Friday, June 28, 2024

स्वीडन, वॉलंडर आणि मॅन्केल

माझ्या इंग्रजी (फिक्शन) वाचनाचा प्रवास आजवर (काही मोजके अपवाद वगळता), साधारणतः एखादी सिरीज/चित्रपट बघून तो आवडल्यास, तो चित्रपट अथवा सिरीज ज्या पुस्तकावर आधारित आहे ते पुस्तक आणि त्यानंतर त्या लेखकाची अन्य पुस्तकं मिळवून वाचणं अशा प्रकारे होत आलेला आहे. मात्र नुकताच हा क्रम उलट्या दिशेने घडण्यासाठी निमित्त ठरेल अशी एक घटना घडली. एका इंग्रजी पुस्तकांच्या समूहात एका वाचकाने त्याने २०२३ मध्ये वाचलेल्या निवडक पुस्तकांची छायाचित्रं टाकली होती. सगळी पुस्तकं रहस्य, थरार, गुन्हेगारी या माझ्याही आवडत्या जॉनरमधलीच होती. जॉन ग्रिशम, ली चाईल्ड, मायकल कॉनली, डॅन ब्राऊन, डेव्हिड बालडाची, जेम्स पॅटर्सन या नेहमीच्या यशस्वी कलाकारांची मांदियाळी तिथे जमली होती. मात्र त्यात एका वेगळ्या लेखकाने माझं लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव होतं हेनिंग मॅन्केल (Henning Mankell) आणि पुस्तकाचं नाव होतं 'फेसलेस किलर्स' (Faceless Killers). लेखकाच्या नावावरून हा आपला नेहमीचा अमेरिकन, ब्रिटिश लेखक नाही हे लक्षात येत होतं. थोडी शोधाशोध केल्यावर मॅन्केल साहेब स्वीडनमधल्या आघाडीच्या ज्येष्ठ लेखकांपैकी एक असून त्यांनी त्यांचा मानसपुत्र असलेला स्वीडिश पोलीस इन्स्पेक्टर कर्ट वॉलंडर (Kurt Wallander) या पात्राला केंद्रस्थानी ठेवून साधारण १२ पुस्तकं लिहिली असल्याची माहिती मिळाली. त्यातलं पहिलं पुस्तक, अर्थात ज्यात कर्ट वॉलंडर हे पात्र पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस येतं ते पुस्तक म्हणजे फेसलेस किलर्स असून ते मॅन्केल यांनी ३३ वर्षांपूर्वी अर्थात १९९१ साली लिहिलं असल्याचंही समजलं.

कुतूहल म्हणून मी फेसलेस किलर्स वाचायला सुरुवात केली. निदान पहिलं प्रकरण वाचून बघून पुस्तक कसं आहे, वर्णनं कशी आहेत याचा काहीतरी अंदाज बांधू असा विचार केला. पण झालं उलटच! पहिलं प्रकरण तर दहा मिनिटांत संपलंच पण आपोआपच दुसरं प्रकरण वाचायला सुरुवात झाली होती. त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत जागून तीन प्रकरणं संपवली आणि मॅन्केलची शैली, वर्णनं, त्याने वॉलंडरचं पात्र ज्या खुबीने रंगवलं होतं ते पाहून थक्कच होऊन गेलो.

आपल्याला नेहमीच्या सवयीच्या असणाऱ्या न्यूयॉर्क, लॉस अँजल्स, शिकागो, लंडन, वगैरे ठिकाणांच्या वर्णनांच्या ऐवजी स्वीडन मधल्या स्केन (Skane/Scania) काऊंटीतल्या यस्टाड (Ystad) शहराच्य्या  पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेलं एक दुर्गम गाव, तिथलं राहणीमान, तिथले शेतकरी इत्यादींची मी यापूर्वी कधीच न वाचलेली वर्णनं होती. गावातल्या एका वयोवृद्ध एका शेतकऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचा अतिशय अमानुषपणे खून करण्यात येतो आणि तिथे आपला नायक वॉलंडर जाऊन पोचतो आणि तपासाला सुरुवात करतो. शेतकऱ्याच्या पत्नीने मृत्यूपूर्वी 'फॉरेन' अशा अर्थाचा काहीतरी शब्द उच्चारला असल्याचं त्याच्या शेजाऱ्यांकडून कळल्यावर वॉलंडर त्याही दिशेने तपास करायला सुरुवात करतो. खूप तपास करून, शोधाशोध करूनही सगळीकडे नन्नाचा पाढा असल्याने वॉलंडर आणि त्याचे सहकारी अक्षरशः हतबल होऊन जातात. दरम्यान एका निर्वासित व्यक्तीचा खून होतो आणि रहस्य अधिकच गहिरं होत जातं.

बरीच सव्यापसव्य करत, अपयशं पचवत, धक्के खात वॉलंडर आणि त्याचे सहकारी काही निष्कर्षांपर्यंत पोचतात आणि पुढचा प्रवास त्या दिशेने सुरु करतात आणि अखेरीस महत्प्रयासाने आणि भरपूर उलथापालथ झाल्यानंतर अतिशय धक्कादायकरीत्या तिन्ही खुन्यांपर्यंत पोचण्यात यशस्वी ठरतात. या प्रवासादरम्यान स्वीडन देश, तिथलं ग्रामीण आणि शहरी जनजीवन, सरकारी कारभार, सुसंपन्न आणि प्रगत असलेला पश्चिम युरोप आणि तुलनेने मागास असा पूर्व युरोप, तिथल्या निर्वासितांचे प्रश्न, त्यातून जन्माला आलेली गुन्हेगारी या सगळ्याची इत्यंभूत माहिती वाचकाला मिळत जाते. वॉलंडरचं साधं परंतु चौकस व्यक्तिमत्व, त्याचे त्याच्या कुटुंबाशी, सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी असणारे संबंध, नात्यांमधली ओढाताण, त्याच्या तपासाची शैली, एखाद्या गोष्टीचा अखेरपर्यंत पाठपुरावा करत राहण्याचा हट्टीपणा या सगळ्याचं अतिशय प्रवाही असं वर्णन करण्यात लेखक हेनिंग मॅन्केल अतिशय यशस्वी ठरला आहे.

इतका यशस्वी की पहिलं पुस्तक काही दिवसांत संपताच वॉलंडर मालिकेतलं पुढचं पुस्तक अर्थात डॉग्ज ऑफ रीगा (The Dogs of Riga) आपसूकपणेच सुरु केलं गेलं. दुसऱ्या पुस्तकात स्वीडनशी सागरी हद्द शेअर करणारा शेजारी देश अर्थात लाटविया (Latvia, ज्याच्या राजधानीचं नाव रीगा आहे) देशातलंअस्थिर जीवन, हुकूमशाही सदृश परिस्थिती इत्यादी आपण आजवर कधीही न वाचलेल्या गोष्टींशी आपली ओळख करून दिली जाते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच अतिशय छळ करून ठार मारण्यात आलेल्या दोन व्यक्तींची प्रेतं एका नावेतून स्वीडनच्या सागरी हद्दीत प्रवेश करतात. अर्थातच आपल्या नायकाला तपास करण्यासाठी नियुक्त केलं जातं. दोन्ही मृत व्यक्ती लाटवियाचे नागरिक असून लाटवियामधील गुन्हेगारी टोळ्यांशी त्यांचे संबंध असून लाटवियामधला एक पोलीस अधिकारी अधिक तपासासाठी स्वीडनमध्ये येणार असतो. तो काही दिवस येऊन, तपास करून परत गेल्यावर लगेच त्याचा त्याच्या देशात खून केला जातो. हे सगळं नक्की काय रहस्य आहे हे न कळल्याने लाटविया पोलिसांकडून मदत म्हणून वॉलंडरला लाटवियामध्ये पाठवण्याची विनंती केली जाते. लाटवियाला पोचल्यावर तिथलं विचित्र जनजीवन, गुन्हेगारी समाज, अंमली पदार्थ आणि त्या अनुषंगाने पोखरली गेलेली नोकरशाही आणि सरकार बघून वॉलंडरला अक्षरशः धक्काच बसतो. काही काळाने वॉलंडर आपल्या नेहमीच्या शैलीने याही खुन्यांचा शोध लावण्यात यशस्वी होतो.

तिसऱ्या पुस्तकात तर एका गुन्ह्याच्या शोधासाठी वॉलंडरला आफ्रिकेत पाठवण्यात आलं असून तिथे योगायोगानेच त्याला नेल्सन मंडेलांच्या खुनाच्या कटाचा सुगावा लागतो अशी साधारण कथा आहे. तिसरं पुस्तक मी अजून सुरु केलं नाहीये पण लवकरच करेन. मॅन्केलच्या कादंबऱ्या या एका अर्थी थोड्या ताणलेल्या दीर्घकथा आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

त्याच्या या वैशिष्ट्यामुळेच त्याच्या पुस्तकांवर आधारित वॉलंडर नावाच्या मालिकेची निर्मिती स्वीडिश आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये करण्यात आली आहे. ब्रिटिश मालिका बीबीसी वर असून साधारण दीड तासाचा एक भाग असून तो वॉलंडरच्या एकेका पुस्तकावर आधारलेला आहे. इंग्रजी मालिकेत वॉलंडरचं पात्र Kenneth Branagh या अभिनेत्याने साकारलं असून अगाथा ख्रिस्तीच्या 'मर्डर ऑन द ओरियंट एक्स्प्रेस' या २०१७ साली प्रकाशित झालेल्या चित्रपटात Branagh ने सुप्रसिद्ध गुप्तहेर हर्क्युल पॉरो (Hercule Poirot) याची भूमिका केली होती.

नेहमीची, टिपिकल शहरी, चकचकीत अमेरिकन वर्णनं वाचून कंटाळा आला असेल, युरोपातलं राजकारण, समाजजीवन याची थोडीफार आवड असेल तर वॉलंडरच्या तपासविश्वात आवर्जून प्रवेश करून बघाच. काहीतरी वेगळं वाचल्याचा आनंद नक्की मिळेल. आणि अर्थातच ज्यांना पुस्तकं वाचायची इच्छा/वेळ नसेल ते थेट मालिका तर बघू शकतातच. जय वॉलंडर, जय मॅन्केल, जय स्वीडन!!!


--हेरंब ओक

Tuesday, June 18, 2024

कडवट विकृतीचं दर्शन घडवणारं ‘बिटर चॉकलेट’

जगभरात अव्याहतपणे चालू असलेल्या बाल लैंगिक शोषणाला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेलेल्या पिंकी विराणी लिखित आणि मीना कर्णिक अनुवादित ‘बिटर चॉकलेट’ या २००९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात पानोपानी आढळणारा कडवटपणा पुस्तकाचं शीर्षक आणि मुखपृष्ठ (षांताराम पवार) यांनाही व्यापून राहिलेला आहे. शोषित
बालके, त्यांचे पालक, शेजारीपाजारी, नातलग, समाजसेवी संस्थांमध्ये कार्यरत व्यक्ती, समाजसेवक, (तथाकथित) माननीय न्यायमूर्ती, पोलीस आणि स्वतः शोषक अशा अनेक लोकांच्या या विषयाशी संबंधित अशा शेकडो अनुभवांचं संकलन असं या पुस्तकाचं स्वरुप आहे. यात अल्पवयीन मुलगा/मुलगी यांच्याशी त्यांचे सख्खे/सावत्र वडील, सख्खा भाऊ, मावस/मामे/आत्ये/चुलत भाऊ, काका, मामा, आजोबा, नोकर, स्वयंपाकी, मित्र, शेजारी, शिक्षक, क्रीडा शिक्षक, मैत्रीण यांनी जबरदस्तीने, धूर्तपणे, फसवून, ब्लॅकमेल करून केलेल्या लैंगिक शोषणाचे असंख्य संदर्भ दिले आहेत. या विषयावर जगभरात केल्या गेलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष, अभ्यासकांचे अनुभव, विविध अहवाल, अनेकविध पुस्तके यांचेही उल्लेख पुस्तकादरम्यान येत राहतात. पुस्तकाच्या अखेरीस दिसणाऱ्या संदर्भग्रंथांच्या यादीवरून नजर फिरवली असता, अतिशय अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं आहे हे लक्षात येतं.

पुस्तकाच्या पहिल्या पानापासून एकेक भयंकर अनुभव वाचत पुढे जात असताना आपला मेंदू आणि गात्रं बधिर होऊन जातात, संवेदना साकळून जाऊन हळूहळू मरून जातात. तरी पुस्तकातली अत्याचारी वर्णनं संपत नाहीत. पिंकी विराणी यांनी अरुणा शानभाग हिच्यावरील दुर्दैवी अत्याचाराचं वर्णन केलेलं 'अरूणाची गोष्ट' हे पुस्तक मी यापूर्वी वाचलं होतं. तेही असंच भयंकर अस्वस्थ करून टाकणारं आहे. हे पुस्तक वाचताना ती अस्वस्थता काही हजार पटींनी वाढलेली असते.    

सावजं कशी हेरली जातात, त्यांना कसं फसवलं जातं, अत्याचारपीडित बालकांची लक्षणं कोणती, तक्रार करणाऱ्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय असते, शोषक व्यक्तीची प्रतिक्रिया कशी असते, सामाजिक संस्था, पोलीस, डॉक्टर्स, समाज, न्यायालयं यांच्या जबाबदाऱ्या काय इत्यादी सर्व गोष्टींवर या पुस्तकात तपशीलवारपणे चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे या विकृतीवरचे उपाय, त्यापासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्याच्या पद्धती,  इत्यादींवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून त्या दरम्यान असंख्य शोषितांचे निरनिराळ्या भयंकर अनुभवांची पेरणी असं पुस्तकाचं साधारण स्वरूप आहे.

दरम्यान हे पुस्तक वाचताना प्रचंड धक्कादायक अशी काही माहिती मिळते ज्यामुळे वाचक पूर्णतः हादरून जातो. 'भक्ष्य' मिळण्याची सुलभता आणि अत्यंत ढिसाळ कायदे यामुळे जगभरातल्या विकृत जनावरांचं भारत हे आता एक अतिशय आवडतं स्थळ बनलं असून गोवा हा तर त्यांचा लाडका अड्डाच झालेला आहे. त्याखालोखाल हिमाचल, केरळ यांनाही प्राधान्य दिलं जात आहे. भारतीय मुलांमध्ये आढळणारं एड्सचं नगण्य प्रमाण हे देखील जगभरातल्या विकृतांचा ओढा भारताच्या दिशेने वाढण्यामागचं एक प्रमुख कारण आहे.

लेन पर्नड आणि तिच्या प्रियकरासोबत अठरा जणांवर गोवा पोलिसांनी खटला दाखल केला. केरळमधल्या कोवालम येथे एका जर्मन पर्यटकाला प्रत्यक्ष संभोग करताना पकडलं गेलं, पण त्याने लाच देऊन स्वतःची सुटका करून घेतली. गोव्यातल्या हॉटेलमध्ये पोलिसांनी अन्य एका जर्मन नागरिकाला एका अल्पवयीन मुलासोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह कृत्यं करत असताना पकडलं असता तो 'अनैसर्गिक गुन्हा करत असल्याचे सिद्ध होत नसल्याने 'आदरणीय' न्यायालयाने त्याला सोडून दिलं. गोव्यात अनाथाश्रमाच्या नावाखाली बाल लैगिक शोषणाचा भलामोठा कारभार चालवणारे फादर आणि ब्रदर फ्रेडी यांना जेव्हा १९९१ मध्ये अटक करण्यात आली तेव्हा पोलिसांना तिथे लहान मुलांची २३०० हून अधिक अश्लील छायाचित्रं, सिरिंज, झोपेची औषधं, कामोत्तेजक द्रव्यं असे अनेक पुरावे सापडले. परंतु पंचेचाळीस दिवसांच्या आत पोलिसांनी फ्रेडीला 'पुराव्यांच्या अभावी' जामिनावर सोडून दिलं.

बाल लैगिक शोषणासंदर्भातले भारतातल्या ढिसाळ कायद्यांची आणि निद्रिस्त न्यायव्यवस्थेची जगभरात इतकी दुष्कीर्ती पसरलेली आहे की न्यूझीलंडमधील एका पुरुषाला या गुन्ह्यासंदर्भात अटक झाली असतात त्याने आपला खटला भारतात चालवावा अशी विनंती केली आणि ती मान्यही करण्यात आली!!!

जगभरात वेगाने पसरणाऱ्या वोकीझम (wokism) नावाच्या अक्राविक्राळ राक्षसाने या क्षेत्रातही आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या पुस्तकात एकामागोमाग एक येणाऱ्या विकृत आणि किळसवाण्या वर्णनांनंतर आपलं मन निबर व्हायला लागलेलं आहे असं वाटत असतानाच पुस्तकाच्या  साधारणतः मध्यावर एक अत्यंत धक्कादायक आणि प्रचंड किळसवाणा असा गौप्यस्फोट केला जातो जो वाचून वाचकाच्या हातातून पुस्तक अक्षरशः गळून पडतं !!!

भारतात आणि जगभरात संभोगासाठी लहान मुलग्यांना मागणी असते ही वस्तुस्थिती आता सर्वत्र स्वीकारण्यात आलेली आहे. अमेरिकेत तर लहान आणि तरुण मुलांसोबत संभोग करता यावा यासाठी द नॉर्थ अमेरिकन मॅन बॉय लव असोसिएशन (नाम्बला - NAMBLA) नावाची एक संघटना स्थापन करण्यात आलेली असून "लहान मुलं आणि मोठी माणसं यांना आपलं प्रेम लैंगिक दृष्ट्या व्यक्त करावंसं वाटलं तर तो कायद्याने गुन्हा असू नये" या मागणीसाठी यांनी ही चळवळ उभी केली आहे. लहान मुलगे आवडणाऱ्या पुरुषांनी लिहिलेली 'व्हेअर द यंग वन्स आर' नावाची एक पुस्तिका अमेरिकेत हातोहात खपली. पाच डॉलर्स किंमत असणाऱ्या या ३० पानी पुस्तिकेच्या ७२००० प्रती तेरा महिन्यांत  संपल्या. 

सोळा वर्षाखालील २५ टक्के मुलग्यांना आणि ४० टक्के मुलींना अशा प्रकारचे अनुभव आलेले असतात. थोडक्यात २००२ पर्यंत लैंगिक दृष्ट्या शोषण होणाऱ्या मुलांमध्ये ४ कोटींहून अधिक मुलगे तर ६ कोटींहून अधिक मुली आहेत. या सगळ्या प्रकाराला कधीतरी कुठेतरी आळा बसावा, संबंधित कायद्यांमध्ये तातडीने सुधारणा व्हाव्यात असं आपल्यासारख्या सुजाण नागरिकांना वाटत असेल तर त्यासाठी लेखिकेने पुस्तकाच्या शेवटी केंद्रीय कायदा मंत्री, केंद्रीय गृहमंत्री, भाजप आणि काँग्रेस पक्ष आणि खुद्द पंतप्रधान यांच्या कार्यालयांचे संपर्कासाठीचे पत्ते दिलेले असून त्या पत्त्यांवर पत्रं पाठ्वण्याचं वाचकांना आवाहनही केलं आहे.

संपूर्ण पुस्तकभर वाचलेल्या गडद, काळ्या, विचित्र आणि विकृत अनुभवांच्या माऱ्यानंतर एका सकारात्मक नोंदीवर शेवट करण्याचा लेखिकेचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असला तरी पुरेसा मुळीच नाही. कारण पुस्तकभर निरनिराळ्या काल्पनिक नावांनी वावरणारी, असह्य यातना आणि अन्याय सहन केलेली खरीखुरी लहान मुलं मात्र यापुढे कधीच वाचकांच्या मेंदूतून, त्यांच्या जाणिवांमधून बाहेर पडणार नसतात. न्याय मिळावा यासाठी आपल्याकडे सतत आशेने बघणाऱ्या त्या अदृश्य मुलांना नजरेआड करण्याइतकं धैर्य आपल्या अंगी कधीच येणार नसतं!!!

--हेरंब ओक

Thursday, May 23, 2024

'गर्द' काळ्या व्यसनाचं कृष्णविवर!

विस्थापित, दंगलग्रस्त, हळद कारखान्यातले कामगारबिडी कामगार, उकिरड्यात काम करणारे लोक, वेश्या, दारूच्या व्यसनापोटी आयुष्याची धूळधाण उडालेले लोक या आणि अशा असंख्य उपेक्षित जमातींवर अनिल अवचट या अवलियाने विपुल लेखन करून ठेवलेलं आहे. त्यांच्या कुठल्याही पुस्तकाचा फॉर्म बऱ्यापैकी सारखाच असतो. म्हणजे रिपोर्ताज अर्थात अहवाल स्वरूपाचा. त्यात ना कुठली अलंकारिक भाषा असते की वीरश्रीने भरलेला अभिनिवेश असतो. आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या अन्यायकारक गोष्टी, परिस्थितीने गांजलेले, पिडलेले, पिचलेले लोक यांच्या कथा सोप्या भाषेत कथन केलेल्या असतात. ते कुठल्याही स्वरूपाचा निष्कर्ष न काढता घटना, वस्तुस्थिती वाचकांसमोर मांडतात आणि तात्पर्य शोधण्याचा निर्णय सर्वस्वी वाचकांवर सोपवून मोकळे होतात. या अशा प्रकारच्या पुस्तकांमधलं त्यांचं एक जुनं पुस्तक म्हणजे 'गर्द'. अंमली पदार्थांच्या व्यसनांच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि त्यांच्यावर उपचार करणारे मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना बोलतं करून त्यांनी या जीवघेण्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या दुर्दैवी रुग्णांचे भीषण अनुभव वाचकांसमोर मांडले आहेत. साधारण १९८५-८६ साली डॉ आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर सुमारे दीड-दोन महिने राहून रुग्ण, त्यांचे नातेवाईक, अन्य डॉक्टर, परिचित अशा अनेकांच्या अनुभवांतून उभं राहिलेलं हे गर्दचं काळंकुट्ट विश्व अवचट वाचकांच्या समोर उलगडतात. पुस्तकातले काळे अनुभव तितक्याच प्रभावीपणे जिवंत करणारं गडद काळ्या शैलीतलं अप्रतिम मुखपृष्ठ सुभाष अवचटांनी चितारलं आहे.


अगदी दुसरी-तिसरीतल्या शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयात जाणारे आणि गडगंज श्रीमंत ते घरात अठरा विश्व दारिद्र्य असणारे असे कुठलेही दुर्दैवी जीव या भयकारी व्यसनाच्या पोलादी पंजातून सुटू शकलेले नाहीत. अनिल अवचट डॉ नाडकर्णींबरोबर या अशा गर्दपीडित व्यक्तींना जाऊन भेटले, त्यांच्या अनेक बैठकांना उपस्थित राहिले, लोकांना बोलतं केलं, आधार दिला, मदत केली, अधिकाधिक लोकांना या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायला साहाय्य केलं. एकदा बाहेर पडलेले अनेक जीव मोह आवरू न शकल्याने किंवा अन्य काही कारणापायी पुनःपुन्हा गर्दच्या आहारी जात राहिले. अशा लोकांवर विशेष मेहनत घेऊन डॉ नाडकर्णी त्यांना पुनःपुन्हा त्यातून बाहेर काढत राहिले. या आणि अशा असंख्य अनुभवांचं छोटेखानी पुस्तक म्हणजे गर्द. यातला प्रत्येक अनुभव एवढा भयावह आहे की प्रत्येक प्रकरणानंतर पुस्तक बंद करून देवासमोर उभं राहून आपण किती सुदैवी आहोत याबद्दल त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं वाटत राहतं.

गर्दच्या आहारी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला तब्येत आणि खिसा ढासळत गेल्यावर हे व्यसन किती भयंकर आहे हे हळूहळू लक्षात यायला लागलेलं असतं. सुरुवातीला कधीतरी मजामजा म्हणून सुरुवात झालेल्या, कोणाच्यातरी आग्रहावरून सुरु केलेल्या या व्यसनाचा खरा भेसूर चेहरा दिसल्यावर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला जाऊ लागतो. पण गर्दच्या विळख्यातून बाहेर पडणं किती अवघड आहे हेही अवचट अनेक व्यसनाधीन लोकांच्या निरनिराळ्या अनुभवांद्वारे आपल्यासमोर मांडतात. 

पुस्तकातला प्रत्येकचा अनुभव तितकाच भयंकर असला तरी त्यातल्या त्यात त्यातले दोन अनुभव वाचून मात्र मी तीव्र नैराश्याच्या भावनेने ग्रासून गेलो! अनिल अवचट आणि डॉ आनंद नाडकर्णी एकदा कामाठीपुऱ्यातल्या व्यसनाधीन मुलांना भेटायला गेले असता तिथे त्यांना कचराकुंडीतल्या कचऱ्याच्या ढिगात काहीतरी हलताना दिसलं. काही वेळाने कळलं की ती हलणारी वस्तू म्हणजे १५-२० वर्षांचा एक गर्दुल्ला मुलगा होता. हाडांचा सापळा झालेलं, धुळीने माखलेलं शरीर, त्यावर एक काळाकुट्ट कोट आणि तितकीच काळीकुट्ट लुंगी. तो मुलगा कचऱ्यातून कागदाचे तुकडे वेचून त्याच्या पाठीवरच्या पोत्यात टाकत होता. थोडी चौकशी केल्यावर गेली दोन वर्षं या व्यसनात अडकलेला तो एक अनाथ मुलगा असल्याचं कळलं. रोज त्याला किमान पंचवीस (१९८५ सालचे पंचवीस रूपये) रूपयांची गर्द लागते हे कळलं. आणि हे पंचवीस रूपये तो रोज सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत कचरा गोळा करून, तो विकून कमावतो आणि त्या पैशांतून गर्द विकत घेतो. त्यामुळे अन्न घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे उरतच नाहीत आणि अर्थात अन्नावरची वासनाही मेलेली असते. हे असं न खाता किती दिवस चालणार असं विचारल्यावर तो जे उत्तर देतो ते हादरवून टाकणारं असतं.

"बस, इसीमें खतम होने का" !!!!

"मी साक्षात मृत्युशी बोलतोय असं मला वाटलं" या एका वाक्याने अवचट तो प्रसंग संपवतात. पण तो अनुभव पुढचे किती दिवस, महिने आपल्या डोक्यात राहून आपल्याला कुरतडत राहणार असतो हे आपलं आपल्यालाही माहीत नसतं.

हे अनुभव सांगताना अवचटांनी अनेक पुस्तकांचे दाखले दिले आहेत. जेम्स कोलमनच्या अ‍ॅबनॉर्मल सायकॉलॉजी या पुस्तकातला एक अनुभव त्यांनी तिथे नमूद केला आहे जो वाचून कामाठीपुऱ्यातल्या मुलाचा अनुभव कसाबसा पचवत असलेल्या वाचकाला अजून एक भयंकर मानसिक धक्का बसतो.

त्या पुस्तकात एका नुकत्याच जन्मलेल्या आणि लगेच मृत पावलेल्या बाळाचा फोटो दिला असून फोटो खाली माहिती दिली आहे की हेरॉईन अ‍ॅडिक्ट बाई, ती गर्भार असताना हेरॉईन घेत असेल तर गर्भातलं तिचं मूलही आपोआपच अ‍ॅडिक्ट म्हणून जन्माला येतं. जन्मल्याजन्मल्या काही तासांतच ते मूल हेरॉईन न मिळाल्याने उलट्या, जुलाब होऊन डिहायड्रेशन होऊन मरण पावतं.

पुस्तकातली सगळी प्रकरणं अहवाल स्वरूपातली असली तरी अखेरचं प्रकरण मात्र तांत्रिक माहितीने भरलेलं आहे. गर्द म्हणजे नक्की काय, त्याचे विविध प्रकार, हेरॉईन, ब्राऊन शुगर, चरस, हशीश, गांजा, अफू ही आणि अशी इतर अनेक व्यसनं, त्यांच्यातली साम्यं आणि फरक या आणि अशा अनेक मुद्द्यांवर लेखक विस्तृत चर्चा करतो.

या पुस्तकातली एक सर्वात आगळीवेगळी गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या शेवटी प्रकट होणारी 'पुस्तक मिटण्यापूर्वी' या नावाची डॉ आनंद नाडकर्णी यांची अत्यंत मुद्देसूद शब्दांत लिहिलेली प्रस्तावना. पुस्तकाच्या आशयाची तीन भागांत मांडणी करून त्यांनी हा विषय अधिकच सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात डॉ नाडकर्णी यांचे प्रयत्न, अनुभव, जिद्दीने या प्रश्नाला वाहून घेण्याची तळमळ अशा प्रकारच्या सकारात्मक नोंदीवर पुस्तकाचा शेवट होत असला तरी दरम्यान वाचलेले असंख्य भयानक आणि त्यातही वर उल्लखलेले दोन भीषण अनुभव तर जगाच्या अंतापर्यंत आपली पाठ सोडणार नाहीत असं वाटत राहतं.

 गर्दचं व्यसन संबंधित व्यक्तीला क्रूरपणे पकडून ठेवून त्याला अखेरपर्यंत आपल्या ताब्यात कसं ठेवत असेल याचा वाचकाला घ्यावा लागणारा हा एक प्रकारचा प्रत्यक्ष अनुभवच नव्हे का?!!

--हेरंब ओक


Thursday, May 2, 2024

समकालीन संदर्भांच्या आधारे बाबराचं वस्त्रहरण

आभास मलदहीयार. शिक्षणाने आर्किटेक्ट असलेला आणि इतिहासाची प्रचंड आवड असलेला एके काळचा कट्टर कम्युनीच, सिक्युलर, इस्लामप्रेमी माणूस अजिंठा आणि वेरूळचं स्थापत्य बघून अक्षरशः आमूलाग्र बदलून गेला आणि त्याने बाबर, अकबर, तैमुर इत्यादी मुस्लिम लुटारू राज्यकर्त्यांच्या मूळ चरित्रांचा सखोल अभ्यास करायला घेतला. आणि कालांतराने त्याने त्याच्या इस्लाम राज्यकर्त्यांच्या सिरीजमधलं पहिलं पुस्तक 'Babur : The Chessboard king' लिहून काढलं. या इतिहासाशी अत्यंत प्रामाणिक असलेल्या पुस्तकाचा प्रवास म्हणजे ही मुलाखत. 

या मुलाखतीदरम्यान लेखकाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

१. ज्याला मुघल साम्राज्य म्हंटलं जातं ते खरंतर मुघल नाहीत.

२. ताजमहाल बांधण्यासाठी (त्या काळातले) ४ कोटी रूपये खर्च झाले. आणि तेही मुख्यत्वाने अतिशय विक्राळ अशा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ज्यात लाखो लोक भुकेने तडफडून मेले.

३. मुघल आणि ब्रिटिश काळातील GDP आणि per capita income मध्ये कम्युनिस्ट इतिहासकारांनी केलेली फसवाफसवी.

४. अकबराने मक्का, मदिनेसकट जगभर पाठवलेले करोडो रूपये.

५. अकबराने त्याचा दीने इलाही नावाचा पंथ स्थापन करण्यामागचं खरं कारण.

६. बाबर मंगोलवंशातील लोकांचा द्वेष का करत असे?

७. बाबर समलिंगी असल्याचे पुरावे.

८. पुरोगामी आणि UPSC च्या लोकांचे लाडके इतिहासतज्ज्ञा इरफान हबीब आणि रोमिला थापर यांच्यातलं साम्य आणि फरक.

ही मुलाखत खालील लिंकवर 1:46:30 ते 3:52:22 यादरम्यान बघता येईल. 

याच स्ट्रीममध्ये सुरुवातीला 15:02 ते 45:09 च्या दरम्यान आपल्या तडाखेबंद अभ्यासाने आणि समकालीन संदर्भ आणि पुराव्यांच्या आधारे फेबुवर इस्लाम, मुघल, बाबर, औरंग्या यांची नियमितपणे पोलखोल करणारे सत्येन वेलणकर Satyen Velankar यांचीही उपस्थिती असून त्यांनी बाबरच्या आत्मचरित्राच्या आणि इतर अनेक समकालीन संदर्भांच्या आधारे बाबराचं मूर्तीभंजन केलं आहे.

तळटीप : एक्स मुस्लिम साहिल आणि Adam Seeker यांच्या युट्युब चॅनल्सवरच्या live streams मार्फत नेहमीच इस्लामविषयी अत्यंत रंजक माहिती मिळत असते. जे लोक हे ही चॅनल्स नियमितपणे फॉलो करतात त्यांना माहीत असेलच की या चॅनलवर गप्पांदरम्यान कधी कधी अश्लील उल्लेख येऊन जातात. या मुलाखतीदरम्यानही बोलण्याच्या ओघात असे गंमतीशीर उल्लेख १-२ वेळा आले आहेत.

व्हिडीओचा युट्युब दुवा : https://www.youtube.com/live/KneO-jiuKSw

खलिफाकाळातलं दारिद्र्य ते पाकिस्तान : एक चक्र पूर्ण


मध्यंतरी अनंत अंबानीच्या प्रि-वेडिंग कार्यक्रमात जगभरातल्या सुप्रसिद्ध, बलाढ्य व्यक्तींनी आणि खेळाडू, कलाकार इत्यादींनी हजेरी लावल्याच्या पार्श्वभूमीवर हा एक मीम खूप लोकप्रिय झाला होता. हा मीम खरा असावा की काय असं वाटायला लावणारे संदर्भ असलेल्या, इस्लामच्या खलिफाकाळातली वर्णनं असलेल्या एका ग्रंथाची आठवण झाली.


पर्शियन आणि मुस्लिम सैन्यांदरम्यान नोव्हेंबर ६३६ मध्ये कादिसिया येथे मोठं युद्ध झालं. हे युद्ध दुसरे खलिफा उमर यांच्या काळात झालं. पर्शियन सैन्याचा सेनापती होता रुस्तुम आणि इस्लामी सैन्याचा प्रमुख होता कआका नावाचा एक सरदार. चार दिवस चालू असलेल्या या युद्धात अखेरीस मुस्लिमांनी पर्शियनांवर निर्णायक विजय मिळवला. विजयानंतर मुस्लिमांना अक्षरशः अविश्वसनीय लूट मिळाली. अमूल्य रत्नं, अलंकार, जवाहिर हाती लागले. लुटीचं अंदाजे मूल्य सुमारे १४७० दशलक्ष दिहरम होतं.

इस्लामच्या प्रथेप्रमाणे आणि पैगंबरांच्या आदेशाप्रमाणे लुटीचा पाचवा हिस्सा मदिनेला खलिफांकडे पाठवून देण्यात आला. बाकीची रत्नं, संपत्ती, स्त्रिया प्रथेप्रमाणे मुस्लिम सैन्यात वाटून टाकण्यात आल्या. एवढी लूट बघून मुस्लिम सैन्य अक्षरशः आश्चर्यचकित होऊन गेलं.

लुटीत मिळालेला कापूर बघून त्याचं काय करायचं हेच त्यांना कळेना. कारण कापूर म्हणजे काय हेच त्यांना माहीत नव्हतं. तो त्यांनी मीठ म्हणून वापरला. 

एका सैनिकाला लुटीमध्ये एक अतिशय अमूल्य असं रत्न मिळालं. ते त्याने अन्य कोणाला १००० दिहरम अशा नगण्य किंमतीला विकून टाकलं. नंतर त्याला एका जाणकाराने, "इतकं अमूल्य रत्न एवढ्या मातीमोल भावाने का विकून टाकलंस?" असं विचारलं असता तो उत्तरला, "१००० पेक्षा मोठी संख्या असते हेच मला माहीत नव्हतं. नाहीतर अजून मागितले असते."

दुसरा एक सैनिक त्याला मिळालेल्या लुटीतली एक पिवळसर वस्तू हातात धरून ओरडत होता, "या पिवळ्या वस्तूच्या बदल्यात मला कोणी एखादी पांढरी वस्तू देईल का?" काही वेळाने त्याला कळलं की आपल्या हातात असलेल्या वस्तूला सोनं म्हणतात.

संदर्भ : प्रेषितांनंतरचे पाहिले चार आदर्श खलिफा (लेखक : शेषराव मोरे)

तळटीप : चार खलिफांच्या काळात इस्लाम जगभर कसा पसरला आणि युद्धादरम्यानच्या नृशंस कत्तलींची वर्णनं आणि आकडे या ग्रंथात पानोपानी आहेत. त्यावर नंतर सवडीने लिहेन.

--हेरंब ओक

Friday, January 12, 2024

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्यात आणि गदारोळात काही प्रमुख आक्षेप किंवा प्रश्न 'सर्वांना' सामायिकरित्या (कॉमन) पडलेले आढळतात. इथे 'राममंदिराचे समर्थक आणि विरोधक या दोघांनाही' अशा अर्थी 'सर्वांना' हा शब्द वापरला आहे. आणि खरंच दोन्ही बाजूच्या लोकांना छळणारे हे प्रश्न किंवा आक्षेप त्यांना अगदी मनापासून, अगदी प्रामाणिकपणे पडलेले आहेत असं जाणवतं. ते सगळे प्रश्न/आक्षेप एकत्रितरित्या मांडण्याचा प्रयत्न केल्यावर अशी काहीशी यादी तयार झाली. हे प्रश्न/आक्षेप कुठल्याही विशिष्ट क्रमाने नसून दिसले, आठवले, सुचले त्याप्रमाणे लिहिले आहेत याची नोंद घेणे.

 

आक्षेपांची/प्रश्नांची यादी

१. राममंदिराचं उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीलाच का ठेवला आहे?

२. हा कार्यक्रम रामनवमीला ठेवणं अधिक योग्य ठरलं नसतं का?

३. रामनवमीच्या दरम्यान निवडणूक येत असल्याने आचारसंहितेच्या भीतीने राजकीय फायदा मिळवता येणार नसल्यानेच उद्घाटन लवकर ठेवलं आहे.

४. हिंदू धर्मानुसार पौष महिना हा धर्मकार्याचा मुहूर्त म्हणून वर्ज्य महिना आहे.

५. निव्वळ लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा स्वार्थ साधण्यासाठी हा मुहूर्त काढला गेला आहे का?

६. हा असा मुहूर्त कोणी काढून दिला?

७. राममंदिर पूर्णपणे बांधून व्हायच्या आधीच उद्घाटन / प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अट्टहास का?

८. राममंदिराच्या नावावर निव्वळ राजकारण चालू आहे.

९. राममंदिराच्या नावावर मतं गोळा करण्याचा प्रकार आहे हा.

१०. हे राममंदिर ज्या प्रकारे उभं राहतंय त्याला माझा विरोध आहे.

११. सगळं वातावरण मोदीमय करून, रामाच्या नावावर भावनिक आवाहन करून निवडणूक जिंकण्याचा अश्लाघ्य प्रयत्न.

१२. राममंदिराच्या आडून हिंदूंच्या शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न आहे हा.

१३. राममंदिराच्या आडून भाजपच्या शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न आहे हा.

१४. राममंदिराच्या आडून मोदींच्या शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न आहे हा.

१५. खुद्द शंकराचार्यांचा या सोहळ्याला आणि दिवसाला विरोध आहे.

१६. हिंदू धर्माचे प्रमुख असलेल्या चार पीठांच्या शंकराचार्यांपैकी एकालाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण का नाही?

१७. मोदींना हिंदूचे नवे शंकराचार्य होण्याची इच्छा आहे का?

१८. चारही पीठांचे शंकराचार्य पद हे केवळ शोभेचं पद आहे का?

१९. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रमुख असताना मोदींच्या हस्ते उदघाटन का?

२०. मोदी हे हिंदू धर्माचे प्रमुख आहेत का?

२१. शंकराचार्यांच्या मतांना काहीच किंमत नाही का?

२२. थापाड्याच्या हातून राममंदिराचं उद्घाटन का?

२३. ज्याने स्वतःच्या बायकोला सोडून दिलं आहे अशा माणसाच्या हस्ते राममंदिराचं उद्घाटन का?

२४. अशिक्षित माणसाच्या हस्ते राममंदिराचं उद्घाटन का?

२५. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अन्य महत्वाच्या भाजप नेत्यांना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

२६. राष्ट्रपतींना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

२७. उद्धव ठाकरेंना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

२८. संजय राऊतांना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

२९. राज ठाकरेंना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

३०. रणबीर कपूर आणि आलीया भट आणि बॉलिवूडमधल्या अन्य नटव्यांना आणि नाटक्यांना आमंत्रण कशाबद्दल?

३१. त्यांचं राममंदिर उभारणीत काय कर्तृत्व आहे?

३२. काँग्रेस आणि सोनिया गांधींवर आमंत्रण नाकारण्याची वेळ का आली?

३३. राममंदिराच्या गर्भगृहात होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी संघाच्या सरसंघचालकांना कोणत्या धार्मिक/अध्यात्मिक निकषानुसार निवडण्यात आलं?

३४. अयोध्येतला राम माझा राम आहे. पण आमच्या रामाचा तुमच्या राजकारणासाठी आणि मतं वाढवण्यासाठी गैरवापर आम्हाला मान्य नाही.

३५. धर्माचा वापर करून राजकारण करण्यास माझा विरोध आहे.

३६. धर्माचा वापर करून निवडणूक जिंकणं मला अमान्य आहे.

३७. धर्माचा वापर करून निवडून येणं आणि नंतर भ्रष्टाचार करणं मला हे अमान्य आहे.

३८. धर्माचा वापर करून निवडून येणं आणि नंतर भ्रष्ट लोकांना आणि गुंडांना पोसणं हे मला अमान्य आहे.

३९. हे अक्षता वाटपाचं काय प्रकरण आहे नक्की?

४०. त्या अक्षतांचं काय करायचं आहे नक्की?

४१. त्यापेक्षा ते तांदूळ एखाद्या भुकेल्या माणसाला देणं योग्य नाही का?

४२. मंदिरात असलेला राम बालरुपातच का आहे?

४३. मोदी रामाला हाताला धरून नेतायत हे चित्र चुकीचं आहे.

४४. हा सर्वधर्मसमभाव मानणारा अर्थात सेक्युलर देश आहे. धार्मिक प्रकरणांत सरकारचा सक्रिय सहभाग असणं चुकीचं आहे.

४५. एवढा जो निधी जमलं आहे त्याचा हिशेब कुठे आहे?

४६. या एवढ्या उधळपट्टीची काय आवश्यकता आहे?

४७. श्रीरामाच्या जयघोषात सीतेचा उल्लेखही का नाही?

४८. श्रीराम लिहिणंच योग्य आहे. श्री राम लिहिणं चुकीचं आहे.

४९. श्रीरामाच्या गळ्यात जानवं का नाही?

५० श्रीरामाच्या हातात आयुधं दाखवण्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय?

५१. एक सर्वसामान्य हिंदू म्हणून मला इतरही अनेक प्रश्न पडलेले आहेत.


"देशातल्या इतर सर्व समस्या संपल्या का?", "त्या ठिकाणी शाळा किंवा हॉस्पिटल का बांधत नाहीत", "तारीख का सांगत नाहीत" या प्रश्नांची उत्तरं मिळाली असल्याने किंवा ते तितकेसे समयोचित (relevant) राहिलेले नसल्याने किंवा न्यायालयाने तो गुंता सोडवलेला असल्याने हे आणि असे अन्य काही प्रश्न अलीकडे विचारले जात नाहीत नसल्याने ते वरच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाहीत.

राज्याभिषेकाच्या वेळी खुद्द श्री छत्रपती शिवाजी महाराजांनाही अशाच अनेकानेक प्रश्नांना आणि आक्षेपांना तोंड द्यावं लागलं होतं हे आपण जाणतोच. या वाक्यात श्रीराम किंवा शिवाजी महाराज किंवा मोदी यापैकी कुठल्याही व्यक्तीची अन्य दोन व्यक्तींशी तुलना करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही हे मराठीचं किमान ज्ञान असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या लक्षात येईल हे गृहीत धरून त्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही याची नोंद घेणे.

तर राज्याभिषेकाच्या वेळी खुद्द श्री छत्रपती शिवाजी महाराजांनाही अशाच अनेकानेक प्रश्नांना आणि आक्षेपांना तोंड द्यावं लागलं होतं हे आपण जाणतोच. सर्वसामान्य जनतेच्या मनावर असणाऱ्या शेकडो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीचं जोखड उखडून फेकून देऊन, कैक वर्षांत न झालेली एक अतिशय महत्वपूर्ण अशी ऐतिहासिक कृती किंवा हिंदू व्यक्ती सत्ताधारी होऊ शकते, तिचा राज्याभिषेक होऊ शकतो या गोष्टींची कल्पनाही करू न शकणाऱ्या किंवा त्यांचा साफ विसर पडलेल्या हिंदू हृदयांमध्ये नवचेतना फुंकण्यासाठी त्याच तोडीची काहीतरी प्रतीकात्मक कृती करणं आवश्यक आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी फार विचारपूर्वक राज्याभिषेकाचा निर्णय घेतला.


त्यात राजकारण होतं का? हो होतं....

त्यात समाजकारण होतं? नक्कीच होतं...

धार्मिक प्राबल्याचं दर्शन होतं का? अर्थात होतं..

शक्तिप्रदर्शन होतं का? होतंच होतं...

आपली दुचाकी स्वच्छ करण्यासाठी दुचाकीला बांधलेलं फडकं चोरीला गेल्यावर किंवा आपल्या पार्किंगच्या जागेत एखाद्या तिऱ्हाईताने गाडी लावल्यावर किंवा अगदी जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे ५ टक्के सूट मिळण्याऐवजी केवळ ३ टक्के सूट मिळाल्यानेही आपण संतापाने लालेलाल होतो. अर्थात त्यात काही चूकही नाही. कायदेशीररित्या आपल्या मालकीची असलेली आपली एखादी वस्तू, वास्तू, गोष्ट आपल्याकडून जेव्हा अन्याय्य पद्धतीने हिरावून घेतली जाते त्यावेळी असा संताप येणं आणि ती परत मिळवण्यासाठी बळाची, धनाची, काळाची पर्वा न करता ती वस्तू परत मिळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहणं यात काहीही चूक नाही. मग ते एकेकाळी आपल्या पूर्वजांचं असलेलं राज्य असो की आपल्या हृदयाच्या अगदी समीप असणाऱ्या एखाद्या उपास्य देवतेचं मंदिर असो. आणि एकदा का न्याय्य पद्धतीने विजय प्राप्त झाला की तो विजय साजरा करणं हेही सर्वार्थाने योग्यच. कारण ती वस्तू आपण बळाने जिंकलेली नसते तर आपलीच असणारी (Rightfully ours) वस्तू न्याय्य पद्धतीने लढा देऊन आपण परत मिळवलेली असते. यात इंग्रजांच्या जड जिभांना उच्चारता येत नसल्याने त्यांनी बॉम्बे केलेलं मूळ मुंबई हे नाव परत देणं, पाशवी क्रौर्याचं प्रदर्शन मांडत धर्मांध टोळ्यांनी दिलेलं अलाहाबाद नाव अडगळीत टाकून मूळच्या प्रयाग या नावाचं पुनरुज्जीवन करणं अशा सगळ्या उदाहरणांचा समावेश होतो.

'मोपल्यांचे बंड' मध्ये सावरकर तिथल्या हिंदूंच्या मानसिकतेला आणि धार्मिक अज्ञानाला उद्देशून म्हणतात की शत्रू वेशीवर येऊन उभा ठाकलेला असतानाही आपले लोक मात्र पळी-पंचपात्र आणि सव्य-अपसव्य यातच अडकून पडले होते. (तंतोतंत हेच शब्द नाहीत. पण मथितार्थ हाच). अंतिम लक्ष्य अर्थात पोपटाचा डोळा हा राममंदिराची उभारणी हा आहे. दिवस  कोणता? वार कोणता? नक्षत्र कोणतं? मुहूर्त कोणता? प्रसाद कशाला? आमंत्रण कशाला? अक्षता कशाला? याच्याच हस्ते का? त्याच्या हस्ते का नाही? यांच्या मताला किंमत नाही का? यांना आमंत्रण का? त्यांना का नाही? यात राजकारण का? धर्मकारण कशाला? शक्तिप्रदर्शन कशाला? हे आणि असे लक्षावधी प्रश्न अक्षरशः गौण आहेत या क्षणी. पिढ्यान् पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर हा एवढा महान सोहळा वास्तवात उतरतोय. तो याचि देही याचि डोळा पाहायला मिळण्याचं भाग्य आपल्या पिढीला लाभतंय!!


नव्या युगाची नांदी ठरेल असा सुवर्णक्षण काही पावलांवर आलेला असताना फुटकळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यात आनंदाने सहभागी होण्याचं समाधान मिळवायचं? की छिद्रान्वेषीपणा करत, निरर्थक मुद्दे मांडत, अर्थहीन आक्षेप घेत, आपले अहंकार कुरवाळत या सोहळ्याला गालबोट लावण्याचं समाधान पदरी पाडून घ्यायचं? दोन्हींमध्ये समाधान आहेच. योग्य पर्याय निवडण्याचा प्रगल्भ संतुलितपणा प्रत्येकाच्या ठायी येवो हीच त्या रामरायाचरणी प्रार्थना.

 जय श्रीराम !!!!

 --हेरंब ओक

रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन

काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) ' द हाऊसमेड ' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे , भरपू...