
Toss the coin. नाणं उडवा, दुसरी बाजू. पहा काय दिसतंय? काळोख.. अगदी काळाकुट्ट. मिट्ट, कभिन्न... दिव्याखाली अंधार.
याच देववत भासणाऱ्या, आदर्शवत वाटणाऱ्या माणसावर असंख्य गुन्हे दाखल झालेले आहेत. फक्त अमेरिकेतच नाही तर अगदी आपल्या भारतात पण. त्याच्या काळ्या कृत्यांची यादी देणारे अनेक लेख अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आणि तेही शब्दकोडं वाल्या चार पानी सायंदैनिकांमध्ये नव्हे तर अगदी टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारख्या मानाच्या वृत्तपत्रांत .. तर काय काय केलं या चटवाल साहेबांनी??? ............ काय नाही केलं विचारा.
-अमेरिकेतल्या मोठ मोठ्या बँकांमधून मोठ्ठल्ली कर्जं घेऊन ती बुडवली?
----- हो बुडवली. लिंकन सेव्हीन्ग्स, फर्स्ट न्यूयॉर्क बँक फॉर बिझनेस सारख्या बँकांना विचारा.
-भारतातल्या मोठ्या बँकांमधून मोठ्ठल्ली कर्जं घेऊन ती बुडवली?
----- हो अगदी. आणि तेही "द गल्ली बँक ऑफ भूरगड" वगैरे सारख्या नाही तर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अशा सरकारी बँकांना.
-हॉटेल संदर्भात चुकीची कागदपत्रे दाखवून एक्स्चेंज कमिशनची दिशाभूल केली?
----- हो केली. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँकरप्सी नोंदवून कर्जं बुडवण्यासाठी याचा वापर केला.
- राजकीय संबंधांचा वापर व्यक्तिगत स्वार्थासाठी केला?
----- हा हा हा.. हा गुन्हा असेल तर भारतातले सगळे आजी, माजी, भावी नेते १०००० वर्षांसाठी तुरुंगात जातील. पण असो. विषयांतर नको. तर हे सुद्धा केलं चटवाल साहेबांनी.
- यांना कधी अटक झाली होती?
----- अहो बँकांना फसवल्याबद्दल सीबीआय ने अटक केली होती. पण वर उल्लेखल्याप्रमाणे राजकीय बळाचा वापर करून ते यातून सही सलामत सुटले.
आणि अशा महान माणसाला आपलं सरकार राष्ट्राच्या उच्चतम सन्मानांपैकी एक सन्मान हसतहसत बहाल करतं. भलेही चटवाल या सगळ्यात निर्दोष असेल, गुन्हे खोटे असतील वगैरे वगैरे गोष्टी आपण मान्य करू. पण तरीही देशातील अशा महान सन्मान दिल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्यावर (सामाजिक चारित्र्य या अर्थी) कुठलाही डाग नको, तो अगदी स्वच्छ असला पाहिजे ही अपेक्षा चटवाल आणि त्याच्या पिलावळीच्या दृष्टीने भ्रामक असली तरी आपल्या सारख्या सामान्यांच्या मताचा विचार करता अवास्तव आहे का? की सरकार पुरस्कारांच्या घोषणा करताना त्या बातमीच्या खाली ** घालून तळटीपा वगैरे देते की "आम्ही हवे त्याला पुरस्कार देऊ, जनतेचा यात काही संबंध नाही" वगैरे वगैरे !!
चटवालची बातमी वाचण्याआधी मी "सैफ अली खान" ला पद्मश्री मिळाल्याबद्दल जाम वैतागलो होतो. म्हटलं याचं काय कर्तृत्व? पण आता ही बातमी बघून त्याबद्दल काहीच वाटत नाहीये. चटवाल सारख्याला जर पद्म पुरस्कार मिळतो तर सैफ अलीच्या गेल्या ४० आणि येणा-या ८० पिढ्यांनाही तो दिला गेला तरी आपली काही तक्रार नाही.
अर्थात गोपीनाथ मुंड्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे. पुढे काय होईल कोण जाणे. पण माझा मूळ मुद्दा अतिशय छोटासा आणि वेगळाच आहे. मला २ दिवसांपूर्वी पर्यंत संतसिंग चटवाल बद्दल काय माहित होतं? शून्य. काहीही नाही. टोटल ब्लँक.. पुरस्कारांच्या घोषणा ऐकल्या चटवाल बद्दल ऐकलं. थोडं विकी केलं, थोडं गुगल मारलं आणि वरचे सगळे मुद्दे मिळाले. जर माझ्या सारख्या सामान्य माणसाला २-४ टिचक्या मारून चटवाल बद्दलची सगळी (आक्षेपार्ह) माहिती दीड मिनिटात मिळाली तर मग पुरस्कार समिती, तेथील अधिकारी, पंतप्रधान कार्यालय किंवा इतर कुठलीही संबंधित कार्यालयं काय झोपा काढत होती की काय? मुंड्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आक्षेप नोंदवल्यानंतर या सर्व वेबसाईट्सवर चटवाल बद्दल माहिती टाकली गेली असं नाही न होऊ शकत? मग तरीही त्याला दामटून पुरस्कार देण्यात कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत? आणि ते कोणाचेही गुंतले असोत पण अशा माणसाला पुरस्कार देण्याने पद्म पुरस्कारांची किंमत आणि पुरस्कार समितीची विश्वासार्हता मात्र नक्कीच कमी झालीये. अगदी काही न करणा-या ओबामाला शांततेचा नोबेल देणाऱ्या नोबेल समितीच्या विश्वासार्हतेपेक्षाही काकणभर नाही तर अगदी मणभर अधिकच कमी कारण कितीही म्हटलं तरी नोबेल परका आहे पण पद्म आपला आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आपल्या करांच्या पैशातला आहे. म्हातारीही जातेय आणि काळही सोकावतोय. अधिकाधिकच !!!