Sunday, September 17, 2017

स्नूज...

वेळ : निद्रादेवीची आराधना करण्याची

आई मोबाईलवर काहीतरी काम करते आहे. तितक्यात चिरंजीवांची कर्कश्श हाक.

आSSSSSSई

आई : अरे काय झालं?

चिरंजीव : आई, आता झोपायची वेळ झाली ना?

आई : हो. मग?

चिरंजीव : मग आत्ता मोबाईल कशाला? ठेव तो मोबाईल.

आई : ओ आजोबा.. अलार्म लावत होते. 

आईचं स्वगत उर्फ लाऊड थिंकिंग (ज्याचा आईला लवकरच पश्चाताप होणार आहे) : चला. झाले लावून अलार्म. ५.... ५:१५.... ५:३०. (स्नूज.... स्नूज.... स्नूज....)

चिरंजीव : आई

आई : आता काय राजा?

चिरंजीव : आई, तू तीन अलार्म का लावलेस? इतक्या वेळा का उठतेस? एकदाच उठायचं ना.

#आदि_आणि_इत्यादी

Wednesday, September 6, 2017

हॅ.. त्यात काय?

काल लेकाच्या शाळेत यावर्षीची पहिली PTM (Parents-Teacher Meet) उर्फ ओपन हाऊस झालं. म्हणजे आपल्या वेळच्या "बाईंनी भेटायला बोलावलंय" वाल्या चिठ्ठीचं थोडं व्यापक आणि सॉफिस्टिकेटेड स्वरूप. व्यापक यासाठी की सगळ्यांनाच बोलावतात आणि सॉफिस्टिकेटेड यासाठी की फारच प्रेमाने वागवतात. असो.

आम्ही लेकाच्या वर्गात जाऊन स्थानापन्न झालो. आमच्या आधी २-३ पालक-मुलांच्या जोड्या होत्या. दहा-पंधरा मिनिटांत आमचा नंबर आला. आम्ही बाईंच्या सॉरी टीचरच्या समोर जाऊन पोचलो आणि खुर्ची सरकावून बसणार एवढ्यातच टीचरने "अरे आदितेय. वॉव. कम कम. हाऊ आर यु बेटा?" असं तोंड भरून स्वागत केलं. घरी "आता निदान पाच मिनिटं गप्प बसायला काय घेशील रे बाबा?" चा जप करायला लावणाऱ्या चिरंजीवांनी त्यांच्या (घरातल्या) स्वभावाच्या अगदी विरुद्ध वागत शाळेतल्या रुपाला प्राधान्य देत एवढ्या मोठ्या स्वागताला अजिबात दाद न देता, न बोलता फक्त किंचितसं हसून प्रत्युत्तर दिलं. बाईंनाही ते अपेक्षितच असावं म्हणा.

अभ्यास, डबा खाणं, परीक्षा वगैरे नॉर्मल विषयांवर बोलणं झाल्यानंतर आम्ही टीचरना "लेकाबद्दल काही तक्रार वगैरे नाही ना?" अशा अर्थाचं काहीतरी विचारलं.

आणि एकदम टीचर बोलायला लागल्या. "तुम्हाला एक गंमत सांगते. आदितेय, प्रणव आणि अर्जुन हे तिघे एकदम बेस्ट फ्रेंड्स आहेत. कायम एकत्र असतात. खाणं, खेळणं सगळं सगळं एकत्र करतात. पण.." एक छोटा पॉज... "पण भांडतातही खूप. रोजच्या रोज भांडतात." 

आमचा लेक भांडतो हा आश्चर्याचा मोठा तोफगोळा होता आमच्यासाठी. म्हणजे भांडणं वाईट आहे वगैरेसारखे निष्पाप, निरागस विचार आमचे अजिबात नाहीत. मुलांनी तर भांडलंचं पाहिजे. आम्हीही भांडतो... एकमेकांशी... पण तरीही आमच्या लेकासारखा मुलगा जो उंबरठ्याबाहेर ब्र काढत नाही तो भांडतो हा नाही म्हंटलं तरी एक (पार्शियल सुखद) धक्काच होता आमच्यासाठी.

"आदितेय भांडतो? कशावरून भांडतो...?"

"नो नो." हाहाहाहा.. "आदितेय भांडणार? नो वे." बाईंनी धक्क्यातली हवा शिताफीने काढून घेतली होती. "अहो काय आहे माहित्ये का? प्रणव आणि अर्जुन या दोघांनाही आदितेयच्या शेजारी बसायचं असतं रोज. त्यावरून रोज भांडण. मग मी त्यांना सांगितलं की रोज एकेकाने नंबर लावून बसा आदितेयच्या शेजारी" 

हा सामान्य इसम वर्गात आहे की नाही यासारखे किरकोळ प्रश्न शिक्षकच काय तर इतर मुलांनाही न पडू  देणाऱ्या आणि त्यांच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बापाच्या (आणि बहुतेक आईच्याही) लेकाच्या शेजारी कोणी बसायचं यावरून इतर मुलांमध्ये वाद होतात आणि ते वाद सोडवायला शिक्षिकांना मध्ये पडावं लागतं हा मगाशी बसलेल्या भांडणवाल्या धक्क्यापेक्षाही हजारो रिश्टरने तीव्र असा धक्का होता.

"तर मग होतं काय की" स्टोरी अभी बाकी ही मेरे दोस्त..."ज्याचा आदितेयच्या बाजूला बसायचा नंबर असतो तो दिवसभर एकदम खुश असतो. पण दुसऱ्याला मात्र मागच्या बेंचवर बसायला लागतं. तर हा जो मागच्या बेंचवर बसलेला असतो तो पुढच्या बेंचवर बसलेल्याशी दिवसभर भांडत राहतो. मी त्यांना सांगितलंही की तुम्ही अजून एक मित्र शोधा. चार जणांचा ग्रुप करा आणि चौघे जण मिळून एकत्र मजा करा. पण हे ऐकायलाच तयार नाहीत"

तर असंच अजून थोडा वेळ कौतुक समारंभ ऐकत, निघताना टीचरने दिलेल्या "आदितेय, बेटा खात जा रे थोडा. किती बारीक झालायस" वाल्या आग्रही सूचनेला हसून मान देत तरंगत तरंगत आम्ही वर्गाबाहेर पडलो.

वर्गात टीचरचा कौतुक समारंभ संपल्यावर बाहेर मातोश्रींचा कौ.स. सुरु झाला.

"आदितेय? एवढे बेस्ट फ्रेंड्स? मजा आहे. कधी सांगितलं पण नाहीस आम्हाला घरी."

मातोश्रींच्या एवढ्या कौतुकाच्या 10X उत्साहाला चिरंजीवांनी तितक्याच नीरसपणे उत्तर दिलं..

"हॅ.. त्यात काय? त्यात काय सांगायचं? सिनियरला असताना धनुष आणि कुंजन पण याच कारणावरून भांडायचे की !!!!"

Friday, July 14, 2017

'भारी' (पडलेला) पॉटर !!

"बाबाबाबाबाबामी आज हॅरी पॉटरचे आठही पार्टस संपवले. तिसऱ्यांदा !!! त्यातला फर्स्ट आणि सेकंड तर मी फोर टाईम्स पाहिलेत आधीच आणि बाकी सगळे टू टाईम्स. काय धम्माल येते मायत्येहॅरी पॉटर हिरो आहे एकदम आणि हॉगवर्टस तर बेस्टच एकदम

या सगळ्या गदारोळाच्या दरम्यान मी म्हंटलेलं "हो काअरे वा" हे त्याच त्या हॉगवर्टस की हॉगवर्डसच्या कुठल्याशा तळघरात लुप्त झाल्यागत गायब होऊन गेलं.

घरात पाऊल टाकल्या टाकल्या एवढं 'पॉटरीस्वागत झाल्याने आज स्टेशनवर आपण चुकून 'पावणे दहाव्याप्लॅटफॉर्मवर उतरलो की काय असा मला भास झाला. 

"बाबाबाबाबाबातुला हॉगवर्टसची चार हाऊसेस महित्येत??"लेकाच्या मानगुटी बसलेली रोलिंगबाई लवकर उतरायची चिन्हं दिसेनात. 

"बाबाबाबासांग ना पटकन" एकदा हाक मारून आपल्या जन्मदात्यास ऐकू येत नाही हा अढळ विश्वास त्याने कुठून मिळवला असेल याबद्दल किंचितही शंका न घेता मी कुरबुरलो "हे बघ बेटा. तुला माहित्ये मला हॅरी पॉटरचा फक्त फर्स्ट पार्ट आवडतो पण बाक..."

"म्हणजे सॉसरर्स स्टोन. आणि बुकचं नाव फिलॉसॉफर्स स्टोन" इन्स्टंट करेक्शन !!

"मी बोलू?"

"......." साफ दुर्लक्ष.

"मला फक्त पहिला पार्ट आवडतो आणि तो ही मी फक्त दोनदाच बघितलाय. तुझ्यासारखा चारचारदा नाही."

"पण फर्स्ट पार्टमध्ये कितीतरी वेळा हाऊसेसची नावं दाखवली आहेत"

"हो रे. काहीतरी चार हाऊसेस आहेत आणि मला त्यांची नावं माहित पण आहेत फक्त आत्ता आठवत नाहीत" हापिसात पण कधी इतकं मुत्सद्दीपणे खेळल्याचं मला स्मरत नाही.

तेवढ्यातच ग्रीफेन्डोर का कायसासा एक ओळखीचा शब्द सोडला तर इतर सात आठ इंग्रजी शब्दांचा एक समुच्चय कोपऱ्यातून निमूट चाललेल्या बाईकवाल्याला ज्याप्रमाणे फोरव्हीलरवाले कट मारून जातात तद्वत माझ्या कानाला कट मारून गेले.

"बाबाबाबातुला हॅरी पॉटरचं खरं नाव माहित्ये?" बापाला काहीतरी माहीत नाहीये आणि त्यात आपण चक्क पीयचडी करून ऱ्हायलोय या उत्साही कल्पनेनेच पोरगं नखशिखांत चेकाळलं.

पण मी पण हॅरी पॉटरचं खरं नाव सांगून (जे आत्ता मला अजिबातच आठवत नाहीये) त्याच्या यॉर्करवर चौकार खेचला.

"बाबा आणि हरमायनी ग्रँजरचं?

तिचं नाव कोण विसरेलअसं मनातल्या मनात म्हणत "एमा वॉटसन" असं एकेक शब्दावर जोर देत मी खणखणीत आवाजात उतरलो.

व्हिजिबली हिरमुसलेल्या चिमुकल्या कपिलने अखेरचं अस्त्र काढलं. "आणि रॉन व्हिजलीचं?"

"कोण रॉन व्हिजली?" असं प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आलेलं उत्तर महत्प्रयासाने गिळून टाकून मी प्रश्न ऐकलाच नाही असं दाखवत इकडे तिकडे बघायला लागलो.

मला उत्तर आठवायला घसघशीत सव्वा दोन सेकंदांचा वेळ देत आमच्या बिग बी ने स्वतःच जवाब कॉम्प्युटरजींकडे लॉक करून टाकलं.

"बाबाबाबातुला हॅरी पॉटरचा बड्डे कधीये माहित्ये का?"

मी टी-ट्वेन्टी समजत होतो ती प्रत्यक्षात टेस्ट होती तर. पण आता मी पुरेसा खचलो असल्याने सरळ पांढरं निशाण फडकवून टाकलं.

"१९९७" श्री रोलिंग.

त्यानंतर त्या पॉटऱ्याच्या इतर दोन मित्र मैत्रिणींचेही वाढदिवस सांगून झाले. (जे आत्ता मला अजिबातच.....)

इतक्या वेळ हा राक्षसी हल्ला कौतुकाने पाहणारी माय माऊली आपली आणि लेकाची आवड इतकी जुळत असल्याच्या अतीव आनंदात अनवधानाने पृच्छकर्ती जाहली.

"आणि सोन्यामाझा बड्डे कधी असतो रे?"

आणि अचानक कोहली गडबडलाधडपडला पण तेवढ्याच शिताफीने स्वतःला सावरत उत्तरला "बहुतेक नाईनटीन फॉट्टी सेवन की कायतरी".

Sunday, February 12, 2017

स्पीन

दर महिन्याला बदलणाऱ्या 'टेम्परवारी' खुळांमध्ये आमचे येथे (चि. कृपेकरून) सध्या टेबलटेनिसच्या खुळाचा नंबर लागलेला आहे. दोन साध्या रॅकेट्स (बॅट्स नाही. बॅट म्हंटलं की फाऊल) आणि बॉल घेऊन आमचा गेम सुरु होतो. या समग्र वर्णनाचा उद्देश इतकाच की आमच्या टेबल टेनिस गेममध्ये (सुदैवाने) टेबलला यत्किंचितही स्थान नाही हे जनतेच्या लक्षात आणून देणे. असो.

तर काल असाच गेम सुरु होता. बराच वेळ नीरस टकटक करून झाल्यावर अस्मादिकांनी बॉल किंचित स्पिन करून मारला. त्यामुळे युवराजांना अर्थातच तो मारता आला नाही आणि ते किंचितसे धडपडले.

समोरचा धडपडल्यावर त्याला मदत करायला जाण्याआधी जोरदार हसण्याची उबळ येण्याची प्रवृत्ती -- समोर धडपडणारा आपलाच लेक असला तरी -- काही केल्या शमू शकत नाही. निव्वळ त्या प्रवृत्तीला जागून केवळ आणि केवळ एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूनच अस्मादिक हसले हे त्रिकालाबाधित सत्य काही केल्या युवराजांच्या पचनी पडलं नाही आणि बाणेदारपणे ते उत्तरते झाले.

"अरे ए बाबा, तुझं खेळाकडे लक्ष आहे का? तुला टीटी (टेबलटेनिस म्हंटलं की दुसरा फाऊल) खेळता तरी येतं का? तू बॉल मारतोयस कुठे आणि तो फिरून जातोय कुठे ते तरी बघ !!!!"

बाबा कॉट बाय स्पीन अँड बोल्ड बाय युवराज (इन टीटी)

Saturday, December 10, 2016

पापी 'पेट' : भाग-२

युवराज : बाबा, ते बघ 'पेट क्लिनिक'

बाबा : हम्म

यु : बाबा, पेट क्लिनिक म्हणजे काय?

बा : अरे मला वाटलं तुला माहित्ये अर्थ.

यु : हो रे मला माहिती आहेच. पण तरी तू सांग.

बा : अरे पेट्सना बरं नसलं की पेट क्लिनिक मध्ये नेतात. तिकडे डॉक्टर त्यांना चेक करतात, औषधं देतात.

यु : म्हणजे 'वेट' ना?

बा : काय?

यु : अरे ते अ‍ॅनिमल्सचे डॉक्टर'. त्यांना वेट म्हणतात ना?

बा (लेकाच्या शब्दसंग्रहावर खुश होऊन) : अरे वा. तुला माहिती आहे वेट हा शब्द? कसा काय? शाळेत शिकवला का?

यु : हो. मी तुला आधीच म्हंटलं ना की मला माहिती आहेच.

बा : अरे वा. व्हेरी गुड.

यु : बाबा, पण ते वेट कसे बनतात? कसे बनतात ते अ‍ॅनिमल डॉक्टर'?

बा (लेक्चरच्या आयत्याच मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून घेत ): अरे ते खूप अभ्यास करतात. भरपूर मार्क्स मिळवतात. पेट्सना बरं कसं करायचं ते शिकतात. आणि वेट बनतात.

यु : पण ते बनतात कसे?

बा : काय?? कोण काय बनतात कसे??

यु : अरे ते अ‍ॅनिमल डॉक्टर' बनतात कसे?

बा : अरे.. सांगितलं ना. भरपूर अभ्यास करून.

आता युवराजांचा पेशन्स संपत आलेला असतो. असा कसा मंद बाबा मिळालाय आपल्याला असा भाव चेहऱ्यावर आणून एकेक शब्द हळू आणि स्पष्ट उच्चारत युवराज मंद बाबासाठी सोपी मांडणी करून सांगायला लागतात.

यु : नाही रे. तसं नाही. ते वेट. म्हणजे अ‍ॅनिमल्सचे डॉक्टर'... बरोबर?  म्हणजे अ‍ॅनिमल्स डॉक्टर'.  बरोबर?म्हणजे ते पण अ‍ॅनिमलच असतात ना?? म्हणजे अ‍ॅनिमल्सचे डॉक्टर अ‍ॅनिमलच असतात ना?? म्हणजेच वेट म्हणजे अ‍ॅनिमलच असतात ना?

बाबा गंडस्थळावर आपलं सॉरी कपाळावर हात मारून घेत चारी सॉरी दोन्ही पायांवर मटकन खाली बसतो !!

Friday, December 9, 2016

लचके-झटके

लचके-झटके : भाग-एक

चिरंजीव : आई... आई.... आईईईईईईईईईईईईईई

मातोश्री : अरे हो हो हो. काय झालं काय एवढं एकदम ओरडायला??

चि : आई

मा : पुढे बोलाल का राजे?

चि : आवाज ऐकलास का आई?

मा : कुठला आवाज?

चि : अग आई. केवढा मोठा आवाज झाला.

मा : हो का? मी नाही ऐकला बाळा. मी फोनवर बोलत होते.

चि : अग !! ऐकला कसा नाहीस? केवढा मोठ्ठा आवाज झाला !!

मा (आता किंचित वैतागून) : छे रे. कधी? कुठे झाला आवाज? नाहीतर मी नसता का ऐकला

चि : अग आई. खरंच खूप मोठा आवाज झाला. इतका की मी तर एकदम *लचकलोच*

हसून हसून मातोश्रींची मान खरंच लचकते !!

===============================================

लचके-झटके : भाग-सव्वा

चिरंजीव : आई, पाणी दे ना मला प्लीज

मातोश्री : तुला सांगितलंय ना? पाणी हाताने घ्यायचं. आई देणार नाही सगळ्या गोष्टी हातात.

चि : अग पण मला ते फिल्टरमधलं गार पाणी नकोय. गरम पाणी हवंय. ते कसं हाताने घेऊ मी?

मा : तुला आणि चक्क गरम पाणी हवंय आज?? कसं काय बरं?

चि : अग आम्ही ना आज स्कूलबसमध्ये खूप आरडओरडा करत आलो. खूप मस्ती केली.

मा : अच्छा मग?

चि : अग त्यामुळे माझा घसा जरा *लचकलाय*

मा : काय???? घसा लचकला? म्हणजे?

चिरंजीव (गळ्यावरून हात फिरवत..) : अग इथे इथे आतमधून दुखतंय. 

मा : अच्छा अच्छा. ओरडून ओरडून घसा दुखतोय !!!!

हसून हसून मातोश्रींची गळा उर्फ घसा खरंच लचकतो उर्फ दुखायला लागतो !!

===============================================

लचके-झटके : भाग-दीड

बाबा आणि चिरंजीव स्कुल बसची वाट बघत उभे असतात. अचानक वेगाने येणारी एक कार आणि एक बाईक कचकचून ब्रेक मारून एकमेकांसमोर उभे राहतात. जरा वेळ 'ठेवणीतल्या चौकशा' करून झाल्यावर आपापल्या वाटेने निघून जातात.

चिरंजीव : बाबा, आत्ता बघितलंस काय झालं?

नुकतीच झालेली 'ओव्यांची अदलाबदल' चिरंजीवांनी ऐकली काय आणि आता ते नक्की काय आणि कशाकशाचे अर्थ विचारतील या नुसत्या कल्पनेनेच बाबाला घाम फुटतो.

बाबा : हो. ते दोघेही जोरात गाड्या चालवत होते ना त्यामुळे एकदम समोरासमोर आल्यावर जोरात ब्रेक दाबायला लागला. म्हणून कधीही एवढ्या जोरात गाडी चालवायची नाही.

बाबा नागरीक शिक्षणाच्या धड्यामागे लपण्याचा क्षीण प्रयत्न करतो.

चि : हो रे ते मला माहिती आहे. 

बा : मग?

चि : तो कुत्रा..

बा : (अजूनच भयानक टेन्शनमध्ये येत) काय?

चि : अरे त्या दोन गाड्यांनी एवढ्या जोरात ब्रेक मारला ना की त्या आवाजामुळे तो कुत्रा आहे ना तो एकदम जोरात *लचकला*

बाबा हसून हसून फुटतो आणि हसून हसून मातोश्रींची मान आणि घसा उर्फ गळा का आणि कसे लचकले असतील हे बाबाच्या क्षणार्धात लक्षात येतं !!

Thursday, October 20, 2016

आजोबा

वीकांताच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही आमच्या नेहमीच्या पिझ्झा प्लेसमध्ये येऊन स्थानापन्न झालो. वेटरने ओळखीचं स्माईल देऊन स्वागत केलं. मी आणि सौभाग्यवती असे दोघेच दिसल्याने चिरंजीवांचीही चौकशी करून झाली. 

"हे नवीन काहीतरी दिसतंय.. ट्राय करून बघू" किंवा "हे टुडेज स्पेशल आहे हे मागवू" हे असलं काहीतरी आपल्या खाद्यधर्मात बसत नसल्याने असंख्य वेळा मागवून झालेला टेस्टेड अ‍ॅड व्हेरीफाईड टिपिकल लाडका पिझ्झा अस्मादिकांनी ऑर्डर केला आणि "आज काहीतरी वेगळं घेते.", "मला हा पास्ता कधीपासून ट्राय करायचा आहे. पण चांगला असेल ना?" असे एकेक टप्पे पार करत अखेरीस "जाउदे. नकोच ते" म्हणत सौभाग्यवतींनी अस्मादिकांच्या पिझ्झामधला अर्धा वाटा घेण्याचा उद्देश जाहीर करताच मी चपळाईने पिझ्झाची ऑर्डर गुणिले २ केली.

आजूबाजूच्या टेबल्सवर २-३ कपल्स होती, दोन मुली होत्या, कॉलेजचे ग्रुप्स होते. पाचेक मिनिटांत वेटर आला आणि आमच्या टेबलवर एक केकचा तुकडा ठेवून जायला लागला.

"अरे वा. केकच्या आकाराचा पिझ्झा"

"हाहाहा. नाही सर. केकच आहे. त्या समोरच्या टेबलतर्फे आहे सगळ्यांना" आम्हाला कर्णाकृती असलेल्या टेबलच्या दिशेने बोट करून वेटर उत्तरला.

केक चांगला चविष्ट होता. आम्ही दोघेही उठलो आणि ककृ टेबलजवळ जाऊन उभे राहिलो. सात जण होते. चार मुलं आणि ३ मुली. सगळे १५-१७ वयोगटातले चांगल्या घरातले वाटत होते. ग्रुपच्या मध्यभागी एक हसरी मुलगी बसली होती. डोक्यावर टियारा (मुकुट) आणि एका खांद्यावरून खाली कंबरेच्या दिशेने जाणारा मिस वर्ल्ड वाल्या मुली घालतात तसा रिबिनीचा पट्टा उर्फ सॅश होता. इन शॉर्ट शी वॉज द बड्डे गर्ल. आम्ही दोघांनी पुढे होऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि केकबद्दल आभार मानले. तिने हसून शुभेच्छांचा स्वीकार केला आणि म्हणाली "थँक्स. पण हा केक बर्थडेसाठी नाहीये."

"मग??"

छान हसून शेजारी बसलेल्या तिच्याच वयाच्या आणि उंचीच्या, शिडशिडीत अंगाच्या बोकडदाढीवाल्या मुलाकडे बोट दाखवून ती म्हणाली

"वुई आर इन रिलेशनशिप नाऊ. वुई कन्फर्मड इट"

आम्हाला चटकन कळलं नाही. आम्ही किंचित हसलो आणि परत आमच्या टेबलवर येऊन बसलो. रिलेशनशिप स्टेटसचे प्रकार फेसबुकापुरते मर्यादित आहेत या आमच्या समजाला धक्का बसला होता. हे आमच्या डोंबिवलीत घडतंय यावर विश्वासच बसत नव्हता. अर्थात चूक किंवा बरोबरचा किंबहुना ते आम्ही ठरवण्याचा किंवा त्यांना जज करण्याचा प्रश्नच नव्हता. आकर्षण, हुरहूर, होकार, मग प्रेमाचं हळुवार नातं आणि मग मोजक्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी गुपित शेअर करणं अशा (घिसापिट्या) टप्प्यांतून गेलेल्या आमच्या पिढीतल्यांना "रिलेशनशिप कन्फर्म करणं, त्याचं  सेलिब्रेशन करणं आणि त्याबद्दल पार्टी देणं" हे झेपतच नव्हतं.

थोड्या वेळाने आमची पिझ्झाची ऑर्डर घेऊन वेटर आला. जाताना केकची डिश घेऊन जायला लागला.

"गेल्या आठवड्यात पण दोन तीन जणांनी असंच चुकून बर्थडे वीश केलं होतं" तो म्हणाला.

"नक्की किती पार्ट्या होतात अशा दर आठवड्याला?"

"सहसा वाढदिवसाच्याच असतात. पण अशा रिलेशनशीपच्याही असतात अधून मधून"

आम्ही फक्त हसलो.

पिझ्झा खाऊन झाल्यावर हात धुवायला म्हणून मी उठलो. समोरून दुसऱ्या कुठल्यातरी ऑर्डरची डिश घेऊन वेटर येत होता. माझं समोर लक्ष नव्हतं. माझा त्याला धक्का लागणारच होता. इतक्यात तो चटकन थांबला आणि म्हणाला

"सॉरी आजोबा"

"आ जो बा ????" मी चीत्कारलो.

"हाहाहा सर. तुम्हाला कसं आजोबा म्हणेन मी." मी उठलो तेव्हा माझ्या मागून एक आजोबा हात धुण्यासाठी उठले होते. त्यांना वेटरचा धक्का लागता लागता वाचला होता. त्यांच्याकडे बोट दाखवून वेटर म्हणाला,

"मी यांना म्हणालो."

आजोबा माझ्याकडे बघून हसले. मी ही हसलो.

समोरच्या हसऱ्या ग्रुपमधून मोठमोठ्याने चिडवण्याचे, हसण्या खिदळण्याचेआवाज येत होते. ते स्वतःच्याच विश्वात होते.

मी वेटरकडे बघितलं आणि म्हणालो. "अगदी बरोबर आहे तुझं. काहीही चूक बोलला नाहीस तू. मी आजोबाच आहे !!!!"

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...