Saturday, February 25, 2023

भारत-पाकिस्तान ते कोरिया-जपान.... व्हाया चीन

गेल्या एक-दीड महिन्यांत दोन अप्रतिम पुस्तकं वाचण्याचा योग आला. अक्षरशः खिळवून ठेवणारी, हतबुद्ध करून सोडणारी! एक फिक्शन कादंबरी आणि दुसरं म्हणजे आत्मचरित्र. कादंबरी आहे ती ही भारतात घडलेल्या एका महत्त्वाच्या घटनेवर आणि त्या घटनेच्या अनुषंगाने घडलेल्या अनेक लहान मोठ्या तपशीलांबाबत महिती देणारी तर आत्मचरित्र आहे ते एका उत्तर कोरियन व्यक्तीचं.

८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पंतप्रधानांनी निश्चलनिकरणाची ऐतिहासिक घोषणा केली. या महत्त्वाच्या घटनेला मध्यवर्ती ठेवून श्री अय्यर यांनी 'हू पेंटेड माय मनी व्हाईट?' ही कादंबरी लिहिली. निश्चलनिकरण, त्याची कारणं , आवश्यकता, अनिवार्यता, परिणाम अशा अनेक अंगांना लेखाने या पुस्तकात स्पर्श केला आहे. भारतीय राजकारणातील अनेक चिरपरिचित पात्रं, त्यांचे स्वभाव, लकबी घेऊन आणि मूळची नावं किंचितच बदलेल्या स्वरूपात आपल्याला भेटतात. त्यात चिदंबरम पासून ते सोनिया आणि मोदींपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

भारतीय चलनाची छपाई करण्यासाठीच्या एका यंत्राच्या (LEPE Machine) गुप्त लिलावाच्या घटनेपासून पुस्तकाला सुरुवात होते आणि प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला आणि अखेरीस एकेक नवीन धक्का वाचकांना बसत जातो. अनेक घटनांची मांडणी असूनही वेगवान हाताळणीमुळे पुस्तक कुठेही आणि किंचितही कंटाळवाणं होत नाही. काही वेळातच कोट्यवधी खोट्या नोटा घेऊन केरळच्या किनाऱ्यावर पोचणारं जहाज, त्या पैशाचं शिताफीने आणि अतिशय नियोजनबद्ध रीतीने करण्यात आलेलं वाटप अशा अविश्वसनीय घटनांबद्दलच्या माहितीबरोबरच त्या पैशाचा लव्ह-जिहाद, लॅन्ड-जिहाद, दहशतवादी उद्योग इत्यादींनासाठी केला जाणार वपर आणि या सगळ्यात पाकिस्तानचा असणारा थेट सहभाग  याविषयी अतिशय खुलेपणाने मांडणी केलेली आढळते. त्याच्याच जोडीला, दरम्यानच्या काळात भारतीय राजकारणात घडणाऱ्या घटना आणि राजकारण्यांचे निर्ल्लज उद्योग वाचताना अक्षरशः संताप येतो.

श्री अय्यर

श्री अय्यर यांच्या मनी सिरीजमधील हे पाहिलं पुस्तक असून दुसरं पुस्तक 'हू पेंटेड माय लस्ट रेड?' हे आयपीएल मधील राजकीय लागेबांधे आणि भ्रष्टाचारावर आधारित आहे. तर तिसरं पुस्तक 'हू पेंटेड माय फ्युचर ब्राईट?' असून ते भारतीय राजकारणातील नजीकच्या भविष्यकाळात घडू शकणाऱ्या घटनांबद्दल आहे. ही  दोन पुस्तकंदेखील लवकरच वाचण्याचा मानस आहे.  

'हू पेंटेड माय मनी व्हाईट?' मध्ये असंख्य छोटे छोटे तपशील आहेत आणि अनेक राजकीय घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघितलं गेलं आहे. त्यामुळे अधिक लिहिण्यापेक्षा हे पुस्तक आवर्जून वाचावं असं मी सांगेन. या पुस्तकाचा अनुवादही उपलब्ध असून घातसूत्रचे लेखक श्री दीपक करंजीकर यांनी 'विघ्नाविराम' या नावे तो केला आहे.

=======================================

'अ रिव्हर इन डार्कनेस' 


'अ रिव्हर इन डार्कनेस' या मासाजी इशिकावा (Masaji Ishikawa) लिखित आत्मचरित्रात उत्तरकोरियाच्या 

कम्युनिस्ट हुकूमशाही सरकारच्या राजवटीत असंख्य हालअपेष्टा आणि भ्रष्टाचार आणि उपासमार यामुळे मरणोन्मुख झालेल्या जनतेचं अत्यंत भयकारी चित्रण आहे. लेखकाचे वडील मूळचे दक्षिण कोरियन असून आणि आई जपानी होती. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या जपानच्या पराभवानंतर सुमारे चोवीस लाख कोरियन सैनिक जपानमध्ये अडकून पडले ज्यात लेखकाचे वडीलही होते. कालांतराने त्यांचं स्थानिक जपानी मुलीशी लग्न होतं. काही वर्षांनी जपानमध्ये अडकलेल्या कोरियन नागरिकांना जवळपास जबरदस्तीनेच उत्तर कोरियाला नेण्यात येतं, ज्यात जपान सरकारचाही अप्रत्यक्ष सहभाग होता.

उत्तर कोरिया म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग असून तिथे जाणं हे जणू  प्रत्येक कोरियन नागरिकाचं कर्तव्यच आहे हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात उत्तर कोरियाला पोचल्यानंतर स्वर्ग तर राहोच पण किमान नागरी सुविधा आणि प्राथमिक गरजा पूर्ण होण्याच्या बाबतीतही तिथे कशी मारामार आहे हे लेखकाच्या कुटुंबियांच्या लक्षात येतं. त्यात पुन्हा जपानमधून आलेले (Returnees) म्हणून कोरियन सरकार आणि जनतेकडून या लोकांना सदैव दिली जाणारी वाईट वागणूक आणि केला जाणारा भेदभाव यामुळे मूळची वाईट परिस्थिती अधिकच भयानक होते.

दिवसचे दिवस होणारी उपासमार, लहान मुलांचं कुपोषण, सरकारी अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी आणि तरीही सतत स्वस्तुतीत मग्न असणारं सरकार पाहून जॉर्ज ऑरवेलच्या १९८४ ची प्रकर्षाने आठवण येते. ऑरवेलने काल्पनिक म्हणून लिहिलेय कादंबरीतील कित्येक घटना उत्तर कोरियात प्रत्यक्षात जशाच्या तशा घडताना पाहून धक्का तर बसतोच पण ऑरवेलच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटल्यावाचूनही राहत नाही. 

मासाजी इशिकावा 

असंख्य लटपटी, खटपटी, मानहानी, अपमान, जवळच्यांचे मृत्यू, आत्महत्येचा प्रयत्न अशा अनेक अविश्वसनीय आणि हेलावून टाकणाऱ्या घडामोडींनंतर लेखकाची उत्तर कोरियातील आणि चीन यांच्या मध्ये वाहणारी यालु नदी जीवाच्या करारावर ओलांडून जाऊन चीनमार्गे जपान मध्ये प्रवेश करण्याची तयारी होते. पुस्तकाच्या अखेरीस का होईना भेटणाऱ्या काही चांगल्या व्यक्ती आणि नशिबाची साथ यामुळे लेखकाचा उत्तर कोरियातील छत्तीस वर्षांचा नरकवास संपुष्टात तर येतो परंतु त्याचबरोबर एक नवीन दुःख त्याची सदैव सोबत करणार असतं.


अतिशय आनंद आणि तितकंच टोकाचं दुःख अशा एका विचित्र मनस्थितीत वाचकाला ठेवून पुस्तक संपतं. शेवटची ओळ वाचून झाली तरी मासाजी इशिकावा आणि त्यांच्यासारख्या असंख्य दुर्दैवी जीवांनी आणि त्यांच्या कुटूंबियांनी भोगलेल्या अतीव हालअपेष्टा वाचून वाचकांच्या मनात दाटून येणारी विषण्णता काही केल्या जात नाही आणि त्याच वेळी निव्वळ एका चांगल्या देशात जन्म घेतल्याने अन्य लोकांपेक्षा आपण किती सुदैवी आहोत हाही विचार मनात आल्यावाचून राहत नाही!

-हेरंब ओक

Sunday, January 1, 2023

२०२२ चा पुस्तकीय लेखाजोखा

 

१. ब्लॅक फ्रायडे : एस हुसेन झैदी (अनुवाद - सायली राजाध्यक्ष)
२. वर्दीतल्या माणसाच्या नोंदी : सदानंद दाते
३. मी फुलनदेवी : अनुवाद - डॉ प्रमोद जोगळेकर
४. एका दिशेचा शोध : संदीप वासलेकर
५. बिराड : अशोक पवार
६. गावकुसाबाहेरची माणसं : लक्ष्मण गायकवाड
७. संवादू अनुवादू : उमा कुलकर्णी
८. निवडक कन्नड कथा : उमा कुलकर्णी
९. कर्वालो : श्री. के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी (अनुवाद - उमा कुलकर्णी)
१०. धर्मश्री : डॉ एस एल भैरप्पा (अनुवाद - विजयालक्ष्मी रेवणकर)
११.  टाईमपास : प्रोतिमा बेदी (अनुवाद - सुप्रिया वकील)
१२. फेरा : तस्लिमा नसरीन (अनुवाद - मृणालिनी गडकरी)
१३. अंश : रत्नाकर मतकरी
१४. तेल नावाचं वर्तमान : गिरीश कुबेर
१५.  लंडन बॉम्बिंग २००५ : निळू दामले
१६. विंचवाचं तेल : सुनीता भोसले
१७. श्री सदा आनंद बाबा : दिवाकर नेमाडे
१८.  शिंडलर्स लिस्ट : थॉमस केनीली ( अनुवाद - संजय दाबके)
१९. पणतीला जपताना : समीर दरेकर
२०. अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर  : संजय बारू (अनुवाद - लीना सोहोनी)

काश्मीर विषयक पुस्तकं

२१. काश्मीरनामा : सच्चिदानंद शेवडे
२२. काश्मीर - एक शापित नंदवन : शेषराव मोरे
२३. दहशतीच्या छायेत  : तेज एन धर (अनुवाद - सुजाता देशमुख)
२४. काश्मीर धुमसते बर्फ : जगमोहन (अनुवाद - मो ग तपस्वी)
२५. कशीर : सहना विजयकुमार  (अनुवाद - उमा कुलकर्णी)
२६. रक्तगुलाब : आशिष कौल (अनुवाद - छाया राजे)

सुहास शिरवळकर
२७. काळंबेरं
२८. कणाकणाने

पंकज कालुवाला
२९. इस्रायलची मोसाद
३०. जर्मन गुप्तचर यंत्रणा

निरंजन घाटे
३१. झू
३२. आधुनिक युद्ध कौशल्य

व्यंकटेश माडगूळकर
३३. वावटळ
३४. वारी

नारायण धारप
३५. अघटित
३६. किमयागार
३७. लुचाई
३८. बलिदान
समर्थकथा
३९. समर्थांची ओळख
४०. समर्थांना आव्हान
४१. समर्थांचा विजय
४२. विषारी वारसा

अरुण शौरी
४३. द वर्ल्ड ऑफ फतवाज : अनुवाद - भारती पांडे
४४. आत्मवंचना (Self Deception) : अनुवाद - अशोक पाथरकर
४५. गव्हर्नन्स : अनुवाद - भारती पांडे
४६. ख्यातनाम इतिहासकार : अनुवाद - सुधा नरवणे

ध्रुव भट्ट
४७. तत्त्वमसि :  अनुवाद - अंजनी नरवणे
४८. अतरापी : अनुवाद - सुषमा शाळिग्राम

जॉर्ज ऑरवेल
४९. १९८४ : अनुवाद - अशोक पाध्ये
५०. अ‍ॅनिमल फार्म : अनुवाद - भारती पांडे

अनिता पाध्ये
५१. एकटा जीव
५२. एक होता गोल्डी

यदुनाथ थत्ते
५३. मुस्लिम समाजातील वाहते वारे
५४. मुस्लिम मनाचा कानोसा

डॉ एस एल भैरप्पा (अनुवाद - उमा कुलकर्णी)
५५. तंतू
५६. साक्षी
५७. गृहभंग
५८. परिशोध

अच्युत गोडबोले
५९. किमयागार
६०. अर्थात
६१. अनर्थ

English

६२. A Time for Mercy : John Grisham
६३. Forrest Gump : Winston Groom
६४. First Blood : David Morrell
६५. Missionary Position : Christopher Hitchens
६६. Chanakya's Chant : Ashwin Sanghi
६७. Ed Husain : Among the mosques

Lee Child
६८. Killing Floor
६९. No Plan B

Irving Wallace
७०. The Celestial Bed
७१. The Miracle

Jeff Lindsay
७२. Darkly Dreaming Dexter
७३. Dearly Devoted Dexter
७४. Dexter in the Dark
७५. Dexter by Design

Michael Connelly
(Mickey Haller series)
७६. The Brass Verdict
७७. The Reversal
७८. The Fifth Witness
७९. The Gods of Guilt
८०. The Law of Innocence

(Harry Bosch series)
८१. Black Echo
८२. Black Ice
८३. City of Bones

(Renee Ballard series)
८४. The Late Show
८५. Dark Sacred Night

श्राव्य पुस्तके (ऑडिओ बुक्स)

८६. २६/११, कसाब आणि मी : रमेश महाले (वाचन : उपेंद्र लिमये)
८७. (कदाचित) इमॅजिनरी : गणेश मतकरी
८८. रारंगढांग : प्रभाकर पेंढारकर
८९. सुहेलदेवची पराक्रमगाथा : अमिश त्रिपाठी
९०. प्रतिपश्चंद्र : डॉ प्रकाश कोयाडे
९१. शितू : गो नी दांडेकर

जयवंत दळवी
९२. अंधाराच्या पारंब्या
९३. सारे प्रवासी घडीचे
९४. पुरुष

हृषीकेश गुप्ते
९५. हाकामारी
९६. तीळा तीळा दार उघड
९७. परफेक्ट बाई फोल्डिंगचा पुरुष
९८. भयकथा
९९. काळजुगारी

सुहास शिरवळकर
१००. माध्यम
१०१. झलक
१०२. सॉरी सर
१०३. न्याय अन्याय
१०४. म्हणून
१०५.  काटेरी
१०६. सहज
१०७. असह्य

निरंजन घाटे
१०८. हेरांच्या जगात
१०९. मानवाच्या शोधाची कहाणी
११०. प्राणी जीवनगाथा
१११. अग्निबाणाचा इतिहास

पुलं
११२. काय वाट्टेल ते होईल
११३. हसवणूक
११४. जावे त्यांच्या देशा
११५. एका कोळीयाने

Novellas/Short stories
राष्ट्रीय आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : सुधीर जोगळेकर
The Black Phone : Joe Hill
The Fourth Man : Lee Child
The Christmas Scorpion  : Lee Child
Smile : Lee Child
Sincere Warning About The Entity In Your Home : Jason Arnopp

हृषीकेश गुप्ते (audio book) कथा
मोठी तिची सावली
पानगळ
मुआवजा

Wednesday, November 9, 2022

अरुण शौरी : विचारमंथन


अरुण शौरी हे अत्यंत बुद्धिमान अर्थतज्ज्ञ
मुरब्बी राजकारणी आणि तितकेच अभ्यासू विचारवंत म्हणून भारतीय जनतेला सुपरिचित आहेत. त्यांनी अनेक मासिके/वृत्तपत्रांमधून महत्वाच्या विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या लेखांवरून त्यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला झालेलीच असते. या अशा अत्यंत प्रतिभावंत आणि कर्तबगार व्यक्तीने लिहिलेली तब्ब्ल चार पुस्तकं गेल्या दोन महिन्यांत वाचण्याचा योग आला. यापूर्वी त्यांचे वृत्तपत्रांमधून छापून आलेले लेख वगळता मी त्यांचं कुठलंच पुस्तक वाचलेलं नव्हतं. या चारही पुस्तकांचे विषय एकमेकांपेक्षा सर्वस्वी भिन्न असूनही प्रत्येक पुस्तकात संबंधित विषय इतक्या प्रभावीपणे मांडणे आणि त्यासाठी शेकडो पुस्तकेपत्रव्यवहारखंडग्रंथ यांचे संदर्भ म्हणून वापर करूनते योग्य ठिकाणी मांडून वाचकाला त्या विषयाची इत्यंभूत माहिती अतिशय सोप्या शब्दांत करून देण्याची त्यांची हातोटी बघून थक्क व्हायला होतं. या चार पुस्तकांचे विषय भारत-चीन संबंधभारतीय राजकारणातली नोकरशाहीतथाकथित सुप्रसिद्ध असे भारतीय इतिहासतज्ज्ञ आणि मुस्लिम समाजातील फतवे आणि त्यांचा इतिहास असे एकमेकांपासून सर्वस्वी भिन्न असे आहेत. प्रत्येक विषयाची अनेक पुस्तके-पत्रव्यव्हार-खंड वाचून, पानापानांवर त्यांचे संदर्भ देऊन केलेलं हे लिखाण वाचणं हा वाचक म्हणून अत्यंत समृद्ध करणारा अनुभव आहे.

आपण एकेका पुस्तकाची थोडक्यात ओळख करून घेऊ.

पुस्तक क्रमांक १

मूळ पुस्तक : Self-Deception

अनुवादित पुस्तक : आत्मवंचना

अनुवाद : अशोक पाथरकर

सर्वप्रथम हे आवर्जून नमूद करायला हवं की हे संपूर्ण पुस्तक अन्य इतर संदर्भांबरोबरच प्रामुख्याने SWJN अर्थात Selected Works of Jawaharlal Nehru या ग्रंथाच्या जवळपास ८० हून अधिक खंडांमधले असे निवडक खंड ज्यांत नेहरूंचा भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहार, नोंदी आणि त्या संदर्भात केलेली भाषणं इत्यादी आहेत अशा खंडांवर आधारलेलं आहे.

तत्कालीन भारत-चीन संबंधांच्या बाबतीत पंतप्रधान म्हणून नेहरूंचं धोरण कसं होतं, दृष्टिकोन कसा होता, त्यांचे काय परिणाम झाले हे वाचायला मिळतं. त्याचप्रमाणे तत्कालीन राजदूतांनी भारत-चीन संदर्भातील वेळोवेळी व्यक्त केलेली मतं आणि माध्यमं व त्यांच्या प्रतिक्रिया इत्यादी मुद्द्यांची साद्यन्त माहिती वाचकाला मिळते.

नेहरूंच्या अक्साई चीनच्या बाबतीतल्या "हा प्रदेश केवळ वाळवंट असून या भागात गवताचं पातंही उगवत नाही" या अत्यंत वादग्रस्त विधानापासून ते भारताने अरुणाचल प्रदेश आणि एकूणच ईशान्य भारतातल्या राज्यांकडे केलेलं दुर्लक्ष यांच्या नोंदी वाचायला मिळतात. "अरुणाचल हा चीनचाच प्रदेश आहे.", "अरुणाचल हा भारताने बळजबरीने ताब्यात ठेवलेला चीनी प्रदेश आहे." अशी विधानं चीनच्या नेतृत्वाकडून अधिकृतपणे आणि वारंवार केली जात असतानाही त्याकडे भारतीय नेतृत्व साफ दुर्लक्ष करत राहिलं. चीनच्या अधिकृत नकाशात संपूर्ण अरुणाचलबरोबरच आसामचा बराचसा भाग चीनचा म्हणून दाखवला जात होता. तिबेट जेव्हा भारताकडे लष्करी मदतीसाठी विनवण्या करत होतं तेव्हा तिबेटला मदत तर पुरवली गेली नाहीच पण उलट "चीनचा शस्त्रबळाने पराभव करता येईल हा विचार भ्रामक आहे" अशी मखलाशीही करण्यात आली.

जॅकस मार्टिन या ब्रिटिश विशेषज्ज्ञाच्या एका प्रबंधात एक थक्क करणारं उदाहरण वाचायला मिळतं. तो म्हणतो, "पूर्वीचा चीन, हा आज चीन म्हणून जो आहे असा दावा केला जातो त्याच्या *फक्त* एक तृतीयांश होता"

यावरून गेल्या काही दशकांमध्ये उत्तरोत्तर वाढत गेलेल्या, चीनच्या सत्तापिपासू अपप्रवृत्तीवर झगझगीत प्रकाश पडतो.

नेहरूंच्या काळापासून चालू असलेला भारतीय सत्ताधाऱ्यांचा चीनच्या बाबतीतला बोटचेपेपणा हा थेट डॉ मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत कसा चालू होता हे दाखवणाऱ्या एका घटनेचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. हा प्रसंग २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान दिल्लीत घडला होता.

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक गेम्सच्या आधीच्या काही महिन्यांमध्ये चीन सरकारने तिबेटी जनतेचे निषेध आंदोलन नेहमीप्रमाणेच अतिशय क्रूरपणे दडपून टाकले. आणि ते ही खुद्द आपल्या देशाच्या राजधानीत. प्रत्यक्ष नवी दिल्लीत. जगातील कुठल्याही सरकारने जे केले नव्हते ते मनमोहन सिंग सरकारने दिल्लीला केले. कोणत्याही सरकारने दिला नसता इतका भ्याड आणि भित्रा प्रतिसाद आपल्या सरकारने दिला. ऑलिम्पिक मशालीसाठीची दौड जेमतेम दोन किलोमीटर अंतर कापणार होती. या दोन किमीसाठी सरकारने वीस हजारांपेक्षा जास्त जवान‚ पॅरामिलिटरी जवान‚ पोलीस आणि साध्या वेषातील पोलीस त्या मार्गाभोवती व जवळपासच्या भागांत तैनात केले होते. तिबेटी निर्वासितांना मारहाण करून दूर ठेवण्यात आले. सरकारी कार्यालये बंद होती. रस्ते अडवण्यात आले होते. मेट्रो बंद करण्यात आली. अगदी संसद सदस्यांनासुद्धा संसदेला लागून असलेल्या विजय चौकातून आपल्या घरी जाण्यापासून थांबवण्यात आले. हे सर्व ऑलिम्पिकच्या प्रेमामुळे करण्यात आले असे तुम्हाला वाटते? ते चीनच्या भीतीमुळे करण्यात आले.

चीनची विस्तारवादी प्रवृत्ती, वाढती भूक आणि त्याला भारतीय नेतृत्वाच्या बोटचेप्या धोरणांमुळे मिळत गेलेलं प्रोत्साहन आणि या सर्वांमध्ये भारतभूमीचं झालेलं नुकसान या सगळ्याचं तपशीलवार वर्णन वाचायचं असल्यास हे पुस्तक अवश्य वाचायला हवं. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक तसेच भारत-चीन संबंध या विषयात रुची असणाऱ्यांनीही आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

 

पुस्तक क्रमांक २

मूळ पुस्तक : Governance

अनुवादित पुस्तक : गव्हर्नन्स

अनुवाद : भारती पांडे

भारतातील नोकरशाहीअनेक खातीअनेक शासकीय विभाग आणि उपविभाग आणि त्यांचे आपापसातले तंटेबखेडे आणि त्या संदर्भात या सर्वांचा एकमेकांशी वर्षानुवर्षं गोगलगायीच्या गतीने चालत असलेला निर्बुद्ध पत्रव्यवहार हा या पुस्तकाचा प्रमुख विषय आहे. अनेक खाती आणि विभागांनी एकमकांवर दाखल केलेलं खटलेत्यांचे निकालवरच्या न्यायालयांमध्ये केली गेलेली अपील्सया अनुषंगाने केला जाणारा कधीही न संपणारा अर्थहीन पत्रव्यवहार आणि त्यात उधळले जाणारे सरकारचे आणि पर्यायाने जनतेचे कोट्यवधी रूपये या सर्वांवर हे पुस्तक परखड भाष्य करतं. त्यातले काही तऱ्हेवाईक आणि तितकेच बालिश प्रसंग बघितले की वाचकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही.

१. दिल्लीत सरकारी मालकीची असलेली कित्येक हॉटेल्स बेकायदा आहेत.

२. अनेकांचे मालक ठाऊक नाहीत.

३. अनेकांवर खटले चालू आहेत.

४. कित्येक खटल्यांमध्ये सरकारच्या बाजूने निकाल लागलेले असूनही मूळ मालक अद्यापही त्या वास्तूची मालकी सोडायला तयार नाही आणि तरीही सरकार त्याबाबतीत काहीही पावलं उचलत नाही.

या असल्या विस्मयकारक गोष्टी वाचून वाचकाला धक्काच बसतो.

दुसरं एक प्रकरण असंच धक्कादायक आहेदोन खात्यांदरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारात नजरचुकीने काही हजार कोटींनी वाढवला गेलेला आकडात्यामुळे जमाखर्चात उदभवलेली भानगड त्यावरून कित्यके महिने चालू असणारा पत्रव्यवहार आणि शेवटी कोणीतरी एका पक्षाने समजूतदारपणा दाखवून पडती बाजू घेणे अशा प्रसंगांची मालिका वाचली की या लोकांचा मेंदूकॉमन सेन्स वगैरे शब्दांशी दुरान्वये तरी संबंध आलेला असतो की नाही असा प्रश्न पडतो.

 एक प्रसंग तर इतका दुर्दैवी आहे की हे सगळं खोटंच आहे असं वाटायला लागतं.

काही खात्यांच्या एका सामूहिक बैठकीत एका खात्याने दुसऱ्या खात्याला काही लेखी सूचना केल्या होत्या. त्या सूचना करताना त्यांनी त्या हिरव्या शाईचा वापर केला होता. दरम्यान त्या सूचनांकडे साऱ्यांनीच दुर्लक्ष करून त्याऐवजी "कुठल्याही खात्याला सूचना करताना सर्वमान्य अशा काळ्या किंवा निळ्या शाईचा वापर न करता हिरव्या शाईचा वापर करण्याचा अधिकार आहे का?" आणि "हिरवी शाई वापरून केल्या गेलेल्या सूचना ग्राह्य धाराव्यात का?" या मुद्द्यांवर कित्येक महिने खंडीने पत्रव्यवहार केला गेला आणि अखेरीस हिरवी शाई चालेल असा निर्णय घेतला गेला!

भारतीय नोकरशाहीच्या अशा थक्क करून सोडणाऱ्या असंख्य निर्बुद्ध घटनांचे उल्लेख या पुस्तकात पानोपानी भेटीस येतात आणि वाचकाला नैराश्यग्रस्त करून सोडतात.


पुस्तक क्रमांक ३

मूळ पुस्तक : The Eminent Historians

अनुवादित पुस्तक : ख्यातनाम इतिहासकार

अनुवाद : सुधा नरवणे

 डॉ भैरप्पा यांचं आवरण हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना भारताच्या कला आणि शिक्षण क्षेत्रावर डाव्या विचारांच्या मंडळींची कशी मजबूत विखारी पकड आहे याचा चांगलाच अंदाज असेल. हे पुस्तक वाचताना आवरण या कादंबरीत वाचलेल्या काल्पनिक प्रसंगांशी नातं सांगणाऱ्या परंतु प्रत्यक्षात घडलेल्या घटना आपल्या भेटीस येतात आणि हतबुद्ध व्हायला होतं

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या नेमणुकांत केल्या गेलेल्या पक्षपतांच्या त्रोटक उल्लेखांसोबतच ICHR अर्थात Indian Council of Historical Research (भारतीय इतिहास अनुसंधान परिषद) या महत्त्वपूर्ण संस्थेतएकाच विचारसरणीच्या (तथाकथित) इतिहासतज्ज्ञांच्या (!) नेमणूका वारंवार आणि वर्षानुवर्षे कशा केल्या जातात यावर लेखक प्रश्नचिन्ह उमटवतात. ICHR मध्ये २५ वर्षांत रोमिला थापर आणि सतीशचंद्र यांची चार वेळा तर इरफान हबीब आणि एस गोपाल यांची अनुक्रमे पाच आणि तीन वेळा नेमणूक केली गेली. इतकंच नव्हे तर ICHR च्या अध्यक्षपदासाठीही अशाच प्रकारचे खेळ खेळण्यात आले होते. यातल्या अनेक इतिहासतज्ज्ञांनी एखाद्या प्रकल्पासाठी सरकारकडून लाखो रूपये घेऊन तो प्रकल्प पूर्ण न करता ते पैसे हडपलेवारंवार मुदतवाढ मागून घेतली आणि वरून त्यासाठी अतिरिक्त मानधनही घेत राहिले आणि अंतिमतः प्रकल्प पूर्ण केलाच नाही अशा स्वरूपाची असंख्य उदाहरणं शौरी यांनी दिली आहेत.

श्री श्रीमाळी नावाच्या एका डाव्या विचारांच्या इतिहासकाराने टीव्हीवरील एका चर्चेच्या कार्यक्रमात असं विधान केलं की "प्राचीन भारतात गोमांस खाल्ले जात होते असे सुस्पष्ट उल्लेख वेदात आहेत". त्यावेळी आपले सनातन ग्रंथवेदपुराणे इत्यादींचे तज्ज्ञ असलेल्या श्री रघुवंशी नामक व्यक्तीने त्यावर आक्षेप नोंदवला आणि प्रतिप्रश्न केला की अशा अर्थाचा उल्लेख श्री श्रीमाळी यांनी कुठल्या ग्रंथात वाचला आहे त्याचा संदर्भ सांगावा. श्रीमाळी यांनी असे संदर्भ अनेक ठिकाणी सापडतात असं ठोकून दिलं. तरीही श्री रघुवंशी यांनी त्यांना निदान एखादा वेदऋचाश्लोक यांचा संदर्भ देण्याची विनंती केली ज्याचं उत्तर श्रीमाळी यांना अर्थातच देता आलं नाही. त्यानंतर त्यांनी "मी वेद नाहीतर वैदिक वाङ्मय असे म्हंटले होते" अशी मखलाशी केली. त्यानंतर कुठल्या वैदिक वाङ्मयात हा उल्लेख आहे हे विचारल्यावर त्यांच्याकडे अर्थातच उत्तर नव्हतं. अखेरीस श्रोत्यांमधून एक विद्वान गृहस्थ पुढे आले आणि म्हणाले की त्यांनी त्यांच्याबरोबर चारही वेद आणले आहेत. श्रीमाळी यांनी कृपा करून त्यात तो संदर्भ शोधून दाखवावा. श्रीमाळी यांनी त्या वेदांना हात तर लावला नाहीच आणि तरीही स्वतःच्याच असत्यकथनाला ते ठामपणे चिकटून राहिले. त्यानंतर श्री रघुवंशी यांनी वेदांमधील एकामागोमाग एक असे अनेक श्लोक वाचून दाखवले की ज्यांत गोमांस खाऊ नये असे स्पष्ट उल्लेख करण्यात आले होते. एवढं होऊनही श्री श्रीमाळी हेच म्हणत राहिले की "मला एखादी ऋचा म्हणू दाखवता आली नाही याचा अर्थ असा नाही की मी तज्ज्ञ नाही. त्याचप्रमाणे गोमांस भक्षणाच्या विरुद्ध अनेक ऋचा काढून दाखवल्या तरी त्याचा अर्थ असा होत नाही की त्याकाळी गोमांस खाल्ले जात नव्हते."

काही दिवसांनी श्रीमाळी यांनी 'द हिंदूया वृत्तपत्रातील आपल्या लेखात सदर प्रसंगाचा उल्लेख करून असे सांगितले की मी एखाद्या श्लोकाचा संदर्भ देऊ शकलो याचा अर्थ असा नाही की प्राचीन भारतात गोमांस भक्षण अमान्य होते."

 

पुढचा प्रसंग मात्र खासच धक्कादायक आणि निराशाजनक आहे. पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाने १९८९ मध्ये काढलेल्या एका आदेशात असं स्पष्टपणे म्हंटलं की नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात "मुस्लिम राज्यकर्त्यांवर कुठलीही टीका नसावी. त्याचप्रमाणे मुस्लिम राज्यकर्ते आणि आक्रमकांनी मंदिरे उध्वस्त केल्याचे उल्लेख नसावेत. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर मुस्लिम राजकर्त्यांच्या कारकिर्दीविषयीच्या उल्लेखांमध्ये खाली सूचना सुचवण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी केली जावी". थोडक्यात हा एक प्रकारचा फतवाच होता. कोणते उल्लेख वगळावेत आणि सुधारित उल्लेख काय असावेत यांची एक भलीमोठी यादीच परिपत्रकात जोडण्यात आली होती.

त्यातले काही महत्वाचे उल्लेख आणि बदल आपण बघू.

१.      मूळ : अरबांनी गोहत्येवर बंदी घातली होती.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

२.      मूळ : महमूद कट्टर मुस्लिम होता. 'इस्लाम किंवा मृत्यूअसा इस्लाम धर्माचा गाभा होता.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

३.      मूळ : हिंदू स्त्रियामुस्लिमांच्या नजरेस पडू नयेत म्हणून त्यांना घरातच राहायला सांगत.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

४.      मूळ : लावण्यवती राणी पद्मिनी हिची प्राप्ती करून घेण्यासाठी अल्लाउद्दीनने चितोडवर हल्ला केला.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

५.      मूळ : हिंदुस्थानातील लोकांवर आपला धर्म लादण्यासाठी मुस्लिमांनी अमानुष अत्याचार केले.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

६.      मूळ : सुलतान महमूदाने मोठ्या प्रमाणावर हत्यालुटालूटविध्वंस आणि धर्मांतरे केली.

सुधारित : हत्या आणि धर्मांतरे हे उल्लेख वगळले जावेत.

७.      मूळ : सुलतान महमूदाने सोमनाथ मंदिरातील जडजवाहिरांची लूट केली आणि गझनीतील मशिदीकडे जाणाऱ्या मार्गावर शिवलिंगाची पायरी बनवली.

सुधारित : "शिवलिंगाची पायरी बनवली" हा उल्लेख वगळला जावा.

 'औरंगजेबाचे धार्मिक धोरणया प्रकरणातील मजकूर गाळण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. हिंदूंशी तो कसा अमानुषपणे वागलाहिंदू मंदिरांचे त्याने काय केलेइस्लामचा प्रचार इत्यादींबद्दलचे सर्व उल्लेख वगळून टाकण्याचे या परिपत्रकवजा फतव्यात म्हंटले होते.

आणि परिपत्रकात म्हंटल्याप्रमाणे हे सर्व बदल हे (तथाकथितइतिहासतज्ञांच्या मदतीने आणि मान्यतेने होत होते हे विशेष दुर्दैवी! अशा प्रकारचा दुषित इतिहास भारताच्या उगवत्या पिढ्यांच्या माथ्यावर वर्षानुवर्षे लादून या तथाकथित ख्यातनाम इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाचे आणि भावी पिढ्यांचे कधीही भरून येऊ न शकणारे असे नुकसान केले आहे.


पुस्तक क्रमांक ४.


मूळ पुस्तक : The World of Fatwas

अनुवादित पुस्तक : : फतव्यांचे जग

अनुवाद : भारती पांडे

हे पुस्तक मला सर्वांत आवडलेलं आणि तितकंच डोकं भंडावून सोडणारं आहे. "फतवा म्हणजे काय?" या प्राथमिक प्रश्नापासून पुस्तकाची सुरुवात होते. फतवा म्हणजे निर्णय किंवा हुकूम. रोजच्या जीवनात कसे वागावे किंवा नित्य दिनक्रमातील प्रसंगांमध्ये काय भूमिका घ्यावी अशा स्वरूपाच्या शंकाएखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनेइस्लामी तज्ज्ञांसमोर मांडल्यावरतज्ज्ञांनी कुराण आणि हदीसमधील घटना आणि श्लोक यांच्या माध्यमातून दिलेली उत्तरं म्हणजे फतवा. यात आरोग्यवैवाहिक संबंधपरंपरावारसाहक्क अशा दैनंदिन मुद्द्यांपासून ते थेट सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवतीभूकंप का होतातशुक्रवारीच पवित्र दिवस काअशा सर्व प्रकारच्या प्रश्नोत्तरांचा समावेश असतो. सदर पुस्तकासाठी संदर्भ म्हणून लेखकाने १९८२ ते १९८७ या काळात प्रसिद्ध झालेल्या किफायती उल मुफ्ती यांच्या फतव्यांच्या ९ खंडांचा आणि त्याचप्रमाणे अहलउलेयारहिमिया अशा अन्य पाच संग्रहांचा आधार घेतला आहे. 

"भूकंप का होतो?" या प्रश्नाला "पृथ्वीवरील ज्या ठिकाणचं पाप वाढतं तेथील नस खेचली जाते आणि भूकंप होतो" असं उत्तर मिळतं. साप किंवा विंचवाच्या विषयावरील उपाय म्हणून देवाचा धावा करावा असं उत्तर येतं. अन्नपदार्थात माशी पडली तर ती कशी काढावी याचे नियम आहेत. हात पाय कसे धुवावेतलघवीला/शौचाला कसे जावे इत्यादींचेही नियम सांगितले आहेत.

काफर कोणाला मानावे?” या प्रश्नाच्या उत्तरादाखल अनेकांनेक मुद्द्यांचं मंथन केलेलं आढळतं. प्रत्येक जीव जन्माला येताना इस्लामीच असतो परंतु त्याचे पालक त्याला अज्ञानाने ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात अशी मखलाशी केली जाते. वेदगीता आणि कुराण हे सर्व सारख्याच योग्यतेचे धर्मग्रंथ आहेत असे मानणारा तसेच इस्लाम आणि अन्य धर्म समान आहेत असे मानणारा इसम काफर समजावा. यापैकी काहीही गंमतीने किंवा वैतागाने उच्चारलं गेलं असलं तरीही त्याला काफर समजण्यात यावं अशा स्वरूपाचे स्पष्ट निर्देश दिलेले आढळतात.

शिक्षणाविषयी किंवा खरं तर शिक्षणाच्या निरुपयोगीतेविषयी आणि अनावश्यकतेविषयी बरंच भाष्य केलेलं आहे. ज्या शिक्षणामुळे मोमीन अर्थात मुस्लिम लोकइस्लामी रूढी आणि श्रद्धा यांचा तिटकारा करू लागतात असं आधुनिक शिक्षण घेण्यापेक्षा निरक्षर राहणं केव्हाही उत्तम असं सांगितलं गेलं आहे. झाडूवाल्याची नोकरी सोडून इंग्रजी शिक्षण घेणे हे तर अजूनच वाईट असा एक स्पष्ट निकाल आहे. (स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी काश्मिरी मुसलमानांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात आल्यावर आलेली ही प्रतिक्रिया आहे.)

स्त्रिया आणि स्त्रीशिक्षण या विषयावर असंख्य फतवे आहेत. स्त्रिया चटकन बिघडू शकत असल्याने त्यांना शिक्षणसंस्थांना मध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. स्त्री गुलामाशी संभोग पूर्णतः मान्य आहे. पत्नीशी शारीरिक संबंध कसे ठेवावेतमेहर म्हणजे कायउजूर म्हणजे काय इत्यादी स्त्रियासंभोगविवाह आणि संसार इत्यादी सर्व विषयांवर मार्गदर्शन करणारे फतवे आहेत.

स्त्रियांविषयीची अनेक मतं धक्कादायक आहेत.

१.      पुरुषांसाठी सर्वात दुःखद बाब म्हणजे स्त्री आहे.

२.       नरकातही स्त्रियाच बहुसंख्येने आहेत.

३.       स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत अर्धी बुद्धी असते.

आणि या प्रत्येक मुद्द्याची कारणंही संबंधित फतव्यांमधून देण्यात आलेली आहेत.

तिहेरी तलाक आणि अटीयुक्त (conditional) तलाक म्हणजे काय आणि त्यातला फरक समजावून सांगणारे फतवे आहेत. तिहेरी तलाक च्या संबंधात पाकिस्तानी टेलिव्हिजनवरच्या एका जोडप्याच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग डोळे उघडणारा आहे.

पाकिस्तानी टीव्हीवरील एका मालिकेत नवराबायकोचं काम करणारं आणि प्रत्यक्ष आयुष्यातही नवरा-बायको असलेल्या दाम्पत्याचा धक्कादायक प्रसंग पुढीलप्रमाणे. मालिकेतला नवरा त्याच्या मालिकेतल्या बायकोला मालिकेत तलाक देतो. तो भाग संपल्यावर अर्थातच ते प्रसंग पूर्वीप्रमाणे म्हणजे अर्थातच विवाहित दाम्पत्याप्रमाणे राहू लागतंही बातमी कर्णोपकर्णी मौलवींपर्यंत पोचते आणि प्रकरण चिघळतंमौलवींच्या मतानुसार एकदा तलाक झाल्यावर ते जोडपंत्या स्त्रीचा इस्लामी नियमांप्रमाणे हलाला होईपर्यंत पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत. हलाला म्हणजे अर्थातच त्या स्त्रीला अन्य एखाद्या पुरुषासोबत निकाह करूनलैंगिक संबंध प्रस्थापित करावे लागतात आणि त्यानंतर त्या पुरुषाने तलाक दिल्यानंतरच ती परत आपल्या जुन्या पतीशी विवाह करू शकते. मौलवींनी त्या स्त्रीला हलाला करून, 'शुद्धहोऊन मगच तिच्या मूळ नवऱ्याबरोबर पुन्हा लग्न करता येईल असा निवाडा दिला आणि तिला त्याप्रमाणे वागायला लावलं.

हे मूळ पुस्तक प्रचंड मोठं आहे. भारती पांडे यांनी मूळ पुस्तकाचा संपूर्ण अनुवाद केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अनेक संदर्भांची पुनरावृत्ती झाली आहे. एकच संदर्भ अनेकदा निरनिराळ्या उदाहरणांमध्ये पुनःपुन्हा दिले गेला आहे आणि त्यामुळे पुस्तकाची पृष्ठसंख्या खूप वाढली आहे. त्यामुळे असे पुनरावृत्ती झालेले संदर्भ वगळून त्यांनी पुस्तकाचा पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरूपात अनुवाद केला आणि त्यानंतर हे पुस्तक आकाराला आलं.

आपण कल्पनाही करून शकणार नाही इतक्या विविध प्रकारचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या पुस्तकात वाचकांच्या भेटीस येतात. एका ठिकाणी तर तब्बल दोन पानं भरून छोटे छोटे असे फक्त प्रश्न दिलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं पुरवणाऱ्या फतव्यांची माहिती पुढे देण्यात आलेली आहे.

इस्लामी प्रेरणाजीवनधर्मजीवनशैलीचालीरीतीकट्टरता आणि या सगळ्यावर मौलानामुल्लामौलवी इत्यादींची असलेली पोलादी पकड या सर्वांची इत्यंभूत माहिती मिळवायची असल्यास हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे.

सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट विषयसंबंधीचे शेकडो संदर्भअगदी सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवून त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करून सोडण्याची आणि त्याच वेळी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची एक विलक्षण हातोटी डॉ अरुण शौरी यांच्या लेखनात आहे. प्रत्येकाने हे अंजन आवर्जून घ्यावंच. अर्थात त्यानंतरही डोळे उघडणं/न उघडणं हे मात्र सर्वस्वी वाचकांच्याच हातात आहे.

-हेरंब ओक

Tuesday, November 8, 2022

नो लंडन नो बॉंबिंग !! (लंडन बॉंबिंग २००५)

सहसा मला पुस्तकावर आणि संबंधित लेखकावर टीका करायला आवडत नाही. कुठलंच पुस्तक तितकंसं टाकाऊ नसतं असं अनुभवाअंती झालेलं मत असो किंवा अगदी निवडून, पारखून घेऊनच पुस्तकं वाचण्याची लागलेली सवय असो, पण सुदैवाने अगदीच तुरळक अपवाद वगळता अमुक एक पुस्तक आवडलं नाही असं माझ्या बाबतीत फार कमी वेळा होतं. भ्रमनिरास होत असतीलही कदाचित पण तो वाचनसवयीचा एक अटळ असा भाग आहे.

पण काही पुस्तकं मात्र नैमित्तिक भ्रमनिरासाच्याही कैक योजनं पुढे जाऊन अक्षरशः कठोर अपेक्षाभंग करून प्रचंड निराश करतात किंवा अगदीच स्पष्ट शब्दांत बोलायचं झाल्यास अक्षरशः फसवणूक झाल्याचा अनुभव देतात तेव्हा मात्र आपला टीका न करण्याचा नियम मोडावा लागतो. किंवा मग आपण एवढं पारखून घेऊन पुस्तक निवडलेलं असतानाही कसे काय फसलो असं वाटायला लागतं. वस्तुतः ही फसवणूक सुरू झालेली असते ती पुस्तकाच्या शीर्षकापासूनच.

नुकतंच मी 'Among the Mosques' हे गेल्या शंभरेक वर्षांत ब्रिटनमध्ये फोफावलेला इस्लाम या विषयावर Ed Husain या ब्रिटिश मुसलमान लेखकानेच लिहिलेलं एक पुस्तक वाचलं. या पुस्तकाबद्दल लवकरच लिहायचा मानस आहे. अतिशय तपशीलवार माहिती, संदर्भ आणि पुराव्यांसकट लिहिलेलं ते पुस्तक वाचत असतानाच वाचनालयात निळू दामले लिखित 'लंडन बॉम्बिंग २००५' हे पुस्तक दृष्टीस पडलं आणि 'इम्पल्सिव' वाचकाप्रमाणे ते लगेच उचललं. अर्थात Among the Mosques मधले तपशील डोक्यात घोळत असल्याचाही परिणाम होताच. ब्रॅडफर्ड, ब्रिस्टन, मँचेस्टर ही दोन्हींमध्ये सामायिक असलेली ठिकाणं वाचून लंडन बॉम्बिंग वाचण्याची उत्सुकता अधिकच चाळवली गेली होतीच.


पुस्तकाच्या पहिल्या दोन पानांमध्ये ७ जुलै २००५ साली लंडनच्या भूमिगत रेल्वे आणि बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची अगदी थोडक्यात माहिती येते. बॉम्बस्फोटांबद्दल वाचून काहीच दिवसांत ते बॉम्ब्स् आणि आत्मघातकी हल्ले करणारे ते ब्रिटिश मुस्लिम तरुण यांच्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने लेखकाचा इंग्लंड दौरा कसा ठरतो त्याबद्दल तपशीलवार माहिती मिळते. (जी बॉम्बस्फोटांच्या तपशिलांपेक्षाही अंमळ अधिकच आहे.) लेखकाचा इराण मार्गे येण्याचा प्रयत्न कसा सफल होत नाही याचेही अनावश्यक तपशील येतात. त्यानंतर लेखक एकदाचा इंग्लंडमध्ये जाऊन पोचतो आणि मित्राकडे जाऊन उतरतो. लेखक इंग्लंडला पोचल्यावर बॉम्बस्फोट झाले ती ठिकाणं, तिथली पोलीस स्टेशन्स, संबंधित तपास अधिकारी, दहशतवाद विरोधी पथक (anti terrorist squad) आणि त्यांचे अधिकारी, अतिरेकी वास्तव्य करत असलेली शहरं, ठिकाणं, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शाळा, मशिदी, शिक्षक इत्यादींना भेटेल, अतिरेक्यांची आर्थिक/सामाजिक/सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचप्रमाणे इतक्या महाविघातक निर्णयामागची त्यांची कारणमीमांसा समजून घेईल आणि त्यादृष्टीने काही चौकशी करेल, भेटीगाठी घेईल आणि त्यातून त्याने केलेली निरीक्षणं, निष्कर्ष आपल्यापुढे मांडेल अशी कुठल्याही सर्वसामान्य वाचकाची अपेक्षा असते.


पण घडतं भलतंच. कुठल्या मित्राकडे गेलो, तिथे काय खाल्लं, कुठली दारू प्यायली, कुठल्या गावी गेलो, कसा गेलो, तिथे रस्ता कसा चुकलो, मग रस्ता कसा सापडला, कसा भटकलो, बस कशी पकडली, टॅक्सी कशी शोधली, चावी हरवल्याने शेजारच्यांकडे कसा अपरात्री गेलो, गप्पा मारल्या, खाल्लं, दारू प्यायली, परदेशी भारतीयांना कसा वेळ नसतो, ते कसे आत्ममग्न असतात, त्यांच्यापेक्षा मला त्यांच्या शहराची आणि शेजाऱ्यांची कशी अधिक माहिती आहे हीच बडबड पानंच्या पानं भरून चालू राहते.

अधेमधे अनेक लोकांना लेखक भेटतो त्याचे उल्लेख येतात. काही जण त्याला भेटीचा उद्देश विचारतात. तेव्हा काही वेळा लंडन बॉम्बिंग विषयी माहिती गोळा करायला आलोय हे सांगण्या ऐवजी लेखक म्हणतो की तुम्हाला हवं ते बोला..!!!! तर काही वेळा इतरच काहीतरी प्रश्न विचारत राहतो ज्यांचा लंडन बॉम्बिंगशी कणमात्रही संबंध नसतो.

दुसऱ्या एका शहरात तिथले नगरसेवक स्थानिक मुस्लिम लोकांना कसे भेटत नाहीत याबद्दल उगाचच एक लांबलचक भाषण झोडतो. एका ठिकाणी एका भारतीय व्यापाऱ्याच्या रोल्स रॉईस बद्दलचे गोडवे गायले जातात तर अन्य काही ठिकाणी अशाच लंडन बॉम्बिंगशी संबंध नसलेल्या गप्पा झोडल्या जातात.

नाही म्हणायला अधेमधे ओसामा, अमेरिका, टोनी ब्लेअर, मार्गारेट थॅचर, तालिबान यांचे उल्लेख येतात पण त्यांचे धागेदोरे प्रस्तुत पुस्तकाच्या विषयाशी अर्थात २००५ च्या लंडन बॉम्बस्फोटांशी मात्र जुळवले जात नाहीत. त्याचप्रमाणे वंशद्वेष, परदेशी आणि अन्य वंशीय लोकांना आपलंसं करण्यात स्थानिक ब्रिटिश कसे अपयशी ठरतात, त्यामुळे मुस्लिम तरुणांची माथी कशी भडकतात, त्यांच्या मनात स्थानिक नागरिक आणि त्यांचा धर्म, चालीरीती, संस्कार, जीवनशैली यांच्याबद्दल तुटकपणा, द्वेष कसा निर्माण होतो आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून मुस्लिम तरुण कसे आयसिस मध्ये जातात, कसे दंगली घडवून आणतात, कसे बॉम्बहल्ले करतात याची रसभरीत वर्णनंही येतात!

तब्बल दीडशे पानी पुस्तकात विषयाशी प्रामाणिक असणाऱ्या किंवा विषयाला धरून असणाऱ्या किमान दीडशे ओळीही (सलग नव्हे, एकूण) नसाव्यात हेच पुस्तकाचा रुपरंग स्पष्ट करायला पुरेसं आहे.

कच्ची डायरी किंवा खर्डा अखेरचा (किंवा सुरुवातीचाही) हात न फिरवता, घाईघाईने प्रिंटिंगला दिलं आहे असं वाटावं एवढं विस्कळीत पुस्तक वाचल्यावर सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे निव्वळ घोर फसवणूक झाल्याच्या अनुभवाखेरीज वाचकाच्या पदरी काहीही पडत नाही.

आणि त्यात पुन्हा एखाद्या महत्वाच्या आणि आवडीच्या विषयावर आणि तेही एखाद्या महत्वाच्या, प्रथितयश आणि गंभीर लेखन करणाऱ्या लेखकाने इतकं हलक्यात लेखन करावं हेही तितकंच वेदनादायी खरं तर.

अर्थात हे लेखकाच्या समग्र लेखनाविषयी मत नसून केवळ या पुस्तकाबद्दलचं मत आहे आणि सदर लेखकाची अन्य पुस्तकं दर्जेदार असतील या बद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही. फक्त मी ती वाचलेली नाहीत इतकंच. किंबहुना त्यांची सुसाट जॉर्ज, अफगाणिस्तान, लवासा वगैरे विषयांवरची पुस्तकं अतिशय दर्जेदार आहेत हेही मी ऐकून आहे. तरी सदर पुस्तक मात्र भ्रमनिरास करतं हे मात्र नक्कीच!

अर्थात हे ही पुस्तक अनेकांना आवडू शकेल किंवा आवडलंही असेल. हे पुस्तक वाचा किंवा वाचू नका हे सांगण्याचा मला अधिकार नाहीच. मात्र 'समानशीले' वाचक मंडळींचा अपेक्षाभंग होऊ नये म्हणून दिलेली ही एक सूचना म्हणून याकडे नक्कीच बघू शकता.

-हेरंब ओक


रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन

काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) ' द हाऊसमेड ' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे , भरपू...