Friday, July 2, 2010

एरिन, अपील, कार्बाईड, अन्याय वगैरे... !!

तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्या शोधात असते. जो वकील तिची केस लढतो त्याच्याकडेच नाममात्र पगारावर क्लर्क म्हणून कामाला लागते. काम करत असताना तिला एका खटल्याची माहिती कळते. एका बलाढ्य इलेक्ट्रिक/गॅस कंपनीवर त्या परिसरात हानिकारक रसायनं सोडून तेथील पाणी दुषित केल्याचा आरोप असतो. या पाण्याच्या वापरामुळे तेथील अनेक रहिवाश्यांना कित्येक प्रकारचे भयानक रोग झालेले असतात. कंपनी अतिशय मोठी आणि शक्तिशाली असल्याने अर्थातच ती असल्या आरोपांना किंमत देत नसते. ही बाई त्या परिसरातल्या नागरिकांशी संपर्क साधून, त्यांच्याशी बोलून, अधिकाधिक माहिती गोळा करते. त्या कंपनीविरुद्ध सगळ्यांनी एकत्र खटला दाखल करावा यासाठी त्या लोकांना आणि तिच्या स्वतःच्या बॉसला तयार करते. हे करताना तिला सर्वांचाच रोष पत्करावा लागतो. स्वतःचा बॉयफ्रेंड, किंबहुना मुलांशी भांडणं होतात. तिचा वकील बॉसही ही एवढी मोठी उडी घ्यायला साशंक असतो. कारण केस हरली तर दिवाळखोरी निश्चित असते. अखेरीस खटला उभा राहतो. बाजू मांडल्या जातात, पुरावे दिले जातात, साक्षी नोंदवल्या जातात. अंतिमतः त्या गॅस कंपनीने विषारी रसायनं त्या भागात निष्काळजीपणे, ते द्रव्य किती विषारी आहे हे ठाऊक असूनही योग्य काळजी न घेता सोडल्यानेच तेथील पाणी दुषित झालं आणि ते दुषित पाणी प्यायल्याने तेथील रहिवाश्यांना अनेक भयंकर जीवघेण्या आजारांना तोंड
द्यावं लागलं यावर शिक्कामोर्तब होतं. कंपनीला ३३३ कोटी डॉलर्सचा दंड होतो. !!! रूढार्थाने कायद्याचं शून्य ज्ञान असलेल्या एका साधारण स्त्रीपुढे अतिविशाल कंपनीला गुडघे टेकावे लागतात... !!!

ही अमेरिकेत कॅलिफोर्नियामधे घडलेली सत्यघटना आहे... !!! त्या बाईचं नाव एरिन ब्रोकोविच. या घटनेवर पुढे तिच्याच नावाचा चित्रपट निघाला. ज्युलिया रॉबर्टसने एरिन ब्रोकोविच अक्षरशः जिवंत केलीये. या चित्रपटासाठी ज्युलियाला ऑस्कर मिळाला.

****

मिसिसिपीतल्या एका छोट्या परगण्यातले (काऊन्टी) लोक अचानक फटाफट मृत्युमुखी पडू लागतात. सगळ्यांचं कारण एकच. कॅन्सर. हा वेग बघता बघता इतका वाढतो की या परगण्यात एका वर्षांत कॅन्सरने मरणार्‍यांची संख्या संपूर्ण अमेरिकेत एका वर्षात कॅन्सरने मरणार्‍यांच्या एकूण संख्येपेक्षा तिप्पट होते. कॅरी काऊन्टीला 'कॅन्सर काऊन्टी' हे भ्रष्ट नाव मिळतं. कॅन्सरमुळे अफाट संख्येने बळी पडणार्‍या लोकांच्या मृत्यूमागेही अशीच एक बलाढ्य रासायनिक कंपनी असते. अगदी तेच कारण. भयंकर विषारी द्रव्य कुठल्याही काळजीशिवाय जवळच्या जंगलात, जमिनीत, पाण्यात कुठेही सोडली जातात. ती झिरपत झिरपत जात प्यायच्या पाण्याच्या स्त्रोतापर्यंत पोचतात आणि पाण्यात मिसळतात.

पेशाने वकील असलेलं मेरीग्रेस पेटन आणि वेस पेटन हे जोडपं त्यातल्या जिनेट बेकर नावाच्या एका बाईची केस स्वीकारतात. या बाईने काही महिन्यांच्या अंतराने आपला नवरा आणि १०-१५ वर्षांचा मुलगा गमावलेला असतो. प्रचंड प्रयत्नाने आणि अफाट इच्छाशक्तीच्या बळावर पेटन्स खटला लढवतात आणि जिंकतातही. कंपनीने बेकरला नुकसान भरपाई म्हणून चार कोटी डॉलर्स द्यावेत असा निकाल कोर्ट देतं. स्थानिक कोर्टातल्या त्या निर्णयाला 'क्रेन केमिकल' चे वकील उच्चन्यायालयात आव्हान देतात. दरम्यान 'क्रेन' चा मालक कार्ल ट्रूडू (Carl Trudeau) एक जबरदस्त खेळी खेळतो आणि तीही एका सिनेटरच्या मदतीने. ज्या उच्च न्यायालयात ही केस साधारण चौदा महिन्यांनी उभी राहणार असते त्या न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी साधारण आठ महिन्यांनी निवडणुका होणार असतात. कार्ल निवडणुका 'मॅनेज ' करणार्‍या एका कंपनीला गाठतो आणि त्यांना काही कोटी डॉलर्स देतो. त्या कंपनीचा सर्वेसर्वा असलेला बॅरी एक साधा, सरळमार्गी वकील (रॉन) निवडतो, मिसिसिपीतल्या न्यायव्यवस्थेबद्दल, चुकीच्या न्यायप्रक्रियेबद्दल, एकूणच (न) होणार्‍या अन्यायाबद्दल रॉनचे कान भरतो आणि हा न्यायप्रक्रियेतील अन्याय दूर करण्यासाठी त्याची कंपनी काम करत असल्याचं सांगून हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी होणार्‍या निवडणुकीसाठी उभं राहण्याची गळ घालतो. पैशाची काळजी करू नकोस, त्याची व्यवस्था मी आणि माझी कंपनी बघू असं गोड आश्वासनही देतो. भोळा रॉन या सापळ्यात अडकतो आणि निवडणूक लढवायला तयार होतो. निवडणूक प्रचारात करोडो रुपये उडवले जातात, अस्तित्वातच नसलेल्या अनेक मुद्द्यांची राळ उठवली जाते, वातावरण गढूळ केलं जातं, जाहिरातींचा मारा केला जातो आणि शेवटी ती निवडणूक जिंकली जाते. काही दिवसांनी बेकर केस जेव्हा रॉन समोर येते तेव्हा तो काहीही विचार न करता ती केस, तो दंड, ती शिक्षा सरळ फेटाळतो आणि अशा काही अटी घालतो की जेणेकरून तो खटला पुन्हा सुनावणीसाठी म्हणून खालच्या कोर्टात जाऊ शकत नाही की अपील करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही. तसंच त्या गोष्टींना 'क्रेन केमिकल' जवाबदार आहे याचा भक्कम पुरावा नाही असं सांगून "तो परिसर स्वच्छ करणे, पाणी शुद्ध करणे, रसायनं काढून टाकणे" यापैकी कुठल्याही प्रकारची जवाबदारी 'क्रेन केमिकल' वर नाही असा निर्णय देतो. आणि हे सगळं त्याच्याकडून बेमालूमपणे करवून घेतलं जातं. तो बळीचा बकरा आहे हे त्याला (एका प्रसंगाचा अपवाद वगळता) कळतही नाही.

पेटन वकील देशोधडीला लागतात, दिवाळखोरी जाहीर करतात. मुलाच्या आणि नवर्‍याच्या आठवणीने रडत राहण्याशिवाय जिनेट बेकरच्या हातात काहीच रहात नाही. या खटल्याकडे डोळे लावून बसलेले अनेक फिर्यादी आणि त्यांचे वकील खटला न लढताच हरतात. सुरुवातीला खटला हरल्यानंतर शेअर बाजारात शंभर कोटी डॉलर्स हरलेला कार्ल ट्रुड्रू त्याच्या कित्येक कोटी डॉलर्स परत मिळवतो. ४१ कोटीचा दंड चुकवणारा कार्ल शेवटी ९१ कोटीची मोठ्ठी बोट विकत घेतो.

'द अपील'. जॉन ग्रिशमच्या अनेक हादरवून टाकणार्‍या पुस्तकांपैकी एक. या कादंबरीचा सत्यघटनेशी संबंध नाही असं ग्रिशम कितीही म्हणत असला तरीही काही वर्षांपूर्वी व्हर्जिनिया मध्ये हायकोर्टाच्या न्यायाधीशाची खुर्ची विकत घेण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता त्याच्याशी ही कादंबरी कमालीचं साधर्म्य साधते.

****

एका गजबजलेल्या शहरात एका मध्यरात्री एका रासायनिक कंपनीच्या अफाट निष्काळजीपणामुळे वायूगळती होते. पंधरा हजार लोक थेट मृत्युमुखी पडतात. प्रचंड व्यंग घेऊन जन्माला येणार्‍या अर्भकांची तर गणतीही अशक्य. एक अख्खी पिढी काळाच्या पडद्याआड जाते आणि पुढच्या कित्येक पिढ्या अपंग होतात किंवा अनेक दुर्धर रोगांचे आगर बनतात. कंपनीच्या अमेरिकन मालकाला (सन्मानाने) भारतात आणलं जातं, खटला दाखल केल्यासारखं दाखवून त्याचा यथायोग्य पाहुणचार केला जातो, काही तासांत त्याला जामिनावर सोडलं जातं, प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि स्वतः पंतप्रधान यांच्या आशीर्वादाने त्याला विमानतळावर पोचवलं जातं आणि तो सुखरूप अमेरिकेत पोचेल याची काळजी घेतली जाते. कालांतराने "जामिनावर सोडलं जाईल" या अटीवरच तो पोलिसांच्या स्वाधीन झालेला असतो हे गुपित फुटतं. थोडक्यात तो सगळा खेळ असतो. सगळं काही ठरल्याप्रमाणे पोलीस त्याला फरार घोषित करतात. मुख्यमंत्री, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री सगळे त्यांच्या हो ला हो करतात. त्याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेला जाब विचारण्याची आणि कालांतराने भीक मागण्याची भाषा केली जाते. पण पुढे काहीच ठरत नाही. कोणीच काही करत नाही.  २६ वर्षं खटल्याची कागदपत्र उबवून झाल्यावर 'अन्यायालय' आरोपींना २ वर्षं आणि काही लाख रुपड्यांची  शिक्षा देतं. (आणि मुख्य आरोपी तर आरोपींच्या यादीतून कधीच बाद झालेला असतो !!) काही लाखांच्या जामिनावर आरोपींची सुटण्याची व्यवस्था करून ठेवलेली असतेच. पंधरा हजारांचे खुनी दीड लाख रुपड्यात सुटतात. मुख्य आरोपीचं तर नखही दृष्टीस पडत नाही. (कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर तशी व्यवस्था केलेली असते.). आमचे पंतप्रधान त्यांच्या राष्ट्रपतींना भेटतात पण या सार्‍या अन्यायाबद्दल चकार शब्द काढण्याचा पुरुषार्थ दाखवत नाहीत.

सार्‍याच बेकर आशाळभूतासारख्या न्यायाची, मदतीची वाट बघत राहतात. पण कोणीच पेटन्स किंवा ब्रोकोविच मदतीला येत नाहीत. येतात ते फक्त बॅरी, ट्रूडू आणि रॉनच. लचके तोडायला !!!

तळटीप  : 'द अपील' वाचत असताना आणि वाचून झाल्यावर मला एरिन ब्रोकोविच तर आठवलीच पण आपल्या भोपाळ खटल्यात किंवा एकूणच न्यायव्यवस्थेत 'द अपील' सारखीच न्यायाधीशांची खरेदी-विक्री होत असेल का असा एक प्रश्नही मनात डोकावून गेला. असेल.. नक्कीच असेल.. त्याशिवाय का न्यायव्यवस्थेची, शोषितांची अब्रु खुल्यावर लुटली जात असतानाही सगळे मंत्री-संत्री, पुढारी (आपल्याला मिळालेल्या रुपड्यांच्या राशीवर लोळत) तोंड शिवून गुपचूप बसले होते !!!

* सर्व छायाचित्रे गुगल इमेजेस/विकी वरून साभार.

36 comments:

  1. चांगली झाल्ये पोस्ट. मनाला चटका देउन गेली.

    ReplyDelete
  2. आभार नचिकेत. हे भोपाळचं काही केल्या डोक्यातून जात नाही आणि त्यात नुकतंच 'अपील' वाचलं त्यामुळे अजूनच असहाय वाटलं :(

    ReplyDelete
  3. ज्युलिया रॉबर्टसने एरिन ब्रोकोविच अक्षरशः जिवंत केलीये.
    अप्रतिम चित्रपट आहे हा.


    बाकी आपली न्यायव्यवस्था ही राजकीय पुढार्याच्या दावणीची गाय आहे.

    ReplyDelete
  4. सचिन, माझाही प्रचंड आवडता चित्रपट आहे एरिन ब्रोकोविच. आणि ज्युलिया तर लाजवाबच. जे तिथे होऊ शकतं ते इथे का होऊ शकत नाही याचीच राहून राहून खंत वाटत राहते. :(

    ReplyDelete
  5. हेरंब,
    भोपाळच्या विषयावर लिहिताना, अनेक जण कारबाईड कंपनीचा उल्लेख दाट वस्तीत असलेली कंपनी असा करतात. पण खरंच, कंपनीला जेव्हा प्लान्ट टाकायची परवानगी मिळाली, तेव्हा त्या भागात वस्ती अजिबात नव्हती. तिथे नंतर वस्ती वाढत गेली आणि ती सुद्धा बेकायदेशीर झोपड्यांची. ह्याचा अर्थ, त्या गेलेल्या जीवांचा मोल कमी होतो असा नाही. पण असली वस्ती कीट-नाशक बनवणार्‍या कारखान्या शेजारी वसत असताना प्रशासन काय करत होतं? UCC एवढा प्रशासनाचा ही हा दोष नाही का?

    UCCचे सर्व दोष मला मान्य असले, तरी त्या वेळची स्थानिक आणि राज्य पातळीवरची प्रशासनं ही पण कारणीभूत आहेत. त्यांना दोष देऊन त्यांच्या वर कारवाई करण्याची मागणी कुणीच का करत नाही? की आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचा कारटा?

    ReplyDelete
  6. विनय, प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत.

    प्रशासनाचा दोष नाही असं म्हणतच नाहीये मी. किंबहुना तो आहेच. व्हीपी सिंग, राजीव गांधी यांसारख्या मोठ्या माशांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत प्रत्येक जण याला जाव्बदार आहेच. किंबहुना इतकी न्यायदानात ढिलाई आणि विलंब लावल्याबद्दल न्यायालयही तेवढंच जवाबदार आहे. पण हे सर्व मान्य केलं म्हणून कार्बाईडच्या गुन्ह्याचं परिमाण कुठे कमी होतं? किमाभुना दोषींच्या यादीत कार्बाईड प्रथम क्रमांकावरच आहे माझ्या मते तरी. अशा काही बाबतीत आपला तो बाब्या हा नियम लावला तरी काही चूक नाही.

    ReplyDelete
  7. २५ वर्ष लागली ह्या घटनेला कारणीभूत लोकाना शिक्षा सुनावण्यात पण हाती फक्त पालीच शेपूट आला..पाल शेपूट टाकून पळून गेली :(
    २५ वर्षांत या गोष्टीमध्ये भारतात काय सुधारणा झाल्या आहेत याविषयी कोणी बोलतच नाही. अशा प्रकल्पांची आज स्थिती काय आहे? आज असा अपघात घडवायचा प्रयत्न अतिरेकीसुद्धा करू शकतात. असा अपघात झाला तर काय होईल, यंत्रणा ते हाताळण्यास आज सक्षम आहे का?

    ReplyDelete
  8. हेरंब या सार्‍या घटनांमधुन तुला काय सांगायचं कळतंय...पण कुठे वळवायचं ते सांग.....:(

    ReplyDelete
  9. पैसा हा देवा हून मोठा नाही....अस म्हणतात....पण देवापेक्षा कमी पण नाही.....

    पैसा फेको तमाशा देखो...

    तुझ्या माझ्या सारख्यांनी फक्त आत्मक्लेश करायचा, संधी मिळेल तेव्हा खरडायच....:( :( :(

    ReplyDelete
  10. असे प्रयत्न करणारांचे पाय न ओढण्याची प्रेरणाही खरे तर आजची गरज आहे.

    ReplyDelete
  11. ज्युलिया रॉबर्टसने एरिन ब्रोकोविच अक्षरशः जिवंत केलीये.
    Agadi barobar....

    Baki tujhi post tyatali tagmag aani mag hatblata sagale umjale ..... brashtacharachya prachand dongarapudhe aapale naganya astitva aahe Heramb.... manmauji mhanato tase

    तुझ्या माझ्या सारख्यांनी फक्त आत्मक्लेश करायचा, संधी मिळेल तेव्हा खरडायच....:( :( :(

    Milel tevha 'अपील' vachayala havey....

    ReplyDelete
  12. खरच रे हेरंब..जे तिथे होऊ शकतं ते इथे का होऊ शकत नाही याचीच राहून राहून खंत वाटत राहते. :(
    आता हेच बघ ना एका ९/११ नंतर त्यांनी तालिबान कस नेस्तनाबुत केल.त्यानंतर किमान आजवर तरी दहशतवाद्यांनी तिथे वाकड्या नजरेने पाहिलेल नाही.नाहीतर भारतात असे कित्येक भ्याड हल्ले होत आहेत आणि आपण.....

    ReplyDelete
  13. नेहमी प्रमाणे अर्थपूर्ण......

    ReplyDelete
  14. Kay bolnaar...??? Aani kaay lihinaar...??? Svatachya jeevala tras karun ghyayacha nusta...dusare kaay...???
    BTW,Post chaan jhaliye...!!!

    ReplyDelete
  15. भोपाळच्या घटनेत तर कोर्टाने तर अजब निर्णय दिला, ह्याला आपले सरकारच जबाबदार आहे,आपले परीक्षण(निरीक्षण) चांगले वाटले,

    ReplyDelete
  16. सत्यवाना!
    अगदी जळजळीत वर्णन केलंयस रे! जळतोय बघ एकदम आतून!
    मोठा गेम झालाय हेच खरं!

    ReplyDelete
  17. सुहास, आणि पाल गेली तीही सिंहाच्या आवेशात. लपूनछपूनही नाही. अशा प्रकारचे अपघात/घातपात झाले तर ते हाताळायला यंत्रणा सक्षम आहे की नाही ते ठाऊक नाही पण त्याचं राजकारण करायला, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायला मात्र नक्कीच सक्षम आणि तयार आहे !!! :(

    ReplyDelete
  18. अपर्णा, कुठेच काहीच वळणार नाही... त्या नराधमांच्या माना वळवता उर्फ मुरगळता आल्या तर बघायला हवं !!

    ReplyDelete
  19. धनो देवो भवः | पैसा देवो भवः
    संपत्ती देवो भवः | दौलतः देवो भवः

    असा नवीन श्लोक तयार आहे या लोकांनी. स्वतःच्या आई, बाप, गुरुजनांना विकायला मागेपुढे पाहणार नाहीत हे लोक. जनतेचं काय घेऊन बसलास !!

    ReplyDelete
  20. सविता, हो ना आणि अशा प्रकारचा पाठिंबा प्रामुख्याने सरकारकडून मिळायला हवा तर उलट तेच पाठ फिरवतात !!!

    ReplyDelete
  21. तन्वी, नक्की वाच अपील. मी मागे ग्रिशमवर लिहिलं होतं तेव्हा अपील वाचलं नव्हतं. नाहीतर ते यादीत खूप वरच्या स्थानावर टाकलं असतं.

    आपलं अस्तित्व नगण्य आहे हे खरंच. त्यामुळे तर अजूनच हेल्पलेस झाल्यासारखं वाटतं. विनोदी किंवा विचित्र वाटेल पण पूर्वीच्या काळी ऋषीमुनी आपल्या पुण्याईच्या आधारावर समोरच्याला जसे शाप द्यायचे तसे या सगळ्या लोकांना हाल हाल करून ठार मारण्याचे शाप द्यावेत आणि ती तडफड स्वतःच्या डोळ्यांनी बघता यावी अशी खूप इच्छा आहे. त्यासाठी कितीही पुण्याई खर्ची पडो किंवा कोणालाही मी कितीही निष्ठुर वाटो. पण.... !! :(

    ReplyDelete
  22. आभार देवेन.. इथे दोन्ही प्रकारचे अनुभव आहेत. पण पॉझिटिव्ह प्रकारचे जास्त. आणि दहशतवाद्यांविरुद्ध कडक कारवाई करणं सोड तशा सध्या विचारानेही चड्ड्या पिवळ्या होणारी लोकं दुर्दैवाने आपला राज्यशकट हाकतायत. त्यामुळे अशा अनेक २६/११, भोपाळ प्रकारच्या घटनांसाठी मानसिक तयारी करून ठेवणं एवढंच आपल्या हातात आहे !!!

    ReplyDelete
  23. आभार सागर. अपील वाचलं आणि खूप बेचैन झालो.

    ReplyDelete
  24. आभार मैथिली.जीवाला त्रास तर होतोच.. प्रचंड होतो. कुठेतरी व्यक्त झालो नाही तर फार घुसमटायला होईल आतल्या आत !!

    ReplyDelete
  25. आभार काका... मलाही हा अजब निर्णयच वाटला होता आधी. पण आता अपील वाचल्यावर तर खात्री झाली आहे की असंच काहीसं घडलं असणार आपल्या इथेही :(

    ReplyDelete
  26. बाबा, अरे अपील वाचत असताना असाच जळण्याचा अनुभव घेत होतो मी गेले काही दिवस. अजूनही तगमग शांत होत नाहीये. खूप मोठ्ठा गेम झालाय रे आणि तोही अगदी अगदी पद्धतशीरपणे..

    ReplyDelete
  27. आजचा दिवसच वाईट होता....
    पहीले 'द कॉन्स्टंट गार्डनर' पाहीला, आणि मग 'एरिन ब्रॉकोविच'...
    'द कॉन्स्टंट गार्डनर' अफ्रिकन लोकांना नविन औषधांच्या टेस्टींग आणि साईड इफेक्ट्स बद्द्ल गिनिपीग कसं बनविलं जातं यावर आहे...
    हे सर्व पाहील्यावर, तुझी ही पोस्ट वाचल्यावर प्रचंड हतबलता जाणवत आहे.

    ReplyDelete
  28. 'कॉन्स्टंट गार्डनर' पहिला नाहीये पण वर्णनावरून भयानकच वाटतोय. अरे तरी एरिन ब्रोकोविच सुखांत आहे. अपील वाचल्यावर आपोआपच भोपाळ आठवतं आणि आपण एक यत्किंचित क:पदार्थ असल्याचं वाटायला लागतं. !! :(

    ReplyDelete
  29. एरिन ब्रोकोविच पाहिलेला आहे, तसेच दोन्ही पुस्तकंही वाचलेली आहेत. एक अजून पुस्तक आहे टॉर्ट लॉ वरचं, नाव आठवत नाही, पण -ते पण छान होतं.

    ReplyDelete
  30. एरिन ब्रोकोविच अप्रतिमच आहे. तुम्हीही ग्रिशमचे पंख असल्याने तुम्हीही 'द अपील' वाचलं असणार याची खात्री होतीच. टॉर्ट लॉ वरचं कुठलं पुस्तक? ग्रिशमचंच होतं का?

    ReplyDelete
  31. तुझ्या अश्या पोस्ट्सवर अता कमेंट देणे बंद करणार आहे मी... उगाच ................................ !!!

    ReplyDelete
  32. रोहणा, अरे अशी पोस्ट लिहून झाली ना की मीच ठरवतो दरवेळी की आता पुन्हा या विषयांवर काहीही लिहायचं नाही. पण इलाज नाही. काहीतरी होतं आणि मग लिहिलं जातंच !!

    ReplyDelete
  33. विद्याधर +२

    बाकी ज्युलिया अप्रतिमच.

    ReplyDelete
  34. श्रीताई, माझी पण तीच अवस्था झाली होती अपील वाचल्यावर :(

    ज्युलिया खरंच बेस्ट आहे त्या चित्रपटात !!

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...