं काय? तर नेहमीचीच.. विशेष वेगळी नाहीत. ठराविकच म्हणा हवं तर किंवा घासून गुळगुळीत झालेली म्हणा. काय म्हणताय त्याने फरक पडत नाही. परिणाम एकच. ब्लॉगच्या तोंडावरची माशी हलत नाही. तर या माशीची म्हणजे माशी न हलण्याची ठराविक, घागु झालेली काही कारणं.

१. काही न सुचणे. अगदी काहीच काहीच न सुचणे. टोट्टाल ब्लँक. ब्लॉगर म्हणून नव्हे तर एक नागरिक, समाजप्रिय माणूस, सजग व्यक्ती या नात्याने हे कारण म्हणजे धोक्याची घंटाच. आपल्या आजूबाजूला एवढ्या चांगल्या, उत्तम, बर्‍या, टाकाऊ, वाईट, दु:खद घटना घडताहेत आणि त्याबद्दल आपल्याला आपलं मत नाही? हे फारच भयंकर. ब्लॉग लिहीत नसलात तर काही हरकत नाही. कारण तुमचे व्यक्त होण्याचे मार्ग वेगळे आहेत असं आपण समजू शकतो. पण ब्लॉग/डायरी/कविता असं काहीकाही लिहिताय तरी ब्लॉगवर पोस्ट टाकायला किंवा नवीन कविता करायला विषय मिळत नसेल तर भयानक अवस्था. आपण आपल्या आवरणात, कोषात नको तेवढे गुंतलो आहोत, आजूबाजूला, सभोवताली काय घडतंय ते बघायची, जाणून घेण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही मारून गेलंय आपलं. उठा.. बेसिनसमोर उभं राहून गार गार पाण्याचे ८-१० हबके मारा. जागे व्हा, उठा, जागृत व्हा, जागरूक व्हा.. डोळ्यासमोर (आणि डोक्यातही) आलेला मरगळीचा पदर हरवला, नाहीसा झाला, आसपासचं दिसू लागलं तर मग तुमचा हा आजार भयानक स्वरूपाचा नव्हता हे निश्चित. आता बघा आपोआप सगळ्या बातम्या दिसायला लागतील. युनियन कार्बाईडचा अमानुषपण, न्यायालयाने स्वतःच उडवलेली कायदा आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली, क्रीडामंत्र्यांनी आपलं सॉरी कृषिमंत्र्यांनी ताशी एक या गतीने उलटसुलट फिरवलेली विधानं, अतिरेकी, नक्षलवादी, माओवादी आणि असेच अजून कुठल्या कुठल्या 'वादां'चे बुरखे पांघरलेली अमानुष/भीषण/क्रूर या शब्दांना निरर्थक आणि निस्तेज करून टाकणारी श्वापदं. अर्थात हेच दिसावं/दिसेल/लिहावं असा अट्टाहास नाही. इतरही काही गोष्टी दिसतील ज्या आपल्या थेट जीवनमरणाशी निगडीत नसतील. तुलनेने कमी त्रासाच्या असतील. जाऊदे. भरकटायला नको जास्त. मुद्दा हा की बरंच काही चांगलं/वाईट घडतंय आजूबाजूला. डोळे, मन आणि लॅपटॉप उघडा असला की झालं.

सुदैवाने क्रमांक १ चं कारण लागू होत नाहीये मला. का ते क्रमांक २ मध्ये सांगतो.

२. दुसरं कारण असतं की हे सगळं आपल्याला दिसत असतं. आपण विदीर्ण होत असतो/आनंदी होत असतो. नवीन मुद्दे सुचत असतात. त्यांच्या आपण नोंदी करतो मनातल्या मनात. टिपणं काढून ठेवतो मेंदूत कुठेतरी. त्या सगळ्या नोंदी/टिपणं मग ब्लॉगवर येतात ड्राफ्ट मोड मध्ये. पण झालं.. इथेच कुठेतरी माशी शिंकते, घोडं पेंड खातं. एवढे विषय, मुद्दे, गप्पा, कथा, कविता अर्धवट तयार असतात.
पण आयत्या वेळी 'पावसात भिजायला गेलेल्या चिमुरड्याने पाऊस वाढला तरी घरात न येत हटवादीपणे बाहेरच रहावं' तसा हटवादीपणा करत ते मुद्दे, त्या अर्धवट पोस्ट्स पूर्णत्वाला येताना मात्र हटवादीपणा करतात. म्हणजे अर्धवट अर्धवट अवस्थेत ८-१०-१२ लेख तयार असतात. पण प्रत्यक्षात हातात काय तर शून्य. आधीची पोस्ट लिहून कित्येक दिवस सरलेले असतात आणि सरतही असतात. पण पोस्ट्सची संख्या मात्र आहे तेवढीच. हा प्रत्यक्षात उतरवणं, व्यक्त होणं हा प्रकार जमला पाहिजे खरंतर. आणि तोही जास्त वेळ न घेता.

तर हे दुसरं कारण लागू होतंय मला. अनेक अर्धवट पोस्ट्स पडल्या आहेत अपूर्णावस्थेत. पण मेंदू शिंचा साथ देत नाही.

अजूनही एक कारण आहे. सगळ्यांत लोकप्रिय. उपरोध नाही. खरंच.. आयची आन.. सगळ्यांत लोकप्रिय, सगळ्यांचं लाडकं-आवडतं, सगळ्यांत सुयोग्य, सगळ्याचंच असणारं, नेहमीचंच आणि अगदी खरं...

३. तर हे सगळ्यांचं लाडकं असलेलं कारण म्हणजे "वेळ नसणे". वेळ, वक्त, टाईम, समय.. कसा वेळ जातो तेच कळत नाही. अनेक गोष्टी, मुद्दे ब्लॉगवर टाकायचे असतात. पण वेळच मिळत नाही. आणि कधीतरी जागून किंवा वीकांताला लिहावं म्हटलं तर तोवर तो विषय एवढा जुना होऊन जातो की बर्‍याच ब्लॉग आणि वर्तमानपत्रं यातही तो येऊन गेलेला असतो. त्यामुळे लिहिला जात नाही. आणि पुन्हा सोमवारपासून तेच ते "वेळ नाही" वालं चक्र चालू होतं आणि चालूच रहातं.

वर म्हटलं तसं माझं कारण मधलं आहे. चला ब्लॉग न लिहिण्याच्या कारणांमध्येही मध्यमवर्गीय आहे हे बघून बरं वाटलं ;)

मी काय लिहितोय, काय बडबडतोय, काय टंकतोय मलाच माझं काही कळत नाहीये. मागे कोणीतरी म्हणालं होतं त्याप्रमाणे फुकट जागा मिळाली आहे म्हणून टाका काहीतरी असं वाटत असेल हे. हो. यावेळी तरी हे असंच आहे. काही सुचत नाही, सुचलेलं उतरत नाही आणि ते का उतरत नाही याचं जरा लाउड थिंकिंग करत होतो आणि तेच मग पोस्टमध्ये उतरवलं. ही पोस्ट प्रतिक्रिया मिळण्याच्या लायकीची नाही. त्यामुळे प्रत्येक प्रतिक्रिया म्हणजे बोनस आहे. तरीही प्रतिक्रिया आल्याच तर ते माझं नशीब आणि तुमचा विनय झाला... !!!

52 comments:

  1. ए हे तुला कसं रे कळलं? मी खरेच का इतक्या लाउडली... की पार जर्सीपात्तूर पोहोचलं... हा हा... आपुन भी आजकल २ और ३ में... दिमाख में ट्रॅफिक जाम आणि घरात मस्त दंगा सुरू आहे... :)

    ReplyDelete
  2. सध्या मी पण मध्यमवर्गीय..काय करू यार विषय खूप आहेत डोक्यात पण अर्धवट टाइप केला की कुठे अडत काय माहीत..तूच मार्ग दाखव बर यातून :)

    ReplyDelete
  3. खरंच, अगदी लाख मोलाचं लिहिलंय! कारण क्र. २ आणि ३ मलाही लागू होताहेत, त्यातल्या त्यात २ तर १०१%!

    ReplyDelete
  4. ही अख्खी पोश्टच एकदा माझ्या ब्लॉगवर टाकावी म्हणतेय...कसं काय??

    ReplyDelete
  5. कारण क्र. २ आहे सगळे ब्लॉग्स वेळेवर अपडेट न होण्याचे मुळ....

    मागे कोणीतरी म्हणालं होतं त्याप्रमाणे फुकट जागा मिळाली आहे म्हणून टाका काहीतरी

    हा हा हा

    ReplyDelete
  6. हेरंब
    अजून बरीच कारणं आहेत बघ तुला कुठलं लागु पडतं ते.. इथे दिलेली आहेत ती कारणं..http://wp.me/pq3x8-1mO

    ReplyDelete
  7. ----------------------------

    ----------------------------

    मला काय म्हनायचं आहे त्यासाठी शब्द सुचत नाहीये.
    तुला जस समजेल तस समजून घे.

    ReplyDelete
  8. Heeehee... :D
    Bhaarriii.......!!! Kasli mast zaliye post aani mhane Pratikriya na denyachya laayakichi post...
    Kahihi...!!!
    Baki shevatacha TOMANA sahiye...Ajun te prakaran purate dokyatun gelele disat nahiye tujhya... ;)

    ReplyDelete
  9. हा हा श्रीताई. आपल्या सगळ्यांचं लाउड थिंकिंग शेवटी सेम लाईनीवरच असणार ना :) .. हा २ आणि ३ चा गुंता सुटला पाहिजे पटपट..

    ReplyDelete
  10. सुहास, अरे माझी स्वतःची तीच अवस्था आहे. मी काय मार्ग दाखवणार. :)

    तुका म्हणे उगी राहावे। जे जे होईल ते ते पाहावे।

    ReplyDelete
  11. आभार क्रांती. २ क्रमांकाच्या गटात अनेक जण आहेत :)

    ReplyDelete
  12. जरूर जरूर अपर्णा.. नाहीतरी ग्रेट माइंड्स .... :)

    ReplyDelete
  13. आनंद, क्र २ म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालं आहे ;)

    >>मागे कोणीतरी म्हणालं होतं त्याप्रमाणे फुकट जागा मिळाली आहे म्हणून टाका काहीतरी<<

    अरे तेवढंच त्यांना समाधान.. बघा आम्ही म्हणालो होतो की नाही?? हो बाबांनो हो !! ;)

    ReplyDelete
  14. बाप रे काका.. ३५ कारणं? इथे ३ कारणं लिहितानाही माझी दमछाक झाली. खरंच bad patch चालू आहे :P

    ReplyDelete
  15. ----------------------------

    ----------------------------

    सचिन, समजलं समजलं :)

    ReplyDelete
  16. अग प्रतिक्रिया न देण्याच्या लायकीचीच आहे पोस्ट. पण तरीही प्रतिक्रिया येतात याचं कारण मी शेवटच्या ओळीत दिलंय ना तेच आहे .. माझं भाग्य आणि तुमचा विनय :)

    ते प्रकरण हळू हळू विसरलं जाईल. परवा आका चा स्टेटस मेसेज होता. तो अगदी लागू होतोय बघ. "पुरुषाची अभिमानाची आणि स्त्रीची प्रितिची जखम लवकर भरुन येत नाही : क्रौंचवध (वि.स.खांडेकर)" (म्हणजे स्त्रीच्या प्रीतीच्या जखमेबद्दल कल्पना नाही. मी पुरुषाच्या अभिमानाविषयी बोलत होतो. ;-) )

    ReplyDelete
  17. सागर, आपण सारे अर्जुन :)

    ReplyDelete
  18. हेरंब,

    एकदम मनातले लिहिलेस. माझ्या ब्लॉग मध्ये पण बऱ्याच कच्च्या पोस्ट आहेत, पण पूर्ण करणं जमतच नाहिये! :(

    -निरंजन

    ReplyDelete
  19. काही सुचत नाही, सुचलेलं उतरत नाही agadi samarpak upma.. ani hi agadi pratikriya dyayachya layakicich post aahe.. Sahi jhaliye..cool

    ReplyDelete
  20. देवांग पटेलचं गाणं आहे, "टाईम नही...मेरे पास टाईम नही!"...
    असो...जोक्स अपार्ट...ह्याला रायटर्स ब्लॉक म्हणतात....चालायचंच...
    एक प्रसिद्ध लेखक सांगून गेला होता, "ज्याला पेन कागदावर टेकवण्यासाठी बूड खुर्चीला जास्तीत जास्त टेकवून ठेवता येतं, तो खरा लेखक..."

    ReplyDelete
  21. आपलंही २.
    तसं बघितलं तर आपली सेंच्युरी आहे पोस्ट्स मधे. पण ६०-७०% ड्राफ़्ट :)

    मध्यमवर्गीय :)

    ReplyDelete
  22. सर्व सामान्य लोक क्रमाक २/३/मध्ये मोडतात ,सर्व साधारणता (अपवाद्मक लोक सोडून. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात.) असे होतेच ,

    ReplyDelete
  23. निरंजन, आपण सगळेच जण आपल्या कच्च्या पोस्ट्स पक्क्या करू शकलो तर ब्लॉगर/वर्डप्रेस भरून वहायला लागतील :) ..

    jokes apart पण लवकरच सगळ्या पोस्ट्स पक्क्या होवोत ही सदिच्छा !!

    ReplyDelete
  24. गौरव, प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत.. !!

    "काही सुचत नाही, सुचलेलं उतरत नाही" ही अगदी वस्तुस्थिती आहे. असाच प्रकार चालू आहे सध्या. बघूया कधी संपतोय हा बॅड पॅच :(

    ReplyDelete
  25. बाबा, आभार... यस्स .. "रायटर्स ब्लॉक" .. चपखल शब्द.. उगाच "बॅड पॅच बॅड पॅच" म्हणत होतो. रायटर्स ब्लॉक हा शब्द आठवलाही नाही. खरंच वाट लागलीये ..

    ReplyDelete
  26. हा हा ऋयामा, डायरेक्ट सेंच्युरी ?? भारी आहेस.. चल तर सगळे ड्राफ्टस फायनल करून खरीखुरी सेंच्युरी मारून टाक बघू :)

    ReplyDelete
  27. आभार काका. आपण काय सर्वसामान्यच.

    ReplyDelete
  28. हेरंब, तुझाच नाही तर बऱ्याच जणांचा ब्लॉग सध्या मरगळलेला आहे. काहीच नविन वाचायला मिळत नाहीये :-(. सगळ्यांना एकदमच मरगळ येण्यामागचं शास्त्रीय कारण शोधावं लागेल :-)

    ReplyDelete
  29. अभिलाष, मरगळ झटकून काहीतरी नावं, ताजं, मस्त लिहिण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. शक्यतो लवकरच यश येईल :)

    ReplyDelete
  30. Take a Chill-Pill, Man! :-)मस्तपैकी हे ''रिकामे डोके'' किंवा ''सुन्न डोके'' एन्जॉय कर! बघ मग तुला त्यातूनच फर्मासपैकी विषय सुचतो की नाही लिहायला.... हा हा हा! स्वानुभवाचे बोल आहेत होsss! :P क्काय काळजी करू नकोस, ती लिहिण्याची सुरसुरी कुठंही पळून जात नाही बघ! शुभेच्छा! :-)

    ReplyDelete
  31. हा हा .. आभार अरुंधती... अग तोच तर प्रॉब्लेम आहे.. फर्मास विषय आहेत डोक्यात (आणि ड्राफ्ट मध्येही.) पण पूर्वीसारखे फुलत नाहीत, फुलवता येत नाहीत असं काहीतरी विचित्र प्रकार झालाय.. असो.. लवकरच हा दुष्काळ संपेल अशी आशा :) आणि शुभेच्छांबद्दल धन्स..

    ReplyDelete
  32. aaiga.. so true!
    agadee agadee asach hota rav!
    bharee lihilays..

    ReplyDelete
  33. :) आभार जास्वंदी आणि ब्लॉगवर स्वागत..

    सगळ्याच ब्लॉगर्सची दुखणी शेम-टू-शेम असतात तर :)

    ReplyDelete
  34. मला तर मध्ये मध्ये कं ची बाधा इतकी होत असते कि कोणत्याही कारणाची एकस्क्युजची गरज पडत नाही आणि पोस्टपेक्षा ड्राफ़्टची संख्या वाढते मग ते पुर्ण करावे कि डिलीट करावे हा विचार करत मी त्यातील सोपाच मार्ग निवडतो... :)

    ReplyDelete
  35. हा हा .. अरे बरोबर. कं हे अजून एक प्रमुख कारण आहे. ते कसं राहिलं द्यायचं. अरेरे .. कं पंथाशी मीच प्रतारणा केली ;)..

    आणि पुढच्या वेळेस पासून सोपा मार्ग नको निवडूस.. किंचित अवघड मार्ग निवड :)

    ReplyDelete
  36. खरच, सगळ्यांनाच कं ची बाधा झालीये खरी. मनात बर्‍याच गोष्टी आहेत पण शब्दबद्ध होते नाहीयेत.
    सोनाली

    ReplyDelete
  37. ब्लॉगोब्लॉगी पोस्टांचा दुष्काळु :)

    ReplyDelete
  38. माझी सध्या कारण १, कारण २ आणि कारण ३ अशी घसरण झालेली आहे. मागच्या वर्षी प्लॅन्चेट लिहिताना एकदम ब्लॅन्क झाले होते. कंटाळा यायचा ब्लॉग उघडायचा पण. मग २/३ कथा लिहून झाल्यावर छोटे लेख अर्धवट लिहून ठेवलेले असायचे. आता लेख पूर्ण आहेत, तर वेळ जास्त मिळत नाहीये. आज वेळ आहे पण आज मी ब्लॉग्स वाचणार. पंधरा दिवस झाले सगळे ब्लॉग्स वाचल्याला.

    ReplyDelete
  39. खरंय बाबा. दोन आणि तीन मधे बेक्कार अडकायला होतं. इच्छा असूनही केवळ मनासारखं नाही झालं म्हणून ड्राफ्ट तसाच पडून राहतो, महिनोन्महिने, डिलीट होईपर्यंत.

    ReplyDelete
  40. कांचन, हे ब्लॅन्क होणं वालं प्रकरण सगळ्यांच्या नशिबी असतं बहुतेक. माझंही तेच झालं. आधीची पोस्ट लिहिली आणि त्याच्यानंतर जो ब्लॅन्क झालोय की काही विचारू नकोस..

    ReplyDelete
  41. नॅकोबा, २ आणि ३ वाईट रे वाईट.. "मनासारखं नाही झालं" या कारणाने कित्येक पोस्टी पडून आहेत ड्राफ्टमध्ये. :(

    ReplyDelete
  42. hehe,that was funny.Can say nice observation,or maybe you're gone through this stages so you worte this.Reply

    ReplyDelete
  43. Anee, True .. yeah I've not gone but going thru this situation and my option is option #2

    ReplyDelete
  44. काय आहे ना की डोक्यात खूप विचार पिन्गा घालायला लागले कि गुन्ता होतो.आणी तो गुन्ता बाहेर निघतान्ना मग traffic jam होतो.

    ReplyDelete
  45. अरुणाताई, अगदी खरंय.. तसंच काहीसं झालंय सध्या !!

    ReplyDelete
  46. he he he he
    बा हेरंबा तुझे पाय कोठे आहेत? अरे पण या पोस्टेत तुझे सगळे कंस कोठे पळाले? (इतका आळसही बरा नव्हे). तर कारण क्रमांक दोन टोटलात पटले. अरे माझं घोडं तर पेंड खा खाऊन ओबेस झालंय बिचारं.

    ReplyDelete
  47. हा हा शिनु.. सध्या तरी शूजमध्ये आहेत.. जाउदे जाम पांचट होता हा..

    अग कंस नाहीत की टीपा नाहीत. सगळेच रुसलेत. या घोड्याने पेंड खाणं थांबवलं एकदा की मग येतील सगळे लाईनीत :)

    ReplyDelete
  48. या वर काही प्रतिक्रिया न देता सरळ एक मस्त पोस्ट टाकून उत्तर देणार होतो पण काय करणार
    ..................
    ..................
    ......................

    पुन्हा तेच वेळ नाही

    ReplyDelete
  49. विक्रमा, बर्‍याच दिवसांनी आलास. बरं वाटलं. खरोखरच तुला अजिबातच वेळ नाही असं वाटतंय. थोडक्यात तू क्र ३ वाला :)

    ReplyDelete
  50. my reason is 2!! lihun khoop padly aardhvat pan post karne hot naahiye :(

    ReplyDelete
  51. दीपक, सेम पिंच. क्र २ चं कारण म्हणजे फार कटकट. सगळं तयार असूनही नीट शब्दांत न उतरणं म्हंजे महासंकट. असो. लवकरच लिहून टाका.

    ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...