"लेडीज अँड जंटलमन, प्लीज वेलकम.. मेरा दोस्त, मेरा भाई, जोसेफ मॅस्कार्हेनSSSस"
बास रे बास. हे वाक्य ऐकलं आणि मी जोरजोरात टाळ्या वाजवल्या नाहीत किंवा "यस्स यस्स" करत मुठ हवेत उडवली नाही किंवा आनंदातिशयाने उठून उभा राहिलो नाही असं कधीच झालं नाही. पहिल्यांदा 'रॉक ऑन' बघताना तर या जोसेफ मॅस्कार्हेनसच्या शेवटच्या प्रसंगातल्या स्टेजवरच्या आगमनानंतर आणि आदि श्रॉफने खणखणीत आवाजात केलेल्या त्याच्या स्वागतानंतर मी अक्षरशः नाचलो होतो.
त्यानंतर गंभीर चेहर्याचा, लांबलचक केस मोकळे सोडलेला, खांद्याला गिटार अडकवलेला जोसेफ स्टेजवर प्रवेश करतो आणि पुढची पाच-सात मिनिटं 'सिंदबाद द सेलर' सादर करत नाचत, गात, ओरडत, उड्या मारत, थिरकत हे दोघे सभोवतालचं वातावरण अक्षरशः भारून टाकतात. त्यानंतर अचानक जोसेफच्या पत्नी आणि मुलाला स्टेजच्या एका कोपर्यातून प्रवेशताना बघून आदि हळूच जोसेफच्या कानात पुटपुटतो आणि माईक जोसेफच्या हातात देतो. जोसेफ त्या दोघांकडे बघतो आणि किंचित स्मित करत शांत, संयत 'तुम हो तो' चं रॉक व्हर्जन गायला लागतो. आवाज, संगीत चढत जात जात 'तुम हो तो' कधी 'सिंदबाद द सेलर' शी एकरूप होतं हे कळतही नाही.
एवढा दिमाखदार, उत्साही, सकारात्मक शेवट असलेल्या 'रॉक ऑन' मधे संपूर्ण चित्रपटभरच या उस्फुर्ततेचे, उत्साहाने सळसळणार्या, रसरसणार्या तरूणाईचे अनेक छोटे छोटे प्रसंग विखुरलेले आढळतात. हा चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या न बघण्याचा कपाळकरंटेपणा मी केला होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे एकूण जाहिराती, ट्रेलर्स, त्या चौघांचे गेटप, गाणी वगैरे बघून मला हा चित्रपट म्हणजे बॉलिवूडी रॉकच्या नावाखाली चाललेला काहीतरी विचित्र प्रकार असेल असं उगाचंच वाटलं होतं. त्यामुळे अंमळ उशिरानेच म्हणजे रिलीज झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी हा चित्रपट बघायचा योग आला किंबहुना माझ्या एका मित्राला तो काही करून बघायचा असल्याने त्याच्याबरोबर अपघातानेच बघितला गेला. आणि बघितल्यावर लक्षात आलं की कसल्या अफलातून अनुभवला आपण मुकणार होतो.
नावात रॉक असलं तरीही रूढार्थाने फक्त रॉकला वाहिलेला हा चित्रपट नाही. सॉरी.. हे वाक्य सिनेमाच्या प्रिव्ह्यूमधे लिहितात तसं झालंय. म्हणजे येत्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि एखाद्या समीक्षकाने चित्रपटाचा प्रि-रिलीज शो बघून आपल्या ब्लॉगवर लिहावं तसं. खरं तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर २-३ वर्षांनी त्यावर काही लिहिताना ही अशा प्रकारची वाक्यं लिहिली नाहीत तरी चालतं. कारण रॉक ऑन सारखा चित्रपट आवडला नाही (यावर मतभेद होऊ शकतात, म्हणून सेफ गेम म्हणून)/ पाहिला नाही असा माणूस विरळाच.. पण तरीही मुद्दा तसाच महत्वाचा असल्याने प्रि-रिलीज टाईप वाक्य तसंच लिहिलं. तर रॉक संगीत या पैलूएवढेच अन्य दोन ठळक महत्वाचे पैलू या चित्रपटात आहेत. एक म्हणजे चित्रपट पाहताना आपल्याला नोस्टॅल्जिक व्हायला भाग पाडणारी मित्रामित्रांमधली हलकीफुलकी पण लाईव्हली दृश्यं आणि दुसरं म्हणजे चित्रपटाच्या टॅगलाईनमधे थेट दिला जाणारा आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा 'लिव्ह युअर ड्रीम' हा ठळक मेसेज. चित्रपटांमधल्या संदेशांनी जग बदलत नसतं असं कोणीही कितीही म्हणालं आणि क्षणभर का होईना त्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं तरीही मला अजूनही संदेश देणारे चित्रपटच आवडतात. म्हणजे देशप्रेम, भ्रष्टाचारमुक्ती असे मोठमोठे संदेशच असावेत असं काही नाही किंबहुना अनेकदा हे असले संदेश बटबटीत आणि उथळपणे दाखवले गेल्याने त्यातली परिणामकारकता कमी होऊन उलट ते हास्यास्पदच वाटायला लागतात. याउलट अनेकदा हे 'लिव्ह युअर ड्रीम' सारखे साधे, सरळ संदेश पोकळ देशप्रेमाच्या 'एन्नाराय' गप्पा ठोकणार्या संदेशांपेक्षा अधिक जवळचे वाटतात.
भन्नाट शब्द आणि रँडम सीन्सची भलतीच देखणी सरमिसळ केलेलं उल्हसित टायटल सॉंग.. एकत्र जमलेला, मजामस्ती करणारा मित्रमैत्रिणींचा ग्रुप, गाणी, गिटार, मस्करी, बाईकवरच्या शर्यती, समोरच्या जलाशयात धावत जाऊन मारलेल्या उड्या या सगळ्यासगळ्यांत एक जिवंतपणा आहे. ओरिजिनॅलिटी आहे. टायटल सॉंग, त्यातलं एकूण एक दृश्य आपल्याला भूतकाळात घेऊन जातं. प्रत्येक प्रसंग कुठूनही कसाही आपल्याच कॉलेजजीवनातल्या कुठल्यातरी प्रसंगाशी नकळत आणि तितकाच सहज जोडला जातो, जोडता येतो. प्रत्येक फ्रेम एकतरी जुना प्रसंग जिवंत करते. प्रत्येक गाणं एकातरी लाडक्या मित्राची/मैत्रिणीची आठवण करून देतेच देते.
रॉक ऑन बघून झाल्या झाल्या मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना मेल करून या चित्रपटाबद्दल कळवलं होतं.
"Aatta ch just "Rock On" baghitala.. I dont know whether u guys have watched it or not.. but i loved it and regretted why i didnt watch it earlier.. it is an awesome movie.. felt very nostalgic.. mala tumachi jaam aathavan yayala lagali.. the days, evenings, nights, midnights (and rare mornings) together.. the time we spent together, the fun, masti and all.. u shud watch it.."
आणि एका मैत्रिणीचं लगेच उत्तर आलं.
"ya,when i saw it, i also felt the sameway.... that night only i told x "mi ice-cream gatarat fekale to kissa" & he also shared some of the funny kissa's from his frnd circle.
yesterday only x ,Myself & y we met & spoke abt those "best days of our life" & also discussed abt so many people & now wht they do & all... we too missed u a lot!!"
याहून काही लिहीत नाही..
असो... गंमत म्हणजे या चित्रपटात सगळे साईडहिरो आहेत. रूढार्थाने हिरो कोणीच नाही. श्रेयनामावली दाखवताना सगळी नावं एकत्र दाखवता येत नसल्याने ती पुढे मागे दाखवली गेली इतकंच. आपल्या हातात गिटार आहे म्हणून ते विचित्र अंगविक्षेप करूनच वाजवलं पाहिजे या दशकानुदशकांच्या कल्पनेला मुठमाती देणारा वास्तव (हिरो नव्हे तर) साईडहिरो यात आहे. शांतपणे, चेहर्यावर मंद स्मित असणारी व्यक्तीही गिटारिस्ट असू शकते किंबहुना गिटारिस्ट हा हिरो नसून साईडहिरो असू शकतो (आणि त्याला खरोखरीचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक मिळू शकतं) आणि गिटार हे पोरी पटवण्यासाठी न वापरता छंद, आवड, करियर म्हणूनही वाजवता येतं असे (बॉलीवूडच्या) प्रस्थापित नियमांना छेद देणारे अनेक प्रकार यात आहेत. तसंच पार्श्वगायनासाठी भारदस्त किंवा हाय पीचचा आवाज असणारे गायक अत्यावश्यक आहेत याही लोकप्रिय समजाला किंचित किनरा पण प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला आवाज वापरून जबरदस्त छेद देण्याचं कामही या चित्रपटाने केलंय. थोडक्यात नियमाला अपवाद असणारे असे अनेक प्रकार प्रचंड ताकदीने आणि कल्पकतेने वापरून त्यांना रूढ नियमांचा दर्जा मिळू शकेल इतकी सुंदर कलाकृती निर्माण करण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी ठरला आहे.
वर सांगितलेला नोस्टॅल्जियावाला भाग संपेसंपेपर्यंत दुसरा तेवढाच इंटरेस्टिंग आणि महत्वाचा प्रकार सुरु होतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं नाव 'लिव्ह युअर ड्रीम'.. छोट्या कारणावरून मतभेद होऊन, गैरसमज होऊन, संगीतापासून, ग्रुपपासून, आपल्या 'मॅजिक'बँड पासून, आपल्या स्वप्नापासून, एकमेकांपासून दुरावलेले आणि आपापल्या उद्योगात रमलेले (निदान रमल्याची बतावणी करणारे) पण आतल्या आत कुढणारे चार मित्र हातातली सगळी काम, सगळे उद्योगधंदे, सगळे गैरसमज आणि अशाच छोट्या-मोठ्या अडचणी दूर सारून सळसळत्या तारुण्यात पाहिलेलं स्वप्न पुन्हा एकदा पेलायला तयार होतात ही कल्पना ऐकायला साधी वाटली तरी दिग्दर्शकाने ती ज्या काही ओघवत्या शैलीत मांडली आहे तिला तोडच नाही. चित्रपटाच्या मध्यापर्यंत विनाकारण आपापले इगोज जपत राहणारे हे चौघे कालांतराने एक होतात आणि आपल्या जुन्या स्वप्नाच्या शोधात, ते सत्यात उतरवण्याचा ठाम निश्चय करून, अनेक अडचणींना तोंड देत देत, प्रसंगी जीवघेण्या रोगाची पर्वा न करता आपलं उद्दिष्ट कसं गाठतात याचा प्रवास म्हणजे चित्रपटाचा उत्तरार्ध. पण दोन्हीही तेवढेच सशक्त आणि दर्जेदार. कित्येकदा, वेगळं होण्यापूर्वीचा तरुण मित्रांचा, धम्माल मजेचा नोस्टॅल्जिक भाग खमंग जमलाय की अचानक गृहस्थाश्रमातून बाहेर पडून आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रचंड धडपड करणार्या, निरनिराळ्या अडचणींना तोंड देत देत शेवटी आपलं ध्येय गाठणार्या मध्यमवयीन काका लोकांचा उत्तरार्ध जास्त चमचमीत झालाय अशा कोड्यात आपण पडतो.
पण आपल्यापैकी प्रत्येकानेच अगदी तीच नाही पण बरीचशी तसीच मजा, गप्पाटप्पा, जागरणं, गाणी, पिकनिक्स, ट्रेक्स आपापल्या ग्रुप बरोबर केली असल्याने पूर्वार्ध तर आवडतोच पण खूपच प्रॉमिसिंग, पॉझिटिव्ह, आशादायी असल्याने उत्तरार्धही तेवढाच आवडतो. पण मला उत्तरार्ध आवडण्याचं अजून एक कारण आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चित्रपटातच्या उत्तरार्धात घडतं तसं आपल्याही आयुष्यात घडावं, लहानपणी, तरुणपणी किंवा अगदी काही वर्षांपूर्वी बघितलेली आपलीही काही छोटी स्वप्नं पुरी व्हावीत अशी सुप्त इच्छा असतेच परंतु ती स्वप्नं पूर्ण होणार नाहीत याची जवळपास खात्रीही असल्याने प्रत्यक्षात नाही तर निदान पडद्यावर तरी ती पूर्ण झालेली बघताना मला प्रचंड आनंद होतो !! मला वाटतं 'रॉक ऑन' एवढा भिडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे. 'लिव्ह युअर ड्रीम' चा स्वैर अनुवाद करायचा झाल्यास मी तरी 'कुठलंही स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटा.... अक्षरशः कुठल्याही वयात !!' असा करीन.
रॉकऑन प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी त्यावर लिहिण्याचं कारण म्हणजे ....... म्म्म्म कारण काही नाही. परवा पुन्हा एकदा रॉक ऑन बघितला. गेल्यावेळेस पेक्षा अजून आवडला. लिहावसं वाटलं. हेच कारण.. आंबरसाच्या वाटीत पाची बोटं बुडवून ती चाटून खाताना मिळणाऱ्या सुखाचं काय कारण? सचिनचं शतक झाल्यावर आनंदाने उर भरून येतो याचं काय कारण? काहीकाही आनंदांची कारणं शोधायची नसतात. फक्त मनावर होणारं त्यांचं गारुड अनुभवायचं असतं !! बस्स... !!
* हे गारुड यापूर्वी जालरंग प्रकाशनाच्या दीपज्योती इ-दीपावली अंकात करून झालेलं आहे.




