Sunday, May 1, 2011

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ५

माझ्या खादाडीच्या प्रयोगांचे पहिले चार भाग वाचल्यानंतर मला अनेक लोकांच्या तक्रार वजा प्रतिक्रियांना (ज्यात प्रतिक्रिया वजा आणि तक्रारीच अधिक होत्या) तोंड द्यावं लागलं. उदा. पहिला  भाग वाचल्यावर काही जण म्हणाले की "कसली रे ती गांडूळांची डिश.. काय तर म्हणे मॅगी.. शी.. असल्या पोस्ट्स लिहवतात आणि असल्या डिशेस (म्हणजे पदार्थ, ताटल्या नव्हे) करवतात तरी कशा रे?" किंवा दुसर्‍या  भागानंतर काही प्रतिक्रिया होत्या की "पोराला घास भरवण्याचे हे प्रयोग आमच्या दृष्टीने सध्या तरी निरुपयोगी आहेत. जरा काहीतरी धड लिहीत जा किंवा नावं तरी धड देत जा पोस्टला (माझ्या पोस्टला लेख म्हणण्याचं मी अलिकडे आणि वाचकांनी फार पूर्वीपासूनच सोडून दिलंय.)" किंवा तिसर्‍या  भागानंतर काहींनी तक्रार मांडली की "कोण खातं रे हे असले पास्ते बिस्ते? जरा काहीतरी चांगली रेसिपी द्यायची सोडून ही कसली थेरं?" आणि चौथ्या  भागानंतरच्या काही कमेंट्स अशा आल्या की "आमच्याकडे आम्ही बोर्नव्हिटा अजिबात आणत नाही. कंप्लान/हॉर्लीक्स आणतो आणि कंप्लान/हॉर्लीक्स बरोबर ही डिश एकदम फ्लॉप आहे (हो ती आहेच. उगाच सत्य का नाकारा?)..."

या एवढ्या तक्रारी वाचून मला खरं तर खूप आनंद झाला. म्हणजे कसं की शिव्या घालण्यासाठी का होईना पण अजूनही लोक ब्लॉग वाचतायत तर. पण ज्याप्रमाणे त्या कुठल्याशा एका महान सुविचारातली मोठी लोकं त्यांना मारलेल्या दगडांचं रुपांतर माईलस्टोन्समध्ये करतात तसं मीही त्या शिव्यांचं रुपांतर (जरा तरी) बर्‍या पोस्टांमधे करायचं ठरवलं. ज्याप्रमाणे सचिन ऑफला आलेल्या भन्नाट चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा इम्प्रोव्हाईज्ड शॉट मारतो (अर्थात तेंडूलकरच.. पिळगावकरला कधी बॅट तरी हातात धरलेली बघितली आहेत का? उग्गाच कायतरी..) तसंच मीही ही नवीन रेसिपी इम्प्रोव्हाईज्ड करायची ठरवली जिच्यात वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळया व्यक्ती आणि वेगवेगळी सामाजिक स्थानं (म्हणजे बगीचा, मॉल वगैरे नव्हे त्या व्यक्तींचीच सामाजिक स्थानं) यांना अनुसरून पाककृती द्यायचं ठरवलं.

अजून एक महत्वाची सूचना म्हणजे ही डिश फक्त विकांत स्पेश्य्य्यल ब्रेकफास्ट डिश आहे. उरलेल्या पाच दिवसांत ती कंप्लीट निकामी आहे याची आधीच नोंद घ्या. तर आपली आजची डिश आहे..............

जाऊदे नंतर सांगतो. आधी पूर्वतयारी करुया. आता इथे सामाजिक/घरगुती स्थानावरून इम्प्रोव्हायजेशन आहे बरं... नीट लक्ष द्या.

पहिली पायरी

१. रूममेट व्हर्शन

आपण : अबे, कुछ बनाते है यार.

रूमी : क्या बनाएगा बे तू?

आपण : बोल क्या बनाऊ?

रूमी : तू कुछ मत बना. पिछले बार ऑम्लेट जलाया था. याद है ना? मै ही बनाता हूँ.. बोल क्या खाएगा?

या स्टेपला सहा महिन्यांपूर्वीचं एखादं जळकं ऑम्लेट लक्षात ठेवणारा 'जंगली हाथीकी तरह याददाश' असलेला रूममेट दिल्याबद्दल देवाचे आणि ऑम्लेट जाळण्याच्या कौशल्याबद्दल आपले स्वतःचे (मनोमन) आभार मानावेत. असा रूममेट नसेल तर मग रूममेट बदलावा. डिश बदलली जाणार नाही !!!

आपण : कुछ खास नही यार.. चल सँडविचही बनाते है.

रूमी : ठीक है.

आपण : ओक्के. तू तयारी शुरू कर. मै ब्रेड लेके आता हूँ..

रूमी : अबे रुक. मै ही लाता हूँ..

आपण मागे एकदा शिळा (ळा ळा... ला नाही ळा) आणि नंतर एकदा व्हीटच्या ऐवजी व्हाईटब्रेड आणल्याचंही रूमीने लक्षात ठेवल्याबद्दल पुन्हा एकदा आभारप्रदर्शनाचे कार्यक्रम (हो.. अर्थात मनोमनच) पार पाडावेत.

आपण : ओके. ठीक है.. तब तक मै बाकी की तय्यारी करता हूँ.

आपल्या या वाक्यानंतर "आता यात तयारी करायला राहिलंय काय??" अशा अर्थाच्या रूमीच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्हांकडे साफ दुर्लक्ष करावं.

रूमी गेल्यावर सोफ्यावर देह टाकून, लोळत पडून मस्तपैकी चॅनल्स सर्फत रहावं. ('मस्तपैकी' हे लोळत साठी वापरलेलं विशेषण आहे चॅनल्ससाठी नव्हे.) घराजवळचा अण्णा/भैय्या/वाणी किती दूर आहे यावर तुमचं लोळणसुख अवलंबून आहे.

--------

२. गर्लफ्रेंड व्हर्शन (अर्थात लिव्ह-इन वालीच... (विकांतातल्या) भल्या पहाटे ब्रेकफास्टला बरोबर असणारी गर्लफ्रेंड ही लिव्ह-इनच असणार.. नाही का?)

हे व्हर्शन बघून हळहळ, निषेध आणि संताप व्यक्त करणार्‍या खादाड वाचकांसाठी मौलिक सल्ला : इम्प्रोव्हायजेशनच्या वचनात बांधलो गेलो असल्याने हे व्हर्शन देणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा

हळहळ व्यक्त करण्याऐवजी एल-आय जीएफ शोधा..
निषेध व्यक्त करण्याऐवजी एल-आय जीएफ शोधा ..
संताप व्यक्त करण्याऐवजी एल-आय जीएफ शोधा ..

यातलं काहीही न व्यक्त करणार्‍यांनी पुढे वाचा.

शनिवारी भल्या पहाटे १० च्या सुमारास आळोखेपिळोखे देत..

आपण : जानू, भूख लगी है... कुछ बनाऊ?

इथे हिंदी संवादांना पुरणाच्या पोळीत पुरण आणि पोळीला जेवढं महत्व असतं तेवढं महत्व आहे. कारण कुठल्याही गर्लफ्रेंडांना (खास करून लिव्ह-इन वाल्या) त्यांच्याशी दिल्लीभाषेत किंवा आंग्लभाषेत संवाद साधत त्या चित्रपटांतल्यासारखे (म्हणजे हिंदी किंवा इंग्रजी हो.. 'त्या' म्हटल्यावर कुठल्या काय विचारताय? सभ्य माणसांचा ब्लॉग आहे हा !!!) संवाद टाकल्याशिवाय आपला (म्हणजे त्यांचा) बॉयफ्रेंड रोम्यांटिक वगैरे वाटत नाही. तेव्हा हिंदी इज लय मस्ट... !

जानू उर्फ ती : ना जानू.. मैही बनाती हूँ.. बोलो क्या बनाऊँ?

सदरहु ठिकाणी "नही मै", "नही मै" करत आदमासे दहा मिनिटे लाडिक भांडणं करावीत. त्याने रोमान्सला रंग चढतो की नाही याची ग्यारंटी, कल्पना वगैरे नाही पण आपल्या डिशला मात्र चढतो. या ठिकाणी फोकस हा रोमान्सवर नसून डिशवर आहे याचा विसर पडू देऊ नये.

"नही मै", "नही मै" वाली लाडिक (आय क्नो, फार सबजेक्टीव्ह आहे हे) किणकिण संपली की मग हार पत्करल्याचा अभिनय करावा आणि म्हणावं "ठीके जान, तुम ही बनाओ"

जानू उर्फ ती : हां. पर क्या बनाऊ?

आपण : कुछ खास नही. बस सँडविचही बनाओ.

जानू उर्फ ती : बस? इतनाही?

जानू खरोखर विचारते आहे की तोंडदेखलं हे शोधण्याच्या भानगडीत न पडता फक्त "हां" असं म्हणावं.

"तो ठीक है. मै ब्रेड लेके आता हुँ" असं म्हणावं. असं म्हणून झाल्यावर खरोखरच तयारीला लागावं. कारण रूमीच्या वेळी वापरलेली युक्ती इथे चालत नाही. आपल्याला स्वतःला खरंच जाउन ब्रेड आणावा लागतो.

जाताना खिशात किमान ४५ रुपये आहेत याची खात्री करावी. नाही.. ब्रेडला २० रुपयेच लागतात हो पण उरलेल्या २५ रुपये आपल्या पदार्थाच्या यशस्वितेसाठीची गुंतवणूक आहे. उरलेल्या २५ रुपयांचा गुलाब घ्यावा. गुलाब मिळाला नाही तर कुठलंही एखादं विंग्रजी नावाचं म्हणजे डेलिया, झेनिया, ट्युलिप, क्याक्टस वगैरे वगैरे नावाचं... सॉरी सॉरी.. क्याक्टस नाही.. क्याक्टस सोडून कुठलंही चालेल... तर असं कुठलंही विंग्रजी नावाचं फुल घ्यावं.. यापैकीही कुठलं मिळालं नाही तर मग कुठलंही एखादं चांगलं टपोरं किंवा कुठलंही वासाचं (म्हणजे सुवासिक याअर्थी) फुल घ्यावं. फुलपुडी चालणार नाही !!

-------

बायको व्हर्शन : उपव्हर्शन १ (नवीन लग्न झालेले)

इथे 'उप' हे उपवर/उपवधू याअर्थी नसून उप-सुचना याअर्थी वापरण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यावी !! आपला 'उपवधू' काळ संपला आहे हे विसरू नये.

शनिवारी सकाळी अंदाजे साडेनवाच्या सुमारास पहिली मोठी जांभई द्यावी. त्या जांभईने बायको उठतेच.

ती (धडपडत उठत): बापरे.. किती वाजले? बराच उशीर झाला का?

आपण : अग मग काय झालं? शनिवार तर आहे आज. आणि काल जागरणही झालं ना.

या वाक्याला ती लाजते. ती लाजल्यानंतर पाळण्याचे जे काही संकेत/नियम  वगैरे वगैरे तुमच्यात असतील ते पाळून झाल्यावर तिला म्हणावं

आपण : चल. मस्त फ्रेश होऊ या आणि बाहेर जाऊन छानपैकी ब्रेकफास्ट करुया.

ती : छे. ब्रेकफास्टसाठी बाहेर कशाला? मी करते की पटकन काहीतरी. काय करू सांग.

आपण : अग नको. कशाला उगीच? चल ना बाहेरच जाऊ मस्त.

ती : नाही रे. बाहेर नको. मी घरीच करते पटकन काहीतरी.

या वाक्यानंतर आग्रह लगेच थांबवा. वरच्या "नही मै" वाल्या लाडिक किणकिणीप्रमाणे चार-सहा वेळा ताणलंत तर खिशाला मोठी चाट पडण्याचा संभव आहे. प्रत्येक स्टेप, संवादांची पुनरावृत्ती वगैरे बाबी अतिशय विचारपूर्वक योजलेल्या आहेत त्यामुळे वारंवार "का?" असं विचारू नये किंवा स्टेप्समधे आपल्या मनाप्रमाणे बदलही करू नयेत. संभाव्य परिणामांना आणि बिघडलेल्या डिशला आम्ही जवाबदार नाही.

आपण : बरं चल. घरीच कर काहीतरी साधंसोपं.

ती : काय करू?

आपण : म्म्म्म्म्म्म.. (साधारण चौदा सेकंदांच्या पॉज नंतर) चल सँडविच करुया पटकन. (इथे नेहमीच्या सवयीमुळे "करूया" च्या ऐवजी तोंडातून "कर" असं निघून गेल्याने डिश फसल्याची उदाहरणं आहेत. तेव्हा सांभाळून.. )

ती : ओक्के.. चालेल.. मी पटकन ब्रेड घेऊन येते खालून.

आपण : तू कशाला जातेस? तू थांब मीच घेऊन येतो.

ती : नको नको. मी आणते रे.

आपण : चल नाहीतर दोघेही जाऊ ब्रेड आणायला.

ती : वेडा आहेस का? एवढा काही जड नाहीये ब्रेड. मी आणते पटकन. तू थांब इथेच. आराम कर मस्त.

या स्टेपलाही आग्रह सोडून देऊन थांबणं आणि भावनेच्या भरात वाहवत जाणार नाही याची दक्षता घेणं अत्यावश्यक आहे.

आपण : (छान हसत) बरं जा तू.. तोवर मी केर काढून ठेवतो आणि सिंकमधल्या भांड्यांवर हात फिरवून ठेवतो.

घाबरून जाऊ नका. हे करायला लागत नाही. कारण नंतर केर आणि भांड्याला रखमाबाई येणार असतात त्यामुळे आपल्याला इकडची काडी तिकडेही करावी लागत नाही आणि बायकोही खुश होते.

------------

बायको व्हर्शन : उपव्हर्शन २ (लग्नाला तीन-चार वर्षं झालेले.)

१. डोळे उघडल्या उघडल्या नेहमीप्रमाणे "अग ए, चहा झाला की नाही अजून?" च्या ऐवजी "गुड मॉर्निंग सोना" असं म्हणावं (ही सूचना फक्त बायकोचं नाव सोनल/सोनम/सोनिया वगैरे असणार्‍या नवर्‍यांसाठी आहे असं वाटल्याने "अरे पण माझ्या बायकोचं नाव रिचा आहे. मी सोना कसं म्हणू?" असले फालतू प्रश्न विचारू नयेत. सोना हे कॉमन लाड-नाव आहे.)

२. या गुड मॉर्निंगपायी सोन्याला फेफरं आलं असल्याची शक्यता असल्याने संभाव्य उत्तरासाठी (नाही.. उत्तरा हे कोणाचंही लाड-नाव नाही.. आन्सर या अर्थी म्हणतोय मी.) तिला सुमारे सव्वा तीन मिनिटांचा वेळ द्यावा. तरी उत्तर न आल्यास "गुड मॉर्निंग सोना" ची पुनरावृत्ती करावी.. त्यानंतरही सव्वातीन मिनिटे होऊन गेल्यावरही उत्तर न आल्यास पुनरावृत्तीच्या भानगडीत न पडता थंड पाणी तिच्या चेहर्‍यावर ओतण्याची.... स्वारी.. शिंपडण्याची तयारी करावी.

३. फार कमी शक्यता असली तरी बर्‍याचदा सोनाचं प्रत्युत्तर "मॉर्निंग सोना" असं येतं. गांगरून न जाता शरद पवारच्या मुस्काटात मारेल असं स्मित चेहर्‍यावर (तोंड वाकडं न करता) ठेवावं

४. "आज मी घरातले सगळे पंखे पुसणार आहे, माळ्यावरचं सगळं सामान साफ करणार आहे." तीन सेकंद पॉज "....... ब्रेकफास्ट झाल्यावर" असं म्हणून ताडकन बेडवरून खाली उडी मारावी. सोनाचा जमिनीवर पडलेला जबडा उचलून चिकटवावा (शक्यतो हातानेच.)

५. पुढे असं म्हणावं "किंवा मी कामालाच लागतो. माझं आवरून झालं की मग बघुया ब्रेकफास्टचं"

एव्हाना सोनानेही जमिनीवर ताडकन उडी मारलेली असते.

सोना : नाही रे. आधी पटकन ब्रेकफास्ट करते मी काहीतरी. काय करू सांग?

(यावर काय उत्तर द्यायचं हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना ओळखलंच असेल तरीही)

आपण : उगाच जास्त काही करू नकोस. साधं सँडविचही चालेल.

सोना : बरं चालेल.

यापुढे काहीच बोलावं लागत नाही कारण त्या ३-४ सेकंदांच्या अवधीत सोना ब्रेड आणायला पळालेली असते. तरीही ती साधारण दरवाज्यापाशी असताना (हे टायमिंग साधणं फार फार महत्वाचं आहे !!) जरा लाउड थिंकिंग केल्यागत, (आपण) म्हंटलं तर स्वगत (तिने) म्हंटलं तर प्रकट अशा पट्टीत, तिने ऐकलं न ऐकलं अशा नरो वा कुंजरो वा थाटात पुढचं वाक्य बेमालूमपणे टाकावं.

आपण : उजवा खांदा जरा दुखतोय किंचित.. जरा गरम पाण्याने शेकून घेतो.

सोना ब्रेड घेऊन येईपर्यंत आपली आंघोळ झालेली असते आणि आंघोळीनंतर माळा आणि पंखे साफ करावे लागत नाहीत त्यामुळे ..... !!

-----------

बायको व्हर्शन : उपव्हर्शन ३ (पोरंबाळं व्हर्शन)

१. वरच्या (उपव्हर्शन २) प्रमाणेच बायकोला (एव्हाना सोनाची बायको झालेली असते) गोड आवाजात हाक मारावी. पण त्यात एक किंचित व्हेरिएशन आहे. बायकोच्या नावाच्या पहिल्या अक्षराने तिला हाक मारावी.. म्हणजे स्वाती असेल तर "ए स्वा" किंवा प्रीती असेल तर "गुड मॉर्निंग प्री" किंवा सारिका असेल तर "हे (हे म्हणजे विंग्रजी hey वालं) सा" अशी हाक मारावी.

महत्वाची सूचना : बायकोचं नाव सुनिता/शुभांगी/शीतल वगैरे असणार्‍या नवर्‍यांनी फक्त पहिल्या अक्षराऐवजी पहिली दोन अक्षरं वापरणं अधिक श्रेयस्कर !!!

२. सकाळच्या अशा छान सुरुवातीनंतर बायको शक्यतो हसतेच. आपणही हसावं

३. आपण : चल आज मी मुलांचा अभ्यास घेणार आहे" तीन सेकंद पॉज "..........ब्रेकफास्टनंतर"

४. त्यानंतर बायको "अभ्यास?? पोरं कितवीत आहेत हे तरी माहिती आहे का?" सारख्या वरकरणी विनोदी पण प्रत्यक्षात गोंधळात टाकणार्‍या प्रश्नांचा 'दुसरा' (गुगली जुना झाला आता) टाकते. त्यावर डगमगून, रागावून, चिडून न जाता फक्त निर्लज्जपणे ख्या ख्या ख्या करावं.

५. आपण : चल आता आम्ही बसतोच अभ्यासाला. मी आणि पोरं अभ्यास झाल्यावर नाश्ता करू. तू तुझ्यासाठी काहीतरी करून खाऊन घे.

६. बायको : चल काहीतरीच काय. पोरं काय उपाशीपोटी करणार आहेत अभ्यास? तुझं आपलं काहीतरीच. मी पटकन काहीतरी करते मग तुम्ही बसा अभ्यासाला. सांग पटकन काय करू ते.

(तुम्हाला उत्तर माहित आहेच तरीही)

७. आपण : उगाच जास्त काही करू नकोस. साधं सँडविचही चालेल.

बायको दोन मिनिटांत तयार होऊन ब्रेड आणायला पळते. आपण सोफ्यावर लोळत निवांतपणे चॅनल सर्फिंग करावं किंवा लॅपटॉप उघडून ब्लॉग्ज वाचत बसावं. काहीच करायचं नसेल तर पुन्हा पांघरूण डोक्यावर घेऊन शांतपणे घोरायला लागावं.

पोरं आपल्याकडे अभ्यास करत नाहीत. त्यांना आईच लागते. हे आपल्याला, पोरांना आणि बायकोलाही माहित असतं. फक्त बायको एखादा चान्स घेत असते. थोडक्यात (मुलांच्या कृपेने) आपण सुटलेले असतो.

---------------

ही आत्ताशी पहिलीच पायरी संपलेली आहे आणि सँडविच सारखा मामुली आणि क्लिष्ट पदार्थ आपल्या "माझे खादाडीचे प्रयोग" च्या सिरीज मध्ये येणार नाही हा चाणाक्ष आणि खादाड वाचकांनी बांधलेला तर्क १०१% खरा आहे. आपली आजची डिश सँडविच नाहीच्चे मुळी. त्यामुळे (कितीही कंटाळा आलेला असला तरीही) डिश समजून घेण्यासाठी पुढे वाचत रहा.

दुसरी पायरी

- तुम्ही वरीलपैकी ज्या कुठल्या गटात मोडत असाल त्याप्रमाणे तुम्हाला ब्रेड आणून मिळाल्यानंतर किंवा तुम्ही ब्रेड आणल्यानंतर, गुलाब, डेलिया, झेनिया, ट्युलिप वगैरे देऊन झाल्यानंतर, चॅनल सर्फिंग करत यथेच्छ लोळून झाल्यानंतर किंवा दुखावलेला खांदा शेकून जरा बरा झाल्यानंतर किचनमध्ये प्रस्थान करावं.

- रूमी, एल-आय जीएफ, बायकोकडे बघून छानसं स्मित द्यावं (हो हो तिन्ही व्हर्जन्समध्ये)..

- त्यानंतर अत्यंत प्रेमाने सुरी आणि कटिंग बोर्ड डायनिंग टेबलवर ठेवावेत.

- एवढं झाल्यावर "एक मिनिट हं. माझा सेल वाजतोय बहुतेक.." असं म्हणत शिताफीने किचनमधून बाहेर पडावं.

- साधारण अडीच मिनिटांनंतर स्वयंपाकघरात पुनःप्रवेश करावा.

- एव्हाना दुसर्‍या पात्राने (कॅरॅक्टर याअर्थी हो.. उगाच पुन्हा ते रूमी, एल-आय जीएफ, बायको वगैरे लिहायला लागायला नको म्हणून पात्र लिहिलं होतं पण तुमच्या शंकेखोर स्वभावाने पुनरुक्ती करावी लागलीच... छ्या !! ) ब्रेडच्या पाकिटातून वरचा ब्रेड बाहेर काढून टाकलेला असतो आणि उरलेल्या ब्रेड्सच्या कडा सुरीने कापून टाकायला सुरुवात केलेली असते...

बिंगो !!!! यु गॉट इट... हीच आहे आपली आजची डिश.

सांगतो सांगतो.. एक मिनिट.. पाकिटातला वरचा आणि खालचा ब्रेड आणि सगळ्या ब्रेड्सच्या कडा या अमानुषपणे, निर्दयीपणे आणि अरसिकपणे काढून टाकल्याचं चित्रच आपण आत्तापर्यंत बघत आलोय. पण ते साफ चूक आहे. किंबहुन मी तर म्हणेन की ब्रेडच्या पाकिटात या तीन वस्तू सोडल्या तर चविष्ट असं काही नसतंच. खोटं वाटत असेल तर आज ट्राय करून बघाच. एक मिनिट.. डिश अजून पूर्ण झालेली नाही.

- तर या कडा आणि ते बिचारे, बापुडवाणे ब्रेड्स हातात घ्या.

- चांगलं भरपूर फॅटवाल्या बटर/लोणी/चीजस्प्रेड वगैरेचा डबा घ्या (चालतं हो एक दिवस. मी सांगतोय ना !!)

- डब्याचं झाकण उघडा.

- ब्रेडची कड सरळ त्या डब्यात बुडवा आणि छानपैकी चमच्याप्रमाणे फिरवा आणि मस्तपैकी गट्टम करा.

- अधून मधून त्या कडा त्या गरीब बिचार्‍या ब्रेड्सवर फिरवा.

- कडा संपल्यावर ते ब्रेडही तोंडात टाकून द्या.

- मस्तपैकी तृप्तीची (हे बायकोचं किंवा कोणाचंही लाड-नाव नाही) ढेकर द्या.

- "ऑSSS.. मी जरा अर्धा तास पडतो ग." असं म्हणून बेडरूमच्या दिशेने पळून जा. गर्लफ्रेंड व्हर्जनात हे हिंदीत म्हणा हे सांगायला नकोच म्हणा.. पण तरीही.

डिश आवडली की नाही ते नक्की कळवा म्हणजे त्याप्रमाणे पुढच्या भागात अजून इम्प्रोवाईज करायला बरं !! नाही का?? ;)

65 comments:

  1. हा हा हा हा.... लई लई भारी. इतक्या प्रकारचे सँडविच कधी ऐकले नव्हते आणि ते सर्व्ह करायची पद्धत पण लाजवाब... आवडेश :)

    ReplyDelete
  2. हाहाहाहा !!!! जबरा!

    ReplyDelete
  3. आवरा...
    अरे त्या ब्रेडच्या चार कडांसाठी इतक्या लोकांना (रूमी पासून एल-आय जीएफ ते बायको (पूर्ण फुल्ल लाईफ सायकल), मुलांचे करियर (तुम्ही अभ्यास घेणार म्हणजे)) वेठीस धरलेस. आश्वासन देऊन लोळालोळी, आणि शेकाशेकी करण्यात तुमचा हात बारामतीकरच धरू शकतील.

    ReplyDelete
  4. प्रचंड भारी .
    मस्त रे आवडलं .
    एकदम झकास

    ReplyDelete
  5. हा हा हा.. मस्त.. यातलंच एक थोडं पुढलं व्हर्शन :०( न टाळता येण्यासारखं) लग्न होऊन १० ते पुढे कितीही वर्ष झालेली आहेत, सकाळची वेळ, बायको थकुन झोपलेली आहे, [पण तुम्हाला मात्र जाग आलेली आहे} तिच्याकडे मोठ्या आशेने बघावे, की ती कधी उठते ते! ती उठणार नाही, कारण तिला पण एकच दिवस मिळतो झोपायला ( हे वाक्य बरेचदा ऐकवलेलं असतं, तेंव्हा तिला झोपू द्या)
    कारची चावी घ्या, लॅचची पण किल्ली बरोबर घ्यायला विसरू नका, सरळ गाडी काढून समोरच्या हॉटेल मधे जाऊन, खमण ढोकळा+ बारीक नायल~ऒन शेव, किंवा जिलेबी-फाफडा वगैरे पदार्थ पॅक करून घ्या.
    जर एखाद्या ठिकाणी मॅंगो शेक मिळत असेल तर तो पण घ्या. सकाळी ब्रेकफास्ट ला छान लागतो. घरी आल्यावर सगळे पदार्थ नीट सोडून एका भांड्य़ात काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवा.

    नंतर गॅस वर चहाचे भांडे ठेउन आपला चहा, आणि तिची कॉफी करा. आणि तिला तिच्या हातात कॉफीचा कप द्या..

    ReplyDelete
  6. हाहाहा.. प्रचंड भारी...
    एकसे एक वाक्याला हसत गेलो..
    अप्रतीम डिश..
    लईच :)

    ReplyDelete
  7. कसल्या डीटेल्स टाकल्या आहेत!
    भन्नाट क्रियेटिवीटी!!
    भारीच!!!

    ReplyDelete
  8. laiii bhari!!

    - Nikhil Bellarykar.

    ReplyDelete
  9. डँम्बिस ! डँम्बिस नवरा आहेस ना तू एकदम !? :D कळतच आहे ते ! प्रत्येक वाक्यावाक्यातून टपकतोय नुसता डँम्बिसपणा ! :D

    'माझ्या पोस्टला लेख म्हणण्याचं मी अलिकडे आणि वाचकांनी फार पूर्वीपासूनच सोडून दिलंय.' हेहे ! :D हे नेहेमी माझ्या मनात येत ! म्हणजे अगदी मराठीत बोलायचं म्हणून आपण आपल्या पोस्टला 'लेख' म्हणायचं आणि मग उगाच त्या पोस्टीला एकदम भारदस्त स्वरूप द्यायचं ! असंच काहीसं ! :p

    आवडली पोस्ट ! एकदम लब्बाड पोस्ट आहे ! :D

    ReplyDelete
  10. महेंद्रजी अहो आमच्या लग्नाला नुकतेच १० वर्ष झाले की ;) (अमितला यावेळेसची हेरंबची पोस्ट वाचून दाखवणे कॅन्सल... महेंद्रजींची प्रतिक्रीया फक्त वाचणार मी ... :) )
    अनघाला दुजोरा.... :)

    हेरंबा, अरे माणसा भन्नाट रे बाबा ही वाळूची चेटकीण (तू सॅंडविच म्हणतोयेस याला, हे माझ्या लेकाने दिलेले नाव आहे )...

    (तुझ्या वाढलेल्या वजनाचं रहस्य समजलं बरं का... )

    अनूजा वाचतेयेस ना ही पोस्ट... पुढच्या रविवारी यालाच पाठव ब्रेड आणायला, तू शिकव आदिला ABCD ... :)

    ReplyDelete
  11. सहीये. काही काही पंचेस भारी आहेत एकदम. बाकी जमल्यास त्या ढेकाराचं नाव बदल बॉ.

    ReplyDelete
  12. मायला प्रचंड!!!!
    'फुलपुडी चालणार नाही' - हा मास्टरस्ट्रोक होता! :D

    ReplyDelete
  13. हा हा हा हा........

    प्रचंड प्रचंड भारी ....

    (खादाडी बाबत अत्यंत मोलाची माहिती दिल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.)

    ReplyDelete
  14. प्रचंड प्रचंड भारी ....
    पुर्ण पोस्ट ईजोय केली... काही ट्रिक्स माझ्या वर्जन मध्ये वापरत्या येण्याजोग्या आहेत.. :) :)

    ReplyDelete
  15. प्रचंड भारी....

    अशक्य भारी लिहल आहेस्...

    अस म्हणतात अनुभवातुन माणुस शिकत जातो....तु एवढे सगळे अनुभव कधी घेतले आहेस;)

    >>सभ्य माणसांचा ब्लॉग आहे हा !
    हो का...आम्हाला माहितच नव्हत्..बर झाल बॉ संगितल

    >>आणि काल जागरणही झालं ना.
    हो हा ब्लॉग सभ्य माणसाचाच आहे ;)

    >>सोना हे कॉमन लाड-नाव आहे
    प्रचंड गाढा अभ्यास्..हे एका दिवसात नव्हे बारा गावच पाणी पिल्यानंतरच सुचत्.(ही कमेंट सभ्य माणसाची आहे कृपया चुकीचा अर्थ घेउ नये;) )

    >>बायकोचं नाव सुनिता/शुभांगी/शीतल वगैरे असणार्‍या नवर्‍यांनी फक्त पहिल्या अक्षराऐवजी पहिली दोन अक्षरं वापरणं अधिक श्रेयस्कर

    लोळालोळी... :) :)

    ReplyDelete
  16. हा हा हा हा ..... डिश भन्नाट आवडली....

    ReplyDelete
  17. डीश,आवडली, मस्त

    ReplyDelete
  18. हाहाहा...भार्री... :-D

    ReplyDelete
  19. अनघाशी बाडिस.

    लवकरच नवरा व्हर्जन येउदेत !!!! म्हंजे काय ना .. आमच तस्ल व्हर्जन तयार आहे अन तुमच्या सुचनांनी मौलिक भर पड्ल हो आमच्या ज्ञानात :D बाकी काय नाय
    :)

    ReplyDelete
  20. हाहा सुझे.. अरे पण मेन डिश सँडविच नाहीये.. विसरलास? :) हेहे धन्स धन्स.

    ReplyDelete
  21. हाहा सिद्धार्थ.. तसं म्हंटलं तर जरा अवघडच डिश आहे.. काय काय वेठीला धरावं लागतं बघ ;)

    ReplyDelete
  22. सागरा आभार्स.. बर्फी गट कव्हर करायचा राहिला.. पुढच्या भागात ;)

    ReplyDelete
  23. हाहा काका मस्तच एकदम.. पण (माझ्यासारख्या) आळशी नवर्‍यांसाठी (विकांतात) चहा कॉफी करून घेणं म्हणजेही जरा जस्तच कष्टप्रद होतं ;)

    ReplyDelete
  24. धन्स आनंदा.. या आयडिया तू ऑलरेडीच वापरत असशील म्हणा ;)

    ReplyDelete
  25. अनेक आभार वैभव.. आणि ब्लॉगवर स्वागत.

    अशीच भेट देत रहा..

    ReplyDelete
  26. निखिल, आभार्स :)

    ReplyDelete
  27. अनघा,

    डँम्बिस, लब्बाड.. !! अरेरे.. अगदी विशेषणांची खैरातच केलीस तू ;) .. पण नाही ग.. खरं तर अगदी साधी, भोळी भाबडी, निष्पाप (लेख नाही) पोस्ट आहे ही ;)

    ReplyDelete
  28. तन्वे,

    काळजी नको. मी अमितला पोस्ट मेल करतोय त्यामुळे पुढच्या विकांतात सकाळी अचानक त्याचा उजवा खांदा दुखायला लागला तर काळजी करू नकोस :P

    वाळूची चेटकीण... लोल्झ !!

    >> अनूजा वाचतेयेस ना ही पोस्ट...

    अर्थातच.. कालपासूनच छळ सुरु झालाय माझा घरात :(

    ReplyDelete
  29. धन्यु तृप्ती...

    ढेकर... हाहाहा.. मला आधी काही कळलंच नाही क्षणभर... हाहाहा.. पुढच्या भागात बदलतो नाव ;)

    ReplyDelete
  30. हेहेहे बाबा.. धन्स रे..

    डेलिया, झेनिया, ट्युलिपच ने रे बाबा ;)

    ReplyDelete
  31. आभार्स पाटीलसाहेब.. मोलाची माहिती वापरताना काही अडचणी आल्या तर कळवा. मंडळ आनंदाने मदत करेल ;)

    ReplyDelete
  32. आभार्स आभार्स आका :)

    >> काही ट्रिक्स माझ्या वर्जन मध्ये वापरत्या येण्याजोग्या आहेत.

    अर्थातच... पूर्ण अनुभवाअंती दिलेल्या आहेत त्या ;)

    ReplyDelete
  33. हाहाहा यवगेशसाई.. अरे अनुभवातून माणूस शहाणा होतोच पण 'दुसर्‍यांच्या' अनुभवांतून माणूस विद्वान होतो.. ही तसलीच विद्वत्ता आहे :P

    >>आणि काल जागरणही झालं ना.
    हो हा ब्लॉग सभ्य माणसाचाच आहे ;)

    हाहा.. अरे सभ्य ब्लॉग आहे म्हणून तर अधिक विस्ताराने नाही लिहिलं ;)

    बाकी तू, आप्पा, सपा या ग्रुपसाठी काही अनुभव विशेष उपयोगी पडतील ही एकदम ग्यारंटी ;)

    एखाद्या सुनिता/शुभांगी/शीतल ने ही पोस्ट वाचली तर काही खरं नाही माझं :)

    ReplyDelete
  34. आभार आभार मान्यवर..

    खरंच यार.. 'बनवाबनवी' वाला पिळगावकर गेला रे :(

    >> म्हणून मी म्हणतो जगात सचिन तेंडूलकर, आयुर्विमा, ऑक्सिजन, मृत्यू आणि पुणेरी सूचनांना पर्याय नाही !!!

    हाहाहा.. परफेक्ट.. पुणेरी सूचनांची सर कशालाच नाही..

    >>म्हणजे ओशाळवाणं, लुब्रं आणि लोचट स्मित ना?

    हाहा.. एकदम शेन्ट परशेन्ट


    >>ब्रेडची कड सरळ त्या डब्यात बुडवा आणि छानपैकी चमच्याप्रमाणे फिरवा आणि मस्तपैकी गट्टम करा.
    हे मात्र मलाही आवडते बरं !

    चला.. ब्रेडच्या कडांचे चाहते आहेत तर :)

    ReplyDelete
  35. हेहे.. आभार प्राची. :)

    ReplyDelete
  36. वैभव, पुन्हा एकदा आभार.. :)

    ReplyDelete
  37. काका, धन्यवाद :)

    ReplyDelete
  38. आभार्स मैथिली. बर्‍याच दिवसांनी दिसलीस !

    ReplyDelete
  39. धन्यवाद विजय आणि ब्लोगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete
  40. आभार प्रीतमोहर..

    तुमचं व्हर्जन पण येऊन जाऊद्यात. म्हणजे आम्हाला आमचं व्हर्जन अजून फाईनट्यून करायला बरं.. काय? ;)

    ReplyDelete
  41. ही ही ही ही हे हे हे हे ख्या ख्या ख्या !!! काल वाचली तेव्हा अंमळ लांब वाटली होती. त्यामुळे मधला भाग( बायको व्हर्जन, {तसाही अस्मादिकांच्या कामाचाच नव्हता म्हणा !}) सोडून सरळ डिशवर हल्ला केला(किती हा हावरटपणा!!).. आज तोही पूर्ण केला( हो, माहिती असू द्यावी माणसाने. कोणती कधी कामी येईल, सांगता येत नाही बाबा!) आणि सगळी पोस्ट परत वाचून काढली.. ही ही ही !!! हसतोय पहाटे ४ :३० वाजता ( आणि कलीग चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह काढतोय !!) !!सलाम !!
    अरे हो, अस्मादिकांनाही ही डिश आवडते बरे !! ब्रेडच्या कडा भयंकर(?) चविष्ट असतात !!

    ReplyDelete
  42. हाहाहा स्वामी लांब झालीच पोस्ट पण ही विनोदी असल्याने लोक न कंटाळता वाचतील (ओव्हर कॉन्फिडन्स ;) ) अशा अपेक्षेने पूर्वसूचना टाकली नाही.

    पण आवडली ना? बास मग.. आता जानूच्या हातचं सँडविच कम ब्रेडच्या कडावाली डिश खाताना माझे आभार मानशील बघ ;)

    ReplyDelete
  43. zakas jamlai breakfast! Fulpudi is gr8ach... lol all the way!

    ReplyDelete
  44. धन्यवाद धन्यवाद साईसाक्षी :D

    ReplyDelete
  45. अरे त्या दिवशी कुठला तरी पिक्चर लावला होता तेव्हा मधेच आय-पॅडवर वाचली त्यामुळे कमेंट दिली नव्हती...आज आले तर खच..... खच पडलाय कमेंटचा आणि पोस्ट वाचून करमणूक झाली तशीच कमेंट वाचून पण झाली....
    योमु, अनघाशी संपूर्ण सहमत....आणि बाबाशी पण......जाउदे एक एक नाव लिहिता ....उगाच नारदाच्या वाक्याला बाबांनी टाळी सारखं महेंद्रकाकांच व्हर्जन सर्वात जास्त आवडल म्हटल तर रागावणार नाहीस न....किंवा म्होरल्या वेळी ते सरळ एडवून टाक कस....:)
    कसली जबरी लोळालोळी आहे बाबा हेरंब....दंडवत तुला....

    ReplyDelete
  46. हाहाहा.. खच पडलाय कारण सगळे जण या आयडिया आधीपासून वापरतायत... आपल्यासारखा अजून कोणीतरी भेटला या आनंदापायी आलेल्या प्रतिक्रिया आहेत या ;)

    महेंद्रकाकांचं व्हर्जन सगळ्यात सिनियर आहे ग त्यामुळे अर्थातच ते बेष्ट आहे :)

    >> तेव्हा मधेच आय-पॅडवर वाचली

    माझा आय-पॅड आला की मीही अशीच कमेंट देणार दर वेळी ;) (हघे)

    ReplyDelete
  47. काय रे.. हे खादाडीचे प्रयोग ऐवजी.... 'खादाडीसाठी केलेले प्रयोग' अश्या श्रेणीत बसवायचे का? कारण बनवत काहीच नाही आहेस.. (फक्त तिलाच 'बनवतो' आहेस...) हे हे ... :P

    ReplyDelete
  48. व्वा मित्रा.. लय भारी.. 'फुलपुडी चालणार नाही': एकदम पुणेरी पंच लाईन.. :)

    ReplyDelete
  49. sagaLyana sarvakaL fasavata yet nahee, puN ekhadeela/ ekhadyala sarvakaL fasavata yeta asa confidence distoy tuza!! BTW: puNyat eka dukanat 2 fulpuDya ghetalya tar ek gulab FREE miLato, garajunna mahitee aslelee baree.

    ReplyDelete
  50. हाहाहा.. हो रे रोहणा.. माझे 'बनवाबनवी' चे प्रयोग हे शीर्षक जास्त शोभून दिसलं असतं नाही? ;)

    ReplyDelete
  51. हाहा धन्स अमित..

    बर्‍याच दिवसांनी येणं केलंस..

    ReplyDelete
  52. स्मिता, पूर्ण कॉन्फीडन्स आहे.. हवं तर मार्गदर्शक पोस्ट्सही लिहायला मी तयार आहे ;) लिहीन लवकरच..

    अमुल्य माहितीबद्दल (समस्त पुणेकरांतर्फे) अनेक आभार्स ;)

    ReplyDelete
  53. अशक्य लोळालोळी... :)
    आत्ता मला समजलं, तू गेल्या आठवड्यात मला ही पोस्ट वाच म्हणून का आग्रह करत होतास ते. मस्त धमाल उडवलीस.

    ती फुलपुडी... LOL

    तुझी बायको/LIGF पासून ते बायको व्हर्जन्स आवड्या. आणि पुरषांचा नंबरी डॅंबिसपणाही... :D:D

    रिफ्रेश केलस रे. धन्यू. :)

    ReplyDelete
  54. हेहे श्रीताई,

    अग गेल्या आठवड्यात तू एवढी कंटाळली होतीस ना म्हणून म्हंटलं जरा तुला स्ट्रेस बस्टर :D

    अग डॅंबिसपणा कसला यात. हे तर बायकांच्या डॅंबिसपणापासून वाचण्याचे साधे सोपे उपाय आहेत ;)

    ReplyDelete
  55. हाहाहा..... भारी... भार्री... भाऽऽऽर्र्र्र्र्र्र्र्र्र्री :-D

    ReplyDelete
  56. हाहा संकेत.. आभार्स... पुढेमागे वापरायला बरे पडतील तुला हे उपाय.. ;)

    ReplyDelete
  57. पु. लं . चं "उरलंसुरलं" वाचलं होतं. तेचं परत वाचतोय असा भास झाला... छान, मस्त होतं sandwich

    ReplyDelete
  58. मंदार, अरे बाप रे.. एकदम पुलं !! अर्थात पुलं म्हणजे जीव की प्राण असल्याने त्यांची शैली कुठेतरी डोकावत असेलच कदाचित. आभार :)

    ReplyDelete
  59. किती दिवसानी पुन्हा वाचली ही पोस्ट.... भारी, अशक्य वगैरे लिहीलेच आहे नाही सगळ्यांनी (म्हणजे मी ही आहे त्यात :) ).... एक प्रश्न हलकाच डोकावला मनात... कुठे गेला गड्या हा हेरंब???

    बाकि ते जगणं निरर्थक वाटलं की तुझ्या पोस्ट वाचून ताजतवानं व्हायचं वालं लॉजिक एक्स्प्लेन्ड आहेच... तेव्हा येऊ द्या पटकन पुढचा ’लेख’ ;).. कोट्याधिश हेरंब :)

    यवगेशा तुझी कमेंट सुपरलाईक रे!!!

    ReplyDelete
  60. तू पुन्हा वाचलीस एवढी मोठी पोस्ट?? हाहाहा.. पुनःश्च एकवार आभार्स :) ..

    >> बाकि ते जगणं निरर्थक वाटलं की तुझ्या पोस्ट वाचून ताजतवानं व्हायचं वालं लॉजिक एक्स्प्लेन्ड आहेच...

    आधी म्हणालो तेच म्हणतो... थोडं जरा अति होतंय. अपचन होईल मला ;)

    पुढचा 'लेख' तयार होतोय.. लवकरच येईल :)

    ReplyDelete
  61. nashib maza nawara blogs wachat nahi re dewa! nahi tar kaahi khar navhat!

    ReplyDelete
  62. हाहाहा माधुरी.. मी ही ब्लॉगपोस्ट त्यांना फॉरवर्ड करतोय ;)

    प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...