Tuesday, June 18, 2024

कडवट विकृतीचं दर्शन घडवणारं ‘बिटर चॉकलेट’

जगभरात अव्याहतपणे चालू असलेल्या बाल लैंगिक शोषणाला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेलेल्या पिंकी विराणी लिखित आणि मीना कर्णिक अनुवादित ‘बिटर चॉकलेट’ या २००९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात पानोपानी आढळणारा कडवटपणा पुस्तकाचं शीर्षक आणि मुखपृष्ठ (षांताराम पवार) यांनाही व्यापून राहिलेला आहे. शोषित
बालके, त्यांचे पालक, शेजारीपाजारी, नातलग, समाजसेवी संस्थांमध्ये कार्यरत व्यक्ती, समाजसेवक, (तथाकथित) माननीय न्यायमूर्ती, पोलीस आणि स्वतः शोषक अशा अनेक लोकांच्या या विषयाशी संबंधित अशा शेकडो अनुभवांचं संकलन असं या पुस्तकाचं स्वरुप आहे. यात अल्पवयीन मुलगा/मुलगी यांच्याशी त्यांचे सख्खे/सावत्र वडील, सख्खा भाऊ, मावस/मामे/आत्ये/चुलत भाऊ, काका, मामा, आजोबा, नोकर, स्वयंपाकी, मित्र, शेजारी, शिक्षक, क्रीडा शिक्षक, मैत्रीण यांनी जबरदस्तीने, धूर्तपणे, फसवून, ब्लॅकमेल करून केलेल्या लैंगिक शोषणाचे असंख्य संदर्भ दिले आहेत. या विषयावर जगभरात केल्या गेलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष, अभ्यासकांचे अनुभव, विविध अहवाल, अनेकविध पुस्तके यांचेही उल्लेख पुस्तकादरम्यान येत राहतात. पुस्तकाच्या अखेरीस दिसणाऱ्या संदर्भग्रंथांच्या यादीवरून नजर फिरवली असता, अतिशय अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं आहे हे लक्षात येतं.

पुस्तकाच्या पहिल्या पानापासून एकेक भयंकर अनुभव वाचत पुढे जात असताना आपला मेंदू आणि गात्रं बधिर होऊन जातात, संवेदना साकळून जाऊन हळूहळू मरून जातात. तरी पुस्तकातली अत्याचारी वर्णनं संपत नाहीत. पिंकी विराणी यांनी अरुणा शानभाग हिच्यावरील दुर्दैवी अत्याचाराचं वर्णन केलेलं 'अरूणाची गोष्ट' हे पुस्तक मी यापूर्वी वाचलं होतं. तेही असंच भयंकर अस्वस्थ करून टाकणारं आहे. हे पुस्तक वाचताना ती अस्वस्थता काही हजार पटींनी वाढलेली असते.    

सावजं कशी हेरली जातात, त्यांना कसं फसवलं जातं, अत्याचारपीडित बालकांची लक्षणं कोणती, तक्रार करणाऱ्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय असते, शोषक व्यक्तीची प्रतिक्रिया कशी असते, सामाजिक संस्था, पोलीस, डॉक्टर्स, समाज, न्यायालयं यांच्या जबाबदाऱ्या काय इत्यादी सर्व गोष्टींवर या पुस्तकात तपशीलवारपणे चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे या विकृतीवरचे उपाय, त्यापासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्याच्या पद्धती,  इत्यादींवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून त्या दरम्यान असंख्य शोषितांचे निरनिराळ्या भयंकर अनुभवांची पेरणी असं पुस्तकाचं साधारण स्वरूप आहे.

दरम्यान हे पुस्तक वाचताना प्रचंड धक्कादायक अशी काही माहिती मिळते ज्यामुळे वाचक पूर्णतः हादरून जातो. 'भक्ष्य' मिळण्याची सुलभता आणि अत्यंत ढिसाळ कायदे यामुळे जगभरातल्या विकृत जनावरांचं भारत हे आता एक अतिशय आवडतं स्थळ बनलं असून गोवा हा तर त्यांचा लाडका अड्डाच झालेला आहे. त्याखालोखाल हिमाचल, केरळ यांनाही प्राधान्य दिलं जात आहे. भारतीय मुलांमध्ये आढळणारं एड्सचं नगण्य प्रमाण हे देखील जगभरातल्या विकृतांचा ओढा भारताच्या दिशेने वाढण्यामागचं एक प्रमुख कारण आहे.

लेन पर्नड आणि तिच्या प्रियकरासोबत अठरा जणांवर गोवा पोलिसांनी खटला दाखल केला. केरळमधल्या कोवालम येथे एका जर्मन पर्यटकाला प्रत्यक्ष संभोग करताना पकडलं गेलं, पण त्याने लाच देऊन स्वतःची सुटका करून घेतली. गोव्यातल्या हॉटेलमध्ये पोलिसांनी अन्य एका जर्मन नागरिकाला एका अल्पवयीन मुलासोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह कृत्यं करत असताना पकडलं असता तो 'अनैसर्गिक गुन्हा करत असल्याचे सिद्ध होत नसल्याने 'आदरणीय' न्यायालयाने त्याला सोडून दिलं. गोव्यात अनाथाश्रमाच्या नावाखाली बाल लैगिक शोषणाचा भलामोठा कारभार चालवणारे फादर आणि ब्रदर फ्रेडी यांना जेव्हा १९९१ मध्ये अटक करण्यात आली तेव्हा पोलिसांना तिथे लहान मुलांची २३०० हून अधिक अश्लील छायाचित्रं, सिरिंज, झोपेची औषधं, कामोत्तेजक द्रव्यं असे अनेक पुरावे सापडले. परंतु पंचेचाळीस दिवसांच्या आत पोलिसांनी फ्रेडीला 'पुराव्यांच्या अभावी' जामिनावर सोडून दिलं.

बाल लैगिक शोषणासंदर्भातले भारतातल्या ढिसाळ कायद्यांची आणि निद्रिस्त न्यायव्यवस्थेची जगभरात इतकी दुष्कीर्ती पसरलेली आहे की न्यूझीलंडमधील एका पुरुषाला या गुन्ह्यासंदर्भात अटक झाली असतात त्याने आपला खटला भारतात चालवावा अशी विनंती केली आणि ती मान्यही करण्यात आली!!!

जगभरात वेगाने पसरणाऱ्या वोकीझम (wokism) नावाच्या अक्राविक्राळ राक्षसाने या क्षेत्रातही आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या पुस्तकात एकामागोमाग एक येणाऱ्या विकृत आणि किळसवाण्या वर्णनांनंतर आपलं मन निबर व्हायला लागलेलं आहे असं वाटत असतानाच पुस्तकाच्या  साधारणतः मध्यावर एक अत्यंत धक्कादायक आणि प्रचंड किळसवाणा असा गौप्यस्फोट केला जातो जो वाचून वाचकाच्या हातातून पुस्तक अक्षरशः गळून पडतं !!!

भारतात आणि जगभरात संभोगासाठी लहान मुलग्यांना मागणी असते ही वस्तुस्थिती आता सर्वत्र स्वीकारण्यात आलेली आहे. अमेरिकेत तर लहान आणि तरुण मुलांसोबत संभोग करता यावा यासाठी द नॉर्थ अमेरिकन मॅन बॉय लव असोसिएशन (नाम्बला - NAMBLA) नावाची एक संघटना स्थापन करण्यात आलेली असून "लहान मुलं आणि मोठी माणसं यांना आपलं प्रेम लैंगिक दृष्ट्या व्यक्त करावंसं वाटलं तर तो कायद्याने गुन्हा असू नये" या मागणीसाठी यांनी ही चळवळ उभी केली आहे. लहान मुलगे आवडणाऱ्या पुरुषांनी लिहिलेली 'व्हेअर द यंग वन्स आर' नावाची एक पुस्तिका अमेरिकेत हातोहात खपली. पाच डॉलर्स किंमत असणाऱ्या या ३० पानी पुस्तिकेच्या ७२००० प्रती तेरा महिन्यांत  संपल्या. 

सोळा वर्षाखालील २५ टक्के मुलग्यांना आणि ४० टक्के मुलींना अशा प्रकारचे अनुभव आलेले असतात. थोडक्यात २००२ पर्यंत लैंगिक दृष्ट्या शोषण होणाऱ्या मुलांमध्ये ४ कोटींहून अधिक मुलगे तर ६ कोटींहून अधिक मुली आहेत. या सगळ्या प्रकाराला कधीतरी कुठेतरी आळा बसावा, संबंधित कायद्यांमध्ये तातडीने सुधारणा व्हाव्यात असं आपल्यासारख्या सुजाण नागरिकांना वाटत असेल तर त्यासाठी लेखिकेने पुस्तकाच्या शेवटी केंद्रीय कायदा मंत्री, केंद्रीय गृहमंत्री, भाजप आणि काँग्रेस पक्ष आणि खुद्द पंतप्रधान यांच्या कार्यालयांचे संपर्कासाठीचे पत्ते दिलेले असून त्या पत्त्यांवर पत्रं पाठ्वण्याचं वाचकांना आवाहनही केलं आहे.

संपूर्ण पुस्तकभर वाचलेल्या गडद, काळ्या, विचित्र आणि विकृत अनुभवांच्या माऱ्यानंतर एका सकारात्मक नोंदीवर शेवट करण्याचा लेखिकेचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असला तरी पुरेसा मुळीच नाही. कारण पुस्तकभर निरनिराळ्या काल्पनिक नावांनी वावरणारी, असह्य यातना आणि अन्याय सहन केलेली खरीखुरी लहान मुलं मात्र यापुढे कधीच वाचकांच्या मेंदूतून, त्यांच्या जाणिवांमधून बाहेर पडणार नसतात. न्याय मिळावा यासाठी आपल्याकडे सतत आशेने बघणाऱ्या त्या अदृश्य मुलांना नजरेआड करण्याइतकं धैर्य आपल्या अंगी कधीच येणार नसतं!!!

--हेरंब ओक

No comments:

Post a Comment

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...