Saturday, August 28, 2010

एय उडी उडी उडी...

जेरेमी : आलं ना सगळं लक्षात?
हेरंब : ह्म्म्म
जेरेमी : पुन्हा सांगू का?
हेरंब : म्म्म्म.. चालेल..
जेरेमी : बरं.. थोडक्यात सांगतो. वर गेल्यावर दार उघडून मी उजवा पाय बाहेर ठेवीन. माझ्या पायाच्या किंचित अलीकडे तू तुझा उजवा पाय ठेवायचास. पुढचं सगळं मी बघून घेईन. त्यानंतर लगेच शरीराचा आकार धनुष्यासारखा करायचा. डोकं आणि पाय जास्तीत जास्त मागे न्यायचे. हात पुढे बांधलेले. नंतर मी तुझ्या खांद्यावर हळूच चापट मारून तुला खुण करेन तेव्हा हात पूर्ण पसरायचे.. आडवे. उडल्यासारखं करायचं. आत्ता इथपर्यंत पुरेसं आहे. उरलेलं मी नंतर सांगेन...
हेरंब : बरं.
नंतर जेरेमी हेरंबच्या पाठीला सॅकसारखं काहीतरी बांधतो.. अर्थात ते जे काही असतं ते साध्या सॅकच्या १५-२० पट जड असतं. दोन पट्टे पाठीवरून आणि दोन पट्टे पायातून येऊन मांडीजवळ आवळले जातात. आता हेरंब एकदम तयार असतो. जेरेमीच्या मते.. स्वतः हेरंबच्या मते तर तो कधीचाच तयार असतो.

जेरेमी : मी आता शुटींग करतो.
दोन-अडीच तास वाट बघत थांबल्याने हेरंबला आधीच कंटाळा आलेला असतो. कधी एकदा वर जातोय असं झालेलं असतं.. त्यामुळे जेरेमीच्या कॅमेर्‍यात बघून तो काहीतरी बडबडायचं म्हणून बडबडतो.

जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : हो
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : नाही
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : माहीत नाही
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : हो. पण मला आता फक्त वर जायचंय.
जेरेमी : ओके
हेरंब, जेरेमी, हेरंबचा एक मित्र आणि जेरेमीचा एक मित्र असे सगळे आत बसतात. पोरगेलासा पायलट विमान सुरु करतो.विमान कसलं ते? मारुती-८०० एवढी रुंदी आणि दोन मारुत्यांएवढी लांबी असलेलं आणि पंख असलेली एक गाडीच ती.जेरेमीने सांगितल्याप्रमाणे हेरंब पायलटच्या शेजारी बसतो. पाय पसरून. हेरंबच्या बरोबर मागे जेरेमी. जेरेमीच्या शेजारी हेरंबचा मित्र आणि जेरेमीचा मित्र बसतात. विमान सुरु होतं आणि बघता बघता आकाशात झेपावतं.जेरेमीने सांगितल्याप्रमाणे विमान सुरु झाल्याझाल्या हेरंब जेरेमीच्या पाठीला रेलून बसतो. हेरंब पूर्ण वेळ लहान मुलासारखा बाहेर बघत असतो. अडीच तासांपूर्वी लख्ख ऊन असणार्‍या आकाशात थोडे ढग दिसायला लागलेले असतात.. विमान प्रचंड घरघर, खरखर, धुस्सधुस्स करत असतं. त्यामुळे

जेरेमी : खरं १५ सेकंदांचा फ्रीफॉल आहे. त्यानंतर पॅराशूट उघडायचं. पण ढगांमुळे आपला फ्रीफॉलचा कालावधी ५ सेकंदांनी कमी होईल. कारण १०,००० फुटांऐवजी आपण ९,००० च जाणार आहोत.

हे हेरंबला

जेरेमी : खरं घरघरघरघर १५ घरघर फ्रीफॉल आहे. त्यानंतर पॅराशूट खरखरखर. पण ढगांमुळे आपला फ्रीफॉलचा घरघरघर ५ सेकंदांनी कमी होईल. कारण आपण १०,००० धुस्सधुस्स फक्त ९,००० च घरघरघरघर..

असं ऐकू येतं. बराच वेळ झाला तरी विमानाचं नाक अजूनही वर असल्याचं हेरंबला जाणवतं. एव्हाना खालच्या गोष्टी जवळपास साखरेच्या दाण्यांएवढ्या दिसायला लागलेल्या असतात. आणि सगळीकडे नुसतं पाणीच पाणी दिसत असतं. हेरंबच्या मनात किंचित भीतीसारखं काहीतरी टकटक करून जातं. "आता मागे नाही ना फिरता येणार?" अशासारखं काहीतरी. तो चटकन दुर्लक्ष करतो. आणि तेवढ्यात.... यस्स !!!!! 'तो' क्षण येतो. जेरेमी त्याच्या सॅकच्या पट्ट्यांचे हुक्स हेरंबच्या पट्ट्यांच्या हुक्समध्ये अडकवतो. दोघे उभे रहातात. जेरेमी विमानाचं दार उघडतो आणि त्याचा उजवा पाय विमानाच्या पायरी(??)वर ठेवतो आणि हेरंबला त्याचा उजवा पाय स्वतःच्या उजव्या पायाच्या अलीकडे ठेवायला सांगतो. आयुष्यात पहिल्यांदाच आपली विमानात चढण्याची आणि 'उतरण्याची' पद्धत सर्वस्वी भिन्न असणार आहे असले काहीतरी विचार हेरंबच्या डोक्यात येऊन जातात. हेरंब पाय विमानातून बाहेर काढून जेरेमीच्या पायाच्या अलीकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पाय नीट ठेवता येणार नाही याची अतिप्रचंड महाभयंकर वारा काळजी घेतो. कसाबसा पाय ठेवल्यावर थेट खाली बघितल्यावर उंचीSSSSSSचा थोडासा फोबिया की तत्सम काहीतरी हेरंबला जाणवून जातं. आता काय होणार असा क्षणभर विचार करत असताना जेरेमीने आपलं काम केलेलं असतं. एका सेकंदाच्या आत हेरंब अजूनही तोच विचार जमिनीपासून काही फुट जवळ येऊन करत असतो. भप्पसप्पठप्प आवाज करत वारा कानावरून जात असतो. जेरेमी खांद्यावर हलकी चापट मारून हेरंबला हात पसरण्याची आठवण करून देतो. जे काही घडतंय ते विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं असतं. इतक्या वेळ पडतोय तरी आपण अजून अधांतरी कसे असं वाटावं इतका वेळ मध्ये गेलाय असं वाटतं ना वाटतं तोच जेरेमी पुन्हा खांद्यावर चापट मारतो. हेरंब हात जवळ घेतो आणि अचानक गुरुत्वाकर्षणशक्तीला गंडवणारी एक शक्ती हवा बनून पॅराशूटमध्ये शिरते. पुन्हा भप्पसप्पठप्प आवाज कानाशी होतो पण यावेळी तो ठप्पसप्पभप्प असा वाटतो. जेवढ्या वेगाने खाली येत होतो तेवढ्याच वेगाने हेरंब आणि जेरेमी वर जायला लागतात. आईसक्रीम सांडून ठेवल्यासारखे ढगांचे गोळे मधून मधून दिसत असतात. "आयला, इथूनच तर खाली आलो ना? मग मगाशी कसे दिसले नाहीत हे?" असा विचित्र विचार करत हेरंब वर जात रहातो.. काहीच क्षण. नंतर सगळं नॉर्मल होतं अचानक. आता एकदम हलकं वाटत असतं. आजूबाजूला काय दिसतंय, काय घडतंय याच्या नोंदी हेरंबच्या मेंदूवर व्हायला लागतात. हे असं कित्येक सेकंदांनंतर होत असतं. मधला काही वेळ एवढा वेगात गेलेला असतो की नोंदी व्हायच्या आतच त्या जुन्या झालेल्या असतात आणि त्यांची जागा नव्या गोष्टींनी घेतलेली असते. मग झाडं, शेतं, जलाशय, पाणी, बिल्डिंग्स, गाड्या, रस्ते, लोकं, विमानं या सगळ्यांचे एक शंभरांश आकार दिसायला लागतात. हळूहळू जेरेमीची कलाकुसर दिसायला लागते. तो मधेच पॅराशूट गोलगोल फिरवतो, मधेच गिरक्या घेतो, मधेच वळवतो, मधेच घिरट्या घातल्यासारखं करतो. हवेशी खेळ चालू असतात, वारा भिरभिरत असतो. तीच तीच झाडं, शेतं वेगवेगळया कोनांतून दिसत रहातात. या सगळ्या इमुकल्या चिमुकल्या पिटुकल्या जगाचा राजा असल्यासारखं हेरंबला वाटतं. हे घिरट्यांचे खेळ बराच वेळ चालू रहातात. जेरेमी अगदी फॉर्मात आलेला असतो. ही त्याची दिवसातली सातवी उडी आहे याच्यावर कोणाचा सांगूनही विश्वास बसणार नाही अशा प्रकारे जेरेमीचे खेळ चालू असतात. बघता बघता एक शंभरांश आकार वाढत वाढत मोठे होत जाताना दिसायला लागतात. एव्हाना हेरंबलाही उंचीचा आणि त्या घिरट्यांचा थोडासा कंटाळा यायला लागतो. पाय जमिनीवर यायची वाट बघायला लागतात. हे सगळं जणु कळल्याप्रमाणे जेरेमी जमिनीच्या दिशेने झेपावायला लागतो. झूम्म्म्म्म्म करत दोघेही खाली येतात. एअरपोर्ट वर लँड होताना विमानाचा काढावा तशा धर्तीवर हेरंब आणि जेरेमीचा धरतीवर पाउल ठेवायच्या काही क्षण आधी एक फोटो टिपला जातो आणि हेरंब एकदाचा जमिनीवर येऊन पोचतो. थोडंसं गरगरत असतं. जाम बरं वाटतं. तेवढ्यात जेरेमी कानाशी येऊन किंचाळतो. "माझं नाव काय??".. फुटला न फुटला अशा आवाजात हेरंब "ज्ये र्र मि" असं काहीसं बडबडतो. क्लिक खटॅक.. कॅमेरा ऑफ. गुड बाय जेरेमी. हेरंब पुन्हा एकदा खात्री करून घेतो.. सुखरूप असतो.. हातीपायी धड असतो... "एय उडी उडी उडी" बरोब्बर जमिनीवर पडलेली असते.

तळटीप क्र. १ : खरं तर ही वाचण्याची नाहीच तर तर बघण्याची किंबहुना करण्याची गोष्ट. तरीही उगाच कायतरी लिहिल्यासारखं केलं. आवडलं नसेल, कळलं नसेल तरी खालचा व्हिडीओ बघा लगेच. तेवढंच (माझं) पापक्षालन होईल... आणि हो. धरतीवर पाउल ठेवतानाचा फोटू पण आहेच.

तळटीप क्र २ : प्रथमपुरुषी एकवचनाऐवजी उगाच टीपी म्हणून विशेषनामाचा वापर केला. पण खरं सांगतो, इतक्या वेळा स्वतःचं नाव लिहिताना, वाचताना भारी मजा येते. अगदी जनार्दन नारो शिंगणापूरकराची शप्पत !!

तळटीप क्र ३ : ही आमची शंभरावी नोंद. अर्थात या टिपेचा या नोंदीशी काहीही संबंध नाही हा भाग अलाहिदा.

व्हिडीओ इथे चिकटवला आहेच आणि आता त्याचा उजवीकडचा भाग कापलाही जात नाहीये. धन्स कांचन. आणि हा तूनळीचा दुवा. जस्ट इन केस.. :)

http://www.youtube.com/watch?v=fEvDlHzYBNo




75 comments:

  1. वा रे वा! कसला नर्व्हस दिसतोयंस तू. पण उडी मारल्यावर मज्जा आली ना!. डर के आगे जीत है! सही आहे.

    पण उगाच नसते किडे सोडतोस तू डोक्यात. आता इथे मुंबईला चौपाटीवर पण असलं काही तरी करतात पण तू जे केलंस तशी मजा इकडे कुठे यायला. इकडे काही विमानगाडी नाही.

    व्हिडिओला म्युझिक चांगलं निवडलं आहेस. तुझा दुसरा इंडिया नाईट व्हिडीओ पण पाहिला. छान आहे एडिटींग. आवडला.

    ReplyDelete
  2. अरे तो वीडियो मधला प्राणी सेम तुझ्यासारखा दिसतोय...
    स्टंटमन आहे का?
    हे..हे...वीडियो छान आहे....
    माझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे पोस्टमध्ये काय लिहिले ते महत्वाचे नाही
    आपले फोटो, वीडियो लोकांना दिसणे महत्त्वाचे...

    ReplyDelete
  3. जाम भारी रे... कसलं टेन्शन तुझ्या चेहर्‍यावर दिसत होतं.. पण सह्ही.. विमानाच्या खिडकीतून सुरक्षीतपणे खाली मुंग्या पाहणे आणि तुझ्यासारखं मुंग्या पाहणे आणि डोक्यात त्या येणे हा अनुभव निराळाच ;)
    जबरीच...

    ReplyDelete
  4. खर खर सांग फाटली न फुल टू.....:P

    ReplyDelete
  5. आयला एकदम भार्र्र्री...मस्त उडी आवडली..
    वीडियो झक्कास हाय :)

    ReplyDelete
  6. १०० पोस्टांसाठी अभिनंदन....
    शंभरी भरल्यासारखा चेहरा होता बरं तुझा व्हिडीओत ;)

    ReplyDelete
  7. आणि हो अभि आणि नंदन शंभरी भरल्याबद्दल ;)

    ReplyDelete
  8. चि .. त्त.. थ .. रा ... र ... क.... ... .... ..
    अजून काटा आहे अंगावर ... जबरी

    ReplyDelete
  9. खरं सांग, उडी मारल्यावर थोडा घाबरला होतास की नाही?? :)
    व्हिडीओ मस्त आहे. पण हा व्हिडीओ घेतला कोणी??

    ReplyDelete
  10. आयला भारीच कि एकदम जबऱ्या
    तुझ्या चेहऱ्यावर जाम टेन्शन दिसत होते पण ;)

    आणि १०० व्या पोस्टीबद्दल शुभेच्छा :)

    ReplyDelete
  11. जबरदस्त अनुभव आहे. मस्त! बाकी १०० लेख झाल्याबद्दल अभिनंदन! लिहिते रहो!

    ReplyDelete
  12. भन्नाटच रे.... वाटच पहात होते तुझ्या या पोस्टची.. :)

    आधि ’उडी” म्हटल्यावर एक क्षण आदिने नवा पराक्रम केला असे वाटले होते पण प्रत्यक्ष बाबाची उडी :)... सही आहे रे अनुभव...

    >>>> पण हा व्हिडीओ घेतला कोणी??
    माझापण हाच प्रश्न...

    बाकि तूला हवेतही तोंड बंद ठेवणे अवघड जात होते हे मात्र समजले हं... ’वटवटीची’ सवय दुसरे काय!! ;)

    ReplyDelete
  13. >>>>१०० पोस्टांसाठी अभिनंदन....
    शंभरी भरल्यासारखा चेहरा होता बरं तुझा व्हिडीओत ;)

    आप +१

    ReplyDelete
  14. अरे सहीच मज्जा आहे तुमची. ......


    अरे तुझी चित्रमाला(video) उजवी कडून कापली जाऊ नये म्हणून हे कर.

    sign in into blogger > go to Design > then select template designer > in template designer select layout > then select adjust width
    आता चित्रमाला प्रमाणे adjust kar.

    ReplyDelete
  15. सही रे... एकदम स्वप्नवत.. मी सुद्धा ग्लायडिंगचा प्लान करतोय...बघूया कधी प्लान फळाला येतोय...

    ReplyDelete
  16. हेरंबा...एकदम भारी विडियो...वर्णन पण मस्त केलयस...नाबाद शतक...अभिनंदन

    ReplyDelete
  17. शतकी खेली भन्नात आहे (बरहा नाही सो मराठी बोबडी वलतेय जरा।।।) मला शीर्षक solid आवडलय चल video आला म्हणून बर आहे.
    विमानात चधायच्या बरयाच पद्धति झाल्यात पण उतारन्याचि भन्नात पद्धत फ़क्त नवर्याच्या wishlist मध्ये ताकेन।।।

    ReplyDelete
  18. प्रचंड भारी!
    व्हिडिओ भारी आहेच...
    पण मला ओएसटी फार आवडला! ;)
    लय लय लय भारी
    आणि शंभरी एकदाची भरल्याबद्दल अभिनंदनाचं पात्र! ;)

    ReplyDelete
  19. फारच धाडसी कृत्य.. आणि अतिशय थरारक वर्णन.. मला तर वाचताना पण काटा आला अंगावर..
    btw वर्तमानकाळात लेख लिहिण्यामागे विशेष उद्देश ??

    ReplyDelete
  20. जबऱ्या !!!!!

    फ्रीफॉलमधे भरपूर बोलायचं होतं पण अतिप्रचंड महाभयंकर वाऱ्यानं गप्प बसवलं नं? नं?? नं????? :D

    पण मानलं लेका, खल्लास !!!

    ReplyDelete
  21. हनुमान ........
    [गाल फुलवले होतेस म्हणून :)]


    एकदम मोठी उडी................

    ReplyDelete
  22. खरं खरं सांग...घाबरलेलास नं..अरे काय मस्त अनुभव असेल न.. विडीओ पण मस्त दिसत होता रे..मुझिक पण सही एकदम......

    ReplyDelete
  23. हेहे.. आभार्स.. अग हो.. थोडा नर्व्हस होतोच.. मेन म्हणजे दार उघडून बाहेर बघितल्यावर जे काय दिसत होतं ते बघून जरा तंतरली होतीच.. पण एकदा उडी मारल्यावर जाम धमाल आली. चौपाटीवर माझ्या मते पॅरासेलिंग असेल ना? अर्थात पॅरासेलिंगलाही मजा येतेच.. पण हा स्काय डायव्हिंग म्हणजे अगदी अशक्य प्रकार आहे !!!

    अग आणि व्हिडिओ, म्युझिक, एडिटिंग हे सगळं त्यांनीच केलं आहे. त्यांच्या पॅकेजमध्येच हे सगळं इन्क्लुड आहे. रच्याक, इंडिया नाईटचा कुठला व्हिडिओ म्हणते आहेस? मी हा एकच व्हिडीओ टाकलाय युट्यूब वर..

    ReplyDelete
  24. :) अरे मी म्हंटलं ना..ही लिहिण्या/वाचण्याची गोष्टच नाही. करण्याची गोष्ट आहे. म्हणून तर पापक्षालनासाठी व्हिडीओ टाकलाय. आणि (निदान या पोस्टमध्ये तरी) व्हिडीओच सगळ्यांत महत्वाचा आहे.. नाही का?

    ReplyDelete
  25. आनंदा, शेवटच्या क्षणी टेन्शन होतंच.. फक्त भीती वगैरे असले स्ट्रेट शब्द न वापरता मावशीकडून 'फोबिया' उसना घेतला तात्पुरता ;)

    अरे खरंच जब्बरदस्त अनुभव होता हा !!! अगदी अविस्मरणीय !!

    ReplyDelete
  26. सागरा, उडी मारायच्या आधी एक क्षण एकदम फुलटू.. पण नंतर फुल यांज्वाय !!

    ReplyDelete
  27. धन्स सुहास :) .. धमाल उडी होती ही..

    तुझ्या अभि आणि नंदनाबद्दल आभ आणि आर ;)

    ReplyDelete
  28. आभार आनंद, अरे उडी मारताना शंभरी जवळपास 'भरल्यातच' जमा होती.. (पाय जमिनीला लागल्यावर 'रिकामी झाली')

    ReplyDelete
  29. आभार प्रसाद.. खरंच चित्तथरारक अनुभव होता तो..
    आणि ब्लॉगवर स्वागत... अशीच भेट देत रहा..

    ReplyDelete
  30. अहो थोडा कसला चांगलाच घाबरलो होतो.. पण उडी मारल्यावर नाही. उडी मारायच्या जस्ट आधी. विमानाचं दार उघडल्यावर.. फक्त भीती वगैरे न म्हणता तो फोबिया वाला गोंडस शब्द वापरला आहे... ;)

    जेरेमीच्या डाव्या मनगटावर कॅमकॉर्डर बांधलेला होता. त्यानेच पूर्ण शुटींग केलं आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितलात तर लक्षात येईल बघा की त्याचा डावा तळवा/मनगट दिसत नाहीये.

    ReplyDelete
  31. हेहे.. धन्स विक्रम.. अरे टेन्शन होतंच राव.. लय टेन्शन.. पण मजाही तेवढीच आली..

    आणि आभार... आणि तुलाही ब्लॉगच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.. तुझ्या ब्लॉगवर कमेंटलो आहेच..

    ReplyDelete
  32. खूप आभार निरंजन.. :) खरंच थरारक अनुभव होता..

    नर्व्हस नायंटीज मधून बाहेर पडायला २ महिने लागले :( .. नव्वदावी पोस्ट जुलैच्या सुरुवातीला लिहिली होती.. शंभरावी पोस्ट ऑगस्टच्या अखेरीस :( .. पूर्वी महिन्याभरात एवढं लिहून व्हायचं.. असो.. लिहितं राहण्याचा प्रयत्न करत राहणारच !

    ReplyDelete
  33. अग.. त्यांच्याकडून डीव्हीडी मिळायला ८-१० दिवस लागले त्यामुळे पोस्ट अडकली होती. डीव्हीडी आल्या आल्या लगेच जागून पोस्ट टाकली :) .. हो यावेळी फॉर अ चेंज बाबाच्या उडीवर लिहिलं आहे. लेकावर पोस्ट असती तर "उड्याच उड्या चोहीकडे" असं काहीतरी नाव द्यावं लागलं असतं ;) ..

    व्हिडीओ जेरेमीने घेतलाय. वर काकांना उत्तर दिलंय बघ.. वटवटीची सवय हा हा हा .. अग तोंड उघडलं की वारा असा भस्सकन तोंडात शिरायचा ना की काही विचारू नकोस. थोडक्यात तोंड दाबून वाऱ्याचा मार चालला होता :)
    आणि शंभरी भरता भरता राहिली म्हणून तर शंभरीची पोस्ट टाकता आली ना ;)

    ReplyDelete
  34. आभार मकरंद.. हो जामच मजा आली..

    आणि व्हिडिओच्या मार्गदर्शनाबद्दल आभार.. पण तू सांगितल्याप्रमाणे करून बघितलं तर "Not applicable for this template." असा मेसेज येतोय. माझं ब्लॉगर.कॉम चं टेम्प्लेट नसल्याने (दुसऱ्या एका साईटवरून हे टेम्प्लेट घेतलंय मी) बहुतेक असा मेसेज येत असेल. असो. तरीही मदतीबद्दल आभार.

    आणि अर्थातच ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा नेहमी.

    ReplyDelete
  35. आभार भारत.. खरंच स्वप्नवत अनुभव होता तो.. मी ग्लायडिंग मनालीला केलं होतं.. जाम मजा येते.. जमलं तर सेलिंग पण कार.. तोही एक जाम भन्नाट अनुभव असतो..

    ReplyDelete
  36. आभार देवेन.. व्हिडीओ भारीच आहे. वर्णनाची कल्पना नाही ;)

    झालं बाबा शतक कसंबसं :)

    ReplyDelete
  37. चला.. मी शीर्षकाबद्दलच्या कमेंटचीच वाट बघत होतो.. and you said it!! .. मलाही शीर्षक जाम आवडलं होतं.. अग अ‍ॅक्चुअली पूर्वी भारतात असताना आम्ही क्रिकेट खेळायला जाताना एका ग्राउंडच्या कंपाउंडवरून उडी मारून जायचो.. तेव्हा मी हे गाणं फेमस केलं होतं ग्रुप मध्ये.. ;) आता ही महाउडी म्हंटल्यावर दुसरं कुठलंही शीर्षक डोक्यात येणं शक्यच नव्हतं..

    नक्की नक्की सांग दिनेशला. विमानातून उतरायची ही सर्वात भन्नाट पद्धत या मताशी तोही १०१% सहमत होईल :)

    ReplyDelete
  38. आभार रे बाबा.. ओएसटी ?? म्हंजी? ट्यूब पेटंना.. वाईस विस्कटा की..

    अगदी बरोब्बर बोललास.. शंभरी 'एकदाची' भरली.. खरं आहे.. !

    ReplyDelete
  39. अरे, तुझा व्हिडीओ इथे पूर्ण येत नव्हता म्हणून डायरेक्ट यूट्यूबवर पाहिला, त्यानंतर तुझ्या नावाशी साधर्म्य असलेल्या दुस-या कुणाचा तरी व्हिडीओ समोर आला. मला वाटलं तो पण तुझाच. असो. हे तुझं अ‍ॅडव्हेंचर लई भारी आहे. तू म्हणतोस ते पॅरासेलिंगच ... आहे इकडे चौपाटीला पण स्काय डायव्हिंगसारखं थ्रिल नाही त्यात. शंभरावी पोस्ट आणि एवढी मोठी उडी! दोन्ही साठी अभिनंदन!

    ReplyDelete
  40. छे.. खास उद्देश असा काहीच नाही.. वेगळा अनुभव होता म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे "मग तो हे म्हणाला.. मग विमान आकाशात झेपावलं.... खालच्या वस्तू खूपच लहान दिसत होत्या" असं भूतकाळातलं वर्णन फारच टिपिकल वाटत होतं मला लिहिताना.. म्हणून जरा वेगळा प्रयत्न केला..

    आणि याच प्रश्नाचं उत्तर थोडा भाव खत/स्टाईल मारत द्यायचं झाल्यास असंही देता येईल.. "तो प्रसंग इतका अविश्वसनीय आणि चित्तथरारक होता की अजूनही तो प्रसंग मी जगतोय असंच वाटतंय.. म्हणून त्या भावना जशाच्या तशा वर्तमानकाळात उतरवल्या.." (असो.. हे अति होतंय.. !! ;) )

    ReplyDelete
  41. हेरंब, हा व्हिडीओ उजवीकडे थोडा तुटक येतो. व्हिडीओच्या एम्बेड कोड मधील width="468" height="282" केलीस तर बरोबर बसेल. उंची व रूंदी कोडमधे दोन ठिकाणी बदलावी लागते.

    ReplyDelete
  42. नचिकेता, अनेक आभार्स..

    अरे भरपूर बोलतोय कसला.. बोलती बंद झाली होती... बोबडी वळली होती :) पण सुरुवातीलाच... नंतर जाआआआम धमाल आली..

    अरे बे-एरियातही हा प्रकार आहे.. गुगल करून बघ..

    ReplyDelete
  43. हा हा हा हनुमान !! बायकोही तेच म्हणाली व्हिडीओ पाहिल्या पहिल्या..

    हनुमानासारखी उडी म्हणून हनुमानासारखे गाल ;)

    ReplyDelete
  44. योग, धन्स, धन्यु , आभार्स :)

    ReplyDelete
  45. माऊ, वर म्हंटलं तसं दार उघडल्या उघडल्या घाबरलो होतोच.. पण नंतर धम्माल !! खूपच सही अनुभव होता !! व्हिडिओ आणि म्युझिक ही सगळी त्यांची कमाल. माझं कर्तृत्व शून्य :)

    ReplyDelete
  46. ओह अच्छा.. अग "heramb skydiving" असं युट्यूबवर टाकलं तर बरेच व्हिडीओज येतात. थोडक्यात हेरंब नावाच्या अनेकांनी आधी स्कायडायव्हिंग केलेलं आहे ;) .. पॅरासेलिंग सही आहे.. मी गोव्यात केलं आहे. पण यस.. स्काय डायव्हिंगचं थ्रिल कशातच नाही.. दोन अभिनंदनांसाठी डब्बल आभार्स.. :)

    अग आणि तू सांगितल्याप्रमाणे ते एम्बेड कोड मध्ये width आणि height सेट केल्यावर आता व्हिडीओ मस्त दिसतोय.. खूप आभार.. काल पहाटे ४:३० ला पोस्ट टाकली तेव्हा काहीच डोकं चालत नव्हतं त्यामुळे सरळ युट्यूबची लिंक दिली होती.. पुन्हा एकदा आभार..

    आणि हो.. आज 'सकाळ' च्या ब्लॉगइट मध्ये मोगरा फुलला वर लेख आहे.. खूप खूप अभिनंदन !!

    ReplyDelete
  47. व्हिडीओ मस्त आहे अभिनंदन

    ReplyDelete
  48. काका, खूप आभार ..

    ReplyDelete
  49. शंभराव्या पोस्टमध्ये शंभरी भरण्याचा प्रयोग जबराटच. व्हिडिओ छान आलाय. सुरवातीला थोडासा टेन्स नंतर क्षणभरच उडी घेऊ की मागे फिरूचे भाव... अर्थात मागे फिरायला जागाच नव्हती... :D. नंतर मात्र तू मज्जा केलेली दिसते आहे स्पष्ट. सहीच. चला आता लवकरच हा अनुभव घ्यायला हवा. :)

    ReplyDelete
  50. भारी रे, वीडियो पाहून शंभराव्या पोस्टची वटवट करण्यासाठी सत्यवानाने जेरेमीला खांद्यावर घेऊन अवतार घेतल्यासारखे वाटले ;-)

    स्कायडायव्हिंग हा प्रकार साला भन्नाट असतो. टेक्सासला सहकार्यांबरोबर गेलेलो. बाकीचे स्कायडायव्हिंग करून आले पण माझी हिंमत नाही झाली. उंचीची जाम भीती वाटते बाबा. आंबे पण झाडावर न चढता खालून दगडी मारुन पाडणारे आम्ही इथे तर डाइरेक्ट ईमान!!! पण स्कायडायव्हिंग करायची इच्छा आहे. पुढच्या वेळी कधी संधी मिळाली तर तुझी उडी स्मरून झोकून देईन म्हणतो ;-)

    बाकी सर सचिनचा चाहता म्हणून तूदेखील नर्व्हस नाइन्टीमध्ये रेंगाळला का?

    ReplyDelete
  51. आयला, मस्त रे! मी तर खाली आल्यावर विचारलं असतं, "मै कहां हूं?" हाहा.

    ReplyDelete
  52. अत्यंत exciting अनुभव दिसतो आहे. वाचताना मजा आली.

    ReplyDelete
  53. That really is an extraordinary experience to be in sky,tried that thing in Longmont,Colorado.G-Force acting on body is tremendous,dude your a brave one,I was literally crying

    ReplyDelete
  54. धन्स ताई.. अग शंभरी भरता भरता राहिली.. वाचलोच.. ;) .. पण उडी मारल्यावर मात्र जी काही धम्माल केलीये त्याला तोड नव्हती !! खरंच हा प्रकार एकदा तरी अनुभवून बघितलाच पाहिजे !! तुमच्या इथेही असेलच हे नक्की.. खरंच एकदा करून बघ.. भीतीचा अर्धा क्षण सोडला कि बाकी सगळी नुसती धम्माल आहे !!

    ReplyDelete
  55. धन्यु सिद्धार्थ.. जेरेमीला खांद्यावर घेऊन अवतार ... हाहाहा.. जामच भार्री :)

    अरे भीती तर वाटतेच.. मला तशी उंचीची भीती वाटत नाही पण तरीही विमानाचं दार उघडल्यावर खाली बघितल्यावर काय होईल हि भीती मला कायम वाटत होती आणि प्रत्यक्षात दार उघडल्यावर ती तशीच्या तशी चेहऱ्यावर आली. पण तो एकच क्षण असतो भीतीचा.. कारण एक पाय बाहेर ठेवल्यावर उडी मारण्याचं काम जेरेमीच करतो. आणि त्यानंतर जे काही घडतं ते शब्दांत सांगणं अशक्य आहे. केवळ अवर्णनीय !! जेव्हा जमेल तेव्हा नक्की नक्की कर एवढंच सांगेन..

    >> बाकी सर सचिनचा चाहता म्हणून तूदेखील नर्व्हस नाइन्टीमध्ये रेंगाळला का?

    यु सेड इट.. अगदी अगदी तसंच झालंय बहुधा.. २ महिन्यात १० पोस्टी फक्त :( .. १०० झाल्यावर सर सचिन एकदम छकडा लगावतात तसं काहीसं होईल अशी आशा बाळगून आहे ;)

    ReplyDelete
  56. हा हा मंदार... माझंही काहीसं "मै कहां हूं?" च झालं होतं ;)

    ReplyDelete
  57. सविताताई, खूप आभार.. हो फारच विलक्षण अनुभव होता हा !!

    ReplyDelete
  58. Hey Anee.. It's indeed an extra ordinary experience !! G-Force is tremendous until you open the parachute !! After that it's all anti-gravity for few seconds .. !! it's great mix n match of G-force and anti ..

    crying?? hahaha.. send me ur youtube link.. i wanna watch.. ;)

    ReplyDelete
  59. Haven't uploaded on youtube yet but now sure will.

    ReplyDelete
  60. Great.. Send me the link once done..

    ReplyDelete
  61. जबराट....च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक...अरे विडीयो प्रचंड भारी आहे...तुझी शंभरी भरली रे...त्याबद्दल अभि+नंदन...

    ReplyDelete
  62. धन्स यवगेशा.. फ़ट्याक+अभि+नंदन .. तिघांबद्दलही ;)

    ReplyDelete
  63. बाब्बो..
    चांगलच यंजाव केलस की! जोराच्या वार्‍याने मधे तुझा चेहरा जिम कॅरीसारखा दिसत होता.
    शंभरी भरली, अभिनंदन!

    ReplyDelete
  64. व्हय व्हय.. जामच यंजाव झालं बगा.. जिम कॅरी .. हा हा हा.. माझ्या मनात सहज एक विचार डोकावून गेला की जिम कॅरीने जर 'उडी उडी' केलं तर त्याचा चेहरा कसा दिसेल? ;)

    आणि शंभरीच्या अभिनंदनाबद्दल शंभर आभार :)

    ReplyDelete
  65. That was very scary!!! :D you did it damm well!!

    ReplyDelete
  66. Anagha :D .. Yeah, the moment he opened the door was indeed scary one but after that it was all fun :D

    Thanks for the comment and welcome to the blog. Keep visiting !!

    ReplyDelete
  67. मी आपला एक वाचक आहे (silent) !! शंभरी बद्दल मनापासून अभिनंदन !! मस्त आहे लेख आणि video सुद्धा - लेखाशिवाय video ला मजा नसती आली हे नक्की ! पुन्हा एकदा अभिनंदन !!

    hey - video मध्ये पहिले काही seconds डोळ्यावर eye gear आहे नंतर दिसले नाहीत मध्येच वार्यामुळे उडून गेले कि काय ?

    ReplyDelete
  68. खूप खूप आभार विक्रम..

    आय गिअर बद्दल : अरे फ्री फॉल च्या वेळी आय गिअर मस्ट आहे. नाहीतर वाऱ्यामुळे डोळे बंदच ठेवावे लागतील. पण एकदा का फ्रीफॉल संपला (सुरुवातीच्या १०-१५ सेकंदांनंतर) की मग पॅराशूट उघडलं जातं त्यानंतर आय गिअरची गरज नसते. त्यामुळे पॅराशूट उघडल्यानंतर त्याने मला आय गिअर काढून टाकायला सांगितले. अर्थात ते एडीट केलं असल्याने व्हिडिओमधे नाहीये :)

    हा हा .. आणि ते उडून नाही गेलेत. शेवटच्या पाच सेकंदांचा व्हिडीओ ज्यात मी लँड झालोय ते पुन्हा बघ. त्यात तुला माझ्या गळ्यात आय गिअर अडकवलेला दिसेल. :)

    सही निरीक्षण आहे.. मानलं तुला. :D

    ReplyDelete
  69. हेरंब,
    खरच lifetime experience आहे हा!
    अभिनंदन १०० पोश्टी पूर्ण झाल्याबद्दल.

    ReplyDelete
  70. अगदी अगदी... जाम ग्रेट अनुभव होता..

    खूप आभार्स :)

    ReplyDelete
  71. लौली... फट्ट्यांग एक्दम... माझा मित्र करुन आला sky-diving... त्याची तारीफ करताना तो तसाच हवेत तरंगायला लागतो. :D

    ReplyDelete
  72. सौरभ, पुढे जेव्हा केव्हा कोणाच्या स्काय डायव्हिंग बद्दल बोलशील तेव्हा त्यांना सांगताना "माझ्या *दोन* मित्रांनी स्काय डायव्हिंग केलं आहे आणि त्याविषयी बोलताना ते तसेच हवेत तरंगायला लागतात" असं सांगितलंस तरी हरकत नाय. कारण ते पूर्णतः खरं आहे ;)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...