Friday, November 12, 2010

एक चालीस की बिग नथिंग

सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने पण देजावू प्रकाराशी माझा 'ऐकून माहिती असणे' याच्या पलिकडे कधी संबंध आला नाही. म्हणजे अनुभव वगैरे कधीच नाही. पण परवा 'बिग नथिंग' बघताना ती देजावू वाली जाणीव मला शब्दशः झाली. हे सगळं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. तो अंधार, ती मारामारी, ती धावपळ, ते एकामागोमाग बसणारे धक्के, उलगडणारी रहस्यं, पडणारी नवीन कोडी अशी नुसती भाऊगर्दी झाली होती सगळी. हे सगळं चालू असतानाच मेंदूच्या अर्काईव्ह (ज्याला वर्डप्रेस 'आर्चिव्ह' म्हणतं तेच) मध्ये थोडी धक्काबुक्की होऊन छोटे देओल साहेब चालताना दिसले एकदम. आणि मग एकदम खट्टाक प्रकाश पडला डोक्यात. हे तर तेच एक चाळीसची शेवटची लोकल चुकल्यावर शिव्या घालत प्लॅटफॉर्मवरून हिंडणारे देओल साहेब होते. अंधारही तसाच होता. चित्रपटाच्या सुरुवातीची स्वगत म्हणायची पद्धतही तशीच. फक्त दोन्ही चित्रपटांच्या शेवटांमध्ये फरक असल्याने प्रत्यक्ष स्वगत वेगळं आहे इतकंच. पण परिणाम तोच. गुन्हेगारी चित्रपट असूनही वेळोवेळी प्रकटणारा विनोद हेही या दोघांमधलं एक प्रमुख साम्यस्थळ.

थांबा एक मिनिट. ही एवढी निरर्थक बडबड वाचल्यावर कोणाला वाटेल की मी असं म्हणतोय की 'एक चालीस की लास्ट लोकल' हा 'बिन नथिंग' वरून घेतलाय आणि त्यावरून कोणी माझ्या अकलेची मोजमापंही काढायला सरसावतील. पण थांबा. यातला कुठलाही चित्रपट दुसर्‍या चित्रपटावरून ढापलेला नाही आणि तसं माझं म्हणणंही नाही. पण दोन्ही चित्रपटांची हाताळणी, मांडणी, प्रसंग, घटना, फ्रेम्स, पात्रं, संवाद, प्रकाश(अंधार)योजना यात इतकं साम्य आहे की एक चित्रपट बघताना दुसर्‍याची आठवण आल्याशिवाय रहात नाही. दोन्ही चित्रपटांची मध्यवर्ती कल्पना (थीम) साधारण एकसारखीच असली तरीही कथा (स्टोरीलाईन) भिन्न आहे. आणि तरीही पटत नसेल तर देजावू बिजावू फक्त तोंडी लावायला होतं असं समजून सोडून द्या आणि डायरेक्ट पुढच्या ओळीपासून वाचायला सुरुवात करा.



( *** कंट्येन स्पायलर्श *** )

"आय मेड अ बिग मिस्टेक" अशा नायकाच्या एकोळी स्वगताने चित्रपटाला सुरुवात होते आणि अंधुकशा उजेडात एका कारची ट्रंक उघडली जाते आणि ........... !!!

या पहिल्या काही सेकंदांच्या प्रसंगानंतर थेट अयशस्वी लेखक चार्लीच्या घरातला त्याच्या आणि त्याच्या पोलीस अधिकारी असलेल्या बायकोमधला ब्रेकफास्ट टेबलवरचा संवाद दिसतो. पीएचडी असलेल्या चार्लीने आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि योग्यतेच्या मानाने खुपच कमी दर्जाची असलेली अशी कॉल सेंटरची नवीन नोकरी प्रचंड अनिच्छेने स्वीकारलेली असते आणि आज त्याचा पहिला दिवस असतो. पहिल्याच दिवशी काहीतरी गडबड होऊन चार्लीला नोकरीवरून कमी केलं जातं. पण तिथे त्याची ओळख होते ती गसशी. बोलता बोलता कळतं की गसला त्याच्या लहान मुलीच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी बरेच पैसे हवे असतात आणि त्यासाठीच तो ही नोकरी करत असतो. एका वर्षाच्या आत पैसे मिळाले नाहीत तर मुलीची दृष्टी जाणार असते. बोलता बोलता हेही कळतं की खून, मारामार्‍या वगैरे काहीही न करता झटपट पैसे मिळवण्यासाठी गसकडे एक योजना आहे. गस ती योजना चार्लीला सांगतो आणि बघता बघता थोड्याशा नाईलाजानेच का होईना चार्ली त्या योजनेत त्याचा साथीदार बनतो. त्याबरोबरच गसची मैत्रीण जोसी हीसुद्धा त्या योजनेत सहभागी होते. योजना अशी असते की कॉलसेंटरमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे गावातल्या रेव्हरंडला त्याच्या अनैतिक कृत्यांसाठी ब्लॅकमेल करून बक्कळ खंडणी उकळायची. कुठे भेटायचं, कसं पळायचं, कोणी काय करायचं, काय करायचं नाही वगैरे वगैरे सगळं चोख ठरतं. रेव्हरंडला फोन करून झाल्यावर प्लानमध्ये ठरल्याबरहुकुम गस त्या रात्री खंडणी मागायला रेव्हरंडकडे पोचतो. पण तिथे झटापटीत चुकून त्याच्या हातून रेव्हरंडचा खून होतो. काही वेळाने अजून एक मोठी गडबड झाल्याने चार्ली तिथे येऊन धडकतो आणि समोर रेव्हरंडचं प्रेत पडलेलं बघून हादरून जातो. बरीच शोधाशोध करूनही गसचा मागमूसही न आढळल्याने भांबावून जाऊन तो समोरच दिसणार्‍या रेव्हरंडच्या प्रेताची विल्हेवाट लावून टाकतो. तोवर गस पुन्हा प्रकट होतो आणि त्याने रेव्हरंडला ठार मारलेलं नसून चार्लीनेच मारलं आहे असं सांगतो. मेलेला माणूस रेव्हरंड नसतो हे कालांतराने कळतं. त्यातून दुसरा खून, तिसरा खून असं सत्र चालू राहतं. रेव्हरंडची बायको, तिचा बॉयफ्रेंड, लोकल पोलीस ऑफिसर, तज्ज्ञ पोलीस अधिकारी अशा नवीन नवीन पात्रांची दर्शनं होत राहतात. काही पात्र कथेला थोडंसं पुढे सरकवून तर काही जबरा धक्का देऊन चित्रपट वाहता (किंबहुना खळाळता) ठेवतात. एकेक करता करता छोट्या छोट्या घटनांमधून प्रमुख पात्रांची खरी रूपं उलगडायला लागतात. कोणीच सोवळं नसतं हे हळूहळू कळून चुकतं. एक चालीस मधल्या मधुचं खरं रूप समोर येण्याचा प्रसंग असो की यातल्या जोसीचा बुरखा फाटण्याचा प्रसंग असो किंवा 'एक चालीस..' मध्ये सुटतोय सुटतोय असं वाटत असताना निलेशचं पुन्हा नवीन संकटात अडकणं असो की यातल्या चार्लीचं सगळं सुरळीत होतंय हे बघून सुटकेचा निःश्वास टाकत असताना नवीन कटकटीत अडकणं असो अशा अनेक प्रसंगांत 'एक चालीस..'ची आठवण येऊन दोघांच्या मांडणी/हाताळणी यांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही. (मला तरी आवरला नाही. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः ;-) ) .. त्यानंतर अनेक धक्के बसत बसत, चिक्कार धावपळी झाल्यावर, काही लोकांचे जीव गेल्यानंतर आणि काहींचे वाचल्यानंतर, अनेक रहस्य उलगडल्यानंतर, अनेक नवीन कोडी निर्माण होऊन ती सुटायची आपण वाट बघत असताना अचानक "आय मेड अ बिग मिस्टेक"च्या स्वगृही आपण परततो. थोडक्यात "आय मेड अ बिग मिस्टेक" हा एक व्हर्च्युअल मध्यंतर आहे. कारण त्यानंतरही धक्क्यांची तीव्रता आणि वारंवारता ही तशीच राहते किंवा कित्येकदा आधीपेक्षा अधिक असते. त्यानंतर चार्लीची बायको, पोलीस अधिकारी, लॉलीपॉप, वायोमिंग विडो, विषारी दारू, अखेरचा सिरीयल किलर (??) अशी वेगवेगळी 'पात्रं' आपापली अस्तित्व अधोरेखित करून जातात.

ज्याप्रमाणे 'एक चालीस..' अचूक आणि निर्दोष नाही त्याप्रमाणे बिंग नथिंगमध्येही सुरुवातीलाच एक मोठ्ठा गोंधळ उर्फ गुफप आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा चार्ली रेव्हरंडच्या घरात शिरतो त्या प्रसंगाची सुरुवात म्हणजे मोठ्ठ्या गुफपची सुरुवात आहे. पण अर्थात त्यानंतर सुमारे तासभर जो प्रचंड धावपळ, दमछाक, धक्काबाजीच्या(धक्काबुक्की नव्हे) रोलरकोस्टर राईडचा अविस्मरणीय अनुभव आपल्याला मिळतो तो पाहता या गुफपकडे डोळेझाक करायला हरकत नाही. बिग नथिंग हा एक निओन्वार आहे पण तो १००% न्वारपट नाही. त्यातले अनेक प्रसंग, संवाद, पात्रनिवड यांच्यामुळे त्याला एक विनोदी फीलही आलेला आहे. चित्रपटाच्या या प्रकाराचं यथार्थ वर्णन करायचं झाल्यास मतकरी म्हणतात त्याप्रमाणे 'न्वार कॉमेडी' हेच वर्णन अगदी चपखल लागू होतं.

ज्या पैशांसाठी एवढे सगळे गुन्हे घडत असतात ते पैसे अंतिमतः अशा व्यक्तीकडे पोचतात की जिला त्याचं काही सुखदुःख नसतं किंबहुना ते पैसे आहेत ही गोष्टही त्या व्यक्तीच्या गावी नसते. पैशांचा ढीग बाजूला पडलेला असताना तिचं त्याच्याकडे लक्षच नसतं कारण तिला त्याचं महत्व नसतं, महत्व माहित नसतं. हा जो शेवट आहे तो म्हणजे एवढ्या वेळ चाललेली पैसे मिळवण्याची शर्यत, त्यासाठी मागेपुढे न बघता पाडले गेलेले खून, केली गेलेली दुष्कृत्यं या सगळ्याला दिलेली एक सणसणीत चपराक आहे.

जाता जाता, 'बिग नथिंग' आणि 'एक चालीस..' मधला देजावू अजून ठळकपणे अधोरेखित करणारा एक मुद्दा सांगतो. 'बिग नथिंग' प्रदर्शित होण्याची तारीख आहे १ डिसेंबर २००६ आणि 'एक चालीस..' च्या प्रदर्शनाची तारीख आहे १८ मे २००७ (तपशील : आयएमडीबी च्या कृपेने). म्हणजे जेमतेम सहा महिन्यांचा फरक. एखादी घटना सहा महिन्यांनी पुन्हा दिसली तरीही तिला 'देजावू'च्या कक्षेत/व्याख्येत गृहीत धरत असावेत असा माझा आपला एक अंदाज.

आणि तरीही पटत नसेल तर देजावू बिजावू फक्त तोंडी लावायला होतं असं समजून सोडून द्या आणि लगेच 'बिग नथिंग' (आणि (अजून बघितला नसलात तर) त्यानंतर लगेच 'एक चालीस..' ही) बघून टाका. ते देजावू बिजावूचं नंतर बघू.. क्काय??

Tuesday, November 2, 2010

दिवाळी मिक्स !!

प्रत्येक ब्लॉगर दरवर्षी इतर ब्लॉगर्सना, वाचकांना आणि हितचिंतकांना आपल्या ब्लॉगवरून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. पण यंदा सगळ्यांनी मिळून जरा वेगळं करायचं ठरवलं. त्याचं काय झालं की काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे ब्लॉगर लोक (म्हणजे 'ब्लॉग लिहिणारा असा तो/ती' याअर्थी. ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस.कॉम अशा अर्थी नव्हे.) असेच जमलो होतो गप्पाटप्पा टाकायला. तेव्हा दिवाळीचा आणि शुभेच्छांचा विषय निघाला. त्यावेळी असं ठरलं की प्रत्येकाने स्वतःच्या ब्लॉगवरून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी सगळ्यांनी एकत्र मिळून एकाच ठिकाणाहून म्हणजे एकाच ब्लॉगवरून शुभेच्छा देऊया. तेवढंच वाचकांनाही बरं. एकच ब्लॉग वाचला की सगळ्या ब्लॉगर लोकांच्या शुभेच्छा मिळतील. तेवढ्यासाठी वेगवेगळया ब्लॉगवर जायला नको आणि तिथेच प्रतिक्रियांमध्ये शुभेच्छा दिल्या की त्या सगळ्या ब्लॉगर लोकांपर्यंतही पोचतील. आणि पुन्हा प्रत्येकाने आपल्या ब्लॉगवरून शुभेच्छा दिल्याने होणारा इ-पानांचा कचरा पर्यावरणाच्या दृष्टीने किती घातक आहे याचा विचार केला असता सगळ्यांनी एकाच ब्लॉगवरून शुभेच्छा देऊन त्यामुळे वाचणार्‍या (म्हणजे लाईफ-सेव्हिंग या अर्थी.. रीडिंग याअर्थी नव्हे) इतर इ-पानांचा दुवा (दुवा म्हणजे जुन्या 'आशीर्वाद' या अर्थी. हल्ली आपण वापरतो त्या 'लिंक' याअर्थी नव्हे. नाहीतर एकाच पोस्टमध्ये शुभेच्छा देऊन अजून कसले दुवे घ्यायचे-द्यायचे हा रास्त प्रश्न पडायचा) घेणं हे अधिक श्रेयस्कर होतं. (कुठल्याही शब्दाच्या पुढे 'पर्यावरण' आणि मागे 'इ' लावलं की सगळे प्रॉब्लेम्स फटाफट सुटतात अशा निष्कर्षाप्रत मी नुकताच आलेलो आहे).. एकूण एकदम फुलप्रूफ प्लान होता.  तर कुठल्या ब्लॉगवरून शुभेच्छा द्यायच्या असा विचारविनिमय चालू असता मी नेहमीप्रमाणे पुढेपुढे करून त्या माझ्याच ब्लॉगवरून द्यायच्या असा प्रस्ताव मांडला (वाचा "मागणी केली") आणि नाही-हो करता करता सगळ्यांनी त्याला मान्यताही दिली. ("कुठे याच्या नादी लागायचं एवढ्याशा गोष्टीसाठी" अशा प्रकारची कुजबुज मी अनुल्लेखाने मारली हेसांनल).. मग सगळ्यांचे शुभेच्छा संदेश एकत्र करून ते या पोस्टमधून वाचकांपर्यंत पोचवायचे असं ठरलं. पण तेवढ्यात अजून एक कल्पना आली कोणाच्या तरी डोक्यात. ती म्हणजे अशी की फक्त शुभेच्छा द्यायच्या मात्र त्याच्या खाली ब्लॉगरचं नाव नाही द्यायचं. वाचक लोक आणि इतर ब्लॉगरही इतके दिवस/महिने आपले ब्लॉग्ज वाचतायत तर त्यांना शुभेच्छा-संदेश वाचायला सुरुवात केल्याक्षणी लगेच ब्लॉगरचं नाव ओळखता आलं पाहिजे. मुद्दाम खाली नाव द्यायची गरजच काय? अर्थात ही कल्पनाही उचलून धरली गेली आणि होता होता सगळ्या ब्लॉगर लोकांचे शुभेच्छा संदेश एकत्र केले गेले. तर अशा रीतीने सगळ्या ब्लॉगर लोकांच्या या दिवाळीच्या एकत्रित शुभेच्छा समस्त वाचकवर्गासाठी आणि अन्य ब्लॉगर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी !

============

- खरं तर मी एक रोमँटिक कथा किंवा दिवाळीच्या शुभेच्छांचं एक रोमँटिक/हलकंफुलकं पोस्टच टाकणार होतो ब्लॉगवर. पण अचानक या एकत्रित शुभेच्छा द्यायचे मत मांडल्या गेले आणि मला देखील ही कल्पना आवडली. एकत्र शुभेच्छा देण्यात खरंच मजा आहे एक. आमच्या नागपुरात, वर्‍हाडात आम्ही सारे असेच एकत्र जमून दिवाळी साजरी करायचो माझ्या बालपणी. त्याची आठवण आली. पण पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी साजरा करण्याच्या दोन पिढ्यांमधल्या पद्धतींमध्ये किती फरक पडलाय नाही? एवढंच बोलून हे पोस्ट सॉरी शुभेच्छा संपवतो !

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'बिनधास्त' शुभेच्छा !!

============

* खरं तर दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ब्लॉगर मेळावा घ्यावा आणि ज्यांना गेल्या मेळाव्यामध्ये जमलं नव्हतं अशा ब्लॉगरनाही या मेळाव्यात सहभागी करून घ्यावं अशी खूप इच्छा होती. परंतु माझ्या पाहिल्याच दिवाळी अंकाचं काम आणि ब्लॉगजगतातल्या नवीन नवीन चोर्‍या पकडण्याचं काम करता करता वेळ कसा गेला कळलंही नाही. लवकरच एक दीर्घकथा घेऊन वाचकांच्या भेटीस यायचा मानस आहे. बघुया कसं जमतंय ते.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'फुलत्या' शुभेच्छा !

============

- दिनविशेष लक्ष्मीपूजन : याच दिवशी महाराजांनी < -- > किल्ला स्वराज्यात सामील केला आणि < -- > यांनी केलेल्या असीम पराक्रमाबद्दल किल्ल्यास < -- > असे नाव दिले. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदून ठेवण्यासारखा आहे.

आणि

खरे तर या पाडव्याला "मस्तपैकी बासुंदी कर" असे मी शमीला सांगितले होते. पण नेमके माझे काम वाढल्याने मला वेळेत येत येणार नाही यावेळी आणि ही दिवाळी हुकणार. असो पण कुठेही असलो तरी खादाडी चुकणार नाही हे अगदी नक्की. आणि परत आल्यावर बासुंदीही वसूल केली जाईल ती गोष्ट वेगळीच. हा हा..

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'खादाड' शुभेच्छा !

============

* दिवाळी म्हटलं की मला आठवतात ते बटाटेवडे. सध्या काही दिवसांसाठी शोमु सुट्टीवर आला असल्याने खायची नुसती चंगळ चालली आहे. दोघे मिळून रोज नवीन नवीन फर्माईशी करत असतात आणि मी मस्तपैकी रोज रोज नवीन काहीतरी बनवत असते :) .. तर आजची मागणी होती बटाटेवडे. बटाटेवडे म्हटलं की मला तर अजूनही माझ्या दादरमधल्या बटाटेवड्यांची आठवण येते आणि तोंडाला नुसतं पाणी सुटतं. गेल्या भारत दौर्‍यात इतके बटाटेवडे खाल्ले होते म्हणून सांगू. असो. कृतीही लिहून घ्या.

<फोटो>

<कृती>

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'सुगरण' शुभेच्छा :)

============

- खरं तर माझा जन्म पुण्यातला आणि माझं आजोळही (हे मी कितव्यांदा लिहितोय ते आठवत नाहीये). त्यामुळे पुणेरी थाटात शुभेच्छा द्यायचा विचार होता. पण ते फार क्लिशे होईल. कारण टेरेंटीनोच्या पंख्याने आणि प्रभूजींच्या भक्ताने पुणेरी थाटात शुभेच्छा देणं म्हणजे फारच कैच्याकै आवरा होऊन जाईल. एकदम मुक्तपीठ वाटेल ते म्हणजे. बाकी मुक्तपीठ हल्ली झोपलंय ही गोष्ट वेगळी. तर मुद्दा हा की पुणेरी नको आणि नॉनपुणेरीही नको.

दिवाळीच्या या 'मेड इन इटली-भिंत' शुभेच्छा घेऊन टाका कसे !!

============

* आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला) असतो नुसता. देवळं वगैरे आहेत पण आमच्या फिलीची मजा नाही. अर्थात इथल्या माउंट हूडची मजा काही और आहे हे मात्र खरं. लॉंग ड्राईव्हवर जाताना उजवीकडे हा असा माउंट हूड आणि रेडिओवर 'रिमझिम गिरे सावन'.. वा क्या बात है. सोबत कांद्याची भजी मिळाली की झालीच मग खरीखुरी दिवाळी. असो.

नमनाचं तेल वाहायला लागायच्या आतच 'माझिया' दिवाळीच्या हलक्याफुलक्या शुभेच्छा देते तुम्हाला आणि पळते कशी.

============

- चित्रपट : दिवाळी दिवाळी
दिग्दर्शक : पी. आनंद

http://www.imdb.com/title/tt012017699909/

माझं नेहमी एकच म्हणणं असतं. मला इतर लोकांसारखं चांगलं चांगलं लिहिता येत नाही. मी खरं तर एक वाचकच आहे. पण चित्रपटांवर मनापासून प्रेम असल्याने हा ब्लॉग अपडेट करत असतो अधून मधून. यंदाची दिवाळी 'स्वदेस' बघून साजरा करायचा विचार आहे.

तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या 'चित्रमयी' शुभेच्छा !

============

* गेल्या दिवाळीची एक आठवण. चकल्या तळत असताना गौरा मागे येऊन उभी राहिली गार गार हात घेऊन. मी तिला ओरडले. म्हटलं "कशाला ग उभी राहतेस एसी समोर? मग उगाच शिंकत राहतेस." पिल्लू म्हणालं, “तुला गरम होतंय ना म्हणून तुझ्यासाठी एसीची हवा हातात भरून आणली होती!!!!!! :)"

माझे डोळे नकळत पाणावले होते.

दिवाळी म्हंटली की मला अशाच काहीकाही गोष्टी आठवत राहतात. कशी कशी साजरी केली दिवाळी ते आठवत राहतं. खरं तर आयुष्यातला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी दिवाळी आहे इतकी तृप्त आहे मी. प्रत्येक क्षणात, तो क्षण जगण्यात एक गंमत आहे. पोरांच्या गंमतीजमती, त्यांच्या शाळा, मस्ती (एकदा तर लेकीने केळं काळं झालं म्हणून धुवायला टाकलेलं वॉशिंग मशीनमध्ये. आता बोला.) नवर्‍याची साथ, माझ्या सहज लिहायला घेतलेल्या ब्लॉगने जोडलेली नवीन नवीन नाती.. जन्मोजन्मी पुरणारी.. तर कधी हळवी होऊन माहेरचं गाणं गात आठवलेली माझ्या नासिकमधली दिवाळी. प्रत्येक क्षणाने भरभरून दिलंय मला..

असंच भरभरून वाहतं सुख तुम्हालाही लाभो याच 'सहज' शुभेच्छा !!

============

- या शुभेच्छा फक्त माझ्या एकट्यातर्फे नसून श्री.मेंदु.बिनडोके, श्री. स.दा. स्पंदने, कु. नयना बोलके, श्री.वदन बडबडे, श्री. का.न.उघडे ,श्री. वासु नाकपुरकर, श्री. हा.त. काहितरीकर, श्री. पा.य. धावते , सौ. रुचिरा जिभे आणि श्री.दात्ता चावरे या सगळ्यांतर्फे आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

या दिवाळीत माझ्या आवडत्या चेतन भगत आणि वपु यांची पुस्तके वाचत वेळ घालवण्याचा विचार आहे. बघू माझ्या शिफ्ट्स सांभाळून कसं जमतंय ते ! पण यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी मी नेहमीपेक्षा थोडासा वेगळा मार्ग निवडण्याचा विचार आहे. मी पूर्वी माझ्या वाढदिवसाला आणि वर्षभरात अजून एकदा रक्तदान करत असे. यावर्षी पासून मी रक्तदानासाठी माझा वाढदिवस आणि दिवाळी असे दोन दिवस नक्की केलेल आहेत. नेत्रदानाचा, देहदानाचा फॉर्मही भरलेला आहेच. तुम्हीही यंदाच्या दिवाळीत अन्य दाने करण्यापेक्षा रक्तदान करावं आणि नेत्रदान/देहदान याचे फॉर्म भरावेत असं मी आवाहन करतो.

आपणा सर्वांना दिवाळीच्या 'दवात भिजलेल्या' शुभेच्छा !

============

- आई काल रात्री मला म्हणाली "शनु, लवकर झोप. उद्या सकाळी लवकर उठून देवळात जायचं आहे.". मग मी दुदु पिऊन लगेच झोपून गेलो. सकाळी लवकर उठून आम्ही गाडीतून देवळात जाऊन आलो. तिथे मला सगळ्या दादा-ताईंनी खूप चॉकलेट दिली. सगळेजण मला 'सगळ्यांत छोटा ब्लॉगर' असं काहीतरी म्हणत होते पण त्याचा अर्थ काय हे काही मला कळलं नाही. मी मोठा झाल्यावर त्याचा अर्थ कळेल असं बाबा म्हणाले.  मग मी ती सगळी चॉकलेट शहाण्या बाळासारखी आईला देऊन टाकली. मग आम्ही घरी आलो. घरी गोड गोड मम्मं करून मी लगेच झोपलो.

तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या 'छोटुकल्या' शुभेच्छा !!

============

- दिवाळी म्हणजे अक्षरशः सैतानासारखे वागायचो आम्ही. अर्थात तेव्हा हे कळतही नव्हतं. आता जरा अक्कल आलीये म्हणून हे एवढं लिहितोय.

"दिवाळीचा बॉम्ब सरळ वातीला उदबत्ती लावून इमाने इतबारे फोडल्याची आठवणच नाही.  उदबत्ती किती मिनिटांत किती जळते त्याच्या खुणा उदबत्तीवर  पेन्सिलीने करायच्या आणि पाच मिनिटांच्या खुणेवर सुतळी बॉम्बची वात बांधायची.  मग उदबत्ती पेटवून हे सर्व प्रकर्ण रस्त्याकडेला सिमेंटच्या पायपात, अंगणात गडग्याच्या पोकळीत, आणि कुठे कुठे वळचण शोधून  तिथे कोंबायचं.  त्यानंतर लपून हुरहुरत वाट बघायची.  पाच मिनिटं संपण्याची.  पाच मिनिटं संपता संपता नेमका कोणीतरी त्या पाईप जवळून चालला असेल, किंवा गडग्यावर बसला असेल तर मग चेकाळ्याला उकाळा.. ढम्म..करून तो फुटला आणि बाजूचा जीव धसक्याने उडाला की मनातला सैतानी स्फोट त्या सुतळी बॉम्बच्या हजार पट असायचा..हायड्रोजन बॉम्बसारखा."

ही दिवाळी साजरी करण्याची आमची साधी सोप्पी आणि आवडती पद्धत. पण आता विचार केल्यावर जाणवतं ते सगळं करणारा मी कोण? तर कोणी नाही. खरं तर 'सुरमई शाम' वाला मी ही मी नाहीच की विमानं उडवणाराही मी नाही. 'थंड पिंप' वाला मी नाही की 'कॉल सेंटर' वालाही मी नाही. तो दुसराच कोणीतरी आहे. फक्त त्याला "मी" म्हणावं लागतं  कारण ”तो” जो कोणी ”मी” नामक जन्मतो तेव्हा जग निर्माण होतं आणि तो “मी” मरतो तेव्हा जग नाहीसं होतं ही साधी थियरी मोडून काढण्यासाठी केलेला कॉस्मिक आटापिटा वाटावा म्हणून.

दिवाळीच्या भुस्स भुर्रर्र भुर्रर्र शुभेच्छा !

============

* दिवाळीच्या शुभेच्छा गद्यातून द्यायला मला आवडत नाहीत. दिवाळीच्या शुभेच्छा या कशा गुलजारच्या एखाद्या नज्मेतून किंवा अमृता प्रीतम च्या एखाद्या छान शेरातून, गझलेतून दिल्या जाव्यात. खालीच अमृता प्रीतमच्या एका कवितेतला छोटासा शेर देते. खरं तर दिवाळीच्या शुभेच्छा अशा दुःखद शेरातून द्यायला नकोत. पण गेले काही दिवस या कवितेने, या शेराने माझ्या मनात अक्षरशः घर केलंय. बघा आवडतोय का.

मिरा शहर इक लम्बी बहिस वरगा है
सड़कां-बेतुकीआं दलीलां दी तरह
ते गलीआं इस तरह-
जिउं इको गल्ल नूं कोई इधर घसीटदा कोई उधर

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'गझलमयी' शुभेच्छा !!

============

- हल्ली आपली विशेष भेट होत नाही कारण हल्ली हा शॉन जाम बीजी झालाय अस वाटत असेल तुम्हाला. थोडफार खर आहे ते. कारण मी बीजी आहे हे तर खरच. ट्रेक-ट्रेक, खादाडी-खादाडी चालू आहे नुसतं सारखं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी काही आता शॉन राहिलेलो नाही. आता मी बदललोय. सांगेन लवकरच.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'उधाणलेल्या' शुभेच्छा !!

============

* माझे सगळे फ्रेंड मला छोटू बच्चू असं काय काय म्हणतात. पण मला राग नाही येत. मला उलट आवडतं ते. कारण आहेच मी सगळ्यांपेक्षा छोटू आणि बच्चू. आणि इथे ब्लॉगविश्वात तर सगळेच माझे ताई आणि दादा आहेत. मी थिंक करत नाही असं मी खोटं खोटंच सांगितलं सगळ्यांना मेळाव्यात. खरं तर मी खूप थिंक करत असते. सतत काहीतरी विचार डोक्यात चालू असतो. फक्त इथे लिहायला कंटाळा येतो.

माझ्या सगळ्या ताईदादांना दिवाळीच्या 'छोटू-बच्चू' शुभेच्छा !!

============

- रँडम थॉट्स - २५

१. पुण्यात एवढा भयंकर विचित्र ट्राफिक असतानाही त्याविषयीचे रँडम थॉट्स फक्त एकाच ब्लॉगवर का लिहिले जातात?
२. 'आवरा' या शब्दाचा खरा अर्थ काय याचा विचार कोणी केला आहे का?
३. मुक्तपीठ शांत असलं की अनंत लोकांना अनंत यातना होतात याबद्दल सकाळ आणि मुक्तपीठ यांचं काय म्हणणं आहे?
४. अल्ताफ राजाला पद्मश्री, मिथुनदांना पद्मभूषण आणि रजनीकांतला पद्मविभुषण पुरस्कार मिळावा का?
५. सीआयडी संपलं याबद्दल निषेध नोंदवण्यासाठी एखादी एनजीओ स्थापन करण्याची कल्पना कशी वाटते?

दिवाळीच्या 'रँडम' शुभेच्छा !

============

* परवा घरी आले आणि बघते तर माझ्या गच्चीतल्या बागेत चक्क आल्याचं फुल. कधीच बघितलं नव्हतं आतापर्यंत. त्यामुळे लगेच त्याचे फोटोही टिपले. ही दिवाळी एकंदरीत मजेत जाणार तर. आल्याचं फुल, माझे 'स्कॉलर आणि राक्षस', हावरटपणाने घेतलेली ढीगभर पुस्तकं.. मजा एकदम.. यावरून एक जर्मन कविता आठवली.

wünsche Ihnen und Ihrer Familie
ein sehr, sehr glücklich Diwali
und erfolgreiches neues Jahr.
genießen!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'आकाशी' शुभेच्छा !

============

- "मला आयुष्यातील प्रत्येक क्षण नव्याने जगायला आवडत. मी खुप मूडी आहे. मी माझ्या मनाला जे योग्य वाटत तेच मी करतो." असं माझ्याविषयी बरंच काही मीच लिहून ठेवलेलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र मी फार हळवा आहे. कधी मुस्कानच्या आठवणीने रडणारा, कधी त्या टीव्हीवाल्यांच्या फालतूपणाला वैतागून त्यांना झोडणारा, कधी देवस्थानांमध्ये मांडलेला बाजार बघून विषण्ण होणारा तर कधी 'जगात भारी कोल्हापुरी' खादाडी करणारा. यंदाची दिवाळी जोरात आहे माझी. अहो पहिला दिवाळसण आहे ना. म्हणून तर.. !

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'मौजी' शुभेच्छा !!

============

* यंदा जरा वेगळं वेगळं वाटतंय दिवाळीला.. राजधानीत साजरी करते आहे मी दिवाळी. त्यामुळे जरा वेगळं किंवा चुकल्यासारखं वाटतंय. पण असं काही वाटायला लागलं की खैरखेडीतला अंधार आठवते आणि मग जाणवतं की समाजातल्या अनेक घटकांपेक्षा आपण कितीतरी पटींनी सुखी आहोत.

आपणा सर्वांना दिवाळीच्या 'शब्द' शुभेच्छा !

============

- कालच दिवाळीवरची एक अतिशय सुंदर आणि वेगळी कविता वाचायला मिळाली आणि ती मला इतकी आवडली की पहिली ओळ वाचता वाचताच तिची चाल आपोआप माझ्या मनात तयार झाली. कवीने यात शब्दांची जी छान हळुवार गुंफण केली आहे ना तिची मजा काही औरच. माझ्या पुढच्या उन्हाळी अंकात ही घेईन म्हणतो.

<कविता>

इथे चाल ऐका.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'चालदार' शुभेच्छा !!

==============

* बघता बघता दिवाळी आली. पण खरं सांगायचं तर राममंदिराच्या बाजूने निकाल लागला तेव्हाच माझी दिवाळी साजरी झाली होती. सध्या खूप घाईत आहे त्यामुळे जास्त लिहीत नाही. पुढच्या कॅनडा दौर्‍याच्या नवीन आठवणी घेऊन लवकरच हजर होईन.

तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या 'शत' शुभेच्छा !!

============

- दिवाळी असतानाही आणि नसतानाही माझं आवडतं पक्वान्न एकच. बर्फ्या !! मला खूप आवडतात बर्फ्या. तसा मी खूप सद्गुणी मुलगा आहे आणि परीक्षा जवळ आली की मला अभ्यासाचा एकच ध्यास लागतो. नुकतीच परीक्षा संपली असल्याने या दिवाळीत बर्‍याच बर्फ्या खाता येतील. आणि थोडीफार इनस्टॉलेशन्सही करायची आहेत.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'बर्फ्यामय' शुभेच्छा !!

============

* ओमानचा निसर्ग, ओमानचा चहा, ओमानमधली गाणारी विहीर, मस्कतचे 'ज्वेल ऑफ मस्कत', सलाला वगैरे माझ्या विशेष आवडीच्या गोष्टी. यंदाची दिवाळी भारतात साजरी होणार आहे. अजिंक्यला आपल्या देशातली दिवाळी कशी असते हे कळावं म्हणून आम्ही दिवाळीला नेहमी भारतातच येतो.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'अक्षर' शुभेच्छा !!

============

- या दिवाळीत खूप कामं करायची आहेत. नवीन लेख निवडून दिवाळी विशेषांक तयार करायचा आहे. ब्लॉगवर बर्‍याच टेक्निकल टिप्सही टाकायच्या आहेत. हे सगळं सगळं घेऊन लवकरच भेटीला येऊ.

दिवाळीच्या 'नेट' शुभेच्छा !!

============

- मी खरं तर कोकणातल्या खार्‍या हवेवर आणि माश्यांवर पोसलेला/वाढलेला आणि जिभेचं वळण तिरका असणार्‍या अंतू बर्व्यासारखा माणूस पण इथे दक्षिणेत येऊन पडल्याने हल्ली 'येनु सार' ऐकत ऐकत मांसाहार करत असतो. पण काही झालं तरी दिवाळीला कोकणात जाऊन माश्यांचा आणि बकर्‍यांचा फडशा पडल्याशिवाय चैन पडणार नाही.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'गजालवाडी' शुभेच्छा !!

============

- यंदाची दिवाळीही नेहमीप्रमाणे रजनीव्रतकथा वाचून, रजनी महाराजांचं डीव्हीडीवर दर्शन घेऊन, पिवळा रुमाल आणि काळा गॉगल रजनीभक्तांमध्ये वाटून, दिवाळीच्या तिन्ही दिवसांचे २४ तास रजनीदेवांचे चित्रपट बघत बघत साजरी करणार आहोत. तेव्हा शुभेच्छा द्यायला वेळ मिळणार नाही. म्हणून आत्ताच देतो.

दिवाळीच्या 'MIND IT' शुभेच्छा, अण्णा !!!!

============

- गेल्या दिवाळीत जाम जाम फिरलो. ते वर्णन या दिवाळीत 'माचाफुको'च्या सिरीज मधून टाकतोय. 'माचाफुको' सिरीज सुद्धा आधी इंसेप्शन प्रमाणे 'सी' मध्येच लिहिणार होतो. पण माचाफुको पडला पक्का फिरता. त्यामुळे बरेच भाग टाकतोय. एवढं 'सी' प्रोग्रामिंग आणि तेही प्रत्येक भागात करायला वैताग येईल राव.

तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या 'सौर आणि माचाफुको' शुभेच्छा !!

============

- माझ्या बिनभिंतीच्या घरातल्या लोकांना या वेळी मी प्रेमळ दम भरलेला आहे की या दिवाळीत कोणीही फटाके फोडू नका आणि वीज वाचवा, पाणी वाचवा आणि झाडं लावा, झाडांवर प्रेम करा झाडांवर प्रेम करा.

दिवाळीच्या 'मनाच्या' शुभेच्छा !

============

- मनसोक्त फिरण्याची ही माझी शेवटची दिवाळी असेल असं सगळे चिडवत असले तरी पुढच्या दिवाळीत मी सगळ्यांना दाखवून देईनच की मी काय चीज आहे. जाउदे. पुढचं पुढे. या दिवाळीचा कोटा पूर्ण करायचा आहे.

सॅक : टिक
कॅमेरा : टिक
रोप : टिक
मॅगी : टिक
मेणबत्त्या : टिक

चला मी तयार आहे. येताय ना तुम्ही?

तुम्हाला दिवाळीच्या 'भटक्या' शुभेच्छा !!

============

- या दिवाळीत बरंच काही लिहायचं आहे ब्लॉगवर. नवीन टेम्प्लेट, ब्लॉग सजवण्याच्या नवीन युक्त्या, वर्डप्रेससाठी खास नवीन माहिती असं बरंच काही. बर्‍याच ब्लॉगर्सनी विजेटस बनवून देण्यासाठीही विनंती केली आहे. तेही काम करायचंय. पण हे फुकट क्रेडीट कार्डवाले कॉल्स साले थांबले तर वेळ मिळणार ना लिहायला. शांत बुलेटधारी (भीम) शांत !!

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'बंबल-बी' शुभेच्छा !!

============

- हल्ली जाम बिझी झालोय त्यामुळे जास्त वेळ मिळत नाही. पण या दिवाळीच्या मुहूर्तावर एक नवीन कथा घेऊन वाचकांच्या भेटीला येतो आहे. सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, ड्रामा असं सगळं सगळं असणार आहे या नवीन कथेत. लवकरच भेटू नवीन कथा घेऊन.. 'द डीप व्हॅली ऑफ मनी'

दिवाळीच्या 'मनातल्या' शुभेच्छा !!

============

- ही दिवाळी आमचं आराध्य दैवत रारा पपु श्री शिरीष कणेकर यांची फिल्लमबाजी आणि फटकेबाजी ऐकत व्यतीत करण्याचे मनी वसते आहे. पण नेमका ओबामा फोन करून निद्राराणीचा नाश करायचा आणि ओबामाचा पत्ता शोधत पत्तेशोधनाचं चिंतन करत तातडीचा वॉशिंग्टन दौरा करावा लागायचा. त्यापेक्षा नकोच ते. एकदा या ओबामाचे प्रॉब्लेम्स सोडवले म्हणजे मग मी फटकेबाजी ऐकायला आणि करायला मोकळा.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'जीवनगाणी' शुभेच्छा !!

==============

- दिवाळी एवढी घाईघाईत जाणार आहे की मनातल्या अनेक लघुकथा लिहायला, मनातल्या चाफ्याचा गंध ब्लॉगवर उतरवायला वेळ मिळेल का हे सांगता येत नाही. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'गंधित' शुभेच्छा !!

============

- या दिवाळीत मी दोन नवीन पोस्ट्स टाकणार आहे ब्लॉगवर. एक म्हणजे लिनक्स मधल्या काही महत्वाच्या पण सर्वसामान्यांना माहित नसलेल्या कमांड्स आणि दुसरी पोस्ट म्हणजे नासाने काढलेल्या मंगळाच्या छायाचित्रांवर लिहिलेली पोस्ट. लवकरच टाकेन.

दिवाळीच्या 'सुरुवातीच्या' शुभेच्छा !!

============

- या दिवाळीत गावाला जायच आहे. मजा येईल. 'ती' ही भेटेल. 'ती'च्याशी बोलायला मजा येईल. पण अप्सरा तिथे नसेल, अप्सरा भेटणार नाही याचं खूप वाईट वाटत आहे. तिचा तो लाल ड्रेस.. उफ्फ. माझं हृदयच बंद पडेल अस वाटत. दिवाळीत तर ती साडी नेसणार असेल. किती गोड दिसेल ना ती. ती आहेच गोड म्हणा. मीच हा असा फुस्स. तिच्यासमोर गेलं की काहीच सुचत नाही. मी मित्राला बोललो तर तो मला हसायला लागला. हे मित्र पण ना यार. जाउदे. सोडा ते. बोलूच.

दिवाळीच्या 'अप्सरा' शुभेच्छा !!

============

टीप :

१. ज्या शैलीत,भाषेत शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत ती त्या ब्लॉगरची निव्वळ एकमेव शैली, भाषा, निवड, विषय मांडणी आहे असं मुळीच नाही. फक्त ही शैली त्याच्या/तिच्या इतर शैली/मांडणी पेक्षा अधिक वापरली गेली आहे किंवा प्रभावीपणे वापरली गेलेली आहे असं मला वाटतं (ते पूर्णतः सत्य असेलच असं कदाचित नाही). त्यामुळे त्याचा प्रभाव वाचकांवर (किंवा फक्त माझ्यावर) अधिक पडलेला आहे असं समजावं.

२. कुठेही कुठल्याही ब्लॉगचा, ब्लॉगरचा किंवा त्याच्या/तिच्या मताचा/शैलीचा उपमर्द करण्याचा किंचितही उद्देश नाही. कोणाचा अपमान करण्याएवढा अजून मी मोठा झालेलो नाही आणि एवढं मोठं होण्याची इच्छाही नाही ;)

३. तरीही कोणालाही चुकून माकून आपला स्वतःचा, ब्लॉगचा, आपल्या शैलीचा, मताचा, पद्धतीचा, मांडणीचा अपमान झाल्यासारखं वाटल्यास ताबडतोब कळवणे. ते उल्लेख काढून मी पोस्टमधून काढून टाकेन. पण कोणी अशा प्रकारची तक्रार केल्यास ती तक्रार म्हणजे मला त्या ब्लॉगरची शैली व्यवस्थित कळली आणि मी ती हुबेहूब उचलूही शकलो आणि त्या पद्धतीने लिहूही शकलो याला पावती दिल्यासारखं होईल हे मात्र लक्षात असू दे ;)

४. चुकून एखाद्या ब्लॉगचा उल्लेख राहिला असल्यास तो माझा 'कपटीपणा' वा 'उद्दामपणा' नसून निव्वळ 'धांदरटपणा' वा 'वेंधळेपणा' समजावा. कुठल्याही ब्लॉग/ब्लॉगरला कपटीपणे वा उद्दामपणे वगळण्याएवढा मोठा... <यापुढे टीप क्र. २ वाचावी>

५. सर्व ब्लॉगर्स, वाचक, हितचिंतक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'ना हरकत' शुभेच्छा !! :D

============

वर म्हटल्याप्रमाणे ब्लॉगर लोक गप्पाटप्पा टाकायला जमले होते तेव्हा तिथे येऊ न शकलेल्या काही लोकांनी नंतर मेल करून शुभेच्छा संदेश पाठवले होते पण तळटीप क्र. ४ मध्ये उल्लेखिलेल्या माझ्या अचाट गुणविशेषांमुळे ते संदेश वरील विभागात नोंदवण्याचे राहून गेले होते. ते आता खाली देत आहोत. अर्थात तळटीप क्र. ४ मध्ये उल्लेख केलेल्या कारणांमुळे ते माझ्यावर रागावले नाहीयेत ही बाब तर नक्की..

============

- मी अलिकडे लिहिणं जरा कमी केलेलं असलं तरी सगळे ब्लॉग्ज नियमित वाचतो आणि आवडलेल्या पोस्ट्सवर प्रतिक्रियाही देतोच. या दिवाळीपासून पुन्हा नियमित लिखाण सुरु करण्याचा विचार आहे. आणि आमचा प्रिय मित्र 'अखिल वेगळे' देखील सतत मागे लागला आहे. त्यामुळे लिखाण सुरु होणार हे नक्कीच.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या 'मेवामय' शुभेच्छा !!

============

- वर उल्लेख केलेल्या सगळ्या ब्लॉगर मित्रांच्या मानाने ब्लॉगिंगच्या दुनियेतला माझा प्रवेश तसा नवाच. अनेक दिवस इतरांचे ब्लॉग्ज वाचून, तिथे प्रतिक्रिया देऊन झाल्यावर आपण आपलाही ब्लॉग सुरु करायला हवा असे स्वच्छंदी विचार माझ्या मनात दाटायला लागले आणि लगेच पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी माझा ब्लॉग सुरुही केला. बघा कसा वाटतोय तुम्हाला ते.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या 'स्वच्छ' शुभेच्छा !!

============

तर हे आमचे असे गुणविशेष पुनःपुन्हा जागृत होऊन नवनवीन यंट्रया येऊन अजून अजून नवनवे शुभेच्छासंदेश मिळत राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या पानाला भेट देत रहा वरचेवर !

Saturday, October 30, 2010

अरुदेवीची कहाणी

ऐका ऐका अरुदेवी तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब स्त्री रहात असे. अरु तिचं नाव. अरु भारी बडबडी होती. सतत बडबडत असे. दिसेल त्याबद्दल बोलायची, वाटेल त्या विषयावर बकबक करत राहायची. बकबक बकबक बकबक बकबक.. बास.. दुसरं काही करीत नसे. प्रत्येक विषयावर तिचं एक मत असे.. पण काहीही बोलण्याआधी आजूबाजूचे लोक त्या विषयावर काय बोलतायत हे ती बघे, सर्वांचं म्हणणं कान देऊन एके आणि त्यानंतर आपलं मत सांगे. तर तिच्या बोलण्यात एक मोठी मौज होती. ती अशी की आसपासच्या दहा लोकांनी दगडाला दगड म्हटलं की ती दगडाला पाणी म्हणीत असे, झाडाला झाड म्हटलं की ती माती म्हणीत असे, नदीला नदी म्हटलं की ती छप्पर म्हणीत असे. लोकांनी तिला सुरुवातीला समजावयाचा प्रयत्न केला. पण ती ऐकेचना. आपला हेका सोडीच ना. लोकांनी खूप समजावून पाहिलं, चुचकारून पाहिलं. पण ती काही बधली नाही. बडबडीचा घेतला वसा काही तिने सोडला नाही. मग लोक कंटाळून निघून जात. असं वारंवार होऊ लागलं. मग तिची भीड चेपली. एकदा तिने हाच प्रयोग पन्नास लोकांसमोर करून बघितला. समोरच्या झाडाच्या पानांचा रंग काळा आहे असं पन्नास लोकांसमोर बिनदिक्कतपणे म्हणाली. पुन्हा तेच सुरु झालं. लोक समजावायला लागले. पण नेहमीप्रमाणे अरु ऐकेना. त्या पन्नासमध्ये आधीच्या दहामधलेही काही लोक होते. त्यांनी उरलेल्या चाळीस लोकांना हिच्या नादी लागणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं कसं आहे आहे हे समजावून सांगितलं. ते ऐकून नेहमीप्रमाणे पुन्हा लोक पांगले. अरुची भीड चेपतच गेली. हाच प्रयोग तिने पुढे शंभर, पाचशे, हजार लोकांपुढे करून बघितला आणि योगायोगाने, सुदैवाने दर वेळी जिंकलीही. एकदा तर तिने संपूर्ण गावाविरुद्ध बोलायला सुरुवात केली. सारं गाव तिला समजावत होतं पण हिचा हेका कायमच. हिचं बोलणं असं असे की समोरच्याला निरुत्तर व्हावंच लागे. म्हणजे कितीही खोटं असो पण त्यात इतका शब्दच्छल असे, शब्दांची इतकी फिरवाफिरवी असे, इतक्या गोंडस आवरणात शब्द लपेटलेले असत, इतके नवनवीन वेगवेगळे शब्दप्रयोग वापरलेले असत, ते इतक्या अलंकारात लपेटलेले असत की बघता बघता समोरचा निव्वळ शब्दसामर्थ्य कमी असल्याने काही करू शकत नसे, निरुत्तर होत असे आणि निरुपाय होऊन निघून जात असे. बोलणार्‍याची मातीही विकली जाते पण न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही म्हणतात ना त्याप्रमाणे जडजड, मोठमोठे शब्द वापरणारा मनुष्य हिरवा रंग काळा आहे, दगड म्हणजे पाणी आहे असं काहीही समजावून देऊ शकतो हे त्या गावकर्‍यांच्या लक्षात आलं. हळूहळू त्यांनी तिच्या नादाला लागणं सोडून दिलं. त्याने तिला अजूनच जोर चढला. निरपराध लोकांची हत्या करणार्‍या भक्ष(ल)वादी लोकांची ती बाजू घेऊ लागली. राजाने त्यांच्याशी लढायला सैन्य पाठवलं याबद्दल ती राजाचा निषेध करू लागली. हे अन्यायकारक आहे असं म्हणू लागली. हकनाक जीव गमावणार्‍या निष्पाप लोकांच्या जीवाचं महत्व, त्यांचा 'जगण्याचा अधिकार' वगैरे वगैरे ती नेहमीप्रमाणेचच सोयीस्करपणे विसरली. भक्ष(ल)वाद्यांना 'गांधीबाबाची लेकरं' म्हणू लागली. राजाने काहीही न करता दुर्लक्ष केलं.

एकदा तिने असंच दगड, पाणी, माती, झाड वगैरे वगैरेच्या गोष्टी लिहिल्या आणि अचानक तिला शेजारच्या देशातून 'भूकड' पुरस्कार मिळाला. तिचा भाव अजूनच वधारला. मिजास अजूनच वाढत गेली. आपण म्हणू तेच खरं, आपण करू तीच पूर्व दिशा असं तिला वाटू लागलं. बडबड वाढू लागली. बकबकीचा परीघ विस्तारू लागला. एकदा राजाच्या मोठ्या राजवाड्यावर हल्ला झाला. हल्ला करणारे पकडले गेले आणि त्यांच्या प्रमुख 'गुरु'जींना देहदंडाची शिक्षा झाली. गुरुजींना देहदंड मिळालाच पाहिजे असं सर्व गावांमधल्या सगळ्याच लोकांचं मत होतं. लोकांचं असं मत आहे हे कळल्यावर, ते शांतपणे ऐकून घेतल्यावर तिने तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्या विरुद्ध मत मांडायला सुरुवात केली. देहदंड देणं कसं अयोग्य आणि चुकीचं आहे याचे डिंडिम पिटायला सुरुवात केली. तेव्हाही राजाने तिच्यावर काहीच कारवाई केली नाही. अर्थात राजालाही देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची अजिबातच इच्छा नव्हती. पण येनकेनप्रकारेण आपला इतरांपेक्षा वेगळा आवाज, मत मांडायची संधी तिने बरोबर साधून घेतली.

होता होता आपल्या कुठल्याच गोष्टीला कोणीच, अगदी राजाही, आक्षेप घेत नाही हे पाहिल्यावर तिचा उत्साह अजूनच दुणावला. ती देशाशी द्रोह करू लागली, राष्ट्राचे तुकडे करू पहाणार्‍यांच्यात उठबस करू लागली. भाषणं ठोकू लागली. ज्या देशाने तिला रोजचं दोन वेळचं खाणंपिणं दिलं त्या देशाला सरळ भूखा-नंगा म्हणू लागली. या देशाचे प्रांत विभागलेच पाहिजेत, प्रदेश वेगळे केलेच पाहिजेत, हा देश तोडलाच पाहिजे असं याच देशात राहून बोलू लागली. एवढंच नाही तर काही प्रदेश हे देशातले कधीच नव्हते असं म्हणू लागली. लोक पुन्हा चवताळले. तिच्या म्हणण्यावर राग व्यक्त करू लागले. पण तिने तिच्या नेहमीच्या शैलीत आपणच कसे बरोबर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला. तुम्ही ज्याला देशद्रोह म्हणता त्याला मी माझं मत म्हणते, तुम्ही ज्याला राष्ट्रद्रोह म्हणता तेच मत त्या प्रदेशातल्या लोकांचं आहे असं उघडपणे म्हणू लागली. वास्तविक त्या प्रदेशातल्या काही लोकांचंच ते मत होतं अन्य जनतेचं नव्हतं हे तपशील ती सोयीस्करपणे विसरली. तिच्याच देशातले तिच्यासारखे देशफोडे, तुटक्या विचाराचे, फुटक्या अकलेचे आणि नजरेचे 'गिल्ली', 'वरवर' सारखे लोक तिच्याबरोबर तिच्या हो ला हो करायला होतेच. होता होता हा ही वाद राजापर्यंत गेला. राजाने नेहमीप्रमाणे आपली जात दाखवली, पळपुटेपणा सिद्ध केला. बुळचटपणे शांत राहत तिला वेळच्यावेळीच रोखली नाही, तिची जीभ हासडली नाही की तिला हद्दपारही केलं नाही. होताहोता अरुची अरुताई आणि अरुताईची अरुदेवी झाली. थोडक्यात ज्याप्रमाणे अरुदेवीला आपलंच म्हणणं खरं करता येई, ती ज्याप्रमाणे बडबड करीत राही, शब्दच्छल करीत राही, हेकेखोरपणे वागीत राही, देशद्रोह करी पण हे सगळं चांगल्याचुंगल्या शब्दांच्या वेष्टनात गुंडाळूनच करी त्याचप्रमाणे हेच गुण तुमच्यातही येओत आणि अरुताईप्रमाणेच तुमच्याही केसाला धक्का न लागता तुमच्यावरही पुरस्कारांची खैरात होवो !! सत्तरा उत्तराची कहाणी नवा उत्तरी सुफळ संपूर्ण.. (सत्तरा आणि नावाच्या ऐवजी इतर काही वापरलंत तर ते कसं चूक आहे हे स्वतः अरुदेवी प्रगट होऊन दाखवून देईल तेव्हा सांभाळून !!)

-- काही संदर्भ विकीपिडियावरून

Friday, October 29, 2010

अतिथी....

जेव्हा आपल्याला एखादा लेख, कविता, स्फुट, ब्लॉगपोस्ट, उतारा प्रचंड प्रचंड आवडतो, आपण त्याच्या प्रचंड प्रेमात पडतो तेव्हा आपण काय करतो? तेव्हा तो लेख आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लोकांना मेल करतो, बझ करतो, फोनवरून कळवतो, फेसबुकवर टाकतो, ऑर्कट स्टेटस अपडेट करतो, ट्वीटचा चिवचिवाट करतो. अधिकाधिक लोकांनी ते वाचलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं कारण लेख वाचून आपण जसे भारावून गेलेलो असतो, आनंदी झालेलो असतो, हसलेलो असतो, टाळी दिलेली असते, डोळ्याची कड हळूच पुसलेली असते, "आपल्याला असं लिहिता आलं असतं तर काय मजा ('जहाजा'तला ज) आला असता यार !!" असा विचार केलेला असतो किंवा क्वचित प्रसंगी आपल्या काळजात जशी एक किंचितशी कळ आलेली असते तो अनुभव , अगदी तसाच्या तसा अनुभव आपल्या सुहृदांना, समविचारी मित्रमैत्रिणींना यावा असं आपल्याला मनापासून वाटत असतं. पण तरीही आपण किती लोकांपर्यंत पोचणार? शंभर? दोनशे? पाचशे ? बास एवढेच... यापेक्षा अधिक खचितच नाही. पाचशे पेक्षा जास्त *चांगले* मित्रमैत्रिणी असलेल्या व्यक्तीचा मी आजन्म गुलाम म्हणून राहायला तयार आहे. असो. तर या अशा 'सोसल 'नॉट'वर्किंग' च्या माध्यमातून जरी आपण पाचशे किंवा समजा अगदी हजार लोकांपर्यंत आपली आवड पोचवली पण तरीही आपल्या यादीत नसलेल्या अन्य हजारो लाखो लोकांचं काय?.. तर या अशा 'काय?' वाल्या प्रश्नाचा आपण फक्त विचारच करत असताना किंवा कदाचित तोही करत नसताना सलील आणि प्रणवने तो विचार प्रत्यक्षात आणून दाखवला. काय केलं त्यांनी? त्यांनी एक सही काम केलं.. नियमित नव्या लेखनाची प्रचंड वेगाने भर पडत असलेल्या मराठी ब्लॉगजगतातल्या निवडक उत्कृष्ट लेखांचं एकत्रीकरण करून दर महिन्याला ते नेटभेटच्या इ-मासिक रुपात प्रकाशित करायला सुरुवात केली. यामुळे झालं काय की नियमितपणे जालावर नसणार्‍या तस्मात असे उत्तमोत्तम ब्लॉग्ज/लेख नियमित वाचू न शकणार्‍या अनेक लोकांना 'अ‍ॅट यॉर फिंगरटिप्स' म्हणतात तसं एका टिचकीसरशी हे लेख इ-पुस्तकाच्या स्वरुपात आपल्या मेलबॉक्स मध्ये मिळवून वाचण्याची सोय झाली. बघता बघता नेटभेट इ-मासिक ही कल्पना सुपरहिट झाली. लोकांना दर महिन्याला नवनवीन लेखन वाचायला मिळायला लागलं, नेटभेटचे वाचक वाढत गेले, वाचकसंख्येने एक लाखाचा आकडा पार केला, इ-मासिकांत लिहिणार्‍या ब्लॉगर्सना नित्य नवीन वाचक लाभत गेले.

एक दिवस सकाळी माझ्या मेलबॉक्समध्ये सलीलचं मेल चमकलं. उघडून बघतो तर चक्क नेटभेटच्या ऑक्टोबर अंकासाठी अतिथी संपादकपद स्वीकारण्याची विनंती. मध्यंतरी २-३ महिने कार्यबाहुल्यामुळे सलील/प्रणवला नेटभेटसाठी वेळ काढणं शक्य होत नव्हतं याची कल्पना होती. तसंच सलीलच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या ब्लॉगरने संपादकपद स्वीकारून स्वतः लेख निवडून अंक काढला तर तो नक्कीच वाचनीय होईलच. आपण सुरुवातीला जे वाचत होतो, कालांतराने ज्यात आपले लेख यायला लागले त्या मासिकाचा अतिथी संपादक म्हणून काम पाहणं ही कल्पना एकदम मस्त होती. मी ताबडतोब होकार कळवला. सलीलशी फोनवर बोलून अंक कसा अपेक्षित आहे, काय करायचं/काय करायचं नाही पक्षि 'डूज अँड डोंटस' (डोंटस असे काही नव्हतेच खरं तर) वगैरे वगैरेवर चर्चा झाली.. आणि बरोब्बर त्याच वेळी माझा *लाडका* बॉसबाबा माझ्या मदतीला धावला. म्हणजे थोडं (अधिकच) जास्तीचं आणि नवीन काम मागे लावून. पुढच्या ४-५ दिवसांत तर काम इतकं वाढलं की "मी का या अंकासाठी 'हो' म्हणालो, अंक (माझ्याच्याने) निघणार तरी आहे का" असं वाटायला लागलं. पण आठेक दिवसांत बाबा जरा थंड झाला आणि मी ऑक्टोबरात अपडेट झालेले आणि माहित असलेनसलेले जवळपास सगळे ब्लॉग्ज पालथे घालायला सुरुवात केली. पालथे घातले, भ्रमंती केली, डेरे टाकले, पडीक राहिलो काय हवं ते म्हणा. एकेक ब्लॉग, एकेक लेख पूर्वी नुसतं वाचक म्हणून वाचताना आणि आता तात्पुरत्या का होईना पण अतिथी संपादकपदाच्या चष्म्यातून म्हणून वाचताना माझ्या दृष्टीकोनात फरक पडला एवढं नक्की जाणवलं. म्हणजे नक्की काय ते मला माझ्या तोकड्या शब्दसामर्थ्यामुळे कदाचित व्यवस्थित समजावून सांगता येणार नाही. पण दृष्टीचे कोन निराळे होते हे नक्की जाणवलं.

अमाप शब्दसागरातून निवडक लखलखते मोती वेचून आणले किंवा साहित्याच्या विशाल आसमंतातून अविरत तळपणारे तेजोगोल निवडून काढले असली जडजंबाळ वाक्यरचना टाळून एवढंच सांगतो की एकापेक्षा एक भार्री सरस लेख गवसले. जगावेगळ्या माणसांवरचे महेंद्र कुलकर्णी आणि चंद्रशेखर आठवले यांचे झपाटून टाकणारे लेख असोत किंवा अम्माच्या खडतर जीवनप्रवासाच्या पुस्तकावरचा तन्वीचा लेख असो किंवा मग खैरेखेडीतल्या नागरी जीवन आणि सुधारणांपासून शेकडो योजने दूर असलेल्या लोकांच्या खडतर आयुष्याचं वर्णन करणारा सविताताईंचा लेख असो... वाचता वाचताच भारून टाकणार्‍या रोहनच्या सप्त शिवपदस्पर्शाच्या लेखमालेचा अखेरचा भाग असो की सत्तापिपासू अमेरिकेचा बुरखा फाडणार्‍या निर्भीड वेबसाईटविषयी माहिती देणारा विद्याधरचा लेख असो की एका लढवय्याच्या अखेरच्या प्रवासाची डोळे पाणावणारी सौरभची कहाणी असो.. चार रंगांना लघुकथांत गुंफणारी सुषमेयची लघुकथामाला असो वा नारीचं दुर्गेच्या विविध रूपांशी असलेलं साधर्म्य दाखवणारं जास्वंदीचं स्फुट असो किंवा मग लहान मुलं ज्यांच्या तालावर नाचतात त्या बडबडगीतांच्या मागची कांचनने सांगितलेली दुःखद कहाणी असो... किंवा मग रोजच्या धावपळीत ओठांचे कंस सुलटे करण्यास भाग पाडणारी अपर्णाची सॉफ्टवेअर कामगाराची हलकीफुलकी कहाणी असो किंवा धो धो हसून मुरकुंडी वळवणारी गुरुदत्तची मुंबई-पुणे सायकल ट्रीप असो... हे सगळं एकापेक्षा एक आहे.. विलक्षण आहे.. सरस आहे.. ऑस्सम आहे.. जबरा आहे.. लय भारी आहे.

हे सगळे माझे प्रचंड आवडते लेख आहेत या महिन्यातले. या सगळ्या लेखांचा आणि लेखकांचा मी निर्विवाद चाहता आहे. हे लोक तसेही लिहितातच मस्त पण सुदैवाने माझ्या टाळक्यावर संपादकपदाची टोपी असताना यांनी हे एवढे छान लेख लिहिणं आणि मला ते आपल्या या महिन्याच्या अंकात समाविष्ट करायला मिळणं हा माझा बहुमान आहे का ते माहित नाही किंवा माझं सदभाग्य आहे का याचीही कल्पना नाही पण हे लेख घेता आल्याने प्रचंड आनंद झाला, समाधान लाभलं एवढंच सांगतो.

आणि हो जाताजाता.. यात माझाही एक लेख आहे. पण यात खुर्चीचा, सत्तेचा, पदाचा गैरवापर वगैरे अजिबात काही नाही हो.. कारण हा खरंच माझा मला खूप आवडलेला लेख आहे.. आणि आता ही आत्मप्रौढी वगैरेही नाही. आपण मित्राला ट्रेकचे किंवा असेच कुठलेही फोटो दाखवताना म्हणतो ना की "हा बघ .. माझा हा फोटो एकदम मस्त आलाय.." तर त्याला कोणी आत्मप्रौढी/आत्मस्तुती म्हणेल का? नाही ना? तर हाही त्यातलाच प्रकार आहे..

"हा अंक वाचकांच्या हातात देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे" किंवा "हा आम्ही आमचा बहुमान समजतो" वाली टिपिकल वाक्य नसणारं, सलीलच्या नेहमीच्या स्वतःच्या शैलीत लिहिलेलं संपादकीय वाचायची सवय असलेल्या आणि त्यामुळेच हे असलं उथळ, पाचकळ संपादकीय (!!) वाचून उरलेला अंक न वाचण्याचं जवळजवळ नक्की केलेल्या बा वाचकांनो !!!!! असं प्लीज करू नका. असं केलंत तर तो या चतुरस्त्र लेखन करणार्‍या लेखकांवर, त्यांच्या लेखांवर आणि सगळ्यांत महत्वाचं सांगायचं तर तुम्हा स्वतःवर भलामोठा अन्याय ठरेल. 'शितावरून भाताची परीक्षा' वाले नियम सगळ्या ठिकाणी लावायचे नसतात हो. तेव्हा उलटा पानं, करा सुरुवात वाचायला आणि फडशा पाडा याही अंकाचा.

तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! दिवाळीच्या शुभेच्छा देऊन हे लांबलेलं संपादकीय संपवण्यापूर्वी एकच सांगतो. हा दिवाळी अंक नाही पण तरीही शुभेच्छा मात्र अस्सल बावनकशी आणि मनापासून आहेत.. त्या दिवाळीपर्यंत पुरवा.. कारण पुढच्या महिन्यातला दिवाळी अंक घेऊन येणारी संपादक व्यक्ती माझ्यापेक्षा चिक्कार सिनियर आहे. दर्जेदार लिहिणारी आहे. त्यामुळे पुढच्या अंकाची वाट आत्तापासूनच पाहायला लागा.. चला भेटूच... अंकाच्या पानापानांत !!



---------------------------------------------------------------------------------------

आत्ताच प्रकाशित झालेल्या 'नेटभेट' च्या ऑक्टोबर इ-मासिकासाठी लिहिलेलं हे संपादकीय. संपूर्ण अंक इथे वाचता येईल.

Wednesday, October 27, 2010

वटवटीचं निकालपत्र

मी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही..... आत्मचरित्र का लिहिलं जात असावं? आपण किती 'बेस्ट' आहोत आणि तमाम पब्लिकला ते शेवटपर्यंत कसं कळलं नाही हा टाहो फोडण्यासाठी आत्मचरित्र लिहिलं जातं.
-वपु. 

--------

माझ्या सगळ्या हुश्शार, स्कॉली ब्लॉगु-ब्लगिनींनी आपापल्या ब्लॉगचे पहिले वादि साधारण मार्च/एप्रिल/मेच्या सुमारास साजरे केले. केले म्हणजे ते तेव्हाच होते अर्थात.. मला वाटतं त्या सुमारास जवळपास दर चार दिवसाआड कुठल्या ना कुठल्या ब्लॉगच्या वादिच्या पोस्ट्स येत असायच्या. थोडक्यात हुश्शार पोरांचं सगळं मार्चमधे असतं हेच खरं (विचित्र अर्थ काढल्यास डोळे वटारून पाहण्यात येईल : इति मी नाही तर मार्चातले ब्लॉ-ब्ल) आणि ऑक्टोबरचा महिना हा खास राखीव असतो तो या अशा आमच्यासारख्या रिपीटर* (यात श्लेष आहे. का ते नंतर सांगेन) , बॅकबेंचर, लेटलतीफ** (यातही श्लेष आहे. तोही शेष श्लेषाबरोबरच सांगेन.) ब्लॉग (आणि ब्लॉगर) साठी. थोडक्यात या ऑक्टोबरी ब्लॉगचा प्रथमवार्षिक निकाल लावायची वेळ आलीये तर. हे घ्या निकालपत्रच देऊन टाकतो कसं.

===============================================

सत्यवानाच्या वटवटीचे प्रथमवार्षिक निकालपत्र 

कालावधी : २००९-१०

महिना : (अर्थातच) ऑक्टोबर

दिनांक : २३ (च्यायला गडबड झाली. वाचत रहा. कळेल पुढे)

पूर्ण नाव : सत्यवान वटवटे

पाडलेली एकूण बाडं : ११०

छळ सोसणारे वीर : १३८

स्वतःहून स्वतःच्या मेलबॉक्सात वटवटीचा धोंडा पाडून घेणारे महा-वीर : ६६

मिळालेल्या एकूण प्रतिक्रिया, मतं, ओव्या, शिव्या-शाप वगैरे : ३७९७

मुदलातले प्रतिसाद : ~१८९८

सत्यावानाने त्यावर उलट-टपाली चढवलेलं व्याज : ~१८९८

जोडलेले मित्रमैत्रिणी, सुहृद : भर्पूर

मिळालेलं समाधान : चिक्कार

रस्त्याचा नकाशा पक्षि रोडमॅप उर्फ भविष्यकालीन योजना : मब्लॉवि त्यांच्या यादीतून हा ब्लॉग काढून हाकलून देत नाहीत तोवर लिहीत राहणे. आणि नंतरही लिहीत राहणे आणि त्याच्या नंतर आणि त्याच्या नंतरच्या नंतरही लिहीत राहणे. (वचने किम् दरिद्रता.. हाणा च्यायला)

एकुणातली प्रगती : (अ)समाधानकारक

सुधारणेला वाव : कैच्याकै जाम प्रचंड भारी

===============================================

मागे एकदा कुठेतरी "कवीला कविता वाचून दाखवण्यापुर्वी त्याची पार्श्वभूमी, उद्देश वगैरे समजावून सांगावा लागला तर तो कवितेचा आणि तस्मात् कवीचा पराभव आहे" अशा अर्थाचं काहीतरी वाचलं होतं. तशाच प्रकारे श्लेषाचा दुसरा (आणि पहिलाही) अर्थ समजावून सांगण्यात कोणाचा पराभव वगैरे आहे का ते माहित नाही बुवा. पण जनकल्याणार्थ आम्ही दोन्ही अर्थ सांगण्याचे योजिले आहे.

* वाला श्लेष -
अर्थ १ : सगळ्या हुश्शार पोरापोरींच्या मार्च-मे मधल्या ब्लॉगांनंतर आमचा ऑक्टोबरात आलेला म्हणून रिपीटर.
अर्थ २ : आमच्या गेल्या मार्चमध्ये उघडलेल्या आणि काही महिन्यांतच अगदी गतप्राण नाही तरी निष्क्रीय झालेल्या विंग्रजी ब्लॉगनंतर आलेला हा मराठी ब्लॉग म्हणून रिपीटर.

** वाला श्लेष -
अर्थ १ : अर्थ थोडाफार मगाससारखाच अर्थ म्हणजे उशिरा आलेल्या शहाणपणाप्रमाणे उशिरा सुरु केलेला म्हणून लेटलतीफ.
अर्थ २ (हा अर्थ जाम महत्वाचा आहे. नीट लक्ष देऊन ऐका) : २३ ला झालेल्या वादिचा निकाल आमच्या २७ आणि तुमच्या २८ ला जाहीर केला म्हणून लेटलतीफ.

** च्या अर्थ क्र २ चं स्पष्टीकरण : अनेक कारणांमुळे मला ब्लॉगचा वादि २३ च्या ऐवजी २९ ला आहे असं उगाचंच वाटत होतं. हापिसातलं एक मोठं/महत्वाचं प्रोजेक्ट २९ ला संपणार होतं, माझ्या एका कलिगचा २९ हा शेवटचा दिवस होता (आहे) आणि ........ माझा ट्रेनचा पास २९ ला संपणार आहे. ट्रेनच्या पासाचा आणि वादि विसरण्याचा खरं तर अर्थाअर्थी किंवा सरळ लावता येण्याजोगा संबंध नाही. कदाचित हास्यास्पदच वाटेल ते. त्यामुळे तो उलगडूनच सांगावा लागेल. काये की रोज सकाळी आणि संध्याकाळी पास त्या मशीनवर दाखवून स्टेशनात आणि स्टेशनातून बाहेर येताजाताना त्या डिस्प्लेवर 'लास्ट डे २९ ऑक्टोबर' असं मोठ्या आकारात दिसतं. समहाऊ त्याचं हॅमरिंग झालं असावं (आठवा हास्यास्पद).. थोडक्यात चहुबाजूंनी २९ च्या मार्‍यात सापडल्याने मला तोच दिवस ब्लॉगचा वादिही वाटायला लागला. गोबेल्सनीती म्हणतात ती हीच असावी बहुतेक. तर आज आता दोन दिवसच उरलेत म्हणून काहीतरी खरडून टाकायला म्हणून बसलो आणि सहज बघितलं तर पहिल्या पोस्टवर असलेल्या २३ ऑक्टोबर २००९ ने माझी विकेटच काढली. खरं तर हिटविकेटच. (गेल्या वर्षी २३ ऑक्टोबर २९ ऑक्टोबरला आली होती का हो?)

--------

परवा 'घर हरवलेली माणसं' वाचताना वपुंच्या या बाणेदार ओळी वाचून ब्लॉगच्या पहिल्या वादिच्या पोस्टीचं 'असं' आत्मचरित्र होऊ द्यायचं नाही किंवा कदाचित पोस्टच टाकायची नाही असंही मनात आलं होतं. पण वपुंनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं नसलं तरी अन्य कोणीतरी त्यांचं चरित्र लिहावं एवढे ते महान होतेच. पण आमच्या ब्लॉगची आत्मचरित्ररूपी प्रथम वादि-पोस्ट आम्ही लिहिली नाही तर ते कोणाला कळायचंही नाही त्यामुळे त्यातल्या त्यात हळू आवाजात हा 'टाहो' फोडायचा प्रयत्न केलाय. फार कर्कश नाही झालाय ना?

Thursday, October 21, 2010

बा धनांधांनो... !!

रात्रीचा प्रसाद, आरती वगैरे सगळं आवरून झाल्यावर विठू नुकताच आडवा पडला होता. दिवसभरातले निरनिराळे प्रसंग डोळ्यासमोर तरळून जात होते. रोजच्यासारखंच आजही गरीब, आगतिक, आशाळभूत, खचलेल्या, खंगलेल्या, प्रामाणिक, दांभिक, निर्लज्ज, कोडग्या, मिजासखोर अशा अनेक चेहर्‍यांची दर्शनं झाली होती. त्यातले किती खरे-किती खोटे, किती सच्चे-किती उगाच आलेले हे आपल्याला आजतरी ओळखता आलंय का हे त्याला नीटसं कळत नव्हतं. काहीच सांगता येत नाही या माणूसजातीचं. कधी कसे दिसतील, कसे वागतील, काय करतील कोणीच सांगू शकणार नाही. विचारांची गाडी घरंगळत घरंगळत आपल्या नेहमीच्या विषयांवर आलेली पाहून त्याला स्वतःशीच हसू आलं. अचानक दार वाजल्याचा आवाज आला. बंद झालेल्या देवळात आत्ता यावेळी कोण येणार याची कल्पना न आल्याने विठूने किंचित उठत "कोण आहे?" अशी हाळी दिली.

"मी बाबा" नेहमीचा परिचित असा धीरगंभीर पण किंचित थकलेला आवाज ऐकून विठूने पटकन दार उघडलं.

"अरे बाबा तू? ये रे आत ये.. आत्ता यावेळी कसा आलास?"

"जरा महत्वाचं बोलायचं होतं रे तुझ्याशी. बरेच दिवस विचार करत होतो. पण आज ती महत्वाची गोष्ट ऐकली आणि ठरवलं की आजच जायचं तुझ्याकडे. म्हणून उठलो आणि तडक आलो तर तू हा असा दरवाजातच प्रश्नांची सरबत्ती करतोयस"

"हा हा हा. चुकलो बाबा. ये आत ये. बस इथे निवांत."

पाणी वगैरे पिऊन थोडी तरतरी आल्यावर बाबा म्हणाला,

"कसा आहेस रे विठू?"

"मी मजेत रे. तू बोल. आणि उभा का आहेस अजून? बस की खाली.. हां आता इथे माझ्याकडे तुझ्या घरच्यासारखी सोन्याची सिंहासनं नाहीत बाबा. मी स्वतः विटेवर उभा राहणारा साधा दगडाचा देव. मी कुठून आणू सोन्याचं सिंहासन? पण म्हणून तू बसणारच नसशील तर मग राहिलं. उभा रहा बापडा. मी मात्र बसतो." विठू मिश्कीलपणे म्हणाला. तो मिश्किलपणा कळला नसल्याप्रमाणे किंवा कळून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्यागत बाबाच्या चेहर्‍यावर एक किंचित वेदना उमटली.

"अरे बाबा.. एवढा चौकोनी चेहरा करायला काय झालं? मी गंमत करत होतो." विठू.

"अरे हो. मी काही रागावलो बिगावलो नाहीये. पण खरं सांगायचं तर मला त्याविषयीच बोलायचं आहे तुझ्याशी."

"बोल ना काय झालं?"

"मला एक मदत हवीये तुझ्याकडून"

"मदत? माझ्याकडून? काय हवंय बोल."

"म्म्म्म.. थेटच विचारतो कसा."

"बोल ना"

"मला सांग तू तुझ्या भक्तांना बुद्धी कसा देतोस?"

"काय? म्हणजे? कसली बुद्धी?"

"हेच रे वागण्या-बोलण्याची वगैरे."

"ए बाबा. मला काही कळत नाहीये. काय ते स्पष्ट बोल ना जरा"

"तुला आठवतं मी शिर्डीत बसायचो ती शिळा?"

"हम्म. तिचं काय?"

"आज तीही गेली. तीही सोडली नाही या लोकांनी. तिलाही मढवली  सोन्याने. आणि आता सोन्याने मढवलीये म्हणून कडीकुलुपात बंदही करून टाकली. सोन्याचे दागदागिने झाले, हार झाले, मुकुट झाले, मेघडंबर्‍या झाल्या, सिंहासनं झाली, वस्तूंचे लिलाव झाले, प्रसादाच्या किंमती लावून झाल्या, रांगांसाठी देणग्या घेऊन झाल्या, माझ्या पूजेसाठी दहापट भावाने रकमा उकळून झाल्या, भक्तनिवासाचे भव्य प्रासाद उभारून झाले.. सगळ्यासगळ्याचं बाजारीकरण करून झालं रे. सगळ्याला किंमतींची लेबलं लावून झाली. आता माझ्या अंगावरच्या वस्तू संपल्या म्हणून मग आजूबाजूच्या गोष्टी यांच्या तावडीत सापडल्यात. आज ही शिळा मढवलीये सोन्याने उद्या तर मला वाटतं हे लोक मलाच पूर्ण सोन्यात मढवतील. मढवतील कशाला सोन्यातच घडवतील. सोन्याची मूर्ती, सोन्याचं सिंहासन आणि असंच सगळं सगळं सोन्याचं.. माझं नक्की त्या मिडास राजासारखं होणार आहे. दिसेल तिथे सोनं.. पण अर्थात मिडास राजाची ती अवस्था निदान त्याच्या कर्माने तरी झाली होती. पण माझी ही अवस्था मात्र माझ्या या स्वतःला माझा भक्त म्हणवून घेणार्‍या स्वघोषित भाविकांच्या आततायीपणामुळे, श्रीमंतीच्या आणि ती मांडण्याच्या फसव्या भ्रामक हव्यासापायी होणार आहे. घुसमटतो रे जीव. मी कधी काही मागितलंय का यांच्याकडे? मला सोन्याने मढवा, चांदीने सजवा असं कधीतरी सांगितलंय का? मी स्वतः एका साध्या कफनीवर आणि फाटक्या धोतरात राहणारा माणूस. आयुष्यात कधी सोन्याचांदीला शिवलो सुद्धा नाही. पण माझ्यामागे यांनी माझे धिंडवडे आरंभलेत रे."

विठू गहिवरला. बाबाला यावेळी इथवर आलेलं पाहिलं तेव्हाच असं काहीसं ऐकायला मिळणार याची खात्री होती तरीही गहिवरला. वाईट वाटलं त्याला. विषण्ण झाला तोही.

बाबा बोलतच होता. "आज तुझ्या गाभार्‍याबद्दलची बातमी  वाचली आणि कोण आनंद झाला. खूप अभिमान वाटला तुझा म्हणून म्हटलं प्रत्यक्ष भेटूनच विचारावं की तुझ्या भक्तांना बुद्धी देतोस तरी कसा? समजावतोस कसा त्यांना?"

विठू खिन्नपणे हसला.

"का हसलास रे?"

"काही नाही रे. तू विचारलास तोच प्रश्न विचारायला माझ्याकडे आत्तापर्यंत अनेकजण येऊन गेले. बालाजी, दगडू गणेश, सिद्धिविनायक आणि अजूनही अनेक स्नेही. त्या सगळ्यांना सांगितलं तेच तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. कोणाला बुद्धी बिद्धी देणारे आपण कोणी नाही. ज्याचं त्याला कळत असतं. पापं करा, काळे पैसे कमवा आणि मग ते असे सोन्यानाण्याच्या रुपात वाहा देवाच्या पायावर. काळ्या पैशाच्या झंझटी मिटल्या आणि पुन्हा ढीगभर पुण्य गाठीशी मारल्याचं फसवं का होईना समाधान. एक देतो म्हणून दुसरा, दुसरा देतो म्हणून तिसरा... म्हणून सातवा.... शंभरावा.... हजारावा.. पंचवीस लाखावा... चालूच सतत. अनादि कालापासून चालू आहे आणि अनंतापर्यंत चालू राहील.. आणि वर पुन्हा देवाने सांगितलं, दृष्टांत दिला, दर्शन दिलं, कौल लागला, नवसाला पावला असे आपल्याच नावाचे उलटे ढोल बडवायचे. हे आपण शिकवतो त्यांना? ही बुद्धी आपण देतो? अजिबात नाही.. मुळीच नाही.. सगळा खोटेपणा आहे रे. म्हणून म्हणतो बुद्धी बिद्धी देणारे आपण कोणी नाही रे. किंबहुना कोणीच कोणाला कसलीच बुद्धी वगैरे देऊ शकत नाही. ते त्यांच्या मनाप्रमाणे वागत असतात. तोंडी लावायला फक्त आपलं नाव. करायचं तेच करतात. किंबहुना करू नये तेच करतात."

बाबा अवाक होऊन ऐकत होता.

"तुला खरं सांगू? चूक त्यांची नाही चूक आपलीच. खूप मोठी चूक."

"आपली चूक? म्हणजे? मी नाही समजलो."

"हो आपलीच चूक. आपण त्यांच्या हृदयात नांदत होतो तोवर ठीक होतं. त्यांनी आपल्याला त्यांच्या हृदयातून काढून देव्हार्‍यात बसवलं, गाभार्‍यात स्थानापन्न केलं तेव्हाच आपण त्यांना रोखायला हवं होतं. आपल्यासमोर पहिला नारळ फोडला गेला, आपल्या अंगावर पहिलं वस्त्र चढवलं गेलं, पहिले अंगारे धुपारे केले गेले, समोरच्या पेटीत पहिला पैसा पडला किंबहुना ती पेटी तिथे ठेवली गेली त्या वेळीच, त्या प्रत्येक वेळी त्यांना तिथल्या तिथे रोखलं असतं, अडवलं असतं तर आज ही वेळ आली नसती. ही सारी फसव्या श्रीमंतीची, भ्रामक वैभवाची आरास रोजच्यारोज पाहायची आणि सगळं बाबाच्या/देवाच्या/महाराजांच्या इच्छेने, कृपेने चाललंय हे वर ऐकून घ्यायचं !! हूं .. तू मारे माझं अभिनंदन करायला आला आहेस पण तुला एक सांगतो बाबा.. आज माझा गाभारा सोन्याचा नाहीये म्हणून उद्याही तो नसेल याची मी खात्री देऊ शकत नाही रे. तू जात्यात आहेस आणि मी सुपात.. इतकाच काय तो फरक."

एक मोठ्ठा उसासा सोडून बाबा हताशपणे उठला.

"निघालास? कंटाळलास का रे माझ्या बडबडीला?"

"नाही रे. कंटाळलो नाही. कंटाळतोय कशाला.. तू खरं तेच बोलतोयस. पण तरीही मला आता गेलं पाहिजे. काकड आरतीची वेळ होत आली. गाभारा उघडायच्या आत आतमध्ये जाऊन बसलं पाहिजे. नेमका रस्त्याने चालत जाताना कोणाला दिसलो तर तो रस्ताही सोन्याने मढवून ठेवतील. म्हणून त्याच्या आत पोचलं पाहिजे रे... त्याच्या आत पोचलं पाहिजे."


*****

तळटीप : माफी मागत नाही कारण कुठल्याही देवाचा, देवळाचा, धर्माचा, देवस्थानाचा, भक्तांचा अपमान करण्याचा अजिबात उद्देश नाही. तसंच मी नास्तिकही नाही पण म्हणून स्वतःला आस्तिक म्हणवणारे करतात ते सगळंच योग्य आहे असं मानणाराही नाही त्यामुळे....... !

Thursday, October 7, 2010

'मुव्हमेंट' खतरे मे !!!!!

जनाब राहुलमियां गांधी,

अस्सलाम वालेकुम. यहावहा मुडेबिना सरळ मतलबकीच बात करतो. कालच्या अखबारमध्ये तुमचे खयालात वाचले. और हाय. बहोत बुरा लगा. बहोत बहोत बुरा लगा. दिल को ठेच पहुची. हम आपको अपना समझते थे. तुम्ही आमचेच होतात. आमच्यातलेच होतात. निदान आम्ही तरी असेच सोचत होतो. पर हाय. वो एक ख्वाबही था. एक सपना था. पण हे तुम्ही बोललात? "आरएसएस आणि सिमीमध्ये बिलकुल फर्क नाही" ही तुमची जबानी आहे? यकीन नाही होत क्षणभर. पण अखबारवाले म्हणतात म्हणजे सच असेल. पक्का सच असेल. जे काय असेल ते असो पर हम तो इतनाही कहेंगे के आपको 'मुव्हमेंट' समझीही नही. 'मुव्हमेंट' चे इरादे, 'पाक' खयालात कधी तुमच्यापर्यंत पोचलेच नाहीत. तुम्ही सिर्फ कहनेके लिये आमच्यात होतात, आमच्यातले होतात. पण या अल्लाह, तुम्हाला 'मुव्हमेंट' कधीच कळली नाही. काय हे? कळली नव्हती, समजली नव्हती, ध्यानमध्ये आली नव्हती तर निदान एक बार आम्हाला विचारायचंत तरी. एक दफा तो पुछा होता. 'मुव्हमेंट' ची महती तुम्हाला समजावून सांगायला आम्ही काहीही केलं असतं. कितीही वक्त जाया झाला असता तरी बेहत्तर. 'इस्लाम खतरे मे' असताना जिहादाचा लढा लढणारा, त्याचं महत्व सांगणारा इतका 'पाक' ग्रुप दुसरा कुठला ठाऊक आहे का तुम्हाला? क्या आप जानते भी है?? त्या अर्ध्या चड्डीवाल्या काफरांशी आमची तुलना? हो आता 'आमची' च म्हणणार. 'आपली' नाही म्हणणार. तुम्ही आता आमच्यातले राहिलाच नाहीत राहुलमियां.. आणि एवढं झाल्यावरही एका रिपोर्टरने तुमसे पुछा था के "आपको क्या वाकई असंच म्हणायचं आहे? 'मुव्हमेंट' वर बंदी आहे, काफरांच्या संघावर बंदी नही है. फिर भी वो एक कैसे?"... विचारलं होतं ना असं? पुछा था के नही? और आपने क्या कहा.. आपने कहा "मुझे उससे कोई लेना देना नही.".. या अल्लाह.. तुम्हाला लेना देना नसेल. पण तुम्ही गलत बोलता आहात आणि तुमच्या त्या म्हणण्यामुळे कौमच्या नजरेत, आमच्या कौमच्या नजरेत 'मुव्हमेंट'ची इमेज खराब होते आहे हे तुमच्या दिमागमध्ये तरी येतंय का? आणि त्यामुळेच तुम्हाला लेना-देना असलं-नसलं तरी आम्हाला लेना-देना आहे. आप गलत हो आणि तुमची गलती तुम्हाला स्पष्टपणे दाखवणं ये मेरा काम है. मेरा इमान है. मागे एकदा तुम्ही "हा हा क्यो नही? कोई भी मुसलमान शक्स प्रधानमंत्री बन सकता है, जरूर बन सकता है, हर्ज ही क्या है उसमे?" असं बोलून आमचं दिल जितलं होतंत. बाप, दादी, परदादा आणि त्याचा तो पंचेवाला मित्र या सगळ्यांप्रमाणे हा छोकरा पण आपलं आणि फक्त आपलंच भलं करणार इस बातका हमे यकीन हो गया. दिल खुश हो गया था. पर हमे क्या पता था के यही छोकरा एक दिन हमारी मुव्हमेंट को काफारोंके संघसे जोडेगा. आर एस एस शी आमची तुलना?? या अल्लाह. या खुदा. बडा ही बदतमीज लौंडा है ये. हमारा तो खून खौल रहा है. पर 'जो हुआ सो हुआ' असं म्हणून हम चूप नही रहेंगे. आणि त्यासाठीच खास हे खत लिहायला घेतलं. आम्ही म्हणजे संघ का नाही आणि संघ म्हणजे आम्ही का नाही आहोत याची एक भलीमोठी यादीच आम्ही तुम्हाला देणार आहोत.

मुव्हमेंट म्हणजे आरएसएस नाही आणि आरएसएस म्हणजे मुव्हमेंट नाही क्योंके

१. मुव्हमेंट सिर्फ और सिर्फ इस्लामसाठी काम करते. (तुमच्या आरएसएसला इस्लाम आणि जिहाद म्हणजे काय ये मालूम भी है?)

२. मुव्हमेंटके लिये जिहादसे बडा और कुछ नही.

३. इंडियाके मुस्लीमोंको पश्चिमी दुनियाके चाकाचौंधसे बल्की इंडियासेभी दूर रखके सिर्फ इस्लाम और अल्लाह येही उनके मसिहा है ये खयालात उनके दिलोदिमागमे पैदा करना, इस्लामके तौरतरीकोंसे उन्हे वाकीफ करना और काफरोंके साये से भी उन्हे दूर रखना ये मुव्हमेंटका सबसे बडा एम है. (क्या आरएसएस ये कर सकता है?)

४. इंडियन सरकारने घाबरून जाऊन मुव्हमेंटवर बंदीही आणली होती.अर्थात कोर्टाच्या निर्णयाने घाबरून जाऊन वो उठानी भी पडी थी. (हा. आरएसएसभी तुम्हारी दादीने एक दफा बंद करवाया था लेकिन उसका मतलब ये तो नही की वो हमारे बराबरी के हो गए !!)

५. आमच्या मुव्हमेंटचं स्लोगन तुम्ही कधी वाचलं आहेत का? "Allah is our Lord, the Quran is our constitution, Mohammed is our leader, Jihad is our way". (तुमच्या त्या आरएसएसच्या संस्कृत की कुठल्याशा भाषेत लिहीलेल्या, इंडियाला खुदा मानणार्‍या गाण्यापेक्षा हे किती महान आहे पाहिलंत तरी का?)

६. मुव्हमेंट का ये मानना है के हुजूर-ए-आला लादेन साहेब हे इस्लामचं एक सबसे अहम उदाहरण आहेत. ते एक सच्चा मुसलमान आहेत आणि प्रत्येक मुसलमानाने वैसे बननेकी ठान लेनी चाहिये. (तुमच्या त्या केशव टोपीवाल्या किंवा माधव दाढीवाल्याला आमच्या लादेन साहेबांची सर कशी येणार?)

७. मुव्हमेंटमध्ये काम करणारे कित्येक जवान प्रत्यक्ष लादेनसाहेबांच्या कैदाच्या फौजमधले आहेत. (तुमच्या आरएसएस मध्ये कोणाची तरी इतकी लायकी आहे का?)

८. मुव्हमेंट नुसती बकबक करत नही. मुव्हमेंटचं कार्य और करिष्मा खूप मोठा आहे. २००६ के बंबई ब्लास्टस, २००८ के अहमदाबाद, जयपूर, दिल्ली ब्लास्ट्स या सगळ्यात मुव्हमेंटने दिखाई हुई हिम्मत काबिले तारीफ है. (क्या कमसकम एक ब्लास्ट करनेकी भी तुम्हारे आरएसएसकी औकाद है?)

९. आरएसएस काफरोंके लिए काम करते. इंडियाला देवी, भगवान काय काय मानते. हमने पहलेकी कहा है के मुव्हमेंट एक अल्लाह छोडके किसीको खुदा नही मानती.

१०. तुम्हारे आरएसएसने इंडिया के फ्रीडम फाईटमेभी हिस्सा लिया था. (मुव्हमेंट तो तब पैदाभी नही हुई थी.)

११. तुमची आरएसएस 'वसुधैव कुटुंबकम्' असलं काहीतरी मानते. (मुव्हमेंटचा असल्या फालतू गोष्टींवर अजिबात विश्वास नाही.)

पढा आपने? वाचलंत हे सारं? आता तरी झाली तसल्ली? जी भर गया? आता तरी तुम्हाला कळलं असेलचं की आरएसएस आणि मुव्हमेंट किती अलग आहेत एकमेकांपेक्षा. सिमीची सर संघाला कशी येणार? अर्थात आधी आम्ही चिडलो होतो. बहोत गुस्सा झालो होतो. खफा झालो होतो तुमच्यावर. पण आता तुम्हाला खत लिहून समजावल्यावर आमचा गुस्सा कमी झालाय. कारण कितीही झालं तरी तुम्ही अजून लहान आहात. बच्चे आहात. मिडियाने 'युवराज युवराज' म्हणून डोक्यावर बसवल्याने तुम्हालाही ते खरं वाटायला लागलं आहे. लोग आपके सामने झुकते है तब आप समजते है के वो राहुल के सामने झुकते है. पण ते राहुलसमोर नही तर राहुल 'गांधी' समोर झुकतात हे तुम्ही विसरताय. जाने दो. तुमच्या बालिशपणावर कसलं रागवायचं? तिकडे कसलं लक्ष द्यायचं? तुमची पार्टी आमच्यासाठी सगळं करते आहे, सगळं करेल. आम्हाला मॅडमवर पूर्ण यकीन आहे. तेव्हा तुम्ही तुमचं काम करत रहा बरं. उगाच काहीतरी छोट्या बच्चासारखं बडबडू नका. तुम्ही कुठल्या त्या दुष्काळग्रस्त, खुदकुशी करणार्‍या शेतकर्‍यांच्या घरातून जाऊन राहण्याची नाटकं करा, किंवा मग त्या शेतात काम करणार्‍या लोकांबरोबर कामं करण्याची नाटकं करा किंवा मग बंबईवर 'आम्ही' केलेल्या हल्ल्यात लढणारे कमांडोज कसे बिहारी होते ते तुमच्या भाषणात ठासून सांगा. तेवढंचं करा. जेवढं जमतंय तेवढं करावं. जो काम अपने बस मे नही उसमे क्यो टांग अडाते हो राहुल मियां? पछताओगे. और क्या कहना !!

आपला,
मीर मसूद मुल्ला मोहम्मद हकीम
प्रेसिडंट, स्टूडंटस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया

और एक बात : मियां अफझल गुरु साहिब और सरताज-ए-जिहाद कसाब के बारे मे अपनी जो बातचीत हुई थी उसे ना भुले. उन बातोंका और इस खत का कोई ताल्लुक नही. शुक्रिया !!!

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...